कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -२
भाग -२
दुपार झाली होती. करमरकर सकाळी शास्त्रींबरोबर झालेल्या मीटिंगमुळे अस्वस्थ होते. शास्त्री काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण अनामिक भयाने पछाडल्यामुळे त्यांना बोलायचे धाडस होत नसावे.
ह्या संयंत्राच्या बांधणीत असंख्य अडचणी आल्या होत्या. ही गोष्ट खरी होती, शास्त्रींनी मघा घारीचा उल्लेख केला.
एका वर्षापूर्वी घारीने प्रॉजेक्टच्या स्विचआवारावर उंदीर पकडण्यासाठी झडप टाकली होती आणि शॉर्टसर्किट होऊन आरोहित्र जळाले. बीएचइएलने तत्परतेनं नवीन आरोहित्र बनवून दिले म्हणून नाहीतर? नंतरच्या धुवाधार मान्सून मध्ये संयंत्राच्या भोगद्यात पाणी शिरले होते. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याने (पुण्याच्या इतिहासात असा पाउस केव्हाही झाला नव्हता!) हा अपघात झाला होता असा निष्कर्ष तज्ञांच्या समितीने काढला होता. त्याच महिन्यात भूकंप झाला. पण भोगाद्याच्या डिझाईन मध्ये आण्विक विद्युत केंद्राच्या मानकांचा उपयोग केला असल्याने ढिम्म काही नुकसान झाले नव्हते. आणि आता हे अमानवी प्रकार?
डॉक्टरांच्या स्वीय सचिवाचा फोन होता.
“सर, अनाथ बालिकाश्रमाचे सचिव कोळेकर आपल्या भेटीसाठी थांबले आहेत.”
“अरे मग त्याना का खोळंबवून ठेवले आहेस? पाठवून दे आत.”
करमरकर अनाथ बालिकाश्रमाचे माननीय विशेष देणगीदार होते. शिवाय त्यांनी दोन बालिकांना “दत्तक” घेऊन त्यांच्या खर्चाचा भार उचलला होता.
कोळेकर केबिनमध्ये आले.
“कोळेकर, बसा. आज काय विशेष?”
“नमस्कार करमरकर सर, आम्ही आश्रमासाठी निधी जमवण्यासाठी जादुगार पाशा ह्यांच्या जादूच्या प्रयोगाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आश्रमातल्या मुलीही काही कार्यक्रम सादर करणार आहेत. तुम्हाला कदाचित माहित असेल कि पाशा गूढ वैज्ञानिक प्रयोग सादर करतात. तुम्हाला त्यात रुचि वाटेल तेव्हा आपण तिकिटे घेऊन हातभार लावावा अशी विनंती आहे.” कोळेकरांनी येण्याचे प्रयोजन सांगितले.
तिकिटे? डॉक्टरांना मनोमन हसू आले. एकटा जीव सदाशिव. ना पत्नी, ना मूल ना बाळ. स्त्री ही पुरुषाच्या मार्गातील धोंड आहे अशी धारणा. (हे डॉक्टर राघवेंद्र करमरकर ह्यांचे वैयक्तिक मत आहे. लेखकाची मते अशीच असतील किंवा नसतील.) घरात दूरची आत्याबाई. हाउस मॅनेजर! तिला म्हातारीला जादूच्या प्रयोगात काय इंटरेस्ट असणार? एक तिकीट घेऊन करमरकरांनी विषय संपवला.
कोळेकरांनी जाताना आश्रमाला भेट द्यायची आग्रहाने विनंति केली. निदान ह्या कार्यक्रमाला तरी नक्की या. काढा थोडा वेळ. मेंदूला थोडी विश्रांती तरी मिळेल. इत्यादि.
कार्यक्रम वेळेवर सुरु झाला.
पाशाने अरेबिअन नाईट्स मधल्या जादुगारासारखा पोशाख केला होता. वर रंगीबेरंगी भडकाऊ रंग आणि चित्रे असलेला रेशमी झब्बा आणि खाली त्याला साजेलशी सलवार! झब्ब्यावर दिखाऊ बिन बाह्यांचे जाकीट. डोळ्यात सुरमा आणि हनुवटीवर टोकदार दाढी. व्वा! कायपण सोंग काढले होते. चोहो बाजूंनी टाळ्यांच्या कडकडात त्याने रंगमंचावर प्रवेश केला. डॉक्टर राघव करमरकरांनी क्षणभर बालपणात प्रवेश केला. नकळत त्यांनी पण एक टाळी वाजवली.
माझ्यामते पाशाची हीच सर्वात मोठी जादू असावी. त्याने तर्कट शास्त्रज्ञाला भावनाविवश केले.
“मेहेरबानो, कद्रदानो, पाशाका सलाम आलेकुम. रामराम! सत् श्री अकाल! अॅड ए बिग हाय हॅलो!”
अशी धेडगुजरी सुरवात करून त्याने कार्यक्रमाला सुरवात केली. प्रथम त्याने हातचलाखीचे प्रयोग केले. म्हणजे एका नाण्याची बघता बघता दहा नाणी केली. नंतर ती दहाही गायब केली. मग तीच नाणी प्रेक्षकातील एका लहान मुलाच्या खिशातून काढून दाखवली. हॅटमधून कबुतरं काढली. सहकाऱ्याच्या डोक्यावर भात शिजवला. मुलीला हवेत लटकावले. गिलोटिनने मुलीचे दोन तुकडे केले. (आणि पुन्हा जोडले.) एव्हढेच नव्हे तर ग्रेट इंडिअन रोप ट्रिक सुधा दाखवली.
हे सगळे तद्दन हातचलाखीचे प्रकार होते.
त्यानंतर त्याने जे दोन प्रयोग दाखवले त्याला केवळ अमानवी म्हणायला पाहिजे. डॉक्टर करमरकर अमानवी शक्तींवर विश्वास ठेवणाऱ्यापैकी नव्हते. त्यांचा शाळा कॉलेज पासून शिकवल्या गेलेल्या शास्त्रीय पद्धतीवर विश्वास होता.
तुम्ही जर हवेत नाणे उडवले तर छाप किंवा काटा यायची शक्यता फिफ्टी फिफ्टी असते. हाच प्रयोग शंभर वेळा केला तर? प्रयोग कोण करतोय त्याच्यावरही बरच काही अवलंबून असतं बरका मंडळी. म्हणजे माझ्यासारख्या अॅवरेज बँकेत अॅवरेज कारकुनी करणाऱ्या, अॅवरेज शाळेत अॅवरेज मास्तरकी करणाऱ्या इत्यादी अॅवरेज माणसाचा स्कोर फिफ्टी फिफ्टी असतो. त्याच काय आहे फक्त अॅवरेज माणसांंना निसर्गाचे नियम लागू होतात. समाजात वरच्या स्थानावर असणाऱ्या म्हणजे कंपनींचे सीईओ, डायरेक्टर, नटसम्राट, नेतेलोक, प्रतिथयश लेखक वगैरे वगैरे मंडळींचा स्कोर साठ-चाळीस पर्यंत पोहोचतो. पण आपल्या ह्या पाशाचा स्कोर फुल शंभर पैकी शंभर पर्यंत पोचला. त्याने शंभर वेळा नाणे हवेत उडवले, शंभर वेळा छाप!
डॉक्टर राघव करमकरांचा स्वतःच्या डोळ्यांवरचा विश्वास उडवणारा प्रसंग होता. संख्याशास्त्राला आव्हान देणारे कोडे होते.
काही वेळा काय होतंं ना की एखादंं नाणंं एखाद्या बाजूला झुकते माप देणारे- म्हणजे बायस्ड- असते. डॉक्टरांनी पाशाकडून नाणे घेऊन त्याचे क्रिटीकल निरिक्षण केले. नाण्यासारखे नाणे होते. एका बाजूला अशोकस्तंभ, दुसऱ्या बाजूला प्रातःस्मरणीय संताची प्रतिमा. संशयास्पद काहीच नव्हते.
“जादुगार पाशा, ही वन टाईम जादू आहे का तुम्ही पुन्हा पुन्हा करून दाखवू शकता?” डॉक्टरांनी आव्हानात्मक स्वरात विचारले.
पाशाने स्मितहास्य केले. “कुठेही, केव्हाही, कितीही वेळा. डॉक्टर, ही जादू नाहीये. हा संदेश आहे. ह्यात गूढ अर्थ भरला आहे. ज्याला समजला त्याला जीवनाचे सार आकलन झाले.”
पाशाने आता काचेचा ग्लास घेतला. त्यात प्रथम पांढरे तीळ भरले. पांढऱ्या तिळावर काळ्या तिळाचा थर रचला. प्रेक्षकांना तो ग्लास दाखवला.
“खाली पांढरे तीळ त्यावर काळे तीळ! ह्याला वैज्ञानिक “सुरचना” म्हणजे “ऑर्डर” संबोधतात. आता पहा मी या सुव्यवस्थेचा भंग करतो.” पाशाने ग्लास हलवला. पांढरे तीळ आणि काळे तीळ एकमेकात मिसळले.
“आता हा ग्लास कितीही हलवला- या पुढील हजार वर्ष हलवला- तरी “खाली पांढरे तीळ त्यावर काळे तीळ!” अशी रचना होणार नाही. मंडळी तुम्ही हे मान्य करता कि नाही. मान्य करत नसाल तर या, इथे स्टेज वर या आणि आपल्या नशिबाची परीक्षा करा. जो मला हे करून दाखवेल त्याला करोड रुपये इनाम!”
कोणीही रंगमंचाकडे फिरकले नाही. वाट पाहून पाषा म्हणाला, “पाशा द ग्रेट सुपरहीरोच्या शब्दकोषात “अशक्य” शब्द नाही. हे पहा तुमच्या नजरे समोर पाशा “डिसऑर्डर”को “ऑर्डर”मे बदलता है. अनहोनी को होनी कर देता है.”
त्याने काचेचा ग्लास हातात घेतला आणि हळुवार स्वरात जणू हुकुम दिला, “चलो बच्चे लोग अपनी अपनी जगह चले जाव.” ग्लासमधले तीळाआपापली जागा पकडण्यासाठी धाऊ लागले. स्थिरस्थावर झाल्यावर “खाली पांढरे तीळ त्यावर काळे तीळ!” अशी रचना झाली.
हे म्हणजे अति झाले. “एंट्रॉपी”च्या मूलभूत सिद्धांताला आव्हान देणारे होते.
डॉक्टरांना हे सहन होण्यासारखे नव्हते.
“पाशा, तुम्ही तर ऑम्लेटचे पुन्हा अंडे करून दाखवाल!”
“यात काय संशय!” पाशा हसून म्हणाला, “पोळीचे गहू, दह्याचे दूध आणि विजेचा कोळसा/पाणी. बोला काय करून दाखवू? का झाडलेली बंदुकीची गोळी, धनुष्यातून सोडलेला बाण परत आणून दाखवू?”
“असं होत नसतं. हा तुमचा “मास हिप्नोटीझम” प्रयोग आहे. हो ना?” डॉक्टर उद्गारले.
“डॉक्टर, आपण जगातले जानेमाने शास्त्रज्ञ आहात. मै रहा एक मामुली जादुगार. अब मै क्या कहू? मेरे गुरुजी बाघामहाराज कहते थे, “पाशा, बेटा जैसे जिसकी सोच.”’
कार्यक्रमाच्या शेवटी संमोहनाचा प्रयोग होता. त्याआधी पाशाने बडबड करायला सुरुवात केली.
थोडा वेळ वटवट केल्यावर जादुगार पाशा डॉक्टर करमरकरांकडे वळला.
“काही लोकांचा ह्या शास्त्रावर विश्वास नाही, होय ना डॉक्टर? मी तुमच्या मनात काय विचार चालले आहेत ते समजू शकतो. तुम्ही मनात म्हणता आहात,“भोळे लोक ह्याचे बळी होतात. माझ्यासारखा कणखर मनःशक्ती असणाऱ्या शास्त्रज्ञाला तुम्ही संमोहित करू शकणार नाही.” हेच तुमच्या मनात आहे ना?”
डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. हा माणूस मनकवडा आहे का? का ह्याला कर्णपिशाच्च वश आहे? ह्याला माझे विचार कसे वाचता आले?
“मला ह्या प्रयोगासाठी स्वयंसेवकाची गरज आहे. प्रेक्षकातले कोणी तयार आहे? घाबरू नका. अगदी सुरक्षित प्रयोग आहे.”
प्रेक्षकात हलकी कुजबुज सुरु झाली. पण पुढे यायला कोणी तयार नव्हते.
“मी जर माझ्या सहकाऱ्याला इथं बसवलं तर तुम्ही म्हणणार, “सब मिले जुले.” म्हणून मला तुमच्यापैकी एक जण स्वयंसेवक पाहिजे आहे. है कोई माई का लाल? भाईलोग यहाके मरहट्टे और पेशवा हमारे अटक तक आये थे और एक आप है. पुणे के लोग! छ्या.”
डॉक्टरांना काय सुरसुरी आली कोण जाणे. कदाचित त्यांना हा डायलॉग वर्मी लागला असावा. पुण्याच्या अस्मितेचा प्रश्न होता. कुणा टिनपाट गारुड्याने पुण्याची निंदानालस्ती करावी? आपल्या उपस्थितीत?
डॉक्टर पुढे सरसावले. पुण्याच्या अभिमानाने त्यांचा उर भरून आला.
“मी आहे तयार! माझी खात्री आहेकी तुम्ही मला संमोहित करू शकणार नाही.”
“व्वा, ये हुई ना जिगरकी बात. बसा इथं ह्या खुर्चीवर.” जादुगार हसून म्हणाला. “एक मिनिट, डॉक्टर ही छत्री घेऊन तुम्ही प्रयोगाला बसणार?”
डॉक्टर हसले. जादुगाराला छत्रीची जादू कशी समजणार? “हो काय हरकत आहे? तुम्हाला असं तर वाटत नाही कि ह्या छात्रीमुळे जादू चालली नाही. हो आधीच क्लीअर केलेलं बर, मागाहून एक्सक्यूज सांगू नका.”
“ओ नो. तुम्ही छत्री घ्या किंवा रेनकोट घालून बसा. नो प्रॉब्लेम!”
अरेरे! डॉक्टर उगीच इरेला पेटले. मी त्यांना दोष देणार नाही. जे जे नशिबात असते ते ते तसच होत. आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे याची त्यांना पुसटशी जरी कल्पना असती तर?
पाण्याचा ग्लास पुढे करत जादुगार म्हणाला, “डॉक्टर, तुम्हाला तहान लागली असेल तर...”
“नको, मला तहान लागलेली नाही.” डॉक्टरांनी पाणी पिण्यास नकार दिला.
“मग कोक, पेप्सी...”
“ही थंड पेये प्रकृतीला अपायकारक असतात. हे पहा तुम्ही जास्त वेळ खर्च न करता प्रयोग सुरु करा पाहू.” डॉक्टरांनी दटावले.
“ओके, ओके.” प्रेक्षकांकडे वळून त्याने छद्मी हास्य केले, “प्रेक्षकहो, डॉक्टरांना अजिबात तहान लागलेली नाहीये. माय लॉर्ड, ये पॉइंट नोट किया जाय.” जादुगार नाटकीपणाने उद्गारला. प्रेक्षागारात मंद हास्याची लाट पसरली.
डॉक्टरांच्या चेहऱ्यावर नाराजी होती.
पाशा डॉक्टरांच्या जवळ सरकला. त्याने डॉक्टरांना डोळे झाकण्यास सांगितले. त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत तो काही पुटपुटत होता. डॉक्टरांना ग्लानी येऊ लागली.
प्रेक्षकांकडे वळून पाशा तुच्छतेने म्हणाला, “जगप्रसिद्ध डॉक्टर राघवेंद्र करमरकर! पूर्ण संमोहित झाले आहेत. आता ते माझ्या कह्यात आले आहेत. मी त्यांना जशा आज्ञा देईन तसे ते वागतील. त्यांनी त्यांची इच्छाशक्ती मला समर्पण केली आहे.”
अरेरे! अरेरे! काय हा अधःपात.
“पाशा, मला पाणी पाहिजे. खूप तहान लागली आहे.”
जादुगार पाशाने पाण्याचा ग्लास पुढे केला. डॉक्टरांनी घटाघटा पाणी पिऊन ग्लास रिकामा केला.
“पहा, मी ह्यांना पाच मिनिटांपूर्वी विचारले होते कि पाणी पाहिजे काय? तेव्हा त्यांनी पाणी नाकारले होते. त्यांना तहान लागली नव्हती. आणि आता?” पाशा कुत्सितपणे उद्गारला.
ज्या कामासाठी पाशा आला होता ते पाशाचे काम झाले होते.
डॉक्टरांची मेमरी दुभंगून संपादित होण्याचे कार्य सुरु झाले होते. त्याच्या पूर्ततेसाठी चोवीस तासांचा अवधी लागणार होता.
मला वाटतं, की डॉक्टरांनी इरेस पेटायला नको होतं. फार पर्सनली घ्यायला नको होतं.
कार्यक्रमाच्या अखेरीस...
“जागे व्हा. मिस्टर करमरकर.” जादुगाराने त्यांना सुचना केली, “आता तुम्ही घरी जा. तुमची प्रिय पत्नी तुमची वाट बघत असेल.”
डॉक्टरांना गंमत वाटली. बालब्रह्मचाऱ्याची बायको?!?
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx