लॉकडाऊनचा कोव्हिड-केसेसच्या आकड्यांवर होणाऱ्या परिणामाचं विश्लेषण.
कल्याण-डोंबिवलीत २ जुलैपासून सुरू असलेले लॉकडाऊन १९ जुलैला संपणार आहे. ह्याआधी ते १२ जुलैला संपणार होते. पण ११ जुलैला ते अजून सात दिवस वाढवले गेले. ११ आणि १२ जुलैला अनुक्रमे ६१५ आणि ६६१ केसेस आल्याने हा निर्णय योग्यच वाटला. त्यानंतर २ दिवस, सोमवार १३ जुलै, मंगळवार १४ जुलै, केसेस पडत्या होत्या, अनुक्रमे ४२७ आणि ३३६. मग मग २ दिवस त्या परत वाढत आहेत. शुक्रवार-शनिवारी (१७-१८ जुलै) महानगरपालिका लॉकडाऊन वाढवायचा कि नाही हा निर्णय घेईल.
निर्णय हे पुराव्यांवर आधारित असावेत, भावनांवर नाही. कोव्हीड-१९ च्या बाबतीत पुरावे म्हणजे आकडेवारी. पण आकडेवारी ही केवळ आहे तशी बघून चालत नाही.
उदाहरणार्थ- २ जुलैच्या लॉकडाऊनचा फरक पहायचा असेल तर कोणत्या तारखेपासून पाहावा?
आता २ जुलैला एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाव्हायरसने शिरकाव केला तर ८ जुलैला आपण टेस्ट करून घ्यावी अशी लक्षणे दिसायची शक्यता आहे. मग टेस्ट करायची तयारी आणि त्याचा positive निकाल मिळायला पुढचे काही दिवस . म्हणजे साधारण १० दिवसांनंतर अशा व्यक्तीच्या शरीरातील विषाणू आपल्याला आकड्यातून कळेल. जसे खगोलशास्त्रात आपल्याला दिसणारा तारा हा काही शे-हजार वर्षांपूर्वीच्या अवस्थेत दिसतो तसं आपलाल्या दररोजच्या आकड्यातून काही दिवस अगोदरपर्यंतचा कोव्हीडचा प्रसार कळतो.
अर्थात जर व्यक्ती मनाप्रमाणे तपासणी करून घेऊ शकली तर हा १० दिवसांचा कालावधी कमी होईल. पण अजून आपण त्या अवस्थेत आलेलो नाही.
तर २ जुलै पासून कल्याण-डोंबिवलीत सुरू असलेल्या लॉकडाऊनचा प्रभाव कळायचा असेल तर १२ जुलै पासूनचे आकडे पहावे लागतील.
मी सोबत दोन ग्राफ जोडले आहेत.
त्यातल्या आकृती-१ मध्ये १२ जुलै ते १६ जुलै २०२० ह्या कालावधीसाठी केलेला अंदाज (forecast) आहे. ह्यातली तांत्रिक बाजू मी इथे समजावत नाही. हा अंदाज बांधताना ११ जून ते ११ जुलै ह्या ३१ दिवसातील माहितीचा उपयोग केलेला आहे. हेच दिवस का? तर अनलॉक-१ जे १ जूनपासून सुरू झाले त्याचा परिणाम ११ जूनपासून दिसू लागला (वरचाच १० दिवसांचा तर्क) आणि २ जुलैपासून कल्याण-डोंबिवलीत परत लॉकडाऊन आले, ज्याचा परिणाम १२ जुलैपासून दिसणार आहे. अंदाज बांधताना असे गृहीतक आहे कि जर परत लॉकडाऊन झाले नसते तर काय केसेस सापडल्या असत्या.
निळ्या रंगाची रेषा आहे तो आहे मुख्य अंदाज. त्याच्या भोवती दिसणारा पट्टा हे दाखवतो कि जरी ह्या पट्ट्यातील एखादी संख्या आली तर ती मुख्य अंदाजासारखीच मानावी लागेल. आकृती-१ नुसार १२ जुलैची आकडेवारी अंदाजाहून जास्त आहे. पण त्यानंतर चारही दिवस ती अंदाजाहून कमी आहे. १५ आणि १६ जुलैला ती पट्ट्यात, मुख्य अंदाजाजवळ आलेली आहे, पण खालच्या बाजूला आहे.
एक गोष्ट इथे नोंद करायला हवी कि लॉकडाऊनच्या काळात स्क्रीनिंग सुरू झालेले आहे. स्क्रीनिंगमुळे काही दिवसांनी सापडले असते असे रुग्ण अगोदर सापडतात. स्क्रीनिंगमध्ये संशयित रुग्णाची पहिले antigen टेस्ट होईल, त्यात कोव्हीड-१९ ची शक्यता आढळल्यास मुख्य टेस्ट होईल. म्हणजे २-३ दिवसांत निकाल येईल. माझ्या माहितीतील रा.स्व.संघ जनकल्याण समितीचे स्क्रीनिंग ७ जुलैपासून सुरू झाले. म्हणजे ९ जुलैपासून तरी त्यात सापडणाऱ्या रुग्णांचा आकडा दिसायला हवा. त्यामुळे १२ जुलैपासून दिसणाऱ्या आकड्यांत हे स्क्रीनिंगमुळे आलेले आकडेही आहेत.
थोडक्यात जर स्क्रीनिंगमध्ये बरेच रुग्ण सापडत असतील तर लॉकडाऊनमुळे संक्रमणाचा वेग घटला आहे असे म्हणायला वाव आहे. माझ्या स्वतःच्या मते हीच शक्यता आहे.
एक अजून मुद्दा, ज्याची माहिती मला वैयक्तिक रित्या आहे, ती म्हणजे लॉकडाऊनमुळे उद्भवणारा लोकांच्या उदारनिर्वाहाचा प्रश्न. एप्रिल-मे महिन्यांत कल्याणातील काही वस्त्यांत धान्यवाटप करण्याच्या निमित्ताने माझा काही लोकांशी दूरध्वनीवरून संपर्क झाला होता. त्यातील दोघांनी मला मागच्या २ दिवसांत परत संपर्क केलेला आहे - आमच्याकडे धान्य नाही, काही मदत कराल का म्हणून!
ह्या सगळ्याचा विचार करता मी लॉकडाऊन वाढवायचे का नाही हा निर्णय घेणाऱ्या व्यक्तींना मी पुढील गोष्टी सुचवू इच्छितो.
१. केवळ दिसणाऱ्या आकड्यांवर जाऊ नका. न दिसणारे आकडे (आकृती-१ मधील निळी रेषा) लक्षात घ्या.
२. आकड्यांच्यापाठच्या उशीरही ध्यानात घ्या. २ जुलै ते १२ जुलै च्या लॉकडाऊनचा प्रभाव १२ जुलै ते २२ जुलैमध्ये दिसणार आहे.
३.लोकांच्या उदरनिर्वाहाची अवस्था बिकट होते आहे आणि केसेस जे असू शकत होते त्याहून कमी झाल्या आहेत असे दिसत आहे (आकृती-१) - त्यामुळे लॉकडाऊन सुरू ठेवणे हाच पर्याय आहे असे नाही. पर्यायही आहे!
४. स्क्रीनिंगचा परिणाम लोकांसमोर आणा. त्याचे दोन फायदे आहेत. पहिला, स्क्रीनिंगचा फायदा किती हे समजणे. आपण नुसतीच श्रेयांची गरम लढाई बघतो आहोत. आकडे आले कि उष्णता कमी आणि प्रकाश जास्त होऊ शकतो. दुसरा, लोकांना हा विश्वास येईल कि लॉकडाऊनचा परिणाम (एकूण आकडा वजा स्क्रीनिंगचा परिणाम) झाला आहे. अन्यथा दररोजच्या आकड्यांनी लॉकडाऊन प्रभावहीन आहे अशीच भावना प्रबळ होण्याची शक्यता आहे. (ही बाब अशक्य आहे असे नाही, पण तेही तपासायला काही दिवस थांबावेच लागेल.)
५. आकृती-२ ही पहा. १ जूनपासून मुंबई महानगर परिसरात (MMR) जे दळणवळण सुरू झाले त्याचा स्पष्ट परिणाम ह्या आकृतीत आहे. जर १ जून २०२० पूर्वीचीच अवस्था राहती तर कल्याण-डोंबिवली मध्ये जून महिन्यात २७९२ केसेस मिळाल्या असत्या. प्रत्यक्षात मिळाल्या किती - १०५४३!
हे का झालं? कारण १) मुंबईतील आणि २) कल्याणातील ऑफिसेस-दुकाने सुरू झाली आणि ३) काही प्रमाणात लोकल ट्रेन सुरू झाल्या. २ जुलैच्या लॉकडाऊनने ह्या तीनपैकी एकच घटक बंद केलेला आहे. बाकी दोन सुरूच आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचा प्रभाव मर्यादितच राहणार. त्यामुळे लॉकडाऊनकडून किती अपेक्षा ठेवाव्यात हेही नीट ठरवले पाहिजे.
मूळ प्रकाशन किरण लिमये ह्यांच्या ब्लॉगवर - दुवा
१)रोगावर औषध नसताना कोणत्या
१)रोगावर औषध नसताना कोणत्या गोष्टी केल्यास रोग आटोक्यात ठेवता येईल ही विश्लैषणं सरकारला निर्णय घेण्यास मदत करतात.
तुमची गणितं करा आणि आम्हास योग्य उपाय सुचवा हेच सरकार म्हणतं.
२)बंदी घालून इकॉनमी पार कोलमडली. त्यामुळे काही बंधनं पटली तरी अमलात आणत नाहीत.
३)आता इमारती बांधकामं सुरू झाली आहेत.
४) हार्डवेर , रंगाची दुकानं बंद होती कारण त्यांच्याकडे ही काम करणारे गिऱ्हाईक म्हणून येत असत. ती लोकं गावी गेली किंवा गप्प बसली आहेत.
५) मुंबईतील अत्यावश्यक सेवेत काम करणारा बराच कर्मचारी वर्ग इथे कल्याण डोंबिवली परिसरातून येतो आणि ते रुग्ण वाढत आहेत. पांढरी कॉलरवाले घरी बसू शकतात.
--------------------------------
वाचतोय आणि विचार करतोय.