आणि पुस्तकांची नावं...

"पात्रांच्या नावाआधी पुस्तकांच्या नावाचा विचार करायला हवा होतास... ते आधी सांगायचंस ना." एक मित्र म्हणाला.
"अरे ठरवून लिहीत नव्हते काही. असंच लिहून झालं ते उगाचच." मी म्हटलं आणि पुस्तकांच्या नावांविषयी आठवायला लागले.
पुस्तकाचं नाव ठरवून मग लेखन सुरू होतं, असा तर काही क्रम नसतो. माझ्याबाबतीत तर असं झालंय की बहुतेकवेळा मी लेखन पूर्ण केल्यावर मग पुस्तकाच्या नावाचा विचार केलाय. अपवाद फक्त 'ठकी...'चा. ते लेखन सुरू केलं तेव्हाच, म्हणजे जेमतेम एक पान लिहून झालेलं असतानाच सुचलं आणि पक्कंही झालं.

माझ्या लेखनाची सुरुवात कवितांनी झाली. कवितांना शीर्षकं देणं मला कधीही जमलं नाही.
पहिला कवितासंग्रह 'मौज'ने मागीतला, तेव्हा त्यांच्याकडे मी तोवरच्या काळात लिहिलेल्या सगळ्याच कवितांचं बाड सोपवलं.
निवडबिवड आपलीआपण केली नाही. त्यातल्या एकाही कवितेला शीर्षक नव्हतं. या संग्रहाचं संपादन श्रीनिवास कुलकर्णी यांनी केलं.
"एकाही कवितेला शीर्षक का नाही, त्यामागे काही विचार आहे का?" असं त्यांनी विचारलं.
मी म्हटलं,"विचारबिचार काही नाही. पण मला नावं ठेवता येत नाहीत. तसं काही सूचत नाही, कळत नाही आणि जमतही नाही."
मग थोडा विचार करून ते म्हणाले,"असं होत असेल तर मग एक उपाय असतो. कवितेतली एखादी वा अर्धी ओळ शीर्षक म्हणून वापरायची."
हे सोपं होतं. मी आपलं कवितांमधले शब्द उचलून नावाजागी टाकून ठेवण्याचा उद्योग सुरू केला.
दरम्यान एका वाड्मयीन मासिकात काही कविता छापून आल्या. मी नाव दिलेलं नव्हतंच; म्हणून त्यांनी तिथं 'कविता' असा शब्द छापला.
एका ज्येष्ठ कवींनी त्याची खिल्ली उडवत म्हटलं,"गंमत आहे. वर कविता, मध्ये कविता, खाली कविता."
मग त्रासून सगळ्या कवितांना नावं ठेवायला पदर खोचला आणि देऊन टाकली... आहे काय न् नाही काय!
श्रीनिवास कुलकर्णी ती नावं वाचून डोक्याला हात लावून बसले,"ही काय शीर्षकं आहेत का?"
ते जितके भडकू शकतात, तितके सौम्य भडकले होते.
मी म्हटलं,"तुम्हीच तर सांगितलं होतंत ना... की खालचे शब्द उचलून वर ठेवायचे!"
त्यांनी हताश नजरेनं माझ्याकडे पाहून लाल पेन उचललं.
या संपादनाच्या कामात तप उलटलं. त्यानंतर मी लिहिलेल्या कविता बर्‍याच वेगळ्या होत्या. या जुन्या प्रेमकविता आता कधी छापल्या जाणार हे माहीत नव्हतं. "माझं पुस्तक कधी येणार?" हे प्रकाशकांना विचारत बसण्याचा आणि धोशा लावण्याचा माझा स्वभाव नाही. आपलं काम लिहिण्याचं, ते आपण केलं. छापण्याचं काम त्यांचं, तर करतील त्यांच्या सवडीने... असा विचार.
तरी भोचकपणे एकदा माधव भागवतांना म्हटलंच की,"माधवभाऊ, दरम्यान माझी चार प्रेमं करून झालीत... कितव्या प्रेमाच्या वेळी या प्रेमकविता छापून येतील माहीत नाही..."
ते अर्थात सात्त्विक त्रासले.
'तत्पुरुष' आणि 'ब्र' ही दोन पुस्तकं प्रकाशित झाल्यानंतर काही वर्षांनी 'धुळीचा आवाज' हा माझा 'पहिला असणार होता तो कवितासंग्रह' मौजेकडून आला; 'तत्पुरुष' त्याआधी प्रकाशित झाल्यानं पहिला ठरला.
'धुळीचा आवाज' हे एका कवितेतलेच शब्द होते आणि ते शीर्षक म्हणून समर्पक आहेत, त्या संग्रहाच्या मूडला साजेसे आहेत, असं वाटत होतं.
संपादकांनी निवडलेलं शीर्षक दुसरं होतं. 'एका रंगाचं नाव' असं दुसर्‍या एका कवितेचं नाव त्यांनी शीर्षक म्हणून निवडलं होतं. त्या वादात दोन वर्षं अजून पुढे सरकली. माझं एक पुस्तक छापून येणं ही काही 'वाड्मयीन घटना' असणार नव्हती, त्यामुळे निरुत्साह भरलेला होता.
पुस्तकाचं शीर्षक निवडणं हे प्रकाशकाचं काम, हक्क असं संपादकांचं म्हणणं होतं आणि ते लेखकाचंच असं मी अर्थातच म्हणत होते.
पुस्तक हे लेखकाचं की प्रकाशकाचं? - असाही एक बारका वाद तेव्हा झडला, असं आठवतंय. ( वाद अर्पणपत्रिकेवरही झाला होता, ते पुन्हा कधी सांगेन.)
अखेर माझी सरशी झाली आणि 'धुळीचा आवाज'वर शिक्कामोर्तब झालं.
या सगळ्या विलंबानं उत्साह इतका ओसरला होता की मी पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहण्याची, ब्लर्ब वाचण्याची प्रकाशनपूर्व उत्सुकता दाखवली नाही.

'तत्पुरुष' हे शीर्षक चंद्रकांत पाटील यांनी सुचवलं. त्यांनी ते विस्कटून सांगितलं ( क्षमस्व. स्पष्ट करून समजावून सांगितलं... ) ते इतकं जड पारिभाषिक होतं आणि पुन्हा व्याकरणातलं काहीतरी होतं ( व्याकरण हा माझा गणितानंतरचा शत्रु क्र. २ ) की डोक्यावरून गेलं. ते समजून घेण्याचा नाद मी सोडला आणि समजावून सांगण्याचा नाद सरांनी सोडला. काहीही वाद न होता, हे शीर्षक पक्कं झालं.

'ब्र' ही माझी छापून आलेली ( किंवा पूर्ण लिहिलेलीही ) पहिली कादंबरी. तिचं मूळ शीर्षक होतं : अश्मांतक.
हे शीर्षक जड होतं, चटकन अर्थ सांगणारं नव्हतं. कादंबरीत एक प्रसंग आहे, त्यात 'कार्यकर्ते कसे असावेत' याचं एक काव्यात्म चिंतन आहे.
त्यात 'अश्मांतक' ही प्रतिमा वापरलेली होती. शीर्षक अर्थपूर्ण नक्कीच होतं; पण मला एखादा लोकाभिमुख असलेला साधा शब्द हवा होता.
नंतर या पुस्तकाची अर्पणपत्रिका लिहिली, त्यात ब्र हा शब्द होता. मांडणी करताना मी ब्र या शब्दाची उंची आसपासच्या इतर शब्दांहून वाढवली होती आणि प्रुफरिडरनं आपली बुद्धी चालवून ती उंची नॉर्मलला आणून शब्द एकेरी अवतरणात टाकून देण्याचा सरधोपटपणा केला होता. अक्षरांना काही दृश्यात्मकता असते असं माझ्यातला चित्रकार सांगत होता. मग ती दुरुस्ती करताना क्लीक झालं की हाच शब्द वापरू नावासाठी.
प्रकाशकांनाही तो आवडला. या शीर्षकाची पुढे बरीच आणि चांगली चर्चा झाली.
तरीही काही ना काही घोळ झाले नाहीत, तर ती शीर्षकं कसली? क्रेडिटपेजवर रोमनलिपीत पुस्तकाचं आणि लेखकाचं नाव लिहिलं जातं.
तिथं 'ब्र'चं स्पेलींग संपादकांनी Bra असं केलं, ज्याचा उच्चार 'ब्रा' असा झाल्याने अनेक आचरट विनोद प्रसृत झाले.
एका हिंमतशून्य चाहत्या वाचकाने निनावी पत्रासह मला ब्रेसियर कुरियर करण्याचाही उद्योग केला.
मग भाषातज्ज्ञांशी चर्चा झाल्या की 'ब्र' या शब्दाचं स्पेलींग काय बरं असावं?
त्यांचे वाद अजूनही पुस्तकाच्या आता बारा आवृत्त्या झाल्या तरी सुरू आहेत. आम्ही सध्या Brra असं स्पेलींग लिहितो आहोत तोवर.

मग 'भिन्न'!
इथं शोधून नाव सापडत नव्हतं. कितीजणांनी किती याद्या करून झाल्या. काही पसंदच पडेना.
तेंडुलकरांनी मला विचारलं की,"आता दुसर्‍या कादंबरीचं नाव पण एकाक्षरी का?"
मी म्हटलं,"बहुतेकतर नाही. म्हणजे जी नावं आम्ही काढली आहेत त्यात एकही एकाक्षरी नाहीये. पण हां, एका शब्दाचं असेल हे मात्र नक्की."
त्या काळात आगगाडीच्या डब्यांसारखी मोठी शीर्षकं सिनेमांना, पुस्तकांना इत्यादी द्यायची फॅशन आली होती; जी मला अजिबात आवडली नव्हती.
तेंडुलकरांना म्हटलं,"कादंबरीचं ठरलं नाहीये... पण आत्मचरित्राचं नाव मात्र पुन्हा एकाक्षरीच असणार आहे."
त्यांनी चमकून माझ्याकडे पाहिलं आणि उत्सुकतेनं विचारलं,"काय ते?"
"ढ." मी सांगितलं,"सतत परीक्षा द्याव्या लागणार्‍या आणि सतत नापास होत आलेल्या बाईचं आत्मचरित्र म्हणून ढ!"
तेंडुलकर म्हणाले,"मग तर त्याच्यावर माझा कॉपीराइट आहे."
मी म्हटलं,"असं कसं? मला सुचलंय ना, म्हणजे कॉपीराइट माझाच."
"बरं... मग असं करूया..." त्यांनी मांडवली करत तडजोड सुचवली,"आपण दोघं मिळून आत्मचरित्र लिहूया आणि त्याचं नाव ठेवूया - दोन ढ."
मी हसून म्हटलं,"चालेल!"
ही कादंबरी मी अनेक गोंधळांमुळे वर्षभर बाजूला ठेवली होती लिहून झाल्यावर. वैचारिक गोंधळ होते, भाषेचा मुद्दा होता आणि काही कौटुंबिक दबावही होते. त्यामुळे शीर्षकाचा विचार करायला मुबलक वेळ होता.
त्या काळात मी एका अभ्यासाठी विदर्भात फिरत होते. विदर्भात ज्या शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत, तिथल्या विधवा बायकांची सद्यःस्थिती हा अभ्यासाचा विषय होता. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेसाठी मी हे काम करत होते. अत्यंत डिप्रेसिंग वातावरण होतं. तासन् तास चालून पायांचे तुकडे पडत होते. रस्त्यांवर पोटर्‍यांपर्यंत वस्त्रगाळ धूळ असे. मैलोन् मैल साधी चहाची टपरी दिसायची नाही; कुठं दोन-दोन दिवस खायला मिळायचं नाही. सोबत ठेवलेल्या गोष्टी बरेचदा ज्या घरांमध्ये जाऊ तिथली उपाशी मुलं पाहिली की देऊन टाकल्या जात. एकदा अशीच एका बारक्या बसस्टँडवर बसची वाट पाहत तीनचार तास थांबले होते. आत्महत्यांची चर्चा सुरू होती. एक सहप्रवासी म्हणाला,"डोकं पार भिन् झालंया बगा."
भंजाळून जाणे, हा एक भिन्न चा अर्थ लागला; आणि निवडलेल्या शब्दांपैकी तो पक्का झाला. तरीही या नावाबाबत मनात असमाधान राहिलंच.

'मृगजळीचा मासा' ही ज्ञानेश्वरीतील एक प्रतिमा. ती एका कवितेत होती. हे नाव पहिल्या म्हणजे मौजेच्या संग्रहावेळीच मी निवडलं होतं. पण मग अंतिम निवडीच्या वेळी संग्रहाची पानं कमी करण्याचं ठरलं अचानक आणि निवडलेल्या कवितांमधल्या काही बाजूला ठेवाव्या लागल्या, त्यात नेमकी या शीर्षकाची कविताही होती. म्हणून ते शीर्षकही बाजूला ठेवलं गेलं. ते मेघना पेठेला आवडलं होतं.
मेघनाचा मुद्दा असा होता की, "एखाद्या कवितेचं वा कथेचं शीर्षकच पुस्तकाला दिलं पाहिजे असं आवश्यक नाही. एकुणात तुम्हांला काय सांगायचंय ते शीर्षकात आलं की झालं."
मेघनाच्या 'आंधळ्याच्या गायी' या संग्रहाचं शीर्षक असंच स्वतंत्र आहे.
तर ते बाजूला ठेवलेलं शीर्षक तिसर्‍या संग्रहासाठी निवडलं गेल्यातच जमा होतं. ती कविताही अर्थात त्या संग्रहात आहे.

यानंतर 'ग्राफिटीवॉल'.
हे मुळात मी 'लोकप्रभा'मध्ये लिहिलेलं एक सदर होतं. याची कल्पना होती प्रवीण टोकेकर यांची. ( खलनायकासाठी तुझं नाव वापरेन, ही धमकी मी दिली होती, तो हाच मित्र.)
'लोकप्रभा'च्या कार्यालयात आम्ही बोलत होतो. त्यानं एखादं सदर लिहिण्याचं प्रपोजल आकर्षक पॅकेजसह दिलं. माझा लिहिण्याचा मूड नव्हता. 'भिन्न' लिहून डोकं फिरलेलं होतं. खेरीज आता विदर्भ दौरा सुरू होणार होता. मग 'सदर लिहायचं नाही' हे ठरलं.
मी हुश्श केलं आणि मग आमच्या बाकी गप्पा, टवाळक्या सुरू झाल्या. त्यात लिहितानाचे अनुभव, विचार, वाचकांच्या प्रतिक्रिया, प्रकाशकांचे आणि संपादकांचे किस्से, मी वाचत असलेली नवी पुस्तकं असं वाट्टेल ते आडवंतिडवं बोलणं सुरू झालं.
टोक्यानं विचारलं," तू हे कुठे नोंदवून ठेवतेस की नाही? इंटरेस्टींग आहेत यातल्या काही गोष्टी."
मी म्हटलं,"डायरीबियरी लिहिण्याची सवय नाहीये. पण काही अनुभव उगीच लिहून ठेवलेत. काही सुटे विचारही. संगणकावरच्या त्या डायरीवजा फाइलचं नाव आहे 'ग्राफिटीवॉल.' गंमत काहीतरी."
तर तो म्हणाला,"आपण हे याच नावानं छापू."
कल्पना चांगलीही होती आणि वाईटही.
वाईट अशासाठी की मी, मला, माझं असं या मजकुरात सातत्यानं आलं होतं; ते खासगीत ठीक होतं, पण छापायचं म्हणजे संकोच वाटत होता.
लेखकाची डायरी म्हटल्यावर हे गृहीत आहे... अशी त्यानं यशस्वी समजूत काढली.
चांगलं म्हणजे ज्या बारीकसारीक गोष्टी आजूबाजूला सांडलेल्या असतात ( व्यंकटेश माडगूळकरांच्या भाषेत 'सरवा' ) त्या वेचून झाल्या असत्या.
मग हे 'इंग्लीश' शीर्षक नको, असा मुद्दा मी काढला. खूप विचार करून झाले. पर्याय सापडला नाही.
इतर भाषांमधले अनेक शब्द आपण जसेच्या तसे स्वीकारतो, त्यांना पर्याय असतील वा घडवता आले तर नाकारावेत, पण नसेलच तर ते स्वीकारण्यात गैर नाही.. असे चर्चेअंती ठरले.
हीच चर्चा पुस्तकाच्या वेळी पुन्हा माजगावकरांसोबत झाली; पण तेव्हाही पर्याय सापडला नाहीच.

'कुहू' हे कादंबरीच्या नायकाचंच नाव. ते इतकं ठसठशीत होतं की तेच शीर्षक म्हणून आवडलं, त्याला पर्याय शोधलाच नाही.

'जोयानाचे रंग' हे बालकथांचं पुस्तक. "शीर्षकात हे ख्रिश्चन नाव कशासाठी?", हा प्रश्न देशात इतकी वर्षं ख्रिश्चन स्थिरावलेले असूनही विचारला गेलाच. "पुस्तक अनुवादित वाटेल." असंही एक कारण सांगितलं गेलं. जोयाना नावाची मुलगी माझ्या शेजारी राहायची. या तिच्या गोष्टी आहेत. पुस्तकातल्या चित्रांसाठीही संदर्भ म्हणून तिचे फोटो वापरले आहेत. "त्या जोयानाच्या गोष्टी आहेत, म्हणून जोयानाच!" इतकंच माझं त्यावर उत्तर होतं.

आणि आता हे 'ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम'.
मला न आवडणार्‍या फॅशनचं, पण मलाच सुचलेलं नाव. वाचकांकडून त्यातला 'आणि मर्यादित पुरुषोत्तम' बारक्या टायपात असल्याने आणि जास्त शब्दसंख्या असल्याने गायब होत जाणार आणि अखेर 'ठकी' एकटीच उरणार हे दिसतंय... तरीही...
ठकी ही आपली जुनी लाकडी बाहुली. साच्यातनं न काढलेली, तरीही साचेबद्ध रूप असलेली. त्रिकोणी आकार, सपाट पाठ, ठाम उभी आणि मर्यादित रंगात रंगवलेली. आईच्या भूमिका करणार्‍या 'अभिनेत्री' पाहिल्या तर त्यांच्यात(ही) एक साचेबद्धता आणि एक बाहुलीतत्त्व दिसून येते.
आणि मर्यादा पुरुषोत्तम हे लेबल काढून दुसर्‍या बाजूने पाहिलं, तर त्यांचा मर्यादितपणा ध्यानात येतो...
- अशा विचारातून आलेलं हे नाव.

... आजवर हे इतकंच. बाकी संपादित, अनुवादित कामं आहेत. त्यांच्या गमती पुन्हा कधी.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

... आजवर हे इतकंच. बाकी संपादित, अनुवादित कामं आहेत. त्यांच्या गमती पुन्हा कधी.

अजून शांग. असं लहान बाळासारखं म्हणावंसं वाटतंय.

पुभाप्र!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

शेवटच्या शीर्षकाची गोष्ट सगळ्यात जास्त आवडली. आणि 'ढ'पण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुस्तकांच्या नावाबाबत चिंतन आवडलं.

बहुतेक लोकांचा स्वतंत्र लेखनाशी (प्रयत्नाशी म्हणा) पहिला अनुभव येतो, तो शाळेतल्या निबंधलेखनात. त्या अनुभवात शीर्षक आही येते, कारण शिक्षक-परीक्षकांनी ते दिलेले असते. त्यामुळे ते मुळात स्वतंत्र लेखन नाही असे म्हणानाका.

बिगरव्यावसायिक लेखनाचा दुसरा मोठा प्रवाह म्हणजे वैयक्तिक पत्रे. पूर्वीच्या काळी वैयक्तिक पत्रांना शीर्षके नसत. आजकाल ईमेलमध्ये प्रेमपत्रांनासुद्धा काहीतरी "विषय" म्हणून द्यायची प्रथा आहे. काही का असेना, विषय किंवा शीर्षक किंवा नाव हे मागाहून येते, बहुधा.

ललितकलाकृती रचताना आधी नाव ठरवणे, मग रचना करणे, असे शालेय जीवनानंतर क्वचितच कोणी करत असेल. त्यामुळे कविता महाजनांनी सांगितलेला अनुभव तेवढ्यापुरता सार्वत्रिक असावा. पण त्यांच्यासारखी अनुभवांची पोतडी सार्वत्रिक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या धाग्यातून सुरू झालेली मराठी बालसाहित्याविषयीची चर्चा खूप रोचक आणि माहितीपूर्ण झाली आहे ती दुसर्या स्वतंत्र धाग्यात हलविता येईल का? त्या निमित्ताने इतरही लोक यात भर घालू शकतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आशुतोष यांनी इतिहासाच्या निमित्ताने हा धागा ऐसी वर काढला होता. विषयाची व्याप्ती बरीच मोठी असल्याने आणि एक दिशा निश्चित नसल्याने, तसेच इतर संस्थळांवर आधीच बरीच चर्चा झाल्याने कदाचित फारसा प्रतिसाद लाभला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नांवांमागच्या गमतीजमतीबाबतचे लेखन आवडले.
नांवांनाही आपले असे एक आयुष्य मिळते आणि त्याचीही रंजक गोष्ट होऊ शकते, हे जाणवले.

संपादकः यापुढिल प्रतिसाद बालसाहित्यावर अधिक विस्तृत चर्चेसाठी इथे हलवला आहे. मात्र मूळ लेखनावरील प्रतिसाद याच धाग्यावर अपेक्षित आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविताताई,
तुमचं लेखन नेहमीच आवडीने वाचते. इतर अनुवादित, संपादित कामांबद्दलच्या गमतीही वाचायला आवडतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0