आजचे दिनवैशिष्टय - २
व्यवस्थापक: 'आजचे दिनवैशिष्टय' ह्या सदरात दिसणार्या नावे आणि घटनांवरून वेगवेगळे धागे सुरू करण्याऐवजी एकाच सलग धाग्यात वेळोवेळी ही माहिती नोंदवीत केल्यास तिला अधिक सुबकपणा येईल असे वाटून श्री कोल्हटकर हा धागा सुरू केला होता. पहिल्या धाग्यावर १००+ प्रतिसाद झाल्याने वाचकांच्या सोयीसाठी नवा भाग काढत आहोत.
यापूर्वीचे भागः भाग १
========
आजच्या दिनवैशिष्टयात पुढील उल्लेख आहे:
'आनंद' या मुलांच्या मासिकाचे संस्थापक-संपादक, बंगाली-मराठी कोशकार वासुदेव आपटे (१८७१).>
हे ठीकच आहे पण आपटे ह्यांचे अजून एक महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी 'मराठी शब्दरत्नाकर' नावाचा मराठी-मराठी शब्दकोश रचून १९२० मध्ये प्रकाशित केला. ह्याच्या नंतर अनेक आवृत्त्या निघाल्या. तिसरी आवृत्ति 'आनंद' मासिकाचे तत्कालीन संपादक गोपीनाथ तळवलकर ह्यानी १९५३ मध्ये आनंद प्रकाशनतर्फे बाहेर आणली. मजजवळ ती उपलब्ध आहे आणि तिच्यामध्ये पहिल्या आवृत्तीची आपटे ह्यांनी लिहिलेली पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना आणि आपटे ह्यांचे चरित्र आहे. (आनंद मासिकाचे नाव त्यांचा दिवंगत मुलगा आनंद ह्याच्या नावावरून दिले असावे असे वाटते.)
हे मासिक आता चालू आहे का नाही हे मला माहीत नाही पण मी शाळेत असण्याच्या दिवसात, म्हणजे १९५०च्या दशकात हे मासिक आणि शालापत्रक असे आणखी एक मासिक मुलांमध्ये खूपच प्रिय होते. मी आनंदचा नियमित वाचक होतो आणि शालापत्रकची तर माझी वर्गणीच होती.
माझ्याजवळील 'शब्दरत्नाकरा'मधील आपटे ह्यांचे छायाचित्र पुढे देत आहे.
अमेरिकेतील दुसरी दुर्दैवी हत्तीण
वरील प्रतिक्रिया वाचून आठवण झाली ती DC विरुद्ध AC ह्या एडिसन आणि निकोला टेस्ला/वेस्टिंगहाउस ह्यांच्यामधील वादात AC किती धोकादायक आहे हे सर्वसामान्यास कळावे आणि आपला व्यापारातील स्पर्धक स्पर्धेतून बाहेर फेकला जावा ह्या हेतूने एडिसनने 'टॉप्सी' नावाच्या हत्तिणीला AC प्रवाहाने जाहीर रीत्या मारून दाखवले त्या प्रसंगाची आठवण झाली. त्याचे चित्रीकरण येथे पहा.
'टॉप्सी'वरील विकिपीडिया पान येथे आहे.
कोणत्याशा माहितीपटातून ...
एडीसनने मृत्युदंड झालेल्या एका माणसालाही AC करंट देऊन मारवलं होतं. त्या माणसाचा मृत्यु हालहाल होऊन झाला, साधारण पंचवीस मिनीटं ही प्रक्रिया सुरू होती आणि हा दुर्दैवी माणूस त्यातला बहुतांश काळ जिवंत, शुद्धीत होता; असं कोणत्याशा माहितीपटात पाहिलं होतं. पुढे एडीसनने या हत्तीणीला मारलं. DC हा प्रकार AC पेक्षा जास्त गळती होणारा आणि धोकादायक असतो. सुदैवाने त्या 'युद्धा'त टेस्ला आणि वेस्टींगहाऊस जिंकले. वेस्टींगहाऊसला नायगारा धबधब्यातून वीज निर्माण करण्याचं कंत्राट मिळालं. आणि आता जगभरच AC पद्धतीने वीज घरोघर पोहोचते.
फार कमी व्होल्टेजवर चालणारे LED दिवे अजून फार प्रचलित नाहीत. पण बहुतांश प्रकारच्या फोनचे चार्जर्स, कंप्यूटर्स, LED/LCD टीव्ही अशी 'हलकी' उपकरणं डीसी वीज वापरतात. (प्लगमधे जाणारा भाग मोठा असेल किंवा लॅपटॉपसाठी असतो तसा चार्जर असेल तर उपकरण डीसी विजेवर चालतं.)
स्टीफन झ्वाइग
आजच्या दिनविशेषातील स्टीफन झ्वाइग उल्लेख वाचून कॉलेजात केलेले स्टीफन झ्वाइगचे वाचन आठवले. त्याच्या लेखनाची - म्हणजे लेखनाच्या भाषान्तराची - एक मालिका एका प्रकाशकाने काढली होती. तिच्यामध्ये ७-८ पुस्तके असावीत आणि त्या सर्वांना एक विशिष्ट प्रकारची बांधणी होती ज्यामुळे पुस्तके लांबूनहि ओळखता येत. फर्ग्युसन कॉलेजात जेरबाई लायब्ररीच्या ओपन अक्सेस मुळे एकदा मला त्याच्या लेखनाची चटक लागल्यावर सर्व पुस्तके मी वाचून काढली होती. त्यांपै़की 'Beware of Pity' ही एका अपंग मुलीवर जडलेल्या प्रेमाच्या कहाणीची कादंबरी आणि 'The Royal Game' ही बुद्धिबळाच्या खेळाभोवती गुंफलेली दीर्घ कथा अजूनहि स्मरणात आहेत. त्याची शैली अतिशय रंजक होती.
सध्याचा गाजत असलेला The Grand Budapest Hotel हा सिनेमाहि स्टीफन झ्वाइगच्य कथेवरच आधारित आहे असे वाटते.
उत्सुकतेपायी अधिक शोध घेतला आणि खालील उद्बोधक माहिती मिळाली. झ्वाइगच्या Kaleidoscope 1 आणि Kaleidoscope 2 अशा दोन कथासंग्रहामध्ये त्याच्या दीर्घकथा आहेत हे आठवले आणि वर उल्लेखिलेली 'The Royal Game' ही कथा, तशाच 'The Invisible Collection' 'Letter from an Unknown Woman' ह्या दीर्घकथाहि आठवल्या. हे दोन्ही संग्रह 'Million Books Project'मध्ये आहेतच. ह्याखेरीज त्या www.arvindguptatoys.com/arvindgupta/stefan-1.pdf
www.arvindguptatoys.com/arvindgupta/stefan-2.pdf
येथेहि उपलब्ध आहेत.
अरविंद गुप्ता हे आयुकामध्ये शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या www.arvindguptatoys.com ह्या वेबसाइटवर मराठी, हिंदी, इंग्रजी मिळून काहीशे पुस्तके पीडीएफमध्ये आहेत. मला वाचायला आवडतील अशी बरीच पुस्तके तेथे दिसली. तुम्हीहि शोध घेऊन पहा. कदाचित काहीतरी मिळून जाईल, जसे मला Kaleidoscope 1 आणि Kaleidoscope 2 मिळाले.
रिचर्ड द थर्ड
इथे अजूनही २३ एप्रिल असल्याने ही प्रतिक्रिया 'आजचे दिनवैशिष्ट्य'मध्ये चालून जावी.>
२३ एप्रिल हा शेक्सपिअरचा जन्मदिन आणि मृत्यूदिनही. त्याच्या गाजलेल्या नाटकांबद्दल बरंच काही लिहिलं गेलं आहे. ही नाटकं मुळातून वाचावी अशी तर आहेतच; पण त्यांच्यातला प्रास, Iambic Pentameterची तालबद्धता, कोट्या (puns) आणि महत्त्वाच्या शब्दांचं वाक्यातलं स्थान आणि वारंवारिता - यासाठी ती लक्षपूर्वक ऐकण्याजोगीही.
'रिचर्ड द थर्ड' या नाटकाची सुरुवात ज्या भाषणाने होते, त्याचे चित्रपटातील हे दृश्य.
या भाषणाचं इयन मकेलनने केलेलं विश्लेषण शेक्सपिअरच्या लेखनातली ही ठळक वैशिष्ट्यं उलगडून दाखवतं - http://www.stageworkmckellen.com/
पत्री सरकार
१९४६ : पत्री सरकारच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माफी दिल्याची घोषणा
या 'चळवळी'चे अधिकृत नाव 'प्रतिसरकार' असे होते ना?
मला वाटते, यांच्याविषयीच्या काही (कु)ख्यातीमुळे यांना 'पत्री सरकार' असे (कुत्सितपणे) संबोधले जात असे.
(असे उडतउडत ऐकलेले आहे; चूभूद्याघ्या. जाणकारांनी सविस्तर खुलासा करावा.)
अं...... शक्य आहे
अं...... शक्य आहे. मला वाटतं मी मुळातच Reference (या बरोबर शब्दा) ऐवजी Source असा (चुकीचा) शब्द वापरणार होतो. म्हणजे असं की;
- पुस्तकातलं वाक्य माझ्या लिखाणाचा आधार आहे असं सांगायचं होतं मला - पुस्तकातल्या त्या लिखाणाचा 'संदर्भ' द्यायचा होता.
- पण मी जर एखाद्या गुन्ह्यासंबंधी काहि माहिती मिळवली तर त्या माहितीचा 'स्त्रोत' मी गोपनीय ठेऊ शकतो.
आता हा कांदा जरा अजून सोलूया! - "गावातलं वाचनालय हा माझ्या लिखाणातल्या माडगूळकरांच्या पुस्तकातल्या संदर्भांचा स्त्रोत आहे." :-)
अवांतर
आमचा एक तमिळ मित्र आम्हांला एकदा म्हणाला, "ल बोलते वक्त नाक दात को टच करता है, ळ बोलते वक्त और ऊपर और ऴ बोलते वक्त और ऊपर टच करता है!" मला काय झेपलेच नाही. माझे तोंड बघून शहाण्याला दोन मिनिटांनी आपली चूक लक्षात आली आणि म्हणाला "हिन्दी में नाक को जीभ (त्याच्या उच्चारात जीब :प ) बोलते है". अजूनही माझ्या चेहर्यावरचे भाव पाहून म्हणाला "हिन्दी के जीभ को तमिळ में नाक बोलते है!" आणि मग कुठे आमच्या डोक्यात प्रकाश पडला. :ड
प्रति सरकार
मला वाटते की चळवळीचे मूळ नाव 'प्रतिसरकार'असे होते. चळवळीमध्ये ती चालविण्यासाठी सरकारी खजिने लुटणे, गावांतील वाणीव्यापार्यांना लुटणे अशा गोष्टी मान्य होत्या, जशा वासुदेव बळवंत फडके ह्यांच्या चळवळीतहि होत्या.
चळवळ मुख्यत्वे करून दक्षिण महाराष्ट्रात पसरली. तेथील ब्राह्मण वर्गाला साहजिकच तिची दहशत होती. 'प्रतिसरकार' ह्या शब्दाचे लवकरच 'पत्रीसरकार' असे रूपान्तर झाले आणि ह्या नावेला साजेश्या अशा अफवा आणि आख्यायिकाहि पसरू लागल्या. त्यातील एक म्हणजे 'ब्राह्मण सावकारांच्या पायाला पत्रे ठोकणारे ते पत्री सरकार' ही आख्यायिका.
ही आख्यायिका कुचेष्टेपेक्षा गैरसमजुतीतून निर्माण झाली असे वाटते.
प्रती सरकार - पत्री सरकार
प्रती सरकारला कुत्सीतपणे पत्री सरकार म्हणायचे हे पहिल्यांदाच ऐकल, आणि त्याची ब्राम्हणांनाच दहशत होती हेही.
आजोबांनी (जे त्यात होते) सांगितल्यानुसार ज्याला शि़क्षा द्यायची आहे त्या माणसाला उताणा झोपवून त्याच्या तळपायांवर भरमाप्पा (आज पोलिसांकडे असतो तसा दांडू पण बर्यापैकी जाड आणि नियमीतपणे तेल लावत असलेला) हाणायचे, पाय जायबंदी होस्तोवर.
ह्या क्रियेला 'पत्री मारणे' म्हणत असत, म्हणून पत्री सरकार.
अर्थबोधन
गेर्निकात असलेल्या घोड्याच्या आणि बैलाच्या चित्रामागचा अर्थ काय असावा ह्यावर कलाप्रेमींमधे झालेल्या चर्चेनंतर पिकासो म्हणतो -
...this bull is a bull and this horse is a horse... If you give a meaning to certain things in my paintings it may be very true, but it is not my idea to give this meaning. What ideas and conclusions you have got I obtained too, but instinctively, unconsciously. I make the painting for the painting. I paint the objects for what they are...
चित्राचा अर्थ शोधणार्यांसाठी हा दुवा उपयोगी पडावा, तरीही पिकासो काय म्हणतो ते लक्षात ठेवावे.
कूली
अमिताभच्या संयत्,मार्मिक,हळव्या- हळूवार , आशयगर्भ्,भावगर्भ, उत्कट, महन्मंगल अशा "कूली"
नामक थोर कलाकृतीत "अल्लारखा" असाच उच्चार आहे.
अल्लरखाँ असा उच्चार नाही.
तर सांगायचे म्हणजे कूली मध्ये "अल्लारखा" हा उच्चार आहे; म्हणजेच "आल्लारखाँ" हाच योग्य उच्चार असला पाहिजे.
;)
हे खाँसाहेब नुकतेच जन्मले
हे खाँसाहेब नुकतेच जन्मले असता आजारी पडले अन घरच्यांनी देवास साकडे इ. घातले अन सुदैवाने काही उपचाराविनाही बरे झाले अशी काहीशी कथा वाचल्याचे स्मरते. तस्मात त्यांचे नाव देवाने राखलेला अर्थात अल्ला-रखा असे पडले. आता पुढे ते मोठे खाँसाहेब झाले, तस्मात अल्लारखा खाँ चे अल्लारखाँ झाले असेल असे वाटते.
Impressionist
मुख्यपानावर असलेल्या चित्रकाराच्या 'इंप्रेशनिझम' शैलीबद्दल थोडे -
Impressionist painting characteristics include relatively small, thin, yet visible brush strokes, open composition, emphasis on accurate depiction of light in its changing qualities (often accentuating the effects of the passage of time), ordinary subject matter, inclusion of movement as a crucial element of human perception and experience, and unusual visual angles.
The term 'Impressionist' was first used as an insult in response to an exhibition of new paintings in Paris in 1874. A diverse group of painters, rejected by the art establishment, defiantly set up their own exhibition. They included Monet, Renoir, Pissarro and Degas.
इम्प्रेशनीस्ट शैलीच्या मुख्य लक्षणांबद्दल इथे वाचता येईल.
क्लोड मोने हा पहिला इम्प्रेशनीस्ट, त्याच्या पहिल्या इम्प्रेशन ह्या चित्रावरुन हि शैली पुढे विकसित झाली.
पॉप्युलर
अधिकचे निबंध विषय :-
१. पॉप्युलर कल्चरमधील इम्प्रेशनिस्ट बद्दलचे समज
२. jean paul sartre झं पॉल सार्त्र ह्याचा अस्तित्ववाद व इम्प्रेशनिस्ट ह्यांचा संब्म्ध
३. चेकॉव्ह - टोल्स्टॉय ह्यांची विचारधारा इम्प्रेशनिस्ट पर्यंत कशी पोचते ते स्पष्ट करा
४. बौद्ध व कन्फ्युशियन तत्वज्ञानातील सुप्त इम्प्रेशनिस्ट प्रवाहांची तुलना करा
५. बर्ट्रांड रसेल, बेंजामिन फ्रँकलिन ह्यांच्या अभ्यासकांसाठी इम्प्रेशनिस्ट असणं महत्वाचे आहे काय ह्याची चर्चा करा
६.वूडी अॅलनच्या चित्रचौकटीत व प्रकाशाच्या खेळात इम्प्रेशनिझम डोकावताना जाणवतो काय हे स्पष्ट करा.
'माने'चे आजचे चित्र
हे चित्र पाहून काही गोष्टी मनात आल्या.
१. चेहरा, हात आणि सावलीसकटची पावले सोडता शरीरयष्टी द्विमित वाटली.
२. हाताचे मधले वळलेले बोट, तळव्यांवर पडणारी 'फाइफ'ची सावली या आणि अशा दोन-तीन गोष्टींतच अधिक खोली जाणवते.
३. पार्श्वभूमी जवळपास एकरंगी आणि एकप्रतलीय वाटते.
४. कदाचित त्यामुळेच आणि काळा, लाल आणि पांढरा रंगसंगतीमुळे व्यक्तीचित्र एकदम उठून दिसते.
वास्तववादाकडून दृकप्रत्ययवादाकडे जाण्याच्या 'माने'च्या प्रवासात हे चित्र कदाचित त्या स्थित्यंतराचे प्रातिनिधित्व करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. चित्राविषयी अधिक वाचायला हवे.
माने आणि चित्राविषयी
हे चित्र १८६६चं आहे. ह्या काळात मानेवर स्पॅनिश कलाकारांचा विशेष प्रभाव होता. विशेषतः व्हेलाझ्केझचा प्रभाव इथे दिसतो. गडद आणि झगझगीत रंगांतला कॉन्ट्रास्ट हे इथे त्याचं लक्षण आहे. तसंच चित्रविषय हा एक सर्वसाधारण मनुष्य असणं ('जंटलमन' वर्गापेक्षा खालचा असा) हेदेखील त्याचं लक्षण आहे. १८६६च्या प्रतिष्ठित पॅरिस सालोंमध्ये हे चित्र नाकारलं गेलं होतं. कारण तेव्हा प्रचलित 'चांगल्या' कलेच्या कल्पनेत कदाचित ते बसत नसावं. (हेदेखील आता रोचक वाटू शकेल) हे नकाराचं प्रकरण तेव्हा खूप गाजलं होतं. प्रख्यात लेखक एमिल झोला तेव्हा मानेच्या बाजूनं धावून आला होता. त्या आधीही १८६२मधल्या सालोंमधलं मानेचं ' Déjeuner sur l’herbe चुकीच्या कारणांसाठी गाजलं होतं. त्यानंतर जे स्कँडल झालं त्यामुळे मानेला पुष्कळ त्रास सहन करावा लागला होता, पण झोला आणि कवी बोदलेरसारख्यांचा पाठिंबा आणि मैत्री त्या वेळी मानेला आधार देत गेले. मग १८६५मध्ये त्याचं 'ऑलिम्पिया' सालोंमध्ये स्वीकारलं जाणं हे आधुनिकतेकडे चित्रकलेचा प्रवास होत चालल्याचं कदाचित लक्षण होतं. पण ह्या पार्श्वभूमीवर १८६६मध्ये हे साधंसं चित्र पुन्हा नाकारलं गेल्यामुळे माने खरा आव्हाँ-गार्द ठरला ;)
संत गोरा कुंभार आणि सत्य साई बाबा
रविवारी म्हणज्च २८ एप्रिलला संत गोरा कुंभार ह्यांची पुण्यतिथी होउन गेली पण त्याचा उल्लेख दिनवैशिष्ट्यात दिसला नाही.
(कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय, पण रविवारी नाही सापडला. काय झोल आहे समजत नाही.)
२४ एप्रिल रोजी सत्यसाईबाबा ह्यांनी जीवनयात्रा संपवली.
त्या घटनेचाही उल्लेख दिसला नाही दिनवैशिष्ट्यात.
१० एप्रिल
>> रविवारी म्हणज्च २८ एप्रिलला संत गोरा कुंभार ह्यांची पुण्यतिथी होउन गेली पण त्याचा उल्लेख दिनवैशिष्ट्यात दिसला नाही.
(कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय, पण रविवारी नाही सापडला. काय झोल आहे समजत नाही.)
विकी पानानुसार ती १० एप्रिलला होऊन गेली. त्यामुळे ऐसीवरही त्याचा उल्लेख १० एप्रिलला येऊन गेला.
ऊप्स
तेच म्हटलं. इथेच पाहिल्यासारखं वाटत होतं दिनविशेषात.
पण एक दोन गावात गोरा कुंभार पुण्यतिथीनिमित्त रविवारी काही कार्यक्रम वगैरे असल्याचे वाचण्यात आले.
शिवाय आताच तपासले तर कालनिर्णयातली तारिख दिसते आहे :-
रविवार, २७ एप्रिल.
(मी वरती २७ एप्रिल म्हणण्याऐवजी चुकून २५ एप्रिल म्हटलो.)
बहुतेक तिथी विरुद्ध क्यालेंडर तारिख असा नेहमीचाच भारतीय तारखांबाबतचा घोळ असावा असे वाटते.
(पक्षी :- १० तारखेस ग्रेगोरियन तारखेनुसार तर २७ तारखेस तिथीनुसार वगैरे; असे स्वतःलाच समजावत आहे.)
ओम् कुल्थुमविषयी
Oum kalthoum ही गेल्या शतकातली गायिका इजिप्तमधली. अरेबिक गाणी गाणारी व अरेबिक चित्रपटांत काम करणारी. तिच्या नावाचे अनेक उच्चार आणि स्पेलिन्ग् उपलब्ध आहेत. मी जे प्रत्यक्ष एका इजिप्शिअन व्यक्तीकडून ऐकले तो उच्चार 'ओम् खुल्थुम'ला जवळ जाणारा होता. अगदी थोडक्यात महत्त्व सांगायचे तर भारतात लता मंगेशकर हे नांव घेतल्यावर ज्या मोठेपणाची जाणीव अनेकांना होते, तसे हिच्या बाबतीत इजिप्शिअन/अरेबिक जगतात लोक (आपापल्या) कानाच्या पाळ्या पकडून आदराने नतमस्तक होतात. सर्वश्रेष्ठ अरेबिक गायिका असा तिला मान आहे.
२००३ साली एका आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत सहभागी झालो असताना आयोजकांनी शेवटच्या दिवशी वेगवेगळ्या देशांतून आलेल्या मुलांना त्यांच्या देशाविषयी प्रातिनिधिक अश्या स्वरूपाचे ५ मिनिटांचे सादरीकरण करायला सांगीतले. त्यात अनेकांनी आपापला देश प्रामुख्याने कश्यामुळे ओळखला जातो त्याची चित्रे वगैरे दाखविली. (उदा. भारत म्हटला की 'ताजमहाल', तुर्कस्थान म्हटला की 'ब्लू मॉस्क्', इ.). एका इजिप्शिअन मुलाने 'मला जे सांगायचे ते इथे आहे' असे म्हणून पडद्याकडे निर्देश करून बाकी काही न बोलता ती ५ मि. फक्त उम् खुल्थुमचा एक गाण्याचा तुकडा ऐकवला आणि पडद्यावर त्या अरेबिक गाण्याचे इंग्रजी भाषांतर ओळीओळीने दाखविले. त्यात इजिप्तच्या थोरवीचे वर्णन होते. त्यावेळेस या गायिकेचे नांव व तिची अरेबिक देशांतली ओळख प्रथमच ऐकली.
शक्य आहे, पण...
...'आजच्या दिनवैशिष्ट्यां'त केवळ 'जन्मदिवस: ४ मे: गायिका उम कलतूम (१९०४)' एवढ्याशा त्रोटक नोंदीने (कोणत्याही आग्यापिछ्याशिवाय नि स्पष्टीकरणाशिवाय) कोणाला हा अर्थबोध कसा (नि काय म्हणून) व्हावा, नि कोणाच्या आयुष्यात त्याने फरक काय म्हणून पडावा?
(हेच, उदाहरणादाखल, जर लता मंगेशकर-तलत महमूद-मुहम्मद रफी-प्रभृतींबद्दल घडले असते, तर काही अर्थबोध घडण्याची वा कोणास फरक पडण्याची शक्यता बळावती.)
कालनिर्णय!
कालनिर्णय!
कालनिर्णय हा खात्रीशीर स्रोत मानला जात नसल्यास क्षमस्व.
कालनिर्णय बरेच प्रचलित आहे, वापरात आहे म्हणून उल्लेख केला.
( अवांतर :- औरंगाबादला ईद का कसल्यातरी तारखांसाठी मौलवी व जिल्हाधिकारी ह्यांच्या बैठकीत सुटी ठरवायला कालनिर्णय
वापरला गेल्याचे ऐकून मौज वाटली होती.)
ग्रेगरियन असावे
ऐतिहासिक (अर्थात पुराव्याने शाबित) व्यक्तींचे जन्म-मृत्यू दिनांक ग्रेगरियन कालगणनेत तर पौराणिक (अर्थात पुराव्याने शाबित नसलेले) व्यक्तींचे जन्मदिन (उदा. रामनवमी, कृष्णजन्म, हनुमान जयंती इ.) तिथीनुसार द्यावी असा संकेत आहे.
तेव्हा, वामन पंडितांच्या पुण्यतिथीची तारीख ग्रेगरियन कालगणनेत असावी, असे मानता येईल.
...
तलत महमूद व कैफी आझमी यांच्या स्मृतिदिनांनिमित्त तलत महमूद यांचा अभिनय व पार्श्वगायन असलेले आणि कैफी आझमी लिखित एक गीत मुखपृष्ठावरून ऐकता येईल.
च्यायला! तलत दिसायचा पण बरा (म्हणजे ते काय 'ह्याण्डसम' की काय ते म्हणतात, तशातला) की हो!
आज जॉर्ज ब्राक या चित्रकाराचा
आज जॉर्ज ब्राक या चित्रकाराचा जन्मदिवस आहे. त्याने सुरुवातीच्या काळात काढलेली भडक रंगातली चित्रं (fauvism) आणि त्यानंतर (पिकासोच्या जोडीने) काढलेल्या क्यूबिस्ट चित्रांमधला एकरंगीपणा यांच्याबद्दल आश्चर्य वाटतं. उदाहरणार्थ हे एक बंदराचं चित्र -
आणि हे मासेमारीच्या बोटींचं -
साधारण एकाच विषयाला, एकाच माणसाने दोन पद्धतींनी चितारताना एवढा फरक असावा याची गंमत वाटली.
दुसरं चित्र मासेमारी बोटींचं
दुसरं चित्र मासेमारी बोटींचं आहे हे कळायला काही मार्ग दिसत नाही.
चित्र नीट पाहिलं तर त्यात खालच्या बाजूला माशाच्या खवल्यांसारखा पोत दिसतो. यांना बोटी म्हणण्यापेक्षा होडगी म्हणता येईल अशा वस्तू चित्रात आहेत. ही होडगी मासेमारीसाठीच बहुतेकदा वापरली जातात. तसे या चित्रात फार अॅबस्ट्रॅक्ट आकारही नाहीत. (म्हणून या चित्राबद्दल बोलणं मला सोपं वाटलं.)
दुसरं चित्रं पाहताना त्या शेजारी 'फिशिंग बोट्स' असा फलक लावलेला होता, म्हणून मला अर्थ समजताना मदत झाली हे खरंच.
खरं आश्चर्य हे की
खरं आश्चर्य हे की ब्राकने जे काहि चितारलंय, जे काहि रंग कागदांवर मांडलेत (गूगलवर जाउन त्याची अजून अशी करामत पण पाहिली) त्याला 'चित्र' म्हणतात!! ब्राकलाच कशाला बोल लावायचा म्हणा. आणिक बरेच आहेत. वाक्यं वेगळ्या वेगळ्या ओळींवर लिहून, भरपूर टिंब वापरून लिखाण केलेलं असतं त्याला कविता म्हणणारेही आहेत. ;-)
ब्राकचा प्रवास
>> त्याने सुरुवातीच्या काळात काढलेली भडक रंगातली चित्रं (fauvism) आणि त्यानंतर (पिकासोच्या जोडीने) काढलेल्या क्यूबिस्ट चित्रांमधला एकरंगीपणा यांच्याबद्दल आश्चर्य वाटतं.
ब्राकचा प्रवास खूप रोचक आहे. मातिसनं प्रचलित केलेल्या फॉव्हिस्ट शैलीचा त्याच्यावर सुरुवातीला प्रभाव होता, पण हळूहळू तो सेझानच्या प्रभावाखाली आला, आणि मग सेझानच्याही पुढे तो क्यूबिजमच्या दिशेनं जाऊ लागला. मधल्या काळातल्या त्याच्या Maisons à l'Estaque (१९०८) सारख्या चित्राविषयीचा हा व्हिडिओ पाहिला, तर त्याच्या प्रवासाविषयी अधिक कळेल. ह्या चित्रावर सेझानच्या निसर्गचित्रणाचा प्रभाव आहे, पण क्यूबिझमच्या दिशेनं जाण्याची त्यात चाहूलही आहे. कोणत्याही वस्तूचं चित्रीकरण करताना रंग, पृष्ठभाग आणि अनेक इतर घटकांबरोबर खेळत क्यूबिस्टांनी चित्रकलेच्या इतिहासातले काही अत्यंत महत्त्वाचे प्रयोग केले आणि एक प्रकारे अमूर्त चित्रकलेची चाहूल दिली. त्याची किंचित झलक ह्या व्हिडिओत मिळेल.
थोडी नजर तयार केली, तर ब्राकची मजा घेता येईल. तो एक प्रतिभावान चित्रकार होता आणि आधुनिक चित्रकलेच्या इतिहासात त्याचं स्थान अनन्य आहे.
श्री. आनंद मोडक
माझी दोन अतिशय आवडती गाणी, मोडकांनी संगीतबद्ध केलेली -
१. मना तुझे मनोगत... मला कधी कळेल का ?
(गायिका: आशा भोसले, गीतकार: सुधीर मोघे, चित्रपट: कळत नकळत, [१९८९])
२. मी गाताना... गीत तुला लडिवाळा
(गायक: रवींद्र साठे, गीतकार: ना. धों. महानोर, चित्रपट: एक होता विदुषक [१९९२])
मना तुझे मनोगत हे अतिशय अवडतं
मना तुझे मनोगत हे अतिशय अवडतं गाणं. शब्द काय सुरेख आहे त्याचे, मनाबद्दल केवळ ह्या दोन वाक्यात किती समर्पक सांगितलं आहे "कोण जाणे केवढा तू व्यापतोस आकाशाला, आकाशाचा अर्थ देशी एका मातीच्या कणाला" .. व्वा क्या बात.
संगीत उत्तमच, आणि आशाताईंचा आवाज म्हणजे दुधात साखर/सोने पे सुहागा/चेरी ऑन केक.
ग्रीनिच मीन टाइम इ.
आजच्या ४ जूनच्या दिनविशेषातील पुढील उल्लेख वाचला:
'१८७६ - न्यू यॉर्कहून निघालेली 'ट्रान्सकाँटिनेन्टल एक्सप्रेस' ही अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही रेल्वेची पहिली प्रवासी ट्रेन ८३ तास ३९ मिनिटांच्या प्रवासानंतर सॅन फ्रांसिस्कोला पोहोचली.'
त्यावरून आठवले की अमेरिका आणि कॅनडा हे पूर्वपश्चिम असा बराच मोठा भूविस्तार असणारे देश जेव्हा तारायंत्र आणि आगगाडयांनी एकत्र बांधले जाऊ लागले तेव्हा त्यांना वेगवेगळ्या भागातील स्थानिक वेळा वेगवेगळ्या असणे ह्यातील अडचणी नजरेस पडू लागल्या. उदाहरणार्थ आगगाडीचे सुटसुटीत वेळापत्रक करणे. त्यावर इलाज म्हणून तासातासाचे टाइमझोन्स पाडावयास त्यांनी प्रारम्भ केलाच होता. हीच कल्पना सर्व जगभर पसरवून सर्व जगाचे टाइमझोन्स करण्यासाठी अमेरिकेच्या पुढाकाराने वॉशिंग्टन डीसी येथे १८८४ साली the World Meridian Conference नावाची परिषद बोलावण्यात आली आणि तत्कालीन जगातील सर्व महत्त्वाच्या राष्ट्रांनी आपापले प्रतिनिधि तेथे पाठविले. (त्यात हिंदुस्थानलाहि प्रतिनिधित्व मिळाले होते, हिंदुस्थानातील दोन ब्रिटिश अधिकारी हिंदुस्थानचे प्रतिनिधि म्हणून तेथे गेले होते.) ह्या परिषदेचे फलित म्हणजे टाइमझोन्सची व्यवस्था आणि ग्रीनिच मीन टाइमचा जागतिक कालसन्दर्भासाठी उपयोग.
ह्या परिषदेमध्ये ब्रिटन आणि फ्रान्स ह्या दोन राष्ट्रांमधील चुरस आणि परस्परांचा मत्सर ह्यांचे दर्शन झाले. अनेक कारणांमुळे बहुतेक सर्व राष्ट्रांचा शून्य रेखांश Prime Meridian ही ग्रीनिचच्या वेधशाळेवरून नेण्याच्या कल्पनेला पाठिंबा होता. अमेरिकेनेहि ह्याला संमति दर्शविली होती. फ्रेंच प्रतिनिधींनी मात्र प्रथम पॅरिसस्थित वेधशाळेचा दावा मांडला आणि तो शक्य नाही असे दिसल्यावर शून्य रेखांश अझोर्स बेटांच्या पलीकडे अटलांटिक महासागरात ही रेषा असावी असे सुचविले, जेणेकरून ही रेषा कोठल्याहि देशाच्या भूभागातून न जात सर्वच्या सर्व महासागरांमध्येच पडेल. हेहि परिषदेस मान्य झाले नाही आणि शून्य रेखांश ग्रीनिच वेधशाळेमधून जावा असा ठराव पसार झाला.
ठौक होते
हे ठौक होते.
म्हणजे एका अर्थाने आपण आख्खे आजचे जग हे युरोपीय चश्म्याने पाहतोय; असेच झाले.
अगदि खंडाम्ची नावेही त्यांनी त्यांच्या हिशेबाने दिली; तीच रूढ झाली आणि प्रचारात राहिली.
(अमुक नदीपलिकडचा तुर्कीचा प्रदेश म्हणजे आशिया... नंतर नदीपलीकडील जे जे काही आहे ते ते...
अगदि पार चीन- जपान पर्यंत सारेच आशिया.)
क्यालेंडारही त्यांचेच. (तिथी नक्षत्रे तांत्रिअकदृष्ट्या सुरुही असतील, पण प्रत्यक्ष वापरात कोणी वापरत नाही.
छत्रपतींचा जन्म इस १६३० मध्ये झाला असेच म्हणतो; शके सतराशे काहीतरी असे आपण म्हणत नाही व्यवहारात.
)
काल गणना, अंतर गणना, क्यालेंडर सारेच त्यांनी रूढ केलेले.
खंड
खंड हे बहुतेक भौगोलिकदृष्ट्याही वेगवेगळ्या प्लेट्समध्ये येतात.
बाकी गोष्टी त्यांनी त्यांचे रूढ केलेपेक्षा त्यांनी या मापनात प्रमाणीकरण आणले हे अधिक योग्य ठरावे.
पाश्चात्य मैल, पौंड वापरायचे - ते मात्र आपल्याकडे (नी अनेक देशांत) टिकले नाही, आपण वेगवेगळ्या राजवटीत वेगवेगळी मापनपद्धती अवलंबलि आहे - आता प्रमाण किमी/मीटर या दशमान पद्धतीवर स्थिरावलो आहे
आपण घटका-पळे या काहिशा (अधिक तृटीपूर्ण/ढोबळ/क्लीष्ट? कल्पना नाही) पद्धती वापरायचो, सेकंद, मिनिट अधिक सोपे आहे असे नाही पण ते मोजायचे यंत्र थोडक्या जागेत - प्रसंगी हातावरही मावते या कारणाने ते अधिक प्रचारात राहिले.
पाश्चात्यांच्या प्रत्येक गोष्टीत अनुकरण केले, त्यांच्या दृष्टीने बघतो पेक्षा त्यांनी अधिक सोप्या पद्धती दिल्या, प्रमाण पद्धती दिल्या हे (प्रत्येक नसले तरी) अनेक बाबतीत योग्य ठरावे
फूट - मीटर
दशमानीकरणानंतर फूट पाउंड जाऊन मीटर किलोग्रॅम आले.
त्यावेळी जगभरात (ब्रिटिश साम्राज्यात + अमेरिकेत) रूढ असलेल्या फुटाचं धशमानीकरण का केलं गेलं नाही असा प्रश्न मला नेहमी पडतो.
म्हणजे फुटात बारा इंच ठेवण्याऐवजी दहा इंच ठेवता आले असते.
भारतासारख्या अशिक्षितांच्या देशात रुपयाचे (१६ आणे) ६४ पैसे बदलून शंभर पैसे (नवे पैसे) बर्यापैकी सहज घडून गेले. मग मुद्दाम फूट काढून टाकून मीटर रूढ करण्यात काय हंशील होते? की इंग्लंडच्या घसरलेल्या सामर्थ्यामुळे सूड घेतला गेला?
एक आणा = ६ नवे पैसे
एक आणा = ६ नवे पैसे.
पण आम्ही १ आणा - ६ पैसे, दोन आणे १२ पैसे, तीन आणे १९ पैसे चार आणे २५ पैसे असं शाळेत पाठ केलं होतं. तिसरा (सातवा, अकरावा आणि पंधरावा) आणा ७ पैशांचा.
आपल्याकडे फूट पाउंड होते म्हणजे ब्रिटन मध्ये होतेच.... :)
माझ्या पहिल्या नोकरीत ब्रिटिश कोलॅबोरेशन होते. तिथे ऐशी सालापर्यंत इंचच वापरात होते. त्यांच्या ड्रॉइंगवर मिलिमीटर मध्ये आकडे असत पण ते इंच आहेत हे सहज लक्षात येत असे. (बार चा व्यास १९ मिमि असे लिहिलेले असे- जो माणूस मिलिमीटर मध्ये विचार करेल तो १९ मिलिमीटर ऐवजी २० मिलिमीटर घेईल).
इथे पाहिले तर दोन पैसे म्हणजे रुपयाचा पन्नासावा भाग असं नाण्यावर लिहिलेलं असे. शिवाय दोन "नवे" पैसे असं लिहिलेलं असे.
नंतरच्या नाण्यांवर तसं लिहिणं बंद झालं.
रोचक बाब म्हणजे ६, १२ आणि १९ पैशांची नाणी पाडली गेली नव्हती.
एक आणा ६ पैसे तर रुपया चौसष्ट
एक आणा ६ पैसे तर रुपया चौसष्ट पैशाचा कसा?
का चौसष्ट जुन्या पैशाचा रुपया होता? नी ४ जुन्या पैशाचा आणा?
बाकी यावरून (खरंतर उगाच) ब्रॉड गेज गाडीच्या रुळांमधील अंतराची कहाणी आठवली. या ब्रॉड गेज नावाने चालणार्या गाड्यांच्या रुळाअंतील अंतर मात्र वेगवेगळे आहे ;) (उदा. भारतात ब्रॉड गेज साडेपाच फुटी आहे तर फिनलंड मध्ये पाच फुटी, आर्यंलंडमध्ये सव्वापाच फुटी)
नया पैसा
१९५६-५७ च्या सुमारास ४ पैसे = १ आणा, १६ आणे = १ रुपया ह्या जुन्या नाण्यांऐवजी १०० पैसे = १ रुपया अशी नवी चलनव्यवस्था सुरू झाली. ह्यामध्ये रुपया तोच राहून खालची नाणीच केवळ बदलली. तसेच रुपये-आणे-पैसे ह्या त्रिस्तरीय व्यवस्थेऐवजी रुपये-पैसे अशी द्विस्तरीय व्यवस्था सुरू झाली. नवी नाणी एकदम पुरेशा प्रमाणात देशभर पोहोचणे शक्य नव्हते, तसेच जुनी नाणी लोकांच्या खिशामध्ये होतीच आणि तीहि चलनातून हळूहळू बाद होईपर्यंत वापरात चालू ठेवणेच इष्ट. ह्या कारणासाठी तात्पुरता उपाय म्हणून जुन्या अमुक पैशांबरोबर नवे तमुक पैसे, जसे की जुने २ पैसे = नवे ३ पैसे, असे कोष्टक अधिकृतरीत्या निर्माण केले गेले होते आणि वर्तमानपत्रांमधून छापवून आणून त्याला प्रसिद्धीहि देण्यात आली होती. जुनी नाणी चलनामधून पुरेशा प्रमाणात निघून जायला काही वर्षे लागली तोपर्यंत वरील कोष्टकानुसार व्यवहार चालू राहिले. ह्या कोष्टकामुळे दोन व्यक्तींमधील व्यवहारामध्ये एकाचा तोटा आणि दुसर्याचा फायदा होणार हे निश्चित होते. उदाहरणार्थ भाजीवाल्याकडून ३ नवे पैसे परत यायचे असतांना भाजीवाल्याने त्याऐवजी २ जुने पैसे दिले तर भाजीवाल्याचा ०.१२५ पैसे इतके नुकसान होते. (त्या काळात भाजीचे दर ह्या स्केलवर असत हेहि ध्यानात धरले पाहिजे.) हा फायदा-तोटा असा अगदी लहान असल्याने सहजगत्या मान्य केला जाई. त्यावरून भांडण निघाल्याचे मलातरी उदाहरण माहीत नाही. जुनी आणि नवी अशी दोन्ही चलने कायदेशीर असल्याने कोणत्या चलनात पैसे द्यायचे हे ठरविण्याचा अधिकार चलन देणार्याकडे असे.
दोन प्रकारचे पैसे एकाच वेळी वापरात असल्याने नव्या पैशांना 'नया पैसा' असे अधिकृत नाव होते आणि ते नाण्यावर लिहिलेले होते. जुने पैसे काही कालानंतर चलनामधून पूर्णतः निघून गेल्यावर हा फरक महत्त्वाचा राहिला नाही आणि 'नया पैसा' नुसता 'पैसा' झाला.
आणे व्यवहारामधून गेले तसेच चवली (दोन आणे), पावली (चार आणे) आणि अधेली (आठ आणे) हे शब्द व्यवहारामधून गेले. आण्याला लोक 'गिन्नी' असे म्हणत तो शब्द गेला. चवलीचे चौकोनी नाणेहि इतिहासजमा झाले.
+
पैसे आणि नवे पैसे असा फरक त्याकाळी होता. हे माझ्या आधीच्या प्रतिसादात फोटोमधून दाखवले आहेच.
पॉइंट इज हे ट्रान्झिशन भारतासारख्या मोठ्याप्रमाणात निरक्षरता असलेल्या देशात सहजपणे घडून गेले. वर्तमानपत्रातली कोष्टके भाजीवाल्यांनी पाहिली असण्याची शक्यता कमीच. तसेच सामान्य माणसांनीही त्या नव्या पैशांना सहज आत्मसात केले असे दिसते. त्या पार्श्वभूमीवर फूट पाउंडांचे दशमानीकरण न करण्याचे कारण लक्षात येत नाही.
कालगणनेचा मनोरंजक इतिहास
३६५ वा ३६६ दिवसांचे दहा भाग करुन दहा महिने तयार करता आले असते की.>
नाही, असे करता आले नसते. निसर्गाने आकाशात अनेक घडयाळे चालू ठेवली आहेत पण ती ओळखण्याचे शास्त्रीय ज्ञान प्राचीन मानवाकडे नव्हते.
जेव्हापासून कालगणना करण्याची आवश्यकता मनुष्यसमूहांना भासू लागली तेव्हांपासून निसर्गातील दोन घडयाळांची जाणीव त्यांना सहजीच झाली. दिवसरात्र आपोआपच कळते. एका पूर्णचंद्रापासून दुसर्या पूर्णचंद्रापर्यंत साधारणपणे दर २९ वा ३० दिवसरात्रीं जातात हे एक घडयाळ. तसेच साधारणपणे ३६५ दिवसांनी सर्व ऋतु पुनः त्याच क्रमाने सुरू होतात हे दुसरे घडयाळ. ह्यांपैकी चंद्राचे घडयाळ पहिल्याप्रथम लक्षात आले असणार आणि एका ऋतुचक्रामध्ये चंद्राचे साधारणमानाने पौर्णिमा ते पौर्णिमा असे १२ प्रवास होतात हे काही काळानंतर लक्षात आले असणार.
ह्यापैकी कोणत्याहि गोष्टीवर मनुष्याचे नियंत्रण नाही आणि ही स्थिति आहे तशी स्वीकारणे इतकेच त्याला शक्य आहे. म्हणजेच एका वर्षात १२ महिने आणि एक महिना म्हणजे २९ वा ३० दिवस ह्या एकाच मार्गानी प्राचीन काळामध्ये कालगणना करणे शक्य होते. कालानुक्रमाने ह्या कालगणनेशी धार्मिक कार्यांचा संबध जुळला आणि ही कालगणना बदलून दुसरी कोणती अधिक 'सुटसुटीत' कालगणना आणणे हे अशक्यप्राय झाले.
अमेरीकेतल्या पहिल्या हत्तीविषयी
१३ तारखेच्या दिनवैशिष्ट्यात "१९७६ - पहिला हत्ती अमेरिकेत आला" असा उल्लेख होता. त्यामुळे कुतुहल चाळवलं. १९७६ नक्कीच चूक असणार पण बरोबर साल किती? तर १७९६ - आकड्यांची अदलाबदल झाली! अधिक शोध घेतल्यावर रंजक माहिती मिळाली.
१७९६ मधे पहिला हत्ती अमेरीकेत आणला गेला. अर्थातच जहाजाने. कुठल्या जहाजाने? अर्थातच 'अमेरिका' नावाच्या! बेलीने तो विकत घेउन लवकरच बार्नम/बेली सर्कस चालू केली. त्या हत्तीच्या नावाने न्यूयॉर्क मधल्या सॉमर्स शहरात एक हॉटेल काढलं - एलिफंट हॉटेल! बाय द वे, त्या हत्तीचं नाव Old Bet. आणि खरं बेलीने तो हत्ती नाही विकत घेतला, त्याने Old Bet विकत घेतलीन - हत्तीण होती ती! पुढच्या वीसेक वर्षात ती अमेरीकाभर भटकली. १८१६ साली Old Bet मेली. एका मुलाने तिच्या डोळ्यात गोळी झाडून मारलं, वेगळ्या शहरात दुसर्याच कोणी मारलं वगैरे प्रवाद आहेत. पण कोणी माणसाने तिला मारलं हे दुर्दैवी सत्य. तिच्या या अशा दु:खी अंतानंतर बेलीने त्या हॉटेलासमोर एका खांबावर तिची लाकडी प्रतिकृती उभारली. ते हॉटेल आ़णि ती प्रतिकॄती अजूनही सॉमर्समधे आहे.
दिनवैशिष्ट्य अचूक असूच नये. मुळात मी १९७६ ऐवजी १७९६ असं बरोबर साल वाचलं असतं तर Old Bet बद्दल एव्हढी माहिती काढत बसलो नसतो!