साक्षात्कार

फर्रुखाबादच्या बस स्टँडवर गेलो तर कायमगंजला जाणारी बस गच्च भरली होती. मी कसाबसा आत शिरलो आणि उभा राहिलो. माझ्यानंतरही लोक चढत राहिले. कल्पना करता येणार नाही, इतक्या प्रमाणात बस आणखी आणखी भरत गेली. पुढच्या दरवाजाने कंडक्टर आला. एकेकाला पोस्टाच्या स्टँपच्या आकाराचं तिकीट देऊ लागला. मी मागच्या दरवाजाशी. गर्दीतून हा इथे कसा येणार, हा प्रश्न मला सुचतो आहे, तेवढ्यात तो उतरला आणि मागच्या दाराने शिरला. त्याने माझ्याकडे पाहिलं.

उंची सामान्य, अंगकाठी किरकोळ, वर्ण सावळा. एकूण वावर सर्वसामान्यासारखा. असा मी.

तरी माझ्या तोंडावर त्या कंडक्टरला काहीतरी सापडलं. माझ्या जवळच्या सीटवर बसलेल्या एका खेडुताला त्याने खेकसून, बखोटं धरून उठवलं. तो बिचारा उभा झाला. मग कंडक्टर मला म्हणाला,

"बैठिये साबजी."

मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. पण काही वेगळं, खटकण्याजोगं झालंय, असं वाटणारा मी एकटाच होतो. शरमलो; पण ताठपणे 'नाही' म्हणायला जमलं नाही. बसलो.

त्या क्षणी सुरुवात झाली आणि थोड्याच काळात माझा साक्षात्कार पूर्ण झाला: या देशात, या देशाच्या उभ्या आडव्या पसाऱ्यात मी एक विशेष अधिकार असलेला, विशेष सुरक्षितता असलेला प्राणी आहे. या देशातली तमाम जनता माझे हे विशेष अधिकार सांभाळण्यास बांधील आहे. जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत मला कसली चिंताच नाही! माझी चिंता या जनताजनार्दनाला.

कारण मी उच्चवर्णीय आहे. आणि ते माझ्या थोबाडावर छापलेलं आहे. ते मी पुसून टाकूच शकत नाही. मी किंवा माझ्या उच्चवर्णातला दुसरा कुणीही तोंड वर करून जेव्हा म्हणतो, 'मी जात मानत नाही, मी जात सोडली आहे,' तेव्हा मी किंवा तो स्वतःच्याही नकळत ढोंग करत असतो. मी जात सोडली, तरी काय फरक पडतो? मला घेरून राहिलेला सारा समाज माझी जात मानत असतोच. माझ्या जातीचा मान मला मिळेल, त्याच्यासकट इतरही तसा मान मला देत राहतील, याबद्दल दक्ष असतोच. या हमीचा, या इन्शुरन्सचा तुरा डोक्यावर बाळगत 'मी नाही त्यातला,' असं नाटक करणे म्हणजे पराकोटीचं ढोंग होय. जात सोडणे ही माझ्यासाठी, माझ्यासारख्यांसाठी एक चूष आहे. फुकटची चैन आहे.

"शहरात चला," हा संदेश आंबेडकरांनी म्हणूनच दिला! कारण शहरात, त्यापेक्षा मुंबईसारख्या महानगरात 'देशीयता' पातळ होत जाते. जात ठळक राहत नाही. स्वतःला समाजाच्या तळचे मानणारे जरी अजूनही लोकल गाडीत आत, सीटवर न बसता दरवाज्यात बसत असले; तरी गाडीत, बसमध्ये जनरल सीटवर बसलेल्याला अशा कारणासाठी उठवण्याचा विचारही कोणी करू शकत नाही.

हा झाला माझा अनुभव. मला जागा देण्यासाठी ज्याला उठावं लागलं, त्याचा अनुभव कसा असेल त्या क्षणाचा? गोष्ट लहान असेल, पण व्यक्तीच्या प्रतिष्ठेची आहे. आत्मजाणिवेची आहे. तरी मला बिलकुल वाटत नाही की त्याच्या आत्मप्रतिष्ठेला धक्का बसला असेल. त्याला ते सवयीचं असण्याची शक्यता जास्त. 'आपलं नशीब खराब म्हणून आपण त्या क्षणी तिथे बसलो होतो,' असंच सुलभ लॉजिक त्याच्या मनात उमटलं असणार.

आणि तो थोडा जरी संवेदनशील असेल तर?

तर निश्चित त्याच्या आत्मजाणिवेवर ओरखडा उठला असेल. त्याला मेल्याहून मेल्यासारखं झालं असेल. 'हा उघड अन्याय आहे, पण आपण त्याविरुध्द काहीही करू शकत नाही,' या विचाराने त्याला असहाय्य वाटलं असेल. त्याच्या जगण्याच्या ऊर्जेवरच घाव बसला असेल. अशा अनुभवांचा एकंदर परिणाम म्हणून त्याची एकंदर इच्छाशक्ती दुबळी होत गेली असेल. 'ही स्थिती कधीही उदभवू शकते आणि उद्भवली की निमूट उठण्यापलिकडे आपण काहीही करू शकत नाही', हे उमजल्यावर तर आत्मविश्वास पांगळाच होऊन जाणार.

एका बाजूने माझ्यासारख्याला सुरक्षिततेचा, हक्कांचा विमा देणारी व्यवस्था दुसऱ्या कोणालातरी असुरक्षित बनवत असते. त्याचा आत्मविश्वास चिरडत असते. "शक्यतो नकोच 'त्यांच्यात' जाणं. नकोच ते अपमान होण्याचं टेन्शन सतत बाळगणं." अशी त्याची वृत्ती होत गेली, तर त्याला दोष देता येईल का?
हे मी सर्वसाधारण व्यक्तीविषयी बोलत नाही. 'मी जर तिथे असतो तर' या शक्यतेच्या विचारातून बोलतो आहे. आज मी जिथे आहे, तिथे माझ्या आत्मप्रतिष्ठेला धक्का लागू नये म्हणून मला क्षणोक्षणी टवकारून असावं लागत नाही. लागलं असतं तर माझं काय झालं असतं, या विचारातून बोलतो आहे.

माझा अनुभव उत्तर प्रदेशातला, महाराष्ट्रात असं होणार नाही; असं कोणी म्हणतंय का? इथली उदाहरणं द्यायची गरज आहे का?

आता विचार करा. वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आणि काँग्रेसबरोबर समझोता का करू शकत नाही?

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आणि काँग्रेसबरोबर समझोता का करू शकत नाही?

कारण ऐकीव / गॉसिपनुसार भाजपशी 'समझौता' (म्हणजे काय ते समजून घ्या) आधीच झाला आहे. Smile

बाकी पुण्यात सर्रास येणारा अनुभव म्हणजे - तुमचं उच्चवर्णीयत्व तुमच्या चेहेऱ्यावर / वेशभूषेवर वगैरे छापलेलं असलं तर बस कंडक्टर तुमच्याशी सौजन्यानं वागतात. पुण्यात बसमध्ये (किंवा इतरत्रही) सौजन्य ही बसण्याच्या जागेपेक्षा अधिक दुर्मीळ गोष्ट आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सम आर मोअर ईक्वल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

तुमचा अनुभव विशेष आहे।
वंचितचं म्हणाल तर सध्या भाजपात गोळा झालेले मित्रपक्ष हीच मोठी भाजपाला डोकेदुखी ठरतेय - एबिपीमाझा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असं वाटणारा मी एकटाच होतो. शरमलो; पण ताठपणे 'नाही' म्हणायला जमलं नाही. बसलो.

यात तुमची चूक नाही. अनपेक्षित प्रसंग समोर आल्यास बहुसंख्य लोकांची स्थिती अशीच होइल. पण परत जर असे घडले, तर मात्र तुम्ही ठाम कृती कराल की नाही त्या माणसाला त्या सीटवर बसण्याचा समान हक्क आहे.
.

तिथे माझ्या आत्मप्रतिष्ठेला धक्का लागू नये म्हणून मला क्षणोक्षणी टवकारून असावं लागत नाही. लागलं असतं तर माझं काय झालं असतं, या विचारातून बोलतो आहे.

अचूक.
भित्र्या सशासारखं, मूक पाखरांसारखं जीणं. Sad हा पैलू तर आहेच. पण स्वत: तसं जीवन जगण्यासाठी माणूस जरा तरी तयार होतो. पण आपल्या लेकरांनाही तसच हाडतूड केलेलं पाहून मात्र आतडं तुटत असेल. मुलांच्या भविष्याबाबत , आशा वाटत नसेल तर माणूस केविलवाणा होइल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0