अभिजात संगीत आणि स्वरलेखन

अभिजात संगीताचा उगम प्राचीन भारतात कधी व कोठे झाला? याची माहिती कोठेच मिळत नसल्याने ते कोणालाही सांगता येणे हे अशक्यप्राय आहे. परंतु ज्याला सध्या स्वरलेखन किंवा नोटेशन या नावाने आपण संबोधतो तशा प्रकारचे संगीताचे काही नियम किंवा साचा फार पूर्वीपासून भारतात अस्तित्वात होता याच्या काही पाऊलखुणा मात्र दिसून येतात. इ,स पूर्व 2000 हा काळ साधारणपणे वैदिक संस्कृतीचा उदय काल म्हणून मानला जातो. या कालानंतर रचल्या गेलेल्या दुसर्‍या वेदाची किंवा सामवेदाची रचना, गेय किंवा गाण्यामध्ये म्हणण्यासारखी केली गेलेली असल्याने नियमबद्ध संगीताची संकल्पना निदान या कालापासून पुढे तरी अस्तित्वात आलेली होती असे म्हणणे फारसे गैर ठरू नये. सामवेदामधील गेय ऋचांना सामगान या नावाने ओळखले जाते. सामगानांमध्ये 3 स्वर वापरले जात असत. हे 3 स्वर ‘अनुदत्त’ (मंद्र स्वर), ‘उदत्य’ (तीव्र स्वर) आणि ‘स्वरित’( मध्य स्वर) या नावाने ओळखले जात. 3 स्वरांवर आधारित असलेली ही साधी सोपी संगीत रचना, पुढच्या काळामध्ये नंतर कधीतरी, प्रत्येकी 7 स्वर असलेल्या 3 सप्तकांमध्ये नियमबद्ध केल्या गेलेल्या संगीत रचनेमध्ये विकसित झाली.

या पुढच्या किंवा प्राचीन इतिहास कालात, वाद्यांच्या साथीने केले जाणारे गायन विकसित झाले होते याचा सर्वात जुना स्पष्ट पुरावा, पहिल्या शतकात चित्रित केलेल्या अजिंठा येथील 9 क्रमांकाच्या गुंफेतील भित्तीचित्रामध्ये दिसतो. या चित्रात एका तत्कालीन राजाच्या समोर वाद्यांच्या साथीवर नृत्य आणि गायन करणारा एक युवती समूह चित्रित करण्यात आलेला दिसतो. या भित्तीचित्राच्या कालाच्याही आधी रचल्या गेलेल्या कौटिल्य निर्मित प्रसिद्ध ग्रंथ ‘अर्थशास्त्र’ यामध्ये संगीताबद्दल काही संदर्भ सापडतात. वात्सायन ऋषींनी संगीताची व्याख्या, गीत किंवा मौखिक गायन, तालवाद्यांचे वादन आणि नृत्य या तीन कलांचा मिलाफ अशी केली होती.

सातव्या शतकापासून निरनिराळ्या राजांच्या दरबारात आपली गायनकला सादर करणार्‍या गायकांचे संदर्भ निश्चितपणे मिळतात. मुघल सम्राट अकबराच्या दरबारात असलेला तानसेन हा गायक तर सुप्रसिद्ध आहेच. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात राजाश्रय लाभलेली ही गायन कला, गुरू कडून त्याच्या शिष्याला मौखिक स्वरूपात शिकवली जाणारी एक विद्या याच स्वरूपात चालू राहिली. सारंगदेव रचित संगीत रत्नाकर, या सारखे काही अपवादात्मक लेखन सोडून, या कलेचे नियम, पद्धती किंवा रागरागिण्यांचे स्वरलेखन केलेली पुस्तके किंवा या कलेचा इतिहास सांगणारे फारसे ग्रंथ दुर्दैवाने कधी रचले गेले नाहीत किंवा रचले गेले असल्यास ते अज्ञातच राहिले. या नंतर भारतात ब्रिटिशांची राजवट आली व राजाश्रय मिळालेल्या गायकांची संख्या कमी कमी होत गेली. यामुळे बहुतेक गायकांची कला व संगीताचे ज्ञान हे त्यांच्या कौटुंबिक वर्तुळापर्यंतच मर्यादित राहू लागले. लागले. संगीत कलेकडे समाज एक करमणुकीचे साधन याच दृष्टीने आणि कमीपणाने पाहू लागला. मात्र याच काळात बडोदा, ग्वाल्हेर आणि लखनौ या सारख्या ठिकाणच्या संस्थानिकांनी मात्र गायक-वादकांना उदार राजाश्रय देण्याचे कार्य चालू ठेवून संगीतकला टिकवण्यास मदत करण्याचे स्पृहणीय कार्य केले.

अभिजात संगीताला प्राप्त झालेल्या दुरवस्थेचे हे चित्र विसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत साधारण तसेच राहिले. या नंतर मात्र एक भारतीय संगीततज्ज्ञ पंडित विष्णू नारायण भातखंडे ( 1860-1936) यांनी हिंदुस्थानी अभिजात संगीताच्या पद्धतीचे नियम आणि निरनिराळ्या रागरागिण्यांच्या स्वरलेखनाचे कार्य हातात घेतले व अखेरीस भारतीय संगीताला लिखित स्वरूपातील नियम आणि स्वरलेखन प्राप्त झाले. भातखंडे यांचा जन्म मुंबईमधील एका चित्पावन कुटुंबात झाला होता व त्यांनी आपले शिक्षण मुंबईचे एलफिस्टन कॉलेज आणि पुण्याचे डेक्कन कॉलेज येथे घेतले होते. त्यांनी कायदा या विषयातील पदवी 1885 मध्ये प्राप्त केली होती आणि 1887 पासून ते वकिली करू लागले होते. कॉलेजमध्ये शिकत असतानाचा भातखंडे सतार वाजवण्यास शिकले होते, नंतर त्यांनी गायनाची कलाही शिकून घेतली व संगीताच्या नियमांबद्दलचे ज्ञान आत्मसात केले होते. त्यांची पत्नी व कन्या यांच्या दुर्दैवी निधनानंतर भातखंडे यांनी आपली वकिली सोडून दिली व आपले उर्वरित आयुष्य, संगीतामधील निरनिराळी घराणी, त्यांचे नियम आणि स्वरलेखन यांचा अभ्यास करून एकत्रित अशा हिंदुस्थानी संगीत पद्धतीच्या नियमांचे आलेखन करण्यात घालवण्याचा निश्चय केला.

पंडित विष्णू भातखंडे यांनी सर्व रागरागिण्याचे स्वरलेखन केलेली ‘स्वरमालिका’ या नावाची पुस्तिका प्रसिद्ध केली व त्याच्या पाठोपाठ लक्षसंगीतम हा संस्कृतमधे लिहिलेला ग्रंथ 1909 मध्ये प्रसिद्ध केला. पुढच्या काळात आपल्या या संस्कृत पुस्तकावरील एक टीकाग्रंथ या स्वरूपात असलेला आणि 4 खंडामध्ये विभागलेला, ‘हिंदुस्थानी संगीत पद्धती’ हा ग्रंथ, त्यांनी आपण संशोधन करून संकलित केलेला संगीताचा हा अनमोल वारसा सर्वसामान्यांना समजावा, म्हणून प्रसिद्ध केला. चार खंडात असलेला हा ग्रंथ आज हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे सर्वमान्य अभ्यासपुस्तक म्हणून मानला जातो. संगीताच्या कोणाही उपासकासाठी हा ग्रंथ म्हणजे अभ्यासाची पहिली पायरी आहे असे समजले जाते.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या इतिहासाचे जरा बारकाईने वर्णन मी वर केले आहे याचे कारण हे आहे की प्राचीन भारतीयांकडे असलेल्या इतर अनेक कला व कौशल्ये या जशा कालौघात नामशेष होऊन गेल्या तसे शास्त्रीय संगीताचे झाले नाही यामागे या एका व्यक्तीचे अथक परिश्रम फक्त कारणीभूत होते या सत्याकडे वाचकांचे लक्ष वेधले जावे. भातखंडे यांनी भारतीय संगीताला कालौघात नष्ट होण्यापासून वाचवले नसते तर आज या संगीताला परत एकदा जी लोकमान्यता व प्रतिष्ठा मिळाली आहे ती मिळणे शक्यच झाले नसते.

परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत नामशेष होण्याच्या वाटेला जे प्रथम लागले होते ते कोणत्या मुलभूत कारणांमुळे असावे? इतर प्राचीन कला व कौशल्ये ज्या कारणांमुळे नष्ट झाली तेच कारण याच्याही मागे होते. दुर्दैवाने प्राचीन भारतीयांना आपले ज्ञान लिखित स्वरूपात मागे ठेवावे अशी आस्था कधीच वाटली नाही. पद्धतशीर आणि शास्त्रीय पद्धतीने आपले कौशल्य किंवा कला यांचे ग्रंथ स्वरूपात आलेखन करून मागे ठेवावे असे कोणत्याच क्षेत्रातील (उदा. स्थापत्य, युद्धकला, औषधोपचार) तज्ञांना, (हाताच्या बोटावर मोजता येतील असे अपवाद सोडल्यास) कधीच वाटले नाही याला एक दैवदुर्विलास असेच म्हटले पाहिजे.

उलट पक्षी, गेल्या शेकडो किंबहुना हजार वर्षांपूर्वीपासून ऐतिहासिक कागद किंवा इतर माध्यमांवर लिहिलेले दस्ताऐवज चिनी लोकांनी मात्र मोठ्या काळजीपूर्वक सांभाळून ठेवलेले आढळून येतात. भारतीय संस्कृतीशी तुलना करता येईल अशीच जुनी चिनी संस्कृतीही असल्याने माझा असा समज होता की चीनमध्ये त्यांच्या संगीताबद्दल जुने ऐतिहासिक ग्रंथ विपुल प्रमाणात नक्की लिहिलेले असावेत व ते काळजीपूर्वक सांभाळले गेले असावेत. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे जुने ग्रंथ अस्तित्वात असल्याची माहिती मला तरी कोठे सापडली नाही. चिनी संगीत परंपरेसंबंधी 200 वर्षांपूर्वी लिहिलेला व अतिशय दुर्मिळ असलेला असा एक ग्रंथ केंब्रिज, इंग्लंड येथे नुकताच सापडला आहे व एकंदरीतच चिनी संगीताबद्दल लिहिलेल्या ग्रंथांची दुर्मिळता लक्षात घेता हा ग्रंथ साहजिकच अतिशय महत्त्वपूर्ण असा मानला जातो आहे.

‘Xian Di Pipa Pu’ हे शीर्षक असलेला हा ग्रंथ कोण्या एका रेव्हरंड जेम्स ईनमान याने चीनमधून इंग्लंडमध्ये आणला होता. हा रेव्हरंड ज्या ब्रिटिश बोटीमधून इंग्लंड्ला येण्यास निघाला होता त्या बोटीची मलेशियाच्या किनार्‍याजवळ फ्रेंच आरमाराशी फेब्रुवारी 1804 मध्ये लढाई झाली झाली व त्यात रेव्हरंड ईनमान यांची बोट बुडाली. मात्र स्वत: रेव्हरंड आणि त्यांचे सामान कसेबसे वाचले. रेव्हरंड नी इंग्लंडला परतल्यावर आपली सर्व चिनी पुस्तके केंब्रिज मधील सेंट जेम्स कॉलेज या संस्थेला देणगी म्हणून देऊन टाकली. चिनी संगीतासंबधी असलेला हा ग्रंथ त्या पुस्तकात असल्याचे नुकतेच आढळून आले आहे. या ग्रंथामध्ये असलेल्या स्वरलेखनामुळे हा ग्रंथ अतिशय दुर्मीळ असा मानला जातो आहे.
या ग्रंथात 3 चिनी पारंपारिक वाद्यांची ओळख करून दिलेली आहे. या शिवाय गोंगशे या नावाने ओळखल्या जाणार्‍या 13 पारंपारिक बंदिशींचे नोटेशन किंवा स्वरलेखन सुद्धा यात दिलेले आहे. गॉन्गझू मधील शिंन्घाई कॉंझरवेटरी येथील प्राध्यापक झिवू वू यांच्या मताप्रमाणे प्राचीन चिनी संगीताचे स्वरलेखन देणारा हा ग्रंथ खरोखरच अत्यंत दुर्मीळ आहे. डॉ. जोयान यॉन्ग या चिनी संगीत तज्ञाच्या म्हणण्याप्रमाणे प्राचीन चिनी संस्कृती आणि संगीत या बद्दल जास्त माहिती करून देण्याच्या दृष्टीने 210 वर्षांपूर्वीचा हा ग्रंथ फारच महत्त्वाचा ठरतो.

या ग्रंथाचा शोध लागल्यामुळे चिनी संगीताबद्दल जशी माहिती नव्याने उपलब्ध झाली आहे तशी माहिती भारतीय संगीताबद्दल होणे कठीण दिसते आहे. याला एकच कारण आहे ते म्हणजे लिखित स्वरूपातील दस्ताऐवज मागे सोडण्याबद्दल प्राचीन भारतीय विद्वानांमध्ये असलेली संपूर्ण अनास्था. यामुळेच आपले अनेक सांस्कृतिक ठेवे कालौघात नामशेष झालेले आहेत.

मूळ इंग्रजी लेखासोबत असलेली चित्रे बघण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा.

27 मार्च 2014

धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

लेखातील भावनेशी सहमत आहे.
भारतीयांनी फारसं मागे ठेवलं नाही हे दिसतच आहे.
पण जे काही लिखित होतं, त्यातल्याही कैक गोष्टी गायब होतात ही एक अजून समस्या आहे.
भासाची तब्बल अकरा संस्कृत नाटकं अगदि अलिकडे म्हणजे १९१०च्या आसपास लिखित स्वरुपात सापडली म्हणतात.
काही ठिकाणी तर मूळ ग्रंथ उपलब्धच नाहित.
त्या ग्रंथांवरील टीका/समीक्षा उपलब्ध आहेत. त्यावरूनच मूळ लेखन काय असेल ह्याचा अंदाज लावावा लागतो.
थोडक्यात, समस्या हीच की, मुळात लिहिलेलं म्याटर कमी.
आणि जितकं काही लिहिलेलं आहे, या ना त्या कारणानं तेही धड उपलब्ध नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

छान लिहिलयं.

संगीत कलेकडे समाज एक करमणुकीचे साधन याच दृष्टीने आणि कमीपणाने पाहू लागला.

म्हणजे आधी करमणूक सोडून दुसराही काही हेतू होता का?

पद्धतशीर आणि शास्त्रीय पद्धतीने आपले कौशल्य किंवा कला यांचे ग्रंथ स्वरूपात आलेखन करून मागे ठेवावे असे कोणत्याच क्षेत्रातील (उदा. स्थापत्य, युद्धकला, औषधोपचार) तज्ञांना, (हाताच्या बोटावर मोजता येतील असे अपवाद सोडल्यास) कधीच वाटले नाही याला एक दैवदुर्विलास असेच म्हटले पाहिजे.

आयुर्वेदाबद्दल बर्‍यापैकी लिहून ठेवलं आहे. आणि ते आत्ताच्या आयुर्वेद अभ्यास शाखेत अभ्यासाला पण असतं. खगोल शास्त्राबद्दल पण लिहिलेलं असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

'भारतीय संगीताचा इतिहास' ह्यावर काही अधिकाराने मी लिहावे असे काहीहि शास्त्रीय ज्ञान मजपाशी नाही. पुढे लिहिलेले केवळ माझ्या सामान्य ज्ञानावर आधारित आहे.

<या ग्रंथाचा शोध लागल्यामुळे चिनी संगीताबद्दल जशी माहिती नव्याने उपलब्ध झाली आहे तशी माहिती भारतीय संगीताबद्दल होणे कठीण दिसते आहे. याला एकच कारण आहे ते म्हणजे लिखित स्वरूपातील दस्ताऐवज मागे सोडण्याबद्दल प्राचीन भारतीय विद्वानांमध्ये असलेली संपूर्ण अनास्था. यामुळेच आपले अनेक सांस्कृतिक ठेवे कालौघात नामशेष झालेले आहेत.>

संगीताच्या बाबतीत परिस्थिति इतकी नैराश्यपूर्ण होती काय ह्याबाबत मी साशंक आहे. भरताचे नाटयशास्त्र, शार्ङ्गधराची शार्ङ्गधरपद्धति हे पुस्तके तर सर्वांना माहीत आहेतच पण आणखीहि डझनावारी संगीताला वाहिलेली जुनी संस्कृत पुस्तके अभ्यासकांना ठाऊक आहेत. माझ्याजवळील गीतगोविंदाच्या प्रतीमध्ये जी संस्कृत टीका आहे तिच्यामध्ये अशा बर्‍याच पुस्तकांचा, रागांचा, तालांचा इत्यादि उल्लेख आहे. किंबहुना आजहि भारतीयांनी जगाला अभिमानाने दाखवाव्या आणि ज्यांच्या परंपरा प्राचीन कालापासून अविच्छिन्न टिकून आहेत अशा बाबींमध्ये भारतीय अभिजात संगीताची गणना केली जाते. भारतीय संगीत कधी लुप्तप्राय अथवा नामशेष होण्याच्या वाटेवर होते हे विधान मला योग्य वाटत नाही. मौखिक मार्गाने भारतीय संगीत परंपरा अखंडपणे चालू राहिली आहे. शास्त्रीय संगीत राजेरजवाडे आणि शोकीन लोकच ऐकत असले तरी त्याचा जनमान्य अवतार मीराबाईची भजने, सूरदास, तुलसीदास, नरसी मेहतासारख्या संतकवींची कवने, कीर्तनकारांची कीर्तने सामान्यांपर्यंत प्रत्यही पोहोचत होताच.

भारतीय संगीताच्या बाबतीत जर काही कमतरता असलीच तर ती पुस्तकी अथवा लिखित मार्गाने संगीताचे तन्त्र ग्रंथबद्ध होणे. वर उल्लेखिलेल्या ग्रंथामधील ज्ञान हे पूर्णपणे आत्मसात होण्यासाठी गुरूचे मार्गदर्शन आवश्यक होते आणि संगीत शिक्षणाचा तोच एकमेव मार्ग होता. दोन स्वरांमधील फरक समजून घेण्यासाठी एकुलता एक मार्ग म्हणजे गुरुमुखातून त्यांचे श्रवण हाच होता. आजहि गुरुमुखातून श्रवण ह्याचे महत्त्व कमी झालेले नाही पण गुरु जे सांगतो ते समजण्यासाठी छापील पुस्तकेहि उपलब्ध आहेत. हे कार्य भारतीय संगीताचे लेखन करण्याचा मार्ग दाखवून पंडित वि.ना.भातखंडे ह्यांच्यासारख्या अभ्यासकांनी केले. ह्याच संदर्भात सांगलीचे के.बी.देवल, ब्रिटिश सनदी अधिकारी ई.क्लेमण्टस ह्यांनी केलेले काम ध्यानात येते.

भारतीय संगीताच्या बाबतीत घडलेली दुसरी अनिष्ट गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळात संगीताला असलेली जनमान्यता मध्यकालीन भारतात ओसरत गेली आणि संगीत ही चंगीभंगी लोकांनी ऐकायची बाब आहे आणि तिचे शिक्षण नायकिणी आणि कोठेवाल्या बाईलोकांनी करायची गोष्ट आहे अशी समजूत निर्माण होत गेली. ही लाट उलटविण्याचे कार्य विष्णु दिगंबर पलुस्करांसारख्या तपस्वी लोकांनी केले आणि संगीताची गेलेली प्रतिष्ठा त्याला परत मिळवून दिली. शंभरसवाशे वर्षांपूर्वीची परिस्थिति आणि आजची परिस्थिति ह्यामध्ये मोठा फरक असा आहे की त्या काळात चांगल्या घरातील मुलींलेकींनी संगीत शिकणे हे अब्रह्मण्यम होते, आज त्याच मुलीलेकींना त्यांचे आईवडील पैसे खर्चून संगीत शिकवतात.

चिनी संगीताबाबत तर मला भारतीय संगीताहूनहि कमी कळते तरीहि तेथेहि लेखात म्हटल्याइतकी निराशाजनक स्थिति नसावी. चीनची शेवटची महाराणी त्झु ह्सि (Empress Dowager Tzu-Hsi/Cixi उच्चारातील चू.भू.दे.घे.) हिचे चरित्र मी अलीकडेच वाचत होतो. चिनी संगीत आणि ऑपेरा ऐकणे हा तिचा प्रमुख विरंगुळा होता असे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडी असहमती दाखवत माझा पॉइंट ठेवतो.

हिंदुस्तानी संगीतावर मुघल आणि तुर्क अशा बाहेरच्या आक्रमणानंतर पुरेसे परिणाम झाले असावेत. मुख्यतः भारतीय संगीत हे विलंबित आणि खर्जाकडे असायचे. साथीला असणारे वाद्य म्हणजे पखवाज आणि वीणा. या मध्यआशियाई मिक्सप नंतर तयार झालेले वाद्य तबला ( पखवाजापेक्षा वेगवान आणि वरच्या पट्टीत वाजणारा) आणि वीणा च्या ठिकाणी सतार/ सरोद ( परत एकदा द्रुत गत आणि वरची पट्टी) आणि या सोबत डेव्हलप झालेला नृत्य प्रकार कथक ( दक्षिण भारतातील नृत्यप्रकरांपेक्षा जलद).

धृपद पद्धतीमध्ये आजही पखवाजच वापरला जातो. ख्यालाबरोबर पेटी (हार्मोनियम) घ्यायची पद्धत पण बरीच उशिरा सुरु झाली).
गौधरबानी, डागोरबानी ,खंडरबानी, नौहरबानी अशा चार धृपदचे गायकीच्या पद्धती होत्या. या पद्धतींमध्ये शुद्ध, भिन्न, गौडी, वेगस्वर आणि साधारण असे स्वर लावण्याचे प्रकार (गती/ गिती) होते. या ज्या गिती आहेत त्यांचा वापर करून या चार पद्धती विकसीत झालेल्या.
सध्या माहिती असलेले धृपादिये म्हणजे डागोरबानी गाणारे डागर बंधू आणि त्यांचे शिष्य हे आहेत. खंडरबानी प्रकारात मला माहिती असलेले शेवटचे कलाकार उस्ताद असद अली खान. डागोरबानी खेरीस इतर प्रकारात धृपद गाणारे कोणी नाहीत. (असल्यास खूप आनंद आहे. इथेच कलाकारांची नावे द्यावीत ही विनंती)

मुघल साम्राज्याच्या विलयास जाण्याबरोबर तानसेनच्या वंशजांनी वेगवेगळ्या ठिकाणी आश्रय घेऊन आपली घराणी स्थापन केली. बऱ्याच घराण्यांची मूळ नाळ तानसेन किंवा त्याच्या शिष्यांपर्यंत जाऊन पोहोचते. प्रत्येक घराण्याने आपली एक अशी वेगळी शैली तयार केलेली आहे. आणि आज ही या शैली बदलत आहेत. आजचे समजा बनारस घराण्याचे गायक शंभर वर्षापूर्वी असते तर नेमकं असंच गायले असते का ? फक्त अंदाजच लावता येऊ शकतो.

काळानुसार बदलणे ही काहीशी अपरिहार्यता असावी.

तानसेनाची वंशावळ. मिया तानसेन धृपदिये आणि आजचे वंशज ख्याल गायकीमधले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतीय संगीताच्या बाबतीत जर काही कमतरता असलीच तर ती पुस्तकी अथवा लिखित मार्गाने संगीताचे तन्त्र ग्रंथबद्ध होणे.

प्रस्तुत लेखाचा विषय हाच आहे. कोल्हटकरांच्या माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल चन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगला निबंध आहे. अरविंद कोल्हटकरांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.
-------------------
पाश्चिमात्य अभिजात संगीतात स्वरलेखन अधिक विकसित झाले, हे खरे आहे. त्याचे कारण ते संगीत सादर करायची पद्धत असावी. प्राचीन चर्च-गीतांचे लेखन झाले ते समूहगानाच्या गरजेमुळे. स्वरमेळ-पद्धतीच्या गायन-वादनामुळे सुद्धा लिखित संगीत गरजेचे आहे.

भारतीय संगीतात स्वरमेळ फक्त तानपुर्‍याशी असतो, आणि गायक-वादकाला नवीन हरकती जागच्या-जागी रचण्यास पुष्कळ मोकळीक असते. खुद्द तोच गायक दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात स्वतःची पूर्ण नक्कल करू इच्छत नाही.

स्वरलेखन नाही, पण ताल-"बोलणे" (याला "जवळजवळ लेखन" म्हणणे वावगे ठरणार नाही) या बाबतीत भारतीय संगीत अग्रेसर आहे, आणि पाश्चिमात्य अभिजात संगीत खूपच तोकडे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आणि प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत.

धनंजय यांच्याशी सहमत आहे. भारतीय शास्त्रिय संगीत-नृत्याचे सादरीकरण हे मुळात एकल प्रकारात मोडते व त्यात नवीन स्वरविकासाला वाव असतो. विलंबीत लयीतली ख्यालगायकी आणि कथक नृत्यातले थाट सादरीकरण ही माझ्या माहितीप्रमाणे त्याची उत्तम उदाहरणे होत.

ताल-बोलणे म्हणजे पढन्त असे तुम्हाला म्हणायचे असावे. भातखंडे पदधतीआधी पढन्त लिपीबद्ध करायला कधी सुरुवात झाली, हे जाणून घ्यायला उत्सुक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आणि माहितीपूर्ण प्रतिसाद आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमचे क्षेत्र नव्हे, पण असेच म्हणतो.

मन्दारकडून 1. classifications of music, 2. fundamentals of music and 3. technical aspects of Indian classical music असल्याशा विषयांवर वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बर्‍याच वर्षांपूर्वी या विषयावर लिहिलेला माझा एक लेख या दुव्यावर वाचता येईल. काही मंडळींना तो रोचक वाटण्याची शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अक्षरधूळ वरील लेख छान आहे, पण...

(हे वाक्य चांगल्या गुणाचे वर्णन करते, "पण"चे नाही : ... ) काही भाग सर्व प्रकारच्या संगीताला लागू आहे, उदाहरणार्थ "...frequency range of 20 to 20,000 Hertz...", "We need to have a series of notes or SWARA. Further, the individual notes used in a series, should be such that when listened together, a pleasant experience results."

("पण"चे वर्णन येथपासून : ... )
बराचसा लेख हार्मोनियमला मूलभूत मानून लिहिलेला आहे. सात-सुर + मधले-पाच = १२ हा प्रकार कदाचित (ताणून, क्षम्य अतिसुलभीकरण म्हणून) पाश्चिमात्य संगीताला लागू होईल. पण सध्यातरी भारतीय अभिजात संगीतासाठी हे अतिसुलभीकरण अतिरेकी आहे. हार्मोनियम भारतीय संगीतात अजून तडजोड म्हणून वापरतात. प्रत्येक सुर थोडासा मोघम-भसाडा लावल्यामुळे अशा हार्मोनियमसह गायक २२ श्रुती वापरून (त्यातून ५-७ स्वर रागनिहाय निवडून) गाऊ शकतो. पण गायकाचा स्वर शक्यतोवर तानपुर्‍याशी जुळवलेला असतो. त्यामुळे २२ श्रुती या पूर्णपणे इतिहासजमा झालेल्या नाहीत. (म्हणून पाश्चिमात्य संगीतात "क्षम्य अतिसुलभीकरण" भारतीय अभिजात संगीतासाठी क्षम्य राहात नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेख फक्त भारतीय संगीताची तांत्रिक बाजू काय आहे याची वाचकांना ओळख व्हावी म्हणून लिहिला होता. हार्मोनियमच्या पट्ट्या दाबल्या की पियानो प्रमाणेच स्टॅन्डर्डाइझ्ड स्वर निघत असल्याने त्याचा आधार घेतला होता. हार्मोनियमचे स्वर एकाच फ्रिक्वेन्सीचे नसतात, त्यात हार्मोनिक्स असतात वगैरे आक्षेप मला मान्य आहेत. पण या गोष्टींचा प्रस्तुत लेखाच्या विषयाशी संबंध नाही असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मागे जयंत कुलकर्णींनी हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतावर फार सुंदर लेख लिहिले होते. इथे सापडतील. चंद्रशेखर यांनी दिलेला लेख पण चांगला आहे.
गाण्याबद्दल जास्त वाचण्यापेक्षा निवांत मस्त ऐकत राहा. जिथे रस येईल त्या बद्दल वाचन करा किंबहुना ते ऑपोआप होईल. डायरेक्ट टेक्निकल मध्ये घुसून ते गणिती करण्यात काय मजा नाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गाण्याबद्दल जास्त वाचण्यापेक्षा निवांत मस्त ऐकत राहा. जिथे रस येईल त्या बद्दल वाचन करा किंबहुना ते ऑपोआप होईल. डायरेक्ट टेक्निकल मध्ये घुसून ते गणिती करण्यात काय मजा नाय.

क्या बात कही है!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

रस इ. आला की व्हायचं ते वाचन होईलच.

पण संगीतातल्या जार्गनमुळे फुक्कटचा टर्न ऑफ होतो आणि संगीत म्ह. कैतरी औघड इ. असल्यागत वाट्टं. ती जार्गन जरा एक्स्प्लेन केली तर आमच्यासारखे अज्ञ तुम्हांला दुवा देतील. त्यामुळे संगीताची संदर्भचौकट नक्की काय आहे ते कळायला अशा लेखाने थोडीतरी मदत होईल. साधे उदा. देतो.

१. राग म्ह. नक्की काय?
२. शुद्ध/कोमल/वर्ज्य इ. स्वर हा नक्की काय प्रकार आहे?
३.तार/मंद्र इ. सप्तके इ.इ. म्हंजे काय?
३. अमुक गाणं तमुक रागात आहे हे कसं ओळखतात?
४. एखादा राग, उदा. यमन घेतला तर कैकदा वाचनात येते- यमनाची हजारो रूपं इ.इ. म्हंजे नक्की काय? हे आलंकारिक किती आणि प्रत्यक्ष स्वरलेखन मांडून दाखवता येणारे व्हेरिएशन किती?
५. घराणं ही कन्सेप्ट नक्की काय प्रकार आहे? गाण्याची स्टाईल इथपर्यंत समजू शकतो, पण जऽरा स्पष्टीकरण.

अशा काही प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेत कसलेही अवडंबर न माजवता दिली तर किमान माझा तरी लै मोठा दुवा मिळेल. आता कैकदा हा सर्व कीस पाडून करायचंय काय? एंजॉय करता आल्याशी मतलब, असं म्हणून बोळवण करणारेही पुष्कळ आहेत. पण संगीत असो वा साहित्यकृती, त्या त्या क्षेत्राची परिभाषा आत्मसात झाली तर एंजॉय करणेही अधिक समृद्ध होते. आपल्याला जे आवडते ते अधिक नेमकेपणे समजते आणि सांगता येते म्हणून ते समजणे आवश्यक आहे असे मला वाटते इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओक्के, मुद्दा थोडा उशीरा कळला. मला जिथपर्यंत समजते तिथंपर्यंत लिहीतो. आत्ता हापिसात आहे, जास्त टाइपता येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवश्य लिहा, वाट पाहतो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी वर दुवा दिलेला लेख बॅटमन यांनी वाचल्यास त्यांना त्यांच्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद चंद्रशेखरजी. लेख वाचून पाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं