स्वयंपाकघर आणि गृहिणी
जेव्हा एखादी मुलगी लग्न होऊन सासरी जाते, तेव्हा तिच्या कळत-नकळत तिची वेगळी छटा बहरत असते. ती व्यावसायिक असो, एखाद्या क्षेत्रात खूप उंच हुद्द्यावर असो, किंवा गृहिणी असो, ती पूर्ण वेळ स्वयंपाक घरात नसेलही, तरी तिचं, घरातल्या त्या भागाशी नातं तयार होत असतं. तिथली प्रत्येक वस्तू तिच्या स्पर्शाला ओळखू लागते आणि तीसुद्धा त्या वस्तूंना निव्वळ स्पर्शानं जाणू लागते. मग साखरेचा डब्बा घासल्यावर त्यात फक्त साखर ठेवायची, इतर कुठल्या पदार्थांची अगर सामानांची अदलाबदल झालेली तिला चालणार नाही, बेसनाचा डब्बा त्याच रांगेत, त्याच जागेवर असावा, उजव्या बाजूला मसाल्यांच्या बरण्या, डाव्या बाजूला कडधान्य आणि इतर वस्तू, जणू नकळत, तिचे ते उघड नियम बनत जातात, सगळ्यांना अर्थातच त्या पाळाव्या लागतात. कोणी त्यात ढवळाढवळ करायचा प्रयत्न केला किंवा नियम पाळले नाहीत, मग त्या व्यक्तीला ओरडा खाण्याशिवय दुसरा पर्याय उरत नाही. त्यामुळं, तिच्या आणि स्वयंपाकघराच्या नात्यात कोणी नाक न खुपसलेलं बरं.
मुलांना आणि नवऱ्याला वेगवेगळे पदार्थ करून घातल्यावर तिच्या चेहऱ्यावरचं तेज झळकू लागतं, तिला एक वेगळंच समाधान मिळतं. काही कारणास्तव तिला बरं नसलं आणि बाहेरून किंवा इतर कोणाकडून जेवण मागवायची पाळी आलीच, तर तिच्या मनाची चलबिचल होते.
पण मग मुलं तर मोठी होतात, खाजगी आयुष्यातही अनेक बदल घडतात. मुलांची लग्ने होतात, घरात सुना येतात. आणि तिची खरी गंमत, तिची खरी परीक्षा तेव्हाच होते. तिनं तिच्या इतक्या वर्षाच्या हक्काच्या स्वयंपाक घराची, आपली जागा घेणाऱ्या सुनेशी नातं जुळवावं लागतं. अशा वेळी सुरुवातीला तिला खूप तडजोडी कराव्या लागतही असतील. इतक्या वर्षांपासून आपलं स्वतःचं असलेलं कोणा दुसऱ्या व्यक्तीला देऊ करावं, ह्यासारख तिच्यासाठी कठीण क्वचित काही असावं. पण ही परिक्षासुद्धा ती पार करते, आणि हा वारसा पुढं चालू राहतो.
(हा विषय एखाद्या गृहिणीच्या दृष्टिकोनातून वळवायचा होता. अर्थातच स्वयंपाकघराशी नातं जुळण्यासाठी, लग्न झालंच पाहिजे असं नाही. पण त्याविषयी पुढं कधी..
आणखी एक राहिलंच. आजकाल जशा स्त्रिया उद्योग क्षेत्रात पुरुषांहून खूप पुढं पोहोचल्यात, पुरुषही स्वयंपाक करण्यात पाठी राहिले नाहीत. तो ही एक स्वतंत्र विषय.).
प्रतिक्रिया
अब आएगा मज़ा!
कॉलिंग अदिती...
(नाही म्हणजे, मीही हे मँटल थोड्या वेळाने उचलेनच म्हणतो, परंतु, आधी तज्ज्ञांनी यात हात घातलेला बरा. जेणूं काम तेणूं थाय...)
प्रयोग कुठला?
माझं लग्न झालं नाही, मी लग्न केलं. सबब हा धागा माझ्यासारख्या कर्तरी प्रयोगातल्या माणसांसाठी नाही. त्यामुळे मीही या विषयातली तज्ज्ञ नाही.
आपला पास.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अवांतर - तीन तासात बरेच धागे
अवांतर - तीन तासात बरेच धागे निघतायत अन्य संस्थळांवर आणि लोकांना ड्यु आयडीज चा त्रास होउन राहीलाय. आता हे बघायचय जर अशी वेळ ऐसीवर आली तर ऐसी प्रशासन कसे हाताळतात असे आय डी ज व त्यांच्या सुमार पोस्टस.
अपरिचित भाऊ/भगिनी हे अवांतर आहे बर्का. तुमचे चालू द्यात. तुमची पोस्ट भारी आहे.
तरीही
लोकाग्रहास्तव, किंवा 'न'वी बाजू आग्रहास्तव, ह्या घ्या थोड्या लवंग्या -
मी लग्न केलं.
मी लग्नाच्या आधी आणि नंतरही स्वतःच्या घरात राहते.
लग्न केलं तेव्हा आणि नंतर काही वर्षांनी काही काळ मी बेरोजगार होते.
बेरोजगार नव्हते तेव्हा मी माझ्यापुरते किंवा बरेच जास्त पैसे कमावते.
मी बऱ्या अर्ध्यापेक्षा जास्त शिकले आहे; आणि बऱ्या अर्ध्यापेक्षा जास्त प्रसिद्ध आहे.
स्वयंपाकघर म्हणजे जिथे खायला मिळतं ती जागा.
तिथे काही वस्तू कुठे ठेवायच्या याबद्दल मी आग्रही आहे, काही वस्तूंबद्दल बरा अर्धा आग्रही आहे.
स्वयंपाकघरापेक्षा जास्त वेळ मी बाहेर, बागेत आणि घरातल्या ऑफिसात घालवते.
मी स्वयंपाक करून कुणालाही खायला घालण्याची मला अजिबात हौस नाही. उलट कुणी माझ्या सूचनांनुसार स्वयंपाक करून मला खायला घातलं तर फार बरं होईल. पण माणसांना ट्रेन करणं सोपं नसतं; बरा अर्ध्याला फार प्रयत्नांनी शिकवलं आहे.
मला अत्यंत निरुपयोगी असण्याची आणि लोकांवर कमीतकमी बाबतीत अवलंबून असण्याची हौस आहे. जगा आणि जगू द्या.
अनेक बायकांना स्वयंपाक करून लोकांना खायला घालण्याची हौस असते. त्यातून त्यांना आनंद मिळत असेल तर मिळो, मला रोज सकाळी व्यायाम करून आनंद मिळतो. शिवाय सकाळी जिममध्ये हंक ट्रेनर असतो. म्हणून मी व्यायाम करते.
पोराबाळांचं लचांड मला नको वाटतं. ऑफिसात, किंवा बाहेरही कुणी माझ्याकडे 'ताई' म्हणून बघायला लागल्या की मला वारेमाप कंटाळा येतो.
तिर्री मांजरीला फक्त माझ्यावर अधिकार गाजवण्याचा हक्क मी दिला आहे. कारण तिर्री मांजरीवर संपूर्ण घराची जबाबदारी आहे.
॥जय जय तिर्री प्रसन्न॥
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अदिती, नाही, हा लेख
अदिती, नाही, हा लेख तुमच्यासाठी नाही..तुम्ही मनावर लावून घेऊ नका, बर्का..तुम्ही विक्षिप्तच बऱ्या
नाही लावून घेत...
तो प्रतिसादही तुमच्यासाठी नाहीच, 'न'वी बाजू आणि त्यांच्यासारख्या डांबरट लोकांच्या करमणुकीसाठी आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
विषय खूप साधा पण अतिशय स्फोटक
स्वयंपाक.
आता काय आहे लोकांचा आहार फक्त शहरांचा विचार करू कारण प्रश्न शहरात च उपस्थित जास्त होतात.
मुलांच्या tipin मध्ये.
चिप्स,सँडविच, जाम ब्रेड,आणि अगदी दुर्मिळ चपाती आणि भाजी.
Office ल जाताना.
काही ठिकाणी एक भाजी आणि चपाती आणि जास्त प्रमाणात काहीच नाही कॅन्टीन किंवा बाहेर खाण्याचा मार्ग मोकळा.
रात्री .
इथे पण पूर्ण जेवण खूप कमी घरात असते.
चपाती ,भाजी,भात, डाळ
खूप दुर्मिळ.
जास्त करून बाहेर किंवा पिझ्झा,नुडल्स,मॅगी,अनेक असेलच फालतू जेवण काही मिनिटात तयार होणारे
जेवण करणे हा काही खूप अवघड प्रश्न नाही पुरुष पण तीस मिनिटात उत्तम जेवण बनवू शकतात.
आज कालची लग्न होवून येणारी पोरगी अंबानी ची सून असल्यासारखी स्वप्न घेवून येते.
त्यांची स्वप्न आणि रिॲलिटी ह्यांच्या मध्ये सूर्य आणि पृथ्वी ह्या मध्ये. जेवढे अंतर आहे त्या पेक्षा जास्त अंतर असते.
अर्थातच राजेश. पुरुष असो,
अर्थातच राजेश. पुरुष असो, स्त्री असो, किन्नर असो. रस असेल, तर कोणीही सुगर, सुगरण बनू शकतं..
हो
स्वयंपाक बनवता येणे हे लिंग सापेक्ष नाही.रूढी ,परंपरा नी स्वयंपाक हा स्त्री नीच करायचा असतो हे लोकांच्या मनावर बिंबवल आहे.
बारा बलुतेदार पद्धती सारखी ही कुटुंबाच्या आतील बलुतेदारी आहे.
स्त्री पेक्षा पुरुष उत्तम स्वयंपाक बनवतात.
मोठ मोठ्या हॉटेल मध्ये पुरुषच अन्न पदार्थ बनवत असतात .
स्वयंपाक करणे गृहिणीला
स्वयंपाक करणे गृहिणीला जरूरीचेच असते.. निदान भारतात तरी. त्यात आवडी-निवडीचा विचार केलाच जात नाही.
स्वयंपाक हे एक जीवनावश्यक कौशल्य आहे... आणि प्रत्येकाला ते थोडेफार तरी अवगत असायला पाहिजे असे मला वाटते.
मी माझ्या मुलाला थोडेफार पाककौशल्य शिकविले.. थोडेफार तो आपणहून शिकला. फार नाही पण जरूरीपुरते अन्नं तो शिजवू शकतो. माझे वडिल, पति आणि भाऊ देखिल स्वयंपाकघराला अपरिचित नाहीत. परंतु परंपरेने हे स्त्रियांचेच क्षेत्र आहे.
ऑफीसमधे जेव्हा तुम्ही काम करता, तिथे तुम्हाला एखादी जागा , टेबल, आजकाल संगणक दिलेले असते. ते सर्व तुम्ही तुमच्या गरजेनूसार, आवडीप्रमाणे ठेवता/मांडता आणि त्यात कुणी बदल केलेला कुणालाच आवडत नाही. तुम्ही जिथे दिवसातले अनेक तास व्यतीत करता, ती जागा तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे मांडून घेता. तिथल्या वस्तु देखिल शक्यतो तुमच्याच गरजेनूसार निवडता.
तेच गृहिणीच्या बाबतीत देखिल खरे आहे. स्वैपाकघर हे तिचे कार्यक्षेत्र आहे. तिथे जास्तकरून तिचाच वावर असतो. त्यामुळे सहाजिकच ती तिच्या मतानूसार सारे काही आणते, ठेवते, लावते. त्यात काही बदल करायचा हक्कं देखिल फक्तं तिलाच असायला हवा. हे अगदीच नैसर्गिक आहे.
दोन पिढ्यांमधे संघर्ष होणे अटळ असते, कारण स्वत:च्या हक्कामधे वाटेकरी येणे अंमळ त्रासदायक होते. पण सगळ्याच घरात हा संघर्ष विकोपाला जात नाही. काही घरात तो छुपा असतो, आडून आडून बोलण्या,वागण्यातून प्रकट होतो. काहीवेळा उलट परिस्थिती देखिल असते. म्हणजे सुनेच्या घरी सासु, सासरे, दीर, नणंद रहायला येणे.
परंतु आजकाल एकत्र कुटुंब पद्धती फारशी दिसत नाही. आणि आश्चर्य म्हणजे, तरीही या कारणांवरून धुसफुस बघायला मिळतेच.
असो..
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
अगदी मनीषा. मलासुद्धा हेच
अगदी मनीषा. मलासुद्धा हेच वाटतं. स्वयंपाक करणे, न करणे, तो का न करणे हा मुद्दा नाहीच. मलासुद्धा इतका रस नाही ह्या क्षेत्रात. पण जेव्हा काही गृहिणींचं निरीक्षण करते तेव्हा त्यांच्या काम करण्याची पद्धत, स्वयंपाक घरातल्या प्रत्येक वस्तूला आपल्या मुली /मुलाप्रमाणं जपणं, आपल्या 'पेटंट' पद्धतीनं सगळं करणं, हे पाहताना गंमत वाटते. गृहिणी असो, किंवा ऑफिसमध्ये जाणारी/जाणारा असो. प्रश्न स्त्रीचा, पुरुष, किंवा किन्नराचा नाही. पण त्या घरातल्या भागाशी जोडलेल्या नात्याचा आहे.