निनाद पवार यांच्या कविता

संकल्पना

निनाद पवार यांच्या कविता

- Ninad Pawar

शहराच्या हवेलीत राहणारा
तीन रात्र खाल्लेला म्हातारा
खुंटीवरचा काळा कोट घालून
जडावलेले खांदे सावरून
जुनी दाढी घेऊन
एका टेबलावरचा काळा चष्मा लावून
कपाटातली टोपी घालून
सतरा दिवसांचे पेपर घेऊन
रोज पार करायचा एक रस्ता
घड्याळाइतका वेळ त्याजवळ नव्हता
थोडा जास्तच होता असं तो म्हणायचा
एका म्हाताऱ्याकडे होती एक पिशवी
पावसापाण्यासाठी एक छत्री
चेहरा नांगरलेला व्यथांनी
बाकं भुंकायची त्याच्यावर
माणसं दात ओठ खायची
मनगटं वळायची दिवसाची त्यामागून
एका म्हाताऱ्याला पहायचा होता शुक्र दुपारी
ह्या रस्त्यांवर जे व्हायचं ते लिहून घ्यायचं होत काळ्या पेनानं
एवढ्याचाच माफक अर्ज होता सरकारकडे
त्याला कोणीच थांबवलं नव्हतं निघताना
नोकराने साफ केलेले बूट चमकत होते फक्त
एक म्हातारा डबा उघडून जेवायचा दुपारी
जसं घर खायला उठायचं
तसं खुलेआम चारचौघातही वाटायचं
शहराच्या आधीपासून राहायचा इथे तो
म्हणून शहराच्या आधीपासून तो परका होता

एक म्हातारा अनेक दिवस जागा होता
अनेकांच्या डोळ्यातून वाहायची त्याची गोष्ट
मग अनेकजण दिसायचे त्यासारखेच

---

रात्र बेसुमार वाढलीये
दरवाजा किंचितसा कललाय
माठातलं पाणी वाहून गेलं नसलं तरी हळूहळू झिरपतंय
एक पेंटिंग आणलंय अनेकदा बघितलेलं
नि आता त्याची गोष्ट कळलीये
ते कुठे लावायचं हे तिला विचारून ठरवू
रस्ते निघून जाण्यापूर्वी ती परतलीये निमुटपणे
दाराजवळच्या बल्बखालचं काही स्पष्ट दिसत नाही तिच्या डोळ्यात
रिकाम्या पॅसेज मध्ये फक्त तिच्या अंगाची सावली पसरलीए.
मी दिलेली कॉफी न घेताच ती आत गेली
तेव्हा गॅलरीतून काहीवेळ आपण पांढुरके ढग पाहून घेतले
प्रत्येक मजल्याचे जिने चढत एक एक खिडकी गच्चीपर्यंत जाऊन आलीये
हेही आताच दिसलय
या वेळी तिच्या कुलूप लावलेल्या घराची आठवण का यावी?
तिच्या घरात बसायला बेसुमार झाडांची छायाही नाही
तिच्या घरात टेकायला भिंतही नाही
पंखा बंद करायचा राहून गेलाय
अर्धा घोट पाणी ग्लासात कालपासून राहिलंय
ते कुंडीत टाकल्यावर अर्ध्या घोटाचे तीन फुलं येतील
खाली पडलेल्या पानांना टाळून जायची सोय आहे इथे
इथल्याच हॉस्पिटल मागून रेल्वेचा आवाज येतो
तिथे एक जास्वंदाचं झाड आहे रुळांच्या शेजारी
त्यापलीकडे प्लॅटफॉर्म आहे
आजसारखी ती परत आलेली तेव्हा आम्ही तिथून चालून आलो होतो
इथे पहाट आहे सांगायला काय संपतय नि काय सुरु होतंय
फार न बोलता ती येऊन बसलीये समोर, काही न सांगण्याच्या विचारात
घरात उरलेली उन्हे तशीच पाठ करून त्याविषयी लिहिण्याचा बेत आहे

यावेळेस इमारतीच्या पाठीवरले रंग चंद्राखाली काय काय लपवतात हे त्यांनाही माहितीये.

---

नवीन जागी सगळे ओळखू लागलेत
तरी रात्री झोप येत नाही
तसं या शहरात वेगळं काय आहे? असं एका हॉटेल मधला वेटर म्हणाला
आणि परत पाणी ओतू लागला
सूर्य मावळला होता तेव्हा मी आसपास फिरून आलो
तरी खिशात दुमडून ठेवलेल्या कागदात बघून
त्याने मला तोच प्रश्न विचारला
टेबलावर चहा रिकाम्या नजरेनं ठेवत ते तो तिथेच ठेऊन निघून गेला
रस्त्यांवर उरलेली गर्द माणसांची टोळी
घरं शोधत होती
हा कुठला भ्रम होता?
बसच्या पायऱ्या उतरतानाचे पाय
नि एका तळ्याकाठी असलेल्या लॉजचे जिने चढतानाचे पाय हे दोन्ही एकच होते
फक्त हेतू वेगळा होता.
त्यांची दिशाभूल केली कोणी
तरी आपण हरवणार नाही इतके पक्के मनात वसलेले रस्ते कधीतरी खुडून जातीलच
या इथे समोर एक गडद निळी खुर्ची आहे
त्यावर बसून खिडकीतून पक्ष्यांपाठोपाठ
माणसांनी जपलेल्या प्रार्थना हवेत जाताना दिसतात
चंद्राला टेकून चांदणं पाहता येईल इतका उजेड आत पसरलाय
इथे परदेशी स्वरांनी वस्ती वसवली
ती जाऊन त्यावर कोणी शेती केली
कोणी राजवाडे नि फॅकट्रया बांधल्या
इथली तटबंदी आता काही उपयोगाची वाटत नाही लोकांना
कि नाही काही काम एका बाजूला ठेवून दिलेल्या तलावाचं
मित्रांशी होणाऱ्या ओळखी गोळा करत करत तसा दिवस संपतच आलाय
ही फार साधी गोष्ट नाहीये इथे
एक निश्चल पानगळ सुरू असताना अंधाराचं सावट पसरतं
तेव्हा हळूहळू न पटणारे दिवे कुठलं गाणं ऐकत असतात?
मुक्कामात पाहिलेली लेणी नि धबधबे
ती कोरताना कोणी तिच्यासारखं रडवेलं झालं असेलच
तसं हे शहर खूप छोटं आहे
असं ह्या लॉजचा गडी म्हणाला होताच

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet