मिलिंद पदकींच्या कविता

कविता

मिलिंद पदकींच्या कविता

- मिलिंद पदकी


"या शतकात आता मोठ्या शहरातच जगावे लागेल"

या अनंत विश्वाची झालीय एक दहा बाय दहाची खोली
जगण्यातील अडचणींनी, गंधांनी भरलेली
खिडकीतून एक रेल्वे धडाडत जाताना दिसते, जिच्या खिडक्यांचे प्रकाश
आसमंत उजळवू शकत नाहीत, गाडी पळत सुटलेली असते
अंधारापासून सुटका मिळविण्यासाठी.
तिचा आवाज असतो थरथरता, पण पोलादी
आणि तिच्या शिट्टीने बाकी सारे उध्वस्त होत जाते,
ठासून भरलेल्या लोकसंख्येची वाळवंटे पार करण्यासाठी
गाडी धावतच असते!
लोकही धावत असतात निष्प्रेम जीवन पार करण्यासाठी
शेवटी एक दिवस तेही प्रेमाशिवाय जगायला शिकतात
खुशीत जगतात, अगदी नाचून-गाऊनसुद्धा!
लहानपणचे गाव झालेले असते आता उपनगर,
बैलगाडी जायची नाही तिथे आता मेट्रो धावते
प्रेमाची इतिहासपूर्व तसबीर भिंतीवर टांगलेली असते,
तसबिरीवर पडत राहतो पाऊस, धूळ, थंडी,
दिवस, रात्र, धुक्यात झाकलेली,
तिच्या मागे किडे, पाली राहतात बिऱ्हाड करून.
कोणी चिकित्सक मग म्हणतो की या दिवसात
डोळे शुष्क तसे सर्वांचेच दिसतात, डॉक्टर तर औषधही
देत नाहीत त्यासाठी. प्रेमावाचून कोणी मरत-बिरत नसतं
हे सर्वांनाच कळून चुकलेलं असतं.
खिडकीतून जाणारी रेल्वे दिसते, बराच काळ
तिचा आवाज आसमंताचा कबजा घेऊन रहातो.
अनवरत निर्माणाधीन शहराच्या या बारीक, धूसर मातीत
मृगजळासारखं सुद्धा काही चमकत नाही कधी
पण आयुष्य चालत रहातं!

मूळ हिंदी कविता: "इस सदी में जीवन अब विशाल शहरों में ही सम्भव है" : कुमार अंबुज
भाषांतर : मिलिंद पदकी

---

साक्षात्कार

म्हटले शोधावी एखादी पुरेशी हीन जागा,
आपल्याला शोभेलशी
या विराटात 'आपली" म्हणता येईल अशी,
(सकाळी उठल्यावर आपले स्थानच हरविले
असल्याची भावना नको!)
अशी जागा, जी घेतल्यास कोणी स्वार्थीपणाचा आरोप
नाही करू शकणार आपल्यावर!

पण पहातो तर काय : प्रत्येक वस्तू, प्रत्येक जागा
अस्तित्वाच्या अफाट तेजाने उजळलेली!
कुठेच नव्हते मला साजेसे क्षुद्रत्व

रस्त्यावरच्या गवताच्या काडीतही सापडली
अगम्य नवी हरित सृजने
नवनिर्मितीस सज्ज.
रस्त्याकडेच्या दोन्ही पायांनी थोटक्या एका भिकाऱ्यातही
कण आणि कण स्वप्रेमाने ओथंबलेला!

साक्षात्कार : अस्तित्वात कुठे हीनता नाहीच
शेवाळं, गवत, झाड, किडा, भिकारी, मी
सारेच दैदीप्यमान अस्तित्वाचे मानकरी!

मूळ इंग्लिश कविता : "Still" by A. R. Ammons
भाषांतर : मिलिंद पदकी

"श्री सूर्य-विजय"

(शिशिरऋतूच्या पुनरागमें / एकेक पान गळावया
कां लागता मज येतसे / न कळे उगाच रडावया
शिशिरागम - बा. सी. मर्ढेकर)

फ्रीवेच्या दोन्ही किनाऱ्यांना गच्च लगडलेला
लाल-पिवळा मृत्यू, कडेला पडलेली, कणाकणाने
अनंतात विलीन होणारी हरणे, खारी, ससे ...
अभाग्याच्या प्राक्तनासारखी
नकळत अंगावर येऊन आदळणारी
कच्च अंधारी संध्याकाळ,
या सर्वांतून मुक्त करण्यासाठी सृष्टी अखेर घालेल
त्यावर पांढरे-स्वच्छ आच्छादन : जे तीन महिने टिकेल.
मग तेही अस्तंगत होत जाईल
त्यात उमटलेल्या पावलांसह...
ताकदवान बुलडोझर पुन्हा स्वच्छ करतील रस्ते
सूर्य पुन्हा जोमाने उगवू लागेल
सृष्टीला हिरवा पाला फुटेल,
जिवंत हरणे, ससे, खारी त्यात
वेगाने धावू लागतील,
जसे काही घडलेच नाही!
मीसुद्धा बेसबॉल कॅप उलटी फिरवून
त्याच फ्रीवेवर गाडी हाणताना
हसत सुटेन!
आणि नंतर पुन:
दिवस परत लांबत जातील
- कदाचित तेव्हाही पुन:
तुला माझे शब्द आठवतील.

"क्षितिजांवर नवे सूर्य उगवतच रहातात"

क्षितिजांवर नवे सूर्य उगवतच रहातात
जळो-विझोत दिवे, घाव जळतच राहतात १.
माझ्या गल्लीतले हे माझे जीवनसाथी
सतत आपले चेहरे बदलतच रहातात २.
समाज आपली चाल चालतच राहतो,
काफिले थांबतात, रस्ते चालतच रहातात ३.
कठीण कातळ असो, किंवा काळाची बळजोरी
जीवनाला नवे झरे फुटतच रहातात ४.
अंगातही नसते सबुरी नी चिकाटी
अन एकीकडे क्षणही हुकतच राहतात ५.
संध्याकाळी देवा मला आता सांभाळ
अशुभाच्या सावल्या फिरतच रहातात ६.
जमानाही होता एके काळी दोस्त
"अख्तर" आता आरशातच रमत राहतात ७.

मूळ कविता: उफ़ुक़ उफ़ुक़ नए सूरज निकलते रहते हैं : अख़्तर होशियारपुरी
भाषांतर : मिलिंद पदकी

"नौकानयनातील प्रगती"

कुमारी मातेच्या पोटी देव जन्माला आला, त्याला त्यांनी
मोठ्या धारदार खिळ्यांनी क्रूसावर ठोकून ठार केले,
नंतर तो गुहेतून जिवंत बाहेर आला व आकाशात उडून गेला.
त्याच्या नावाने त्यांनी पुढची पंधराशे वर्षे विज्ञानावर
बंदी आणली, (पण ते चांगलेच होते!).
नंतर पृथ्वीचा थाळीसारखा आकार हळूहळू चेंडूसारखा
झाला व त्यांच्या लक्षात आले की यातून लुटालूट व बलात्कारांना
चांगली संधी मिळेल. गोऱ्या पिशाच्चांचा नायक होता
कोलंबस . "भारता" च्या किनाऱ्यावर उतरून त्याने
तिथे एक क्रॉस व स्पेनचा झेंडा ठोकला आणि सर्व दिशांच्या
सातशे मैलावर स्पेनच्या राजाचे अधिराज्य घोषित केले
(कारण त्याच्याकडे खूप बंदुका होत्या ).
रबराच्या चिकाला खनिज तेलासारखे महत्त्व प्राप्त झाले
तेव्हा अमेझॉन नदीवरच्या स्थानिकांना चीक गोळा करण्याची
संधी देण्यात आली. त्यांनी ती आनंदाने घेतली कारण
कोटा पूर्ण झाला नाही तर त्यांचा उजवा हात तोडला
जात असे. स्थानिकांना प्रगतीची ओढ असल्यामुळे
बायकामुलांवरील बलात्कारांकडे ते हसून दुर्लक्ष करायला शिकले.
मग त्यांच्यातल्या काहींना युरोपच्या प्राणिसंग्रहालयात
ठेवण्यात आले. पिंजऱ्याबाहेर "त्यांना शेंगदाणे टाकू नयेत"
अशी पाटी असे, त्यामुळे गोरी मुले निराश होत.
अशी प्रचंड प्रगती झाली. नासा चंद्रावर रॉकेट सोडते तेव्हा
त्याच्या लोखंडी कणांनी खालच्या तळ्यातल्या मगरींचे
थायरॉईड प्रदीप्त होऊन त्या अधिक वेगाने हल्ला करू लागतात.
लवकरच येथे कोलंबस डे साजरा होणार आहे !

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मिलिन्दजी
तुमची शब्दांची निवड किती चपखल आहे.
लोकही धावत असतात निष्प्रेम जीवन पार करण्यासाठी

या ओळीपाशी जीव घु टमळत राहीला ही ओळ पार करता आली नाही.
ये फासले तेरी गलियो के हमसे तय ना हुए
हजार बार रुके हम हजार बार चले
सारखी मनाची भिरभिर अवस्था होउन गेली या सर्व कविता वाचुन
तुम्हाला अनेक धन्यवाद
या अप्रतिम अनुवादांसाठी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love