फुसके बार – २६ जानेवारी २०१६

फुसके बार – २६ जानेवारी २०१६
.
१) आज २६ जानेवारी पुन्हा एकदा.

माझ्या अंदाजाने १५ ऑगस्टची स्वातंत्र्याची तारीख एकदा ठरल्यानंतर दुसरा एक राष्ट्रीय दिवस त्यानंतर लगेचच नको या भावनेने स्वातंत्र्यचळवळीतील २६ जानेवारी हा दिवस ओढूनताणून निवडला गेला. मला त्याचे प्रत्यक्ष कारण माहित आहे तरीही. तेव्हा याउपर मला त्याचे काही विशेष महत्त्व वाटत नाही.

राष्ट्रभावना निर्माण करण्यासाठी अनेक देशांमध्ये असतो तसा एक राष्ट्रीय दिवस (नॅशनल डे) साजरे करण्याचे ठरवण्यात यावे. अर्थात असा दिवस तेवढेच मोठे औचित्याचे कारण शोधून ठरवण्यात यावा.

बाकी लोकशाहीच्या नावाखाली होणा-या आपल्याकडच्या सार्वत्रिक किंवा कोणत्याही निवडणुका कसा लढवल्या जातात हे आपल्या सर्वांनाच चांगले माहित आहे. या निवडणुका किती बंदोबस्तात घ्याव्या लागतात, किती मतदारसंघ आजही संवेदनशील म्हणून जाहिर होतात हे सगळे आपल्याला माहित आहे. बिहारसारख्या राज्यातील निवडणुकांचे दळण किती दिवस चालते व तसे का चालते हेदेखील आपल्याला चांगलेच माहित आहे. तिथल्या जाऊ दे, आपल्याकडच्या महानगरपालिकांच्या, नगरपलिकांच्या व ग्रामपंचायतीच्या निवडणुका कशा लढल्या जातात हे तरी पाहू. तेव्हा प्रजासत्ताक म्हणवला जाणारा हा दिवस आपल्या भोंदूपणाचेच प्रतिक आहे व तो भोंदूपणाच आपण अगदी दिमाखात साजरा करतो, यात मला अजिबात संशय नाही. तेव्हा असा दिवसाच्या शुभेच्छा वगैरे मी देत बसत नाही.

धन्य हे अशा भोंदू व भंपक लोकांचे प्रजासत्ताक. पुन्हा जगातली सगळ्यात मोठी लोकशाही वगैरे म्हणत आपल्यातलाच कोणी आपलीच लाल करून घेऊ पाहिल तेव्हा या वास्तवाचे स्मरण होऊ दे.

बाकी ते फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद सुखरूप त्यांच्या देशात परतोत हीच इच्छा.

२) सामना सिनेमाची चाळीस वर्षे

सामना सिनेमाला चाळीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने टीव्हीवर कार्यक्रम पाहिला. जब्बार पटेल, रामदास फुटाणे वगैरे होते.

जब्बार पटेलांचा पहिलाच सिनेमा असला तरी कॅमे-यातून गोष्ट सांगणा-या दुर्मिळ सिनेमांपैकी तो एक आहे असे आवर्जून सांगितले गेले.

सिनेमाची निवड बर्लिन चिर्तपट महोत्सवासाठी झाली. कलाकारांच्या विमानतिकिटांची एकूण रक्कम होती ६४हजार, तर हे सोय करू शकले केवळ २५हजारांची. त्यामुळे बर्लिनला कसे जायचे हा मोठाच प्रश्न. हे गेले मुंबईच्या कमिशनरकडे. त्यांनी यांची अडचण समजून घेतली आणि म्हणाले, पुन्हा थोड्या वेळाने त्याच एअरलाइनच्या ऑफिसमध्ये जा. त्याप्रमाणे हे तिकडे गेले. तर तिथला अधिकारी यांना म्हणाला, काय राव तुम्ही कुठला लग्गा लावलात, त्या साहेबांनी तुमच्या तिकिटांची सोय केली नाही तर आमच्या बिल्डिंगचे पाणी तोडण्याची धमकी दिली आहे. पण माझ्या डोक्यावरही इतर साहेबलोक आहेत. काय करता येते ते मी पाहतो. त्यानंतरही तिकिटाचे काय होते याची काळजी. अखेर आम्ही ठरवले, की नाहीच जमले, तर एक गोव्याची ट्रीप करून तेथून काही इंपोर्टेड वस्तु आणून लोकांना सांगायचे की या बर्लिनहून आणल्यात. अखेर अगदी काही तास आधीच तिकिटांची सोय झाली. तेथे कितीतरी वेळ आधीच जायचे असते हे आम्हाला कोठे माहित? आम्ही आपले एसटीस्टॅंडसारखे तेथे पोहोचलो, तर आमच्या नावाचा पुकारा चालू होता. कसेबसे विमानात बसलो.

तिथून परत आल्यावर आमच्यातले बहुतेक जण पुन्हा एकदा ख-याखु-या एसटी स्टॅंडवर. जामखेड वगैरेच्या एसटी पकडायला.

कार्यक्रमात सामनातील अनेक प्रसंगही दाखवले गेले.

विचार आला की सिनेमातल्या मालकांना मास्तर भेटू शकले, कारण त्या ताकदीचे निस्पृह मास्तर 'होते'. आज बहुतेक मास्तरच अशा मालकांनी आपल्या वळचणीखाली घेतले आहेत. तेव्हा अशा माजलेल्या मालकांच्या डोळ्याला डोळा भिडवून जाब विचारायला शिल्लक कोण राहिले आहे? ज्यांना जाब विचारायचा त्यांचेच अमृतमहोत्सव साजरे करणे चालू आहे. व अशा मालकांना अपल्या गैरकृत्यांची उपरती होईल हा चमत्कारही संभवत नाही. त्यावर एक उपाय होऊ शकतो, या मालकांना सामना हा सिनेमा रोज एकदा असा सलग दहा दिवस एकट्याने पाहण्याची सक्ती करण्यात यावी आणि काही फरक पडतो का पहावे.

नाही तरी एका मालकांनी आम्हा राजकारण्यासारखे वागू नका असा उपदेश नुकताच केल्याचे वाचले. तेव्हा आशेचा काही किरण आहे वा उपरती आहे असे समजायचे की नुसताच पोकळ बुडबुडा?

३) युनिट बेस्ड इंशुरन्स विकणा-यांमध्ये अनेकदा स्त्रियांचा भरणा असतो. त्यातही अर्थात सुंदर स्त्रियांचा. अनेक जण त्यला बळी पडतात हा अनुभव अगदी माझ्या एका मैत्रीणीने सांगितला आहे.

मी परदेशात असताना अॅलिको या अमेरिकी कंपनीच्या ललना आमच्या ऑफिसमध्ये यायच्या. शिवाय सगळेच एनआरआय. काही जण त्यांना लगेच बळी पडायचे तर काही नट्स फोडायला ब-यापैकी कठीण असल्यामुळे त्यांच्यासाठी पुन्हा पुन्हा यावे लागायचे. पॉलिसी विकण्याची नेहमीची युक्ती म्हणजे आधी कौटुंबिक माहिती विचारून घेतलेली असायची. मुले किती, केवढी, बायको काय करते, वगैरे. मग त्यानंतर टचवुड, पण तुमच्यानंतर तुमच्या कुटुंबाचे काय होईल हा मार्मिक प्रश्न. या प्रश्नाला समोरचा हमखास बळी पडलाच पाहिजे हा साधा आडाखा. ती एका इनस्ट्रुमेंटेशनच्या ड्राफ्ट्समनच्या मागे ब-याच दिवसांपासून लागली होती. बरे, हा पठ्ठ्या त्याला पॉलिसी घ्यायचीच नाही असे स्पष्टपणे सांगायचाच नाही. एवढी सुंदर स्त्री माझ्याकडे येते आहे, मी स्वत:हून तिला येऊ नको असे का म्हणू असे याचे म्हणणे.

अखेर खूप वेळा अशा चकरा झाल्यावर तो तिला म्हणाला, की या विषयावर माझ्या बायकोशी बोललेलो आहे. तिने मला सांगितले आहे की माझ्यानंतर ती काही दिवसांनी सरळ दुसरे लग्न करेल. आता तुम्हीच सांगा मी अशा बायकोची काळजी का करू? अर्थात तुमची ही पॉलिसी चांगलीच आहे, तरी मी माझ्या कमाईचे पैसे तिच्यासाठी का घालवू?

त्या बाई पुन्हा त्याच्याकडे फिरकल्या नाहीत. जेवणा-या वेळात विविध मुद्द्यावरून चर्चा होत असे. त्यामुळे हळुहळु त्या बाईंचे आमच्या ऑफिसमधले दुकान बंद झाले हे वेगळे सांगायला नको.

४) कल्पना करा. आपल्याकडे भाजलेल्या शेंगा आहेत, मटारचे दाणे आहेत किंवा तत्सम काही आहे, ज्यातून आपल्याला निवडून-निवडून खायचे आहे. आणि हे मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. तेव्हा सहसा काय होते, आधी कोवळे दाणे संपतात, मग त्यातल्या त्यात कोवळे असलेले पण थोडे निबर झालेले दाणेही चालतात, नंतर त्यापेक्षा थोडे अधिक निबर दाणे. आणखी इच्छा असेल तर राहिलेले पूर्णपणे निबर दाणेही संपतात.

विपुलता असेल तर मात्र केवळ कोवळे दाणे शोधून त्यावरच ताव मारण्याची ऐष करता येते.

तेव्हा दाने-दाने पे लिखा होता है खानेवाले का या ना खानेवाले का नाम। ये तो निर्भर होता है दाने कितने हैं और खानेवाला कौन है इसपर।

५) माझ्या एका पणजोबांना त्यांच्या एका नातवाने बरेच मोठे झाल्यावर एक प्रश्न विचारला. तुमच्या बरोबरच्या अनेकांचे निधन झाले आहे, तरीही या वयातही तुमची प्रकृती अजुनही चांगली आहे. तुमच्या दीर्घायुष्याचे रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी हा प्रश्न विचारत आहे. नातवाची अपेक्षा की पणजोबा ते नियमितपणे करत असलेल्या व्यायामाचे, त्यांच्या निर्व्यसनीपणाचे दाखले देतील.

पणजोबा अजिबात रागवले नाहीत. ते सर्वांना अहोजाहो करत, अगदी लहानांनाही. म्हणाले, अगदी चांगला प्रश्न विचारलात. तुम्ही शेतकरी आहात ना, शेतीतलेच उदाहरण देऊन सांगतो. तुम्हाला व्यवस्थित कळेल.

शेतातली ज्वारी जेव्हा तुम्ही कापणीला काढता तेव्हा शेतात किती कणसे असतात, हजारो. त्यांची कितीही काळजीपूर्वक कापणी केली तरी दोनचार कणसे मागे राहतातच. तसा मी मागे राहिलो आहे. जेव्हा ‘त्याच्या’ ते लक्षात येईल तेव्हा माझाही नंबर येईल रे.

प्रतिक्रिया

वारंवार सांगूनही योग्य ठिकाणी लेखन न केल्यामुळे धागा वाचनमात्र करण्यात येत आहे.