फाल्को पेरेग्रायनस

#ललित #मन्वंतर #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२१

फाल्को पेरेग्रायनस

- आदूबाळ

एक

त्या लांबरुंद डाकबंगल्याला लांबरुंद व्हरांडा होता. त्याच्यापुढे एक चौकोनी जमिनीचा तुकडा होता. त्यात तंबू टाकून शोल्टो बसायचा. दिवसभर त्याच्या तंबूसमोर कमरेला फडकं लावलेल्या लोकांची रांग लागायची. त्या लोकांचा एखादा सरदार असायचा. आमच्या हायलँड्समध्ये क्लॅन चीफ असतात ना, तसा त्या मळक्या लोकांचा प्रमुख. कनाती लावलेल्या तंबूत शोल्टोसमोर एकेक जण जायचा. हे लोक सही वगैरे करू शकतील असं वाटत नाही. पण काहीतरी कागदावर करून द्यायचे. शोल्टो करून घ्यायचा. दिवसभर हेच चालायचं.

शोल्टो माझा आत्येभाऊ. माझ्यापेक्षा चांगला पंधराएक वर्षं मोठा असेल. आत्याच्या नवर्‍याने त्याला पब्लिक स्कूलमध्ये घातलं. पण युनिव्हर्सिटीपर्यंत काही तो पोचू शकला नाही. त्याच्याबद्दल इकडे काही बरं ऐकू यायचं नाही. आत्याचा नवराही कोणी मोठा जमीनदार वगैरे नव्हता – तो सिंगापूरला पोस्ट खात्यात होता. एकुलत्या एक पोराला इंग्लंडला पाठवून शिक्षण देण्याइतपत जमलं. पैसे आणि प्रेम संपलं, तेव्हा बॉम्बेच्या एका फर्ममध्ये त्याला नोकरी मिळवून दिली.

सोळाव्या वर्षी माझी प्रेप स्कूल संपली. आई म्हणाली, आता तुझ्या लग्नाची खटपट करायला हवी. बाबांनी टेकू दिला. त्यांना धडपडे कर्तबगार लोक आवडतात – आणि "कर्तबगार लोक कॉलनीत जातात, आणि नशीब काढतात" असं ते कायम म्हणत असत. "नाहीतर एवढ्या मोठ्या 'ब्रिटिश राज'चा आपल्याला उपयोग काय?" असा प्रश्न ते विचारत.

शोल्टोचं आणि त्यांचं कधी फारसं जमलं नाही, पण तो हिंदुस्थानात नोकरीला गेल्यावर एकदम लाडका झाला. त्यांच्या डोळ्यांसमोर हिंदुस्थानात, किंवा सिंगापूरमध्ये सरकारी नोकरीत असलेला कोणी होता. नाहीतर लेव्हांटमधला कोणी, अगदीच काही नाही तर बर्मा. नोकरी शक्यतो सरकारी हवी, पण तीही अपेक्षा सोडायला ते तयार होते. गेल्या युद्धाने त्यांचं मत बदललं असावं.

त्यांनी लगोलग शोल्टोला पत्र लिहिलं. शोल्टोचा तसा जम बसला होता – म्हणजे तेव्हा तसा समज होता. त्याच्या हिंदुस्थानात ओळखीही होत्या – परत : असं तोच स्वत: म्हणत असे. बाबांनी त्याला गळ घातली, बाबा रे, तुझ्या 'डियरेस्ट कझिन आयोना'चं लग्न जुळवायला मदत कर. चारपाच महिन्यांनी हिंदुस्थानातून त्याचं उत्तर आलं : 'वी आयोना' एवढी मोठी झाली? वा वा! तिला इकडे पाठवून द्या. माझ्याकडे राहील. इथल्या सोसायटीत वावरेल. क्लबांत येईल. ओळखी होतील, आणि अनुरूप कोणी मिळेलच. पाठवून द्या.

बाबांनी ऐकलं. त्यांना माहीत नव्हतं.

***

दोन

'शॅपरोन'ची मुलाखत बाबांनी स्वत: घेतली. आईने नेहमीप्रमाणे मान डोलावली. तिला नेहमीप्रमाणे तिचं मत नव्हतं. चांगली पोक्ती-पुरवती मिस हॉकिन्स बाबांना पसंत पडली. तिला मद्रासच्या एका शाळेत गव्हर्नेस म्हणून नोकरी मिळाली होती. त्या शाळेने बोटीचं भाडंही पाठवलं होतं, पण थर्ड क्लास!

"मी तसल्या लोकांबरोबर प्रवास करूच शकत नाही," नाक उडवत मिस हॉकिन्स म्हणाली. तिच्या कोटावर एका टोकदार चोचीच्या पक्ष्याच्या आकाराची ब्रूच पिन होती.

तिसर्‍या आणि दुसर्‍या वर्गाच्या बोटीच्या तिकिटातला फरक आणि बॉम्बे मद्रास पहिल्या वर्गाचं रेल्वेभाडं यावर मिस हॉकिन्स मला पत्करायला तयार होती. बाबांनी लगोलग मला तिच्या हवाली केलं.

प्रवासात मी मिस हॉकिन्सला त्या ब्रूच पिनबद्दल विचारलं.

"पेरिग्राईन फाल्कन," ती म्हणाली. "माझ्या एका विद्यार्थिनीने आपल्या मृत्युपत्रात माझ्यासाठी ही पिन लिहून ठेवली होती. इट्स स्ट्रेंज – मी त्या पोरीला फारशी ओळखतही नव्हते. एक दिवस लंडनमधल्या एका सॉलिसिटर फर्मने बोलावलं आणि ही पिन माझ्या हवाली केली."

"महागाची असेल ना!" मी म्हणाले.

"मला नाही वाटत. पिन मिळाल्या-मिळाल्या मी चौकशी केली – न्यू मार्केटमधल्या ज्यूलरने मला फक्त दहा शिलिंग देऊ केले! व्हाईटचॅपलच्या लॉजमध्ये तासाला तेवढे मिळाले असते," ती डोळे मिचकावत म्हणाली. "म्हणजे, मला जायची हौस असती तर!"

बॉम्बेच्या बंदरावर शोल्टो आम्हाला घ्यायला आला होता. शोल्टोचे काही फोटो घरी होते, त्यापेक्षा तो आता वेगळाच दिसत होता. नाजुक हनुवटी त्याने दाढीत लपवून टाकली होती, आणि त्या दाढीतही पांढरे केस उगवायला लागले होते.

शोल्टो हॉटेलात उतरला होता, कारण त्याची फर्म जरी बॉम्बेची असली तरी म्हणे शोल्टोचं काम बॉम्बेत नव्हतं. ते कुठेतरी आतल्या भागात होतं. "मफ़ऽसिल – यू विल लाईक इट," शोल्टो वारंवार म्हणत राहिला.

तीन दिवसांत शोल्टोने आम्हाला बॉम्बे दाखवलं. आमच्याबरोबर बॉम्बे दाखवायला एक अँग्लो मुलगी होती. 'रुबी' नावाची. दिसायला गोड होती एकदम.

"त्यांच्यातच असली नावं असतात. ज्युली, रोमा, शीला," मिस हॉकिन्स आपलं नाक उडवत म्हणाली. "तुझ्या भावाला सांभाळ – या चटकचांदण्या चिकटून बसतात."

पण इथे शोल्टोच लघळपणा करत होता, आणि रुबी त्याला फारसा भाव देत नव्हती. शोल्टो चिडत होता, कावत होता, आणि तिला आणखी चिकटू पाहात होता. लहानशा हालचालींतून, मानेच्या झटक्यांतून ती त्याला त्याची जागा दाखवून देत होती.

आणि ती जागा तरी काय होती? बॉम्बेच्या एका मोठ्या ब्रिटिश फर्ममध्ये शोल्टो डेप्युटी मॅनेजर होता. इथे आल्यापासून, म्हणजे गेली दहाएक वर्षं. रुबीच सांगत होती. त्याच्या हाताखाली काही इंडियन लोक होते; एकही युरोपियन नव्हता. तिकडून आलेली नवी नवी पोरं शोल्टोच्या हुद्द्याला रुजू व्हायची, आणि वर्षा-दोनवर्षांत वर-वर चढून जायची. फर्मची ऑफिसेस सगळ्या एशियात होती. तिकडे बदलून जायची, ब्रँच हेड बनून. शोल्टो आमचा तिथेच आला, तिथेच राहिला. रुबी फर्ममध्ये टायपिस्ट होती. त्या टायपिस्ट पोरींमध्ये जोक होता, की पाचेक वर्षांत शोल्टोला फर्निचरमध्ये जमा करतील.

शोल्टो आम्हाला एस्प्लनेडवर एका रेस्तरांमध्ये जेवायला घेऊन जात असे. तिथे बॉम्बेतले बरेच तरुण युरोपियन लोक यायचे. तरुण मुलं आणि मुलीही. शोल्टो घुम्यासारखा बसून राहायचा कोपर्‍यात. त्याची कोणाशी फारशी ओळख नव्हती. जणू तोही इथे प्रथमच येत होता. त्या मानाने रुबीच जास्त मोकळेपणाने वावरायची, तरुण पोरांबरोबर नाचायची. शोल्टो तिच्याबरोबर नाचायला पाहायचा. ती नकार द्यायची. नाचलीच, तर तिच्या हालचालीत एक लाकडी कठीणपणा जाणवायचा. जणू रुबीभोवती एक तेजाळ लाल माणिकवलय होतं, आणि शोल्टो त्यात शिरायचा केविलवाणा प्रयत्न करत होता. त्याचा वारंवार तेजोभंग होत होता, आणि नेमकं मिस हॉकिन्सने त्या जखमेवर मीठ चोळलं.

"हिच्यासाठी कोणी पाहून ठेवलंयस का, की..." मिस हॉकिन्स माझ्याकडे बोट दाखवत थोड्या कुजक्या आवाजात शोल्टोला म्हणाली.

आवाजातली खर शोल्टोला झोंबली.

"मी नोकरड्यांकडून हुकूम घेत नाही," चमचा टेबलवर फेकत तो मोठ्याने म्हणाला. "आयोना, तुझ्या नोकराणीला हे कळायला पाहिजे."

आसपासच्या टेबलांवरचे लोक बघायला लागले. लंडनमध्ये असलं काही झालं असतं तर बाबांनी शोल्टोला उभं आडवं तासलं असतं. चिडचिड करत शोल्टो रेस्तरांमधून चालता झाला.

नशिबाने तीन दिवसांतच मिस हॉकिन्सची मद्रास गाडी होती, त्यामुळे हा विषय फारसा वाढला नाही. मी तिचा निरोप घेतला. नाही म्हटलं तरी चारपाच महिने एकमेकांबरोबर राहून आपुलकी वाटतेच. माझ्या डोळ्यांत पाणी आलं. मिस हॉकिन्सने मला जवळ घेतलं, आणि माझ्या ड्रेसवर आपली फाल्कनची ब्रूच पिन लावली.

"नाही, नको नाही म्हणायचं!" तिने दटावलं. "तुला आवडली होती ना!"

"सगळं होईल ना नीट, मिस हॉकिन्स?" मी भाबडेपणाने त्यांना विचारलं.

"धिस इज अ बर्ड ऑफ प्रे. शिकारी पक्षी आहे हा," मिस हॉकिन्स म्हणाली. "कायम लक्षात ठेव, स्वत:ला मदत फक्त आपण स्वत: करू शकतो. मारणारे खूप असतात, स्वत:ला तारणारे आपणच. मे धिस बर्ड टीच यू दॅट."

मी डोळे पुसत असताना मिस हॉकिन्स माझ्याकडे एकटक बघत होती. बोलावं की न बोलावं असं द्वंद्व तिच्या मनात चालू असावं. नाही बोलली.

बोलली असती तर काय बोलली असती? पुढे घडणार्‍या घटना तिच्या अनुभवी दृष्टीला जाणवल्या होत्या का?

***

तीन

मफ़ऽसिलला पोचायला तीन दिवस लागले. आधी रेल्वेने, मग पालखीने. उंच डोंगर होते, आपल्या हायलँड्ससारखे. गर्द झाडी. त्याच्या मध्यावर हे मफ़ऽसिलचं गाव. त्या गावाच्या खाली कुठेतरी खाणकाम होणार होतं, आणि तो कोळसा बंदरापर्यंत वाहून न्यायला रेल्वे लागणार. जवळचा रेल्वेमार्ग पन्नास मैल लांब होता. तिथपर्यंत रेल्वेरूळ बांधायचं काम शोल्टो काम करत असलेल्या बॉम्बेच्या फर्मला मिळालं होतं. रेल्वे बांधायला जमीन लागणार होती. त्याचा हिशोब फर्मच्या अधिकार्‍यांनी केला होता. ती जमीन आता ताब्यात घ्यायची होती. पण त्यावर त्या मफ़ऽसिल भागातले लोक राहात होते, शेती करत होते. त्यांच्याकडून कागदपत्रांवर सही घेतल्याशिवाय फर्मच्या नावावर जमीन होणार नव्हती. हे काम अवघड नव्हतं, पण किचकट होतं. शोल्टोला हे कागदी घोडे नाचवायला फर्मने पाठवलं होतं.

मफ़ऽसिल भागातले बरेच लोक डाकबंगल्यापर्यंत यायचे. काही ठिकाणी शोल्टोला स्वत: जायला लागायचं. त्याला तो 'राउंड' म्हणत असे.

शोल्टो मलाही मफ़ऽसिलला घेऊन गेला. खरं तर त्याने 'एलिजिबल बॅचलर्स'ची रांग लावतो असं बाबांना पत्रात कबूल केलं होतं. हे सगळे लोक शोल्टोला कुठे भेटले काय माहीत : बॉम्बेला तरी तसल्या लोकांशी त्याचा काहीच संबंध नव्हता. आणि इथे मफ़ऽसिलमध्ये तर प्रश्नच नाही.

तसं हे मफ़ऽसिल जगापासून अगदी तुटलेलं नव्हतं. पंधरा मैलावर एक हिल स्टेशन होतं. पन्नास वर्षांपूर्वी, म्हणजे 'राज'च्या सुरुवातीच्या काळात या हिल स्टेशनवर आपले लोक पालख्या-मेण्यांतून यायचे. एकदा आले की चारचार महिने राहायचे.

"आता तिथे कोणी जात नाही," शोल्टो सांगत होता. "कारण बॉम्बेपासून जवळ तीनचार हिल स्टेशन्स झाली आहेत. आता त्या ठिकाणी फारसं काही नाही, जुने बंगले आहेत तीनचार. नेटिव्ह्ज तिथे कधीच राहायचे नाहीत, ते त्या डोंगराला काळा डोंगर समजतात. सिली सुपर्स्टिशन्स..."

मफ़ऽसिलमध्ये आल्यापासून शोल्टो वेगळाच वागायला लागला होता. त्याचा मनातली कोणतीतरी गाठ उलगडली होती जणू. बॉम्बेमध्ये भिरभिर हिंडणारे त्याचे डोळे इथे स्थिर झाले होते. त्यात काही खोल खोल दिसायला लागलं होतं.

सकाळी आम्ही एकत्र 'छोटी हाजरी' घ्यायचो. म्हणजे ब्रेकफास्ट. डाकबंगल्यात खानसामा आणि त्याची बायको राहायचे, तेच आमच्या तैनातीला. मग शोल्टो आपल्या कामाला लागायचा तो सूर्य बुडेपर्यंत. मी तशीच व्हरांड्यात बसलेली असायचे. समोर दिसायचा, काम करताना, पण इकडे बघायचाही नाही. दुपारी जेवायला कधी यायचा, कधी खानसाम्याकडून जेवण तंबूतच मागवायचा. त्या सरदार लोकांबरोबर जेवायचा, कधी. सूर्य त्या उंच उंच डोंगरांआड बुडाला की यायचा, आपल्या खोलीत जाऊन बसायचा. जेवायची वेळ झाली की मीच बोलवायचे. जेवून आम्ही गप्पा मारत बसायचो.

तो सांगायचा त्या आठवणी. इंग्लंडमधल्या त्याच्या शाळेच्या, मित्रांच्या आठवणी. बेकायदा 'हूच' बोर्डिंग हाऊसमध्ये नेल्याच्या, आणि डीनची तंबाखू चोरून ओढल्याच्या आठवणी. आणि स्वप्नं – आधी युनिव्हर्सिटीची, मग नव्या देशात जायची, फर्ममध्ये वर वर चढत जाऊन नाव पैसा सत्ता कमावायची स्वप्नं. त्या स्वप्नांना लागलेली कीड. फर्ममधलं राजकारण. सोबत खानसामा 'छोटा पेग' कायम पुरवत राहायचा.

"प्रत्येकाला एक 'गार्डियन एंजल' असतो बघ, आयोना. आपल्या डोक्यावर कायम छत्री असते त्याची. हाच एंजल आपल्याला आयुष्यात पुढे नेतो, धोक्यांपासून वाचवतो. माझा गार्डियन एंजल माझ्यासारखाच सामान्य असणार. अनरिमार्केबल. म्हणून मी जिथे होतो तिथेच राहिलो."

"आता या नेटिव्ह लोकांचा गार्डियन एंजल घे. इथे बसून कळत नाही. माझ्याबरोबर राउंडला चल कधीतरी. पिढ्यान्‌पिढ्या, वर्षानुवर्षं, ते जिथे राहिले तिथून आता फर्म त्यांना बाहेर हाकलणार. कारण : इथे सरकारला रेल्वे करायची आहे. फर्म त्यांच्या जमिनींच्या बदल्यात काहीतरी पैसे फेकणार, आणि तेही त्यांना मिळणारच नाहीत बहुतेक. त्यांच्या सरदाराच्या घशात जाणार. काय बोलतोय यावर यांचा गार्डियन एंजल? काहीही नाही, कारण तोही त्यांच्यासारखाच नेटिव्ह असणार."

"डु यू हेट देम?" मी विचारलं.

"हेट? नाही नाही!" शोल्टो हसायला लागला. "मला साला फरकच पडत नाही. आय ऍम जस्ट अ पेपर पुशर. हुकमाचा ताबेदार. फर्म सांगेल ते करणार. तरच प्रगती होते फर्ममध्ये."

"रुबी?" मी अशाच एका संध्याकाळी धीर करून विचारलं.

"ओह! दॅट प्रिटी हार्लट!"

रुबी आणि शोल्टो एकेकाळी फर्ममधलं गाजलेलं प्रेमप्रकरण होतं म्हणे. एका ख्रिसमस पार्टीत ते पहिल्यांदा एकत्र आले. रुबी तेव्हा फर्ममध्ये नवीनच आली होती. जवळजवळ सहा महिने ते एकत्र होते. इतके, की रुबी कित्येकदा शोल्टोच्या बॉम्बेमधल्या फ्लॅटवरच राहायची आणि थेट फर्ममध्ये यायची. हळूहळू तिला लक्षात आलं की शोल्टो ही गाडी फार लांब पल्ल्याची नाही. एके दिवशी तिने गाडी बदलली. शोल्टोच्या मनात कडवटपणा राहिला, आणि रुबीला परत मिळवायची अभिलाषाही गेली नाही. रुबीनंतर कोणी त्याच्या आयुष्यात आली नाही.

रुबीचा विषय बराच लांबला. त्याने अनेक छोट्यामोठ्या गोष्टी सांगितल्या. काही अत्यंत खाजगी. सांगू नयेत अशा. ऐकवल्या नाहीत अशा.

त्या रात्री माझ्या खोलीचा दरवाजा मध्यरात्री खडखडला. प्रथमच. तकलादू होता.

***

चार

स्वप्नं पडायला सुरुवात यानंतरच झाली. बहुदा त्या रात्रीपासूनच.

एक दृश्य कायम स्वप्नात दिसे. एक फाल्कन – माझ्या पिनवर होता तसाच – उंचच उंच आकाशातून विहरतो आहे. त्याचे डोळे अर्धवट उघडे, अर्धवट मिटलेले आहेत. खालच्या आकाशातून एक पक्षी एकटाच चालला आहे. फाल्कन सावध होतो. त्याच्या पंखांत ताठरपणा येतो. खालच्या पक्ष्याचा वेग ताडून पाहात तो आपला डावपेच ठरवतो. आपले पंख वाकडे करत फाल्कन वळतो – ठरवलेल्या ठिकाणी येतो, आणि पंख मिटून झेपावतो.

त्या बिचार्‍या पक्ष्याला तो फाल्कन दिसतो, पण झेप थेट त्याच्या अंगावर घेतलेली नसते, त्यामुळे पक्षी निर्धास्त राहातो. आपला रस्ता थोडासा बदलतो, आणि उडत राहतो. फाल्कन जवळजवळ त्याच्या पातळीवर येतो, आणि निमिषात स्वत:चा मार्ग बदलून, पंख पसरत त्या पक्ष्यावर झडप घालतो.

हे स्वप्न मला इतक्या वेळेला पडलं, त्याची गणतीच नाही. कधी मी शिकार झालेली पक्षी असे, कधी मी दुरून ही घटना बघणारा दुसरा पक्षी असे. पण मी कधीही ही शिकार थांबवू शकले नाही.

इकडे ऋतू बदलत होता. थंडीची चाहूल लागायला लागली. उंच पहाडांच्या मागून धुकं उसळायला लागलं. दिवसभर मफ़ऽसिलच्या खोलगट भागांमध्ये साचून राहायला लागलं.

अशातच एका पहाटे काळपट तपकिरी घोड्यावरून 'ती' आली. शोल्टो आपल्या खोलीत झोपला होता. पहाटेच्या प्रकाशात तिने घातलेला लाल पिवळ्या उभ्या धांदोट्या शिवून केलेला पायघोळ स्कर्ट ज्वाळेसारखा दिसत होता. तिच्या अंगावर भरडी शाल होती. गळ्यात वेगवेगळे मणी. तिचा चेहरा म्हटलं तर युरोपियन, म्हटलं तर इंडियन ठेवणीचा होता. उन्हाने रापून तिचा रंग तपकिरी झाला होता.

मी मंत्रमुग्ध होऊन डाकबंगल्याच्या कुंपणापर्यंत आले. तिने वाकून तिचा हात माझ्या हातात दिला. तिच्या हातातल्या जाड्या अंगठ्या मला टोचल्या.

"ससिमा," तिच्या गळ्यातून खरखरीत आवाज आला. मी बघत राहिले. तिला इंग्लिश येत होतं, पण भाषेला वेगळाच लहेजा होता. यापूर्वी मी कधीही न ऐकलेला.

आठवड्यातून एकदोनदा, त्याच पहाटेच्या वेळी, ती यायला लागली. नेहमी स्वत:बद्दल सांगायची. ससिमा त्या ओसाड हिल स्टेशनमध्ये राहायची. शेवटच्या काही ऍंग्लो लोकांपैकी होती. तिचा जन्म इथलाच होता. वडील ब्रिटिश होते, आई इंडियन. वडील कधीच सोडून गेले, आई काही वर्षांपूर्वी गेली. ससिमा घोड्यांवरून आसपासच्या गावागावात फिरायची. औषधपाणी द्यायची, भविष्य सांगायची.

मलाही स्वत:बद्दल सांगावंसं वाटायचं. इंडियामध्ये काय करण्यासाठी आले होते? 'मेमसाब' होण्याचं स्वप्न कसं दूर बॉम्बेला राहिलं. आणि इथे काय होऊन राहिले आहे. पण उजाडता उजाडता ससिमाला पुढे निघायला लागायचं. पुढच्या गावाकडे. माझ्याबद्दल बोलणं काढायला मलाच धीर झाला नाही.
पण तिला कळलं. कसं ते माहीत नाही, आपल्याआपण कळलं. मी न सांगता.
"हेल्प युवरसेल्फ, गर्ल," ती म्हणाली. "स्वत:ला मदत स्वत:च करायला लागते."
"पण कसं?" मी विचारलं.
पण मला उत्तर नको होतं. मला मिस हॉकिन्स आठवली. आणि तिने दिलेली पेरिग्राईन फाल्कनची ब्रूच पिन.

***

पाच

हल्ली शोल्टो मला राउंडलाही घेऊन जात असे. उंच डोंगरांतल्या खिंडींमधून छोट्या गावांमध्ये जायला लागायचं. माझ्यासाठी शोल्टोने एक साईड-सॅडल मागवून घेतलं होतं. दोघेच असायचो, रस्ते निर्मनुष्य : दुर्गम, कच्चे.

एक दिवस पहाटेच राउंडला निघालो. मला खरं तर जायचं नव्हतं. धुकं दाट पडलं होतं. अशाच धुक्यात ससिमा येते. पण शोल्टोच्या हुकमाची ताबेदारी न करण्यात अर्थ नव्हता. दोन वळणं घेतल्यावर डाकबंगला दिसेनासा झाला. नेहमीचा डोंगरी पट्टा सुरू झाला. एका बाजूला डोंगर, दुसर्‍या बाजूला दरी.

शोल्टो पुढे होता, मला त्याची पाठ दिसत होती. घोड्याच्या मागे दोन्ही बाजूंना खाकी दप्तरं लटकवली होती – शोल्टोच्या कामाच्या कागदपत्रांनी भरलेली. शोल्टो मागे वळून बघता तरी त्याला दप्तरांच्या आडचं काही दिसलं नसतं.

मी सहज वर पाहिलं. वर डोंगरातही आमच्या रस्त्याला समांतर जाणारा एक रस्ता होता. कदाचित हाच रस्ता वळून तिथे जात असेल. त्या रस्त्यालाही दुतर्फा झाडोरा होता, पण मधल्या मोकळ्या जागांमधून थोडं दिसत होतं. त्या रस्त्यावर एका घोड्याचं अंग तपकिरी चमकलं. पिवळ्या-तांबड्या धांदोट्या दिसल्या.

दीर्घ श्वास घेऊन मी पुढे पाहिलं. आमच्या उजव्या बाजूला डोंगर होता, आणि त्याला वळसा घालत रस्ता वर वर चढत होता. वळसा घालायचं वळण होतं त्या ठिकाणी जवळजवळ तीन बाजूंना दरी होती. खोल. धुक्याने भरलेली.

मी पंख मिटून घेतले, आणि ड्रेसला लावलेली ब्रूच पिन काढली. ती टाचायचा आटा सुटा केला, म्हणजे मागची लांब अणकुचीदार टाचणी हातात यावी. ब्रूच उलटा करून मुठीत घेतला. दहा शिलिंगांच्या त्या पेरिग्राईन फाल्कनने माझ्या अंगात आपलं बळ सोडलं. दोन बोटांच्या मधल्या भेगेतून टाचणी बाहेर आली.

पंख पसरून झडप घ्यायला आता थोडीशीच वाट बघायला लागणार होती. समोरचा घोडा वळण घ्यायची.

***

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

१. मफ़ऽसिल बोले तो mofussil काय?
२. ससिमा हे कसले नाव? (स्पेलिंग काय?)
३. फॉर्दॅट्मॅटर, शोल्टो हेदेखील क. ना.? (स्पे. का.?)
४. शेवटी नक्की काय घडले? आयोनाने शोल्टोला अ. प्रथम ब्रूचच्या टाचणीने (ढुंगणात?) भोसकूनबि. ब.नंतर मग दरीत ढकलूनबि. दिले की काय? (पण यात तिचा नक्की फायदा काय? आणि, ती पकडली जाणार नाही काय? विशेषकरून, इंग्रजी साम्राज्यावरचा सूर्य अद्यपि अस्ताचलाच्या जवळपाससुद्धा फिरकलेला नसताना? की ‘चलता है, ष्टोरी है’, म्हणून आपले खपवून घ्यायचे, झाले?)
५. अतिअवांतर: इंग्रजी साम्राज्यावरचा सूर्य पुढे नक्की मावळला कधी?

असो. कहाणी दिलखेचक झाली आहे खरी, परंतु, डोक्यावरून जाते, हेही तितकेच खरे.

==========

, विश्वामित्री संक्षेप.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोष्ट कळली नाही अस सांगायला खूप धैर्य लागते. ते सर्व धैर्य एकवटून मी पण म्हणतो कि मला पण समजली.नाही. आता आंधळ्यांनी हत्तीचे वर्णन करावे तसे न करता ते काम विद्वान लोकांवर सोडून देऊया.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथा आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेवट काय कळाला नाय. 'न'बांशी सहमत.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्यासारख्या सर्वज्ञाला हे कसे माहिती नाही?

१. Sholto हे स्कॅाटिश प्रथमनाम आहे. त्याचा अर्थ “पेरणारा”. Thaddeus Sholto नावाची व्यक्तिरेखा शर्लॅाक होम्स मालिकेतल्या The Sign of Four या कथेत मौजूद आहे.

२. ससीमा एका गावाचे नाव आहे. पण व्यक्तिनाम असल्याचे आढळत नाही, हे खरे.

३. आयोना घोड्यावर side saddle बसलेली असते, हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. माझ्या मते तिचा हेतू स्वत:च्या घोड्यास उधळवून आत्महत्या करण्याचा असावा.

गोष्ट अप्रतिम जमली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

पण साईन ऑफ फोर मध्ये शॉल्टो आडनाव आहे.

आयोना आत्महत्या करते म्हणले तरी गोष्ट समजली नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

की आयोना तो ब्रूच शाल्टोच्या सदऱ्याला { ओल्या धुक्यात} लावून नवरा म्हणून स्विकारते.
"आपली शिकार आपणच शोधायची. "

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयोना घोड्यावर side saddle बसलेली असते, हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. माझ्या मते तिचा हेतू स्वत:च्या घोड्यास उधळवून आत्महत्या करण्याचा असावा.

युअरोपिअन स्त्रियांत घोड्यावर एका बाजूस पाय टाकून बसण्याची पद्धत सामान्य होती. ( संदर्र्भ - The Tale of the Horse - by Yashaswi ni Chandra. ) भारतीय स्त्रिया मात्र पुरुषी पद्धतीने घोडेस्वारी करीत. हौसेसाठी किंवा लढाईसाठी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथा आवडली. आता शेवटाचा अर्थ ज्याने त्याने आपल्यापुरता काढावा. पण वाचता वाचता, अचानक दरीत फेकून दिल्यासारखे वाटले खरे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथा फार आवडली.
वाचक म्हणून मी वेगवेगळे फ्लुइड अर्थ काढेन... दोन एक दिवसांनी बदलेनही.
हा कथेचा जयच म्हणता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि हे विसरलो...
तो १९०० च्या आसपासच्या ब्रिटीश इंडियाच्या काळाचा तुकडा फार छान उभा केला आहे.
(स्वत: होतकरू लेखक असल्याने कदाचित म्हणतोय) ती खुप कठीण आणि इम्प्रेसीव्ह कारागीरी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या कथेचा फॉर्म असाच असु शकत होता. दुसर्‍या कुठल्या मार्गाने ही गोष्ट सांगता आली असती असे वाटत नाही. गोष्ट छोटीशीच आहे पण बिटविन द लाईन्स फार मोठा अवकाश आहे. कथेची पात्रे क्विक स्केचेससारखी असली तरी त्यांच्यामागच्या बाजूला कॉलनीचा एक विस्तारीत कॅन्व्हास आहे आणि तो पोस्टकॉलनीयल सिनेमां पाहिलेल्यांना वेगाने उभा करता येतो, आणि त्या पार्श्वभुमीवर कथेचे रसग्रहण करण्यासाठी मदत करतो. अर्थात हे सगळ्यांना सारख्याच पातळीवर इमॅजिन करता येईल असे नाही. पण मीरा नायरचे सिनेमे, सुटेबल बॉय, किंवा तशाच कलाकृतींमधल्या सेपीया टोन मध्ये क्लायमेट चेंज पुर्वीचा भारत इमॅजीन करता येईल. वसाहतीची पार्श्वभुमी असणार्‍या अनेक कथात्मसाहित्यात माणसांची बरीच वर्णने येतात पण त्यातला भारतीयांचा ब्रिटनसंदर्भातला रोष किंवा ब्रिटीशांचा भारतीयांवर असलेला अधिक्षेप आपल्या पुर्वाग्रहांसह तसाच रहातो, त्यामुळे एकच एक माणसांची प्रामाणिक गोष्ट फार कमी वेळा सापडते. मराठीत ह्यापुर्वी असे काही वाचल्याचे स्मरत नाही (मराठी वाचनही तसे कमीच आहे.)

ह्यापुर्वी संतोश सिवनच्या 'बिफोर द रेन्स' मध्ये अशाच काही फ्रेम्स आल्या आहेत ज्याचा उपयोग ही कथा वाचतांना नक्कीच होतो. त्या सिनेमाची कथाही पुर्वाग्रह उभे न करता माणसांची गोष्ट सांगणारी होती. ह्याशिवाय इस्मत आपा चुगताईची 'हिंदुस्तान छोड दो' देखील आठवली ज्यात इस्मत आपांनी एका ब्रिटीश पुरुष पात्रालाही वाचकांची सहानुभूती मिळवून दिली होती.

व्यक्तीगत व्यासंग अधिक विस्तारीत असलेल्यांना ही कथा भावेल पण ती मासेस साठी नसुन क्लासेससाठीच आहे हे नक्की. ब्रिटीश साहित्यात क्लासेससाठी बरेच साहित्य प्रसविले गेले आहे, मराठीतही असेल पण ब्रिटीश क्लासिक गोष्ट मराठीत सांगण्यासाठी विशेष कौशल्य लागते हे इथे निश्चितपणे दिसून येते. कथा वाचतांना काहींना त्यातली आकस्मिकता भावू शकते तर काहींचा रसभंग होउ शकतो, बट अगेन इट्स टोटली डिपेंड्स ऑन द ईंडीविज्युअल.

ऐसीअक्षरे हे फेसबुक नाही त्यामुळे 'दिर्घ लिहा' असे लेखकाला म्हणणार नाही. पण जम्पकट्स, कल्चरल कॅपीटल आणि निर्गव सहानुभुतीचा वापर करुन ह्याच सुत्राने एक चांगली कादंबरी किंवा दिर्घकथाही लिहता येईल. तर तशी अपेक्षा करतोय.

संतोष हा शब्द तामिळ भाषेतुन मराठीत आणायचा असेल तर तो संतोश असाच लिहायला हवा. त्यात मजा आहे. नेमकी कशी ते सांगता येणार नाही, कथेतल्या संदर्भांबाबतही तसेच असावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कॉलेजमध्ये असताना मी एक लघुकथासंग्रह वाचल्याचे आठवले. ब्रिटिश राज्यातील फुटकळ पदांवरील इंग्रजांनी त्यांच्या जगाबद्दल लिहिलेल्या कथा. त्या कथा मला आवडल्या इतपतच अंधुक आठवते, कुठली कथा नेमकी आठवत नाही. कदाचित जॉर्ज ऑर्वेलची हत्ती मारण्याची कथा त्या संग्रहात असेल. (किंवा नसेल.)
पण कथेपेक्षा मला संग्रहाच्या प्रस्तावनेतला एक मुद्दा लक्षात राहिला. त्या चिमुकल्या समाजाच्या वास्तवाच्या कथा एका प्रकारे अनाथ आहेत. इंग्लंडमधल्या वाचकांना "राज"च्या एक्झॉटिक वैचित्र्याची चटक असली, तरी त्या वास्तवात काही रस नव्हता. आणि भारतीय लोकांना या अलिप्त समाजाचे काय स्वारस्य वाटावे?
फॉर्स्टरची "पॅसेज टु इंडिया" कादंबरी, किंवा ऑर्वेलची "किलिंग ऍन एलिफंट" कथा विशाल मानवी वास्तव सांगतात, आणि या लेखकांनी इंग्लंडमध्ये राहून तिथल्या वाचकांना ओळखून रचना केली. ते वेगळे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथा पहिल्या दर्ज्याची आहे. बर्‍याच वर्षांनी कुणी तरी नव्या माणसाचं लखलखीत शंभर नंबरी वाचतो आहे. गेल्या वर्षीची गेंझट ही कथा वाचली नसल्यास वाचकांनी वाचावी. त्या नि ह्या कथेत डावं उजवं मला करता येत नाही. दोन्ही कथा आवडल्या.

कथेच्या लांबीबद्दल : माझ्यामते आहे हे परफेक्ट आहे. वाचकाने प्रत्येक वाक्य मनापासून वाचावं. एकेक वाक्य म्हणजे खानदानी गाण्याचं आवर्तन असावं, असा प्रत्यय लिखाणात येणं महत्त्वाचं. सध्या ते लहान पल्ल्याचं गाणं आहे. बडा ख्याल कदाचित लिहिता येईल. कदाचित गाडी छोट्या पल्ल्याच्या अंगाने पुढे जाईल. त्यातल्या मजेला महत्त्व. लांबीला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

या कथेत, ती पुनर्लेखन करुन दीर्घ केल्यास एका चांगल्या चित्रपटाची बीजे आहेत. कोणा चांगल्या डायरेक्टर पर्यंत पोचावयास हवी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शोधत येणार नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोष्ट आवडली.
एका अतिशय असाहित्यिक माणसाचं मत द्यायचं झालं तर -
मराठी कथा/कादंबऱ्या वगैरेंचा एक अवकाश असतो. त्यात भावना, शहरातलं तेचतेच जगणं (बिल्डिंगमधलं घर-नवरा-बायको-सासर-सासू-ऑफिस-सामाजिक कार्य-किंवा मग तोडफोड लैंगिक काहीतरी) , गावातलं जीवन (गरीबी, पिचलेपण, सामाजिक-आर्थिक विषमता) असल्या विषयांच्या गुरुत्वाकर्षणात लिखाण ओढलं जातंच

काहीतरी वेगळं - फँटसी वगरे नसलेलं आणि तरीही अस्सल भारतीय असं लिखाण त्यामुळे चमकून दिसतं.

अर्थात गोष्ट ह्या कारणासाठी आवडली असं म्हणणं म्हणजे रॅपर सुंदर दिसतो म्हणून चॉकलेट खाण्यासारखं आहे हे मान्य, म्हणूनच म्हटलं एकदम असाहित्यिक माणसाचं हे मत आहे.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही कथा-कादंबऱ्या म्हणून काय वाचलं आहेत, माहीत नाही. पण शक्यता अशीही असेल की त्यात नवीन खरोखरच काही नसेल, रँपर म्हणून नाही आणि आतला माल म्हणूनही नाही.

मला ललित लेखनातलं ढिम्म काही समजत नाही. पण ही कथा एकदा वाचून समजली नाही; पण पुन्हा वाचावी, आणि तिचा अर्थ लावावा अशी इच्छा निर्माण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथा आवडली.
पहिल्यांदा खूप भराभर वाचली, तेव्हा महत्त्वाचे तपशील निसटले Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The Autobiography of an Unknown Indian
Book by Nirad C. Chaudhuri.

शालेय पुस्तकात यातले एक दोन धडे असत.

कधीकधी कथा अशी नसतेच. त्या काळाचे चित्रण असते. एक प्रकारचा रंजक इतिहस आणि त्याची नोंद.

तसे घेऊ शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोष्ट अतिशय आवडली. सॉमरसेट मॉम ची आठवण देणारी. डोळ्यांपुढे आलं सगळं. गोष्टीत न कळण्यासारखे काय आहे ते मात्र नाही कळले.
(हरकत नसेल तर, उच्चार 'पेरेग्रीन' असा आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथा अतिशय सुंदर. खूप दिवसांनी अशी कथा वाचली. सॉमरसेट मॉमच्या शैलीची आठवण झाली. थोडी cold mountain ची पण आठवण झाली. चांगल्या अर्थाने . कॉपी म्हणून नाही.  मला वाटते आयोनाने शालटोला मारले, त्याचा घोडा उधळून लावून. वळणावरती त्याच्या घोड्याला पिन टोचून. कुणीतरी वर म्हटले तसे-- between the lines गोष्टींचा अवकाश मोठा आहे. तोच मला भावला. 

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0