साथीकरिता तंबोर्‍यासम सुरेल पेटी गमते का?

-----------------------------------
साथीकरिता तंबोर्‍यासम सुरेल पेटी गमते का?
-----------------------------------
गाण्यामध्ये वेगवेगळे गाता येती सुर कित्येक,
जाणकार म्हणती "ते सगळे जाणा एका संचामधले"
कुणी म्हणे त्या संचामध्ये काळे-सफेत बारा टप्पे
आणिक कोणी परंपरेने ओळखती बावीस श्रुतींना
-
(पेटीवाला : )
बारा तितक्या असती पट्ट्या बाजाच्या पेटीवर, मोजा!
सारी गाणी वाजवतो मी - साथीला बारा मज पुरले...
(तंबोरेवाला : )
तारा जुळवा पेटीवाले, तंबोर्‍याच्या! नंतर बोला
जरा अंगच्या गंधाराला जा अन शोधा पट्ट्यांगणिक!
-----------------------------------

तळटीप १:
आगामी विशेषांकाकरिता (आहेत याला ६ महिने!) मी जो लेख सध्या लिहीत आहे, त्यात प्रस्तावना म्हणून पुढील कडवी येणार आहेत. या विषयात माझी गती नवशिक्याचीच आहे, पण कधीकधी लहान तोंडी मोठा घास घेण्यात आणि धडपडण्यात मजा आहे. या धाग्याखालच्या प्रतिसादांतून कदाचित मला लेखात काही बदल करता येतील. अर्थात माझ्या कुवतीला जमतील तितकेच हे बदल असतील. या धाग्यावरील प्रतिसादांना मला प्रत्युत्तरे आताच्या आता देता येतीलच असे नव्हे. त्याबाबत अटकपूर्व जामीन मागून घेतो. परंतु अभ्यास करता येईल.
तळटीप २:
वरील कडवी जुन्या कन्नड आणि जुन्या तेलुगु छंद-वृत्त-व्यवस्थेची स्फूर्ती घेऊन रचलेली आहेत. ओळीतील दुसर्‍या अक्षराचे व्यंजन कडव्याच्या प्रत्येक ओळीत पुनरावृत्त होते (याला "प्रास" म्हणतात). प्रत्येक ओळीतील पहिल्या अक्षरातील व्यंजन त्याच ओळीतल्या पाचव्या "गणात" (सतराव्या मात्रेच्या अक्षरात) पुनरावृत्त होते. याला कन्नड-तेलुगुमध्ये (संस्कृतापेक्षा वेगळा अर्थ) "यति" म्हणतात. १२ समान पायर्‍यांची बाजाची पेटी एकीकडे, आणि तंतुवाद्यावर ओव्हरटोन म्हणून झंकृत होणार्‍या श्रुती दुसरीकडे, या दोन परस्परबाधक चौकटींबाबत माझा आगामी लेख असणार आहे. पेटीच्या लोकप्रियतेनंतर तंबोर्‍यावर आधारित स्वरव्यवस्था आणि गायन-वादन हे जुन्या कन्नड-तेलुगु छंदःशास्त्राप्रमाणे कालबाह्य झाले आहे का? किंवा कर्नाटकात अजूनही लागू असेल, तरी हिंदुस्थानी संगीतात नि:संदर्भ झाले आहे का? हे लेखाच्या पार्श्वभूमीतले सूत्र आहे.
तळटीप ३:
भारतीय संगीतातील बावीस श्रुती कुठल्या आणि त्यामागे काय गणित आहे, याबाबतील एक माहितीपूर्ण निबंधमाला डॉ. विद्याधर ओक यांच्या संकेतस्थळावर आहे. बावीस श्रुती वाजवू शकणार्‍या काही वाद्यांकरिता त्यांचे पॅटंट आहे, ही बाब खरी. परंतु संकेतस्थळावरील बहुतेक लेख विक्री-जाहिराती नाहीत, गंभीर आहेत.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

(चूभूद्याघ्या.)

(मोरेश्वरभट 'दोन्हीं बरोबर' म्हणतो. परंतु 'गंधार' प्रचलित असावे, असे वाटते. (पुन्हा चूभूद्याघ्या.))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाजाची पेटी आणि तंबोरा ही तुलनाच मुळी अयोग्य आहे असे मला वाटते. बाजाच्या पेटीवर तिन्ही सप्तकातील सर्व स्वर आणि याशिवाय काही निवडक कोमल आणि तीव्र स्वर वाजवता येतात. तंबोर्‍यावर फक्त ४ किंवा ५ स्वरांच्या तारा असतात. बाजाची पेटी त्यामुळे गायकाला साथ देण्यासाठी वाजवता येते किंवा स्वतंत्रपणेही वाजवता येते. या उलट तंबोरा गायकाच्या पट्टीतील षड्ज आणि इतर काही स्वर झंकारू शकतो. तंबोरा फक्त गायकाचा बेस लाइन षड्ज झंकारत राहतो.

माझ्या मताने बाजाची पेटी आणि सरोद किंवा बाजाची पेटी आणि व्हायोलिन अशा तुलना करणे जास्त योग्य ठरेल. आपण ज्याला ग स्वर म्हणतो त्याचे नाव गंधार आहे, गांधार नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे बाजाची पेटी आणि तंबोरा यांचीच तुलना अपेक्षित आहे, त्याचे स्पष्टीकरण असे :
थोडक्यात : गायक किंवा सोलो वादकाला सुरांचा सांगाडा देणारे (साथीचे) वाद्य म्हणून दोघांची तुलना केलेली आहे. हे स्पष्ट व्हावे, म्हणून आता शीर्षकही बदलले आहे. (तांत्रिक) मोजके आणि ठराविक ओव्हरटोन उपलब्ध असलेल्या तंबोर्‍याची आणि मोजक्या आणि ठराविक पट्ट्या उपलब्ध असलेल्या पेटीची तुलना केलेली आहे. अधले-मधले अगणित आवाज उच्चारू शकणार्‍या व्हायोलिन-सरोदांची तुलना या ठिकाणी अप्रस्तुत ठरेल.

------------------------------------------------------------------------------------
तपशीलवार :
तंबोरा हे सोलो वाद्य होऊ शकत नाही आणि किंवा बाजाची पेटी हे सोलो वाद्य म्हणून वाजवले जाऊ शकते, हा तुमचा मुद्दा बरोबर आहे. तो वरील कडव्यात विचारात घेतलेला आहे.

"बाजाची पेटी सोलो वाद्य म्हणून वाजवली जाऊ शकते" याचा व्यत्यास म्हणून "सध्याच्या पेटीवर सप्तकात १२ पायर्‍या आहेत, म्हणून सैद्धांतिकदृष्ट्या या १२ पायर्‍या गायकाला साथ देण्यास योग्य अथवा पुरेशा आहेत" अशी एक धारणा आपल्याला दिसते. वरील कडव्यांमध्ये हा मुद्दा पेटीवाल्याच्या तोंडी घातला आहे : "सारी गाणी वाजवतो मी - साथीला बारा मज पुरले". जर गायकाला साथीमधून "रे", "ग", वगैरेंकरिता आधार, संदर्भ-श्रुती हवी असेल, तर साथ देणारा पेटीवरील वेगवेगळ्या पट्ट्या दाबून ते-ते संदर्भ पुरवतो.

तंबोर्‍याला चार तारा असल्या तरी चारही तारा फक्त षड्ज-पंचमाला जुळवलेल्या असतात.
> तंबोरा फक्त गायकाचा बेस लाइन षड्ज झंकारत राहतो.
हे वाक्य पुरेसे काटेकोर नाही. तंबोरा गायकाचा षड्ज-पंचम* जुळवलेल्या तारा झंकारतो. (षड्ज मध्यम, किंवा षड्ज-निषाद असे जुळवलेले तंबोरेसुद्धा क्वचित वापरतात. ते अपवाद आतापुरते सोडून देऊ.) पैकी एक षड्ज मंद्र सप्तकात जुळवलेला असतो. या तारांच्या झंकाराचे ओव्हरटोन म्हणून षड्ज-पंचमापेक्षा वेगळे असे अन्य स्वर आपोआप झंकृत होतात. हे ओव्हरटोन सुर प्रकर्षाने/मोठ्याने ऐकू यावेत, अशा तर्‍हेने तंबोरा बनवलेला असतो (भोपळ्याचे वाद्य, पण विशेष म्हणजे जवारी तासून). गायकाला या अन्य स्वरांकरिता आधार किंवा संदर्भ हवा असेल, तर गायक या ओव्हरटोनांशी आपला गळा त्यांच्याशी जुळवतो. तंबोरा हा षड्ज-पंचमावेगळ्या अन्य स्वरांकरिता आधार असतो हा मुद्दा वरील कडव्यांमध्ये तंबोरेवाल्याच्या तोंडी घातलेला आहे. "तारा जुळवा ... तंबोर्‍याच्या, ... अंगच्या गंधाराला .... शोधा". तंबोर्‍याच्या झंकारणार्‍या तारांचे ओव्हरटोन म्हणून षड्ज-पंचमावेगळे बरेचसे सुर ऐकू येत असले, त्यांच्यापैकी "अंगचा गंधार" फार तयारी नसलेल्या व्यक्तीलाही बर्‍यापैकी स्पष्ट ऐकू येतो. लक्ष दिल्यास आपल्या गळ्याने नुसते "साऽऽऽ" म्हणत राहिले तर ही "अंगचा गंधार" श्रुती ऐकू येते, परंतु त्याकरिता तयारी फार लागते. गळा म्हणजे नाहीतरी एका प्रकारे तंतुवाद्यच आहे (व्होकल कॉर्ड), कंपन पावणार्‍या तंतूंचे ओव्हटोनही कंपित होणारच. ही श्रुती पेटीच्या पट्ट्यांमध्ये आपल्याला सापडत नाही. साथीकरिता तंबोरा वापरणार्‍या व्यक्तीच्या युक्तिवादातला हा मुद्दा आहे.

तंबोर्‍यावर ही विवक्षित श्रुती ऐकू येते, घसरत-घसरत त्याच्या आजूबाजूच्या श्रुती ऐकू येत नाही. व्हायोलिनवर किंवा सरोदावर तार दाबणारे बोट घसरत-घसरत वाटेल ते मधले-मधले आवाज काढता येतात, ही बाब खरी आहे. म्हणजे इच्छा असल्यास तंबोर्‍यावर ओव्हरटोन म्हणून ऐकू येणारा विवक्षित शुद्ध गंधार वाजवता येतो, वाटल्यास पेटीवर जुळवलेला "ईक्वल-टेंपर्ड" गंधार वाजवता येतो, आणि वाटल्यास त्या श्रुतींपासून विचलित झालेले आणखी वेगळे सुरही वाजवता येतात. म्हणूनच सर्व मधले सुर शक्य असलेले व्हायोलिन/सरोद आणि मोजक्या पायर्‍या उपलब्ध असलेल्या पेटीची तुलना केलेली नाही. मोजके आणि ठराविक ओव्हरटोन उपलब्ध असलेल्या तंबोर्‍याची आणि मोजक्या आणि ठराविक पट्ट्या उपलब्ध असलेल्या पेटीची तुलना केलेली आहे.

--------------

मी सध्याच्या प्रमाण पेटीबाबत बोलत आहे, हेसुद्धा स्पष्ट करतो. जर नव्याने पेटी बनवायची असेल, आणि एकाच गायकाकरिता बनवायची असेल, तर वेगळा पर्याय आहे. त्या गायकाने निवडलेला षड्ज ठरवून मग बरोबर ओव्हरटोनांशी जुळणारे मधले-मधले बारा सुर त्या पेटीत घालता येतात. हा विचार नुसता कल्पनारम्य नाही. पट्ट्यांची वाद्ये १६-१७व्या शतकात जेव्हा विकसित होत होती, तेव्हाच्या वाद्य-कारागिरांमध्ये आणि वादकांमध्ये हा चर्चेचा-विवादाचा विषय होता. ओव्हरटोनांशी जुळणारे सुर याच पट्ट्या असलेली जुनी ऑर्गने अजून युरोपातल्या काही चर्च-इमारतींत सापडतात. "हार्प्सिकॉर्ड" हे पट्ट्यांचे वाद्य थोडेफार आजच्या पियानोसारखे आहे-होते. तारा बडवण्याऐवजी पट्टी दाबली की झंकृत होत. सुरुवातीच्या काळात सर्व तारा गायकाच्या षड्जाप्रमाणे ओव्हरटोन निवडून जुळवल्या जात. अबब! आजचे दिलरुबा-सारंगीवाले मागच्या (गज-न-पोचणार्‍या, "सिंपथेटिक") तारा दररोज जुळवतात, त्याबाबतही मला "अबब!" असेच वाटते. आजकाल पियानोच्या तारा विवक्षित गायकाकरिता जुळवत नाहीत, आणि त्यामुळे सहाएक महिन्यांत एकदा जुळवल्या तरी चालते.

परंतु सांगण्याचे कारण असे, की ओव्हटोनांना जुळवलेली पेटी आणि तंबोरा यांची तुलना केली, तर या दोघांमध्ये काहीच भांडण होणार नाही. "अंगचा गंधार" तंबोर्‍यावर ओव्हरटोन म्हणून ऐकू येईल, आणि या खास पेटीवर "अंगच्या गंधाराला जुळवलेली पट्टी" म्हणून ऐकू येईल. आणि दोन्ही वाद्यांवरती मोजके विवक्षित सुरच ऐकू येतील. या बाबतीत व्हायोलिन-सरोद या "वाटेल-तो-मधला-सुर-झंकारा" वाद्यांची तुलना होऊ शकत नाही.

-----
तरी व्हायोलिनबाबत तुमचा मुद्दा माझ्याकरिता मोठ्या उपयोगाचा आहे. नाही म्हटले तरी ते तंतुवाद्य आहे. त्यामुळे त्यावरही तारांचे ओव्हरटोन ऐकू येतात. ओव्हरटोन प्रकर्षाने आणि मोठ्याने ऐकू यावेत, अशा प्रकारे त्याची लाकडी पेटी बांधलेली नाही हे खरे - तशी बांधणी भोपळ्याच्या-जवारीच्या तंबोर्‍याची. तरी व्हायोलिनवरही विवक्षित ओव्हरटोन अधिक स्पष्ट ऐकू यावेत असे तंत्र उपलब्ध आहे. माझ्या आगामी लेखात हे ओव्हरटोन मी व्हायोलिनवरतीच काढून ध्वनिफिती जोडणार आहे. (माझ्याकडे व्हायोलिन आहे, तंबोरा नाही, ही माझी सोय.) परंतु हे खास - व्हायोलिन मधले-मधले सुर उच्चारू शकते, ही बाब वापरलेली नाही, तर विवक्षित ओव्हरटोन वाजवून दाखवण्याकरिता तंत्र वापरून केवळ "ताणलेल्या तारा" म्हणून व्हायोलिन वापरणार आहे.

----
सारांश स्पष्टीकरण : मोजके आणि ठराविक ओव्हरटोन उपलब्ध असलेल्या तंबोर्‍याची आणि मोजक्या आणि ठराविक पट्ट्या उपलब्ध असलेल्या पेटीची तुलना केलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मागे एकदा मी संगीताबद्दल तांत्रिक माहिती वैगेरे (द्या) लिहिले होते. नुसत्या २२ श्रुतींवर ६० धडे बघून छाती दडपली. इथून पुढे फक्त मंजूळ गाणी ऐकणे.

पण धनंजयजी, तुमच्या धाग्याचा सुर नक्की काय आहे ते दोनदा वाचून कळले नाही. तेवढं कुतुहल अजून शेष आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रकार थोडा तांत्रिक आहे, खरे.

परंतु तंत्र माहीत नसलेल्या आस्वादकाच्या आतही सुरेलपणाबाबत काही अस्फुट जाण असते. काही प्रमाणात याचे मूळ ध्वनीच्या भौतिकशास्त्रात असते. किंवा सार्वत्रिक भौतिकशास्त्र आणि संस्कृतिनिहाय सौंदर्यशास्त्र यांचे मिश्रण असते. वाद्य बनवणार्‍या कारागिराला आणि खुद्द गायक-वादकाला याची जाण असावी लागते.

आस्वादकाला स्वतःच्या आस्वादाचे विश्लेषण करणे आवश्यक नसते. आणि आस्वादात अडथळा येत असेल असे विचार मध्ये आणूही नये, हे योग्यच धोरण आहे.

खाणार्‍याला पाककृतींची आणि स्वयंपाक-तंत्राची ओळख असणे वैकल्पिक असते, गरजेचे नसतेच. तोंडातला घास चविष्ट लागतो का? ऐवजी "फोडणीत मसाले कुठल्या क्रमाने घातले असा विचारच येत असेल, तर तो विकल्पही नको! परंतु स्वयंपाक्याला मात्र "आपण फोडणीत मसाले अमुक क्रमाने घातले तर खवैयाला अधिक आवडेल" असे विश्लेषण करणे आवश्यक असते. एखादा खवैया कुडुमुडू स्वयंपाकीसुद्धा असतो. अशा खवैयाला जिभेने चव घेण्यातही रस असतो, आणि आपल्या जिभेचे चोचले पुरवण्याकरिता थोडेसे तंत्र जाणण्यातही. (सर्व उत्तम स्वयंपाकी बर्‍यापैकी खवैयेसुद्धा असतात, हे सांगणे नलगे).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमचे धोरण नक्की काय असावे याबद्दल मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद. उदाहरण तर खूपच छान आहे. इथल्या उदाहरणात मी खवैय्या म्हणावा असा माणूस नाही, सामान्य आहार घेणारा नि स्वंयंपाकघरामधे मधे मधे लूडबूड करणारा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

श्री. विद्याधर ओक यांचे एक तासाभाराचे प्रात्यक्षिकासहित सादरीकरण ऐकावे. बर्‍याच संकल्पना कळू शकतील. सुरूवात तर होईल !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शार्ङ्गदेवाच्या संगीतरत्नाकरात ३.१.१४ श्लोकात "गांधारो द्विश्रुतिस्ततः" असे म्हटले आहे. या श्लोकांत षड्ज, ऋषभ... वगैरे नावे दिलेली आहेत. भरताच्या नाट्यशास्त्रात बहुधा "गांधार" असेच आहे (पण तपासले नाही.)

मी मराठीमध्ये लिहीत असल्यामुळे सध्याचे मराठी प्रमाण "रिषभ" असेच वापरणार, "ऋषभ" नाही. परंतु जर मराठी शब्दकोशाप्रमाणे गंधार आणि गांधार असे दोन्ही विकल्प योग्य मानलेले असतील तर जुना "गांधार" शब्द वापरत राहाणे ठीक, असे आधी ठरवले होते. म्हणजे जर आगेमागे जुने उद्धरण द्यायची वेळ आली, तर वेगवेगळ्या नावांमुळे अडखळायला होणार नाही.

पण मराठीत "गंधार" असाच उपयोग अधिक प्रचलित आहे असे प्रतिसादकांचे म्हणणे दिसते ("न"वी बाजू, चंद्रशेखर, तिरशिंगराव). म्हणून "गंधार" वापरायचे ठरवले आहे ("रिषभ"सारखेच).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा या विषयावरचा अभ्यास, तुमच्या विस्तृत प्रतिसादातून जाणवला. तुमच्या मूळ प्रश्नाला माझे उत्तर असे आहे की प्रचलित वापरामधे सगळ्या मोठ्या मोठ्या गायक-गायिकांनाही मी 'गंधार' असेच म्हणताना ऐकले आहे. त्यामुळे 'गंधार' शब्द वापरणेच उचित होईल असे वाटते. माझ्या लहानपणी आकाशवाणीवर बाजाच्या पेटीला बंदी होती ती तुम्ही स्पष्ट केलेल्या कारणांमुळेच होती असे वडिलांकडून ऐकले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संकल्पनेविषयी चर्चा झालेली आहेच, मला कवितेविषयी दोन-चार सुधारणा सुचतात.

कवितेची दुसरी ओळ मीटरमधून बाहेर पडलेली आहे.

गाण्यामध्ये वेगवेगळे गाता येती सुर कित्येक, [कित्येक शब्दाविषयी अनेक जास्त सोपं जाईल]
जाणकार म्हणती "ते सगळे जाणा एका संचामधले" [संचामध्ये एका जाणा त्या सगळ्यां स्वर-सुरावटीला]
कुणी म्हणे त्या संचामध्ये काळे-सफेत बारा टप्पे
आणिक कोणी परंपरेने ओळखती बावीस श्रुतींना

यापेक्षा मी संपूर्ण बदलून ही कल्पना थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडेन

फुलून आल्या स्वरास्वरांनी गुंफे गाणे जणु फुलमाला
किती वेगळी फुले गुंफली प्रश्न पडतसे तज्ञमनाला
कुणी म्हणे या बारा परड्या भरल्या सफेत काळ्याच्या
आणिक कोणी बाविस गणती परंपरा-श्रुतिपरड्यांच्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(८-८ मात्रा मोजून, कुठे चुकले आहे?)
जाणकार म्हण | ती "ते सगळे | जाणा एका | संचामधले" |

मीटर यतीपूर्वी ४ गण आणि यतीनंत ४ गण असे आहे. (गण = ४ मात्रा). कन्नड/तेलुगु वृत्तनियमांनुसार (अनुप्रास)यतीच्या आधी (संस्कृत यति=) पदांत सुद्धा येण्याचे सुद्धा बंधन नाही. शिवाय मी स्वतः स्वीकारलेले बंधन असेही आहे की दर ४ गणांच्यानंतर पदांत (संस्कृत यति) आहे. जेणेकरून कन्नड यति (=अनुप्रास) अधिक गडद व्हावा. या सर्व बंधनांपैकी कुठल्याच बाबतीत मीटर चुकले नाही, असे वाटते.

पहिली ओळ :
गाण्यामध्ये | वेगवेगळे | गाता येती | सुर कित्येक |
इथे "कित्येक" ऐवजी "अनेक" वापरले, तर एक मात्रा कमी पडते, ही त्रुटी आहेच. आणि शिवाय "अनेक"मध्ये मला हवी असलेली अर्थच्छटा नाही. "कित्येक" मध्ये "किती"चे प्रश्नचिन्ह आहे, तर "अनेक"मध्ये "न-एक"चा ठामपणा आहे. "कित्येक"मध्ये संख्या किती आहे, त्याबाबत प्रश्न आहे, "अनेक" मध्ये संख्या किती असेल ते ठाऊक असेल पण सध्या नि:संदर्भ असल्याची छटा आहे.

तुम्ही केलेली प्रतिकविता छानच आहे. फुलांची उपमा लोभस आहे. माझ्या मते येथे दुर्बोधता घेऊन सौंदर्य यायला नको. सध्यातरी माझे मूळचे सुटसुटीत आणि थेट अर्थाचे कडवेच ठेवतो आहे. परंतु तुमची कल्पनाशक्ती आणि कौशल्य कौतूक करण्यासारखीच आहे.
*अर्थात मी केलेला काटेकोर युक्तिवाद आहे, त्यातील सर्व कलमे-उपकलमे काटेकोर आहेत (हे फुलांचे काटे नव्हे तर शास्त्रकाटे होत.) फुलांची उपमा त्यामानाने संदिग्ध आहे.
तुमच्या उपमेत श्रुतींचे टप्पे म्हणजे "माळेतली फुले" की "फुलांच्या परड्या" आहेत? जर दोन्ही, तर हे रसिकाने मध्येच समजून घ्यायचे आहे, की माळेतल्या फुलांची उपमा संपून आता परड्यांच्या रांगेची वेगळी उपमा सुरू झाली आहे, वगैरे. श्रुतींचा एकापाठोपाठ एक असा क्रम असतो, म्हणून माळ ही श्रुतींची असल्यासारखे आधी वाटते, पण मग या पारड्या येतात. किंवा महा-उपमा एकच असेल : बारा किंवा बावीस (वेगवेगळ्या) फुलांच्या परड्या आहेत, प्रत्येक पारडीतली फुले मात्र एकसारखी आहेत, आणि ती फुले एकएक घेऊन, वेगवेगळ्या क्रमाने ओवून फुलांची माळ तयार होते. पण ही माळ कसली उपमा आहे? गाण्याच्या धुनीची? पण मग स्वर फुलून येतात म्हणजे काय होते? गाताना ते फुलत=स्फुरत आहेत का? हा उपमा-अर्थ सहज कळून येत नाही. "परंपरा-श्रुतिपरड्या" या समासाचा विग्रह काय आहे? "सफेत काळ्या(कशा)च्या बारा परड्या भरल्या" आहेत? "सफेत काळ्या" या विशेषणांचे विशेष्य काय आहे? "परड्या" तर नाहीच कारण सफेत काळ्याच्या परड्या आहेत. विशेष्य "फुले" आहे काय? म्हणजे सफेत-काळी फुले आहेत, त्यांनी भरलेल्या परड्या आहेत काय? पुढच्या ओळीतल्या बावीस श्रुतिपरड्या आहेत, त्यांच्यातही हीच सफेत-काळी फुले वेगळ्या वितरणाने भरली आहेत, की बावीस पारड्यांमधली फुले आता सफेत-काळी राहात नाहीत? मुळतल्यासारखा "सफेत" ("सफेद"ऐवजी) वापरलेला शब्द आहे. म्हणजे बहुधा पेटीवरच्या सफेत-काळ्या पट्ट्यांकडे निर्देश आहे. सफेत काळ्या पट्ट्या आणि कानात ऐकू येणार्‍या श्रुती ही एक उपमा, आणि फुलांची ती आणखी एक उपमा, यांचे मिश्रण नेमके कसे वेचायचे?
*

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या सर्व बंधनांपैकी कुठल्याच बाबतीत मीटर चुकले नाही, असे वाटते.

बरोबर. माझी वाचण्यात (सुर हे सूर असं वाचत होतो...) आणि यतिभंग न करण्यात चूक झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडेफार ऐकण्यापलीकडे मला शास्त्रीय संगीतात काहीहि कळत नाही पण वरच्या कवितेतील विषयाशी संलग्न असे एक पुस्तक अलीकडेच वाचनात आले. त्यातील मला जे समजले त्याचा सारांश करणारा एक लेख येथे लवकरच लिहावयाचा विचार आहे. जरा सवड होताच ते करीन असे म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे मिळणारी माहिती थोर आहे पण मुळ धागा आणि प्रतिसाद वाचल्यावर एक सुंदर(फिगरेटिव्हली (पन इंटेंडेड)) स्त्रीचा(फॉर दॅट मॅटर पुरुषाचा(डेव्हिड म्हणा हवंतर)) देह ऑपरेशन थिएटरच्या टेबलावर ठेवला आहे व अनेक दर्दी आस्वादक/अभ्यासक त्या देहावर एक मोठ्ठा इनसिजन घेऊन त्याचे विश्लेषण करण्यात गुंग आहेत आणि मी मात्र थेटरबाहेर तो देह येण्याची वाट बघत बसलो आहे असे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0