भारताची "अग्नि"परिक्षा-भाग-२

भारताची "अग्नि"परिक्षा-भाग-२
लेखन आणि संकलन: सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)

१९ एप्रिल रोजी भारताने अग्नि-५ या लांब पल्ल्याच्या प्रक्षेपणास्त्राची यशस्वी चांचणी करून सध्याच्या सुरक्षा परिषदेतील इतर सभासदांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्या "पंक्ती"ला बसायचा सन्मान मिळविला! अशी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे बनविण्याची क्षमता फक्त पाचच राष्ट्रात आजपर्यंत होती: अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, आणि चीन. आता आपण सहावे असे राष्ट्र झालेलो आहोत. (शिवाय नेहमीप्रमाणे "इस्रायल" हे नांव कंसात असतेच, खरे-खोटे देव जाणे!) या आधी भारताने आग्नि-१ ते अग्नि-४ अशा चार प्रकारच्या प्रक्षेपणास्त्रांची चांचणी केली होती. या पाची प्रकारच्या प्रक्षेपणास्त्रांची आणि सध्या विकसन अवस्थेत भावी प्रक्षेपणास्त्रांची संक्षिप्त माहिती कोष्टकें आणि कांहीं आकृत्यांच्या रूपाने मी शेवटी दिली आहे.

या यशस्वी चांचणीवर अनेक देशांच्या सरकारांतर्फे तसेच प्रसारमाध्यमांतर्फे वेगवेगळ्या प्रतिक्रिया प्रसिद्ध झाल्या. त्यापैकी Stratfor या नियतकालिकातील "भारत चीन यांच्यातील कडवी स्पर्धा" हा रॉबर्ट काप्लान यांचा लेख उल्लेखनीय वाटला म्हणून त्या लेखावर आधारित एक लेख भारताची "अग्नि"परिक्षा (भाग-१) द्वारा मी इथे प्रकाशित केला होता. आता दुसरा भाग इथे देत आहे.

Stratafor प्रमाणेच Agence France Presse या वृत्तसंस्थेने यावर एक लेख लिहिला आहे व तो मला एक्सप्रेस ट्रिब्यून या पाकिस्तानी वृत्तपत्रात वाचायला मिळाला. या लेखात लिहिले आहे कीं भारताला या कामगिरीबद्दल वाटणारा अभिमान बिनबुडाचा नव्हता तर १०० टक्के सार्थ होता. त्यांच्या मते अग्नि-५ला "सामन्याचे नियम बदलणारे प्रक्षेपणास्त्र" (Game changer) असे म्हणायला हवे. हे प्रक्षेपणास्त्र ८० टक्के भारतीय बनावटीचे आहे आणि त्याचा पल्ला संपूर्ण चीन आणि त्याच्याही पलीकडे पोचेल असा आहे. या प्रक्षेपणास्त्रामुळे भारताचे दुस्साहसाविरुद्धच्या प्रतिकाराचे लष्करी सामर्थ्य (deterrence) खूपच सुधारले आहे. आतापर्यंत संपूर्ण चीन आपल्या हल्ल्याच्या क्षेत्रात आणणारी प्रक्षेपणास्त्रे आपल्याकडे कधीच नव्हती.

अग्नि-५ जरी एक तांत्रिकदृष्ट्या मोठी कामगिरी असली तरी चीनसारख्या बलाढ्य राष्ट्राशी बरोबरी करण्याच्या बाजूने टाकलेले एक चिमुकले पाऊल आहे असेच बरेच विशेषज्ञ समजतात. "आपण चीनच्या खूपच मागे आहोत. एकूण प्रक्षेपणास्त्रांची संख्या, पल्ला आणि गुणवत्ता या सर्व बाबींत चीन आपल्या खूपच पुढे आहे" असे एक संरक्षण-विशेषज्ञ आणि दिल्लीतील एका संरक्षणविषयक संस्थेचे ज्येष्ठ "फेलो" सी. राजामोहन यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले कीं प्रेक्षेपणास्त्रांच्या अशा प्रकारच्या प्रात्यक्षिकांवर लक्ष केंद्रित केले गेलेले आहे. म्हणजेच प्रक्षेपणास्त्रांबाबतचे धोरण शास्त्रज्ञ मंडळींकडे असून ते अद्याप सरकारकडे किंवा लष्कराकडे देण्यात आलेले नाहीं.

"आज अभिमानाने तिरंगा स्वत:भोवती लपेटून आपण आनंदोत्सव साजरा करू शकतो पण हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात कसे राबवायचे याबद्दलच्या खर्‍याखुर्‍या लष्करी डावपेचांची आपल्यात अद्यापही वानवाच आहे. अग्नि-५ ला सर्रास वापरासाठी लष्कराच्या हाती सोपवायला अद्याप बराच अवधी लागेल असे वाटते. तज्ञांच्या मते या प्रक्षेपणास्त्राचा अवकाशमार्ग, अचूकपणा आणि त्याची सर्वंकष क्षमता ठरविण्यासाठी अजून ४-५ वेळा त्याची चांचणी घ्यावी लागेल व त्यानंतरच त्याचे उत्पादन सुरू केले जाईल.

IHS Jane’s या संरक्षणविषयीच्या जागतिक संघटनेतील एक विशेषज्ञ राहुल बेदी म्हणाले कीं भारताचे राजकीय नेतृत्व तिच्या संशोधकांच्या या व अशा महत्त्वाचा संशोधनाचा फायदा घेण्यात अपयशी ठरले आहे.
"भारताची अण्वस्त्रांवर आधारलेली दुस्सहसांविरुद्धची प्रतिकारशक्ती आणि ती कशी वापरता येईल याबाबत भारताच्या नेतृत्वाकडे राजकीय दूरदृष्टीचा आणि आकलनशक्तीचा अभावच दिसून येतो. कारण आपल्या राजकीय नेतृत्वाकडे युद्धाच्या डावपेचांसंबंधीच्या ज्ञानाला खूपच मर्यादा आहेत" असेही बेदी म्हणाले.
अग्नि-५च्या यशस्वी आजच्या चांचणीने भारताची चीनला त्याच्या दुस्साहसांपासून परावृत्त करण्याच्या क्षमतेचा नीट वापर झाला नाहीं तर या चांचणीनंतरच्या हर्षातिरेकाचा भर ओसरायला फारसा वेळ लागणार नाहीं असेही बेदी पुढे म्हणाले. (यांची आणखी कांहीं विधाने पुढेही दिलेली आहेत.)
अग्नि या संज्ञेची ही प्रक्षेपणास्त्रे भारत आपल्या १९८३च्या संकलितपणे पथनिर्धारित प्रक्षेपणास्त्रांच्या (guided missiles) विकसनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून बनवत आहे. अग्नि-१ आणि अग्नि-२ ही तूलनेने छोट्या पल्ल्याची प्रक्षेपणास्त्रे भारताचा जुना प्रतिस्पध्याविरुद्ध-पाकिस्तानविरुद्ध-वापरण्यासाठी विकसित केलेली होती पण ३५०० किमीपेक्षा जास्त पल्ल्याची क्षेपणास्त्रे चीनविरुद्ध वापरण्यासाठी विकसित केलेली आहेत.
भारत व चीन या दोन्ही देशांची लोकसंख्या एक अब्जापेक्षा जास्त आहे आणि १९६२सालच्या युद्धातून निर्माण झालेला एकमेकांबद्द्लच्या अविश्वासाच्या इतिहासामुळे त्यांच्यातले संबंध बोचरे आहेत.
म्हणूनच चीनच्या परराष्ट्रखात्याने अग्नि-५च्या चांचणीची नोंद घेतल्याचे सांगितले पण त्यातून निर्माण होणार्‍या तेढीला मात्र मुद्दामच जास्त महत्व दिले नाहीं. "चीन व भारत हे दोन्ही उदयोन्मुख देश असून त्यांच्यात कसलीच स्पर्धा नसून ते एकमेकांना सहकार्य करतात" असे वार्ताहारांना सांगितले.
या चांचणीनंतर अग्नि-५ ने भारताला आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्रे असलेल्या देशसमूहात नेऊन बसविले आहे असे अभिमानाने सांगण्यात आले पण १९९८च्या अण्वस्त्र-चांचणीशी संबंधित एक शास्त्रज्ञ श्री के. संथानम् यांनी याहीपेक्षा जास्त पल्ल्याची प्रक्षेपणास्त्रे बनविण्याच्या योजनांमागच्या लष्करी प्रेरणेबद्दल आश्चर्य व्यक्त केले. "अग्नि-५ च्या पल्ल्याला डावपेचात समर्पकता आहे पण त्यापुढे जाणारी प्रक्षेपणास्त्रे कशाला? आपल्याला ती वॉशिंग्टनवर डागायची आहेत काय?" असाही प्रश्न त्यांनी विचारला. "आपल्याकडे आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्रे असण्याची गरज नाहीं. कारण आपण जास्तीत जास्त एक प्रादेशिक महसत्ता आहोत. आणि आजच्या संरक्षणविषयी डावपेचात याहून जास्त पल्ल्याच्या संरक्षणास्त्रांना स्थान नाहीं" असेही ते म्हणाले.
वरील प्रतिक्रियाव्यतिरिक्त न्यू यॉर्क टाइम्सने संकलित केलेल्या कांही गमतीदार प्रतिक्रियाही माझ्या वाचनात आल्या. त्या प्रतिक्रिया खालीलप्रमाणे:
(१) ग्लोबल टाइम्स या चीनमधून प्रसिद्ध होणार्‍या वृत्तपत्राने मतप्रदर्शन केले होते. पण त्या लेखाची संपूर्ण प्रत आणि त्यातील आकृती-१ मला मिळाली ती खाली देत आहे.
"भारताने लांब पल्ल्याच्या अण्वस्त्रवाहनक्षमतेच्या अग्नि-५ या प्रक्षेपणास्त्राची यशस्वी चांचणी झाल्याचे जाहीर केले. त्याचा पल्ला ५००० किमी असून ते चीनपर्यंत पोचू शकते. भारताला आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्रे बनवू शकणार्‍या मोजक्या देशांच्या "क्लब"चे सभासदत्व हवे होते असे दिसते, पण त्यासाठी अशा प्रक्षेपणास्त्रांचा पल्ला ८००० किमी असायला हवा हे त्यांनी ध्यानात घ्यायला हवे! (खालील आकृती-१ पहा)
प्रक्षेपणास्त्रांच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने जलद प्रगती केलेली आहे. गेल्याच वर्षी भारताने ३५०० किमी पल्ल्याच्या अग्नि-४ या प्रक्षेपणास्त्राची यशस्वी चांचणी केली होती. भारताची आम जनता भारताच्या लष्करी विकासासाठी चीनलाच संदर्भचिन्ह मानते.
भारताच्या लष्करी शक्ती वाढविण्याच्या मार्गात फारसे अडथळे आलेले दिसत नाहींत. भारत हे अद्याप गरीब राष्ट्र आहे आणि दळण-वळणाच्या सुविधांच्या निर्मितीत खूपच मागे आहे. पण भारतीय जनता भारताने अण्वस्त्रधारी राष्ट्र बनावे यासाठी संपूर्णपणे सरकारला समर्थन देते आणि पाश्चात्य राष्ट्रेसुद्धा अण्वस्त्रांबाबतच्या आणि प्रक्षेपणास्त्रांबाबतच्या भारताने केलेल्या तंत्रज्ञानाच्या करारांकडे दुर्लक्ष करतात. भारताच्या लष्करी खर्चात २०१२मध्ये १७ टक्क्यांनी वाढ झाल्याबद्दल आणि भारत आज शस्त्रास्त्रांची आयात करणारा जगातला सर्वात मोठा देश बनला आहे याबद्दल ते चुप्पी साधून असतात.
भारताने आपल्या शक्तीबाबत फाजील समज करून घेऊ नये. आज त्याच्याकडे चीनच्या कुठल्याही भागावर हल्ला करण्याचा पल्ला असलेली क्षेपणास्त्रे असली तरी चीनबरोबरच्या तंट्यांबाबत त्यांच्या जोरावर उद्धटपण केल्यास त्यांचा कांहींच फायदा होणार नाहीं. भारताने लक्षात ठेवावे कीं चीनची अण्वस्त्रशक्ती जास्त मोठी व विश्वासार्ह आहे. चीनबरोबरच्या शस्त्रास्त्रस्पर्धेत नजीकच्या भविष्यकाळात भारताला आघाडी मिळण्याची कांहींच शक्यता नाहीं. प्रतिसादात पुढे म्हटले आहे कीं भारताने आपल्या पाश्चात्य मित्रांच्या मैत्रीच्या फुगवून सांगितलेल्या मूल्यांकनावर आणि चीनला आवरण्याच्या मोहिमेत भाग घेण्याच्या फायद्यांवर विसंबून राहू नये. या लांब पल्ल्याच्या लष्करी महत्वाच्या प्रक्षेपणास्त्रांचे चीनच्या दुस्साहस-प्रतिकारक्षमतेबरोबर समीकरण मांडून त्या जोरावर चीनची कुरापत काढल्यास ती भारताची चूकच ठरेल.
चीन आणि भारत या दोघांनी शक्य होतील तितके मैत्रीयुक्त संबंध प्रस्थापित करावेत. हे शक्य नसेल तर दोघांनी एकमेकांमधील मतभेद सहन करत शांततामय सहजीवन अवलंबावे.
हे दोन्ही देश नव्याने उभरत आहेत आणि त्यांचे याबाबतची प्रतिष्ठा आणि स्थान पहाता या दोन राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य करावे. प्रक्षेपणास्त्रांच्या विकासातून शक्ति समतोल साधण्याचा प्रयत्न करणे चीन आणि भारत या दोन्ही देशांसाठी अविवेकी ठरेल.
आशिया खंडाची भू-राजकीय परिस्थिती चीन व भारत यामधील संबंधांवर अवलंबून राहील. या विभागात शांती आणि स्थिरता नांदणे दोन्ही देशांसाठी निर्णायक ठरणार आहे. म्हणून या विभागात शांती आणि स्थिरता टिकविणे आणि बाहेरील हस्तक्षेपाबद्दल सावध रहाणे याबाबतची जबाबदारी दोन्ही देशांवर पडते.
चीनशी बरोबरी करण्याच्या भारताच्या इच्छेची चीनला कल्पना आहे. लष्करी महत्वाच्या दृष्टीने भारतासाठी चीन हे एक उचित लक्ष्य असल्याने भारताला एक सलोखापूर्ण प्रतिस्पर्धी म्हणून स्वीकारायला तयार आहे.
कांहीं ऐतिहासिक कारणांमुळे चीन व भारत यांच्यामधील परस्पर संबंध संवेदनशील झाले आहेत. पण वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहिल्यास चीन भारताबरोबरच्या संरक्षणविषयक बाबींकडे फारसे लक्ष देत नाहीं पण भारत मात्र आपले सर्व अवधान/लक्ष चीनवर केंद्रित करतो.
भारत शांत राहील अशी चीनला आशा आहे कारण अशी शांतत दोन्ही देशांना हितकारक आहे.
[ग्लोबल टाइम्सच्या वरील लेखात भारताच्या यशामुळे आलेली चीनच्या मनातील चलबिचल आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे व ती लपविण्यासाठी कांहींशी दादागिरीची भाषा चीनने वापरली तर त्यात नवल काय? पण काय गर्भित धमकी दिली आहे चीनने!]


आकृती-१: ३- ४ आणि ५ या प्रकारच्या अग्नि प्रक्षेपणास्त्रांचे पल्ले
(३) चीनच्या सरकारी China Central Television चा मलम लावण्याचा प्रयत्न! "भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण! क्षेपणास्त्रे असलेल्या राष्ट्रांच्या यादीत भारत आता सामील झाला आहे". पण त्यापुढे जाऊन या चित्रवाणीवर आपल्या क्षेपणास्त्रांमधील कमतरता सांगण्यात आल्या. त्यात क्षेपणास्त्राच्या मार्गदर्शक यंत्रणेतील उणीवा आणि तिचे पन्नास टानाचे वजन यांचा उल्लेख प्रामुख्याने करण्यात आला. या प्रचंड वजनामुळे हे प्रक्षेपणास्त्र रेल्वे बोगी किंवा ट्रक यासारख्या हालत्या वाहनांवरून डागणे अवघड होईल व त्याच्यावर प्रतिहल्ला करून ते नष्ट करणे सोपे आहे. त्यामुळे चीनला हे प्रक्षेपणास्त्र धोकादायक वाटत नाहीं.
चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाच्या प्रवक्ते लियू वे मिन: यांनी या चांचणीला फारसे महत्व नाहीं असे भासवत "भारत व चीन हे स्पर्धक नसून ते सहयोगी साहेत" असे सांगितले. या दोन राष्ट्रांनी मित्रत्वाने सहकारयुक्त वागणूक ठेवावी असेही त्यांनी सांगितले. (बगलमें छुरी मुंहमें राम?)

(४) इस्लामाबद येथील संरक्षणासंबंधीचे विश्लेषक मन्सूर अहमद: या प्रक्षेपणास्त्रामुळे भारताच्या प्रत्युत्तराच्या शक्तीत भर पडली आहे. जर भारताने त्याच्या अणूभट्टीवर चालणार्‍या पाणबुडीवरून डागण्याची क्षमता असलेले अग्नि-५ प्रक्षेपणास्त्र विकसित केले तर त्याचा खूप फायदा होईल. कारण अशा पाणबुडीवरील प्रक्षेपणास्त्राचा विनाश करणे पाकिस्तानला अशक्य ठरेल व त्यामुळे भारताच्या अण्वस्त्रांचा विनाश करता येणार नाहीं.

(५) जिनीव्हा येथील Center for Security Policy वरील विशेषज्ञ ग्रॅहॅम हर्ड: चीनच्या दृष्टिकोनातून ही चांचणी चीनशी समतोल राखण्यापेक्षा चीनला आवर घालण्यासाठी केलेली वाटते. चिनी सरकार सध्या डळमळीत आहे कारण त्याचे वरिष्ठ नेतृत्व सध्या अनेक भानगडीत (scandals) अडकलेले आहे व भारताने या चांचणीची ही योग्य वेळ साधली आहे. त्यामुळे चीनचा संशय वाढेल व पूर्व आशियात भारत-चीनमधील शस्त्रास्त्रस्पर्धा वाढीला लागेल.

(६) IHS Jane’s Defenseच्या आशिया-पॅसिफिक लष्करशक्तीच्या विश्लेषिका पूर्णिमा सुब्रह्मण्यम्: अग्नि-५ मुळे भारताला संपूर्न चीनच्या कुठल्याही भागावर हल्ला करता येईल. अग्नि-५ मुळे चीन व भारत यांच्या प्रक्षेपणास्त्रांच्या तंत्रज्ञानातील अंतर कमी झालेले आहे. पण संख्येने व डावपेचाच्या दृष्टीने चीन अद्याप पुढेच आहे.

(७) अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या विश्लेषक सेवेचे अण्वस्त्रप्रसारबंदीचे विशेषज्ञ पॉल केर: संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या भारत व पाकिस्तान या दोघांनी अण्वस्त्रवहनक्षम प्रक्षेपणास्त्रांचे विकसन थांबवावे असे सांगणार्‍या ११७२ क्रमांकाच्या ठरावाचा सर्वांनाच विसर पडलेला दिसतो आहे.

(८) अण्वस्त्रकपात आणि शांती संयुक्त दलाचे संशोधक व स्तंभलेखक प्रफुल्ल बिदवाई म्हणतात, "गरीबांच्या गरजा भागविण्याऐवजी आपण विनाकारण फुकाच्या शस्त्रास्त्रस्पर्धेत गुंतत आहोत ही हास्यास्पद गोष्ट आहे"

(९) "पी.एल.ए."च्या[१] राष्ट्रीय संरक्षणविषयक विद्यापीठातील प्रध्यापक झांग झाओझाँग यांनी ग्लोबल टाइम्सला सांगितले कीं अग्नि-५ ची खरी क्षमता ८००० किमीवरील लक्ष्यांवर हल्ला करण्याची आहे पण इतर राष्ट्रांत काळजी निर्माण होऊ नये म्हणून भारताने जाणूनबुजून आपल्या प्रक्षेपणास्त्राचा पल्ला आहे त्यापेक्षा कमी करून सांगितला.

(१०) "पी.एल.ए."च्या[१] "अकॅडमी ऑफ मिलिटरी सायन्सेस" च्या डू वेनलाँग यांनी ग्लोबल टाइम्सला सांगितले कीं ही आपण केलेल्या प्रक्षेपणास्त्रांच्या चांचणीतील सर्वात जास्त पल्ल्याच्या प्रक्षेपणास्त्राची चांचणी आहे. त्यामुळे आपल्या दुस्साहसाविरुद्धच्या प्रतिकारक्षमतेत वाढ झालेली आहे. हे प्रक्षेपणास्त्र इराणपर्यंतच नव्हे तर त्या पलीकडेही पोचेल. (भाषांतरात घोटाळा झालेला दिसतो. इथे "आपण" आणि "आपल्या"चा "भारत" किंवा "भारताच्या" असा गर्भित अर्थ असावा. शिवाय चुकून चीनच्या जागी इराणचे नांव वापरले गेलेले असावे.)

(११) दिल्लीच्या "इंस्टिट्यूट ऑफ पीस अँड कॉन्फ्लिक्ट"चे एक विश्लेषक जगन्नाथन "द इंडिपेंडंट"शी बोलताना म्हणाले: या प्रक्षेपणास्त्राकडे केवळ "दुस्साहसाविरुद्धची प्रतिकारक्षमता" या दृष्टिकोनातून पाहिले जाईल कारण आपले "प्रथम अण्वस्त्र हल्ला न करण्याचे" धोरण भारताने आधीच जाहीर केले आहे. पण भारताच्या लष्करी महत्वाच्या दृष्टीने भारताची ही एक लांबलचक उडीच आहे.

(१२) DRDO -APचे प्रवक्ते रवी गुप्ता म्हणाले: ही यशस्वी चांचणी भारताच्य दृष्टीने एक ऐतिहासिक दिवस आहे. कारण अग्नि-५ हे एक "खेळाचे नियम बदलणारे प्रक्षेपणास्त्र" आणि तंत्रशास्त्रविषयक चमत्कारच आहे. हे प्रक्षेपणास्त्र एका वेळी एकाहून जास्त क्रिया करू शकते.

(१३) संरक्षण मंत्र्यांचे शास्त्रविषयक सल्लागार व भारताच्या DRDOचे[२] प्रमुख श्री. सारस्वत म्हणाले: आपण हा एकदम सुपरहिट प्रकल्प यशस्वी करून दाखविला! या यशस्वी चांचणीने सार्‍या जगाला एक संदेश दिला आहे कीं भारताकडे या दर्जाची (लांब पल्ल्याची आंतरखंडीय) प्रक्षेपणास्त्रांची संरचना, विकास, निर्मिती करण्याची क्षमता आहे. आता आपण एक प्रक्षेपणास्त्रधारी राष्ट्र बनलो आहोत"


आकृती-२: भारताची पाच प्रक्षेपणास्त्रे

भारताची यशस्वी चांचणी आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त झालेल्या चिंता खाली देत आहे.
चीन-People’s Daily[३]: "भारताच्या लष्करी शक्तीच्या वृद्धीमागील धोके" या शीर्षकाखाली प्रकाशित झालेल्या लेखात म्हटले आहे कीं अग्नि-५ च्या चांचणीद्वारा भारत विभागीय पातळीवर शक्ति समतोल साधू पहात आहे.
भारत-हिंदुस्तान टाइम्स: एकदा ही प्रक्षेपणास्त्रे भारताच्या लष्करी प्रहार शक्तीत दाखल झाली कीं भारताला आशिया खंडात कुठल्याही राष्ट्रावर हल्ला करण्याची क्षमता लाभेल. त्यात चीनच्या अतिउत्तर विभागाचा आणि युरोपच्या कित्येक राष्ट्रांचा समावेश होतो.
भारत-The Indian Firstpost: या प्रकल्याच्या यशामुळे भारत आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्रे बनवू शकणार्‍या मोजक्या देशांच्या "क्लब"चा सभासद म्हणून गणला जाईल.
भारत-The Times of India: गेल्या कांहीं दशकांत भारताने प्रक्षेपणास्त्रांची एक मालिकाच विकसित केली आहे. विश्लेषकांच्या मते कमी पल्ल्यांची अग्नि-१ आणि २ पाकिस्तानला दृष्टीसमोर ठेवून निर्मिली गेली होती तर लांब पल्ल्यांची अग्नि-३, ४ आणि ५ चीनला दृष्टीसमोर ठेवून निर्मिली गेली आहेत.
अमेरिका-रॉयटर: अग्नि-५च्या विकसनकाळात चीनबद्दल खूप संदर्भ पुढे आले. आणि ५००० किमीच्या पल्ल्याच्या प्रक्षेपणास्त्रांमुळे भारत आता आपल्या भारदस्त शेजार्‍याबरोबर शक्ती-समतोल साधू शकेल. पण सत्य परिस्थिती बरीच मर्यादशील आहे. चीनच्या शस्त्रागारात आधीपासूनच ५०००-ते १०००० किमी कक्षांची आजमावलेली आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्रे आहेत. म्हणजेच भारत चीनची कधीच बरोबरी करू शकत नाहीं आणि त्याची गरजही नाहीं.
इंग्लंड-BBC: संरक्षणविषयक विश्लेषक राहुल बेदी म्हणाले कीं अग्नि-५ च्या यशस्वी चांवणीनंतर अण्वस्त्रधारी स्पर्धक असलेल्या चीनच्या कुठल्याही अंतर्गत भागावर दीड टनाचे अण्वस्त्र वाहू शकणारी प्रक्षेपणास्त्रे २०१४-१५ पर्यंत कार्यरत होतील तेंव्हा चीनच्या दुस्सहसाचा प्रतिकार करण्याच्या भारताच्या क्षमतेत लक्षणीय वाढ झालेली असेल.

एक घटना पण किती वेगवेगळे पैलू व त्यानुसार प्रतिक्रिया! पण प्रत्येक भारतीयाला गर्व आणि अभिमान वाटेल अशीच ही "अग्निपरिक्षा" आहे हे नि:संशय!!

एक घटना पण किती वेगवेगळे पैलू व त्यानुसार प्रतिक्रिया! पण प्रत्येक भारतीयाला गर्व आणि अभिमान वाटेल अशीच ही "अग्निपरिक्षा" आहे हे नि:संशय!!

अग्नि प्रक्षेपणास्त्राबद्दल मनोवेधक आणि विस्तृत माहिती
कोष्टक-१ विविध प्रकारच्या "अग्नि" प्रक्षेपणास्त्रांचे पल्ले
Name Type Range
Agni-I MRBM 700 – 1,200 km
Agni-II IRBM 2,000 – 2,500 km
Agni-III IRBM 3,000 – 5,000 km
Agni-IV IRBM 2,500 – 3,700 km
Agni-V ICBM 5,000 – 6,000 km
Agni-VI ICBM 6,000 – 10,000 km
(अग्नि-६ अद्याप विकसनशील असल्यामुळे त्याचे आकडे अटकळीचे आहेत.)
MRBM= Medium Range Ballistaic Missile
IRBM= Intermediate Range Ballistaic Missile
ICBM= Intercontinental Ballistaic Missile
-----------------------------------------------------------
कोष्टक-२: भारताच्या प्रक्षेपणास्त्रांबद्दलचा अधीक तपशील
नाव वजन वेग लांबी व्यास इंधनाचा
टन किमी/तास मीटर्स प्रकार
Agni-I १२ ९००० १५ १ घनरूपी
Agni-II १६ १४००० २१ १.३ घनरूपी
Agni-III ४८ १८०००+ १७ २ घनरूपी
Agni-IV १७ Mach 20 ? ? घनरूपी
Agni-V ५० Mach 24 १७.५ २ घनरूपी
Agni-VI* ५५ ४० १.१ घन+द्रव
* सध्या विकसित केले जात आहे.
(Mach=आवाजाचा वेग)
या खेरीज कमी वजनाची पण लांब पल्ल्याची व पाणबुडीवरून डागता येणारी "K" या संज्ञेने ओळखली जाणारी प्रक्षेपणास्त्रेसुद्धा सध्या विकसित केली जात आहेत. ("K" हे अद्याक्षर आपले प्रक्षेपण शास्त्रांबाबतचे प्रथितयश विख्यात शास्त्रज्ञ आणि आपले भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष अब्दुल कलाम यांच्या गौरवार्थ या प्रक्षेपणास्त्रांना दिले गेले आहे.)
जास्त माहितीसाठी खालील दुवे वाचता येतील:
अग्नि-१: http://en.wikipedia.org/wiki/Agni-I
अग्नि-२: http://en.wikipedia.org/wiki/Agni-II
अग्नि-३: http://en.wikipedia.org/wiki/Agni-III
अग्नि-४: http://en.wikipedia.org/wiki/Agni-IV
अग्नि-५: http://en.wikipedia.org/wiki/Agni-V
अग्नि-६: http://en.wikipedia.org/wiki/Agni-VI


आकृती-३: भारताच्या प्रक्षेपणास्त्रांबद्दलचा चीनच्या ग्लोबल टाइम्स वृत्तपत्राने दिलेला तपशील


आकृती-४: भारताच्या प्रक्षेपणास्त्रांच्या विकासाचे टप्पे चित्ररूपात दाखविणारा तक्ता

------------------------------------------
[१] पीपल्स लिबरेशन आर्मी हे चीनच्या सेनेचे अधिकृत नांव आहे.
[२] Defense Research and Development Organization (DRDO).
[३] People’s Daily हे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीचे मुखपत्र आहे.
[४] Coup d'état

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

बरीच छान माहिती आहे. आभार!

त्याचा पल्ला ५००० किमी असून ते चीनपर्यंत पोचू शकते. भारताला आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्रे बनवू शकणार्‍या मोजक्या देशांच्या "क्लब"चे सभासदत्व हवे होते असे दिसते, पण त्यासाठी अशा प्रक्षेपणास्त्रांचा पल्ला ८००० किमी असायला हवा हे त्यांनी ध्यानात घ्यायला हवे! (खालील आकृती-१ पहा)

आकृतीत एक तृती नेहमी जाणवते की हा हल्ला जणू काही ओरिसातून केला जाऊ शकतो असे समजून नकाशे काढले आहेत आणि तेच सारी प्रसारमाध्यमे दाखवत आहेत. जर हे क्षेपणास्त्र निकोबार बेटांवरून सोडले तर ऑस्ट्रेलियापर्यंत त्याची मजल आहे, जर कच्छच्या रणातून सोडल्यास पूर्व युरोप, आखातीदेश कक्षेत येतात आणि लक्षद्वीपांवरून सोडल्यास बराच आफ्रिका व्यापते. (किंबहुना गंगोत्री हे दक्षिणध्रुवावरचे आपले हक्काचे स्थान तुर्तास बाजुला ठेऊयात नाहितर साऊथ अमेरिकाही येईल Smile ) त्यामुळे अग्नी-५ आंतरखंडीय आहे.

अवांतरः अमेरिकेच्या दोन्हीकडे महासागर असल्याने त्यांना आंत्रखंडीय क्षेपणास्त्रांसाठी मोठी मजल लागत असल्याने ८००० हे मानक ठरले असावे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आता आपल्यालासुद्धा stealth fighter बनवावा लागेल!
http://www.globaltimes.cn/NEWS/tabid/99/ID/709156/The-J-20-stealth-fight...
सुधीर काळे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0