सुलतान पेडणेकर - हृषीकेश गुप्ते

हृषीकेश गुप्ते हे आताच्या मराठी साहित्यामधील एक महत्त्वाचे नाव आहे. कोकणातील वातावरण, तिथली माणसे यांचे अतिशय अनोखे आणि रसरशीत वर्णन त्यांच्या लिखाणात अनेकदा असते. अशाच काही व्यक्तींविषयी ते 'ऐसी अक्षरे'मध्ये एक मालिका लिहीत आहेत. त्याचा हा पहिला भाग : सुलतान पेडणेकर. लॉकडाउनच्या या भयग्रस्त काळात ऐसीकरांना काही वेगळे वाचायला मिळावे म्हणून.
---***---

गावाकडल्या जांभळ्या शाळेच्या आवारात चिंचेचं एक डेरेदार झाड आहे. झाडाखाली चांगला ऐसपैस पार बांधलाय. साधारणत: चौतीस वर्षांपूर्वी मी सुलतानला सर्वप्रथम पाहिलं ते याच चिंचेच्या पाराखाली. मी तेव्हा बालवाडीतून नुकताच पुढल्या वर्गात म्हणजे पहिलीत आणि पर्यायानं नव्या शाळेत जाऊ लागलो होतो. शिशुवर्गापासून दहावीपर्यंत मी एकूण चार शाळा बदलल्या. तालुक्याच्याही नसलेल्या आमच्या गावात पहिली ते दहावी हा प्रवास चार शाळांमधून करावा लागणं हे मला आज आठवतानाही अगम्य वाटतं. त्या काळी शिशुवर्गाला बालवाडी म्हणत. तिथे दोन वर्षं काढल्यावर मग इयत्ता पहिली-दुसरी जांभळ्या शाळेत. मग तिसरी-चौथी कचेरी शाळा आणि सरतेशेवटी पाचवी ते दहावी नुसती शाळा; म्हणजेच मुख्य शाळा. आठवतंय तोवर जांभळ्या शाळेचा रंग कधीही जांभळा नव्हता. अगदी काही वर्षांपूर्वी ती वास्तू पाडून तिथं ग्रामपंचायतीची नवी इमारत बांधेस्तोवर तिथल्या भिंतींना जांभळा रंग दिल्याचं माझ्या स्मरणात नाही. निव्वळ भिंतींचाच रंग नव्हे, तर शाळेच्या आवारातल्या एखाद्या झाडालाही कधी जांभळ्या रंगाचं फूल आल्याचं माझ्या स्मरणात नाही. शाळेवरल्या आभाळातून कधी एखादा जांभळ्या रंगाचा पक्षी विहरल्याचंही मी पाहिलेलं नाही. शाळेला जणू जांभळ्या रंगाचं वावडंच होतं. म्हणूनच बहुधा जांभळी शाळा!

शाळा सकाळी दहा वाजता भरे. घरच्याच गडीमाणसांपैकी कुणीतरी मला शाळेत सोडायला येई. दुपारी चार वाजता शाळा सुटायची वेळ होईस्तोवर ही सारी गडीमाणसं वडिलांसोबत आमच्याच ट्रकवर ओसवालांच्या कूपात जात. जंगलात जिथे सरकारमान्य लाकूडतोड चाले त्या ठिकाणाला त्या काळात कूप किंवा मालकी म्हणत. ट्रकवर हमालीची कामं करणारी कुणीही गडीमाणसं दुपारी घरी नसल्यामुळे बरेचदा आईच मला शाळेतून घ्यायला येई. त्या काळात वर्गातली सगळीच मुलं एकटीच घरी परतत; पण वाटेवर तीन मोठाली तळी होती आणि माझ्या लहानपणीच एका ज्योतिषानं ‘याला पाण्यापासून भय आहे’ हे भविष्य वर्तवल्यामुळे आई-वडील सहसा मला एकट्यानं शाळेतून परतू देत नसत. त्या दिवशीही दुपारी शाळा सुटली. गोंधळ-गोंगाट करत मुलांचे लोंढे बाहेर पडले. शिरस्त्याप्रमाणे मीही रमतगमत वर्गाबाहेर पडलो आणि खंडू भगतची वाट पाहात पायर्‍यांपाशी थांबलो. शाळा सुटल्यावर इतर मुलांची वर्गाबाहेर पडण्यासाठी जी झुंबड उडे, त्याला खंडू अपवाद होता. शाळा सुटल्याचे टोल पडताच खंडू अधीर न होता सावध होत असे. सगळी मुलं बाहेर पडल्यावर उभ्या वर्गभर एक नजर फिरवून मुलांच्या दप्तरातून खाली पडलेल्या जिनसा ताब्यात घेण्याकडेच त्याचं सारं लक्ष असायचं. कुणाची पट्टी, कुणाची पेन्सिल, कुणाचा रंगीत खडू आणि क्वचित, अगदीच दैवानं साथ दिली तर कुणाच्या दप्तरातून खाली पडलेल्या विलक्षण रंगसंगतीच्या आणि चित्ररचनांच्या छापा!

छापा म्हणजे आगपेटीच्या खरखरीत कडा फाडून उरलेले दोन छोटेखानी दर्शनी पत्ते! त्या काळात आम्हा लहान मुलांमध्ये या छापांचं प्रचंड आकर्षण होतं. राजस्थान-गुजराथ भागात बनणार्‍या आगपेट्यांवर बरेचदा वेगवेगळी आकर्षक चित्रं असत. वर्गातल्या गुजराथी किंवा मारवाडी मुलांच्या दप्तरातून या अशा रंगीबेरंगी छापा वेळीअवेळी बाहेर डोकवायच्या. खंडूचं सारं लक्ष या छापांवर असे. अशा छापा गोळा करून, प्रसंगी चोरून त्या जहरू मोहल्ल्यातल्या रझाक रंडीला द्यायच्या आणि त्या मोबदल्यात त्याच्याकडून गोट्या किंवा क्वचित एखादी छोटी पतंग घ्यायची हा खंडूचा आवडीचा उद्योग. रझाकचं मूळ आडनाव इलामी, पण गावानं त्याच्यामागे रंडी ही उपाधी चिकटवली. रझाक रंडीप्रमाणेच गावानं अनेकांना अशा उपाध्या चिकटवल्या होत्या. राजू गुटखा, बाबू डॅडी, खलील पलटी, वंड्या कान्होजी, जिताडेबाबा अशा अनेक! खुद्द खंडूलाच पुढे खिडकी खंडू ही उपाधी मिळाली.

मी वर्गाबाहेर पडलो आणि बाहेर आई वाट पाहत उभी नाही हे पाहून मनोमन सुखावलो. अध्येमध्ये घरातल्या कामांमुळे मला शाळेत आणायला यायला आईला उशीर व्हायचा. अशावेळी तळ्यात न डोकावता, इकडेतिकडे न रेंगाळता घरी परतायचं ही ताकीदच मला घरून मिळाली होती. तो फाल्गुन महिना होता. होळी तोंडावर आलेली. गावातल्या विविध आळ्यांमधून दररोज संध्याकाळी पिला आणि हालकुंड आणायला जाणार्‍या थोरामोठ्यांची जंगलात रीघ लागलेली असायची. सावरीचं झाड मुळापासून तोडून, त्याच्या फांद्या आणि वरची साल कोयत्यानं काढल्यावर जे पांढरंशुभ्र लांबट सोलीव खोड उरतं त्याला गावाकडे होळीचा पिला म्हणतात. हालकुंड म्हणजे होळीभोवती रचायचा लाकूडफाटा. गावात एकूण पाच सार्वजनिक होळ्या. एक रावणमाळाची, एक गवळीपाड्याची, एक कोळीवाड्याची, एक बाजारपेठेची आणि एक आमची म्हणजे प्रभू आळीची. त्या काळी गावातल्या आळ्याआळ्यांमधून होळ्यांची एक अघोषित स्पर्धा असे. प्रत्येक आळीनं आधी जंगलात जाऊन पाहणी करून पुढच्या पंधरा दिवसांसाठी एक-एक झाड हेरून ठेवलेलं असायचं. झाडाच्या खोडावर खडूनं त्या त्या आळीचं नावही बरेचदा लिहिलं जायचं, ज्यायोगे दुसर्‍या आळीनं ते झाड परस्पर तोडून पळवू नये. काही आळ्यांमधनं पिल्याच्या राखणीसाठी मोठ्या होळीच्या आदल्या दिवशी जंगलात माणसंही बसवली जात. ही माणसं गिरणी-कामगारांप्रमाणे सकाळ, दुपार आणि रात्र अशा तीन पाळ्यांमध्ये राखण करीत. तरीही मोठ्या होळीला ऐनवेळी पिल्यांची पळवापळवी व्हायचीच. या पळवापळवीवरून अगदी रक्तपात होईस्तोवर वाद गावात रंगायचे.

गावाकडे फाल्गुन सुरू होऊन चंद्रदर्शन झालं, की पुढे मुख्य होळी पौर्णिमेपर्यंत होळी लावत. पहिल्या होळीला एरंडाच्या झाडाचा पिला आणि पुढच्या दिवसापासून मात्र आकारानं थोडाथोडा मोठा होत जाणारा सावरीच्या झाडाचा पिला. हा पिला होळीच्या मानाच्या खड्ड्यात रोवून त्याच्या आजूबाजूनं लाकूडफाटा, पेंढा आणि हालकुंड रचून होळी पेटवली जाई. होळीमाळ शाळेच्या परतीच्या वाटेवरच होता. फाल्गुन महिना, म्हणजेच होळीचा पंधरवडा सुरू झाल्यापासून माळावरल्या हालचाली आणि उत्साह वाढला होता. संध्याकाळी शाळा सुटण्याच्या वेळी माझ्यापेक्षा वयानं थोडी मोठी असणारी म्हणजे सातव्या-आठव्या इयत्तेतली मुलं दुपारी माळावर आदल्या दिवशी मोठ्यांनी तोडून आणलेलं सावरीचं झाड कोयत्यानं सोलायला बसलेली असायची. या सार्‍या प्रकाराविषयी माझ्या मनात त्या काळी एक बालसुलभ कुतुहल होतं. त्या दिवशी शाळेतून घरी परत न्यायला आई आलेली नसल्यामुळे मला थोडावेळ माळावर रेंगाळण्याची संधी आपोआपच मिळाली होती. शाळा सुटली. आई बाहेर नाही हे पाहताच वर्गात रेंगाळलेल्या खंडूला हाक मारण्यासाठी मी मान मागे वळवणार एवढ्यात एक बुटकेलासा, रंगानं कुळकुळीत काळा, लठ्ठ आणि वयानं माझ्यापेक्षा साधारणत: पाचेक वर्षांनी मोठा वाटणारा मुलगा समोर आला. म्हणाला, “शेट. शेट ना? बारके शेट? तुमाला घरा व्हारलाय. मी तुमाला नेवाला आयलोय.” त्या अनोळखी चेहेर्‍याचा मी पुरता अदमास घ्यायच्या आतच तो पुढे म्हणाला, “शेट, मी सुलतान. सुलतान इब्रमअली पेरनेकर.”

माझ्या वडिलांना आमच्या ट्रकच्या व्यवसायाशी सबंधित गडी-माणसं आणि गावातले इतर लोक ‘शेठ’ म्हणून संबोधत. दोन मोठ्या बहिणींना ‘ताई’ आणि भावाला ‘मोठे शेठ’ अशी हाक मारत. घरात तीन भावंडाच्या पाठीवर तब्बल आठ वर्षांनी जन्माला आलेल्या मला मात्र अशी कोणतीही सन्माननीय उपाधी तोवर मिळाली नव्हती. त्यामुळेच मला शेठ म्हणून हाक मारणार्‍या त्या विचित्र रंगसंगतीच्या चेहेर्‍याकडे मी थोड्या संशयी उत्सुकतेनं पाहू लागलो. माझी दोलायमान मनस्थिती ओळखूनच जणू तो पुढे होत म्हणाला, “मला ओलखला नाय? मी तुमच्या इबूभायचा पोरगा.” एवढं बोलून तो हसला. तो हसला आणि गढुळलेलं पाणी क्षणार्धात तुरटी फिरवल्याप्रमाणे स्वच्छ-नितळ व्हावं तसं काहीसं झालं.

एरवी वेळी-अवेळी, रात्री-अपरात्री दिवसाच्या कोणत्याही अवचित वेळी सुलतान तुमच्यासमोर आला तर तुम्ही बिचकाल यात संशय नाही. सुलतान दिसतोच तसा. ठेंगणा, ठुसका, लठ्ठ आणि पाषाणागत काळा. पण ज्या क्षणी सुलतान तुमच्याकडे बघून हसेल त्या क्षणी तुमच्या मनात सुलतानविषयी दाटलेलं संशयाचं मळभ तात्काळ दूर होईल. सुलतान हसतो तेव्हा त्याच्या काळ्या चेहेर्‍याला साजेसे त्याचे तेवढेच काळसर लाल ओठ हलकेच विलग होतात; आणि त्या काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर समुद्राच्या फेसाळणार्‍या लाटांसारखे सुलतानचे पांढरे शुभ्र दात दृष्टीस पडतात. पुढे जी जादू तुमच्यावर होते, ती त्या संपूर्ण हास्याचा तुमच्यावर झालेला सामाईक परिणाम असतो, का सुलतानच्या अखंड तंबाखू-गुटखा खाण्याच्या सवयीतही शुभ्र पांढर्‍या राहिलेल्या दातांनी तुमची केलेली ती नजरबंदी असते, हे मला आजतागायत कळलेलं नाही.

सुलतान हसला आणि माझ्या मनातली त्याच्याविषयीची असलेली संशयाची भावना तात्काळ नाहीशी झाली. मी दोन पावलं पुढे सरकलो. एवढ्यात त्यानं दप्तर माझ्या हातातून स्वत:च्या खांद्यावर घेतलं आणि आम्ही घराच्या वाटेनं चालू लागलो. परतीच्या वाटेवर सुलतान अथक आणि अविश्रांत बडबडत राहिला. त्याच्या तोंडून बाहेर पडणारी, विशेषत: रायगड जिल्ह्यातल्या मुस्लीम मोहल्ल्यातूनच बोलली जाणारी कोकणीमिश्रित मराठी मला अपरिचित नव्हती. गावाकडल्या आमच्या घरापासूनच मुस्लीम वस्तीची सुरुवात होते. माझं उभं बालपण याच वस्तीतून खेळण्याबागडण्यात गेलं. ही भाषा विलक्षण आहे. ना धड कोकणी, ना धड मराठी. इथेला ‘हावर’, तिथेला ‘थवर’ आणि कुठेल ‘खवर’ म्हणणारी एक विलक्षण बोलीभाषा. या भाषेला जी लय आहे ती मी आजवर ऐकलेल्या सर्व भाषांपेक्षा जास्त गोड आहे. या भाषिक लयीचा माझ्या आजवरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जोपासनेत मोठा वाटा आहे.

फाल्गुन सुरू होऊन जेमतेम दोन-चार दिवस उलटले होते. वसंतागमन झालं होतं आणि काही दिवसांपूर्वीपर्यंतची हाडं गोठवणारी थंडी वातावरणातून नाहीशी झाली होती. भोवतालाच्या रंध्रांतून सूक्ष्मातिसूक्ष्म असा उष्मा स्रवू लागला होता. पानगळीत निष्पर्ण झालेल्या मोठ्या तळ्याकाठच्या चाफ्याला हळूहळू पालवी फुटलेली दिसत होती. ऋतुमानाचा अदमास घेता ते दिवस काही वेळी-अवेळी उष्ण वारे सुटण्याचे नव्हते. असे उष्ण वारे सुटत ते फाल्गुन ओसरल्यावर; पण त्या वर्षी या उष्ण वार्‍यांचं आगमन बहुधा महिना-पंधरा दिवस आधीच झालं होतं. दोनच दिवसांपूर्वी या वार्‍यांची एक भलीमोठी चक्रावळ संध्याकाळ होता होता शाळेच्या छोटेखानी इमारतीवर चालून आली होती. उघड्या दारांखिडक्यांतून आत शिरून वर्गात बसल्या आम्हा मुलांवर आक्रमण करती झाली होती. कुणास ठाऊक का, पण वर्गातल्या वसंता बापटनं या अश्या वार्‍यांना ‘मोगली वारे’ नाव ठेवलं होतं. तो म्हणायचा, हे वारे मोगलांसारखेच आक्रमक असतात. त्यानंतर आयुष्याचा बराच मोठा पल्ला गाठेस्तोवर या वार्‍यांची ओळख म्हणून माझ्या मनात मोगली वारे अशीच खूणगाठ बांधली गेली. हे वारे सुटले की ते एकत्रित होऊन त्यांचं एक सामाईक चक्र तयार होई. हे चक्र स्वत:भोवतीच घोंघावत वेगानं पुढे सरकत जाई. आम्ही त्याला ‘भोवरा’ म्हणायचो. सुलतानच्या तोंडच्या चमत्कारिक भाषिक कसरती ऐकता ऐकता घरी परतत असताना एकाएकी गावदेवीच्या देवळाकडून वार्‍याचा एक मोठाला भोवरा सरसरत आमच्या दिशेनं आला. अविश्रांत चालू असलेली सुलतानच्या तोंडची टकळी तो भोवरा पाहताच अचानक थांबली. सुलतान मला बाजूला ढकलत तात्काळ दूर झाला. भोवरा पुढे सरकत सरकत शंकराच्या देवळासमोरच्या दीपमाळेशी जाऊन क्षणभर रेंगाळला. सुलताननं हाफपँटच्या खिशात हात घालून एक पांढरी पुडी बाहेर काढली आणि त्या काळातल्या हिंदी सिनेमातल्या हिरोसारखी त्यानं स्वत:भोवतीच एक गिरकी घेतली. तीही स्लो-मोशनमध्ये! माझ्यासाठी हे सगळं नवं होतं. म्हणजे तेव्हा आम्ही सगळीच लहान मुलं सिनेमा-सिनेमा खेळत असू; पण सुलतानसारखी अ‍ॅक्शनपॅक्ड तत्परता मात्र आम्हा मुलांमध्ये कधी कुणी दाखवलेली माझ्या स्मरणात नाही. मग त्याच स्लो-मोशनमध्ये सुलतान काहीतरी ओरडला आणि दीपमाळेभोवती गरगरणार्‍या भोवर्‍याच्या दिशेनं धावला. सुलतान जवळ आलेला पाहून म्हणा, किंवा वातावरणातल्या कमीजास्त झालेल्या दाबाचा परिणाम म्हणून म्हणा; पण भोवरा दीपमाळेपासून हलला आणि दूरदूर पळू लागला. माझ्यापासून थोडा पुढे गेलेला सुलतान त्याच स्लो-मोशनमध्ये माझ्याकडे वळून ओरडला, “शेट, धावा.” नेमकं काय झालं सांगता येणार नाही, पण त्या क्षणी माझ्यात एक अनामिक वीरश्री संचारली आणि मी भान हरपून सुलतानच्या, आणि सुलतान वार्‍याच्या त्या भोवर्‍याच्या मागे मागे धावू लागलो. भोवरा विधवेच्या पिंपळाशी जाऊन थोडा स्थिरावला. एव्हाना भोवर्‍याच्या स्वत:भोवतीच भिरभिरण्यातला जोमही थोडा ओसरला होता. सुलतान आपलं ठेंगणं-ठुसकं शरीर घेऊन पळतपळत विधवेच्या पिंपळाशी आला. हातातली पांढरी पुडी त्यानं घाईघाईनं उघडली आणि ती पुडी त्या भोवर्‍यात रिकामी करत तो जोरानं ओरडला, “सधवा रे सधवा, खाल्ल्या सधवाला जाग. इनायतअलीच्या भुताचा कार तू माग.” थोडा वेळ तसाच गेला. सुलतान विधवेच्या पिंपळाशी स्तब्ध उभा राहिला. बिलकुल हालचाल न करता. राष्ट्रगीत सुरू होताना ज्या ‘सावधान’ पवित्र्यात उभं राहतात, अगदी तश्या. ताठ आणि स्तब्ध! वार्‍याचा तो भोवरा काही क्षण पिंपळाशी गरगरून मग किंचित पुढे सरकत ताम्हाण्यांच्या कुंपणाशी जाऊन विरून गेला. मग अचानकच सुलताननं सावधानची मुद्रा सोडली. तो पळत ताम्हाण्यांच्या कुंपणाशी गेला. तिथे गेल्यावर त्यानं पँटच्या मागच्या खिशात हात घालत एक रिकामी आगपेटी काढली. मग माझ्याकडे वळून म्हणाला, “शेट, आता मी बोलतो तसा बोला.” मी एकूण प्रकारानं भलताच प्रभावित झालो होतो. मी तात्काळ होकारार्थी मान हालवली. सुलताननं खिशातून काढलेली आगपेटी उघडली आणि माझ्याकडे एक नजर टाकत तो म्हणाला, “इलवर किलवर इस्पिक बिलवर.” मला क्षणभर तो काय बोलतोय हेच कळेना. मला कळावं म्हणून सुलताननं तेच अगम्य शब्द पुन्हा उच्चारले. यावेळी मात्र मी ते नीट लक्षात ठेवून जसेच्या तसे उच्चारले. मग सुलतान म्हणाला, “आता हाच मंतर रीवस. रीवस म्हंज्ये गारी रीवस घेतो ना आपन? तसा. बोला. बिलवर इस्पिक किलवर इलवर.” मी प्रयत्न केला पण मला ते शब्द उलटे काही उच्चारता येईनात. सुलताननं मला एकदोनदा पुन्हा बोलून दाखवलं, पण छे! बर्‍याच प्रयत्नांनंतर सुलताननं एकदमच स्वत:च्या सर्वांगाला झटका दिला आणि तो जोरानं किंचाळला. मग एखाद्या भगतासारखा तो अंगात वाताचा झटका आल्याप्रमाणे थरथरू लागला. मी घाबरलो. मला क्षणभर काय करावं कळेचना. सुलतानच्या अंगाची थरथर वाढत गेली, वाढत गेली आणि अधिकाधिक वाढतच गेली. अंगाच्या थरथरीसोबत सुलतानच्या तोंडातूनही ‘हाफ’, ‘हुफ’ असे अज्ञात आवाज बाहेर पडू लागले. मी भीतीनं रडकुंडीला आलो. काय करावं हेच मला कळेना. मी त्याच बोबडी वळल्या अवस्थेत तिथून पळण्यासाठी पाऊल उचलणार एवढ्यात सुलतान तात्काळ पूर्ववत झाला आणि सामान्य आवाजात म्हणाला, “तुमी चुकलाव, म्हनून पलाला तो. नायतर भेटला होता. छट!” असं म्हणत माझ्याकडे एक निषेधाची नजर टाकत सुलतान पुढची वाट चालू लागला. काय करावे हे न सुचून मीही त्याच्या मागोमाग मुकाट चालू लागलो. परतीच्या वाटेवर सुलताननं मला त्याच्या त्या मोहक भाषेत उभी हकीकत सांगितली.

माझ्या बालपणी भुतं पकडण्याच्या बाबतीत गावातल्या मुस्लीम मोहल्ल्यातल्या फत्तेखान पानसर्‍यांची पंचक्रोशीत ख्याती होती. फत्तेखान आणि नदीपलीकडल्या वस्तीत राहाणारा किस्न्या म्हात्रे या दोघांकडे तालुक्यातल्या छोट्या-मोठ्या गावांमधले, वाड्यावस्त्यांमधले लोक सातत्यानं तोडगा मागण्यासाठी येत. पण गेल्या काही दिवसांपूर्वीच विषारी साप चावून मेलेल्या इनायत अलींचं भूत या दोघांनाही गुंगारा देत वेळीअवेळी, रात्रीअपरात्री भुंड्या चिंचेखालून जाणार्‍या लोकांना त्रास देत असे. सुलतानच्या मते या भुताला पकडण्याची जबाबदारी फत्तेखानांनी त्याच्यावर सोपवली होती. वार्‍यानं तयार केलेल्या धुळीच्या भोवर्‍यात मीठ टाकलं, की भूत दिसतं असा तेव्हा आम्हा मुलांचा समज होता. भोवर्‍यात मीठ टाकायचं आणि ओरडायचं, ‘मिठा रे मिठा खाल्ल्या मिठाला जाग. शेपटीवाल्या भुताचा काढ तू माग.’ मग जे भूत त्या भोवर्‍यात असतं ते तात्काळ आपला गुलाम होऊन आपण सांगू ती कामं करतं. माझ्यासह त्या काळात माझ्या वयाची अनेक मुलं या भोवर्‍यात मीठ टाकायला मिळावं म्हणून अक्षरश: गावभर वणवणत असायची. पण व्हायचं असं की, जेव्हा वार्‍याचा हा भोवरा तयार व्हायचा तेव्हा नेमकं आमच्याकडे मीठ नसायचं; आणि मीठ आणेपर्यंत तो भोवरा नाहीसा झालेला असायचा. सुलताननं मात्र नेमकी वेळ साधली होती. भोवर्‍यात मीठ टाकण्यात तो पूर्णत: यशस्वी झाला होता, मात्र ऐनवेळी मी मंत्र उच्चारायला चुकल्यामुळे भोवर्‍यातल्या भुताला रिकाम्या आगपेटीत कैद करणं मात्र त्याला जमलं नव्हतं. नंतर घरी परतताना त्यानं मला खिशातली पुडी उघडून आतलं मीठ दाखवलं. ते साधारण पांढरट तपकिरी रंगाचं खडी-मीठ होतं. मी त्याला त्याबाबत विचारलं असता तो म्हणाला, “याला सदव म्हणतात. हिंदू भुताला पकरायला पांड्डा (पांढरं) मिट आनी मुसलमान भुताला पकरायला हा सदव म्हंज्ये काला मिट वापरतात.” त्या दिवशी होळीमाळावर रेंगाळायची माझी योजना सुलतानच्या विलक्षण भूतपकडीच्या खेळामुळे बारगळून गेली. अर्थात माझ्या मनात त्याबाबत काहीही किंतू नव्हता. घरी पोहोचायला तसा उशीरच झाला. घरी पोहोचलो तेव्हा वडील कुपातून परतले होते. त्यांनी सुलतानकडे पाहत उशीर का झाला असं विचारलं. तर सुलतान म्हणाला, “बारक्या शेटच्या पोटात कल आयली. मंग बसले तामान्यांच्या कुपनाशी परसाला.” वडील क्षणभर माझ्याकडे विचित्रश्या नजरेनं बघतच राहिले आणि मी सुलतानकडे. तोवर मला ‘परसाकडे’चा अर्थ माहीत नव्हता त्यामुळे त्या क्षणी माझ्याकडून प्रतिक्रिया अशी काही गेलीच नाही. सुलताननं वापरलेल्या भाषाप्रयोगाचा अर्थ मला कळला तो सुलतान घरी गेल्यावर आईनं माझ्याकडे विषय छेडला तेव्हा. मग मी बराच वेळ एकटाच दातओठ खात सुलतानला शिव्याशाप देत राहिलो. मी घडला प्रकार वडिलांना सांगितला, तेव्हा ते एकदम हसायलाच लागले. म्हणाले, “सदव नाही, सैंधव म्हणायचं असेल त्याला.”

बालपणापासूनच माझ्या भाषिक अवकाशात नवनवीन शब्दांचा भरणा करण्यात सुलतानचा सिंहाचा वाटा आहे. आजही सैंधव हा शब्द ऐकला की मला सुलतानच आठवतो. सैंधवच नव्हे तर डर्क्या, गंडेर, लंडूर, सोटण्या असे अनेक शब्द आणि त्यांचे नावीन्यपूर्ण अर्थ मला सुलतानकडूनच शिकायला मिळाले.

सुलतानचा बाप, ज्याला तो ‘बाप’ अशीच हाक मारायचा, तो इब्राहम अली म्हणजे इबू आमच्या ट्रकवर ड्रायव्हर होता. माझ्या वडिलांच्या उमेदीच्या, म्हणजेच जेव्हा ते इतरांच्या ट्रकवर ड्रायव्हिंग करायचे त्या काळापासून तो वडिलांच्या शागिर्दीत होता. तेव्हा तो वडिलांच्या हाताखाली क्लिनर म्हणून काम करे. पुढे वडिलांनी स्वत:चे ट्रक घेतल्यावर त्याची बढती झाली आणि तो आमच्या ट्रकवर ड्रायव्हर म्हणून रुजू झाला. इबूनं दोन लग्नं केली. त्याची एक बायको ठाण्याजवळ, मुंब्र्याच्या जुळ्या गावात, म्हणजे कौसे येथे होती. गावाकडची लोकं त्या काळात कौश्याला ‘खौसा’ असं म्हणत. दुसरी बायको त्यानं गावात स्वत:सोबतच ठेवली होती. तीच सुलतानची आई. सुलतानचा जन्म झाला आणि पुढच्या काही दिवसांतच त्याची आई काविळीनं दगावली. मग बापानं सुलतानची रवानगी कौश्याच्या त्याच्या पहिल्या बायकोकडे केली. सुलतान आजही त्याच्या सावत्र आईसोबतच राहतो. पण गावी. सुलतान आपल्या सावत्र आईला ‘खाला’ अशी हाक मारतो. गावात कायमचं स्थलांतरित होण्याआधी सुलतानच्या वयाची सुरुवातीची काही वर्षं कौश्यात गेली. पहिल्या बायकोपासून इबूला अजून एक मुलगा होता – सुलतानचा सावत्र भाऊ. तो सुलतानपेक्षा वयानं दहा वर्षांनी मोठा होता. त्याचं नाव मोहम्मद. सुरुवातीचा काही काळ त्यानं मुंबईत ड्रायव्हरचीच नोकरी केली. मग तोही गावाकडे कायमचा निघून आला. गावानं त्यालाही एक उपाधी चिकटवली. ‘मॅटिनी मोहम्मद!’

सुलतान कौश्यातून गावी परतला आणि इबूनं त्याचं नाव शाळेत टाकलं. कौश्यात असेस्तोवर सुलतानचं तिसरीपर्यंतचं शिक्षण उर्दू माध्यमातून झालं होतं. इबूनं गावी आल्यावर सुलतानला मराठी शाळेत टाकलं. त्यामुळे सुलतानला पुन्हा एकदा तिसरीतच बसावं लागलं. मुळात शाळेत उशीरा टाकल्यामुळे इयत्तांच्या शिडीचा विचार करता सुलतान त्याच्या वयाच्या मानानं खूपच अलीकडच्या पायरीवर होता. पुढच्या शैक्षणिक वर्षापासून मी आणि माझ्यापेक्षा वयानं पाचेक वर्षांनी मोठा असणारा सुलतान, आम्ही सोबतच शाळेत जाऊ लागलो. त्यापुढच्या काळात आपल्या कल्पक पोतडीतल्या अनेक अद्भुतिकांच्या साहाय्यानं सुलताननं माझ्या बालमनावर एक न भूतो न भविष्यति असं गारुड करून टाकलं. राजकन्या, राजपुत्र, पर्‍या, राक्षस आणि चेटकिणींचं जग तोवर माझ्यासाठी नवखं राहिलेलं नव्हतं. ‘जादूची अंगठी’ किंवा ‘जादूची तलवार’सारख्या गोष्टींच्या पुस्तकांमधल्या सातासमुद्रापार घडणार्‍या विलक्षण जादुई कथानकांनी माझं बालभावविश्व कधीचंच काबीज करून टाकलं होतं. पण ही सारी कथानकं अनाकलनीय आणि अज्ञात अशा परकीय भूमीत घडायची. सुलतानच्या अविश्वसनीय अद्भुतिका घडत त्या गावकुसाच्या अल्याडपल्याड. जसं, ‘वेशीवरल्या डाकबंगल्यावर अमावस्येच्या संध्याकाळी बुटकी चिनी माणसं येतात. त्यांच्याकडे हिरे असतात... ’ एकदा, आगपेटीत कैद केलेल्या एका भुताच्या मोबदल्यात स्वत: सुलताननं त्यांच्याकडून काही हिरे घेतले होते. ही कपोलकल्पित घटना सांगतासांगताच सुलताननं खिशात हात घातला होता, आणि आभाळाच्या निळ्या रंगासारखे मूठभर मणी बाहेर काढून दाखवले होते. मोगरामावशीच्या गळ्यातल्या मणीहारापेक्षा ते मणी फार वेगळे नव्हते. तरीही मी एका वेगळ्याच अनिमिष अभिलाषेनं त्या मण्यांकडे पाहत राहिलो. या असल्या आख्यायिकांची सुलतानकडे कमतरता नव्हती. ‘वेशीपलीकडल्या कोकण रेल्वेच्या ट्रॅकपल्याड असलेल्या काळडोंगरीवर एक लाल चोचीचा पक्षी राहतो. दररोज रात्री तो आपल्या कर्कश आवाजात ओरडतो. आणि तो जेव्हाजेव्हा ओरडतो तेव्हातेव्हा त्याच्या चोचीतून सोनं पडतं!’ ‘संध्याकाळी गावात फिरणारा फकीर हा मनुष्यप्राणी नसून एक इच्छाधारी नाग आहे. मी स्वत: त्याला नदीकाठच्या पीरबाबाच्या दर्ग्याशेजारी माणसातून नागाच्या रुपात जाताना पाहिलंय.’ अश्या एक ना अनेक! सुलताननं स्वत:च्या अद्भुतिका निर्माण करताना माझ्या मनातल्या जादुई विश्वातली परकीय भूमी अगदी लीलया बदलून टाकली. सुलताननं या जादुई विश्वाला खास देशी परिप्रेक्ष्य दिला. म्हणूनच सुलतान हा मला कायम देशीवादाच्या परंपरेचा एक आद्य पाईक वाटतो.

गावाकडे एक उघडंबोकडं महादेवाचं मंदिर आहे. या देवळाचं नावच बोडकं देऊळ. मंदिराला भिंती किंवा छप्पर काहीही नाही. मला आठवतं तेव्हापासून तिथं एक चारही बाजूंनी रिकामा असा बांधकामाचा चौथरा तेवढा आहे. चौथर्‍याच्या टोकाला गाभारा म्हणून एका खोलगटश्या खडड्यात शंकराची पिंडी आहे आणि तेवढ्यावरूनच लोक त्या वास्तूला महादेवाचं मंदिर म्हणतात. चार पायर्‍या वर चढून चौथर्‍यावर पोहोचल्यावर एक पाषाणात कोरलेला भलामोठा नंदीही आहे. हे बोडकं देऊळही शाळेच्याच वाटेवर. शाळेत जाताना सुलतान नेहेमी या दगडी नंदीकडे पाहायचा. म्हणायचा, “शेट. नीट देका. ह्यो नंदी हाय ना, त्याची नजर देका.” मी टक लावून नंदीच्या डोळ्यांकडे पाहायचो. सुलतानच्या म्हणण्यानुसार त्या नंदीच्या नजरेचा वेध घेऊन नेमक्या ठिकाणी खोदलं तर एका प्राचीन अजगराची कबर सापडेल. ती कबर ज्याला सापडेल त्याला सुलतानच्याच भाषेत, “कवाच कसलीच कमी नाय परनार.” मी त्या नंदीच्या नजरेचा वेध घ्यायचा अनेकदा निष्फळ प्रयास केला. पण ती दगडी नजर समोरच्या नासक्या तळ्याच्या पलीकडे कधीही गेली नाही. हे मी सुलतानला सांगितलं असता तो म्हणाला, “मंग तल्यात खोदायचा. खाली बुरी मारून वंड्याशी जायचा आनी तल्यात खोदायचा.”

प्राणवायूच्या नळकांड्यांसह नासक्या तळ्याच्या बुडाशी सूर मारून कुदळफावड्यानं खोदकाम करत त्या प्राचीन अजगराची कबर शोधून काढल्याचं दिवास्वप्न त्यानंतर मी अगदी तारुण्याच्या उंबर्‍यात येईस्तोवर अनेकदा रंगवलं. पण कल्पनेतही काही केल्या त्या जुनाट कबरीचं स्थान मला सापडलं नाही. या पार्श्वभूमीवर मला सुलतानची प्रतिभा कायमच दैवी वाटते! जगातल्या सर्व प्रतिभा आणि कल्पना थिट्या पाडील असा कल्पनाविलास सुलतानकडे आहे. आज तीन दशकांचा पल्ला ओलांडूनही हा कल्पनाविलास पूर्णत: झिजलेला नाही. तक्रार एकच. सुलतानच्या प्रतिभेला आणि कल्पनाविलासाला विस्मरणाचा शाप आहे. आज रंगवून सांगितलेली घटना सुलतानला उद्या बिलकुल आठवत नाही. बोडक्या नंदीच्या घटनेनंतर काही दिवसांनीच मी पुन्हा त्या विषयासंदर्भात सुलतानला छेडलं, तर तो माझ्याकडे ‘वेडा की खुळा’ या नजरेनं पाहत मलाच समजावत म्हणाला, “असा काय नसतो शेट! ज्यानी कुनी तो नंदी दगरान कोरला त्यानी त्याच्या नजरेनी नंदीची नजर घरवली.” मी अवाक होऊन सुलतानकडे पाहत राहिलो. अर्थात सुलतानच्या या विस्मरणाच्या सवयीचीही सवय मला लवकरच झाली.

सुलतानच्या शाळाप्रवेशादरम्यानची एक ऐतिहासिक घटना सांगितल्याशिवाय सुलतानचरित्राला पूर्णता येणं निव्वळ अशक्य आहे. सुलतानचं पाळण्यातलं नाव गुलाम. याच नावानं त्यानं कौश्यातल्या उर्दू शाळेत प्रवेश घेतला होता. पण वर्गातली सगळी मुलं ‘गुलाम, गुलाम’ म्हणजे नोकर किंवा दास या अर्थानं सुलतानला डिवचत. सुलतानला हे सहन होत नसे. गावी आल्यावर इबू जेव्हा सुलतानला घेऊन मराठी शाळेत गेला तेव्हा शाळेत पाय टाकण्याआधी सुलताननं इबूला विचारले, “बाप, राजाला उर्दूमंदी काय म्हनतात?” इबू म्हणाला, “सुलतान.” यावर सुलतान म्हणाला, “मंग आजपासून माजं नाव सुलतान.” सुलतानला मराठी शाळेत प्रवेश घेऊन देताना माझे वडील इबूसोबत होते. त्यांनी स्वत: हा किस्सा नंतर घरी येऊन आम्हा सगळ्यांना सांगितला. त्यामुळे तो शतश: खरा आहे यात मला किंचितही संशय नाही. आजही हा किस्सा आठवला, की माझ्या नजरेसमोर सुलतानच्या जागी आपल्या धीरगंभीर आवाजात हाच डॉयलॉग म्हणणारा अमिताभ बच्चन येतो. स्वत:च्या नावाच्या रुपानं का होईना, पण गुलामीचं आणि शोषणाचं जोखड जन्मत:च भिरकावून देणारा सुलतान हा मी पाहिलेलं विद्रोहाचं पहिलं जिवंत उदाहरण होता.

सुलताननं शाळेत प्रवेश घेतला खरा, पण त्याचं मन खर्‍या अर्थानं शाळेत कधीच रमलं नाही. सातत्यानं शाळेला दांड्या मारणं आणि गाव उनाडणं यातच सुलतानचे शाळेचे बरेच दिवस खर्ची पडले. शाळेत आल्यावरही शिकण्याऐवजी गुरुजींची कामं करण्यातच त्याचा सगळा वेळ जात असे. यात गुरुजींच्या घरकामापासून, शाळेतला कचरा काढणं, गुरुजींच्या अनुपस्थितीत वर्गात शांतता ठेवणं. अशा सर्व प्रकारच्या कामांचा समावेश होता. त्यातही गावातल्या धनिक आणि प्रतिष्ठित माणसांच्या मुलांनी कधी शाळेत चड्डी पिवळी केली तर बाहेर नेऊन त्यांना स्वच्छ करणं आणि मग वर्ग साफ करणं ही सुलतानची खासियत बनली. मास्तरांची कामं करून सुलतान कसाबसा एक-दोन इयत्ता पुढे सरकला, पण पुढचं शिक्षण त्याच्यासाठी अशक्य होतं. सभोवतालच्या जगात जिथं मुलं किंबहुना शाळेतच जात नसत तिथे पाचवी-सहावीपर्यंतचं शिक्षण घेणं म्हणजे सुलतानसाठी उच्चशिक्षण घेण्यासारखंच होतं. सुलताननं लवकरच शाळा सोडली आणि तो इबूच्याच हाताखाली आमच्याच गाडीवर क्लिनर म्हणून काम करू लागला. दरम्यान घशाच्या कर्करोगानं इबू गेला. तोवर सुलताननं ड्रायव्हिंग लायसन्स मिळवलं होतं आणि तो आमच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून रुजू झाला होता. यथावकाश सुलतानचे दोनाचे चार हात झाले. पुढे चाराचे आठ व्हायलाही वेळ लागला नाही. मधल्या काळात माझे वडील अचानकच हृदयविकारानं दगावल्यामुळे आमचा बिल्डिंग मटेरियल ट्रान्स्पोर्ट आणि सप्लायरचा व्यवसायही डगमगला. कालांतरानं तो पूर्णच बंद पडला. सुलताननं काही काळ इतरांकडे चाकरी केली. पण तिथे तो फार काळ रमला नाही. जेमतेम दोन हजार रुपये पगार. घरात बायको, दोन मुलं आणि सावत्र आई. सोबतीला विडीकाडी-गुटखा, क्वचित एखादी क्वार्टर अशी व्यसनं. बायको सकाळी सांजण्या, पैलवान आणि पुरणपोळ्या वगैरे बनवून थोडाफार हातभार लावायची, पण त्यातही सारं भागणं तसं कठीणच होतं. ड्रायव्हिंग शिकायचं आणि मग ‘भायेरगावी’ म्हणजेच आखाती देशात जायचं हे कोकणातल्या प्रत्येक मुस्लीम तरुणाचं स्वप्न असतं. सुलताननं न पाहताच हे स्वप्न स्वत:हून त्याच्या पायाशी चालून आलं. कुवेतमध्ये काम करणार्‍या सुलतानच्याच साडवानं सुलतानला व्हिजा पाठवला आणि सुलतान नोकरीसाठी आखातात रवाना झाला. सुलतान नोकरीसाठी आखातात रवाना झाला आणि वर्षाभरात परतही आला. परत आला म्हणण्यापेक्षा मालकाच्या मुलाला मारहाण केल्याच्या आरोपावरून त्याला आखातातून शिस्तभंगाच्या कारवाईखाली हद्दपार करण्यात आलं. सुलतान नोकरीवर रुजू होताक्षणी कफिलनं, म्हणजेच त्याच्या तिकडच्या मालकानं म्हणे त्याला उंटांची निगा राखायचं काम दिलं होतं. उंटांना आंघोळ घालण्यापासून त्यांचं अंग पुसणं, त्यांना जेवूखावू घालणं अशी सगळीच कामं. या कामांच्या रगाड्यात सुलतानचा जीव जात असे. एवढं करून कफिल कधीही सुलतानच्या कामावर समाधानी नव्हता. एकदा रात्रभर उंटांचं हगणंमुतणं काढून पहाटे उशीरा झोपलेल्या सुलतानला कफिलच्या मुलानं लाथ मारून उठवलं. सुलतानच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यानं कफिलच्या मुलाला बदडून काढलं. कफिलनं पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी सुलतानला अटक करून भारतीय दूतावासाला कळवलं आणि दोन दिवसांतच सुलतानला कुवेतहून भारतात जाणार्‍या विमानात बसवण्यात आलं.

Sultan Pednekar by Girish Sahasrabuddhe

मधल्या काळात कल्पित अद्भुतिका सांगण्याचं सुलतानचं कसब मागे पडलं असलं तरी अद्यापी ते पूर्णतः वांझोटं झालेलं नाही. त्याचा कल्पनाविलास आजही अध्येमध्ये त्याच्या बोलण्यातून उतू जातो. कोकणातल्या मुस्लीम मोहल्ल्यात राहून कमावलेल्या आपल्या अवीट गोड भाषेत उंटांच्या अनेक शारीरिक वैशिष्ट्यांसह सुलतान त्याच्या अद्भुत अरबी कहाण्या मोठ्या खुबीनं रंगवून सांगतो. यात उंटांच्या खाण्यापिण्यासह हगण्यामुतण्यापासून ते त्यांच्या मैथुनापर्यंतच्या अनेक बारकाव्यांचा समावेश असतो. उंटांची वर्णनं करण्यात सुलतान एखाद्या परदेशी प्राणीनिरीक्षकाला सहजच धोबीपछाड देईल. मद्याचे चार घोट पोटात गेले, की सुलतान शारीरिक प्रात्यक्षिकांसह उंटांच्या मैथुनाचे असे काही बारकावे वर्णन करून सांगतो, की त्यापुढे वात्सायनाच्या कामसूत्रातली चौसष्ट आसनं म्हणजे किस झाड की पत्ती. पण सुलतानच्या या सार्‍या कसबांची किंवा वैशिष्ट्यांची यादी इथेच थांबत नाही. ‘फूल ना फुलाची पाकळी’ या न्यायानं सुलतानचं अगदी चिमूटभर योगदान मराठी साहित्यातही आहे.

एकदा मराठीतले एक लोकप्रिय लेखक माझ्या गावाकडच्या घरी पाहुणे म्हणून आले होते. तोवर माझ्या लिखाणाची सुरुवात किमान दशकभर भविष्यात होती आणि मराठी साहित्याविषयी कुतुहल असणारा वाचक एवढीच माझी स्वत:पुरती ओळख होती. दिवसभर त्या लेखक महोदयांनी भेटायला आलेल्या चाहत्यांशी मारलेल्या गप्पा, आमच्या घरातला चौसोपी आहार यामुळे आलेला शीण घालवण्यासाठी रात्र होताच हळुवार आवाजात माझ्या कानात मद्याच्या सोयीविषयी विचारणा केली. जवळपास किलोमीटरभर अंतराच्या परिघातही कुठे मद्याची विचारणा झाली, की सुलतानचे कान उंदराची चाहूल लागलेल्या मांजरासारखे विस्फारतात. अशावेळी सुलतान असेल तिथे आपले काळे ओठ फाकवत पांढरे दात दाखवून मनाला झालेला आनंद साजरा करत हसतो. साक्षात मालकांच्या घरात उच्चारले गेलेले हे शब्द ऐकून तर सुलतानची सारी गात्रंच विस्फारली. तोवर आमच्या घराच्या ओसरीवर निष्कारणच बसून असलेला सुलतान अचानकच सक्रिय झाला. सुलतानचा चेहेरा खुलला आणि तो माझ्या सूचनेची चातकाप्रमाणे वाट पाहिल्यागत घरातून येरझार्‍या मारू लागला. मधूनच माझ्याशी काही ना काही निमित्त काढून बोलू लागला. मी मद्याच्या सोयीविषयी काहीच सूतोवाच करत नाही हे पाहून लेखक अस्वथ झालेच, पण त्यांच्याहीपेक्षा जास्त अस्वस्थता सुलतानला आली. सुलताननं सरतेशेवटी न राहावून मला विचारलेच, “शेट, या सायबांची काय सोय?” मी त्यावर आपल्याला काहीच कळलेलं नाही असे भाव चेहेर्‍यावर आणताच सुलताननं अधिकच स्पष्ट पवित्रा घेतला, “नाय म्हंज्ये येवरा म्होटा मानूस आपल्या गावात येतो त्याला असा वाटाला नको, की आपला गाव मागास हाय. हितं कायच मिलत नाय.” सुलताननं थेट लेखकांसमोरच विषयाच्या सागोट्याला हात घातल्यानंतर मला काहीच बोलता येईना. मी मुकाट खिशातून पैसे काढून सुलतानच्या हाती सारले. सुलतानच्या चेहेर्‍यावर त्याक्षणी दशकाभरातला सारा आनंद आणि उत्साह एकवटला. मी हातात सारलेले पैसे खिशात कोंबत सुलतान दुडक्या पावलांनी बाजाराचा रस्ता चालू लागला. सुलतान परतला तेव्हा त्याच्या हातातल्या पिशवीत महागड्या दारुच्या दोन भल्यामोठ्या बाटल्या होत्या. मी दिलेल्या पैश्यात त्या प्रतीची दारू येणं शक्य नव्हतं. मी प्रश्नार्थक नजरेनं सुलतानकडे पाहिलं. एखाद्या गरिबाला मदत करणार्‍या धनिक माणसाच्या आश्वस्ततेनं सुलताननं माझ्याकडे पाहात ‘चिंता नको’ अश्या अर्थाची मान हलवली. रात्री जेव्हा साक्षात मद्यपानाचा कार्यक्रम आमच्या मागच्या अंगणात रंगला तेव्हा, सुलतानही या मैफिलीत आपल्या मांडीला मांडी लावून बसणार हे पाहून लेखक महोदयांची भिवयी चांगलीच वर गेली. त्यांनी तशी नाराजी माझ्याकडे स्पष्ट बोलूनही दाखवली. पण त्यांच्या नाराजीवर कोणताही प्रतिसाद देणं मला शक्य नव्हतं. बाटल्यांतलं मद्य पेल्यांत उतरलं तसे लेखक, नाईलाजानं का होईना, पण मांडी घालून बसले. पेल्यातले दोन घोट घश्याखाली गेले तेव्हा लेखकांची जीभ थोडी सैल झाली आणि जिभेसोबत त्यांनी जमिनीवर बसण्यासाठी घातलेली मांडीही. मग शास्त्रीय संगीताचे सुरेल संस्कार झालेल्या त्यांच्या आवाजात ते अचानकच गाणी म्हणू लागले. घश्याखाली उतरलेलं मद्य मेंदूपर्यंत पोहोचलं, तेव्हा लेखक सुलतानच्या खांद्यावर हात ठेऊन नाचायला लागले आणि त्यांनी सुलतानकडे पाहात “सुलतानभाय आपसे गुजारीश है, के आपभी कोई नज्म सुनाये.” अशी प्रत्येक नुक्त्यावर जोर देणारी खास उर्दुमय शिफारिश केली. त्यानंतर सुलताननं गाणी म्हटली. चकण्यासाठी आणलेलं भलं मोठं स्टीलचं ताट डफासारखं हातात धरत लेखकांनी त्या गाण्यावर ताल धरला. सुलताननं म्हटलेल्या गाण्यांत ‘डम डम डिगा डिगा’, ‘आयी आयी आयी आयी तेरी याद आयी’पासून अगदी ‘आय एम ए डिस्को डान्सर’पर्यंतच्या अनेक दशकांतल्या अनेक गाण्यांचा समावेश होता. सुलतान मद्यप्राशनानंतर गायक बनतो. त्याच्या मद्यगायनाची एक खासियत म्हणजे तो प्रत्येक गाणं कव्वालीच्या सुरात म्हणतो. याच मद्यांकित गायन मैफिलीत अचानकच जेव्हा लेखकांनी ‘मालवून टाक दीप’ म्हणायला सुरुवात केली, तेव्हा मात्र सुलतान क्षणभर थबकला. मात्र अश्या अचानक झालेल्या हल्ल्यानं डगमगून जाणार्‍यातला सुलतान नव्हता. ‘मालवून टाक दीप’च्या चार ओळी ऐकून सुलताननं त्या लागलीच मुखोद्गत केल्या. मग सुलतान आणि लेखकांत ‘मालवून टाक दीप’वर एक अनोखी जुगलबंदी सुरू झाली. त्यात सूर, ताल, राग, नाद अगदी सारं काही पणाला लागलं. मध्येच लेखकांनी ट्रॅक बदलत गोविंदाच्या ‘मैसे मिनासे ना साकीसे’वर ब्रेक डान्स करायला सुरुवात केली. ते एक अभूतपूर्व दृश्य होतं. मी आजवर ‘याचि देहि याचि डोळा’ पाहिलेल्या विस्मयकारक दृश्यांची यादी करायची झाली, तर हे दृश्य निश्चितच अग्रस्थान पटकावेल. त्यानंतर घडलेली घटना तर उभ्या मानवी इतिहासातल्या वर्ण, वंश किंवा धर्मभेदांना छेद देणारा पायंडा पाडणारी होती. उभ्या दीड-दोन बाटल्या पोटात रिचवल्यानंतर लेखक मागच्या अंगणातल्या चटईवरच आडवे झाले. अंगणात झोपलेल्या लेखकांकडे पाहून सुलतानला काही चैन पडेना. तो सतत त्याच्या जडावल्या जिभेनं काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत लेखकांकडे पाहत काहीबाही हातवारे करत राहिला. मग शेवटी लेखकांशेजारीच खाली टाकलेल्या चटईवर आडवा झाला. भल्या पहाटे उठून मी बाहेर आलो तेव्हा एखाद्या प्रेमीयुगुलाप्रमाणे लेखक सुलतानला मिठी मारून, एक पाय त्याच्या अंगावर टाकून झोपलेले मला दिसले. आयुष्य कृतार्थ करणारा तो क्षण टिपण्यासाठी त्या काळी मोबाईल नव्हते, अन्यथा समतेचा आणि एकात्मतेचा जगातला सर्वात मोठा संदेश आणि प्रत्यय देणारा तो क्षण मी कायमचा पुराव्यादाखल मोबाईलच्या कॅमेर्‍यात बंदिस्त करून टाकला असता.

सकाळी ताजेतवाने होऊन लेखक पुण्याला माघारी जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांच्या चेहेर्‍यावर रात्रीच्या कलासंगमाचा आनंद यशस्वी मधुचंद्रावरून परतलेल्या नवपरिणित विवाहितेसारखा ओसंडून वाहात होता. लेखकांच्या परतीच्या गाडीची वेळ झाली तरी त्यांचा पाय काही उंबर्‍याबाहेर पडेना तेव्हा मी प्रश्नार्थक नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं असता ते पुटपुटले, “सुलतानभाई कुणाला तरी घेऊन येणार होते.” लेखकांनी हे उद्गार काढायला आणि सुलतान आमच्या गावच्या माजी सरपंचांना घेऊन घरी यायला एकच गाठ पडली. आमच्या घराप्रमाणेच सुलतानचा या माजी सरपंचांच्या घरीही राबता असे. माजी सरपंचांनी शाल आणि श्रीफळ देऊन लेखकांचा सत्कार केला. त्यांच्यासोबत एक फोटोही काढला. यथावकाश लेखक पुण्याच्या परतीच्या गाडीत बसले आणि मी सुलतानकडे पाहत कपाळावर आठी आणली तेव्हा सुलताननं मला आदल्या दिवशीच्या संध्याकाळची रंजक कहाणी सांगितली. लेखकांना साधंसुधं मद्य पाजणं प्रशस्त न वाटल्यानं सुलताननं थेट माजी सरपंचांकडे जाऊन गार्‍हाणं गायलं होतं. आज आपल्या गावात केवढा मोठा माणूस आलाय याची त्यांना पूर्ण कल्पना देऊन त्यांच्याकडून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या तालुक्याच्या गावाहून खास उंची मद्य मागवण्याची व्यवस्थाही सुलताननं केली. माजी सरपंचांना स्वत: त्या मद्याचा उपभोग लेखकांच्या मांडीला मांडी लावून घ्यायचा होता; पण ‘ते बरोबर दिसणार नाही. आपल्या गावचे माजी सरपंच मद्यप्राशन करतात हा संदेश साहित्यविश्वात जाणे बरोबर नाही’ असं सरपंचांना पटवून देण्यात सुलतान यशस्वी झाला. परतीच्या वाटेवर मी सुलतानला ‘मी दारू आणण्यासाठी दिलेले पैसे काय केले?’ असं विचारलं असता तो निर्विकार चेहेर्‍यानं म्हणाला, “सरपंच असला मंगून काय झैला? राजकारनीच तो. लाच घेतल्याशिवाय थोरीच दारू पाजनार हाय?” सुलताननं रात्री आणलेलं मद्य मी दिलेल्या पैश्यांच्या किमान पाचपट महाग होतं. असं महागडं मद्य पाजायला लाचच घ्यायची असेल तर माजी सरपंचांनी त्या मद्याच्या किमान किंमतीएवढी लाच तरी घ्यायला हवी होती असे तर्काधारित प्रश्न सुलतानला कधीही पडत नाहीत.

लेखक महोदयांनी पुण्याला पोहोचताच मला फोन केला, तेव्हा ‘सुलतानला आवर्जून विचारलंय सांगा’ असा निरोप दिला. सुलतानच्या व्यक्तिमत्वापासून प्रेरित होऊन आपण एक कादंबरी लिहिणार आहोत असंही त्यांनी मला सांगितलं. दुसर्‍या दिवशी सुलतानकडे मी विषय काढताच सुलतान थुंकल्यासारखा म्हणाला, “छी! घानेड्डा मानूस.” माझ्या कपाळावर प्रश्नचिन्हांच्या आठ्या पडताच सुलतान उत्तरादाखल पुढे म्हणाला, “ मंग. येवरा म्होटा मानूस! माज्यासारक्या डायवरसोबत दारू पितो. शोबतो काय त्याला?”

सुलतान विरोधाभासाचं एक अजब रसायन होता.

सुलतानचा चरित्रपट मांडायचा झाला तर आठवणींची, किस्सेकहाण्यांची किंवा पात्रप्रसंगांची कमतरता कधीही पडणार नाही. स्वत: दु:खांनी किंवा समस्यांनी वेढलेला असला तरी सुलताननं सहवासातल्या माणसाला कायम हसूच दिलेलं आहे. सुलतानच्या या छोटेखानी चरित्रपटाची सांगता करताना सुलतानच्या आयुष्यातल्या दोन प्रसंगांची आणि त्या प्रसंगांतल्या सुलतानच्या भाषिक कसरतीची अगदी प्रकर्षानं आठवण होते.

पहिला प्रसंग होता सुलतान आखातातून परत आल्यानंतर काही वर्षांनी घडलेला. मी माझ्या एका परदेशस्थित मित्राला आणायला मुंबई विमानतळावर गेलो होतो. रात्रीची वेळ होती म्हणून ड्रायव्हिंग करायला सुलतान सोबत होता. परतीच्या प्रवासात सुलतानच्या तोंडची गिरण चालू झाली आणि त्या भारुडानं मित्र पार भारावून गेला. मध्येच मित्रानं सुलतानला विचारलं, “सुलतानभाई तुम्ही गल्फमध्ये कुठे होतात?” सुलतान म्हणाला, “कोईटला.” यावर मित्राच्या डोक्यात काहीच प्रकाश पडला नाही, तेव्हा सुलतान त्याच्याकडे विचित्रश्या नजरेनं पाहात म्हणाला, “कोईट नाय म्हाईत तुमाला? सद्दाम हुशेननी अ‍ॅटॅक केलेला ना तो कोईट.” मित्राला कळलं, की सुलतान कुवेतला कोईट म्हणतोय. त्यानं हसून पुढे विचारलं, “ तिथे काय काम करायचा तुम्ही?” सुलतान म्हणाला, “ मी तिथे उट धुवायचो.” काहीही न बोलता मी मागच्या सीटवर शांत बसून होतो. उट म्हणजे काय याविषयी मित्राला काही अदमास लागेना तेव्हा सुलतान माझ्याकडे वळून वैतागत म्हणाला, “ काय शेट तुमचे हे दोस्त, अशे अरानी (अडाणी)!” मग मित्राकडे पाहत समजावून सांगण्याच्या स्वरात सुलतान म्हणाला, “तुम्हाला उट नाय माहीत? उट. त्यांची पेन्शिल ठेवायची कंपासपेटी नसते?” सुलतानच्या या वाक्यानं मित्राच्या मेंदूत सहस्र कोटी सूर्यांचा प्रकाश पडला. “अच्छा कॅमल? तुम्हाला उंट म्हणायचंय?”

मित्रासाठी ती युरेका मोमेंट होती!

पुढचा प्रसंग इबू म्हणजे सुलतानचा बाप गेला तेव्हाचा. बराच काळ अंथरुणात खिळून राहिल्यानंतर इबू जेव्हा अल्लाला प्यारा झाला, तेव्हा मी आणि मोठा भाऊ सुलतानला भेटायला त्याच्या घरी गेलो. वेळ दु:खाची होती. आम्ही बराच वेळ बसून उठेस्तोवर सुलताननं ती निभावलीही; पण घराबाहेर पडतापडता सुलताननं भावाला घट्ट मिठी मारली आणि तो गदगदल्या स्वरात म्हणाला, “काय करनार शेट? शेवटी देव तारी त्याला कोन मारी!” आवाक झाल्यागत, हसावं का रडावं हे न कळून मी आणि भाऊ आम्ही दोघंही घरी परतलो. घरी आल्यावर दोघांच्याही चेहेर्‍यावर हास्याची एक रेघ उमटलीच.

आपली भाषा आणि हसू या दोन नैसर्गिक गुणांच्या बळावर सुलतान स्वत:चं आयुष्य रेटण्यात यशस्वी ठरलेला आहे. सुलतानची भाषा हा वैचित्र्य, विरोधाभास आणि अतिशयोक्तीनं ओतप्रोत भरलेला एक मौलिक अलंकार आहे. अतीव दु:खांच्या, दुर्धर समस्यांच्या किंवा अस्वस्थपणाच्या दोलायमान काळात सुलतानच्या सहवासात दिवस थोडे सौम्य भासतात हा माझा अनुभव आहे. आजवरच्या मी मनावर मोहीनी पाडणार्‍या अनेक स्त्रियांच्या हास्यप्रतिमा पाहिलेल्या आहेत. कित्येक सौंदर्यवतींच्या गालावर पडणार्‍या खळ्यांवर मोठमोठ्या भाषाप्रभूंनी उपमा-अलंकारांची केलेली पखरण वाचलेली आहे. पण हसू म्हटलं की खर्‍या अर्थानं मला सुलतान आठवतो. सुलतानचं हसू जगातल्या या सार्‍या हास्यांना फिकं पाडणारं आहे. सुलतानचं हसू तुम्हाला आश्वस्त करतं. सुलतानचं हसू तुम्हाला शांत करतं. सुलतानचं हसू तुमच्या आतल्या खळबळीला स्वस्थ करतं. सुलतान हसतो तेव्हा ग्रहण सुटल्यासारखं स्वच्छस्वच्छ वाटायला लागतं. सुलतानचं हसू मोनालिसाच्या स्मितासारखंच दैवी, गूढ आणि मोहक आहे. ते अजरामर व्हावं अशी सुप्त इच्छा सुलतानला ओळखणार्‍या प्रत्येकाच्याच मनात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या नांदत असेल, याबद्दल मला शंका नाही.

हृषीकेश गुप्ते
---------
ऋणनिर्देश : लेखमालेतील काही भाग 'अक्षरधारा' मासिकात पूर्वप्रकाशित झाले होते.
रेखाचित्र : गिरीश सहस्रबुद्धे

कोकणातले मासले भाग २ - जिताडेबाबा
कोकणातले मासले भाग ३ - जयवंतांची मृणाल
कोकणातले मासले भाग ४ - खिडकी खंडू
कोकणातले मासले भाग ५ - मॅटिनी मोहम्मद

(हृषीकेश गुप्ते यांनी लिहिलेली ही व्यक्तिचित्रांची मालिका २०२० साली लॉकडाऊनच्या काळात 'ऐसी अक्षरे'वर प्रकाशित झाली आणि बरीच गाजली. आता त्यावर पुस्तक येत आहे त्यामुळे लेखकाच्या इच्छेनुसार एक लेख वगळता इतर लेख अप्रकाशित केले आहेत. - ऐसी अक्षरे)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

झकास आहे! आणखी लिहा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मस्त!
थोडं बारकाईनं पाहील्यास तुझ्या हाकामारी, शोले... आणि इतरही काही कथांची मुळं दिसली न दिसलीशी वाटतात Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पूर्वीच वाचले होते. प्रतिक्रिया द्यायची राहून गेली. छानच आहे.
व्यक्तीचित्र हा साहीत्यप्रकार तुमचा हातखंड आहे असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0