बर्ट हानस्ट्राचे ‘ग्लास’ आणि ‘झू’

बर्ट हानस्ट्रा या दिग्दर्शकाचे हे दोन्ही चित्रपट वृत्तचित्र (Documentary) या सदरात मोडतात. वृत्तचित्र हे चित्रपटाचे एक महत्त्वाचे रूप आहे. अशा प्रकारचे चित्रपट अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून तयार केले जात होते. सर्वसाधारणपणे डॉक्युमेंटरीत सलगपणे कथा सांगितलेली नसते. असे चित्रपट एखाद्या सत्य घटनेचे चित्रण करणारे, किंवा व्यक्तीचे जीवनदर्शन घडविणारे, किंवा प्रचार करणारे असतात. परदेशांत या चित्रपटांकडे एक वेगळी विद्या म्हणून पाहिले जाते, त्यांचा अभ्यास होतो व अनेक चित्रपट लोकप्रियदेखील बनतात. मात्र भारतात त्यांना फारशी लोकप्रियता मिळालेली नाही. याचे कारण म्हणजे इतर चित्रपटांसारखे ते टॉकीजमध्ये दाखविले जाण्याची सोय नसते. आपल्याकडे बहुतेक डॉक्युमेंटरीज सरकारतर्फेच काढल्या जातात. ‘फिल्म्स डिव्हिजन ऑफ इंडिया’ने या संदर्भात महत्त्वाचे कार्य केले आहे.

एके काळी डॉक्युमेंटरीजचे दिग्दर्शन फार किचकट, वेळखाऊ (व कंटाळवाणे) असे समजले जात होते. वृत्ताच्या घटनास्थळी पोचण्यास भरपूर वेळ लागत होता. इतर सामानांची व्यवस्था करणे, फिल्म युनिटचे वेळेवर पोचणे व इतर काही अडचण ऐनवेळी उद्भविल्यास त्यावर उपाय शोधणे यातच निर्मात्याचा वेळ, श्रम व पैसा खर्ची घालावा लागत होता. त्यामुळे उत्कृष्ट डॉक्युमेंटरी बनविणे ही दिग्दर्शकाची कसोटी समजले जात होते. अलिकडे डिजिटल व्हिडिओ, हिडन् कॅमेरा, सेल फोन इत्यादी तंत्रज्ञानांची उपलब्धी व रॉ फिल्म्सपासून सुटका मिळाल्यामुळे डॉक्युमेंटरीच्या निर्मितीत दुसरी क्रांती झाली आहे, असे म्हणता येईल. ही साधने दिग्दर्शकांच्या शरीराचे भाग झाले आहेत. त्यामुळे दिग्दर्शकांना आपली सर्जनशीलता दाखविणे सहज शक्य होत आहे.

डॉक्युमेंटरी या सर्वसाधारणपणे माहितीपर असल्या, तरी श्रेष्ठ दिग्दर्शकाच्या हाती त्यांना कलात्मक रूप प्राप्त होते. केवळ माहिती किंवा नोंद यांच्या पलीकडे जाऊन जीवनातील काही सत्यांचा कलात्मक वेध त्या घेऊ शकतात. प्रसंगी त्या अतिशय प्रेक्षणीय व काव्यात्मदेखील बनू शकतात. बर्ट हानस्ट्राचे हे दोन्ही वृत्तचित्रपट याची साक्ष देतात. ‘ग्लास’ या वृत्तचित्रपटातून नेदरलँड्समधील काच उद्योगाचे चित्रण त्यानी उभे केले आहे.

ग्लास

नेदरलँड्स/1958/रंगीत/10 मि/दिग्दर्शकः बर्ट हानस्ट्रा

photo 1

नेदरलँड हा देश पुरातन काळापासून काचेच्या वस्तूंच्या निर्मितीसाठी नावाजलेला देश. एके काळी येथील कामगार सर्व वस्तू हातानेच बनवत होते. त्यांच्या हस्तकौशल्याचे नमूने जगभरातील राजवाड्यामध्ये, श्रीमंतांच्या आलिशान बंगल्यामध्ये व आता वस्तुसग्रहालयामध्ये बघण्यास मिळतात. औद्योगिक क्रांतीनतर काही प्रक्रियांसाठी मशीन्सचा उपयोग ते करू लागले. ग्लासब्लोअर्सचे काम परंपरागत पद्धतीने होत असले तरी काचेच्या वस्तूंना आकार देत असताना कुशल कामगार आपल्या कौशल्याची चुणुक दाखवत त्यात विविधता आणू शकतो. काचेच्या वस्तू तयार करताना कल्पनेला भरपूर वाव मिळत होता. मशीन्सच्या वापरामुळे कामाला गती मिळाली व मोठ्या प्रमाणात अशा वस्तूंचा पुरवठा करणे त्यांना शक्य झाले.
.
सेमी-लिक्विड अवस्थेत असलेल्या काचद्रवाला तोंडाने जोरजोराने फुंकून व/वा काठीला लाटण्यासारखे फिरवत आकार द्यावा लागतो. त्यात थोडीशी चूक झाली तरी जीवावर बेतण्याची शक्यता असते. परंतु हे कुशल कामगार एकाग्रचित्तपणे काम करत असतात. तोंडाने फुंकत असतानाच सिगारेटचा आस्वाद घेत असतात; गप्पा मारत असतात; नृत्यशैलीत त्यांचे काम चाललेले असते. मशीन्स आल्यावरसुद्धा त्यांच्या कौशल्यात फरक पडत नाही. चार्ली चाप्लिनच्या ‘मॉडर्न टाइम्स’मध्ये दाखविल्याप्रमाणे थोडेसे दुर्लक्ष केले तरी प्रचंड प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. काच-निर्मितीच्या या दहा मिनिटाच्या चित्रपटात एकही संवाद नसला तरी फोटोग्राफी, पार्श्वसंगीत, चित्रचौकट्या व माँटेजमधून दिग्दर्शक प्रेक्षकांना आकर्षित करू शकतो. दहा मिनिटात आटोपणाऱ्या या डॉक्युमेंटरीमधून दिग्दर्शकाचे चित्रपट कलाप्रकारावरील पकड सहज लक्षात येते.

झू

नेदरलँड्स/1962/B&W/10 मि/दिग्दर्शकः बर्ट हानस्ट्रा

photo 2

प्राणी संग्रहालयवरील ही डॉक्युमेंटरी बर्ट हानस्ट्रा यानी फारच वेगळ्या पद्धतीने दिग्दर्शित केली आहे. वेळोवेळी छायाचित्रित केलेल्या रीळचे तुकडे पुन्हा संकलन व संपादित करून बर्ट हानस्ट्रा यानी एक उत्कृष्ट डॉक्युमेंटरी चित्रित केली आहे. यातील प्रतिमाच इतक्या बोलके आहेत की त्यावर वेगळे काही सांगण्याची गरज भासत नाही. संगीत दिग्दर्शकाच्या संगीतामुळे झूमधील पिंजऱ्यातील प्राणी व पिंजऱ्याबाहेरची (प्राण्यासारखे वागणारी) माणसं यांच्यात एक समान धागा असल्याचे जाणवते. कोण कुणाला पाहत आहे हाच प्रश्न वेळोवेळी विचारावासा वाटतो. न दिसण्या ठिकाणी कॅमेरा ठेवल्यामुळे प्राण्याचे (व त्याहून अधिक प्रेक्षकांचे) नैज चित्रण – त्याच्या विचित्र हालचाली, माकडचेष्टा, चेहऱ्यावरील हावभाव, प्रेमाचे चाळे, - चित्रित करणे शक्य झाले असेल. खरे पाहता संपूर्ण डॉक्युमेंटरी माणसांच्या डोळ्यातून न बघता प्राण्यांच्या डोळ्यातून माणसं कशी दिसू शकतात, हेच दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, असे वाटू लागते. चांगले संकलन व एडिटिंग कसे असू शकते, याचा हा एक उत्कृष्ट नमूना आहे.

यानंतरच्या इतर काही डॉक्युमेंटरीतसुद्धा हेच तंत्र त्यानी वापरले. ‘एप अँड सुपरएप’ या डॉक्युमेंटरीतसुद्धा त्यानी हे तंत्र वापरून प्रेक्षकांना थक्क करून सोडले आहे. या डॉक्युमेंटरीसाठी प्रसिद्ध प्राणीतज्ञ जेन गुडआल व फ्रान्स डी वाल यांचा सल्ला त्यानी घेतला होता.

नेदरलँडमधील एका लहानशा खेडेगावात बर्ट हानस्ट्रा (1916-1997) या लघु चित्रपट दिग्दर्शकाचा जन्म झाला. वडील एका शाळेत शिकवित होते. विसाव्या दशकातील मंदीमुळे गरीबीतच याचे बालपण गेले. प्रत्येक क्षण आणि दिवस सार्थकी लावण्याची जिद्द बाळगूनच हा लहानाचा मोठा झाला. निवृत्तीनंतर वडील चित्रं काढण्याच्या आपल्या छंदामध्ये वेळ घालवू लागले. शिक्षकी पेशा आवडत नसल्यामुळे तोही वडिलाप्रमाणे पेंटिंग्स काढण्यात मन गुंतवू लागला. त्याचबरोबर फोटोग्राफीत काही प्रयोग करू लागला. त्याच गावातील एका थिएटरच्या प्रोजेक्टर रूममध्ये बसून तो चित्रपट पहात असे. मोडक्या-तुटक्या वस्तू घेऊन त्यानी एक कामचलावू प्रोजेक्टर तयार करून थोडे फार पैसेही तो कमवू लागला. त्याची चित्रपटाची आवड पाहून त्याला ‘दि नेदर्लँड्स अकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस’ या संस्थेत अभ्यास करण्यासाठी प्रवेश मिळाला. प्रत्यक्ष अनुभवापेक्षा अभ्यासात मन गुंतविणे त्याला जड होऊ लागले. हानस्ट्रा स्टेज फोटोग्राफीत रुची दाखवू लागला.

1947च्या सुमारास तो माहितीपर चलचित्रांची निर्मिती करू लागला. त्याच्या ‘मिरर ऑफ हॉलंड’ या माहितीपटाला 1951 साली केन्स फिल्म फेस्टिव्हलमधील ग्राँड प्रि पारितोषक मिळाले. 1958 साली ‘ग्लास’ या त्याच्या माहितीपटाला अकॅडेमी पारितोषक मिळाले. 1962मध्ये त्याच्या ‘झू’ या चित्रपटालासुद्धा BAFTA चे नामांकन मिळाले. त्याने तीसपेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती केली. वयाच्या 81व्या वर्षी आजारामुळे त्याचे निधन झाले.

चित्रपटासाठी येथे क्लिक करावेः

GLASS -
https://www.youtube.com/watch?v=d3QEpQ9ozVU&ab_channel=NederlandsInstitu...

Zoo -
https://www.youtube.com/watch?v=56ot1I27Iso&ab_channel=Dar%C3%ADoRomeroB...

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet