नावरहीत कविता

तू विस्तव पाहीला आहेस? तशी आहेस तू...
विझून गेलेल्या विस्तवासारखी
थंड आणि काळी ठीक्कर
जळून गेलेल्या राखेसारखी
पण त्या विझलेल्या विस्तवात अजूनी धग आहे,
आहेत आगीचे काही अवशेष
जे सांगताहेत कधी काळी
तू एक धगधगती ज्वाळा होतीस...
अजूनही तुझ्यात
धाडसीपणाचे काही अंश शिल्लक आहेत
ते दबले जाताहेत त्यामुळं तुला वाटतंय
की तुझं अवघं कुळंच भित्रं आहे...
पण तुझ्यात धाडसीपणा शिल्लक आहे...

तू मेंढरूच बनायला हवं होतंस त्यांना,
वाट चुकलेलं मेंढरु बनून तू पुन्हा एकदा
असंख्य मुक्या मेंढरांच्या मागून
मान खाली घालून निमूटपणानी जायला हवं होतंस...
पण तू केलीस प्रतिज्ञा मेंढरु न बनण्याची,
ही प्रतिज्ञा तुला मेंढरु बनू देतही नाही आणि
स्वतःला कळपाचा राखणदार समजणारे ते
तुला सुटं जगूही देत नाहीत...
थोडक्यात तू अंतराळी आहेस तुझ्याच प्रतिज्ञेमुळं... आणि राखणदारांपासून लांब जाताना,
तू फिरती आहेस
तुझ्या अस्तित्वाच्या लक्तरांना घेऊन,
तुला ठामपणानी तुझं अस्तित्व
त्यांना स्वीकारायला लावायचं आहे,
पण त्या सापांना हवंय केवळ तुझं रक्षण केल्याचं पुण्य...

तू फिरती आहेस तुझ्या सगळ्या वेदनांसकट
व्याकूळ होऊन... शाप मिळाल्यासारखी...
पण हा शाप नाहीच केवळ एक खेळ आहे...
बुद्धिबळ....बुद्धिबळाचा खेळ माहीती आहे?
तुझं आयुष्य, एक एक घर पुढे ने तू,
त्यांची प्यादीही करतीलच तुझ्यावर चाल
पण तू शांत राहून विचार कर,
ते गाफीलच राहतील,
तुझ्या शांतपणाला
तुझं विझून जाणं समजतील
आणि मग तू तुझ्यावरची राख हलकेच झटक
दिसतील त्यांना तुझ्यातले अग्निकण,
तुझ्याकडे पाहताना नजर खालीच जाईल त्यांची,
सहन होणार नाही ते तेवढंच तेजसुद्धा त्यांना...
त्यांच्या खजील होण्यातच त्यांची हार दिसेल तुला,
ते दुसऱ्या डावाची तयारीही सुरु करतील
पण आता ते तुला जरा बिचकून असतील...
तुला फक्त राख झटकायची आहे...
कळप तर केव्हाच सोडला आहेस तू....
तुला तू सापडशीलच!!!

~अवंती

(पुष्कळवेळा असंच सुचत जातं, नाव वगैरे ठेवायला जमत नाही त्यातलीच ही एक)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कविता उत्तम आहे . चांगले शीर्षक वाचकास आकर्षित करते, त्यामुळे शक्यतो द्यावे असे असे वाटते . "तुला फक्त राख झटकायची आहे" हे शीर्षक कसे काय वाटते ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me