लॅम्बर्टचे शंक्वाकृती प्रक्षेपण

मी पाचवीत किंवा सहावीत होतो तेव्हा आईने मला एक अॅटलास आणून दिला. शाळेच्या अभ्यासाला पूरक म्हणून. दुसरं म्हणजे, भारतातील राज्यांचं लाकडी जिगसाॅ पझल माझ्या वर्गातल्या काही मुलांकडे होतं आणि ते बघून मीदेखील मागत होतो. त्याऐवजी अॅटलास जास्त उपयुक्त ठरेल असं आईबाबांना वाटलं. (आणि ते खरंच होतं.)

भूगोलाच्या पाठ्यपुस्तकात तिसरीत मुंबई, चौथीत महाराष्ट्र, पाचवीत भारत अशा चढत्या भाजणीने जगाच्या नकाशापर्यंत आमची मजल पोहोचली होती. पण हे नकाशे बहुतांशी फक्त राजकीय सीमारेषा दाखवणारे काळेपांढरे, ढोबळ नकाशे होते. त्या तुलनेत, हा अॅटलास म्हणजे पर्वणीच होता.

त्यातले सगळे नकाशे रंगीत होते. राजकीय नकाशे आणि भौगोलिक नकाशे असे दोन्ही प्रकार त्यात होते. कधी ऐकलंही नव्हते असे देश, शहरं, नद्या, बेटं वगैरे त्यात दाखवले होते. आफ्रिकेच्या नकाशात टोगो आणि बेनिन असे देश, मध्य अमेरिकेच्या भौगोलिक नकाशात दाखवलेला माॅस्किटो कोस्ट या विचित्र नावाचा समुद्रकिनारा, अशा मजेदार गोष्टी त्या अॅटलासमध्ये होत्या.

मी अनेकदा तो अॅटलास वाचत आणि बघत बसायचो. कुठल्या खंडात कुठले देश आहेत, कोणत्या देशाची राजधानी कोणती, अशा गोष्टींची मनातल्या मनात आणि उगाचच उजळणी करायचो. कधीकधी एका रंगाचे सगळे देश एका टीममध्ये असं ठरवून टीम्सच्या याद्या रफ वहीत लिहून काढायचो. एखाद्या शहराचं नाव आवडलं तर त्याबद्दल स्वप्नरंजन करत बसायचो. डेन्मार्कमध्ये कोपनहेगनला जाणं ही माझी सुप्त इच्छा होती. (ती अजूनही पूर्ण झाली नाहीये.)

त्या अॅटलासमध्ये काही अगम्य आणि अद्भुत भासणाऱ्या गोष्टीही होत्या. उदा. लॅम्बर्टचे शंक्वाकृती प्रक्षेपण हा शब्दसमूह काही नकाशांखाली लिहिला असे. हा प्रकार काय आहे ते माहीत नव्हतं; पण हे काहीतरी गूढ आणि प्रचंड रोचक असेल असं उगाचच वाटायचं.

पुढे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत भूगोलाच्या पेपरात इराकची राजधानी जगाच्या नकाशात दाखवा असा प्रश्न होता. फक्त त्या अॅटलासमुळे राजधानीचं स्थळ आणि बगदाद हे नाव हे दोन्ही ठाऊक होतं, आणि त्यामुळे तो मार्क मिळाला. पण दहावीच्या परीक्षेनंतर वाचायला दुसरं एक मोठं खाद्य मिळालं, आणि तो अॅटलास हळूहळू विस्मृतीत गेला. हल्लीच कधीतरी Lambert's Conical Projection हे कुठेतरी नकाशाखाली वाचलं आणि अॅटलासची एकदम आठवण आली. बस्स एवढंच.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आफ्रिकेच्या नकाशात टोगो आणि बेनिन असे देश

माझ्यापेक्षा वयाने बरेच लहान म्हणायचे की मग तुम्ही! (की, 'तरुण पिढीचे प्रतिनिधी' या यूफ़ीमिज़मवर भागवू?)

आमच्या लहानपणीच्या ॲटलसमध्ये अधोरेखित देश 'डाहोमी' या नावाने चितारलेला असे. त्याव्यतिरिक्त, ब्रिटिश होंडुरास, दक्षिण व्हिएतनाम, उत्तर व्हिएतनाम, दक्षिण येमेन अशाही नावाचे देश सापडत. (हल्ली कोठे हरवले, कोण जाणे!) इजिप्तसुद्धा कधीमधी 'युनायटेड अरब रिपब्लिक' या नावाने आढळे. (सीरिया त्या देशातून विलग होऊन य वर्षे लोटलेली असताना, नि त्यायोगे त्या देशात 'युनायटेड' म्हणण्यासारखे असे काहीही शिल्लक राहिलेले नसताना. म्हणजे, ते कम्युनिस्ट देश नसतात का, 'पीपल्स' 'डेमोक्रॅटिक' रिपब्लिक ऑफ अमूकतमूक, वगैरे, ज्यांत 'पीपल्स' किंवा 'डेमोक्रॅटिक' असे काऽही नसते? तद्वत.)

फार कशाला, लहानपणीच्या काही नकाशांमध्ये 'ट्रूशियल ओमान' आणि 'मस्कत आणि ओमान' असेही देश पाहिल्याचे आठवते. हे नकाशे बहुधा एक तर थोडे जुने असावेत, किंवा त्यांच्या नवीन आवृत्ती काढताना ते अपडेट करण्याच्या भानगडीत कोणी पडले नसावे. कारण, आम्हाला नकाशे जुजबी का होईना, परंतु वाचता येण्याइतपत अक्कल येईस्तोवर हे दोन्ही देश लयाला गेले होते.

(पण गंमत म्हणजे, 'ट्रूशियल ओमान' आणि 'मस्कत आणि ओमान' अशा नावांचे देश जरी आमच्या लहानपणी हाती लागलेल्या नकाशांत पाहिल्याचे लख्ख आठवत असले, तरी, 'पूर्व पाकिस्तान' अशा नावांचा देश (किंवा प्रदेश, प्रांत, व्हॉटेव्हर) पाहिल्याचे मात्र, का, कोण जाणे, परंतु, आठवत नाही. वास्तविक, बांग्लादेशचा जन्म हा 'मस्कत आणि ओमान' तथा 'ट्रूशियल ओमान' हे दोन्ही देश लयाला गेल्यानंतरचा! तुमच्या अनाक्रॉनिझम-मालिकेत वाटल्यास या बाबीचा ज़िक्र करू शकता. आगाऊ आभार.)
==========

पैकी 'मस्कत आणि ओमान' म्हणजे आजचे 'सल्तनत ओमान' हे नो-ब्रेनर होते, परंतु 'ट्रूशियल ओमान' कोठे गायब झाले? आणि, 'युनायटेड अरब एमिरेट्स' नावाचा देश अचानक कोठून आणि कधी पैदा झाला? असे जोडप्रश्न त्यानंतर अनेक वर्षे आम्हांस स्वतंत्रपणे भेडसावत असत.१अ

१अ आमचे तत्कालीन गणित तसे जरी बरे असले, तरी, २ + २ = ४, असा निष्कर्ष काढता येण्याइतपत प्रगल्भ नव्हते. चालायचेच.

हादेखील आमच्या हयातीतला, आमच्या बालपणातला. आम्ही पहिलीत होतो तेव्हा. रात्री नेमके जेवायला बसायच्या वेळेस (एअर रेड वॉर्निंगचे) भोंगे वाजत; मग पाकिस्तान्यांना शिव्या घालत दिवे बंद करून पुढचा 'ऑल क्लियर'चा भोंगा वाजेपर्यंत वाट पाहावी लागे, नि मेणबत्त्यांच्या प्रकाशात जेवण उरकावे लागे, एवढेच आठवते. (आमच्या आयुष्यातील अनेक कँडललाइट डिनरे आम्हांस केवळ पाकिस्तान्यांच्या मेहेरबानीमुळे लाभली आहेत, हे आम्ही येथे अत्यंत कृतज्ञपणे नमूद करू इच्छितो.) त्यात पुन्हा, अशाच एकदा मेणबत्त्या लावल्यावर, 'तुमच्या घरातला उजेड रस्त्यावरून दिसतो', म्हणून कोणी स्वयंसेवक एअर रेड वॉर्डन शंख करीत आल्याचे आठवते. मग तातडीने बाजारातून काळे कागद आणून आख्ख्या घराची (पाकिस्तानकृपेने) डार्करूम बनवावी लागली होती, असेही (बहुधा त्या मेणबत्तीच्या मिणमिणत्या उजेडामुळे) अंधुकसेच आठवते. तर तेही असोच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझं वय बांग्लादेशपेक्षा ७ वर्षांनी कमी आहे, त्यामुळे तुमच्यापेक्षा लहान ही खरं. "बरेच"बद्दल ठाऊक नाही.

ब्रिटिश होंडूरास हे नाव वाचल्याचं आठवतंय. येमेन (एडन) आणि येमेन (साना) असे देश नकाशात पाहिल्याचंही आठवतंय. तुम्ही नमूद केलेल्या बाकीच्या गोष्टी मात्र त्या अॅटलासमध्ये बहुधा नव्हत्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शाळेच्या अभ्यासक्रमाप्रमाणे इतिहास,भूगोल हे दोन विषय गुंडाळण्यात येत असत. मुळात ते विषय प्रचंड , वय चौदा, कित्येकांना ते अनाकलनीय तसेच विनागरजेचे घुसडलेत हा समज. त्यामुळे कंटाळवाणे झालेले.
अकरावीनंतर (म्हणजे हल्लीच्या दहावीनंतर) एक वेगळा ऐच्छिक अभ्यासक्रम ठेवल्यास कळकळ असणारी मुलेच शिकतील.
माझा चुलतभाऊ अकरावीनंतर मर्चंट नेवीसाठी गेल्यावर म्हणाला की या दोन विषयांची खरी गाठ पडते. आणि अंकगणित.
जगाचा नकाशा, देश, समुद्री सीमा, देशांतील राजकीय हालचाली, ज्या बंदराला बोट डॉकला जाणार तिथल्या आजच्या आताच्या घटना सर्व अद्ययावत लागते. आजच्या घटना उद्या परवाचा इतिहास, परवानग्यात बदल.
-------
विषय आवडला.
---------

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नकाशावर दुसऱ्याला एखादे नाव सान्गुन ती जागा शोधण्याचा खेळ खेळायचो आम्ही. छपरा वगैरे गम्मतशीर नावे तेव्हा पाहिल्यान्दा पाहिली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अगदी अगदी

जागतिक पातळीवर गाव शोधून दाखवणे हा खेळ चालायचा.

मुद्दाम विचित्र नावं शोधणं हेही.

ओम्स्क तोम्स्क या शहरांचे जे उच्चार असतील ते असोत.. पण त्या अटलास छपाईत ते ओम्ऱक तोम्ऱक असे दिसायचे.

रशिया आणि सायबेरिया हे विचित्र नावांसाठी आवडते प्रदेश.
झालंस्तर थिंफु भूतान

लेख नॉस्टॅल्जिक करणारा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुद्दाम विचित्र नावं शोधणं हेही.

ओम्स्क तोम्स्क या शहरांचे जे उच्चार असतील ते असोत.. पण त्या अटलास छपाईत ते ओम्ऱक तोम्ऱक असे दिसायचे.

Ouagadougou नावाचे एक गाव त्याच्या नामवैचित्र्यामुळे असेच आकर्षक झालेले तथा लक्षात राहिलेले. आता, त्याचा खरा उच्चार इथे कोणाच्या बापाला ठाऊक होता? म्हणून मग, मनाला जुळेल तसा 'उअगडौगौ' असा उच्चार करायला - नि करत राहायला - खूप मजा यायची. गेले ते दिवस!

(त्या गावाच्या नावाचा खरा उच्चार - फ्रेंच स्पेलिंगपद्धतीस अनुसरून - 'वगडूगू' (सुरुवातीचा 'व' हा दंत्योष्ठ्य नसून पूर्ण ओष्ठ्य) की कायसासा आहे, असे खूप नंतर कळले. चालायचेच.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमच्याकडे मराठीतीलच अटलास असल्याने मनाने कल्पून अनेक वेगळाले उच्चार करण्यातली मजा आम्ही मिसली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगाचं जिगसॉ पझलही मिळतं आता, पण का कोण जाणे तितक्या मजेने वापरलं नाही मुलांनी. स्क्रीनवरच्या इतर करमणुकीमुळे ह्यातली गंमत कमी झाली असावी.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोपनहेगनला का जायचंय म्हणे तुम्हाला ? फारच छोटं गाव हो.
हॉपऑन हॉपऑफ बस मध्ये बसलं तर दोन तासात परत मूळ जागी येतो.
नाही म्हणायला हॅन्स अँडरसनचा पुतळा आणि त्याहून महत्वाचे म्हणजे कार्ल्सबर्गची गेल्या शतकातील ब्रिवरी (आतून बघू देतात)एवढेच रोचक.
आता बेनिनच म्हणाल, तर संपर्कात रहा, बहुधा आहे पुढे मागे योग ..
( स्वच्छ, माजी फ्रेंच कॉलनी... गरीब पण सभ्य आणि समाधानी लोक, फळफळावलीची रेलचेल, एकंदरीत कॉमिक्स मधील जग )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लहानपणी नील्स बोहरचं चरित्र वाचलं होतं म्हणून कोपनहेगनबद्दल आकर्षण.

बेनिनला जाणार असाल तर खरंच कळवा. शक्य झाल्यास तुमच्यासोबत (स्वखर्चाने) यायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान आहे अनुभव. माझ्याकडेही ॲटलास होता. त्यात मला दक्षिण आफ्रिकेत सगळ्याबाजूंनी वेढलेला लेसोथो हा देश आठवतो.
शिवाय ह्याच वेळी, स्कॉलर्शिप परिक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे एकांनी वेदांती सूक्ते नावाचं पुस्तक दिलं होतं. त्यात पृथ्वी शेषनागाच्या टकलावर नि पाच खंड (एशिआ, युरोप, अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया) इ. ज्ञान वाचलं आणि विज्ञान पहिल्यांदा पहायला मिळालं.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी?