बुलेटप्रूफ कॉफी

२०२२ च्या नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला स्वत:चे वजन केले आणि ते ६८ किलो भरले. मा‍झ्या साडे पाच फूट उंचीसाठी योग्य BMI range १८.५ ते २४.९ अशी आहे. थोडक्यात म्हणजे, मी स्थूलपणाकडे वाटचाल करीत असल्याची ती पहिली चाहुल होती. पुढील वर्षाच्या (२०२३) फेब्रुवारीत होणार्‍या लांब पल्ल्याच्या शर्यतीत भाग घ्यायचा असल्याने मला वजन कमी करणे भागच होते. तेव्हा ६० किलो हे माझे ध्येय ठरवले आणि लवकरात लवकर ते कसे साध्य करता येईल याचा शोध घेण्यास प्रारंभ केला.

तसे पाहीले तर इंटरनेटवर अक्षरश: हजारो उपाय उपलब्ध आहेत. परंतु मला सोपा, खात्रीशीर, स्वस्त आणि सर्वात मुख्य म्हणजे लॉजिकली पटणारा असा उपाय हवा होता. दोन प्रकार सापडले -

१) डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा. जे म्हणतात दिवसातून फक्त दोन वेळाच खा.

२) काही विदेशी तज्ञांचा (डॉ. जेसन फुंग, डॉ. स्टर्न एकबर्ग, डॉ. अनवीन इत्यादी). जे म्हणतात दिवसाचे दोन भाग करा. एक १६ तासांचा ज्यात पाण्याव्यतिरिक्त काहीही न घेणे. आणि दुसरा ८ तासांचा, ज्यात दिवसभराचे खाऊन घेणे.

वरील दोन्ही उपायांत एक गोष्ट समान होती ती म्हणजे साखर पूर्णपणे वर्ज्य करणे आणि पिष्टमय पदार्थांचे (कार्बोहायड्रेट) चे प्रमाण कमी करणे. म्हणजेच सोप्या भाषेत धान्ये (गहू, तांदूळ), बटाटे इत्यादी कमी खाणे.

दोन्ही पद्धती लॉजिकली पटल्या असल्यामुळे मी त्यांचे मिश्रण करायचे ठरवले. आणि ८ तासांत दोन जेवणे करणे आणि उर्वरित काळात काहीही न खाणे, असे सुरू केले. अर्थात दोन जेवणांच्या मध्ये विना साखरेचा आणि कमी दुधाचा चहा किंवा कॉफी घेता येत होतीच. परंतु मला त्यात काहीतरी नाविन्य असावे वाटल्यामुळे पुन्हा शोधाशोध सुरू केली. आणि मला गवसली - बुलेटप्रूफ कॉफी.

मूळ पाश्चिमात्य पाककृतीत, फिल्टर कॉफीत क्रीम घालून पिणे असे आहे. मी त्यातील सारांश घेऊन स्वत:ची पाकृ बनवली. फिल्टर कॉफीऐवजी इन्स्टंट कॉफी वापरणे. आणि क्रीमऐवजी खोबरेल तेल वापरणे (शेवटी दोन्हीत १००% फॅट्च).

तर ही आहे सोपी, चटकन होणारी आणि पौष्टिक भारतीय पद्धतीची बुलेटप्रूफ कॉफी.

साहित्य -

इन्स्टंट कॉफी - १ चमचा
खोबरेल तेल - आवडीनुसार १-२ चमचे
गरम पाणी - १ कपभर

(वर सांगितलेल्या उपायांनी माझे वजन अवघ्या दोन महिन्यात ६० किलोंवर आले. मधल्या काळात ४-५ लग्न इत्यादी कौटुंबिक समारंभात भाग घ्यावा लागल्याने तेवढे दिवस ढील द्यावी लागली. ते जमेस धरूनही दोन महिन्यात ८ किलो कमी ही चांगलीच उपलब्धी म्हणायला हवी!)

https://drive.google.com/file/d/1cz5cNbB78f05I-eoaNnFFNLVkYn3p83Q/view?u...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

माझ्या इंटरमिन्टन्ट फास्टिंग प्रयोगांत मलाही कॉफी+खोबरेल तेल ही अफाट गोष्ट गवसली.
मी फ्रेंच प्रेसमध्ये ब्रू केलेली अरेबिका कॉफी (१/२ कप), २ टेबल स्पून खोबरेल तेल असं मिल्कशेक करायच्या मिक्सरमध्ये फिरवून घेते. तेल-पाणी एकजीव झाल्याने ती जास्त छान लागते. ब्लॅक कॉफी + एक चमचा बदाम तेल हेही छान लागतं.

अरे वा! मिक्सरमधून फिरवून घेणे हा चांगला प्रकार वाटतोय!

श्री दिक्षित यांनी सुचविले आहे फक्त दोन वेळा आहार घेणे .. ते तर मी वर्षानुवर्षे (अगदी बालपणापासूनच) करते आहे. सकाळचा चहा जरा जास्तीचा इतकेच. आहारही बहुतांशवेळा शाकाहारीच असतो... गोड खाणे बहुतेकवेळा काही निमित्तानेच असते. यात विशेष ते काय.
दुसरा उपाय सध्या करते आहे म्हणजे एकवेळेलाच जेवण घेणे.... पण त्याचाही उपयोग जाणवत नाही.
असो.. लांब पल्ल्याच्या शर्यतीकरता शुभेच्छा!

खूप गरम कॉफीमधे थोडेसे साजूक तुप सुद्धा चांगले लागते ... स्वानुभव आहे.

*********

उतनाही उपकार समझ कोई जितना साथ निभाए |
जनम मरन का मेल है सपना, ये सपना बिसरा दे |
कोई ना संग मरे ...

शुभेच्छांकरीता धन्यवाद!

शर्यत गेल्या रविवारी १२ तारखेलाच पार पडली आणि त्यात माझा पर्फोर्मन्स बर्‍यापैकी चांगला झाला.

तुम्हाला OMAD (One Meal A Day) चा देखिल फायदा होत नाही हे आश्चर्यजनकच. कदाचित तुमच्या आहारात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असावे हा माझा अंदाज.

पुढील बुलेटप्रूफ कॉफी ही साजूक तुपाबरोबरच!!

तीनही घटक -तेल,गरम पाणी,कॉफी वेगवेगळे काय परिणाम दाखवतात हे पाहिले पाहिजे.

तीनही घटक -तेल,गरम पाणी,कॉफी वेगवेगळे काय परिणाम दाखवतात हे पाहिले पाहिजे.

हे तीनही घटक रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवीत नाहीत हाच त्याचा फायदा. खोबरेल तेलच हवे असे काही नाही. साजूक तूप, लोणी देखिल चालू शकेल.

एखादी हायब्रीड गाडी ज्याप्रमाणे दोन इंधनांवर चालते (समजा सीएनजी आणि पेट्रोल) त्याचप्रमाणे आपले शरीरदेखिल दोन इंधनांवर चालते - ग्लुकोज आणि चरबी (फॅट्स).

परंतु होते काय की आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे (दर ३-४ तासांनी काहीतरी खाणे वा चहा-कॉफी घेणे) रक्तातील ग्लुकोजची पातळी दिवसभर कायम चढीच राहते. इंधन म्हणून शरीरातील फॅट्स वापरले जातच नाहीत. रात्रीच्या ८ तासांच्या झोपेमुळेच काय तेव्हा ग्लुकोजची पातळी कमी होते. पण लगेचच आपण १-२ चमचे साखर घातलेला चहा पितो आणि ग्लुकोजची पातळी पुन्हा वाढवतो!

तर, जर शरीरातील चरबी जाळायची असेल तर सर्वप्रथम रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी राखणे जरुरीचे आहे. आणि हे साध्य होते दोन प्रकारे -
१) कमी वेळा खाणे.
२) जेव्हा कधी खाणे होईल तेव्हा असे पदार्थ खाणे जेणेकरून ग्लुकोज फारसे वाढणार नाही.

ग्लुकोज वाढवणारे पदार्थ म्हणजे - साखर-गूळ वा अन्य गोड पदार्थ, गहू-तांदूळ वा अन्य धान्यांपासून बनवलेले पदार्थ, बटाटे-रताळी आदि स्टार्च असलेले कंद.

याच्या जोडीने जर थोडाफार व्यायम केला तर फॅट्स जाळायला अधिकच मदत होते.

दोन जेवणांच्या दरम्यान ब्लॅक वा ग्रीन टी वा ब्लॅक कॉफी घेतलीत तरी चालते कारण या पेयांमुळे ग्लुकोजची पातळी वाढत नाही. वर उल्लेखलेली बुलेटप्रूफ कॉफी हादेखिल एक ग्लुकोज न वाढवणारा विरंगुळा! कारण शुद्ध फॅट्समुळे ग्लुकोज वाढत तर नाहीच शिवाय एक प्रकारची संपृक्तता (satiety) येते. त्यामुळे भुकेची भावना चटकन लागत नाही.

आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे (दर ३-४ तासांनी काहीतरी खाणे वा चहा-कॉफी घेणे) रक्तातील ग्लुकोजची पातळी दिवसभर कायम चढीच राहते. इंधन म्हणून शरीरातील फॅट्स वापरले जातच नाहीत.

पण चहा मला आवडतो आणि बिन साखरेचा चालत नाही. सायवाले दूध आवडते. पण वजन वाढत नाही. साठ आहे ते सत्तर करायचे आहे. एकदा पूर्वी पंचाहत्तर पोहोचले होते तरुणपणी. सांगायचा मुद्दा असा की शरीर काही वजनाची लेवल ठरवून टाकतो आणि ते बदलता (कमी/अधिक करणे)येत नाही. अगदी सतत चरत असतो तरीही. हेसुद्धा प्रयोगच आहेत माझे माझ्यावर.

वजन कमी करता येत नाही हे खरे नाही एवढे माझ्यापुरते तरी मी नक्की सांगू शकतो!

>>पण वजन वाढत नाही. साठ आहे ते सत्तर करायचे आहे. एकदा पूर्वी पंचाहत्तर पोहोचले होते तरुणपणी. सांगायचा मुद्दा असा की शरीर काही वजनाची लेवल ठरवून टाकतो आणि ते बदलता (कमी/अधिक करणे)येत नाही. अगदी सतत चरत असतो तरीही. हेसुद्धा प्रयोगच आहेत माझे माझ्यावर.

https://www.nytimes.com/2022/11/21/opinion/obesity-cause.html

वजन का वाढतं (आणि का वाढत नाही) याचं उत्तर देणं फार अवघड आहे. आपण फक्त आपल्याच शरीराला काय मानवतं ते प्रयोग करून बघू शकतो.
माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर माझे वडील टाईप १ डायबेटिक आहेत. त्यांचा डायबेटीस बाविसाव्या वर्षी डायग्नोस झाला, त्याआधी किती वर्षं होता कल्पना नाही. पण आई आणि वडील दोघांकडूनही टाईप १ आणि टाईप २ गुणसूत्र मिळाली असल्याने वजन ही कटकट १४-१५ वर्षांची असल्यापासूनच आयुष्यात आली.
फास्टिंगमुळे एक गोष्ट लक्षात आली ती अशी की आपल्या सकाळच्या फास्टिंग शुगरवर आपला काही कंट्रोल नसतो. अगदी मोजका आहार घेऊनही ज्यांना टाईप २ असतो, त्यांची फास्टिंग जास्तच असते. त्याला डॉन इफेक्ट का असं काहीतरी नाव आहे. म्हणजे पहाटे २-४ या वेळात शरीर आपण उठल्यावर आपल्याला एकदम चक्कर येऊ नये, किंवा शक्ती राहावी म्हणून रक्तातली साखर एका पातळीवर नेऊन ठेवतं. पण ज्यांना टाईप २ आहे त्यांची साखर जास्त असते. रात्री न खाता झोपलं तरीही ही साखर जास्त असते. उलट रात्री उपास केला की अजून वाढलेली दिसते. यालाही कारण आहे. पण प्रतिक्रिया खूप लांब होईल.

अनेक दिवस, म्हणजे १ महिना सातत्याने १६:८ किंवा दिवसांतून एकदाच जेवण करणे असं केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की माझी सकाळची साखर १०० च्या आसपास असायची (म्हणजे प्रीडायबेटिक) ती ८५-९० अशी येऊ लागली. याचा संबंध लिव्हरमधल्या ग्लायकोजेनशी असतोच पण इतक्या लांबच्या पल्ल्याचा उपास केला की ती शक्यता कमी असते. उपासामुळे हळू हळू शरीराच्या पेशींची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते. टाईप २ डायबेटीसचा रूट कॉज हाच आहे की कालांतराने कितीही इन्सुलिन तयार झालं तरीही पेशी ते नीट वापरू शकत नाहीत म्हणून साखर रक्तातच राहते.

हेच असावं.

सुरुवातीला मला वाटले हे लेखन स्पूफ आहे की काय?

पॅराशूट ऑईल खाणे हे माझ्या आकलनाबाहेरचे होते. म्हणजे इडिबल कोकोनट ऑईलची एक कल्पना कायम डोक्यात तरळत असते त्यात पॅराशूट ऑईल बसतच नाही काही केल्या.

नंतर कळले च्यायला, लोक सिरीयस आहेत!

पॅराशूट ऑईल दोन प्रकारांत येते.

जे केसांकरीता असते ते सुवासिक असते, त्यावर हेअर ऑईल असे स्पष्टपणे लिहिलेले असते आणि त्यावर शाकाहारदर्शक असा हिरवा ठिपका नसतो.

दुसरे, जे खाद्य म्हणून मिळते त्यावर हेअर ऑईल असे लिहिलेले नसते. ते सुवासिकदेखिल नसते (नैसर्गिक खोबरेल तेलाचा वास असतो). आणि मुख्य म्हणजे त्यावर हिरवा ठिपका असतो.

खाद्य प्रकारचे खोबरेल तेल आमच्याकडे कायमच असते जे काही ठराविक (दाक्षिणात्य) खाद्यपदार्थांसाठी वापरले जातेच.

पण तळण्यापेक्षा सोपा उपाय आहे. लिज्जत पापड भाजायचे आणि त्यावर हवे तेवढेच पराशूट कोकोनट ओईलचे थेंब टाकायचे. खमंग वास येतोच आणि तेल वाया जात नाही. म्हणजे तळलेल्या तेलाचं काय करायचं ही विवंचना राहातं नाही.
असे पापड मी खातो चांगले लागतात म्हणून.

करून बघतो!

मागे एकदा ऑस्टिनमधला एक जण मला कॉफी+तूप छान लागतं असं सांगत होता. अमेरिकेत सहसा कॉफी म्हणून जे काही मिळतं ते अत्यंत करुण द्रव असतं. त्यामुळे त्या तरुण, गोऱ्या, जिमट्रेनरला काय चवीढवीतलं समजत असणार, असं म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. पण आता सुनील आणि सई, तुम्ही दोघंही म्हणताय तर घाबरत घाबरत प्रयोग करून बघेन.

वजन माझंही थोडं कमी झालेलं मला चालेल.१६:८ उपास-खाणं मला जमण्यातलं नाही; मात्र पोळ्या, भात, बटाटे वगैरे बहुतांश बंदच आहे. सध्या थंडीमुळे व्यायामही जास्त करता येतो. त्यामुळे वजन कमी होत आहे; ते आणखी वेगानं कमी झालेलं उत्तमच.

कदाचित विकेण्डला जेव्हा धावत नाही, वजनं उचलत नाही, तेव्हा १६:८ करून बघितलं पाहिजे; अगदी १६:८ नाही तर १४:१० पासून सुरुवात वगैरे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुरुवातीसच १६:८ कठिण आहे. त्यामुळे १४:१० ने सुरुवात करून १-२ आठवड्यानंतर १६:८ वर जाणेच योग्य.

कॉफी + साजूक तूपदेखिल मस्तच लागते!

पण आता सुनील आणि सई, तुम्ही दोघंही म्हणताय तर घाबरत घाबरत प्रयोग करून बघेन.

लहानपणी एक गोष्ट ऐकली होती. त्या गोष्टीत, मारुतीच्या बेंबीत बोट घातले, की गार लागते, असे कायसेसे होते. (कथेचे बारीक तपशील आता वयोमानपरत्वे विसरलो. कोणी विदित केल्यास उपकृत होईन.)

(तसे पाहावयास जाता, शेपूट तुटलेल्या कोल्ह्याची कथासुद्धा अंमळ रोचक तथा उद्बोधक आहे. Just sayin’…)

किंवा सद्य तळे कोरडे पडेल म्हणून दुसऱ्या भरलेल्या तळ्याकडे एकेका माश्याचे स्थलांतर करणाऱ्या बगळ्याचीही एक गोष्ट होती ना? तीही नीट आठवत नाही.

आणि विनोद उधार घेऊन म्हणायचं तर एक कॉफी वाईट लागली तर आठ तासांत पुन्हा तहान लागेलच.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे १६:८ प्रकरण काय आहे?

२) काही विदेशी तज्ञांचा (डॉ. जेसन फुंग, डॉ. स्टर्न एकबर्ग, डॉ. अनवीन इत्यादी). जे म्हणतात दिवसाचे दोन भाग करा. एक १६ तासांचा ज्यात पाण्याव्यतिरिक्त काहीही न घेणे. आणि दुसरा ८ तासांचा, ज्यात दिवसभराचे खाऊन घेणे.

(मूळ लेखातून उद्धृत.)

तसे नबांनी उत्तर दिले आहेच. १६:८ म्हणजे, दिवसाच्या २४ तासांपैकी १६ तास काही न खाणे (पाण्याव्यतिरिक्त) आणि सर्व खाणे-पिणे ८ तासात उरकणे. जेणेकरून, रक्तात ग्लुकोज (आणि पर्यायाने इन्सुलिन) फारसे राहणार नाही आणि शरीर उर्जेकरीता चरबी (फॅट्स) चा वापर करेल.

'स्थूलपणा' कसा ठरवतात?
(१) शरीरातील स्नायूंपेक्षा चरबी अधिक?
- म्हणजे पुन्हा किती? कसे मोजतात?

कोणत्याही मीटर शिवाय मोजण्याचा किंवा जाणण्याचा दर्शक आहे काय?
जिने चढताना धाप लागते. कुणाला दहा,वीस,तीस जिने (मजले) चढल्यावर दमायला होईल. तर यातून काही निष्कर्ष निघू शकेल का?
समजा सत्तर किलोचा माणूस आहे. तो अमुक एक जिने चढल्यावर दमतोय. पण वजन ६५,६० किलो केल्यावर हा फरक झाला की अधिक जिने चढून शकतो. स्नायू तेच आहेत पण चरबीचे वजन घटल्याने शक्ती वाढली वगैरे. तशा काही सोप्या टेस्ट स्थूलपणा मापण्याच्या ठरवता येतील का?

'स्थूलपणा' कसा ठरवतात?

माझ्यापुरता मी कसा ठरवतो ते सांगू शकतो. मी BMI काऊन्ट पाहतो. तुम्हाला तुमची उंची आणि वजन ठाऊक असल्यास तो काऊन्ट कसा काढायचा याची माहिती जालावर उपलब्ध आहे. त्यानुसारे मी नॉर्मल आणि किंचित स्थूल यांच्या सीमारेषेवर होतो. आता काऊन्ट नॉर्मल आहे.

जिने चढताना धाप लागणे हे हृदय (आणि फुफ्फुस) कमजोर असल्याचे लक्षण आहे. त्याचा कदाचित स्थूलपणाशी संबंध असेलच असे नाही. म्हणजे, स्थूल व्यक्तीस अशी धाप लागण्याची शक्यता जास्त असावी. परंतु, स्थूल नसलेल्या व्यक्तीसही धाप लागू शकते!

स्थूलपणा (ओबिसिटी) हे अनेक व्याधींचे मूळ आहे तेव्हा तो घालवणे केव्हाही चांगलेच!

ह्या दोन पद्धती वापरण्यामुळे वजन घटवण्यात किती फरक पडत असेल? शिवाय ऍसिडिटीचा त्रास असणाऱ्या लोकांना हे जमतं का? १६:८ करणाऱ्या काही ओळखीच्या लोकांचा अनुभव असा की थोड्या दिवसांनी शरीराला या पॅटर्न ची सवय होऊन पुन्हा वजन स्थिरावतं. अर्थात फास्टिंग शुगर वरचा परिणाम मात्र इथे लिहिल्याप्रमाणे टिकाऊ असावा असा माझा अंदाज आहे.

ह्या दोन पद्धती वापरण्यामुळे वजन घटवण्यात किती फरक पडत असेल?

लेखातील तळटीपेत याबद्दल लिहिले आहेच. दोन महिन्यात ८ किलो कमी.

(वर सांगितलेल्या उपायांनी माझे वजन अवघ्या दोन महिन्यात ६० किलोंवर आले. मधल्या काळात ४-५ लग्न इत्यादी कौटुंबिक समारंभात भाग घ्यावा लागल्याने तेवढे दिवस ढील द्यावी लागली. ते जमेस धरूनही दोन महिन्यात ८ किलो कमी ही चांगलीच उपलब्धी म्हणायला हवी!)

शिवाय ऍसिडिटीचा त्रास असणाऱ्या लोकांना हे जमतं का?

सुदैवाने मला हा त्रास नाही तेव्हा मला सांगता येणार नाही.

१६:८ करणाऱ्या काही ओळखीच्या लोकांचा अनुभव असा की थोड्या दिवसांनी शरीराला या पॅटर्न ची सवय होऊन पुन्हा वजन स्थिरावतं.

असे व्हायलाच हवे अन्यथा वजन घटत घटत शून्यावर येईल!!!

माझे वजन गेले ३ आठवडे ५९.५ ते ६०.५ च्या दरम्यान आहे, म्हणजेच स्थिरावले आहे.

फास्टिंग शुगर वरचा परिणाम मात्र इथे लिहिल्याप्रमाणे टिकाऊ असावा असा माझा अंदाज आहे.

होय.

मी जवळपास ७ वर्षं १६:८ किंवा दिवसातून एकच वेळा जेवायची पद्धत फॉलो करते आहे.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सुरुवातीला वजन कमी होतं पण नंतर प्लॅटू येतो. आधी (म्हणजे मी या पद्धती जेव्हा वापरत नव्हते तेव्हाही) असं झालं की मी व्यायाम वाढवायचे आणि आहार अजून कमी करायचे. किंवा आहारातले कार्ब्स शोधून शोधून कमी करायचे. पण वयोमानाप्रमाणे असं लक्षात आलं की आहे त्या स्केड्युलमध्ये आता अजून व्यायाम वाढवता येणं शक्य नसतं. आणि वजन हा एकच निकष ठेवला तर विकेंडला कुठे बाहेरही जाता येत नाही. म्हणून मी वजन हा निकष एका मर्यादेपलीकडे वापरत नाही.
ब्लड शुगर मात्र व्यवस्थित नियंत्रणात राहिली आहे. माझी फास्टिंग तर कमी असतेच पण आठवड्यात कधीही रँडम केली तर तीही १०० च्या आत असते. एचबीए१ सी नेहमी नॉर्मल असतो. हेच जर मी एखाद्या महिन्यात सोडून दिलं तर फास्टिंग आणि पीपी दोन्हीं आकडे बिघडतात. एचबीए१ सी लगेच बॉर्डरलाईनवर येतो. माझा माझ्यापुरता असा निष्कर्ष निघाला आहे की डायबेटीस दूर ठेवायला काही अघोरी करावं लागत नाही. आहारातून ते सहज शक्य आहे. मी अशी पद्धत वापरली नसती तर मला खात्री आहे आत्तापर्यंत मला नक्कीच औषधं घ्यावी लागली असती. आणि जोपर्यंत माझी साखर आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात आहे तोपर्यंत मी वजनाच्या प्लॅटूची विशेष काळजी करणार नाही.

वजन कमी करणे हा एकमेव हेतू असेल तर खूप सोप आहे .
जेवण सोडून ध्या.

आरोग्य हवं हे ध्येय असेल तर योग्य व्यायाम आणि कमी प्रक्रिया केलेले,अन्न,
नेहमी आनंदी असणे,काही तरी छंद असणे, आणि जीवनाकडे positive नजरेने बघणे आणि तसे वागणे इतकेच करायचे आहे.
बाकी दीक्षित वैगेरे कोणाच्या नादाला लागू नका.

वजन कमी करणे हा एकमेव हेतू असेल तर खूप सोप आहे .
जेवण सोडून ध्या.

बरोबरच आहे. भस्मीभूतस्य देहस्य वजनागमनं कुतः? (जळून राख झालेल्या देहाला वजन कुठून येईल?)

भस्मीभूतस्य देहस्य वजनागमनं कुतः? (जळून राख झालेल्या देहाला वजन कुठून येईल?)

मूळ लेखात 'कॉफीं कृत्वा घृतं पिबेत्' ('कॉफी करून (त्याद्वारे) तूप प्या') असा पुरस्कार असल्याकारणाने, त्याचे सीक्वेल म्हणून हे ठीकच आहे.

खोबरेल किंवा तूप घालून कॉफी ही कल्पना वियर्ड वाटत असली तरी कोणत्याही कल्पनेला थेट खारिज करू नये या तत्त्वानुसार एकेकदा ट्राय करायला हरकत नाही. पण तूप आणि तेलांपैकी विशेषत: खोबरेल तेल हे दोन्ही रेग्युलर कशातच न वापरावे असे पदार्थ आहेत अशी समजूत होती.

व्हिएतनाम किंवा अन्य पूर्वेकडील कोण्या देशात एग कॉफी आणि कोकोनट कॉफी (म्हणजे हेच खोबरेल घालत असतील) वगैरे प्रसिद्ध आहे असे ऐकून आहे. तेही ट्राय करायची इच्छा आहे. नुसते ऐकून अंडेयुक्त कॉफी ही डिसगस्टिंग कल्पना वाटते. याचे मूळ कारण कदाचित लहानपणी दुधात कच्चे अंडे घालून मला काही काळ देत असतं त्याच्याशी संबंधित असेल. तो अंड्याचा सर्वाधिक वाईट स्वाद होता.

पण अनेक लोक त्या कॉफीचे प्रचंड गुणगान करताना दिसतात. अवश्य ट्राय करा असे रेकमेंड करतात विशेषत: आंतरजालीय वर्णने. तेव्हा तोही मारुती बेंबी प्रकार असावा की कसे, सांगता येत नाही.

>>>पण अनेक लोक त्या कॉफीचे प्रचंड गुणगान करताना दिसतात. अवश्य ट्राय करा असे रेकमेंड करतात विशेषत: आंतरजालीय वर्णने. तेव्हा तोही मारुती बेंबी प्रकार असावा की कसे, सांगता येत नाही.

मी आता या स्थितीच्या पलीकडे गेले आहे. एकतर असं वाटण्याला अनेक कारणं आहेत ज्याकडे या गोष्टींचा उत्साहाने प्रचार करणारे लोक दुर्लक्ष करतात.
१६ तास काहीही न खाता राहिल्यानंतर, आणि विशेषतः साखर न खाण्याचे किंवा दूध न पिण्याचे बंधन आपणच घालून घेतले असताना, कॉफीतील फॅट आपोआप चविष्ट लागते. त्याला ही अशी एक करुण बॅकग्राऊंड असते जी हे उत्साही लोक तुम्हाला सांगत नाहीत.

याची इतर क्षेत्रांतही अनेक उदाहरणे सापडतात.
१. लग्न झालेले लोक लग्न न झालेल्या लोकांसमोर लग्नाचं असंच चित्र रंगवतात.
२. मूल झालेले लोक मूल न होऊ देणाऱ्या लोकांना मूल हे खोबरेल तेल घातलेल्या कॉफीइतकेच चांगले आहे असं पटवून देतात.
३. नुकतेच व्हीगन झालेले लोक मांसाहार करणाऱ्या लोकांचं असंच डोकं उठवतात.

मला कुणालाही हे करून बघा असं सुचवायचं नाही. किंबहुना, मलाही रोज तीन वेळा जेवता येत असतं तर मी असल्या कुठल्याही फंदात न पडता रोज भात खाल्ला असता.

आत्ता इतक्यातलीच गोष्ट आहे. आमच्या अमेरिकेतली (सियाटलची) स्टारबक्स कंपनी. तिने इटलीत दुकान उघडायचा घाट घातला. आता, हे म्हणजे साधारणतः बाहेरगावच्या माणसाने इंग्लंडातल्या न्यूकॅसल गावात जाऊन तेथे नॉव्हेल्टीचे दुकान थाटून त्या दुकानात कोळसा हा ‘नावीन्यपूर्ण आयटम’ म्हणून विकण्यासारखे (किंवा, तीर्थरूपांना रतिक्रीडेचे प्राथमिक धडे नव्याने देण्यासारखे) झाले. इटली हे (एस्प्रेस्सो संकल्पनेचे, तथा) एस्प्रेस्सोयुक्त पेयांचे माहेरघर/पंढरी/काशी/मक्का; तेथे या उपऱ्या स्टारबक्सच्या अमेरिकीकृत (पक्षी: “भ्रष्ट नक्कल”?) एस्प्रेस्सोयुक्त पेयांना कोठला इटालियन कशाला भाव द्यायला बसलाय? सारांश: स्टारबक्सचा धंदा इटलीत चालेना.
------------------------------
(अवांतर: ‘डॉमिनोज़ पिझ्झा’लासुद्धा इटलीत अशीच अडचण आली होती, म्हणतात. ऐकीव माहितीनुसार, पिझ्झ्यावर अननसाचे तुकडे टाकण्याची नुसती संकल्पना निव्वळ ऐकून जातिवंत इटालियनाच्या अंगावर शहारे येतात, म्हणे. खरेखोटे एक ते ‘डॉमिनोज़ पिझ्झा’वाले, दुसरे ते जातिवंत इटालियन, तिसरे ते अननसाचे तुकडे, आणि चौथा तो (असलाच, तर) परमेश्वर, एवढीच मंडळी जाणोत.)

(अतिअवांतर/डिस्क्लोझर: मला स्वतःला स्टारबक्स आवडते. निदान, त्यांची काही एस्प्रेस्सोयुक्त पेये तरी आवडतात. अंमळ महाग असली, तरीही. जातायेता अधूनमधून स्टारबक्सच्या ड्राइव्हथ्रूमध्ये थांबून उचलण्याइतकी. तितकीही वाईट नसतात; किंबहुना, बरी, किंवा खरे तर अंमळ चांगलीच असतात. परंतु अर्थात, आजतागायत कधी मी इटलीला गेलेलो नाही. शिवाय, कॉफीच्या बाबतीत मी तितकासा चोखंदळही नाही. म्हणजे, सर्वसाधारण अमेरिकन कॉफी (पेट्रोलपंपछाप/तासन्‌तास उकळत ठेवलेली) ही शत्रूला टॉर्चर म्हणूनसुद्धा पाजू नये इतकी भिकार नि भयंकर असते खरी, परंतु तेवढी वगळल्यास, त्यापेक्षा बरी अशी कोठलीही कॉफी मला सामान्यत: चालू शकते, इतकेच नव्हे, तर आवडूही शकते. तर ते एक असो.)
------------------------------
हं, तर सांगत काय होतो, स्टारबक्सचा धंदा इटलीत चालेना. अशा परिस्थितीत स्टारबक्सने काय करावे?

बराच विचार केल्यानंतर स्टारबक्सच्या सीईओच्या डोक्यात, एखाद्या सीईओच्या नाहीतर मार्केटिंग एक्झिक्युटिवच्याच डोक्यातून प्रसवू शकते अशा लायकीची एक कल्पना शिरली. आता, परदेशी मार्केटात आपला प्रॉडक्ट जर का खपवायचा असेल, तर आपल्याला त्या प्रॉडक्टचे स्थानिकीकरण — लोकलायझेशन — करायला पाहिजे, नाही का? अर्थात, इटलीत विकताना आपली एक्स्प्रेस्सोयुक्त पेये ही इटलीकृत — इटालियनाइझ — केली पाहिजेत. (येथे कपाळावर हात मारून घेणारी स्मायली कल्पावी.) तर, स्टारबक्सच्या सीईओची अफलातून कल्पना काय असावी?

तर, एस्प्रेस्सोमध्ये ऑलिव्ह ऑइल मिसळून बनविलेली एस्प्रेस्सोयुक्त पेये, तीसुद्धा ‘तेल घातलेली’ अशा अर्थाचे इटालियन भाषेतले नाव देऊन, स्टारबक्स आता यापुढे इटलीत विकणार आहे, म्हणे. (आणि, प्रयोग यशस्वी झाल्यास, तीच पेये नंतर कॅलिफोर्नियातसुद्धा विकण्याचा स्टारबक्सचा इरादा आहे.)

(एस्प्रेस्सो इटालियन, आणि ऑलिव्ह ऑइलसुद्धा इटालियन... दोघांना मिसळून दिले, नि वर त्याला इटालियन भाषेतले एखादे नाव दिले, की झाले ‘इटलीकरण’! हे म्हणजे, एखाद्या अमेरिकन कंपनीने महाराष्ट्रात आपले दुकान थाटून, श्रीखंडात मिसळीची झणझणीत तर्री किंवा गोडा मसाला कालवून, ‘चुलीवरचे गावरान’ म्हणून ते मार्केट करण्यासारखे आहे. चालायचेच.)

आता, असली मार्केटिंग गिमिके ही अमेरिकेत — आणि मुंबईत! — यशस्वी होऊ शकतात. (अमेरिकनांना नि मुंबईकरांना कोणीही काहीही विकू शकते. किंबहुना, अमेरिकनांपुरतेच जर बोलायचे झाले, तर खुद्द येशूची आईसुद्धा जर कोणी अमेरिकनांना विकू बघितली, आणि जाहिरातीत जर ‘अनाघ्रात’च नव्हे, तर अगदी ‘एक्स्ट्रा व्हर्जिन’ (त्या ऑलिव्ह ऑइलसारखी) असे काहीबाही भन्नाट दावे केले, तर अर्ध्याहून अधिक अमेरिकन आपापली क्रेडिटकार्डे बाहेर काढून सरसावून येतील. तर ते एक असो.) मात्र, स्टारबक्सच्या या भ्रष्टाचाराला खुद्द इटलीत कितीशी गिऱ्हाइके मिळतात, ते पाहाणे अद्याप बाकी आहे. (अगोदरच, केवळ ही बातमी वाचून, लोकांनी नावे ठेवण्यास नि नाके मुरडण्यास सुरुवात केलेली आहे, असे कळते.)

असो चालायचेच.

हे समीकरण वापरलं की तुक्का लागायची शक्यता असतेच. उदाहरणार्थ, भारतात मकडॉनल्ड्समध्ये आलू टिक्की का अशाच काही नावाचा बर्गर मिळतो. तो आता अनेक शाकाहारी भारतीय भक्तीभावाने खाताना दिसतात. बाहेर गाडीवर मिळणारा वडापाव त्यापेक्षा अधिक चविष्ट असणार याची मला खात्री आहे. पण भांडवलशाही, निर्णय स्वातंत्र्य इत्यादी इत्यादी.
असंच अलीकडे फॉरेस्ट एसेंशियलस नावाचा एक सौंदर्य प्रसाधनांचा ब्रँड आला आहे. ते लोक आयुर्वेदिक नावं असलेली क्रीम आणि सिरम रुपये २५००/१५ ग्रॅम अशा भावात विकतात. त्यात सोनं, चांदी आणि अर्थात खोबरेल तेल असतं. त्यांचं खोबरेल तेलही २००० रुपये/५०० मिली असतं. लोक घेत असावेत कारण अजून ते बंद पडलं नाही.
एकूणच तेलाला आणि आयुर्वेदाला चांगले दिवस आले आहेत. हल्ली क्लीन ईटिंग (म्हणजे मंडईत जे ५ रुपायला मिळेल ते कुणाकडून तरी ५०० रूपायला विकत घेऊन खायचं) करणारे लोक असतात जे उठल्या उठल्या पहिल्या प्रथम oil pulling करतात. या लाटेवर स्वार होऊन कोलगेटनंही oil pulling क्षेत्रात प्रवेश केला आहे.
मध्यंतरी अगदी मोजक्या शोध निबंधातून खोबरेल तेलात जे मिडीयम चेन ट्रायग्लिसराइड (MCT) असतात त्यांचा उपयोग पुढे डिमेंशिया टाळायला होऊ शकतो असा अभ्यास करायचा केवळ प्रयत्न झाला. काहीही सिद्ध झालं नाही. तरीही अमेरिकेत आणि आता भारतातही लोक भरमसाठ खोबरेल तेल खाऊ लागले आहेत. त्यावरून लगेच केरळमधले लोक इतके तल्लख बुद्धीचे का असतात याचं उत्तरही सापडलं आहे.

रिफाईंड तेल शत्रू आहे असं लक्षात आल्यावर पुण्यात सगळीकडे लाकडी घाणे उगवले आणि आता लाकडी घाण्यातले तेल खाल्ल्याने कधीच कॅन्सर होत नाही अशी ठाम समजूत माझ्या काही नातेवाईकांनी करून घेतली आहे.

मला भारतातलं स्टारबक्स आवडतं. अमेरिकेपेक्षा चांगलं आहे.

ह्यांच्या खेळात लोकांचे आरोग्य धोक्यात येते.
पहिले रोगाची भीती आणि त्या नंतर रोग टाळायचा उपाय आणि मग product market मध्ये.
लोकांच्या आरोग्याची पूर्ण वाट लागते.
अकस्मात तरुणांना heart attack येण्याची रोज एक तरी बातमी असते.
काही तरी गडबड आहे.
मार्केटिंग खाद्य पदार्थ चे करताना नको ते दावे केले जातात.
जसे कॉफी नी कॅन्सर होत नाही.
लोकांच्या पूर्ण आहाराच्या सवयी ह्या लोकांनी बदलत नेल्या