एक उत्कृष्ट लघुनिबंध

लोकवाङमय गृह या प्रकाशन संस्थेतर्फे 'आपले वाङमय वृत्त' हे मासिक मुखपत्र चालवलं जातं. त्यांच्या वेबसाइटवर म्हटल्याप्रमाणे ‘केवळ एखाद्या प्रकाशन संस्थेचे मुखपत्र’ असे या मासिकाचे स्वरूप नाही. एकूणच वाचनसंस्कृतीचा प्रसार व गुणात्मक विकास व्हावा हा ‘आपले वाङमय वृत्त’च्या प्रकाशनामागचा उद्देश आहे. या आपल्या प्रतिमेशी इमान राखत त्यात अत्यंत दर्जेदार लेखन येत असतं. मी गेले काही अंक चाळले ते सर्वच चांगल्या, वेगळ्या जातकुळीच्या नवीन कवींच्या कविता, वैचारिक लेख, जगप्रसिद्ध शिल्पांची चित्रं, परिणामकारक छायाचित्रं यांनी नटलेले आहेत. त्यातल्या अंकांत अरुण खोपकरांची एक वेगवेगळ्या विषयांवरची अतिशय सुंदर लेखमालाही आहे. त्यातल्या विशेष आवडलेल्या एका लेखाचं ('आपले वाङमय वृत्त' फेब्रुवारी २०१२ अंक, पृष्ठ ४) हे रसग्रहण.

(स्पॉइलर ऍलर्ट - हे रसग्रहण असल्यामुळे लेखाचा निव्वळ गाभा देण्यापलिकडे जातं. तेव्हा कोणाला जर तो लेख मुळातूनच प्रथम वाचायचा असेल तर इथेच थांबावं)

फेब्रुवारी २०१२ च्या अंकात २१ तारखेचा जागतिक मातृभाषा दिन आणि २७ तारखेचा मराठी दिन या दोहोंच्या निमित्ताने त्यांनी भाषेसंबंधी एक लेख लिहिलेला आहे. लेखाचं नाव 'भाषावार प्रांतरचना' असलं तरी लेख आहे भाषेचं स्वरूप, विकास आणि मराठीची सद्यस्थिती या विषयावरचा. हे लेखन वैचारिक मांडणी तर करतंच, पण ते ज्या लालित्याने करतं त्यामुळे लघुनिबंध कसा असावा याचं आदर्श उदाहरण ठरतं. खोपकरांनी आकृतीबंध या बाबतीत गाढा अभ्यास, मूलभूत विचार तर केलेला दिसतोच पण त्याहीपलिकडे त्याच्या प्रुत्येक बारकाव्यावर मनापासून प्रेम केलेलं दिसून येतं. या लेखाचा आकृतीबंधही अत्यंत मोहक आहे.

सुरूवात होते ती त्यांच्या एकविसाव्या मजल्यावरच्या अभ्यासिकेच्या खिडकीवर टकटक करून पाणी मागणाऱ्या कामगाराने. क्षणात आपण त्या उंचीमुळे खेचले जातो. बांबूंच्या पराती बांधून त्यावर काम करणाऱ्या हिंदी, बंगाली, तेलगु भाषा बोलणाऱ्या लोकांकडे त्यांचं लक्ष वेधलं गेलं. आणि त्यांना त्या शब्दांपलिकडे एक वेगळीच भाषा जाणवली. ती या कामगारांची कामाची भाषा.

"...ती भाषा शहराच्या वाढीला आवश्यक भाषा होती. शहराच्या सिमेंट आणि लोखंडाच्या सांगाड्याची रचनाच मुळी ह्या भाषेच्या व्याकरणावर आधारित होती. त्याचे वैयाकरण पन्नास पन्नास मजल्यांच्या परातीवर चढून ह्या उच्च व्याकरणाचे नियम घडवीत होते. शरीराच्या लयबद्ध हालचालींतून श्रमाच्या भाषेचे छंद रचत होते. त्यांचे हे छंद मुक्तछंद नव्हते. त्यात अक्षरांना मात्रागणवृत्तांइतकीही मागेपुढे होण्याची मुभा नव्हती. ते अक्षरगणवृत्ताइतके बांधीव होते. त्यातल्या प्रत्येक गणातील हालचालीत एका लघुगुरूचा फरक झाला असता तर तोल जाऊन त्यांचा मृत्यू ओढवण्याची शक्यता होती...."

भाषा म्हणजे निव्वळ शब्द नव्हे, तर आपल्या भोवतालावर परिणाम करण्याची कुठचंही पद्धतशीर आणि नियमबद्ध माध्यम. चित्राची, संगीताची भाषा असते हे आपण जाणून असतोच. स्वरांचं व्याकरण चुकलं तर संगीत कर्कश होतं हेही अनुभवलेलं असतं. पण त्याचबरोबर या शहराच्या बांधणीची भाषा असते, कॉंप्युटरच्या सर्किट बोर्डवर अतिसूक्ष्म भाग चिकटवण्याची एक भाषा असते, घरात टेबलाला पॉलिश करायला आलेल्या कामगाराची लयबद्ध भाषा असते. तिचे नियम पाळले, ती नैपुण्याने वापरली की तिची अभिव्यक्तीही सुंदर असते. मग अस्सल कलाकाराचं, कारागीराचं आपल्या कृतीवर प्रेम बसून त्यावरून "आई झोपलेल्या मुलावरून जसा अलगद हात फिरवते तसा हात" फिरला नाही तरच नवल. खोपकर जाणकार नजरेने हे टिपतात आणि त्या निरीक्षणाच्या प्रेमातून आलेल्या सहज लालित्याने सांगतात. आपल्याला मातृभाषेचा वारसा मिळतो, पण आपल्या भाषाव्यापारातलं ते एक छोटं अंग आहे. "कुणाची भाषा कुठची हे जन्माने ठरवता येत नाही. प्रांतावरून ठरवता येत नाही. भाषा ही भौगोलिक नसून एक सांस्कृतिक ठेव आहे" असं म्हणत भाषेकडे बघण्याची मूलभूत भूमिका घेतात.

हा विचारप्रवाह इथेच थांबवून पुढे ते भाषेच्या विकासाची चर्चा करतात. त्यांचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाषेचा विकास आणि त्याला कह्यात ठेवण्याचा प्रयत्न करणारं व्याकरण. विकास ही केंद्रोत्सारी प्रेरणा आहे तर व्याकरण ही केंद्रगामी प्रेरणा आहे. व्यवहारातल्या नवीन प्रकाशाकडे वाट फोडत फांद्या पुढे जातात तर व्याकरण मूळं भक्कम करून, फांद्या घट्ट करून या सर्व विस्ताराला जोडून ठेवू पहातं. "कोशकाराचे हात आकाशापर्यंत पसरलेले असतात तर वैयाकरणाचे हात भाषेला प्रेमालिंगनात सामावून घेऊ पहातात." मात्र मराठीबाबत नवीन कोश करून सीमानिश्चितीचे पुरेसे प्रयत्न होत नाहीत त्यामुळे नवनवे व्याकरणाचे नियम बांधून तिला एक आकारबंध देत रहाणं होणार नाही याची ते खंत नोंदवतात. मोल्सवर्थ आणि कॅंडी यांच्या कोशाचं महत्त्व अजून दीड-पावणेदोनशे वर्षांनतरही कमी झालं नाही, किंवा दाते-कर्वे कोशानंतर ऐशी वर्षांत काही विशेष प्रयत्न झाले नाहीत याचं सखेद आश्चर्य व्यक्त करतात.

याचं कारण भाषेत दडलेलं नसून ते सांस्कृतिक-सामाजिक असल्याची ते मांडणी करतात. "एखादी विहीर मौजे बुरकुटे या गावी बांधली काय, किंवा न्यूयॉर्कमध्ये बांधली काय, तिच्यातला बेडूक हा कितीही अंग फुगवलं तरी बेडूकच रहातात." या मंडुकवृत्तीमागे भाषिक/सामाजिक जीवनात आलेला लटकेपणा आणि खोट्याखोट्या भावविवशतेचा कर्करोग.
"भावनेच्या पेशी अनैसर्गिकपणे प्रचंड प्रमाणात वाढतात आणि बौद्धिक पेशींचा संहार करतात. अनुभवाच्या क्षेत्रात बौद्धिक पेशी शिरल्यास ह्या कर्करोगट पेशींचं 'हळवं' अस्तित्व दुखावतं.... हे (बौद्धिक) मापन जर 'लोकाभिरूची'ला काही प्रश्न करू लागलं तर मात्र या भावनिक पेशींमध्ये हिंसेची किती क्षमता आहे ह्याची प्रचीती येते. या हळवेपणात एक भावनिक फॅसिझम असतो, अभिरूचीभिन्नत्वाबद्दल तिटकारा असतो, संवादाला विरोध असतो." या शाब्दिक हिंसाचारापोटी भाषा मागे पडते आहे असं ते सांगतात.

लेख शेवटी काहीसा निराशावादाकडे झुकतो. मला व्यक्तिशः तो निराशावाद पूर्ण पटलेला नसला तरी त्यांनी मांडलेल्या प्रश्नाचे पोत जाणवतात. या लघुनिबंधात (तसंच इतर लेखांतही) ते निव्वळ तर्ककठोर राहात नाहीत - लघुनिबंधविषयाच्या आसमंतात त्यांचे गुंतलेले भावनिक धागेदोरे अत्यंत हळुवारपणे आपल्याला स्पर्श करतात. विचारांच्या बैठकीवर दगडाची कोरडी मूर्ती न बसवता जिवंत, सुजाण व्यक्ती बसलेली जाणवते. या दोहोंच्या मिश्रणातून लघुनिबंधाच्या आकृतीबंधात ते सुंदर कलाकृती सादर करतात.

विचारांच्या पंचवीस मजली परातीवर लयबद्ध आणि लालित्यपूर्ण हालचाली तोल न बिघडवू देता करण्याची 'निबंधाची भाषा' खोपकरांना निश्चितच जमली आहे.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

लेख आवडला. त्यानंतर खोपकरांचा लघुनिबंधही वाचला. लेखात म्हटल्याप्रमाणे त्याची मांडणी, उपस्थित केलेले मुद्दे हे सारंच मुळातून वाचण्यासारखं आहे. बाकी लटकी भावविवशता, हळवी लोकाभिरूची आणि कृतक भाषाव्यवहार यांची जितकी उदाहरणं द्यावी तितकी कमीच. 'दिण्हले गहिल्ले' ते 'दवणीय गहिवरणे' हा निव्वळ भाषिक प्रवास नसून भाषक प्रवासही आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचं परिक्षण आणि खोपकरांचा लेख. आवडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....

लेख आवडला. जगणं लटकं झालंय म्हणून भाषा लटकी झाली आहे हा तर्क प्रथमदर्शनी पटण्याजोगा आहे. आणि मग हळूहळू भाषा लटकी होत गेल्यामुळे जगणं लटकं होत जातं का?

पण हा तर्क अपुरा वाटतो. सगळ्याच काळात लटकं जगणारी माणसं जशी असतात तशीच ते नाकारणारी माणसं पण असतात - हं,प्रतिष्ठा कुणाला मिळते यावरुन कशा प्रकारची भाषा तग धरणार (काही काळापुरतीच म्हणा तीही) हे कदाचित ठरत असावं.

एका चांगल्या लेखाची ओळख करुन दिलीत त्याबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निबंध अतिशय आवडला. त्यामुळे लेखात शेवटी आलेला निराशावादही खपून जातो. जागतिकीकरण आणि केंद्रोत्सारी भाषा यामुळे अनेक भाषांच्या क्षेत्रांची सरमिसळ होत राहते त्यामुळे केव्हा केव्हा सांस्कृतिक भिती वाटते. या उत्कृष्ट लेखाकडे लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0