एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १५

समाजातील बदल – पुण्याचा विकास

सुधीर भिडे

या दोन भागांत महाराष्ट्रातील आजच्या पाच मोठ्या शहरांचा – पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई – एकोणिसाव्या शतकात विकास कसा झाला त्याची माहिती घेत आहोत. गेल्या भागात मुंबईच्या विकासाची माहिती घेतली. पुणे हे देशातील शिक्षण आणि समाजसुधारणा आणि राजकारण यांचे केंद्र म्हणून विकसित झाले. त्या मानाने नाशिकचा विकास हळू राहिला. नागपूरचा इतिहास थोडा निराळा आहे. नागपूर त्यावेळचा सेंट्रल प्रोव्हिन्सेसचा भाग होते तर औरंगाबाद (संभाजीनगर?) त्या काळात हैदराबादच्या निजामाच्या राज्यात होते.

पुणे आणि मुंबई या शहरांची माहिती या दोन भागांत जास्त सविस्तर दिली आहे; कारण त्यावरून त्याकाळातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थितीची कल्पना येते.

पुणे

पुण्याविषयीची माहिती खालील पुस्तकांतून घेतली आहे –
पुणे शहराचे वर्णन, ना. वि. जोशी, १८६८, पुन:प्रकाशन, वरदा प्रकाशन, २०२०.
पेशवेकालीन पुणे, रावबहादूर इनामदार, अंदाजे १९००, पुन:प्रकाशन, डायमंड पब्लिकेशन्स, २००७
पुणे नगरसंस्था शताब्दी ग्रंथ, डॉ. मा. प. मंगुडकर, पुणे महानगर पालिका, १९६०.

शनिवारवाडा

पुण्यातील पहिली मोठी वास्तू – शनिवारवाडा १७३२ साली तयार झाली. १८१७मध्ये इंग्रजांचा झेंडा शनिवारवाड्यावर उभारला गेला. अशा प्रकारे ८५ वर्षे देशातील राजकारणावर या वास्तुमध्ये राहणार्‍या लोकांचा प्रभाव राहिला. या वास्तूसाठी सुरुवातीला १६००० रुपये खर्च झाले अशी नोंद आहे. (आजच्या हिशोबाने साडेतीन कोटी). मागून तटबंदीच्या आत इमारती वाढविण्यात आल्या. मुख्य इमारत सहा मजल्यांची होती असे सांगण्यात येते. शनिवारवाड्याच्या मुख्य दरवाजाचे तोंड उत्तरेकडे होते. यास दिल्ली दरवाजा म्हणत. यावरून तेथील राजकारण्याचे लक्ष्य काय होते ते कळते. १७७९मधील नोंदीप्रमाणे शनिवारवाड्याच्या देखभालीसाठी आणि संरक्षणासाठी ३१४४ असामी होते. याशिवाय वाड्याभोवती ३०० घोडेस्वारांची गस्त असे. वाड्यात सुरेख बागा आणि कारंजी होती. आत पेशवे कुटुंबाची राहण्याची जागा आणि सरकारी कचेऱ्या होत्या.

१८२७मध्ये शनिवारवाड्याला आग लागली. ही आग सात दिवस धुमसत होती. आता फक्त तटबंदी उरली आहे.

मॅलेट आणि संगमावरील इंग्रजांची वकिलात आणि निवासस्थान

१७८५च्या जानेवारीमध्ये मॅलेट यांची पेशव्यांच्या दरबारातील राजदूत म्हणून नेमणूक झाली. प्रथम त्यांनी पेशवे आणि इंग्रज यांच्यात समझौता घडवून आणारे महादजी शिंदे यांची भेट घेण्याचे ठरविले. त्यासाठी ते मुंबईहून मथुरेला गेले. त्यानंतर राजदूत म्हणून नेमणूक पत्र घेण्यासाठी ते कलकत्त्याला गेले; आणि मार्च १७८६मध्ये पुण्यास पोचले. जानेवारी १७८५ साली नेमणूक झालेली व्यक्ती मार्च १७८६ साली एक वर्षाने पुण्यास पोचली. यावरून देशातील दळणवळणाच्या परिस्थितीची कल्पना येते.

मॅलेट पुण्यात २०० सैनिक, ६०० अन्य सेवक, दोन हत्ती आणि पाच पालख्यांसहित पुण्यास पोचले. त्यांच्याबरोबर एक सुंदर मुसलमान मैत्रीण होती. (इंग्लंडला परतल्यावर या गृहस्थांचे एका इंग्लिश स्त्रीबरोबर लग्न झाले, ही मैत्रीण भारतातच राहिली.) त्यांनी आपल्याबरोबर एक मोठा तंबू आणि अनेक राहुट्या आणलेल्या होत्या. पर्वतीजवळ त्यांनी आपला पडाव टाकला. लवकरच त्यांनी पेशव्यांकडे बंगला बाधण्याची परवानगी मागितली. त्यानुसार त्यांना मुळा-मुठेच्या संगमापलीकडे जागा देण्यात आली. ही जागा पुणे शहरापासून (त्याकाळी) पूर्ण तोडलेली होती. त्या जागेवर त्यांनी स्वत:साठी मोठा बांगला बांधला. त्याशिवाय सर्व सेवकवर्गाला राहण्यासाठी घरे बांधण्यात आली. मॅलेट पुण्यात लोकप्रिय राहिले. आपल्या बंगल्यात ते पुण्यातील प्रतिष्ठित व्यक्तींस मेजवानीसाठी निमंत्रण देत असत. त्यांनी पेशव्यास शनिवारवाड्यात एक चित्रकला विद्यालय सुरू करण्यात प्रोत्साहित केले. महाबळेश्वरचा शोध आणि वस्ती याचे श्रेय याच गृहस्थांस जाते.

या मॅलेटसाहेबांनी टिपूविरुद्ध आघाडी उभारली. इंग्रज, पेशवे आणि निजाम या तिघांत टिपूविरुद्ध लढण्याचा करार झाला. त्याप्रमाणे तिघांचे सैन्य मिळून टिपूवर हल्ला करण्यात आला. त्यात टिपूची हार झाली. जिंकलेला प्रदेश तिघांनी वाटून घेतला. या प्रसंगात काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत.

  • पेशवे आणि निजाम इंग्रजांना अजून एक राजा याप्रमाणे बघत होते.
  • एक इंग्रज राज्य, एक हिंदू राज्य आणि एक मुसलमान राज्य यांनी संयुक्तपणे एका मुसलमान राज्यावर हल्ला केला.
  • तिन्ही सैन्यात सैनिक सारखेच – हिंदू आणि मुसलमान.

१८१० साली एल्फिन्स्टन याच वकिलातीत राहिले आणि त्यांच्या काळात पेशवाई नष्ट झाली.

लकडी पूल

नानासाहेब पेशव्यांच्या काळात हा पूल १७६१ साली बांधला गेला. लाकडी बांधकाम असल्याने या पुलास लकडी पूल असे नाव पडले. १८४०च्या पावसाळ्यात पेशव्यांनी मुठेवर बांधलेला लाकडी पूल वाहून गेला. त्या जागी इंग्रजांनी दगडी कामाचा पुल बांधला . त्याचे नाव नंतर कित्येक दशके लकडी पूल असेच राहिले. सध्या हा पूल संभाजी पूल या नावाने ओळखला जातो. हा पूल नारायण पेठेला नदीच्या पलीकडे भांबुर्ड्याला जोडत असे.

जुन्या पुण्यातील पेठा

पुण्यातील पेठांचा विस्तार खर्‍या अर्थाने पेशव्यांच्या काळात झाला. प्रत्येक पेठेत कोतवालाची एक चौकी असे. यापैकी शनिवार पेठ, कसबा पेठ, मंगळवार पेठ , बुधवार पेठ, रविवार पेठ, सोमवार पेठ या ठिकाणी मुसलमानांच्या काळात वस्ती होती आणि वस्त्यांची नावे पण मुसलमानी होती. पेशव्यांनी मुसलमानी नावे बदलून वारांच्या नावांप्रमाणे पेठांची नावे दिली. वारांप्रमाणे पेठांची नावे ही कल्पना बहुतेक सातार्‍याच्या शाहू महाराजांकडून घेतली. सदाशिव पेठ, नारायण पेठ, रास्ता पेठ, घोरपडे पेठ या वस्त्या नव्याने वसविण्यात आल्या. मुसलमानी वस्त्यांची नावे हिंदू करणे ही प्रथा ३०० वर्षापूर्वी चालू झाली असे दिसते.


कसबा गणपती
कसबा गणपती

कसबा पेठ पुण्यातील सर्वात जुनी वस्ती समजली जाते. येथे एक प्राचीन गणेश मंदिर भग्नावस्थेत होते. जिजाऊंनी या मंदिराचा जीर्णोद्धार १६४० मध्ये केला. जवळच त्यांची वास्तू लाल महाल आहे. पुण्याचे ग्रामदैवत जोगेश्वरीचे देऊळही येथून जवळच आहे. त्याकाळी कसबा पेठेत पुरंदरे , मुजुमदार, धडफळे अश्या मोठ्या सावकारांचे आणि सरदारांचे वाडे होते.

शनिवार पेठ शनिवार वाड्यापासून सुरू होते आणि मुठा नदीच्या काठाने ओंकारेश्वरापर्यंत ही वस्ती आहे. येथे मुसलमानांच्या काळापासून वस्ती होती. पहिल्या बाजीरावांनी १७३० साली शनिवार वाडा बांधल्यावर ही वस्ती वाढली. या पेठेत प्रथम पासून सोनार रहात असत. वर्तकी तपकिरीचा कारखाना याच भागात होता.

रविवार पेठेत निजामाच्या काळापासून वस्ती होती. नानासाहेब पेशव्यांनी येथे व्यापारी वस्ती वसविली. आजही या भागात बोहरा, मारवाडी यांची पुष्कळ वस्ती आहे. सोमवार पेठेची वस्ती कसबा पेठेएवढीच जुनी आहे. शहाजी राज्यांच्या काळात या वस्तीला शहापुरा म्हणत असत. आबा शालूकर याने येथे शंकराचे मंदिर बांधले. त्यावरून याचे नाव सोमवार झाले असावे. या भागात कोष्टी आणि शिंपी यांची वस्ती होती.

बुधवार पेठेत मुसलमानांच्या काळापासून वस्ती होती. माधवराव पेशव्यांनी येथे सुधारणा केल्या. नाना फडणिसांचा वाडा या पेठेत होता. इंग्रजांच्या काळात हा वाडा डेक्कन एज्युकेशन सोसायटीला देण्यात आला. सोसायटीने या जागेवर शाळेची इमारत बांधली. नानांचा एक दिवाणखाना स्मरणार्थ ठेवला आहे . तोही आता वाईट स्थितीत आहे.
शुक्रवार पेठ खासगीवाले यांनी नानासाहेब पेशव्याच्या काळात वसविली. १८८५ साली या पेठेत नवीन भाजी मंडई बांधण्यात आली . त्या आधी मंडई शनिवारवाड्याच्या समोरच्या पटांगणात भरत असे.

पानिपतच्या युद्धानंतर सदाशिवराव भाऊ यांच्या स्मरणार्थ ही पेठ वसविली गेली. येथे नाना फडणीस यांनी मोठी विहीर बांधली ज्यास खजिन्याची विहीर म्हणून ओळखले जायचे.


खजिन्याची विहीर बांधकाम
खजिन्याच्या विहिरीजवळचे हे सुंदर बांधकाम आज अस्तित्वात नाही.

१७६१ साली नारायण पेठेची वस्ती झाली .पेठेचे नाव नारायण राव पेशव्यांवरून दिले गेले. नारायण पेठेत गायकवाड वाडा ही महत्त्वाची वास्तू आहे. हा वाडा लोकमान्य टिळकांनी सयाजीराव गायकवाड यांच्याकडून १५,००० रूपयास विकत घेतला. या जागेत टिळकांनी केसरी-मराठा प्रकाशनासाठी छापखाना चालू केला. टिळक पण याच वाड्यात रहात.

१७८१ साली व्यंकटराव घोरपड्यांनी घोरपडे पेठ वसविली. पेशव्याच्या सैन्याचे प्रमुख रास्ते यांनी १७८३ मध्ये रास्ता पेठ वसविली.

भाम्बुर्डा

लॉईड पूल नावाचा पूल शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाजासमोर नदीवर बांधला गेला. या पुलाला आता नवा पूल म्हणतात. नवा पूल आणि लकडी पूल यामुळे नदीपलीकडील भाम्बुर्डा खेडे पुण्यास जोडले गेले आणि लवकरच पुण्याचा भाग बनले. ह्या भागास आता शिवाजीनगर म्हणतात. पांचाळेश्वराची पुरातन लेणी या भागात आहेत.

पर्वती
पर्वतीची माहिती पुणे शहराचा एकोणिसाव्या शतकातील विकास या सदरात बसत नाही. कारण पर्वतीचा विकास त्याआधी झाला होता. पुण्याच्या दक्षिणेस पर्वती ही एक टेकडी आहे. या टेकडीवर नानासाहेब पेशव्यांनी एक देऊळ बांधले. पर्वतीच्या पायथ्याशी रमणा वसाहत होती. त्याविषयी आपण आधी माहिती पाहिली आहेच. पर्वतीच्या देवळाविषयी करमरकरांच्या लिखाणात माहिती आली आहे ती या प्रमाणे – मंदिरात शिवाची चांदीची मूर्ती आहे तिचे वजन दोन मण (७४ किलो) आहे. शिवाच्या एका मांडीवर पार्वतीची मूर्ती आहे आणि दुसर्‍या मांडीवर गणपतीची मूर्ती आहे. या दोन्ही मूर्ती सोन्याच्या असून त्यांची वजने १,१०० तोळे आणि ९०० तोळे आहेत. मंदिराच्या कळसाला सोन्याचा पत्रा चढविला आहे ज्याचे वजन १,००० तोळे आहे . एकूण सोने ३,००० तोळे (३०,००० ग्राम). (या मूर्तीची आजची किंमत १६ कोटी रुपये झाली असती.)


पर्वती येथील मूर्ती
पर्वती येथील मूर्ती

पुण्याची पर्वती हे पुस्तक प्र. के. घाणेकर यांनी लिहिले, (स्नेहल प्रकाशन, २०१५). या पुस्तकात आलेल्या माहितीनुसार १५ जुलै १९३२ रोजी पर्वतीवर दरोडा पडला आणि ही मूर्ती चोरीला गेली. त्यानंतर पर्वती देवस्थानाने पंचधातूची तशीच मूर्ती १९३६ साली करून घेतली, जी आज देवळात आहे.

लोकसंख्या

अठराशे सालापासून पुण्याची स्थिती बिकट होत चालली. कर्नल वेल्स याने १८०१मध्ये पुण्याची लोकसंख्या सहा लाख असल्याचे नमूद केले आहे. १८०२ साली होळकरांनी पुणे लुटले आणि १८१८पर्यंत पुण्याची लोकसंख्या १,१०,००० एवढी कमी झाली होती.

साल लोकसंख्या
१८०१ ६.००,०००
१८१८ १,१०,०००
१८५१ ७३,०००
१८६४ ८०,०००
१८८१ ९९,६२२
१९३१ २,५०,१८७
२००१ २३,११,४९६

१८५०पासून लोकसंख्या परत वाढायला सुरुवात झाली असे दिसते.

फोटोंत पुण्यातील एक रस्ता आणि एक त्या काळातील इमारत दिसत आहे.

जुन्या पुण्यातला रस्ता पुण्यातील जुनी इमारत

साथीचे रोग - प्लेग, देवी आणि फ्लू

१८९६ साली पुण्यात प्लेगचा प्रथम प्रादुर्भाव झाला. पुढची वीस वर्षे प्लेगमुळे कमी-जास्त मृत्यू होतच राहिले. या कालावधीत पुण्यात प्लेगने साधारण ५०,००० लोक मृत्युमुखी पडले. त्या काळात पुण्याची लोकसंख्या दोन लाखाच्या जवळपास होती; याचा विचार करता मृत्यूचे प्रमाण जास्त होते. प्लेगवर निश्चित असा उपाय माहीत नव्हता. त्यामुळे राहती जागा सोडून जाणे हाच एकमेव पर्याय होता. रोगाची लागण झालेली घरे साफ करण्याची जबाबदारी रँड या अधिकार्‍यावर देण्यात आली. लष्करातील शिपायांच्या गैरवर्तणूकीमुळे असंतोष वाढला. सैनिकांच्या अत्याचाराला लोक कंटाळले. चाफेकर बंधूंनी गणेश खिंडीत रँडचा वध केला. १८९७ साली नगरपालिकेने प्लेगच्या रोग्यांसाठी एक हॉस्पिटल चालू केले; जे आजही नायडू सांसर्गिक रोगांचे रुग्णालय या नावाने सुरू आहे. १९०० साली लोकमान्य टिळकांनी प्लेगच्या रोग्यांसाठी अजून एक नवे रुग्णालय स्थापन केले. या वेळी हे लक्षात आले की प्लेगच्या फैलावासाठी उंदीर जबाबदार आहेत. मग नगरपालिकेने उंदीर मारण्याची मोहीम चालू केली. १९२०च्या सुमारास प्लेग आटोक्यात आला.

देवीच्या लशीचा शोध युरोपमध्ये १७९६ साली लागला. १८०० साली पुण्यात देवीची साथ सुरू झाली. पेशव्यांनी पुढाकार घेऊन लोकांना लस टोचून घेण्यास उद्युक्त केले. १८३०पर्यंत मुंबई प्रांतातील सर्व शहरांत लस टोचणे सुरू झाले होते. त्यामुळे प्लेगच्या तुलनेत देवीच्या रोगाने मृत्यूचे प्रमाण कमी राहिले.

१९१८ साली फ्लूच्या साथीची सुरुवात झाली. जेव्हा साथीने भयंकर रूप घेतले तेव्हा दिवसाला २०० नागरिक मृत्युमुखी पडत होते. ही साथ तीन वर्षे राहिली.

पाणीपुरवठा आणि ड्रेनेज

खडकवासला धरणाचे काम १८८५ साली पूर्ण झाले. या धरणातून पुण्याला पाणी मिळू लागले. शहरात १९१५पर्यंत नळाने पाणीपुरवठा चालू झाला. १८८० सालापासून जमिनीखालून ड्रेनेजचे काम चालू झाले. सुरुवातीला ही व्यवस्था नीट काम करीत नव्हती. १९०१० साली नवीन योजना आखण्यात आली. खर्‍या अर्थाने १९२३मध्ये नवीन योजनेच्या कामास प्रारंभ झाला आणि १९२७ साली पुण्यात जमिनीखालील ड्रेनेज काम करू लागले.

सण, खेळ आणि मनोरंजन

पेशवेकाळी पुण्यात दसरा, गणेशोत्सव आणि होळी हे सण प्रामुख्याने साजरे व्हायचे. या सणासाठी सरकारातून भरीव रक्कम देण्यात येत असे. गणेशोत्सवासाठी शनिवारवाड्यात गणेश महाल बांधला होता. मेणबत्त्या आणि झुंबरे यांच्या प्रकाशाने महालात झगमगाट असे. महालात करमणुकीचे कार्यक्रम होत. दसरा हा मोठा सण होता. पेशवे गावाबाहेर जाऊन सीमोल्लंघन करीत. मग दरबार भरे. महत्त्वाचा व्यक्तींना सन्मानार्थ पोशाख दिला जाई. एका नोंदीत हैदराबादच्या निजामाला ६० लाखांचा पोशाख दिला अशी नोंद आहे. होळीचा सण पाच दिवस चाले. पाचव्या दिवशी रंगपंचमीला केशर आणि पळसाची फुले यांपासून तयार केलेले पाणी एकमेकावर उडविले जाई.

१८९२ साली लोकमान्यांच्या प्रेरणेने पुण्यात दहा दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यात आला. लोकरंजनाबरोबर लोकशिक्षण हा याचा हेतू होता. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सन १८९२मध्ये स्थापन केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने १३० वर्षे पूर्ण केली आहेत.


भाऊसाहेब रंगारी यांनी स्थापन केलेला सार्वजनिक गणपती
भाऊसाहेब रंगारी यांनी स्थापन केलेला सार्वजनिक गणपती

भाऊ रंगारी गणपतीची मूर्ती राक्षसाला मारणारा गणेश अशी असते. इंग्रजांच्या काळात ही एक रूपकात्मक प्रतिमा झाली. पुण्यातून हा उत्सव महाराष्ट्रात पसरला आणि महाराष्ट्राच्या बाहेरही गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली.

खेळांत मुष्टियुद्ध आणि कुस्ती हे प्रमुख खेळ होते. घोडेस्वारी आणि घोड्यावरून भालाफेक यांत सरदार तरबेज असत. हत्तीची झुंज हा आवडता मनोरंजनाचा खेळ होता. गंजिफा, सोंगट्या आणि तमाशे ही करमणुकीची साधने होती. पर्वतीच्या पायथ्याला मोठे प्राणीसंग्रहालय होते. त्यात प्राणी पिंजर्‍यांत न ठेवता मोकळ्यावर असत. त्यावेळच्या हिंदुस्थानातले अशा प्रकारचे हे मोठे प्राणीसंग्रहालय समजले जाई.

पोशाख

उच्चवर्णीय दहा हाती धोतरे नेसत. ब्राह्मण अंगावर उपरणे घेत. इतर लोक अंगरखे घालत. सर्व उच्चवर्णीय लांब लाफा असलेले पागोटे घालत. कुणबी शूद्र पाच हाती पंचा नेसत. कित्येक कुणबी फक्त लंगोटी घालून फिरत. अंगरखा म्हणजे काय हे तरुण पिढीस माहीत नसेल. खालील फोटोत अंगरखा घातलेला पुरुष दिसत आहे. डोक्यावर पागोटे आहेच. अंगरख्यावर उपरणे आहे, याचा अर्थ ही कोणी प्रतिष्ठित व्यक्ती असावी. माझे आजोबा अशाच पोषाखात असत.


नगर वाचन मंदिर

शिक्षण संस्था

१८२१ साली सरकारी मदतीने पुण्यात विश्रामबाग वाड्यात पाठशाळा सुरू केली गेली. यामध्ये हिंदू धर्म ग्रंथांचे शिक्षण दिले जाई. इंग्रजी शिकविणारी पहिली शाळा १८३१ साली स्कॉटिश मिशनने सुरू केली. १८३७ साली मेजर कँडी यांची शिक्षण विभागप्रमुख म्हणून नेमणूक झाली. लवकरच लष्कर भागात आणि शहरात चार शाळा सुरू करण्यात आल्या. या काळात सहाशे मुले शाळेत शिकत होती. महिन्याला आठ आणे फी होती. १८५१पासून जोतिबा फुल्यांनी मुलींसाठी तीन शाळा चालू केल्या. त्यातील एक शाळा महार मुलींसाठी होती.

महाराष्ट्रातील त्या काळातील शिक्षण संस्थांविषयी जास्त माहिती येणार्‍या भागात दिली जाणार आहे. या भागात पुण्यातील शिक्षणाच्या व्यवस्थेची सुरुवात आपण पाहिली.

नगर वाचन मंदिर

लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या पाठिंब्याने बुधवार पेठेत वाचनालयाची सुरुवात १८४८ साली झाली. लवकरच हे वाचनालय १७५ वर्षे पूर्ण करीत आहे. सुरुवातीला वर्गणी वर्षाची तीन रुपये होती. १८५२पर्यंत वाचनालयात २१४३ पुस्तके होती. ना. वि. जोशी लिहितात – जुन्या चालीच्या लोकांस याचा उपयोग समजत नाही. यामुळे या लोकांचे नुकसान आहे.


नगर वाचन मंदिर
पुणे नगर वाचन मंदिर

आजमितीस हे वाचनालय काम करीत असून वाचनालयात ५०००० दुर्मीळ पुस्तकांचा संग्रह आहे. सध्या नवीन काळानुसार पुस्तकांचे डिजिटायझेशन चालू आहे. पुण्यात बर्‍याच ठिकाणी वाचनालयाच्या शाखा आहेत. या लेखमालेच्या लेखकाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखनात आलेल्या सदर्भातील बरीच पुस्तके या वाचनालयातून मिळाली. नगर वाचन मंदिराचे आभार.

नगरपालिका

१८४२ साली सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा पास केला. १८५७ साली पुणे नगरपालिकेची स्थापना झाली. पहिले सरकारनियुक्त सभासद याप्रमाणे होते – सरदार नातू, बापू मांडे, नारायण सावकार, जीवनजी मर्चंट, सखाराम सावकार, भास्कर दामोदर, वामनराव सरदार. १८६२ साली मुंबई सरकारने नगरपालिकांविषयी नवा कायदा केला. कराच्या रूपाने आलेला पैसा शाळा, हॉस्पिटले यांवर खर्च करावा असा आदेश देण्यात आला. १८७६ ते १८८२ याकाळात महात्मा फुले नगरपालिकेचे सभासद होते. १८८३पर्यंत नगरपालिकेतील सदस्यांची सरकारकडून नेमणूक होत असे. १८८३ साली पहिली निवडणूक झाली.

१८८५ सालापासून नगरपालिकेकडे सार्वजनिक आरोग्य, रस्ते आणि सार्वजनिक दिवे या जबाबदार्‍या आल्या. १८७७ साली नगरपालिकेकडे रस्त्यावर लावण्यात आलेले ४३१ दिवे होते अशी नोंद आहे. बहुतेक दिवे खोबरेल तेलाचे होते. लवकरच खोबरेल तेलाचे दिवे बंद करून रॉकेलवर प्रकाश देणारे दिवे रस्त्यावर लावण्यात आले. १९२० साली रस्त्यांवर विजेचे दिवे आले. १८८४ साली आग विझविण्यासाठी एक हातपंप असलेली बैलगाडी चालू करण्यात आली.

१९२० साली करातून नगरपालिकेला ३ लाख रुपये उत्पन्न मिळाले.

पुणे नगरपालिकेचे महत्त्वाचे सभासद –
महात्मा फुले – १८७६ – १८८२
लोकमान्य टिळक – १८९५ – १८९७
गोपाल कृष्ण गोखले – १९०२ – १९०६

उद्योगधंदे

वेताळ पेठेत आणि रास्तापेठेत लुगडी, पागोटी आणि धोतरे बनविणारे कारागीर माग चालवित. १८८४ सालाच्या गॅझेटमध्ये पुण्यात १२०० माग चालू होते; आणि रेशमी आणि सुती कापड बनत होते. या धंद्यात ७०० कामगार काम करीत. जेव्हा नवीन कापड मिल्स मुंबईत चालू झाल्या तेव्हा हा धंदा बसला.

तांब्या-पितळ्याच्या भांड्यांचा धंदा पुण्यात १८६० साली सुरुवात झाला. पत्रा इंग्लंडहून आयात होत असे. या धंद्यात २३०० कामगार काम करीत होते. १८८८ साली पुणे मेटल वर्क्स हा पितळ्याची भांडी बनविण्याचा कारखाना चालू झाला.

१८६९ साली ॲम्युनिशन फॅक्टरी चालू झाली. मुंबईतील दारूगोळा बनविण्याचा कारखाना पुण्यास हलविण्यात आला. १९०८ साली बंदुकीची आणि तोफांची दारू पुण्यात बनू लागली.

तवे, कुर्‍हाडी, कुदळी वगैरे बनवणारे लोखंडी सामानाचे कारखाने होते. पुण्यात नाना तर्‍हेची अत्तरे, उदबत्त्या मिळत. चुलीसाठी लाकडाच्या वखारी जागोजागी असत. तपकिरीची तीनशे दुकाने होती. वर्तकी तपकीर चांगली मिळे. इतक्या लहान शहरात तीनशे दुकाने म्हणजे त्या काळात लोकांना तपकिरीचे चांगलेच व्यसन होते असे म्हणायचे.

पुणे कॅम्प

जुन्या पुण्यात कॅम्प (कँटनमेंट) हा भाग महत्त्वाचा होता. १८१७ साली इंग्रजांनी जुन्या पुण्याच्या पूर्वेला जमीन ताब्यात घेतली. हा भाग वानवडी, घोरपडी, मांजरी अशा त्या वेळच्या खेड्यांत होता. इंग्रजांनी ताब्यात घेतलेली जागा जुन्या पुण्याच्या दुप्पट होती. या भागात साधारण पाच हजार सैनिकांची राहण्याची सोय करण्यात आली. सैनिकांसाठी दवाखाना चालू करण्यात आला. सैनिकांच्या सरावासाठी एक फायरिंग रेंज तयार करण्यात आली. या जागेला आजही गोळीबार मैदान असे नाव आहे. एक परेड ग्राऊंड बनले.

हे सर्व वाचून मनात दोन विचार येतात. आपण म्हणतो की पेशवाईचा अंत १८१८ साली झाला. त्या आधी एक वर्ष इंग्रजांनी पुण्यात आपले पाय पसरले होते. दुसरे म्हणजे सैनिकांसाठी अशा तर्‍हेची व्यवस्था त्या वेळच्या किती राजेलोकांनी केली होती? दुसर्‍या बाजीरावांचे बोलायचे तर पेशव्याच्या सैनिकांना वेळेवर पगारही मिळत नसत. सैनिकांच्या राहण्याच्या आणि वैद्यकीय व्यवस्थेची गोष्ट तर दूरच राहिली.

ना. वि. जोशी (पुणे शहराचे वर्णन, १८६८, पुन:प्रकाशन, वरदा प्रकाशन) लिहितात –

हल्ली पुण्याजवळ लश्कर वसत चालले आहे. कारण ही जागा मुंबई इलाख्याची लष्करी कोठी आहे. पाण्यासाठी छोटे धरण बांधून वाफेच्या यंत्राने पाणी चढविले जाते. ते काम करण्यास चौसष्ठ बैल लागत. सदर बाजार नावाचा मोठा बाजार आहे. तिथे बोहर्‍यांची दुकाने आहेत. लष्करात प्रोटेस्टंट लोकांची पाच देवळे आहेत. त्यातील एक मुंबादेवीचे आहे (सेंट मेरी). या देवळात लोक जाजमावर बसत नाहीत. खुर्च्यांवर बसतात. एका देवळास लागून अनाथ मुलामुलींची शाळा आहे. यावर पंतोजी बायकाच आहेत. याला कोनवेंट म्हणतात.

येथे घोड्याच्या शर्यतीचे मंडल आहे (रेस कोर्स). जेव्हा शर्यत असते तेव्हा लोकांचा पूर लोटतो. शर्यतीत साहेब लोक पैसा खर्च करितात व कित्येक कर्जबाजारू होतात.

चर्च

पुण्यात कॅम्पचा (कँटनमेंट) उल्लेख आला की चर्चेस आली. आजच्या पुण्याच्या समाजजीवनात चर्चचा उल्लेख येत नाही. परंतु एकोणिसाव्या शतकात चर्चना प्रामुख्याचे स्थान होते कारण ती राज्यकर्त्यांची प्रार्थनास्थळे होती. पहिले चर्च सवाई माधवरावाच्या काळात १७९५ साली बांधण्यात आले (Our Lady of the Immaculate Conception). वर उल्लेखिल्याप्रमाणे जेव्हा कॅम्प भागात इंग्रजांची वस्ती १८१७पासून चालू झाली तेव्हा इंग्रज सैनिकाच्या सोयीसाठी All Saints Anglican Church बांधण्यात आले. ईस्ट इंडिया कंपनीने १८२० साली अजून एक चर्च बांधले (St Mary’s Church) ज्याचा उल्लेख ना. वि. जोशी आपल्या लिखाणात करतात. पुण्यातील कथीड्रल १८८६ साली बांधण्यात आले.

डावीकडे सेंट मेरी चर्च आणि उजवीकडे पंच हौद मिशन चर्च.

सेंट मेरी चर्च  पंच हौद मिशन चर्च.

पंच हौद मिशन चर्चमध्येच चहा-बिस्किटाचा कार्यक्रम झाला; ज्याची माहिती आपण आधीच्या भागात पाहिली.
(माहितीचा स्रोत : whatshot, 6 Most Beautiful Churches In Pune That Are Known For Architecture, Heritage And Grandeur!, अपराजिता विद्यार्थी, 5 Mar 2021)

नाशिक शहराचा विकास

नाशिकच्या विकासातील काही महत्त्वाचे टप्पे –

नाशिकमध्ये १८६१ साली प्रथम आधुनिक शाळा चालू झाली. पुढच्या वर्षी नाशिकमध्ये रेल्वे आली. १८६४ साली नाशिक नगरपालिका स्थापना झाली. त्याच वर्षी नाशिकमधले पहिले वृत्तपत्र चालू झाले. १९२८ साली नाशिकमध्ये सरकारी छापखाना चालू झाला; तिथे चलनाच्या नोटा छापल्या जाऊ लागल्या.

नाशिक क्रांतिकारी घडामोडींचे शहर म्हणून सावरकरांमुळे प्रसिद्धीला आले. सावरकरांनी येथे मित्रमेळा ही संघटना बनविली. या संघटनेतून प्रेरणा घेऊन अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांची हत्या केली. या घटनेकरता अनंत कान्हेरे त्यांच्या साथीदारांबरोबर फासावर गेले.

नाशिकची तिसरी ओळख सैन्याच्या छावणीमुळे बनली. १८६९ साली देवळाली येथे सैन्याची मोठी छावणी स्थापण्यात आली. १९०४ साली सैन्यातील अधिकार्‍यांसाठी इंडियन स्टाफ कॉलेज नाशिकला सुरू झाले. नंतर हे कॉलेज क्वेट्टा (आता पाकिस्तान) येथे हलविण्यात आले.

नागपूर

नागपूरचे भोसले घराणे नागपूर आणि आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता करीत होते. पश्चिमेस बेरार (वर्‍हाड) आणि पूर्वेस ओडिशापर्यंत भोसल्यांची सत्ता होती. इंग्रजांनी १८१८ साली रघुजी भोसले यास गादीवर बसविले. १८५३ साली रघुजी भोसले निपुत्रिक निवर्तले आणि इंग्रजांनी संस्थान बरखास्त केले. अशा तर्‍हेने खर्‍या अर्थाने १८१८पासूनच इंग्रजांची नागपूरवर सत्ता प्रस्थापित झाली होतो. १८६१ साली नागपूरचा प्रदेश सेंट्रल प्रॉव्हिन्सेस या राज्यात सामील करण्यात आला आणि नागपूर या राज्याची राजधानी बनली. त्या वेळेपासून नागपुरी संस्कृतीवर हिंदीचा प्रभाव राहिला. नागपुरातील पहिले कॉलेज १८४६ साली चालू झाले. टाटांनी १८७७ साली नागपूर येथे कापड गिरणी चालू केली.

औरंगाबाद

औरंगजेबाच्या काळात या शहराचे नाव औरंगाबाद ठेवण्यात आले. त्या काळात औरंगाबाद मुघल लोकांची दक्षिणेतील राजधानी होती. मुघलांच्या अस्तानंतर हे शहर हैदराबादच्या निजामांच्या हातात गेले. एकोणिसाव्या शतकात हे शहर निजामाच्या संस्थानाचा भाग होते. १८५७ साली औरंगाबाद येथील इंग्रजांच्या सैन्यात उठावाची चिन्हे दिसली. पुण्याहून इंग्रजांचे सैन्य येऊन याचा बीमोड करण्यात आला. १९५० सालापर्यंत औरंगाबाद येथे महाविद्यालय नव्हते.

निष्कर्ष

पुण्याची प्रगति शिक्षण आणि राजकारण ह्या क्षेत्रात राहिली. शिक्षणात पुण्याने आपले स्थान अजूनही टिकवले आहे. आज पुण्यात १३००+ कॉलेजेस आहेत आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशिवाय सहा अभिमत विद्यापीठे आहेत.

Ranade described Poona as the intellectual capital of Western India and Bombay as its suburb. (Booklet on Gopal Krushn Gokale by Dr S. Aiyar, Publication Indian Liberal Group, 1973)

त्या काळात नागपूर हे सेंट्रल प्रोविंसेस या राज्याचे राजधानीचे शहर राहिले; त्यामुळे त्या शहराचा विकास झाला. नाशिक आणि औरंगाबादेच्या विकासाला उशिराने सुरुवात झाली.

पुढच्या भागात – भाग १६मध्ये समाजसुधारणेचे समाजसुधारकांनी जे प्रयत्न केले ते पाहू.

मागचे भाग -

भाग १ – एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती
भाग २ – अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी
भाग ३ – अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती
भाग ४ – अठराव्या शतकातील शासनयंत्रणा
भाग ५ – धर्मशास्त्रे आणि कर्मकांडी धर्म
भाग ६ – अठराव्या शतकातील धर्माचे स्वरूप
भाग ७ – धार्मिक सुधारणांची आवश्यकता
भाग ८ – धार्मिक सुधारणांचे प्रयत्न
भाग ९ – समाजसुधारणा – दलित कोण आणि कसे?
भाग १० – समाज सुधारणा – दलितांच्या उद्धाराचे प्रयत्न
भाग ११ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १२ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १३ – समाजातील बदल
भाग १४ – समाजातील बदल – मुंबईचा विकास

लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.

सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण.

सुधीर भिडे

field_vote: 
0
No votes yet