चावडीवरच्या गप्पा - 'टोल'वाटोलवी

अरे वा!, सामान्यांची, आम जनतेची काळजी घेणारे आहे कुणीतरी”, खणखणीत आणि अनुनासिक आवाजात बोलत घारूअण्णांनी चावडीवर हजेरी लावली.

“काय झाले?”, कोणीतरी विचारले.

“काय? आजकाल पेपर वाचायचा सोडून सकाळी सकाळी नातवासाठीच वापरता की काय?” घारूअण्णा एंट्रीलाच नाट लागल्यामुळे खवळले. “अरे त्या राजने, म्हणजे आजच्या तरुणाईच्या भाषेतल्या राजसाहेबांनी टोलवसूली विरूद्ध आवाज उठवला आहे, टोल भरू नका असा आदेश दिला आहे जनतेला”. घारूअण्णांचा तांबडा चेहेरा आनंदाने फुलून गेला होता.

“चला! म्हणजे भैय्यांचा मुंबैतला प्रॉब्लेम संपला म्हणायचा, सगळ्या भैय्यांना महाराष्ट्रियन बाप्तिस्मा देऊन झाला बुवा एकदाचा, हुश्श”, इति बहुजनहृदयसम्राट भुजबळकाका.

“तर तर, महाराष्ट्रभर सगळ्या दुकानांच्या पाट्यांचे मराठीकरणही करून झाले की”, शामराव बारामतीकरांनी भुजबळकाकांची री ओढली.

“ह्या... ह्या... असल्या खेकडा वृत्तीनेच आपण आपले नुकसान करून घेतो आहोत. अरे, टोल नाक्यांवर प्रचंड गैरव्यवहार होत असून टोल वसुलीमध्ये कोणताही पारदर्शकता नाहीयेय. इतक्या वर्षांमध्ये जमलेला टोलचा पैसा नेमका कोठे गेला?”, घारूअण्णा आवेगात विचारते झाले. त्यांचे अंग आवेशाने किंचीत कंप पावत होते.

“ह्म्म्म...पारदर्शकताsss”, भुजबळकाकांचा उपरोध.

“तुम्ही नुसते उसासेच टाकत बसा. बघा बघा, त्या राजने टोलनाक्यांवर मनसेच्या सैनिकांना सलग चौदा दिवस पाहाणी करायला लावून किती वाहने येतात व टोल भरतात याची नोंद करायला लावली. त्याशिवाय शासकीय स्तरावरही माहिती गोळा करायला लावली. ह्याला म्हणतात जनतेचा कैवारी!”, घारूअण्णा त्याच आवेगात आणि आवेशात.

“सैनिकsss, कैवारीsss, ऐकतोय, ऐकतोय, चालू द्या”, भुजबळकाकाही त्याच उपरोधात.

“काय? चालू द्या काय? त्या टोलच्या बदल्यात जनतेला नेमक्या काय सुविधा मिळतात हे जोपर्यंत सरकार स्पष्ट करत नाही तसेच त्यात पारदर्शकता येत नाही तोपर्यंत जनतेने टोल भरू नये असे आवाहन करण्यात गैर काय आहे? बोला ना बोला”, घारुअण्णा.

“इतक्या दिवसांनी बरी जाग आली”, शामराव बारामतीकर.

“अरे, जाग आली तर खरी. नाहीतर आम जनतेची लुबाडणूक चालूच आहे राजरोस, तुमच्या साहेबांची तर फूसच असणार त्याला, बसलेत दिल्लीवर आणि लक्ष राज्यावर”, घारुअण्णांचा राग अजुनही घुमसत होता.

“साहेबांना मध्ये घेण्याचे काम नाही, त्यांना असल्या फालतू गोष्टींमध्ये लक्ष घालायला वेळ नाही”, शामराव बारामतीकरांची निष्ठा.

“हो ना, त्यांचे निष्ठावंत आहेतच की ती काळजी घ्यायला, त्यांना काळजी आता फक्त नंबर दोनचे स्थान मिळवण्याची, एक नंबर काही नशिबात नाही ह्याची खात्री झालीच आहे आता”, घारुअण्णा. “आम्हाला सरकारबरोबर कुठलाही संघर्ष नको. परंतु बळजबरी झाल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल! असे उघड बोलायला निधडी छाती लागते. स्वार्थासाठी पाठीमागून दगाबाजी करणार्‍यांतना काय समजणार हे”, घारुअण्णा आता पेटले.

“उगाच काहीही बरळू नका”, शामराव बारामतीकर.

“खरंय, घारुअण्णा, मुळ विषयाला बगल देऊ नका”, सोकाजीनाना न राहवून.

“काय, काय बगल देतोय मी?”, घारुअण्णा प्रश्नार्थक चेहेरा करून.

“तुम्ही मगाशी काय म्हणालात? इतक्या वर्षांमध्ये जमलेला टोलचा पैसा नेमका कोठे गेला? हाच खरा कळीचा मुद्दा आहे”, सोकाजीनाना, मिष्कील हसत.

“म्हणजे, काय म्हणायचंय तुम्हाला?”, सगळेच एकदम बुचकळ्यात पडून.

“अरे, सोपे आहे, हे सगळे बेरजेचे आणि पैशाचेच राजकारण आहे. एवढा अमाप पैसा गोळा होतो आहे टोल नाक्यावर. सेनेच्या सत्तेच्या काळातच त्याचा अंदाज सगळ्यांना आला होता. आता कदाचित ठेकेदार कंपन्यांवर कंट्रोल राहिला नसेल, टक्केवारी मिळत नसेल. ह्या एकढ्या मोठ्या टोलरूपी जमणार्‍या निधीच्या डबोल्यावर सर्वांचेच लक्ष असणारच, थोडाफार हिस्सा सर्वांनाच मिळायला नको का? पक्ष चालवायचे, सैनिक संभाळायचे, पोसायचे म्हणजे पैसा सगळ्यांनाच लागणार नाही का. थोडे दिवस थांबा! बेरजेचे राजकारण झाले, खोक्यांचा व्यवहार सेटल झाला की हाच टोल समाजसुधारणेसाठी कसा आवश्यक आहे ह्याचे धडे कृष्णकुंज मधून ऐकू येतील”, सोकाजीनाना, त्यांच्या चेहेर्‍यावरचे हास्य तसेच ठेवून.

“आणि काय हो घारूअण्णा, भुजबळकाका आणि तुम्हीही बारामतीकर, तुमचे बुड कधी लाल डब्याच्या सरकारी गाडीखेरीज इतर कुठल्या गाडीला लागले आहे का? आँ? अहो ते टोल भरणारे सर्वसामान्य, आम जनता नसतात हो आपल्यासारखे. तेव्हा सोडा ह्या फुकाच्या बातां आणि चहा मागवा.”

घारुअण्णांनी लगेच पडत्या फळाची आज्ञा मानून चहा मागवला.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खिक् Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मजा आली वाचताना लेख रे ब्रिजेशा. विशेष करून ह्यांनाही तुझा लेख आवडला हे नमूद करते.
(७०च्या दशकापर्यंत टोल काय हे माहित नसणारी) रमाबाई

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आंदोलन वगैरे ठीक आहे, त्याशिवाय मनसेचं अस्तित्त्व कुठून टिकणार? पण मुळात खर्च किती झाला, वसुली किती झाली याची आकडेवारी कोणी प्रसिद्ध केलेली आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"अगं ब(ड)बडे, चावडीवर असं विदा, अभ्यास, नंबर, दाखले घेऊन नसतं यायच गं! कस कळत नाय एवढं ह्या जंटलवुमन्स ना", इती घारुअण्णा.

-(घारुअण्णांचा पंखा) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झंटलवुमन्सना आपला झंटलवुमनपणा सिद्ध करायला घारूअण्णा आणि सोकाजींपेक्षा अधिक श्रम घ्यावे लागतात. मग त्या सगळ्यांना अडचणीत टाकणारे प्रश्न विचारायचे. सोप्पंय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.