सिरीज तिसरी: ब्लॅक मिरर

सूचना:
या लेखात स्पॉयलर्स आहेत. खास करून ब्लॅक मिररच्या या एपिसोड्स विषयी: नॅशनल अँथम, फिफ्टीन मिलियन मेरिट्स, मेन अगेन्स्ट फायर, एन्टायर हिस्टरी ऑफ यु

Black Mirror
धी आपण गाडीतून मस्त चाललेले असतो फॅमिलीबरोबर... सगळं सामान भरून लांब...
किंवा बाईकवरून डेमला पाठी घेऊन... टोचत असतात मखमली सुखद भाले आपल्या पाठीला...
किंवा एकटेच एंट्री टाकतो क्लबमध्ये... कडक शर्ट पॅन्ट मारून...

म्हणजे असं इन्व्हिन्सीबलच वाटत असतं आपल्याला...
पण अचानक कुठूनतरी कोणतरी भलं माणूस येतं आणि सांगतं,

"बॉस आपका डिक्की खुल्ला है..."
किंवा
"मॅडमका ओढणी टायरमे फसनेवाला हय..."
किंवा
"दोस्ता तुझी झिप् उघडी आहे..."

आणि बाल-बाल वाचतो आपण त्या संभाव्य आर्थिक/शारीरिक/मानसिक डॅमेजपासून!

'ब्लॅक मिरर'नं सुद्धा तसंच जागल्याचं काम केलंय... किमान माझ्यासाठी तरी!!

इथे ब्लॅक मिरर म्हणजे काळाशार आरसा... स्क्रीन...
आपल्या फोनचा, टॅबचा, टीव्हीचा, लॅपटॉपचा
काळा आरसा आणि त्याची काळी जादू...
या काळ्या जादूला आमच्या मालवणीत चपखल शब्द आहे: 'देवस्की'!

देवस्की म्हणजे एखाद्या माणसाचं गुंतत जाणं अनाकलनीय अभद्र गुंत्यात.
बरेचदा समजून-उमजून!

तसेच तर गुंतलोय तुम्ही आणि अर्थातच मी:
व्हॉट्सॅपच्या मळमळत्या फॉरवर्ड्समध्ये...
आणि फेसबुकच्या लाचार लाइक्समध्ये...
बाहेर आलेल्या आतड्यांचे आणि कोळसा होत जळणाऱ्या देहाचे व्हिडीओ बघतोय आपण जिभल्या चाटत...
आणि शेअर करतोय सेलिब्रिटींच्या हागल्या-पादल्या गोष्टी...
निसरानी शिक्षा ठोठावतोय आरामखुर्चीतुन...
आणि स्क्रीनवरची क्षुद्र षडयंत्र बघतोय आख्ख्या खऱ्या विश्वरुपाकडे पाठ फिरवून.

हे सगळं अगदी अगदी आरशात दिसावं तसं लख्ख दाखवतो ब्लॅक मिरर:

त्याचा पहिलाच एपिसोड: 'नॅशनल अँथम ' सगळ्यात प्रसिध्द आहे, बहुतेक त्याच्या विचित्र आणि हिडीस प्रिमाईसमुळे...
ती विचित्र हिडीस गोष्ट पहायला लोक इतके आतुरतात की मेन पॉईंटच विसरून जातात हे या एपिसोडचं स्टेटमेंट थोरच आहे.
ह्यातले ओस पडलेले रस्ते बघून हटकून मला भारत - पाक फायनल आठवते.
आणि इतकी वर्षं भारतात (आणि पुरुष देहात) राहूनही न कळलेला त्या ओसाडीतला पॉईंटसुद्धा.

मग येतं 'फिफ्टीन मिलियन मेरिट्स':
ह्यातलं ते ऍड्सचा मारा करणारं, गरज नसलेल्या व्हर्च्युअल गोष्टी घ्यायला लावणारं, वांझोट्या पॉर्नचं फ्यूचरिस्टिक जग...
पण फ्यूचरिस्टिक का?
अरे हे तर आत्ता या क्षणी या इथे चाललंय ना?
तशाच भोवंडून टाकणाऱ्या जाहिराती, खोट्या खोट्या शॉपिंगच्या गरजा आणि ते नकली आसुरी रिऍलिटी शोज:
या एपिसोडमधला शेवटचा मोनोलॉग इतका खरा आहे की आपलीच आपल्याला लाज वाटावी,
"...And the faker the fodder is the more you love it because fake fodder’s the only thing that works anymore, fake fodder is all that we can stomach...
Cause we’re so out of our minds with desperation we don’t know any better. All we know is fake fodder and buying shit. That’s how we speak to each other, how we express ourselves is buying shit..."

एकंदरीतच डेटा वाचण्या-बघण्या आणि शेअर करण्याच्या या गलबल्यात आपल्याला येत चाललेलं रेमेडोकेपण ही या सिरीजची थीम आहे.

क्षणोक्षणी हर एक एपिसोडला मला आठवण येत रहाते आपलीच:

मरणाऱ्या माणसाला मदत करायचं सोडून फोनचा कॅमेरा उपसणारे आपण (व्हाईट बेअर)

एक-एक लाईक आणि सोशल अप्रूव्हलसाठी तोंडं वेंगाडत जीव टाकणारे आपण (नोज डाइव्ह)

राजकारणात सप्तपाताळाच्याही खालची पातळी गाठणारे आपण (वाल्डो मोमेन्ट: खूप खिन्न करणारा मेलॅन्कॉलीक पण ब्रिलियंट एपिसोड)

दात ओठ खाऊन ट्रोल करत रहाणारे आपण (हेटेड इन द नेशन)

हेलिकॉप्टर पॅरेंटिंग करणारे आपण (आर्क एंजल)

ते आणि हे...
भटुरडे, जय भीम, मल्लू, कटवे, बिहारी, भय्या... बकरवाल!
दिल्लीची पब्लिक...
सेंट्रलवाले, वेस्टर्नवाले...
मुंबईकर, पुणेकर...
बायका...
जिकडे मिळेल तिकडे, जसं मिळेल तसं...
वेचून वेचून प्रोफाईलींग करून ठेचून ठेचून मारणारे आपण (मेन अगेन्स्ट फायर)

आपणच तर आहोत की हे सगळे.
आणि आपलंच हे वेडंबिद्रं रूप दाखवल्याबद्दल आभारच ब्लॅक मिररचे.
हे सगळंच खूप खूप खूप महत्त्वाचं आहे.

पण...

खास करून एका एपिसोडनं (एन्टायर हिस्टरी ऑफ यु) एक जो ज्ञानाचा ब्रम्हकण दिलाय ना तो सांगायलाच हवा इथे माउली:

कसं आहे ना की आपलं आणि आपल्या पार्टनरचंही एक आयुष्य असणारे...

एकमेकांना माहीत नसलेलं...
आणि ते तसंच असू द्यावं...
तो कॅन ऑफ वर्म्स न उघडेललाच बरा.
एकमेकांच्या काही बाजू रिस्पेकटफुली अंधाऱ्या राहू द्याव्यात.
मोह पडलाही असेल त्या माणसाला कदाचित... एखाद्या रात्री...
पण आपण त्या विद्रुप सत्याच्या मेडुसाकडे बघून नात्याचा दगड करणार...?
की त्या चुकार क्षणाच्या आगे आणि मागे जीवाला जीव देणारं आपलं माणूस जपणार??

हे ज्याचं त्यानं ठरवायचं...

...

...

माझं ठरलंय!

...

थँक्स टू ब्लॅक मिरर!!!

http://nilesharte.blogspot.in/2018/05/blog-post_11.html#more

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)