‘इनसाइड द एम्प्टी बॉक्स' - चित्रं आणि शब्द आणि चित्रकार-लेखक प्रभाकर बरवे

कलांच्या सहवासाने मनाची श्रीमंती वाढते, मन अधिक समृद्ध होते ह्याचा अनुभव नुकताच घेतला. मुंबईतील NGMA येथे भरवलेले ‘इनसाइड द एम्प्टी बॉक्स - प्रभाकर बरवे यांच्या मूळ चित्रांचे प्रदर्शन’ बघितले आणि वाचलेदेखील. काही व्यक्ती ह्या निव्वळ कलावंत असतात तर काही त्यांच्यातील माणसासह कलावंत असतात. प्रभाकर बरवे यांचं दुसर्‍या प्रकारात सामावलेलं ह्या रुपाची त्यांच्या चित्रांतून-डायर्‍यांतून भेट झाली.

एकेका टप्प्यावरची चित्रं आणि अधून-मधून अडकवलेली डायर्‍यांची पानं... कलावंताचं आयुष्य त्याच्याच शब्द आणि कलाकृतींतून थेट बघण्याचा विलक्षण अनुभव! त्याबद्दल संयोजकांचे, बोधना आर्ट्स आणि क्युरेटर जेसल ठक्कर यांचे खास आभार...

मूळ चित्रांचं प्रदर्शन बघणे हा अनुभव जितका आनंददायी तितकाच चुटपुट लावणाराही ठरला. असं का व्हावं? एकदा-दोनदा-तीनदा बघताना पहिल्यावेळी बघितलेलं दुसर्‍यावेळी पुन्हा बघितलं जातंच असं नाही, नकळतपणे ते निसटतं. त्याचप्रमाणे काही भाग पुन्हा बघून मनात पक्का होतो. तिसर्‍या वेळी बघताना पहिल्या-दुसर्‍या वेळी बघितलेलं बाजूला रहातं आणि जे मनापासून आवडलेलं असतं त्याकडे धाव घेतली जाते. आणि एवढं होऊनही चौथ्यांदा पुन्हा एकदा जाऊन तिन्ही वेळचं निसटलेलं बघण्याची ओढ मनाला लागते, म्हणजेच पुन्हा पहिल्यापासून बघावंसं वाटतं. ह्याला हावरटपणा म्हणावा की अजून काही?

प्रभाकर बरवे ह्या कलावंताने अत्यंत प्रामाणिकपणे आयुष्यभर ज्याचा निदिध्यास घेतला आणि हयात असेपर्यंत मनातल्या कल्पना कागदावर उतरवण्याचं जणू व्रतच अंगिकारलं ते चित्रमय आयुष्य केवळ ‘काही वेळा’ बघून आपल्याला उमगेल असं वाटणं हा भ्रम आहे. हे जरी खरं असलं तरीदेखील अशा कलावंताच्या निवडक कलाकृतींची अभ्यासपूर्ण, कलात्मक मांडणी केलेलं प्रदर्शन पुन्हा-पुन्हा बघावसं वाटत असेल तर त्यात फारसं आश्चर्य वाटण्याजोगं काहीही नाही.
मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमधल्या ह्या प्रदर्शनाविषयीच्या लेखांचे प्रदर्शन बघण्यापूर्वी आणि प्रदर्शन तीनवेळा बघून आल्यानंतर, अशाप्रकारे दोनदा केलेल्या वाचनाने पुन:प्रत्ययाचा आनंद आणि निसटल्याची हळहळ एकाचवेळी मनात भरून राहिली.
आपण ना चित्रकार ना चित्रकलेचे अभ्यासक तरीही ही इतकी ओढ का बरं वाटत असावी? प्रभाकर बरवेंविषयी, त्यांच्या चित्रांविषयी वेगळं का आणि काय वाटतंय?

प्रदर्शनाच्या सुरूवातीला त्यांच्या जन्म ते मृत्यू अशा ठळक नोंदी, फोटो, त्यांनी जमवलेली विविध रेषा-आकार असणारी झाडांची पाने, विद्यार्थी असतानाची स्केचेस, ते नोकरी करत असताना मान्य केलेली त्यांची डिझाईन्स व त्यावरील मान्यतेचे शिक्के (एका ठिकाणी निकम ह्या नावावर काट मारून बरवे असे लिहिलेले दिसले),
त्यांची दोन स्केचबुक्स... (मी त्यातील प्रत्येक पान उघडून, त्यातील चित्रांचा भाग समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी तिथे असलेले व्यवस्थापक मला विचारू लागले की तुम्ही आर्टिस्ट आहात का? मी म्हणाले नाही. मग ते म्हणाले तुम्ही रिसर्चर आहात का? म्हटलं, नाही. तर ते हसून म्हणाले, तुम्ही इतक्या बारकाईने बघताय की मला तसं वाटलं खरं!)
सर्वांत वरच्या मजल्यावर ‘कोरा कॅनव्हास’ ह्या पुस्तकातील काही भागांचे मराठी आणि इंग्रजी वाचन ऐकता येते. इथेच मध्यभागी त्यांच्या डायर्‍यांची मुखपृष्ठे काचेआड लावलेली आहेत. काही डायरीज संपूर्ण, प्रत्यक्ष वाचायला मिळाल्या.

खरंतर डायरी लिहिणे हा अत्यंत खाजगी आणि वैयक्तिक लेखन-प्रकार. ह्यामुळेच कलावंताच्या मनातील विचारांचे ‘दस्तावेजीकरण’ त्याच्याही नकळत घडते. आणि त्यांचे पुस्तक-रुपातील प्रकाशन तसेच प्रदर्शनातील मांडणी अभ्यासकांना-रसिकांना त्याच्या कलेचा अभ्यास वा आस्वाद अधिक चांगल्या प्रकारे करण्यास / घेण्यास ‘भाग पाडते’. होय, भागच पाडते.

मार्च १९८३ च्या डायरीतील घड्याळाची गोष्ट वाचल्यानंतर त्यांच्या चित्रांतील घड्याळाचं महत्त्व लक्षात आलं. पन्नास वर्षांपूर्वी वडिलांना भोसले सर्कशीच्या तिकीटावर लकी ड्रॉमध्ये मिळालेलं लंबकाचं, दर तासाला टोले देणारं जपानी घड्याळ. त्या घड्याळाचं घरातल्या सदस्याप्रमाणे असणं, त्याची काळजी घेणारे आजोबा आणि त्या घड्याळाचा शेवट. एका चित्राचं शीर्षकच मुळी - ‘होमेज टू क्लॉक’!
त्याच डायरीत नुकत्याच दिवगंत झालेल्या त्यांच्या मित्राचं, भास्कर कुलकर्णी यांचं व्यक्तीचित्र वाचायला लिहिलेलं आहे. ह्या कलावंत मित्राचं आयुष्य वाचताना दोन विलक्षण भावनांचं मिश्रण आपल्या मनात होतं. थेट लेखकाच्या हस्ताक्षरातून वाचता येण्याचा आनंद आणि अत्यंत गुणी असूनही जगण्यातील घटनांमुळे ह्या मित्राच्या आयुष्याची झालेली वाताहत यामुळे ते वाचताना मन हळहळत राहिलं.
दुसर्‍या एका डायरीत परदेशातील वास्तव्यात आलेले अनुभव. तिथले हवामान, निसर्गाची बदलती रुपं (त्यांच्या रेखाटनांसह), वेगवेगळ्या चित्र-दालनांना दिलेल्या भेटी, भेटलेले स्त्री-पुरूष चित्रकार, निव्वळ चित्रकारिता हेच उदर-निर्वाहाचे साधन असल्याने चित्र-साहित्याच्या खरेदीवर सूट देणारे दुकान आणि मधून-मधून घरून आलेल्या पत्रांचा, त्यांच्या लेकीला (सोनालीला) संस्कृत विषयात मिळालेल्या बक्षिसाचा उल्लेख! एका कविबरोबर झालेली चित्राची व कवितांची देवाण-घेवाण आणि त्याला साजेशी खास टिप्पणी की ‘कविता आणि चित्रं यांचं मोल कसं ठरवणार?’
काचा आणि जाळ्या यांनी बंदिस्त असलेल्या घरात चुकून शिरलेल्या मधमाशीला घराबाहेर जाण्यासाठी मदत करताना, तिची सुटण्यासाठी व लेखकाची तिला सोडवण्यासाठी झालेली धडपड वाचताना तो प्रसंग नजरेसमोर साकारला गेला. त्या अनुभवाविषयी ते लिहितात, `तिला बाहेर पडताना आपले बोट दिले व ती त्यावर चढून बाहेर गेली, चावली नाही. याचा अर्थ मी आत्तापर्यंत तिला मदत करतोय हे तिला समजले असणार.' या अनुभवातून जे जाणवले त्याबद्दल ते म्हणतात, ‘माझ्याही स्वातंत्र्याच्या कल्पना त्या काचेपर्यंत सिमित असाव्यात. काचेतून बाह्य जग दिसते म्हणजे फक्त दृक्भ्रम. पण ते ते जग नसते. काचेच्या पलिकडे स्वातंत्र्य आहे. त्याकरता प्रथम बाहेर न जाता आणखी आत आल्यावरच पूर्णपणे बाहेर जाऊन स्वतंत्र होता येईल. अगदी आत येणे म्हणजे स्वत्वाच्या जवळ येणे.’

1

त्याच डायरीत `बिटवीन लिफ ॲंड स्नेल' हे चित्र तयार करताना काढलेली रफ स्केचेस कॅनव्हास १, कॅनव्हास २ असे उल्लेख आणि ११ जून १९८८ ला ते पूर्ण झाल्याची नोंद वाचल्यानंतर ते चित्र पुन्हा बघितलं गेलं आणि ‘तो’ दिवस चित्रकाराच्या समाधानी मुद्रेसह नकळत डोळ्यांसमोर साकार झाला.
‘नवी विटी नवं राज्य’ अशा शीर्षकाच्या डायरीत लिहिलेले आहे ---
‘६ एप्रिल १९६१ मध्ये
प्रथम बनारसला गेलो होतो
तेथे पाच वर्षे राहिलो
माझ्या आयुष्यातील नवे पर्व
असेच एप्रिलमध्ये सुरू होते
कारण जन्म मार्चमध्ये झाला.'

2

चित्रकलेचे मूर्त आणि अमूर्त असे मुख्य प्रकार असतात हे एव्हाना ठाऊक झालेलं आहे. मूर्त चित्रांमधील वस्तू, माणसं, इतर प्राणी, पक्षी, झाडं, फुलं-पानं, निसर्ग, आकाश, स्थळं आणि या सर्वांचा आपसातील संबंध हे चित्रांत असेल तर चित्रं बघणं आवडतं कारण आपण काय बघतोय ते निदान समजतं. अमूर्त चित्रांतील अमूर्तपण समजत नाही, त्यातील रेषा-रंगांचं महत्त्व वा वेगळेपण समजत नाही. परंतु, त्यांचे आकार व आपसांतील साहचर्य आणि आपल्या मनाला जो जाणवेल तो अर्थ ही प्रक्रियाही आनंददायी असते. तरीपण, मूर्त चित्रांइतकं ठळकपणे अमूर्त चित्र मनात उरतंच असं नाही.
मूर्त-अमूर्ततेचं मिश्रण हे प्रभाकर बरवेंच्या चित्रांचं वैशिष्ट्य आहे. तसंच त्यांचे डायर्‍यांमधून लिहिलेले शब्दरूपी आणि सचित्र चिंतन हे दोन्ही त्यांच्या चित्रांमध्ये काय बघायचं आणि काय बघायचं नाही ह्याची समज जागी करणारं आहे. त्यामुळे आपण बघतोय ते काय आहे आणि त्यातून काय जाणवतंय ह्याची काहीशी स्पष्टता आपली आपल्याला येणं हे फक्त अमूर्त चित्रांपेक्षा जास्त आनंददायी आहे.

एक डायरी टिपण असे आहे --
त्यात आधी सफरचंदाचे रेखाटन आहे त्याखाली ते लिहितात, `मी काय शोधतो आहे? ह्या अत्यंत वेगळ्या वातावरणात मी कसा (React) वागतो? मी जे शोधतो आहे ते म्हणजे प्रत्येक वस्तूमात्रात दडलेले त्याचे अमूर्तपण. हे फळ वरकरणी दिसते तितकेच नाही. त्याला आतल्या बाजू आहेत. (Substance) आहे. ते सर्व रंग - आकार - अवकाश यांतून शोधावयाचे आहे.'
दुसऱ्या एका टिपणात ते लिहितात --
'प्रत्येक घटना दुसरीपेक्षा थोडीतरी निराळी असते. वरवर सारख्या दिसणार्‍या, भासणार्‍या घटना, व्यक्ती, स्थळ, काळ हा प्रत्येक घटक वेगळा असतो. फक्त प्रवाहीपणामुळे तो एकच भासतो - सारखा दिसतो.
कलेच्या संदर्भात हाच विचार मांडता येईल - आकार, रंग, सारखे वाटणारे पण एकेक घटक म्हणून निरनिराळे असतील. माणसाचे आयुर्मान स्थिर असल्यामुळे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काल ह्या परिमाणात आपण सर्व घटनांचा व घटकांचा विचार करतो. त्यामुळे घटना त्याचत्याच वाटतात. पण प्रत्येक क्षण वास्तविक स्वतंत्र असतो. ह्या स्वतंत्रपणाचा खोलवर शोध घेणे हेच ते सूत्र आणि त्यातील स्वातंत्र्याचा (freedom) अधिक खोलवर विचार करणे हे आपले काम. हे सर्व दृश्यमाध्यमातून करणे.'
त्यांच्या परदेशी वास्तव्यात एका परदेशी चित्रकाराशी झालेल्या संवादानंतर त्यांनी लिहिलं आहे --
`चित्र - समीक्षा - वाङ्मय - चित्रातील अमूर्त आशय अशा अनेक अंगांनी आमची (डग मार्टीन-चित्रकार यांच्याबरोबर) चर्चा झाली. बहुतेक लोक चित्र पहात नाहीत. तर नुसताच अर्थ शोधत असतात हे आमचे दोघांचेही मत झाले.'

अशी टिपणे वाचल्यानंतर जेव्हा आपण त्यांच्या वेगवेगळ्या चित्रांमधली वेगवेगळी सफरचंदं, घड्याळं, ग्लासेस, इमारती, पक्षी, झाडं, पानं बघतो तेव्हा त्यातील वेगळेपण बघायला आपण नकळत उद्युक्त होतो. ‘होमेज टू क्लॉक’ ह्या चित्रांतील आडव्या घड्याळावर पडणारी पानं, ‘द ग्रामोफोन’ ह्या चित्रातील गोळा झालेली पानं आणि ‘अ कप ऑफ टी ऑन लॅंडस्केप' चित्रातील एकमेव पान ह्यांतील साम्य-भेद शोधायला लागतो. त्याचप्रमाणे ‘द थर्ड ॲपल’, ‘ब्ल्यु ऑरा’ आणि इतर अनेक चित्रांमधील सफरचंदं वेगवेगळी दिसू लागतात.
चित्र काढताना मोठ्या होणार्‍या वस्तू आणि लहान होणार्‍या वास्तू या दोन्हीतील फरक, `चित्रामध्ये वस्तू संपूर्ण, ७-८ बाजूंनी दाखवता येते, परंतु वास्तूचा एखादा भाग दिशा, कोन, पातळ्या लक्षात घेऊन दाखवता येतो' हे वाचल्यानंतर ‘द शेल्टर’ मधली छत्री आणि इमारत, ‘द ऑर्फन ॲण्ड काईट’ मधील इमारती आणि इतर काही चित्रांमधील छत्री हे सगळे वेगळे दिसू लागते.
अशाच प्रकारे कात्र्या, एन्व्हलप्स, सुर्‍या, पेंटब्रशेस अशा स्थिर वस्तू आणि अस्थिर पक्षी, प्राणी, प्रतिबिंब, वेगळ्या दिसतात.

3

ह्या चित्रकाराने डायरी-लेखनातून जो स्वसंवाद साधला तो म्हणजे शब्दांतून स्वत:ला समजून घेणे आणि रेखाटनांचा सराव करणे. मनात येणारे विचारही दृष्यमय!
परदेशातील वास्तव्यात असतानाच्या एका डायरीत असे आहे ---
वरती तार्‍याच्या आकाराचे फांदीचे रेखाटन, त्यानंतरच्या पानांवर तशी बरीच रेखाटने आणि त्यासंदर्भातील शब्द -- `ही एक तार्‍यासारखी सुकलेली फांदी रानांत मिळाली. तेथे डांस (भयंकर आहेत) ड्रॉईंग करू देईनात. तेव्हा उचलून स्टुडिओत आणली. पण त्या फांदीचा सारांश अजून पकडता आला नाही.'
दुसऱ्या काही डायऱ्यांतून लिहिलेले --
'समोरचा कॅनव्हास हेच माझे मन. ह्या मनात विचार येतात. डाव्या बाजूने उजव्या बाजूला जातात. विचारांच्या मालिकेचा हा प्रवास पाहताना मात्र त्या प्रत्येक विचाराचे अमूर्त रूप म्हणजे दृष्यशुध्दता, मनाच्या अवकाशात जाणवणारी..'
`समजत आहे पण उमजत नाही - अशी काहीतरी अवस्था आहे. मन शांत व्हावयास हवे. सरळ आकारांचा अभ्यास करावा हे उत्तम.'
एका डायरीत वरती टिंबं, रेघा आडव्या दिशेत काढल्या आहेत आणि खाली लिहिलंय (लिहिण्यास वा रेखाटण्यास काही न सुचल्याने हे लिहिले असणार) -
`ह्याला म्हणतात काही करून जागा भरणे.'

परदेशात असताना घरची आठवण येते तीही चित्रमय. ‘याडोमधले हे वृक्ष आणि गणपतीपुळ्याचे वृक्ष काय फरक आहे? हेही तसेच शांत - निमूट उभे, वातावरणाचे साक्षीदार. दूरवरून समुद्राच्या आवाजाऐवजी येथे ट्रॅफिक ऐकू येतो. पण तो समुद्राचा आवाज आहे अशी कल्पना केली की आणखी काय पाहिजे? एक वृक्ष एका डोळ्याने माझ्याकडे सतत पहात असतो.’

दुसर्‍यांदा हे प्रदर्शन बघताना नुकतीच ओळख झालेली चित्रकार मैत्रीण सोबत होती. तिचे उत्स्फूर्त उद्गार होते, ‘कॅनव्हासचा इतका भाग कोरा ठेवणे ह्यासाठी कमालीचे धाडस लागते.’ आणि आम्ही प्रत्येक चित्रांतील मूर्ततेसह असलेला मोकळा, अमूर्त अवकाशही बघू लागलो.
कोर्‍या कॅनव्हासचे उभे-आडवे असे एक तृतीयांश भाग कल्पून त्यानुसार मुख्य चित्रांची केलेली मांडणी, एकाच आकारात केलेली तीन वेगवेगळी रेखाटने - व्हायोलिन, झाडाचे पान आणि स्त्रीची छाती, सोनालीचा फ्रॉक व त्याचे रेखाटन, अल्फाबेट्स ऑफ नेचर, पक्षी, मासे, घड्याळ व त्याचे स्पेअर पार्ट्स या सार्‍यांचा सराव केलेलं स्केचबुक हे सगळं तिने मुद्दामहून लक्षात आणून दिलेले बघताना आपल्या नजरेतील बदल सुखावणारा ठरला. वेगवेगळ्या रिकाम्या खोक्यांमधील वेगवेगळे आकारही सार्थ दिसू लागले.

एका डायरीत ते लिहितात,
`मी ‘जो’ नाही तो होऊ शकणार नाही
मी ‘जो’ आहे - तोच राहणार...'

‘नवी विटी, नवे राज्य’ ह्या डायरीच्या शेवटचे पान -
‘अबोध मनातल्या ह्या रेषाही
तितक्याच अबोध
परंतु गिरवताना हात
मोकळा होतो
मन मोकळे होते
गाठी सुटतात
धागे सरळ होतात...’

ह्या प्रदर्शनातून भेटणारी प्रभाकर बरवे ही चित्रकार व्यक्ति आपण कोण आहोत, आपण काय काढतोय हे जर यथार्थ स्वसंवाद आणि रेखाटनांतून सांगत असेल तर त्यांचे लेखन पुन्हापुन्हा वाचावे आणि त्यांची चित्रे पुन्हापुन्हा बघावीत असे वाटू लागले तर त्यात नवल ते काय?

तळटीप: इथल्या डायर्‍यांतील मोठा करून भिंतीवर अडकवलेला जो भाग `कोरा कॅनव्हास ' ह्या पुस्तकातला नाही त्यांचे फोटो काढणे निषिद्ध असल्याने सगळे एकतर लक्षात ठेवा, आपल्याकडच्या वहीत टिपून घ्या, नाहीतर वाचा आणि विसरा ह्यामुळे कितीतरी भाग विसरावा लागला ही बोच मनात उरली...

चित्रा राजेन्द्र जोशी - ७.३.२०१९

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाचतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अप्रतिम

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद, शुभांगीताई!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका डायरीत ते लिहितात,
`मी ‘जो’ नाही तो होऊ शकणार नाही
मी ‘जो’ आहे - तोच राहणार...'

हे माझ्याही दैनंदिनी मध्ये लिहीलं होतं. ती मी (सामुहिक वाचन झाल्यामुळे) फाडून जाळून टाकली. खरंच दैनंदिनी एवढी सार्वजनिक असते का?
असेल तर खूप मॅनिपुलेट करून दिली असेल. नाहीतर अतिवैयक्तीक विचार नाही ती दैनंदिनी कसली?
पण वर्णन छान आहे. आवडलं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

मूळ दैनंदिनी वाचनासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत-- त्यात जे आहे ते प्रत्येक कलावंताने वाचावं आणि त्यावर मनन-चिंतन करावं असं भरपूर साहित्य त्यात आहे-- चित्रकलेचा रियाज कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ आहेत त्या.. अति वैयक्तिक काहीही नाही..
वर्णन आवडल्याचं सांगितल्याबद्दल धन्यवाद!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१००%
मलाही डायरी हा प्रकार अतिशय आवडतो पण मी फार जपून लिहीते.
मनात फार खळबळ माजली तर डायरीत लिहून काढते व लगेच ती पाने फाडुन फेकून देते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रदर्शन रविवार १० मार्चपर्यंत चालू आहे.

इथल्या डायर्‍यांतील मोठा करून भिंतीवर अडकवलेला जो भाग `कोरा कॅनव्हास ' ह्या पुस्तकातला नाही त्यांचे फोटो काढणे निषिद्ध असल्याने सगळे एकतर लक्षात ठेवा, आपल्याकडच्या वहीत टिपून घ्या, नाहीतर वाचा आणि विसरा ह्यामुळे कितीतरी भाग विसरावा लागला ही बोच मनात उरली...

डायर्‍यांमधला जो भाग प्रदर्शनात समाविष्ट आहे तो आणि बरव्यांचं इतर काही लिखाण संकलित आणि संपादित करून एका पुस्तकात समाविष्ट केलं आहे. पॉप्युलर प्रकाशन आणि प्रदर्शनाचे संयोजक 'बोधना' ह्यांचा संयुक्त सहभाग असलेल्या ह्या पुस्तकाला वसंत आबाजी डहाकेंची प्रस्तावनाही आहे. त्यातला काही भाग इथे वाचता येईल.

पुस्तकाची सवलतीत नोंदणी इथे केली जाते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वरील माहिती बरोबर आहेच, शिवाय ह्या प्रदर्शनाचा कैटलॉग काही महिन्यांनी प्रकाशित होणार आहे, त्यात इंग्रजी भित्तीडायरीतील भाग समाविष्ट असेल अशीही माहिती मिळाली..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वरील माहिती बरोबर आहेच, शिवाय ह्या प्रदर्शनाचा कैटलॉग काही महिन्यांनी प्रकाशित होणार आहे, त्यात इंग्रजी भित्तीडायरीतील भाग समाविष्ट असेल अशीही माहिती मिळाली..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मटाच्या मागच्या रविवारी आलेल्या पुरवणीत एक लेख आला आहे. आवासचे प्रसिद्ध शिल्पकार करंदिकर यांचे मामा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0