कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -३

स्थळ.
जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पण आत्ता इथे.
आकाशगंगेच्या उत्तर दिशेला असलेले केंस वेनाटीकी (Canes Venatici) नक्षत्र समूहात टीओएन ६१८ अतिविशाल कृष्ण विवर.
वेळ?
ज्याने “काळा”ला गती दिली त्याच्याच उपस्थितीत तुम्ही वेळ विचारत आहात!
कृष्ण विवरात कालप्रवाह थबकलेला असतो. पुढे जायचं विसरलेला असेल किंवा वहायची इच्छाशक्ति हरवली असेल.
अनंत कोटी ब्रह्मांडनायका समोर काळ नतमस्तक झाला होता.
Time saw The Mastar and froze!
अशा ह्या एकलतेमध्ये अशरिणी विश्वशक्तींची विचारसभा भरली आहे. अध्यक्षपदी अनंत कोटी ब्रह्मांडनायक स्वतः आहेत.
“लेट देअर बी लाईट!”
आणि करोडो सौरशक्तींच्या प्रकाशाने विवर उजळून निघाले.
सभेचे कामकाज सुरु झाले.
सर्व प्रथम नवीन तारकासमूह बनवण्याच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.
नवीन तारे बनवण्याचे काम निरंतर सुरु होते. अंतरीची उर्ज्वा संपलेल्या ताऱ्यांंचा विनाश होत होता.
मात्र क़्वाटम फिजिक्स आणि रीलेटिव्हिटी दोघेही अस्वस्थपणे एकमेकांशी हलक्या आवाजात कुजबुजत होते.
“महाराज क्षमा करा पण आपण इकडे एक कटाक्ष टाकावा.”
सगळ्यांच्या दृष्टीपटलावर “अनेकविश्वातल्या” विश्व क्रमांक बेचाळीस मधील आकाशगंगा अवतरली. आकाशगंगेच्या एका भुजावर एक तारा अवतरला. त्याच्या पासून तिसऱ्या क्रमांकावर तो ग्रह होता. दृश्य हळूहळू मोठे होत होते. प्रथम भारत, मग महाराष्ट्र, तदनंतर पुणे. पुण्यापासून थोड्या दूर अंतरावर असलेल्या भव्य इमारतीतील विशाल कक्ष.
डॉक्टर राघवेंद्र करमरकर विचार करत आहेत.
“महाराज, हा द्विपाद प्राणी, राघवेंद्र करमरकर, आपली जिद्द सोडायला तयार नाही.”
“माहित आहे. आपल्या हातात किती वेळ आहे?”
“साधारणपणे पंधरा ते वीस वर्षे आहेत. चार समीकरणांपैकी दोन ह्याला आत्तापर्यंत समजली आहेत. उरलेली दोन समजली की हा प्रयोगशाळेत नागडी-उघडी सिंग्युलॅरिटी बनवायचे काम हाती घेईल. आमच्या मते ह्याला आताच थांबवायला पाहिजे. नाहीतर जेव्हा हा सिंग्युलॅरिटीमध्ये डोकावेल तेव्हा विश्वातला कार्यकारण भाव कोलमडून पडेल... भूत ,भविष्य, वर्तमान हे एकमेकात विलीन होतील. अणु रेणु जागृत होतील...”
जगदीश्वराने हात वर करून थांबण्याचे संकेत दिले.
“महाराज, डॉक्टर शास्त्रींच्या सारखा अपघात?. तो खूप परिणामकारक ठरला. आज दुपारी त्यांनी राजीनामा दिला आहे..”
“घड्याळ दुरुस्त करण्यासाठी त्याच्यावर घण मारण्याची काय गरज? त्याच्या स्मृतींचे संपादन करा. “मेमरीआरएनए” वापरून बाहेरच्या स्मृति त्याच्या मेंदूत पेरा. डीआयडी! त्याच बरोबर त्याची दुसऱ्या विश्वात बदली करा. जा कामाला लागा."

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet