कथांश - १

अ‍ॅसेटसची किंमत बाजारभावावरुन ठरते. अ‍ॅसेट म्हणुन जमीन विकत घेतलेली असल्यास त्या जमिनीतुन पुढे येणारे संभाव्य उत्पादन हे त्या जमीनीचा आजचा बाजारभाव ठरविण्यासाठी वापरले जाते. सामान्य लोकांना दोनच प्रकारच्या जमिनींची खरेदी विक्री माहिती आहे. एक येलो झोनमधली जमिन ज्यावर घरे बांधली जातात आणि दुसरी ग्रीन झोन मधली जमीन जिच्यात शेती केली जाते. ह्या दोन ढोबळ प्रकारांपलिकडे जमीनीची अनेक उत्पादने असु शकतात. एखाद्या प्रदेशात चांदीचे खजिने असतील तर तिथल्या जमिनीची किंमत तिच्यात असलेल्या चांदीच्या उत्पादनांवरुन ठरते. एखाद्या जमिनीत गंधक असेल तर त्या जमिनीची किंमत तिच्यात असलेल्या एकुण गंधकाच्या साठ्याच्या संभाव्य उत्पादनानुसार ठरते. जमिन विकणे ती विकत घेणे ही फक्त संज्ञा आहे. एखाद्या प्रदेशात अर्थनितीच्या संकल्पना काय आहेत त्यानुसार जमिन विकाउ आहे किंवा नाही आणि असल्यास तिचे मुल्य काय आहे हे ठरते. पण हा झाला माणसाच्या डोक्याने माणसापुरता केलेला व्यवहार. ज्या जमिनीची खरेदी विक्री होते तीच्यावर झाडे असतात, तलाव असतात, नद्या, झरे, डोंगर, दर्‍या, पशु, पक्षी, प्राणी असे खुप काही असते. जमीन ह्यांचीही असते पण ह्या सगळ्यांना जमिनीच्या व्यवहारात सामील करुन घेतले जात नाही. त्यांच्या अनुमतीवर जमिनींचे व्यवहार ठरले असते तर कदाचित जमिन कुणाला कधी विकताच आली नसती. म्हणजे विचार करा की शहरातल्या एका डोंगरावरची झाडे तोडुन त्यावर महानगरपालिकेला पुतळा उभा करायचाय आणि ह्याला डोंगरातल्या बेडकांचा आणि खारींचा आक्षेप असल्याने त्यांनी महानगरपालीकेविरुद्ध कोर्टात दावा ठोकलाय.

गेली सहा वर्षे सॅटेलाईट तंत्रज्ञानात केलेल्या अफाट प्रगतीमुळे पृथ्वीवरच्या एकुण एक भागाचे, कानाकोपर्‍यांचे फोटो घेतले गेले. कुठल्या जमिनीत कसले साठे आहेत आणि त्याची बाजारभावानुसार आजची किंमत काय आहे त्याचा रियल टाईम डेटा बनविला गेला. त्यानंतर ज्या जमिनीचा कुणीही मालक नव्हता तिला असेच जाउन ताब्यात घेण्यात आले, ज्याला कुणी मालक होता त्याच्याकडुन ती विकत घेण्यात आली, जमीन सरकारची असली तर ती दिर्घ मुदतीच्या भाड्यावर विकत घेतली गेली. पृथ्वीच्या एकुण एक कानाकोपर्‍याची एक किंमत ठरविण्यात आली. पृथ्वीवरची सर्व संसाधने, त्यांचे पुर्णत: उत्खनन होउन उपयोगात आणता येण्याचा एकुण कालावधी ह्यांचे एक गणित मांडण्यात आले. हा आकडा इतका मोठा होता की सध्याचा वृद्धीदर, सकल राष्ट्रीय उत्पन्न, आणि एकुण खेळत्या भांडवलाचा आकार हा ह्या किंमतीसमोर तसा फार कमी होता. गणित मांडतांना संगणकाला कुठलीही भावना नव्हती, तुम्ही सांगितले ते त्याने आकडेमोड करुन दिले. एका मर्यादीत ग्रहावर अमर्यादीत मार्केट वृद्धी असु शकत नाही हा एक साधा हिशेब कुणालाही लक्षात घ्यावासा वाटला नाही. गेले दशकभर भांडवलशाहीने पाहिलेले स्वप्न साकार झाले. पृथ्वीच्या सर्व संसाधनांची एकुण किंमत ठरविता आली.

राष्ट्रसंकल्पनेला बाजुला करुन खाजगी मालमत्तेच्या स्वरुपात पृथ्वीच्या नकाशाची पुर्नरचना केली गेली. हा नकाशा ना तर पुर्ण स्वाभाविक होता ना तर पुर्ण राजकीय. हा तिसराच हायब्रिड नकाशा होता. कॅपटलीझमचा नकाशा. पृथ्वीला लाखो तुकड्यांत विभागुन मोजुन पहाणारा. मग सुरुवातीला ज्यांना जसे शक्य होते तसे त्यांनी जमिनी विकत घ्यायला सुरुवात केली. लाखो वर्षे एखादी स्वतंत्र राहिलेली जमिन एकदमच कुणाच्या तरी मालकीची झाली. मालकाने तिच्यावर निरनिराळे प्रयोगही सुरु केले. मग आले ते लेटकमर्स. त्यांनी आगोदरच्या मालकांडुन जमिनी दामदुपटीने विकत घेतल्या आणि जमिनीच्या डेटाचे आणखी गुंतागुंतीचे प्रयोग सुरु केले. ह्या इथनं पाच वर्षांनी हायवे जाणार आहे? वाढवा किंमती. ह्या खेड्यात शहराचा हा भुभाग विस्तारीत होउ शकतो? वाढवा किंमती. ह्या इथे बाजरी पिकतेय तिथे खाली सोन्याचे साठे आहेत? वाढवा किंमती.

अ‍ॅसेटसच्या किंमती वाढत्या राहिल्या. लोकांना कागदी पैश्यांवर विश्वास असेलच असे नाही, ते बँकेत पैसे ठेवतात. काही लोकांना बॅंकेवर विश्वास असेलच असेल असे नाही, ते लोक सोने विकत घेतात. काही लोकांना सोन्यावर विश्वास असेलच असे नाही. ते लोक जमिन विकत घेतात. लोकांना जमिन ही सर्वोच्च क्वालीटीची गुंतवणुक भासते पण जमिनीची मालकी ही अशीही फिक्शनल संकल्पना आहे. अ‍ॅसेटच्या किंमती ह्या पेपराच्या नोटाइतक्या आणि सोन्याच्या विटांइतक्याच कृत्रिम आहेत. पण हे सोप्या भाषेत कुणाला कधी समजाउन सांगता येत नाही आणि क्लासिक अर्थतज्ञांना ते मान्य होत नाही, त्यामुळे अ‍ॅसेटस महागतच राहिले.

आता जग फार प्रगती करणार आहे ह्या सबबीखाली आलम दुनियेतल्या मालमत्तेच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढल्या. जगभर अ‍ॅसेटस महाग झाले. ते आणखी महागही होउ शकत होते अगर जग प्रगती करते तर. पण भांडवलशाहीचे आपले असे काही वाईट गुण असतात ज्यामुळे तिची वाढ कमी होउ शकते, थांबु शकते. भांडवलशाहीची वाढ खुरटी होउ लागली कि मग भविष्यातल्या नफ्यांच्या शक्यता कमी व्हायला लागतात, ते तसे झाले म्हणजे अ‍ॅसेटसच्या किंमती कमी होउ लागतात. जग आता प्रगती करु शकत नाहीये हे जर पुर्णत स्पष्ट झाले तर अ‍ॅसेटसच्या, जमिनींच्या किंमती धडाधड कोसळु लागतात इतक्या की काही जमिनी पुन्हा स्वतंत्र होउन जातात.

२००८ साली अमेरीकेत अ‍ॅसेटसच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढल्याने जगभर आर्थिक अरिष्ट कोसळले होते. ह्यावेळी अ‍ॅसेट्सच्या किमती वाढविण्यात जगातल्या सगळ्या देशांचाच समावेश आहे. आता काय होईल हे सांगायला कुणा विशेषज्ञाची गरज उरली नव्हती. 'अ‍ॅसेट बबल' आता कधीही फुटु शकत होता.

(लिखाणातुन)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

अस्थिरता आली की जमिनीच्या किंमती कोसळतात. - युद्धाची चाहूल,
- जवळच सुरू झालेला ज्वालामुखी,
- पाण्याची पातळी वाढू लागली की बेटावरच्या जमिनी,
- अशांतता,दंगली वाढणे,
- तिकडून जाणाय्रा मार्गास एक पर्यायी मार्ग उपलब्ध होणे,
- उत्पादनात घट किंवा ते उत्पादन नाकारले जाणे
- अवर्षण सातत्य.
- रोगराई
- नवीन हाइवे जवळून गेल्याने शांततेचा भंग, हॅाटेलचे गिह्राइक कमी होणे, नैसर्गिक नाविन्यात खोट येणे, देऊळ असल्यास लोकांना तो देव नकोसा वाटणे अथवा पर्यायी दुसरे दैवत सापडणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यात कथा काय आहे? हे तर (बहुधा) वास्तव आहे. (अ)वास्तव असेल तर कथा होईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0