'उत्तरमामायण' - मधुकर तोरडमलांची चौथी घंटा

मधुकर तोरडमलांचे 'तिसरी घंटा' हे आत्मचरित्र प्रसिद्धच आहे. तोरडमल त्यामानाने तरुण आणि कार्यमग्न असतानाच ते लिहिले गेले.
त्याला पार्श्वभूमी अशी की अरुण सरनाईक या त्यांच्या अभिनेत्या मित्राचे अपघाती निधन झाले. ते होण्याअगोदर त्या दोघांचे असे ठरले होते की सरनाईकांनी आत्मचरित्र सांगायचे आणि तोरडमलांनी ते लिहायचे. त्यासाठी पंधरा दिवस पन्हाळ्याला जाऊन रहायचे असा बेतही शिजत होता. आणि अचानक अपघात झाला.
आता आपलेही असेच काही झाले तर? आत्ता सुचते आहे तोवर लिहून काढावे म्हणून त्यांनी 'तिसरी घंटा' वाजवली. मात्र त्यानंतरही तोरडमल दोन अडीच दशके कार्यरत राहिल्याने अनुभवांचे संचित साठतच गेले. 'उत्तरमामायण' (तोरडमलांचे टोपणनाव 'मामा' हे विदीत आहेच) हे त्याचे लिखित प्रतिबिंब.

मात्र हे एका दिशेने जाणाऱ्या प्रवाहासारखे नेहमीसारखे आत्मचरित्र नसून सुचतील तशा सांगितलेल्या आठवणी असे त्याचे स्वरूप आहे. मात्र हे पुस्तक स्वतःच्या पायावर उभे आहे. 'तिसरी घंटा' वाचले असल्यास काही संदर्भ जास्त सहजतेने जुळतील. पण ते वाचले नसल्यास काही अपुरे वाटणार नाही.

गांधीवधातील एक जन्मठेपी आरोपी विष्णू करकरे हे नगरचे. पकडले जाण्याच्या वेळेस ते नगरच्या नाट्यचळवळीत क्रियाशील होते. ते सुटका होऊन परत आल्यावर तोरडमलांनी त्यांची काही (नाटकातील) स्वगते आणि प्रवेश हे ध्वनीफितीवर नोंदवून घेतले. नंतर गप्पा मारताना त्यांच्या गांधीवधातील सहभागाबद्दलही बोलणे झाले. ते सर्व तोरडमलांनी हातचे राखून न ठेवता, पण आपला तोल ढळू न देता, लिहिले आहे.

बाबा, बुवा आणि महाराज यांबद्दल तोरडमलांना चांगलाच तिटकारा. त्याबद्दलच्या लेखात त्यांनी अगदी सणसणीत दांडपट्टा फिरवला आहे. केवळ लेखनासाठी लेखन न करता आपणही कुठेतरी बदलाचे वारकरी व्हायला हवे ही तळमळ या लेखातून दिसून येते.

'संत तुकाराम' या चित्रपटाचे रसग्रहण करून करून सर्वांनी एव्हाना त्याचे पार भुस्कट पाडले आहे. पण तोरडमलांची विवेचक दृष्टी त्यातही काही कंगोऱ्यांवर झोत टाकून मजा आणते.

नगरच्या नाट्यचळवळीचा आढावा घेणारा लेख अगदीच छोटा आहे. पण त्यातील ध्वनीमुद्रणाचे आणि प्रकाशयोजनेचे जे अनुभव नोंदलेले आहेत ते रंगभूमीवर (स्वतःहून) पाऊल टाकलेल्या कुणालाही वाचायलाच हवेत असे आहेत. आणि त्या लेखाच्या अखेरीसचे नव्या मंडळींचे अगदी 'आतून' आलेले कौतुकही.

मारोतराव आणि अर्जुनराव हा लेख विरस करतो असे म्हणत नाही, पण अगदीच रविवारच्या आवृत्तीचा संपादक मानगुटीवर बसलेला असताना लेख 'पाडावा' तसा तो वाटतो.

'तीन बालमित्रांची गोष्ट'मध्ये अगदी लख्ख आत्मचरित्र आहे. वैयक्तिक तपशील, स्थलकालसापेक्ष उल्लेख आदि.

'रहस्य गुलदस्त्यात आणि स्फोट भररस्त्यात' हा लेख नक्की काय आहे याचा अंदाज लागत नाही. तोरडमलांनी केलेला शोध-पत्रकारितेचा प्रयत्न वाटतो. पण त्यात मध्येच त्यांच्यातला लेखक जागा होऊन त्या घटनेत 'आत' शिरू पहातो. संगमनेरात चाळीसेक वर्षांपूर्वी घडलेला एक 'एन्काउंटर' हा या लेखाचा विषय.

अरुण सरनाईकांप्रमाणेच दत्ता भटांचेही तोरडमलांशी चांगलेच मैत्र जुळले होते. 'तिसरी घंटा'मध्ये त्यावर सविस्तर आहेच. 'कल्पक योजना, योजक कल्पना' या दत्ता भटांच्या तोंडी असलेल्या वाक्प्रचाराला मथळा करून लिहिलेला लेख छान खुसखुशीत झाला आहे.

तोरडमलांचे मद्यप्रेम त्यांनी कुठेच झाकून ठेवलेले नव्हते आणि नाही. 'गुजराथी दारूबंदी आणि मी' यात तत्संबंधी लिखाण आहे. मात्र 'तिसरी घंटा'मध्येही यातील एका घटनेचे सविस्तर वर्णन असल्याने इथे द्विरुक्ती वाटते. मात्र दत्ता भटांच्या तोंडी असलेल्या रहस्यमय ओळी (आवडक चिवडक दामाडू, दामाडूचा पंताडू, पंताडूची खोड मोडली, हिरवा दाणा कुडकुडी) खासच!

'गुरूपौर्णिमा' या लेखात त्यांना अभिनयाच्या क्षेत्रात भेटलेल्या काही गुरूंबद्दल लिहिले आहे. त्यात प्रभाकर गुप्त्यांनी केलेली पायांबद्दलची सूचना, किंवा दृष्टी गेलेले भालजी हातांनी तोरडमलांचा चेहरा 'बघून' जे सांगतात ते, परत रंगभूमीच्या वेड्यांना खुषावतील.

'ऑपरेशन पोलो' हे बरेचसे आत्मचरित्रात्मक झाले असते. पण स्वसापेक्ष उल्लेखांनी सुरुवात करून तोरडमल परत वर्णनात्मक पत्रकारितेकडे वळतात आणि जरा गडबड होते.

बाबा, बुवा, महाराज, चमत्कार यांचा तिटकारा असलेले तोरडमल 'त्र्यंबकेश्वर'सारखा लेख लिहितात याचे आश्चर्य वाटू शकते. पण त्यांच्या शेवटच्या ओळी खुलासा करतात. "हे अनुभव जसे आले तसे इथे कथन केलेले आहेत. त्यातून कुठलाच निष्कर्ष मी काढला नाही. कुणी काढला तर तो जाणून घ्यायला मला आवडेल".

'एक न केलेले नाटक' यात परत आत्मचरित्र उमटते. अर्थात वसंत कानेटकर हयात नसताना असे लिहावे का याबद्दल मतभेद होऊ शकतात.

'छंद' यात आत्मचरित्र बाजूला राहून एक हलकाफुलका ललित लेख सामोरा येतो. 'खवय्येगिरी'मध्ये थोडी वैयक्तिक उल्लेखाची फोडणी पडते, पण तोही आत्मचरित्रात्मक नसून ललित लेखच म्हणता येईल.

'आनंदयात्री' हा खरे तर समारोपाचा लेख. एकंदर सूरही तसाच लागला आहे. पण 'सामाजिक बांधिलकी आणि मी' लिहून तोरडमलांनी जाता जाता चार सटके ठेवून दिले आहेत!

आत्मचरित्रात्मक असूनही मुखपृष्ठावरील तोरडमलांचा फोटो (तोरडमलांची रुबाबदार छबी डोळ्यांसमोर असल्यास हा फोटो फारच केविलवाणा वाटतो) सोडल्यास एकही छायाचित्र नाही.
एकंदरीत, 'एक' पुस्तक म्हणून थोडे विस्कळीत वाटले तरीही त्याचा फारसा अडथळा वाचनानंदात येऊ नये.

प्रकाशक: मॅजेस्टिक प्रकाशन.
प्रथमावृत्ती: २४ जुलै २००७

पूर्वप्रसिद्धी: 'मनोगत'

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

"तिसरी घंटा" फार फार पूर्वी वाचले होते. त्यानंतरही दोन्-चार लोकांची प्रथमपुरुषी एकवचनी वर्णनात्मक पुस्तके वाचली.
पण पुढे पुढे कंटाळा येत गेला. एखादा कलाकार कलाकार म्हणून जाम आवडत असला तरी त्याचे वैयक्तिक हेवेदावे, त्यातली त्याची भूमिका वगैरे कशाला समजून घेत बसायचे हेच कळेनासे झाले.(उदा:- मोहन वाघ आणि तोरडमलांचे रॉयल्टीवरून वगैरे वाद. "तो मी नव्हेच" चे प्रथमनिर्माते मो ग रांगनेकर आणि अत्रे ह्यांचे कोर्टकज्जे व त्यात काहिशी कातडीबचाउ भूमिका घेणारे तेव्हाचे होतकरु प्रभाकर पणशीकर; कधी दादा कोंडक्यांच्या तोंडून महन्मंगल,सर्वज्येष्ठ समजल्या जाणार्‍या गाय्८इकेअबद्दलची दुसरी बाजू पाहून आपल्या लाडक्या नि आदरणीय व्यक्तीचे पायही कसे मातीचेच असतात हे समजल्यावर कधी कधी त्रासही व्हायचा, म्हणून म्हटलं सोडून द्या.) एखादा गायक आवडतो ना, कार्यक्रम ऐका नि सोडून द्या. नंतर तो मद्य पितो की बासुंदी त्याचे तो पाहून घेइल.
ह्यामुळेच लागूंचे आत्मचरित्र घरात पडले असतानाही कधी वाचले नाही.
स्वतः बद्दल बोलणारा पण त्यातूनही कुठलेही हेत्वारोप न करणारा एकच माणूस सापडला तो म्हणजे पु ल. त्यांच्या बाल्पपणातल्या आठवणी. होतकरु असतानाच्या काळातल्या साध्या सुध्या घरगुती घटना, त्यांच्या नजरेतून कोकणातल्या गावाचे पुसटसे उल्लेख व चिमुकल्या चकरित त्यांना गावलेला युरोप, हे सगळे ती ती ठिकाणे समजून घ्यायला मदत करतात. पु ल तेवढे ग्रेट आणि अमुक अमुक कसा ड्यांबिस असे सुचवण्याचा कुठेही प्रकार वाटत नाही.
अर्थात वैचारिक वर्तुळात पु ल आवडणे हे सुमार बुद्धीचे लक्षण मानतात म्हणे, पण तेवढ्यासाठी आम्ही आमची आवड नाही दडवू शकत बुवा.
तोरडमल ह्यांच्या भूमिका काही मोजक्या भूमिका मी पाहिलेल्या आहेत, त्यासर्वच आवडल्या.
तोरडमलांचे दोन तीन छोटेखानी लेखही आवडले होते. एक म्हणजे गांधींच्या खुनात सहभागी असलेल्या व्यक्तीची त्याम्नी घेतलेली मुलाखत.(नंतर त्या खटल्याचे महत्वाचे सर्व सरकारी दस्तावेज सावकर डॉट ऑर्ग शी पडाताळून पाहिले. जबानीशी तंतोतंत जुळत होते.जबानीतून सावरकरांकडे होणारा अंगुलीनिर्देश आणि त्यावर सावरकरांनी केलेला बचावही कोर्टासमोरिल उत्कृष्ट बचावाचे उदाहरण म्हणता यावे.)
दुसरा लेख म्हणजे कुख्यात "नाझी" सत्तेच्या काळात सर्वाध्दिक ज्यूंचीए हत्याकांडे करण्याबद्दल कित्येक वर्षांनी इस्राइलने पकडलेला अ‍ॅडॉल्फ आइअकमन हा नाझी जर्मनीमधील "ज्यू समस्येचा विशेषज्ञ" व त्याच्या खटल्याची, कृत्यांची माहिती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मराठीतील बहुतांशी (अगदी 'सांगत्ये ऐका' ही) आत्मचरित्रे म्हणजे 'मी' पणाने ओतप्रोत भरलेले रसायन असते. अत्यंत अलिप्तततेने लिहिण्याचा आविर्भाव करणारे आत्मचरित्रही प्रसंगी 'माझेच कसे बरोबर होते' या मुद्द्याकडेच वाचकाला नेते. मग त्यातील मजकुराला संबंधिताने प्रतिवाद करायचा तर मग त्याने/तिने आपले आत्मचरित्र लिहिले पाहिजे, मग पुनश्चः ते व्यक्तीव्यक्तीच्या स्वभावाचे अपरिहार्य असे डिसेक्शन. वाचक तरी काय, शेवटी त्या कलाकार/लेखकाशी कुठेतरी केव्हातरी नाळ जुळलेली असते म्हणून त्या पलिकडे काही वाचायला मिळते का अशाच भाबड्या समजुतीने त्याकडे वळतो....आणि शेवटी पदरात पडते ते हेच की सार्‍यांचेच पाय मातीचेच.

तरीही "लागूंचे आत्मचरित्र घरात पडले असतानाही कधी वाचले नाही.".....या श्री.मन यांच्या निर्णयाबद्दल इतकेच म्हणू शकतो की, 'लमाण' हे रुढार्थाने आत्मचरित्रे नसून डॉ.श्रीराम लागू या "नाट्यकलाकाराकाचा नाट्यप्रवास" या एकाच गोष्टीवर आधारित असे माहितीवजा पुस्तक आहे. ही बाब खुद्द लेखकानेच प्रस्तावनेत स्पष्ट केली आहे. हां...सुरुवातीला घरगुती गोष्टी, कुटुंब, मित्र, शिक्षण आदीचे उल्लेख जरूर आहेत, पण ते एवढ्यासाठीच की डॉक्टरांची नाट्यसमजूत तिथून कशी प्रगल्भ होत गेली या कारणापोटी.

"तिसरी घंटा" आणि पणशीकरांचे "तोच मी" यांची एकत्रच खरेदी झाली होती. पण आता तोरडमलांचे उत्तरायण वाचनयादीत येईल असे वाटत नाही.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'मन' यांना विनंती आहे की त्यांनी लागूंचे 'लमाण' जरुर वाचावे. एवढा मोठा नट असूनही त्यांनी कुठेही 'मी'पणा येऊ दिला नाहीये.
चौकस यांना इथे पाहून खूपच आनंद झाला. त्यांचे दुसरीकडचे लिखाण वाचून ते एक प्रगल्भ लेखक आहेत याची खात्री पटली होती.
'तिसरी घंटा' वाचले नव्हते. आता वाचीन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१ लमाण बद्दल सहमत आहे.
सुनीताबाईंचा 'आहे मनोहर तरी' हा असा 'स्वतःच्या बाहेर जाऊन' स्वतःला तटस्थपणे पाहण्याचा बर्‍यापैकी यशस्वी प्रयोग अनेकांनी वाचला असेलच, पण तटस्थ म्हणलं की हे पुस्तकही आठवलं म्हणून उल्लेख केला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गांधींच्या मृत्यूविषयी बोलताना 'गांधीवध' म्हणता की 'गांधीहत्या' यावरून लेखकाची त्याविषयीची भूमिका ठरत असते असा संकेत आहे. इथे वापरलेला 'गांधीवध' हा शब्द तोरडमलांचा की धागालेखकाचा?
एकेका प्रकरणाबद्दल एखादंच वाक्य देण्याऐवजी काहीशा विस्तारात सांगितलं असतं तर आवडलं असतं. निव्वळ एखादी गोष्ट आवडली असं सांगण्याऐवजी ती गोष्ट काय आहे आणि का आवडली याविषयी थोडं सांगितलं तर वाचकाला अधिक रस वाटतो. उदाहरणार्थ, 'संत तुकाराम'चे कोणते कंगोरे दिसले? 'मारोतराव आणि अर्जुनराव' हा लेख काय आहे? 'त्र्यंबकेश्वर'मध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे असे प्रश्न हा धागा वाचून पडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गांधींच्या मृत्यूविषयी बोलताना 'गांधीवध' म्हणता की 'गांधीहत्या' यावरून लेखकाची त्याविषयीची भूमिका ठरत असते असा संकेत आहे.

असा संकेत निर्माण झालेला दिसतो खरा. परंतु हा संकेत ज्या तथाकथित दाव्यावर * आधारित आहे, त्या दाव्यात दम नसावा, असे मानावयास जागा आहे, असे दिसते. केवळ एका अश्लाघ्य कृत्याचे कसेबसे लंगडे समर्थन करण्याकरिता ओढूनताणून जमवलेली ही पुस्ती असावी, अशी शंका येते.

सविस्तर विवेचन जमल्यास पुन्हा कधीतरी; तूर्तास, अन्यत्र प्रकाशित झालेल्या एका वेगळ्याच विषयावरील एका धाग्याखालील एका तत्संबंधी उपधाग्याकडे या निमित्ताने लक्ष वेधू इच्छितो.


* पक्षी: 'हत्या' आणि 'वध' यांच्या अर्थच्छटांत फरक आहे, हा दावा, आणि त्या फरकाचे विवेचन, वगैरे. 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकात हा दावा अधोरेखित झाला होता. हा दावा त्या नाटकातच जन्मला, की त्याअगोदर तो प्रत्यक्षात केला गेलेला आहे, याबाबत निश्चित कल्पना नाही.

(अतिअवांतर: पाकिस्तानी दूरचित्रवाणीवरील काही चर्चांच्या कार्यक्रमांत, लाल टोपी घालणारे एक सद्गृहस्थ काहीबाही दावे करीत असतात. 'वध' विरुद्ध 'हत्या' या संदर्भातील उपरोल्लेखित दावा आणि 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकातील त्याचे सादरीकरण पाहून कोणास सदर लालटोपीधारी गृहस्थांची आठवण आल्यास आश्चर्य वाटू नये.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परिक्षण वजा या लेखनाच्या निमित्ताने पुस्तकाचा आढावा आवडला. पुस्तक दिसले तर जरूर वाचेन असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हत्या - Murder; killing in general, but understood only of that killing (whether of man or of any animal) which is viewed as criminal.
वध - Killing.

संदर्भ : मोल्सवर्थ

>>'हत्या' आणि 'वध' यांच्या अर्थच्छटांत फरक आहे, हा दावा, आणि त्या फरकाचे विवेचन, वगैरे. 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकात हा दावा अधोरेखित झाला होता. हा दावा त्या नाटकातच जन्मला, की त्याअगोदर तो प्रत्यक्षात केला गेलेला आहे, याबाबत निश्चित कल्पना नाही.<<

आठवतं तेव्हापासून पुण्यात 'गांधीवध' हा शब्द 'नरकासुरवध', 'बकासुरवध' वगैरेंच्या अर्थच्छटेनं वापरलेला ऐकिवात आहे. त्यामुळे हा दावा त्या नाटकात जन्मलेला नाही, तर पूर्वीपासून प्रचलित असलेल्या शब्दप्रयोगाचा वापर करून त्या नाटकात एक प्रथा पाळली जाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अफजलखानाचा वध.....

फळाची इच्छा न ठेवता कर्म आचरल्यास कोणताही दोष मानता येत नाही. श्रीशिवाजीमहाराजांनी स्वताचे टीचभर पोट भरण्यासाठी काहीही केले नाही. सात्विक बुद्धीने, परोपकाराने त्यांनी खानाला मारले. आमच्या घरात जर चोर शिरले आणि त्यांना घालवण्याएवढा जोर आमच्या मनगटात नसेल, तर त्यांना खुशाल कोंडून घालून जाळावेत. आपल्या जन्मभूमीत त्यांना हाकलून लावायचा महाराजांनी जो पराक्रम केला त्यात पराभिलाषाचे पाप नाही....लोकमान्य टिळक[संदर्भः मंडालेचा राजबंदी(अरविंद गोखले)]

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...............................................................
माणूस जगात शोभून दिसतो तो मोत्यांच्या हारांनी नव्हे तर घामाच्या धारांनी

धन्यवाद चौकस. हे पुस्तक मी वाचले आहे पण पार विसरून गेलो होतो. खूप आवडले होते. मला वाटते त्यामध्ये एक "निजामा" विरुध्द च्या बंडा वर लेख आहे. तो वाचून आपला शाळकरी इतिहास किती भंपक आहे हे उमजले होते.
परत एकदा हया परिचयाची साभार पोच !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0