कोलकात्यातले निर्वासित - भाग २

संकल्पना

कोलकात्यामधले निर्वासित - भाग २

मूळ लेखक - मानस रे

भाषांतर - ३_१४ विक्षिप्त अदिती

मागच्या भागाचा दुवा

बाबांच्या पावलावर पाऊल टाकत डावरीदासुद्धा काँग्रेसवाले होते. पण त्यांना काही पावलं पुढे राहायचं होतं. त्यामुळे काँग्रेसची नवी आणि जुनी अशी शकलं होण्याआधीपासूनच ते 'मूळचे' काँग्रेसवाले होते. ते 'मूळचे' काँग्रेसवाले कारण मूळचं तेच खरं असतं. गांधींसोबत ती विचारधारा खुंटली.

डावरीदांचे दोन देव होते - महात्मा गांधी आणि दिलीप कुमार. आणि एकच व्यसन होतं - लॉटरी. ते आमच्या कुटुंबात आले तेव्हा दीड वर्षांचे होते. बंगालच्या महादुष्काळाचं वर्ष, १९४३. त्यांचं कुटुंब गुराख्यांचं होतं. त्यांच्या आईनं त्यांना बाजारात विकलं - पाच रुपयांना. वडिलांनी तोवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आजीनं त्यांना विकत घेतलं, म्हणून त्यांचं नाव डावरी (Dowry). आई फुकटात आली.

डावरीदा वडिलांबरोबर शाळेत जात. ते स्वतःला केअरटेकर म्हणवत, कधीच शिपाई किंवा ऑर्डर्ली म्हणवून घेत नसत. भद्रलोकपणाचा एक भाग असण्याच्या कल्पनेनं त्यांना झपाटून टाकलं होतं; कदाचित ह्याच कारणामुळे ते 'मूळचे' काँग्रेसवाले होते. आपण शहरातल्या थोरामोठ्यांपैकी आहोत हे माझ्या आईला सांगणं त्यांनी कधीही सोडलं नाही; आणि हे शहर म्हणजे तुमची चाराण्याची निर्वासित वस्ती नाही, हेही म्हणायचे.

आई त्यांना गरम पोळीला साय लावून खायला देऊन, बडबड बंद करायला सांगत असे. ते विषय बदलून लॉटरी आणि थोडक्यात आपल्याला लॉटरी कशी लागली नाही, ह्याबद्दल बोलत.

सणासुदीला हापशीचे १०० 'पंप' आजीला लागू असत. तिच्या पाच रूपयांवरचं व्याज वसूल करण्यासाठी ती केसांना छानसं तेलबिल लावून हापशीखाली न्हाऊन घेत असे. अधूनमधून मुखानं 'देव तुझं भलं करो, पोरा' असं काही सुरू असे. त्यामुळे डावरीदा पंप मारताना मोठ्यानं देवांचा जयजयकार करत असत. पुढच्या जन्मात कदाचित त्यांची गुंतवणूक दुप्पट होण्याची आशा असेल. कधी शंभराच्या आत डावरीदा थांबले तर आजी तक्रार करायची, "रांडेच्या, तुझ्यासाठी वट्ट पाच रूपये मोजले का नाही मी?"

डावरीदा एक दिवस गायब झाले. आमच्या कानांवर आलं की मनूदाचा भाऊ, जंगलीबरोबर ते मुंबईला गेले. (जंगलीचं नाव सिनेमाच्या नावावरून पडलं.) वडिलांची काळजी लवकरच कमी झाली. आईनंही तक्रार बंद केली. आजीही हिंदी सिनेमांना नावं ठेवून काही काळानंतर शांत झाली, "काय माहीत ते माकड त्याला कुठे घेऊन गेलं!" डावरीदांची आई इतरांना समजावण्यात गुंतली, "काळजी नका करू, तो शेवटी परत येईलच." आणि माझ्या वडिलांना म्हणत असे, "दादा, तो परत आला की त्याला चांगला हग्या दम भरा … खरंच!"

बाबा तशा तयारीत होतेच. डावरीदा परत आल्याचं ऐकलं तेव्हा ते व्हरांड्याच्या तीन पायऱ्या उतरून खाली आले, लुंगी वर उचलून गाठ मारली. डावरीदा प्रिंटेड शर्ट घालून आले, पुढे येऊन बाबांच्या पाया पडले. बाबांनी त्यांचं झिपरं डोकं जोरात धरलं आणि एक थोतरीत दिली, आणि थांबले.

"तू त्याला विकत घेतलंस का? मग का मारलंस त्याला?", आजीनं डावरीदांची बाबांपासून सुटका केली. ग्लिसरीन घातल्यासारखे अश्रू त्यांच्या गालांवरून ओघळले. आजीनं डावरीदांना हापशीपाशी खेचून नेलं. त्याचं डोकं हापशीखाली घालून स्वतःच पंप मारायला सुरुवात केली.

१०

त्या रिकाम्या खोलीत, ग्रीनीच एनसायक्लोपिडीया वगळता फारसं काही वाचण्यासारखं नव्हतं. तो तिथे विसंगतच होता. सीमेपलीकडून आलेल्या घरातल्या प्रत्येक वस्तूसारखी ह्याचीही एक गोष्ट होती. खरं तर ह्या कसर लागलेल्या, क्वचितच वाचल्या जाणाऱ्या पुस्तकांची आमच्या घराच्या इतिहासात विशेष जागा होती. फाळणीच्या आठवणींत अडकलेल्या पुस्तकांबद्दल एवढ्यांदा बोललं जायचं की माझ्या मोठं होण्यात ह्या पुस्तकांना स्थान होतं. त्या हिंस्र दिवसांत माझे आईवडील सीमा पार करत असतानाही आईचं शिलाई मशीन आणि बाबांचे हे एनसायक्लोपीडिया वाचवण्याच्या प्रतिमा माझ्या मनावर कोरल्या होत्या. शिलाई यंत्र आणि एनसायक्लोपीडिया, घरगुतीपण आणि ज्ञानाच्या ब्रिटिशांकडून आलेल्या दोन प्रतिमा, आता राजकीय भूगोलाच्या हाणामारीत अडकल्या होता. इतरही काही गोष्टी टिकल्या, आईच्या लग्नातली कॉट, एक आरसा (त्याची काच बेल्जियन आहे, असं आई वारंवार सांगत असे), स्वयंपाकघरातलं कपाट, एक पुस्तकांचं शेल्फ ज्यावर एनसायक्लोपीडिया नंतर विसावला, ते नंतर आलं.

घराच्या आत
घराच्या आत : पुस्तकांचं कपाट आणि फाळणीत प्रवास करून आलेली आईची कॉट

त्या पुस्तकांपलीकडे आमच्याकडे इंग्लिश व्याकरण आणि लेखनाची चिकार पुस्तकं होती. ती नमुना म्हणून बाबांना दिली होती. नेल्सनचं व्याकरणाचं पुस्तक मूळचं म्हणून वडिलांनी ठेवलं होतं, पण पी. के. डे-सरकार ह्यांचं उपयुक्त होतं. इंग्लिश भाषेबद्दल गोडी निर्माण करण्याचा बाबांनी बराच प्रयत्न केला. ते बंगाली पुस्तकांतले उतारे आम्हाला वाचून दाखवत, भाषांतरासाठी. त्यांतले बरेच लेखकांनी स्वतः आठवणी-स्वरूपात लिहिलेले होते. 'आमच्या गावच्या आवारात एक आंबा होता', वडील हे वाचताना भावनाशील होत. मग आपलं नाक गमछानं (पंचा) पुसत; एरवी त्याचा उपयोग डास वारण्यासाठी होत असे.

एक दिवस पी. के. डे-सरकार बाबांना भेटायला आले. ते म्हातारे, कृश होते. त्यांचे बारीक कापलेले, कुरळे केस विरळ होत चालले होते. त्यांना जाड चश्मा होता, चंदनाच्या खोडाच्या रंगाची चश्म्याची फ्रेम होती. त्यांचे हात थरथरत होते. बाबांनी त्यांना मी केलेली भाषांतरं दाखवली. त्यांनी मान हलवली, माझ्या हस्ताक्षराचं कौतुक केलं आणि मला 'barber'चं स्पेलिंग विचारलं. प्रसिद्ध माणसाला मी पहिल्यांदाच भेटलो.

'शिक्षे'चा भडीमार, बंडखोरीतून आलेला थकवा आणि इतर काही पर्याय नसल्यामुळे मी त्या जीर्णशीर्ण एन्सायक्लिपीडियातून स्वतःलाच शिकवण्याचा प्रयत्न सुरू केला - युरोपातली पूर्व-मध्ययुगातली शहरं, अमेरिकेवर मिळवलेला निर्घृण विजय, ओट्या-सोप्यांच्या गल्ल्यांचं बनारस, सौरघड्याळं, इंजिनांचा इतिहास. बंगाल आणि बिहारच्या सीमेपर्यंत मी अनेकदा प्रवास केला. तिथे नेणारी इंजिनं जुन्या काळातली होती. स्वच्छ हवेचा अभाव, लाकूडतोडीचा व्यवसाय, लाकूडतोडीचा आवाज, पाईन आणि देवदारांची सळसळ. कुठंही मुळं नसण्याची भावना दाटून येई.

हिंसा - ११

स्थानिक मारामाऱ्या, एकमेकांतला वैरभाव आणि भेदभाव वगळता पन्नास आणि साठच्या दशकाची मुख्य कल्पना सामाजिक सलोख्याची होती. १९७०मध्ये हे अगदी मुळापासून आणि अगदी झटकन बदललं. नेताजी नगरमधल्या हिंसेचा पहिला दिवस मला लख्ख आठवतो. माझ्या प्रिलीम परीक्षेनंतरची, सप्टेंबरमधली दुपार होती. आई नवरात्राच्या पूजेत होती. मी आधीच्या वर्षांच्या परीक्षांचे पेपर सोडवत, जेवण वाढण्याची वाट बघत होतो. घराबाहेरून काही विचित्र आवाज आणि पावलं ऐकू आली. मी खिडकीतून बाहेर डोकावून बघितलं. वीसेक लोक शांतपणे चालत होते. त्यांच्या हातात सुरे, नळीच्या बंदुका, भाले आणि लोखंडी कांब होते. त्यांच्या चेहऱ्यांवरून, त्यांच्या मनात काही चाललंय हे स्पष्ट दिसत होतं. ते भरभर आणि सावधपणे चालत लवकरच नजरेआड झाले. आम्ही नक्षल आणि काँग्रेसवाल्यांच्या मारामाऱ्यांबद्दल काही काळ ऐकून होतो. त्यांनी मुख्य रस्त्याची, वस्तीच्या पलीकडची बाजू घेतली. त्याचा आमच्यावर फार परिणाम झाला नाही. आम्ही दुसऱ्याच राजकीय प्रदेशात होतो. दुपारी मी जे बघितलं, त्याचा मी फार विचार केला नाही.

काही तासांनंतर, संध्याकाळच्या सुमारास, कुजबूज होत बातमी पसरली; चार तरुणांनी, म्हणे ते नक्षल होते, आमच्या वस्तीवर बाँब आणि बंदुकांनी हल्ला केला. पलीकडे मोठी रिकामी जागा होती, ती त्यांनी ताब्यात घेतली होती. त्यांच्यापेक्षा आमचे लोक भारी पडले आणि आमच्या बाजूच्या नेत्यानं बारक्या सुरीनं त्या चौघांचे गळे चिरले.

ह्या घटनेनंतर काही दिवसांतच, वस्तीची दंगलीची बाजू दिसायला लागली. केंद्रीय राखीव पोलिस, सीआरपीच्या धाडी नेहमीच्या झाल्या. किती चटकन लोकांना ह्या वास्तवाची सवय होते! किती चटकन संपूर्ण वस्तीला लढाईची कळा आली! मारामारी होती मार्क्सवादी (CPI-M) आणि काँग्रेसमध्ये, पण ती लवकरच दोन वस्त्यांमधली मारामारीचंही रूप घेऊन आली.

१२

आम्हाला राजकारण नवीन नव्हतं. लहानपणापासून मी स्थानिकांच्या बारक्या रॅल्या गल्लीतून जाताना बघितल्या होत्या. पुरुष एकसुरात घोषणा देत, मुलं पुढे असत आणि त्यांच्यातला मोठा त्यांच्या मागे; त्याचे हात मागे बांधलेले असत, नजर आकाशाकडे असायची, जणू खुदीराम ब्रिटिश फासाला मिठी मारायला निघाला आहे! आमच्या शाळेच्या दिवसांत आम्ही मोठा गट बनवून, शिक्षकांच्या रोषाकडे दुर्लक्ष करत अत्यंत निरागस घोषणा देत जायचो - "आमचं नाव, तुमचं नाव, व्हिएतनाम, व्हिएतनाम" (आमार नाम, तोमार नाम, व्हिएतनाम, व्हिएतनाम). नकाशात व्हिएतनाम कुठे हे मला माहीत नव्हतं. त्यानं काही फरकही पडत नव्हता, कारण जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी व्हिएतनाम होतं. रक्त सळसळत होतं; जगाची घडी विस्कटण्याचं ते स्थळ होतं.

आता जे काही घडत होतं, ते खूप निराळं होतं. त्या दिवशी केंद्रीय राखीव पोलिस खूप लवकर आले. कोणाचं लक्ष नसताना मी घरातून पळालो. शाळेची शेवटची परीक्षा जवळ आली होती. मला पकडलं तर, माझं पूर्ण वर्ष वाया जाईल, असं मी स्वतःला सांगितलं. आम्ही तिघांनी एकत्र सुरुवात केली. लवकरच एकेक वाढत आमचा सहा लोकांचा गट झाला. पोरं आणि स्त्रिया दिव्यांच्या खांबांवर आवाज करून पोलिस कोणत्या दिशेला जात आहेत, हे कळवत होत्या. आम्ही आवाजाच्या दिशेनं जात होतो. मी आतापर्यंत कधीही असं काही केलं नव्हतं. ही कमतरता मला भरून काढायची होती. चालण्याचा आवाज सगळ्या दिशांनी येत होता. आम्ही नशिबाच्या हवाल्यावर चालत होतो. आम्ही मुख्य रस्त्याला पोहोचलो आणि प्रभागाबाहेरची बस पकडली. आम्ही खूप वेळानं परत आलो आणि आमच्या लक्षात आलं की आमचे सगळे प्रयत्न वाया गेले आहेत. म्हणे, पोलिसांची तुकडी आली, एक फेरी मारली आणि दहा मिनिटांत परत गेली. ह्या वेळेस ते व्हॅनमधून बाहेरही पडले नाहीत.

मी घराजवळ आलो आणि बघितलं तर आई गल्लीच्या टोकाशी उभी होती. एरवी मला उशीर झाला तर ती आवारात उभी राहून मला ओरडण्यासाठी तयार असायची. पण आज सगळंच वेगळं होतं; तिनं माझ्याकडे बघितलंही नाही. जेमतेम आवारात शिरली आणि शांतपणे बाबांना म्हणाली की जिवाशी चाललेले खेळ ती आणखी सहन करू शकत नाही. ती चिंताक्रांत दिसली, फिकुटलेली.

जादवपूरच्या तुरुंगातून परत आल्यावर माझी रवानगी न्यू अलिपोरच्या नातेवाईकांकडे झाली. त्या काळात तो कोलकात्याचा नवश्रीमंत भाग होता. दणकट, सुंदरशी घरं, मोठाल्या खोल्या, बैठकीच्या खोल्यांतले रेडिओ, चकचकीत सायकलींवरची मुलंमुली, आकर्षक आणि तरुण स्त्रिया - वयात येताना ह्याचं प्रतिबिंब माझ्यावर पडलं. हे खरं आयुष्य, असं मी मानलं.

शाळेच्या शेवटच्या परीक्षांआधी मला घरी आणलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर मी बापूजी नगरच्या शाळेत परीक्षेसाठी गेलो. नेताजी नगरच्या मोठ्या मैदानाशी बस पोहोचली तेव्हा तिथे एका कोपऱ्यात लोकांचा मोठा जमाव दिसला. मी खिडकीतून डोकावून पाहिलं तर रक्ताच्या थारोळ्यात चार धडं दिसली, डोक्याशिवाय. एकदाचा मी मोठा झालो.

१३

प्रेसिडन्सी कॉलेजचा इंग्लिश विभाग तेव्हा निश्चितच उच्चभ्रूंचा बालेकिल्ला होता. मी त्यांच्यातला एक नव्हतो. माझे तेव्हाचे मित्र इतर विभागांमध्ये होते. मला पहिल्यांदाच माझ्या पार्श्वभूमीची जाणीव झाली. डी. के. सेन - ब्रिटिशांनी बढावा दिलेले यशस्वी उद्योजक - त्यांच्या मुली माझ्यासाठी परक्याच राहिल्या. पोलिटिकल करेक्टनेस अजून यायचा होता आणि त्यांच्याकडे माझ्यासाठी वेळ नव्हता. मी माझ्या उणिवा झाकून, बहुतेकदा माझं गावठी धैर्य दाखवण्यात मग्न होतो. इच्छा-आकांक्षा आणि दारिद्र्य ह्यांच्या कात्रीत मी सापडलो होतो. मी कधी जिन्यावरून त्यांच्यापैकी एकीला नळावर पाणी पिताना बघायचो. डोकं झुकलेलं. तिचे ओठ त्या रंगीत प्लास्टिकच्या पेल्याला टेकत नसत. तिच्या बोटांत रूमाल फडफडत असायचा. पाणी खाली जाताना तिच्या गळ्याची नाजूक हालचाल. तिनं तिचा पेला हलकेच झटकून कोरडा केला आणि आपल्या बॅगेत टाकून निघून गेली. पुढे त्या 'संभाषितां'बद्दल बोलत, डेनव्हरमध्ये इंग्लिश शिकवत, सांस्कृतिक अभ्यास करत, इंग्लिशमधलं राजकारण चव्हाट्यावर आणत, आणि त्याच दमात न्यू यॉर्कमधल्या टॅक्सी ड्रायव्हरांच्या संपाला पाठिंबा देत आणि फिलाडेल्फियातल्या नोकरीबद्दल बोलत. माझ्या लाजलज्जेच्या कल्पना. त्यांचं रूपलावण्य. दोन्ही बाजूंच्या त्रुटी.

नेताजी नगरात सुरक्षिततेसाठी बदलत्या भूगोलाचा मागोवा ठेवणं गरजेचं होतं. आज सुरक्षित असलेला रस्ता उद्या असेलच असं नव्हतं. माझा कॉलेजप्रवेश आणि मुख्य रस्त्याचा अस्त एकाच वेळी झाला. आमचं अवकाश अरुंद पण खोल होतं; त्यातली घराची सीमा वास्तवाशी भिडलेलं असणं गरजेचं होतं. तो मुख्य रस्ता होता. त्या प्रकारची हद्द आमच्याशी विसंगत नव्हती. आमची स्वप्नं आमच्या भवतालाशी तुलना करता किती अप्राप्य होती, गोंधळाची होती, ह्याची अमर्याद वीण म्हणजे तो मुख्य रस्ता होता. ते आमचं दडपवणारं 'वास्तव' होतं. जसं कोलकाता जवळ आलं तसा मुख्य रस्ता मागे पडला.

१४

रात्र पडायची. अनेक कानाकोपऱ्यांत रात्र दडून राहायची. शत्रूवस्तीतल्या गुंडपुंडांपासून रात्रीच्या अंधारात आमचं रक्षण करणाऱ्यांच्या शौर्याच्या चित्रविचित्र गोष्टी कानावर यायच्या. गावठी बनावटीचे बाँब आणि इतर शस्त्रं रहिवाशांच्या माहितीशिवाय त्यांच्या आवारातल्या झुडपांत लपवलेली होती. केंद्रीय पोलिस जेव्हा भागात विजेऱ्या घेऊन फेऱ्या मारायचे तेव्हा पोरं माडांवर चढून तिथेच अडकून राहायची. भलत्या वेळेस, उगाच नारळ पडायचा तेव्हा आम्हांला संशय यायचा. रात्री चालण्याचा बराच आवाज येत असे, कुजबूज आणि कधी धावणंही त्यात वाढायचं. एक गोष्ट अशीही होती की एकदा कानू उंच माडावरून पडला, पण मातीच्या ढिगाऱ्यावर पडून तो सुरक्षित राहिला.

वस्ती आकाराला येताना तिथल्या हिंसेचा सामाजिक रचनेवर परिणाम झाला; मुख्यतः एकत्रित पालकत्वाच्या रूपात. नेताजी नगराचं रूपांतर छावणीत झालं होतं. वस्तीचं सामाजिक भांडवल सगळ्या बाजूंनी वाहवत होतं, आणि वस्तीचं स्वतःचं काही अस्तित्व टिकणं कठीण होतं. ओळखीचे लोक अचानक अनोळखी झाले. खोका आमच्या घरापलीकडे काही घरं सोडून राहत असे; त्यानं एक दिवस कॉलेजला जाणं सोडून दिलं. दुपारच्या भर उन्हात तो एकदा गल्लीत छत्री घेऊन चकरा मारत होता. त्याला रामराम केल्यावर त्यानं दुर्लक्ष केलं. एकदा मला बघून तो थांबला. तो दुःखात दिसला आणि हळूच म्हणाला, "लैंगिक प्रेरणा जागृत झाल्यावर नवरा नवराच असतो - तो किती मिळवतो ह्यानं फरक पडत नाही." आणि पुन्हा चालायला लागला.

एक अफवा वारंवार येत असे की रात्रपाळीच्या रक्षकांनी हरिमोहनला दिवसा कान पकडून उठाबशा काढायला लावल्या. म्हणे, त्याला चौथीतल्या मुलीवर बलात्कार करताना पकडलं. हे धक्कादायक होतं. काहींनी ते बघितलं, सगळ्यांनी त्याबद्दल ऐकलं, पण कोणीही, अगदी आताही, त्याबद्दल बोलायला तयार नाहीत.

हरिमोहन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक होते. ते उंच, सावळे होते. आम्हांला शिक्षा करण्यासाठी मारण्याची वेळ वारंवार येत असे; तेव्हा ते शिपटी काढून आम्हांला बडवून काढत. त्याविरोधात तक्रार करून उपयोग नव्हता. ते वस्तीचा अविभाज्य अंग होते, थोरामोठ्यांना त्यांच्याबद्दल आदर होता आणि आम्ही त्यांना घाबरून होतो. एका वादळी सकाळची गोष्ट मला आठवते. त्या दिवसांत पाऊस कोसळत असे आणि जोरदार वादळं येत. त्या दिवशी वादळ शांत होत होतं आणि बातमी आली की शाळा उडून गेली आहे. आम्ही धावत तिथे पोहोचलो तर शाळेची दुरवस्था झाली होती. पत्र्याचं छत, कसर लागलेले लाकडी खांब, फळे, सगळं इतस्ततः पसरलं होतं. ह्या सगळ्या पसाऱ्यात हरिमोहन एका बाकावर बसले होते; हरवलेले, शून्यात नजर लावून. बाकड्यांवर आम्ही कोरलेल्या शिव्या, बंडखोरीखातर संध्याकाळच्या अंधारात आम्ही छपरावर मारलेले दगड, आणि अंगभूत खोडकरपणा हे सगळं निसर्गाचा प्रकोप बघून शांत झालं होतं. हरिमोहनचा चौकडीचा शर्ट ओळखीचा होता, त्यांच्या स्लिपर्स पण. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी अनोळखी होते. त्यांच्या नव्या रूपाचं काय करावं हे आम्हां पोरांना समजत नव्हतं. एका प्रकारच्या भीतीवर दुसऱ्या प्रकारच्या भीतीचं सावट आलं होतं. नवी भीती, अनिश्चिततेची भीती, जे कोणालाच घाबरत नाहीत असं वाटत असे त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेली भीती.

आमच्या वस्तीत स्वतःचे असे निर्वासित होते. शत्रूवस्तीतून निष्कासित केलेले राजकीय कार्यकर्ते. आम्ही आमच्या राजकीय पाहुण्यांची व्यवस्थित काळजी घेतली. एक दिवस त्यांच्यातले काही नाहीसे झाले. त्यानंतर केंद्रीय पोलिसांची मुखवटे घालून यायला सुरुवात झाली. भूमिगत हॉस्पिटल सापडलं, शस्त्रांचा उद्योग आणि लपण्याची वेगवेगळी ठिकाणंही. नेताजी नगर हळूहळू पडझड झाल्यासारखं दिसायला लागलं. केंद्रीय पोलिसांचं येणं कमी झालं आणि खून होणंही दुर्मीळ झालं. हळूहळू बसच्या खिडकीत बसून बाहेर बघणंही सुरक्षित झालं.

१५

माझ्या कॉलेजच्या शेवटच्या दिवसांत बाबा खूप आजारी पडले. मूत्रपिंडं निकामी झाली होती. घरातल्या सगळ्यांना हे माहीत होतं आणि त्याची भीती होती. बाबा हॉस्पिटलातून चार महिन्यांनी परत आले आणि पुन्हा पूर्वीसारखे झाले नाहीत. ते आणखी दोन वर्षं जगले. मला पैसा कमावण्यावाचून पर्याय नव्हता आणि मी जवळजवळ जगाच्या अंतापर्यंत शिकवण्या घ्यायला लागलो. मला कामात अजिबात रस नव्हता, फक्त महिन्याच्या शेवटी मिळणाऱ्या पैशांत होता. एकदा मी दसऱ्याच्या दिवशी शिकवणी घेत होतो तेव्हा त्या विद्यार्थ्याचे वडील कोलाकोलीच्या निमित्तानं माझ्या जवळ आले आणि कानात पुटपुटले, "तोमार ता काल हाबे" (तुला उद्या पैसे मिळतील). आपलं तोंड माझ्या डाव्या कानाच्या जवळ लावलं, मग उजव्या आणि मग पुन्हा डाव्या बाजूला. ते इतक्या सफाईदारपणे हे म्हणाले की ही रीत कानात पुटपुटण्यासाठीच तयार झाली, असं मला वाटलं.

वडील गेले त्या दिवशी आई खूप वेळ रडत होती. संध्याकाळी त्यांचा देह अंगणात ठेवला होता आणि अंत्यविधींची तयारी सुरू होती. मला आठवतं, ती बिछान्यावर पडली होती; अशक्तपणामुळे तिला बोलता येत नव्हतं; ती एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळली तसं एक पाऊल दुसऱ्या पायाला आधार देत होतं; तिनं तिच्या नातवासाठी भरतकाम केलेली गोधडी तिच्या हातावर होती. तिनं डोकं हलवलं आणि निःश्वास टाकला, जणू तिच्यासाठीही रस्त्याचा अंत झाला होता. तिनं हिरवी साडी नेसली होती; आता ती पांढऱ्या कापडाच्या ठाणातून काढलेली साडी नेसायला लागेल; तिची तुकतुकीत त्वचा; कोरडे, गुलाबी-जांभळे ओठ. तिचं शरीर गुंडाळीसारखं दिसत होतं. गरिबीचा मूर्तिमंत नमुना; तिची सासू, दीप्तीची मुलगी, स्वतःला ब्रिटिश अमदानीत खानदानी आणि उच्चभ्रू समजत असे; अठरा वर्षांची असताना विधवा झालेली, दोन मुलांची आई आणखी साठ वर्षं जगणार होती; काळजीपूर्वक आपलं वैधव्य मिरवणारी; माझ्या आईला झालेली सगळी मुलं; फाळणी; घराला आग लावल्यावर तिन्ही मुलांसकट, दोघांना कडेवर घेऊन पळणारी आई, मोठ्यानं तिचा पदर पकडला होता; ती तिच्या आई-वडिलांच्या घराच्या दिशेनं जाताना, वस्तीत अध्येमध्ये लावलेल्या आगी, आकाशाचा केशरी रंग; त्यात मिसळलेले दुटप्पी लोकांचे हाकारे; फाळणीनंतरची दोन वर्षं इतर नातेवाईकांसोबत राहावं लागलं ते उत्तर कोलकात्यामधलं झोपडीवजा घर; विचित्र किडेमकोडे, कोल्हे, साप आणि कुट्ट रात्री भरलेली नेताजी नगरमधली सुरुवातीची वर्षं; अधिकारीबाबूंनी बसवलेल्या हापशीपासून दहा मिनिटं चालून घरात पाणी आणणं; तेव्हा तिच्या पोटावर झोळण्यात पहुडलेला मी; शेजारणींशी गप्पा मारत निभावलेला शेजारधर्म; संध्याकाळचं ऊन खात आवारात बसणं; माझ्या वडिलांनी पिशवीतून मासे काढताना म्हणणं- "बघ छबी, माझ्याकडे काय आहे!" आणि तिनं ब्र न काढता ते रांधून वाढणं; तिनं दिवसभर मरमर काम केल्यावर वडिलांच्या तापदायक मागण्या (ते मुख्याध्यापक होते, ते म्हणायचे); मला थोबाडीत मारणारा कडक आणि फुटलेला हात.

वडिलांचं शव जळत होतं, मोठी हाडं फुटत होती, तसं कोलकाता लांबवर विरून जातंय असं वाटत होतं. मला माहीत होतं... काही दिवसांतच मला हे काम सोडून दुसऱ्या शहरात जाऊन काम शोधावं लागणार हे मला माहीत होतं. खरं तर मी चितेच्या वासापासून पळून जात होतो. नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात, ग्रेनाईटच्या भरभक्कम भिंतीशी उभं राहून निरर्थक आवाज आणि विमानतळापलीकडे पोहोचणाऱ्या प्रचंड अवकाशात मला नवी सुरुवात सापडली.

१६

पूर्व बंगालमधून येणाऱ्या लोकांनी आपलं बिऱ्हाड पाठीवर लादून आणलं होतं. आजूबाजूला होणाऱ्या वाढीचा अर्थ त्यांच्या दृष्टीनं आपलं स्थिरस्थावर होणं असा होता. आम्ही तयार केलेला भवताल आणि आमच्या बोलीभाषा हे आमच्या इतिहासाचा भाग होते. आम्ही पोरं ह्याच भवतालात मोठी झालो. त्यात एक सुप्त आकर्षण होतं, त्यातून आम्ही बाकीच्या जगाकडे, जगण्याच्या इतर पद्धतींकडे, शहराच्या इतर भागांतल्या झोपड्यांत राहणाऱ्या इतर निर्वासितांकडे दुर्लक्ष करून होतो. सुसंगती, विस्कळीतपणा, वळणं, बोलीभाषा, वाक्प्रचार, आमच्या मुळांबद्दलच्या गोष्टी, ह्यांतून आमची नव्या जागेशी मुळं जुळत होती, आमच्या भावनांचा साचा बनत होता आणि आम्ही त्यात अलगद, आनंदात गुरफटत होतो. कोलकात्याचं आम्हांवर होणारं आक्रमण थोपवण्यासाठी आम्ही आमचं महत्त्व, जगातलं आमचं स्थान मिळवत होतो. आमच्या पूर्वजांचा आशीर्वाद असलेली पिढीजात घरं फाळणीच्या वावटळीत सुटत होती. मागे वळून पाहता वाटतं, फाळणीच्या ह्या 'आपद्ग्रस्ततेची जाणीव' पूर्णतया मिटवता आली नाही तरी किमान टाळण्यासाठी कदाचित अप्पादुराई ज्याला 'स्थानिकता तयार होणं' म्हणतात ते आमच्या बाबतीत घडत होतं.

घराच्या आत
सीतानाथचा गोठा होता तिथे ही इमारत आता आहे.

सत्तरच्या दशकातल्या हिंसेनं हे सगळं उद्ध्वस्त केलं; आमचा 'गृहपाठ', आणि सतत धास्ती वाटणं नेहमीचं झालं. दोन्ही प्रकारच्या हिंसेच्या वाटा आणि कारणं निराळी होती. पण लोकांनी पुन्हा हा निसर्गनेम समजून त्यात पडलेला हा खंड 'राक्षसी, अविचारी भ्रम' (monstrously irrational aberration) म्हणून बघितला. संशयाचं धुकं सगळीकडे भरलेलं होतं - आपल्यापेक्षा बलवान शक्तींनी आपल्यापासून 'घर' हिरावून घेतलं आहे. आम्ही आमचं बळी पडणं दबक्या आवाजांत साजरं केलं; एकमेकांना मारलं गेलेल्यांच्या गोष्टी सांगितल्या, 'आमच्या' नळीच्या बंदुका आणि गावठी बाँब बनवण्याच्या गोष्टी. गंमत म्हणजे, पहिल्यांदाच आम्हांला इतिहासाचा भाग असल्यासारखं वाटलं.

हे सगळं उलटंपालटं केलं अनेक वर्षं सुरू असलेल्या हिंसेनं. हिंसा सुरू असताना तिथेच राहणारे आणि त्या दरम्यान जागा सोडून परत आलेले, आम्हां सगळ्यांचंच 'स्थान' नाहीसं झालं होतं; किमान आपली जागा म्हणून आम्ही जे समजत असू, ते नाहीसं झालं होतं. कोलकाता हेच आमचं भागध्येय झालं; अपारदर्शकतेला, हातचं काही राखण्याला काही जागा उरली नाही.

सरकार -१७

विरोधाभास असा की सत्तरीच्या दशकात सातत्यानं विकासकामं सुरू ठेवण्याचे प्रयत्नही होत होते. पहिल्यांदाच सरकारनं धरसोडवृत्ती सोडली आणि आमच्याबद्दल गांभीर्यानं विचार केला. कोलकाता महानगर विकास प्राधिकरणाच्या (Calcutta Metropolitan Develpoment Authority - CMDA) रूपानं जागतिक बँकेनं तिथे प्रवेश केला; रस्ते सुधारले, भूमिगत मलनिःसारणाची सुविधा उभारली, प्राथमिक शाळा नव्या इमारतींमध्ये हलवल्या, बारक्या-अरुंद गल्लीबोळांतही दिव्याचे खांब आले, वस्तीत पहिलं पोस्ट ऑफिस आलं.

डावी आघाडी १९७७मध्ये सत्तेत आल्यावर विकासकामांनी वेग घेतला. डाव्यांच्या सत्ताग्रहणाच्या सुरुवातीच्या वर्षांत नेताजी नगरसारख्या निर्वासित वस्तीनं (शहर आणि बाहेर ह्यांच्या हद्दीवर असलेली वस्ती) परंपरा आणि रचना ह्यांचा पक्षाच्या शहरी आणि ग्रामीण धोरणांमध्ये वाटाघाटीची महत्त्वाची भूमिका पार पाडली. नेताजी नगर ह्या बाबतीत विशेष नशीबवान होतं कारण स्थानिक नेता प्रसांता सुर दहा वर्षं नगरविकास मंत्रालयाचा प्रमुख होता. वस्ती सोडून जाणाऱ्यांपैकी अनेक परत आले आणि त्यांतल्या काही तरुणांना सरकारी नोकरीरूपात बक्षिसी मिळाली. एकूण, वस्तीची आर्थिक परिस्थिती सुधारली कारण साठ-सत्तरच्या दशकांत शाळेत जाणारे आता नोकऱ्या करायला लागले होते आणि घरोघरी कमावत्या मंडळींत एकाची भर पडली होती.

१९७८ साली पदव्युत्तर शिक्षणासाठी मी नेताजी नगर सोडून नवी दिल्लीला गेलो. तेव्हापासून, अधूनमधून काही वेळा मी आमच्या जुन्या घरी गेलो आणि काही काळ तिथे राहिलो. मी तिथे जातो तेव्हा एक विचित्र भावना दाटून येते. ती आता खूपच विभागलेली, विखंडित जागा आहे, अगदी प्रत्येक बाबतीत. जागेच्या बाबतीत (अपार्टमेंटमध्ये राहणारे आणि न राहणारे), आणि काळाच्या बाबतीत (जे स्मरणरंजनात रंगतात आणि त्यात काही रस नसलेले). भाषेच्या बाबतीतही ती एकसंध वस्ती राहिली नाही; (बंगालीच्या वेगवेगळ्या बोलीभाषांसोबत आता बंगाली न बोलणारे लोकही तिथे आहेत). वर्गाचा विचार करता, आहे-रे आणि नाही-रे ही विभागणी सहज दिसते. हे जसं शेजाऱ्या-शेजाऱ्यांत दिसतं तसंच घरांघरांतही दिसतं.

नेताजी नगर गुंतागुंतीचं, शिक्षित आणि शहरी बनत गेलं, तसं त्याचं वेगळेपण आणि सुरुवातीची मिथकं गळून पडली. घरं स्वयंपूर्ण बनली आणि वस्तीतल्या पायाभूत सुविधा कोलकात्याएवढ्याच चांगल्या झाल्या. वस्तीचं ऐक्य त्यामुळे कमी व्हायला लागलं. स्थानिकांना विकासाची फळं चाखायची होती पण वस्तीच्या सामाजिकतेपासून ते फटकून होते. वस्तीचा नवा आराखडाही कदाचित अधिक महत्त्वाचा होता - दिपेश चक्रबर्ती ज्याला 'परिणामाचं ध्येय' म्हणतात - उत्पादन आणि हेतूच्या आधुनिकतेचं जाळं - आता स्थानिकांच्या आयुष्य-जगात विणलं गेलं आहे. वस्तीची कमिटी हा समाजाचा केंद्रबिंदू होता, त्यापासून ते आता दूर गेले आहेत. कमिटीनं आता नोकरशाहीची भूमिका घेतली आहे आणि लोकांवर नजर ठेवण्याचं पक्षाचं काम ती करते. एके काळी स्थानिक शाळा वस्तीच्या नैतिकतेचा केंद्रबिंदू होत्या; तोही आता नाहीसा झाला आहे. अशा शाळांत मुलांना पाठवणं कमीपणाचं समजलं जातं. बहुतेक इंग्लिश माध्यमाच्या, खाजगी संस्था कुत्र्याच्या छत्र्यांसारख्या उगवल्या आहेत; शहराच्या कानाकोपऱ्यांत स्कूलबसेस दिसतात.

ह्या काळात स्थानिकांना त्यांच्या जमिनीचा कायदेशीर ताबा मिळाला. १९८९मध्ये सरकारनं आमच्याशी त्या जागेचा ९९ वर्षांचा भाडेकरार केला. दहा वर्षांनंतर, १९९९मध्ये सरकारनं आम्हांला आपापली जागा विकण्याची अधिकार दिला; भवतालावर त्याचा मोठा परिणाम झाला. बांधकाम-सम्राट तिथे शिरले आणि सत्ता-पैशाचं नवं जाळं त्यांनी वस्तीत निर्माण केलं. चार दशकं खेड्यासारखं दिसणारं नेताजी नगर नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला अचानक उंच व्हायला लागलं. रोज नवं बांधकाम होताना दिसतं. अपार्टमेंटची आधुनिकता लगेच दिसते आणि त्याचा परिणाम म्हणून शहराच्या वेगवेगळ्या भागांतले नवे लोक तिथे यायला लागले. भारताच्या इतर भागांतल्या भाषा बाजारात, बस स्टॉप किंवा फोन बूथवर ऐकू येण्याचं आश्चर्य वाटेनासं झालं. नेताजी नगर बहुसांस्कृतिक झालं.

सत्तरच्या दशकाच्या मध्यातच सरकारी मदत विकासकामांच्या स्वरूपात वस्तीपर्यंत पोहोचायला लागली होती आणि वस्ती कधीची नोकरशाहीला सरावली होती. जमिनीचा मक्ता मिळाल्यावर आम्ही समकालीनतेच्या वादळात फेकलो गेलो, वसाहतवादोत्तर शहरीकरणाचा समकालीन चेहरा. दुकानांची फॅन्सी नावं होती; 'शुगर अँड स्पाईस'; हे वाण्याचं दुकान, 'जॉइंट एन्ट्रन्स' हा कोचिंग क्लास, तशीच एसटीडी बूथं आणि अगदी सायबर-कॅफेसुद्धा आले. कोलकात्याशी बरोबरी करायची म्हणजे स्थानिकपणाच्या पलीकडे जाणं आलंच. फाळणीनंतर उभ्या राहिलेल्या वसाहतींमध्ये ही प्रक्रिया सुरू होती; नेताजी नगर हा काही अपवाद नव्हता.

वस्तीतल्या बहुतेकांकडे राजकीय यंत्रणेची भाषा होती; ती भाषा सरकारमुळे जोडली गेली; त्यातून सामाजिक बंध घडले. सरकारशी झगडा त्याचा एक भागच बनला. सरकारी यंत्रणा मुळासकट बदलणं हा त्याचा उद्देश नव्हता; उलट तिचा भाग बनणं हे उद्दिष्ट होतं. कायदेशीररीत्या वा एरवी विकासकामांचा फायदा मिळण्याची मागणी पूर्ण झाल्यावर डाव्यांच्या आक्रस्ताळेपणात सहभागी होण्याची लोकांना गरज राहिली नाही. जनता जशी मोठ्या समाजाचा भाग बनत गेली तशी पूर्वीच्या राजकारणाची पद्धत कालबाह्य ठरली आणि आम्हांला हवासा 'भद्रलोक' शिक्काही मिळाला. आता डावे भूतकाळातून प्रेरणा शोधतात - वस्तीच्या सुरुवातीच्या काळातले कष्ट आणि यश विस्मरणात जाऊ नये; काँग्रेसनं वस्तीकडे केलेलं दुर्लक्ष आणि विकासकामांत डाव्यांनी निभावलेली भूमिका ह्याबद्दल ते बोलतात. अपेक्षेनुसार, तरुणांनी ह्या आवाहनांना प्रतिसाद दिला नाही, त्यांनी ह्यांतलं काही अनुभवलेलं नव्हतं; महत्त्वाचं म्हणजे आजचे प्रश्न, अडचणी सोडवण्यासाठी ह्याचा काही उपयोगच नव्हता. ही पोकळी दुसऱ्या प्रकारच्या राजकारणानं भरून काढली - अविभक्त बंगालमध्ये हिंदूंना मुसलमानांनी दिलेल्या वागणूकीचं राजकारण. फाळणीनंतर जन्माला आलेल्या लोकांनी ह्या राजकारणाला अधिक प्रतिसाद दिला - आठवणीविरहीत भूतकाळ सरकारी स्मरणरंजनासाठी आदर्श पाया ठरतो. ह्या दोन टोकांच्या गोष्टी - सामूहिक आठवणी आणि विस्मृती - आणि त्यांच्या मध्ये इलेक्ट्रॉनिक सामाजिक वर्तुळ आहे, ज्यातून समाजाला नवी ओळख मिळते.

हल्लीच नेताजी नगरात वार्षिक करमणूक कार्यक्रम भरवला होता. अशा कार्यक्रमांसाठी हल्ली गर्दी जमत नाही. वस्तीचं मैदान सोडाच, प्राथमिक शाळेचं छोटं आवारही भरत नाही; लोकांचं लक्ष जावं म्हणून तो कार्यक्रम मुख्य चौकात ठेवला होता. कलाकार वस्तीतले नव्हते, शहरातली मोठी नावं त्यात होती. जे काही थोडेे दर्शक जमले होते, त्यांत बहुतेकसे घरकाम करणारे लोक आणि त्यांची मुलं होती. पण इतर कोणी बघत नव्हते असं म्हणणं साफ चूक ठरेल कारण सगळे बघत होते. ते आपापल्या घरांच्या खिडक्यांतून बघत होते किंवा स्थानिक केबलवाल्यानं टीव्हीवर लावलेलं प्रसारण बघत होते. आजचं नेताजी नगर हा व्हर्च्युअल समाज आहे, व्हर्च्युअल वस्ती.

ओघवत्या स्मरणरंजनाची गंमत आहे; पोकळीत निरनिराळ्या रंगांचा प्रकाश भरला जातो. वसाहतवादोत्तर शहरीकरणाच्या बेसुमार वाढीच्या पार्श्वभूमीवर जुनाटपणाचं सोंगही करुणास्पद दिसतं. नेताजी नगरातल्या माझ्या भूतकाळाशी वर्तमानाचं नातं सांगणारा पक्का सांधा मिळावा ह्याची आशा मी ठेवतो. तिथे राहिलेले अनेक विस्मृतीत गायब झाले आहेत. नेताजी नगर पूर्वीपेक्षाही जास्त खुलं झालं आहे; एकाच प्रकारच्या, एकच भूतकाळ जगलेल्या लोकांची ती वस्ती राहिलेली नाही. उलट ते वेगवेगळे मार्ग एकत्र येणारं जिवंत जाळं आहे; क्वचित येणाऱ्या पाहुण्यांना त्यातली गुंतागुंतीची रचना दिसणार नाही. स्मृती, अगदी बदलत्या जागेच्या स्मृतीही निर्वात पोकळीत राहत नाहीत; त्यांचीही आपसांत नाती असतात - फक्त सूक्ष्म आठवणींची एकमेकांशी नव्हेत, तर आठवणींच्या इतिहासाच्या मोठ्या चित्राशीही असणारी नाती, सरकारनं आमच्या सामाजिकतेकडे ठेवलेलं लक्ष - जो मुद्दा ह्या लेखात सुटला आहे.

बंगाली जनमानसांत 'स्थलांतर' हा शब्द सुस्थितीशी संबंधित उत्साहाशी जोडला जातो, अशा दिवसांत भारताच्या फाळणीबद्दल संशोधकांना रस निर्माण झाला आहे. लाखो लोकांच्या विस्थापनाच्या करुण कहाण्यांची सय येण्याजागी उद्यमशील बंगाल्यांच्या मनांत पाश्चात्य संधींचा विचार येतो. फाळणीच्या आठवणींनी मनात माजणारी खळबळ बंगालच्या अर्थव्यवस्थेच्या घसरणीसोबत आणि राष्ट्रीय राजकारणातलं महत्त्व कमी होत जाण्यामुळे वाढत गेली. कोलकात्यामधला सध्याचा भद्रलोक समाज अंतहीन स्मरणरंजनात गुंतला आहे आणि इतर वर्गांच्या लोकशाहीतल्या वाढत्या सहभागामुळे कोपऱ्यात कोंडला जात आहे. भद्रलोकांचं एकटेपण त्यांच्या दोन अस्मितांमधला पूल आहे - 'भूमिपुत्र' आणि विविधता असलेले. विविधतेतला भद्रलोक हे समजून आहे, पण मान्य करत नाही; कारण ते मान्य केलं तर ह्या निवडलेल्या मातृभूमीत ते स्वतः उपरे ठरतील. भूमिपुत्र भद्रलोक, 'मृत्यू'ची जोखीम पत्करलेल्या दुसऱ्या वर्गाला उपरा मानतो आणि स्वतःला 'मालक'. त्याची व्यक्तता एक तर संपूर्ण समर्पणाची असते किंवा 'दुसऱ्या' वर्गाला पूर्णतया नाकारण्याची - बहुतेकदा दोन्ही एकत्र येतात, आणि स्मरणरंजनाच्या भग्नावशेषांत अडकून राहतात. त्यात बंगाली भद्रलोकांच्या आधुनिकतेचा प्रकल्प फसला आहे; ह्या आधुनिकतेशी त्यांची एकेकाळी नाळ जुळली होती. त्या संदर्भात, मुळं नसण्याचा इतिहास ज्यांनी एकेकाळी शहराच्या भद्रलोक-साम्राज्यावर दावा सांगितला होता, ह्यावर आपला अधिकार आहे आणि तो मिळत नाही असं ज्यांना वाटत होतं, त्याबद्दल विशेष वाईट वाटतं. ह्या लेखात त्यांच्या कष्टांचा काहीसा आढावा घेतला आहे; त्यातला 'विरोधाभास, घातकपणा आणि compelling' सांगण्याचा प्रयत्न आहे. हे समजून घेण्यात हरवलेलं काही शोधण्याचा प्रयत्न आहे.

***

सुरुवातीला एक नदी होती,
नदीचा रस्ता बनला आणि
रस्ता फुटून संपूर्ण जगाकडे गेला.
आणि रस्ता एकेकाळी नदी होता,
तो नेहमीच उपाशी राहिला.
-- बेन ओकरी, १९९१

History Workshop Journalमध्ये २००२ साली पूर्वप्रकाशित

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

शेवटचे परिच्छेद खूप आवडले. आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!