फुसके बार – १९ जानेवारी २०१६ - साहित्य संमेलन

फुसके बार – १९ जानेवारी २०१६

साहित्य संमेलनाच्या तिस-या दिवशी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांची मुलाखत अणि भारत विकास ग्रुपचे हणमंत गायकवाड यांचे आत्मकथन हे विशेष कार्यक्रम झाले.

गायकवाड यांनी अगदी हलाखीच्या परिस्थितीतून सुरूवात करत व कष्ट करण्याची तयारी नेहमी ठेवत अक्षरश; शून्यातून त्यांचे विश्व निर्मिले. मोठी स्वप्ने पहा, कष्टांची तयारी ठेवा आणि गुणवत्तेचा आग्रह धरा हा संदेश त्यांनी युवा प्रेक्षकांना दिला.

ते टाटा मोटर्समध्ये नोकरीला लागले असता महिन्याला आठएक हजार पगार होता. एकदा कंपनीकडच्या अडीच कोटी किंमतीच्या केबल्स भंगारात काढायच्या होत्या. मात्र गायकवाड यांनी पुढाकार घेऊन कंपनीचे होणारे नुकसान बरेच कमी केले. आपला पगार कितीही कमी असला तरी आपण आपल्या शक्तीप्रमाणे जे करणे शक्य आहे ते जरूर करावे, आळशीपणा करू नये, हा संदेश त्यांनी याद्वारे केला.

१०८ नंबरवर फोन करून जी वैद्यकीय मदत मिळते, ती सरकारी यंत्रणाही त्यांची कंपनीच चालवत आहे. त्यामुळे रस्त्यात कोठेही अपघात झाला व वैद्यकीय स्वरूपाची आणीबाणी दिसली तर या क्रमांकावर तातडीने फोन करावा व यासंबंधीची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

माशेळकरांचे आयुष्यही असेच शुन्यातून निर्मिलेले. आई अत्यल्पशिक्षित, गरीबी. दोन वेळचे खायला मिळण्याची भ्रांत. गोव्यातून मुंबईत आल्यावरही तेच हाल चालू, पण शाळा कशीबशी चालू ठेवलेली. महानगरपालिकेची शाळा. अर्थात मराठी माध्यमाची. पण आयुष्यात त्यामुळे माझे काहीही व कधीही अडले नाही हे ते आवर्जून सांगतात. शाळेतले शिक्षक तळमळीने शिकवणारे. यांना गणितात पैकीच्या पैकी गुण ठरलेले. एकदा खूप अवघड पेपर होता आणि त्यांना ७६ गुणच मिळाले. कितीतरी मुले चक्क नापास झाली होती. गुरूजी वर्गात येरझा-या घालत होते. म्हणत होते, माझीच चूक, मीच तुम्हाला शिकवण्यात कमी पडलो, माझीच चूक आहे. असे म्हणता म्हणता त्यांच्याच डोळ्यातून अश्रु वाहत होते. असे शिक्षक होते आमचे. पुढे पंतप्रधानांसमवेत परदेशी पाहुण्यांपुढे याबद्दल बोलणे चालले होते, तेव्हा त्या परदेशी पाहुण्यांनी विचारले की असे शिक्षक अजुनही तुमच्याकडे आहेत का? पंतप्रधान उत्तरले, 'नाही, कारण आता शिक्षकांना आता पूर्वीसारखा मान राहिलेला नाही.'

अकरावीला काही लाख विद्यार्थ्यांमध्ये अकरावे आले; तेही कोणत्याही इतर मार्गदर्शक पुस्तकांशिवाय आणि शिकवणीशिवाय. गरीबी असली तरी तेव्हापासून पुढे अधिक संधी मिळू लागल्या.

वाचनाची अफाट आवड. पण पुस्तके विकत घेण्याची ऐपत नव्हती. मग मॅजेस्टिकच्या कोठावळेंकडे विनंती. मी तुमची पुस्तके खराब करणार नाही, मी ती विकत घेऊ शकत नाही, पण मला ती वाचू द्या. बाबुराव अर्नाळकरांचीही अनेक पुस्तके वाचली. एकदा त्यांच्याकडे सही घ्याला गेले असता अर्नाळकरांनी शेरा मारला की ‘अभ्यास सांभाळून रहस्यकथा वाचाव्यात’. अशी गंमतीदार आठवण त्यांनी सांगितली.

या सगळ्या काळात त्यांनी रस्त्यावरील दिव्याच्या खाली अभ्यास केला. गुजरातेला जाणारी शेवटची रेल्वे गाडी दहा वाजता सुटे. त्यानंतर तेथे शांतता असे. त्या ठिकाणी मग त्यांचा अभ्यास अगदी ‘छान’ होई.

पुढे जाऊन मुंबईतल्या युडीसीटी (आताच्या आयसीटी) मधून केमिकल अभियांत्रिकी पूर्ण झाल्यानंतर ते नोकरीच्या मागे लागले. याचे मुख्य कारण म्हणजे आईचे अविरत कष्ट कमी करावेत अशी त्यांची भावना. पण त्यांच्या आईने त्यांना आणखी शिकायला सांगितले. त्यांनी अवघ्या तीन वर्षांमध्ये पीएचडी मिळवली. तेव्हापासून आजवर त्यांनी देश-विदेशातील ३५ विद्यापीठांच्या डॉक्टरेट्स मिळालेल्या आहेत व त्यांना या वर्षी त्यांची पुढची डॉक्टरेट मिळायची परदेशात मिळायची आहे.

इंजिनियरींग झाल्यावर लगेचच नोकरी न स्विकारता पुढे शिकण्याच्या आईच्या आग्रहाचे कारण त्यांना नंतर कळले. मुंबईत आल्यावर आईने नोकरीसाठी प्रयत्न सुरू केल्यानंतर तिने नोकरीसाठी प्रयत्न केले. मात्र फार शिकलेली नसल्याने सगळीकडचे नकार पचवावे लागले. तेव्हा त्यांनी ठरवले की त्या मुलाला सर्वोच्च शिक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करतील.

पुढे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक, सीएसआयआरचे संचालक या जबाबदा-या पार पाडताना हळदीचे औषधी गुणधर्म, बासमतीचे गुणधर्म यांच्यावरील पेटंटच्याबाबतीतले त्यांचे काम माहितच आहे. शिवाय तशा प्रकारच्या आपल्याकडच्या प्रचलित ज्ञानासंबंधीची पेटंट्स खोडसाळपणे कोणाला घेता येऊ नयेत यासाठीची पेटंटसंबंधीची पद्धत बदलण्यातही त्यांना यश मिळाले. त्यांनी देशात मूलभूत संशोधनाची दृष्टी मिळावी याकरता नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनची स्थापना केली. त्यातून एका तरूण मुलाने मोबाईल फोनच्या आकाराच्या इंस्ट्रुमेंटने इसीजी काढता येण्याचे तंत्र विकसित केले आहे. त्यामुळे आणीबाणीच्या वेळी घरच्या घरीच इसीजी काढून तो डॉक्टरकडे पाठवता येऊ शकतो.

नंतर जगातील प्रमुख देशांनी एकत्र येऊन संशोधनासंबंधीची एक संस्था स्थापन केली. माशेळकर त्या संस्थेचेही सदस्य आहेत.

मुलाखतीच्या शेवटी माशेलकर भावूक झाले. ते म्हणाले की जागतिकीकरणामुळे भारताचा विकास झपाट्याने होत आहे. २०५० पर्यंत देश नक्की विकसित देश म्हणून गणला जाईल. मात्र आज त्यांनी वयाची ७३ वर्षे पूर्ण केली आहेत. तेव्हाचा प्रगत भारत पाहण्यास ते नसतील. त्यांची एकच इच्छा आहे की त्यांचे आताचे उर्वरित आयुष्य घेतले तरी चालेल, पण त्यांना त्या काळात एका दिवसासाठीच का होईना पण तेव्हाचा भारत पाहता येऊ दे. हे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले. मी वैज्ञानिक असूनही अशी अवैज्ञानिक इच्छा बाळगतो आहे याची मल कल्पना आहे हेही त्यांनी आवर्जून सांगितले.

आशा भोसले संगीत रजनी

आदल्या दिवशीच एक तरूणी ‘आशा भोसले नाइट दुपारी नाही, त्यामुळे पहायला थांबता येणार नाही’ असे फोनवर सांगताना ऐकले होते.

या संमेलनासाठी झालेल्या निवडणुकीत पराभूत झालेले कवी विठ्ठल वाघ शेजारीच बसले होते. ते म्हणाले की ते पराभूत झालेत असे त्यांना वाटत नाही. सबनीसांनी निवडून येण्यासाठी काय 'प्रकार' केले (प्रकार हा वाघांचा शब्द) हे सर्वांना माहितच आहे, त्यामुळे या पराभवाचे वैषम्य ते काय मानायचे?

मावळते अध्यक्ष सदानंद मोरे समोरच्याच रांगेत बसले होते. उद्घाटनाच्या वेळच्या भाषणात ते म्हणाले होते की अध्यक्षाने आपल्या स्वभावाला मुरड घालून जबाबदारीने बोलले पाहिजे. त्यांचे हे विधान नूतन अध्यक्ष सबनीसांना दिलेला सल्ला आहे असे म्हटले गेले. सबनीसांनी त्यांचा सल्ला मानला नाही ते वेगळे. मी मोरेंना म्हटले की याचा अर्थ उद्यापासून तुम्ही मोकळेपणाने बोलायला सुरूवात करणार तर. ते म्हणाले अगदी उद्यापासून नाही, सोमवारनंतर. आणखी दोन दिवस आहेत.

कार्यक्रम जवळजवळ पाऊण ते एक तास उशीरा सुरू झाला.

८३व्या वर्षी आशाताईंचे गाणे फार ऐकण्यासारखे नव्हते. पार्श्वसंगीतावर शब्द चालण्यात चुका होत होत्या, सूर सुटत होते. ते साहजिक होते. जवळजवळ ११-१२ गाणी त्यांनी म्हटली तीदेखील उभे राहून, याचीच कमाल वाटली. शब्दांपेक्षा संगीताचा आवाज अधिक असल्याने अनेकदा शब्द कळत नव्हते.

त्यांचा उत्साहच त्यांना अशा प्रकारे अॅक्टिव्ह ठेवत आहे असे वाटले. जणु थांबला तो संपला.

सुधीर गाडगीळांना बोलण्यास फार वाव ठेवलाच नव्हता. येथे हिंदी गाणी न निवडता केवळ मराठी गाण्यांवर भर दिला गेला हे चांगलेच झाले. बाकी इतर कोणत्या गाण्यांपेक्षा ‘गेले द्यायचे राहून’ हे सुंदर पण फारसे स्मरणात नसलेले गाणे त्यांनी स्वत: निवडले ते विशेष वाटले. ‘गोमू संगतीने’ हे निव्वळ गोड गाणे रिमिक्स करून त्यांच्या नातवाने त्याची वाट लावली.

टीव्ही वाहिन्यांवर हा कार्यक्रम दाखवला जात आहे, म्हणजे रेकॉर्ड केले जात आहे याची त्यांना कल्पना न दिली गेल्याने हे जेव्हा त्यांच्या ताफ्यापैकी कोणीतरी लक्षात आणून दिले तेव्हा त्या चिडल्या व मी गाणार नाही असे म्हणाल्या. नंतर सर्वच वाहिन्यांचे कॅमेरे बंद केल्यावर कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. त्याचा निषेष करणा-या पत्रकारांना आयोजकांपैकी कोणी धक्काबुक्की केली. त्याचा निषेध म्हणून पत्रकारांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरूवात केली. आशाताईंना वाटले की ते त्यांच्याविरूद्ध निषेधाच्या घोषणा देत आहेत. म्हणून त्यांनी स्वत: माफी मागितली. मी तुमच्या आजीसारखी आहे, माझ्यावर माझ्या वयात रागावू नका असे आवाहनही त्यांनी केले. अशा मौजेचा प्रकार झाला. त्या हा कार्यक्रम मोफत करत असल्याचे त्यांनी या प्रकारामुळे सांगितले की तसे आधीच ठरलेले होते हे कळले नाही.

हा कार्यक्रम सुरू होण्याआधी माजी जलसंपदा मंत्र्यांच्या पत्नी व इतर नातेवाईकांसाठी जागा करून देण्यासाठी पिंपरीच्या महापौरांना तातडीने उठायला लावण्यात आले. महापौर हे पद इतके कचरा करण्यासारखे असते हे त्या निमित्ताने कळले. उद्घाटनाच्या भाषणात महापौरांनी त्यांच्या भाषणात पवारांना चुकून राज्याचे कृषीमंत्री बनवले याची शिक्षा दिली की काय असे वाटण्यासारखा प्रकार होता.

आजच्या लहान मुलांसाठीच्या कार्यक्रमावरून निश्चित झाले की मुलांच्या साहित्याची परिस्थिती फार गंभीर आहे. ‘नाच रे मोरा’ सारखी गाणी निवडून तर मराठी बालसंगीत इतक्या दशकांमध्ये फार पुढे सरकलेले नाही हेही दिसले. एका छोट्याने बोबड्या स्वरात म्हटलेले दीर्घ गीत मात्र सुंदर होते व त्याने म्हटलेही फार छान. ते नक्की कोणाचे होते?

वारणेचा वाद्यवृंद अजूनही अस्तित्वात आहे याची कल्पना नव्हती. दर्जा फारच घसरलेला आहे हे प्रकर्षाने दिसले. की तो आधीही तसाच होता माहित नाही. कारण मी याआधी तो पाहिला होता, तेव्हा इतकी मुले एकत्र येऊन कार्यक्रम सादर करतात त्याचेच नवल व नाविन्य होते.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पण राकु - एवढा वैताग वाटत असेल तर तुम्ही जाताय कशाला तिकडे? निवांत फिक्चरबिक्चर टाका, पानबिन लावा. साहित्य संमेलन नॉट कूल म्यान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बरोबर अाहे तुमचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एवढा वैताग वाटत असेल तर तुम्ही जाताय कशाला तिकडे? निवांत फिक्चरबिक्चर टाका,

नशिब ऐसीवर धागे पाडा असा सल्ला दिला नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0