एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १६

समाजातील बदल

सुधीर भिडे

एकोणिसावे शतक म्हणजे भारतातील धार्मिक आणि सामाजिक सुधारणावादाचा इतिहास होय.
– रा. ना. चव्हाण

मागील सहा प्रकरणांत आपण त्या काळात धर्माची काय स्थिती होती आणि धार्मिक सुधारणेसाठी काय प्रयत्न झाले, दलित आणि स्त्रियांचे काय प्रश्न होते ते पाहिले. आता आपण समाजाच्या स्थितीकडे वळू. असमानता, अज्ञान आणि गरिबी यांच्या गर्तेत समाज बुडाला होता. एकोणिसाव्या शतकात, १८१८ ते १९२० या काळात समाजात काय बदल झाले ते आपण गेल्या भागात पाहिले.

त्या काळात ९० टक्के भारतीय समाज ग्रामीण भागात राहात असे. खेडेगावांत वतनदारी आणि जाती यांना फार महत्त्व होते. समाजाच्या तळागाळात दलित होते. आदिवासी तर खिजगणतीत नव्हते. या काळात अनेक समाजसुधारक उभे राहिले ज्यांनी समाजातील वाईट प्रथा घालविण्याचा प्रयत्न केला.

१८१८पासून जे शतक चालू झाले त्यात बदल आणि सुधारणेचे कोंब उगवले. जातीव्यवस्था गेली नाही तरी समाजसुधारकांच्या प्रयत्नाने सामाजिक अन्याय कमी झाला.

समाजसुधारक

समाजसुधारकांच्या कामाचा विचार करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे अस्पृश्यांचे आणि स्त्रियांचे प्रश्न आपण गेल्या चार भागांत विचारात घेतले आहेत. याशिवाय समाजसुधारकांपैकी काहींची कामे १९२०नंतर झाली. आपण १८१८ ते १९२० या कालखंडाचा विचार करतो आहोत म्हणून त्यांचा उल्लेख न करणे योग्य होणार नाही.

गोपाळ हरी देशमुख – लोकहितवादी

(लोकहितवादींची माहिती मराठी विश्वकोश आणि रा. ना. चव्हाण यांच्या प्रबोधनाची क्षितिजे या पुस्तकातून घेतली आहे. संपादक रमेश चव्हाण, २०१४)

समाजसुधारकांमध्ये पहिले सुधारक लोकहितवादी. देशमुखांनी लोकहितवादी या नावाने लिखाण केले. देशमुखांपासून ब्राह्मण समाजसुधारकांची परंपरा चालू झाली. लोकहितवादींचा जन्म १८२३ साली पुण्यात झाला. त्यांचे पारंपरिक शिक्षण पंतोजींच्या शाळेत झाले. इंगजी शिक्षण एका ख्रिश्चन मिशनऱ्याकडे झाले. त्या काळात मॅट्रिकची (एस. एस. सी.) परीक्षा नव्हती. शिक्षणानंतर ते कोर्टात भाषांतरकार म्हणून नोकरी करू लागले. न्यायसेवेत चढत चढत ते न्यायाधीश झाले. पुणे, वाई, सातारा आणि अहमदाबाद या ठिकाणी त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केले. ज्या शहरात ते गेले तेथे त्यांनी नोकरीबरोबर समाजकार्याला वाहून घेतले. मुंबई विद्यापीठात त्यांची फेलो म्हणून नेमणूक झाली होती. लोकहितवादी पुणे येथे १८९२ साली वारले.

लोकहितवादी यांनी प्रभाकर या त्यावेळच्या साप्ताहिकातून १०८ लेख लिहिले. हे लेख १८४८ ते १८५०मध्ये प्रसिद्ध झाले. हे लेख शतपत्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. या लेखातून त्यांनी इतिहास, समाजसुधारणा, ज्ञान, ग्रंथांचे महत्त्व, शिक्षणाचे महत्त्व असे विविध विषय हाताळले आहेत. धर्म आणि समाजसुधारणेला शतपत्रांनी प्रेरणा दिली.



लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख

शतपत्रांनी भिक्षुकशाहीवर हल्ला केला. देव-धर्मावर जगणारी भिक्षुकशाही सर्व धर्मांत आहे. आजच्या काळात भिक्षुकांनी कर्मकांड टिकवून धरले आहे. लोकहितवादींनी १८७८ साली आर्य समाजात ‘भिक्षुक’ या विषयावर व्याख्यान दिले होते.

शिक्षण प्रसाराचा मुद्दा शतपत्रात आढळतो अब्राह्मणांचे शिक्षण आणि त्यांचे नोकरी क्षेत्रातील प्रवेश हे मुद्दे शतपत्रात आहेत. जोतिबा फुले आणि लोकहितवादी समवयस्क होते. जोतिबांच्या स्त्री-शूद्रांच्या शाळेला लोकहितवादींनी साहाय्य केले.

जोतिबा फुले

जोतिबांनी १८५१-५२ या सालात पुण्यात स्त्रिया आणि अस्पृश्य यांच्यासाठी शाळा उघडल्या. त्यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांस शिकविले. सावित्रीबाईंनी मुलींच्या शाळेत शिकविण्यास सुरुवात केली. या सर्व उपक्रमाला पुण्यातील सनातनी ब्राह्मणांचा मोठा विरोध झाला. त्याच बरोबर पुण्यातील काही सुशिक्षित ब्राह्मण त्यांच्याबरोबर उभे राहिले. त्यांची पहिली शाळा तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात बुधवार पेठेत चालू झाली. त्यानंतर फुल्यांनी गरोदर विधवांसाठी अनाथाश्रम काढला. १८७३मध्ये फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अस्पृश्यांचा उद्धार हे या समाजाचे उद्दिष्ट होते. ही बरीचशी माहिती आपण आधीच्या भागातून घेतली आहे.

न्यायमूर्ती रानडे

न्यायमूर्ती रानडे यांचे स्त्री उद्धाराबाबतचे काम आपण भाग १२मध्ये पाहिले. समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रांत रानड्यांनी काम केले. रानडे समाजाला शरीराची उपमा देत. शरीर सुदृढ राहण्यासाठी सर्व अवयवांची मजबूती आवश्यकता आहे. हिंदुस्थानात असलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपण आधी हिंदुस्तानी आणि मग ब्राह्मण, पारशी किंवा मुसलमान समजावे, असे ते सांगत. आजही स्वतंत्र भारतीयांनी हा विचार ठेवला पाहिजे. न्यायशील मन असल्यामुळे त्यांचे विचार समतोल वाटतात. लोकहितवादी रानड्यांना २० वर्षांनी ज्येष्ठ होते. दोघेही न्याय खात्यात काम करत होते. दोघांनीही नोकरी करून समाजकार्य केले.

पुण्यात एकदा रानड्यांनी त्यांच्या घरी भोजनसमारंभ ठेवला होता. त्या भोजनास आमंत्रितांमध्ये काही अब्राह्मण होते. त्याबद्दल शंकराचार्यांनी त्यांना प्रायश्चित्त सुनावले. रानड्यांच्या काळात सनातनी विरुद्ध सुधारक, समाजसुधारणा आधी की राजकीय सुधारणा असे वाद चालत.

रानडे हे मराठ्यांच्या शिक्षणाचे आद्य प्रवर्तक होते. १८८३मध्ये म्हस्के यांच्या बरोबर त्यांनी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन स्थापन केली. संस्था चालू करण्याच्या वेळी संस्थेला ३००० रुपये (आजच्या हिशोबाने ६० लाख) देणगी दिली. शिवाय मृत्युपत्रात या संस्थेसाठी १००० रुपये ठेवले (आजच्या हिशोबाने २० लाख). सयाजीरावांना सांगून त्यांच्याकडून संस्थेला १२०० रुपये (आजच्या हिशोबाने २४ लाख) वर्षासन (वार्षिक उत्पन्न) देवविले.

शाहू महाराज त्यांच्याविषयी लिहितात, मागासलेल्या लोकांच्या उन्नतीकरता माझे मित्र रानडे व गोखले यांनी पुष्कळ श्रम घेतले. मागासलेल्या लोकांत विद्येचा प्रसार होण्याची आवश्यकता ही कल्पना मला त्यांच्यापासूनच मिळाली.

(वरील माहिती प्रबोधनाची क्षितिजे, रा.ना. चव्हाण, संपादक रमेश चव्हाण २०१४, या पुस्तकातून घेतली आहे.)

टिळक आणि समाजसुधारणा

समाजसुधारकांनी समाजात बदल घडवून आणण्यासाठी काय प्रयत्न केले ते आपण पाहिले. या सुधारकांत टिळकांचे नाव दिसत नाही. टिळकांची समाजसुधारणांबाबतीत दोलायमान स्थिती होती. समाजात काही बदल आवश्यक आहेत हे टिळक मान्य करीत, पण कायद्यात बदलाला त्यांनी विरोध केला. राजकीय स्वातंत्र्य हे टिळकांच्या दृष्टीने प्रमुख ध्येय होते. समाजसुधारणांच्या मागे गेले तर समाजात दुही माजेल आणि राजकीय चळवळ दुर्बळ होईल असे त्यांचे मत असे. टिळक सुधारणांना कसा विरोध करीत असत याची माहिती निरनिराळ्या स्रोतांमधून मिळाली ती याप्रमाणे –

१. डॉ. सदानंद मोरे यांनी लिहिलेल्या टिळकांच्या चरित्रातून मिळालेली माहिती

  • जेव्हा बाल विवाह प्रतिबंधक कायद्याविषयी चर्चा चालू झाली तेव्हा असा कायदा आणू नये अशा मताचे टिळक होते.
  • मुंबईत रखमाबाई या लहान मुलीचे लग्न व्याधिग्रस्त, अडाणी आणि वयाने मोठ्या दादाजी या व्यक्तीशी झाले तेव्हा रखमाबाई वयाने लहान होत्या. त्या वयात आल्यावर दादाजींनी त्यांनी नांदायला यावे अशी मागणी केली. त्यावेळी रखमाबाईंचे शिक्षण झाले होते. त्यांनी जाण्यास नकार दिला. प्रकरण कोर्टात गेले. कोर्टाने रखमाबाईंनी नांदायला जावे असा आदेश दिला. टिळकांनी या आदेशाचे स्वागत केले.
  • मुलींच्या शाळेत मुलींना सुगृहिणी होईल एवढेच शिक्षण द्यावे अशा मताचे टिळक होते.

२. टिळकांसारखे धर्माला प्रमाण मानणारे आणि धर्माच्या नावाखाली मनमानी करणारे पुरुष सोडता संमतिवय कायद्याचे पालन न करणार्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे असे म्हणणारे लोकही होते – (मंगला आठलेकर, महापुरुषांच्या नजरेतून स्त्री, राजहंस प्रकाशन, २०१८, प्रस्तावना)

३. बाळशास्त्री हरदास यांच्या मते –

”राष्ट्राचा तेजोभंग करणार्‍या सुधारणावादी नेतृत्वास हतबल करणे हे टिळकांचे एक उद्दिष्ट होते.लोकमान्य टिळक, कमलेश सोमण, गोयल प्रकाशन, २०२१, पृष्ठ ८५.

बालविवाह कायदा आणि संमतीवय कायदा यांमुळे राष्ट्राचा तेजोभंग कसा होतो ते समजत नाही. टिळकांच्या नंतर आलेल्या महानायकाने – गांधीजींनी समाज सुधारणा आणि स्वातंत्र्य चळवळ यांची सांगड घातलीच की!

४. शेतीच्या क्षेत्रातील सुधारणांनाही टिळकांनी विरोध केला. शेतकर्‍यांमधील असंतोष पाहून सरकारने १८७९मध्ये डेक्कन ॲग्रीकलचरल रिलीफ ॲक्ट आणला. त्याला टिळकांनी विरोध केला. खालील उतारा वाचल्यावर जास्त काही लिहिण्याची गरजच नाही. राव यांनी टिळकांच्या प्रत्येक वचनाचा मूळ स्रोत दिला आहे. टिळक चक्क सावकारांचा बचाव करत आहेत. रानड्यांनी शेतकरी बँकेची जी सूचना केली त्यालाही ते विरोध करतात –

New Insights into the Debates on Rural Indebtedness in 19th Century Deccan, Parimala V Rao, Economic & Political Weekly, January 24, 2009.

The group of nationalists in Maharashtra included Vishwanath Narayan Mandalik, one of the biggest landlords and related to the Peshwa family, and Bal Gangadhar Tilak. This group also consisted of men who came from either landed or money lending families. They called themselves as "rashtravadi" and opposed social and economic reforms proposed by Ganesh Vasudeo Joshi, Mahadev Govind Ranade and Gopal Krishna Gokhale by calling them "un-national sudharaks" (reformers). They attacked Deccan Agricultural Relief Act (DARA) for ignoring the interests of the sahukars. Tilak criticised Vasudeo Balvant Phadke’s revolt as a "hare brained attempt of the misguided person". Tilak began his criticism of the DARA with an attack on "the right of the alien government to interfere in the internal affairs of the Hindu society". He criticised the British "for destroying the harmony in the villages by interfering on behalf of the peasants". Tilak accepted peasant indebtedness and used it to argue that "hence the insolvent ryot has, properly speaking, no credit. Lending money to him is at best a risky speculation… If the government therefore does not wish to utterly ruin the Sahukars for having helped, (the) Kunbi must pay the debt". Tilak argued that the DARA was enacted "for legally plundering the Sahukar". Tilak argued that "the provisions of DARA struck at the root of the existence of the Brahmin and Marwari moneylenders". Tilak’s defence of the interest of the moneylender was not just economic but social and political too.

There was an immediate necessity of providing alternative credit to the peasants. Ranade and Wedderburn proposed the establishment of agricultural banks to provide loans at a lower rate of interest to the peasants. Tilak attacked Ranade "for being partial to peasants and introducing hardships to the Sahukars".

५. जेव्हा बहुजनांचा विधीमंडळात समावेश करण्याचा प्रश्न आला तेव्हा टिळकांनी त्याला विरोध केला. ते लिहितात – शेतकर्‍यांना विधिमंडळात जाऊन काय नांगर धरायाचे आहेत? शिंप्यांना तिथे जाऊन काय शिलाई मशीन चालवायचे आहे? आणि वाणी तिथे जाऊन काय तराजू तोलणार? (१९१७मधील एका सभेत टिळकांचे भाषण, ब्राह्मणांना कोण अकारण कशाला झोडपणार?, लेखक आनंद घोरपडे, जिजाऊ प्रकाशन, २००६).

सध्याच्या विधिमंडळात आणि लोकसभेत पाहा. कित्येक सदस्य शेतकरी आणि बहुजन समाजातीलच आहेत. देशाचा कारभार व्यवस्थित चालला आहे.

६. १९१९मध्ये पुणे नगरपालिकेच्या हद्दीत प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे याचा विचार चालू होता. टिळकांच्या मताप्रमाणे फक्त मुलांचे शिक्षण सक्तीचे करावे, मुलींचे नाही (अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र, डॉ. छाया पोवार)

७. मुंबईत अस्पृश्यता निवारक परिषद सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आयोजन महर्षी शिंदे यांनी केले होते. या परिषदेची माहिती आधीच्या भागात आलेली आहेच. टिळकांनी परिषदेत अस्पृश्यता अयोग्य आहे, अशा आशयाचे भाषण केले खरे पण ठरावावर सही करण्यास नकार दिला. केसरीत या परिषदेविषयी एक अक्षराही छापले गेले नाही. टिळक मुंबईत एक आणि पुण्यात दुसरे असे वागत होते. (महर्षी शिंदे समग्र साहित्य, खंड २, अस्पृश्यता निवारक परिषद – सहानभूती पण सही नाही.)

वरील सर्व वचनांवरून आणि घटनांवरून टिळकांचा बहुजन समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन समता आणि बंधुभाव यांवर आधारित होता असे वाटत नाही.

सावरकर, आंबेडकर, भाऊराव पाटील आणि समतानंद गद्रे यांचे कार्य १९२०नंतर राहिले. या महान व्यक्तींचे कार्य केवळ १९२०नंतर राहिले म्हणून त्यांचा उल्लेख न करणे योग्य होणार नाही.

सावरकर

सावरकरांची अंदमान येथील काळ्या पाण्यातून सुटका या अटीवर झाली की ते कोणतेही राजकीय काम ते करणार नाहीत. त्यांना रत्नागिरी जिल्ह्यात स्थानबद्ध करण्यात आले. या काळात त्यांनी समाज सुधारणेच्या कामास वाहून घेतले. अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नसे. त्याविरुद्ध त्यांनी जनमत बनविले. रत्नागिरीत पतितपावन मंदिराची स्थापना केली ज्यात सर्वांना प्रवेश मिळे. सामाजिक विचारांच्या बाबतीत सावरकर परंपरावादी नव्हते. सावरकर म्हणतात, मी सामाजिक विचारांच्या बाबतीत आगरकर यांचे गुरुपद स्वीकारतो. अस्पृश्यतेच्या प्रथेमुळे हिंदू समाजाचा एक गट अलग पडतो म्हणून त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्यावर भर दिला. शाहू महाराजांना वैदिक विधी करण्याचा अधिकार नाही ह्या ब्राह्मणांच्या मताला सावरकरांनी विरोध केला. सामाजिक बाबतीत सावरकरांनी विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन घेतला. जो समाज स्वतःला धर्मग्रंथांनी जखडून घेतो तो समाज मागासलेला राहतो. वेद पूज्य आहेत पण ते परमप्रमाण नसावेत. हिंदू धर्माला शेकडो वर्ष पासून पासून जी मरगळ आली होती ती झटकून हिंदू धर्माला विज्ञाननिष्ठ बनविणे हेच त्यांचे ध्येय होते. सुधारणेसाठी या बेड्या तोडा असे ते सांगत –

  • वेदांचे अध्ययन इच्छा होईल त्यास करता आले पाहिजे. आपल्या धर्मबंधूंना वेद वाचण्याचा अधिकार नाही अशी भटबाजी बंद झाली पाहिजे.
  • ज्या व्यक्तीस जो व्यवसाय करण्याची इच्छा आहे तो तिला करता आला पाहिजे. जो पौरोहित्यास योग्य ती परीक्षा पास करेल तो वाटेल त्या जातीचा असला तरी चालेल, तो पौरोहित्य करेल. व्यवसाय हे त्या व्यक्तीच्या गुणांवर अवलंबून असावेत.
  • अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे. विटाळ हाच की ज्यायोगे आरोग्यास हानी पोचते.
  • परदेशगमन हे पाप आहे असे समजणे हे मूर्खपणाचे आहे. हिंदू संघटक, हिंदू व्यापारी आणि हिंदू विद्यार्थी यांचे तांडेच्या तांडे परदेशात गेले पाहिजेत.
  • शुद्धीबंदी – परधर्मी लोकांस हिंदू होता आले पाहिजे.
  • रोटीबंदी – एकत्र खाण्याने धर्म बुडतो ही अत्यंत खुळचट कल्पना आहे. ब्रेड खाण्याने धर्म बुडत नाही.

भाऊराव पाटील

भाऊराव पाटील यांनी १९१९ साली रयत शिक्षण संस्था चालू केली. १९२४ साली सातारा शहरात त्यांनी रहिवासी शाळा चालू केली. त्या ठिकाणी सर्व जातीची मुले एकत्र राहून शिकत. या प्रकारच्या रहिवासी शाळा मोठ्या प्रमाणावर त्यांनी सुरू केल्या. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी रयत शिक्षण संस्था ५०० शाळा चालवत होती; त्यांत तेव्हा २०,००० विद्यार्थी शिकत होते.

कायद्याचे राज्य

कोणत्याही समाजात बदल घडवायचा असेल तर समाजसुधारकांना कायद्याचे समर्थन लागते. ईस्ट इंडिया कंपनीने धर्मावर अवलंबत नसलेली न्याय संस्था देशात आणली. याविषयी जास्त माहिती या लिखाणात पुढे येईल. कंपनीने १७७२मध्येच दिवाणी आणि फौजदारी न्यायालये चालू केली. १८२८पासून भारतीय लोकांची न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यास सुरुवात झाली. १८३४मध्ये मेकॉले यांनी न्यायसंहिता – पीनल कोड – बनविली. इंग्रजांच्या काळात एका नागरिकाने दुसर्‍या नागरिकावर शारीरिक हल्ला करणे हा गुन्हा असल्यामुळे अस्पृश्यांवर होणारे शारीरिक हल्ले बेकायदेशीर झाले. अस्पृश्यताविरोधी कायदा मात्र इंग्रजांच्या काळात बनला नाही. स्वतंत्र भारतात १९५५ साली हा कायदा पास झाला.

समाजपरिवर्तन अतिशय हळू होते.

जोगवा’ ह्या विजयकुमार दळवींनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत नरेंद्र दाभोलकर लिहितात –

समाजपरिवर्तनासाठी कित्येक दशकांचा विचार करावा लागतो. आपल्यासारख्या अत्यंत रूढीग्रस्त आणि सुस्त समाजात परिवर्तनासाठी धीर बाळगणे याशिवाय पर्याय नसतो. याशिवाय प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांगीण उठाव लागतो. त्यामध्ये लेखन, चळवळ, कला माध्यमे, प्रसार माध्यमे, राज्यकर्त्यांचा निर्धार अशा अनेक बाबी असतात. जनमानसात जाण वाढविणे हे प्रमुख अंग असते. कला माध्यमातून जसे की कादंबरी, नाट्य, चित्रपट यातून हे सहजपणे साधले जाते.

निष्कर्ष

रेल्वेची गाडी स्टेशनात उभी असते. चालायला सुरुवात करताना गाडी अतिशय हळू चालू होते. हळूहळू वेग वाढत जातो. गार्डाचा डबा स्टेशनबाहेर गेला की गाडी वेग पकडते. भारतीय समाजाची बी. अँड एस. रेल्वे – बदल आणि सुधारणा – गाडी १८१८ साली हळू चालू लागली आणि १९२० साली गार्डाचा डबा स्टेशन बाहेर पडला होता आणि गाडीने वेग पकडला.

समाजामध्ये बदल आवश्यक आहे असा विचार करणारी एक पिढी पुढे आली. ब्राह्मणी रूढींपासून समाजाची सुटका करण्याची आवश्यकता होती आणि त्यासाठी अनेक ब्राह्मणही पुढे आले. या समाजसुधारकांनी जे विचार मांडले आणि जे कार्य केले त्याचा चांगला परिणाम पुढच्या शंभर वर्षांत दिसला. दुर्दैवाने या समाजसुधारकांनीसुद्धा भटक्या जाती आणि आदिवासींची व्यथा समाजासमोर आणली नाही.

आज आपण कोठे आहोत?

आजचा – २०२० सालचा समाज फार बदलला आहे. या बदलाची बीजे १८१८ ते १९२० या शतकात पेरली गेली. स्त्रियांच्या स्थितीत चांगला बदल झाला आहे. आपले जीवनमान खूप सुधारले आहे. शहरीकरण तिपटीने वाढले आहे. अंधश्रद्धा गेलेल्या नाहीत पण कमी झाल्या आहेत. जाती तशाच आहेत. अस्पृश्यांच्या स्थितीत बदल आहे. त्यांना आता प्रगतीच्या संधी जरूर मिळू लागल्या आहेत. अजून सुधारणा जरूर आहेतच.

ब्राह्मण ब्राह्मणेतर दुहीने दुसरे टोक गाठले आहे. एका ब्राह्मण पत्रिकेतील संपादकीयातील ही वाक्ये पाहा : ब्राह्मण समाजाची टिंगल करणे हा भ्रष्ट राजकारण्यांचा धंदा होऊन बसला आहे. सगळ्यांनाच ब्राह्मणद्वेषाची कावीळ झाली आहे. पूर्वी ब्राह्मणी वर्चस्व होते आता ब्राह्मणेतरांचे वर्चस्व आहे. आज ब्राह्मण सरकारी / निमसरकारी नोकर्‍यांतून बाहेर पडला आहे. समाजात ब्राह्मण केवळ चार टक्के असल्याने त्यांच्या मताला किंमत राहिलेली नाही. त्यामुळे ब्राह्मण राजकीय व्यवस्थेतूनही बाहेर पडला आहे.

पुढचा भाग – १७ –मध्ये आपण शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांनी केलेल्या समाजसुधारणाचा विचार करू.

मागचे भाग -

भाग १ – एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती
भाग २ – अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी
भाग ३ – अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती
भाग ४ – अठराव्या शतकातील शासनयंत्रणा
भाग ५ – धर्मशास्त्रे आणि कर्मकांडी धर्म
भाग ६ – अठराव्या शतकातील धर्माचे स्वरूप
भाग ७ – धार्मिक सुधारणांची आवश्यकता
भाग ८ – धार्मिक सुधारणांचे प्रयत्न
भाग ९ – समाजसुधारणा – दलित कोण आणि कसे?
भाग १० – समाज सुधारणा – दलितांच्या उद्धाराचे प्रयत्न
भाग ११ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १२ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १३ – समाजातील बदल
भाग १४ – समाजातील बदल – मुंबईचा विकास
भाग १५ – समाजातील बदल – पुण्याचा विकास

लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.

सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण.

सुधीर भिडे

field_vote: 
0
No votes yet

एकंदरीत आढावा छान सुरू आहे. वाचतोय. येऊद्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0