कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग-४

तो कोण आहे ह्याबद्दल त्याची स्वतःचीच खात्री नव्हती.
तो जेव्हा प्रेक्षागृहातू बाहेर पडला तेव्हा त्याच्या डोक्यात तेच शब्द घुमत होते.
“जागा हो.”
आपण कुठल्या शहरात आलो आहोत? समजायला काही मार्ग नव्हता. विचारावे का कुणाला? ऐकणाऱ्याची काय प्रतिक्रिया होईल? त्याला वेडा तर समजणार नाहीत? त्याने डोक्याला ताण देऊन आठवण्याचा आटोकाट प्रयत्न केला? परिणाम मात्र उलटा झाला. मेंदूत जणू घणाचे घाव पडू लागले.
ठण्ण्, ठण्ण्, ठण्ण्...
मेंदूत आठवणीची गर्दी झाली होती. लहानपणी त्याची बहिण लोकरीचा स्वेटर विणत असे तेव्हा लोकरीचा गुंता सोडवण्याचे काम त्याच्याकडे असे.
“राघू, गुंता सोडवून दे रे.”
ओके, म्हणजे माझं नाव राघू आहे तर.
राघू स्टेडी, डोंट पॅनिक. तर्कशास्त्र वापर. तुझ्या खिशात काहीतरी असेल.
ओह माझं पाकिट!
त्याने खिशातून पाकिट बाहेर काढलं. पाकिटात पैसे होते. पॅन कार्ड होत. बँकेचे डेबिट कार्ड होतं. चार पाच बिझिनेस कार्ड होती.
राघवेंद्र करमरकर.
जनरल मॅनेजर.
डेटा डायनॅमिक्स लिमिटेड.
202,IXT-A17,
मुक्काम पोस्ट सुखाची पुरचुंडी.
त्याच्या खाली पाच सहा क्रमांक होते.
करावा का एखादा नंबर डायल?
काय करावे?
तर्कशास्त्र वापर. कुणीतरी पडद्या मागून प्रॉम्प्ट केले.
त्याने आज्ञावलीची चळत तपासली.
१)“जागे व्हा. मिस्टर करमरकर.”
२)“आता तुम्ही घरी जा.”
३)“तुमची प्रिय पत्नी तुमची वाट बघत असेल.”
क्रमांक १ ची आज्ञा यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली होती. परिणामस्वरूप त्याचे नाव त्याला पक्के समजले. मिस्टर करमरकर!
ही माहिती साठवून ठेवायला पाहिजे. पण कुठल्या ड्राईव वर? सी का डी? डॉक्टर हा तुमचा साधा संगणक नाहीये. हा सुपर सुपर... देवानां प्रिय प्रियदर्शी संगणक आहे. ह्यात पण दोनच ड्राईव आहेत. पण त्यांची नावे आहेत.
१)डॉक्टर राघवेंद्र करमरकर.
२)राघवेंद्र करमरकर.
ह्यावर काय साठवणूक आहे त्याचे वाचन सवडीने करता येईल. त्यांनी व्यत्ययाकडे दुर्लक्ष केले. तो चौथ्या क्रमांकाच्या महत्वाचा व्यत्यय होता. पुढची आज्ञा समोर आणली.
“आता तुम्ही घरी जा.”
डॉक्टरांनी गाडी नेहमीच्या जागी उभी केली, अजूनही ते भारावलेले होते. ते बराच वेळ गाडीतच वाट बघत बसले. जणू काही संगमरवराचा पुतळा. पुढच्या आज्ञेची वाट पाहत होते. आता पुढे काय करायचे आहे?
“जागे व्हा. मिस्टर करमरकर.” जादुगाराने त्यांना सुचना केली होती, “आता तुम्ही घरी जा. तुमची प्रिय पत्नी तुमची वाट बघत असेल.”
ही प्रोग्रॅमची शेवटची ओळ होती.
द एंड. पुढचा प्रोग्राम?
आपल्याला कधी प्रतित होत नाही पण आपली इंद्रिये आणि त्यांना कंट्रोल करणारी जाणीव- नेणीव ह्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत. जेव्हा आपण गाडी चालवत असतो तेव्हा आपण गाडीची गती, दिशा आणि इतर बरच काही नियंत्रित करतो, पण आपण आणि गाडी ह्या निरनिराळ्या गोष्टी आहेत. हे द्वैत आहे.
स्वरःचा ताबा स्वतःकडे घ्यायला हवा. हीच ती वेळ होती.
डॉक्टरांनी गाडीचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडण्याची क्रिया करताना त्यांना अनेक गोष्टींची उजळणी करावी लागली.
खटका दाबला की दरवाजा उघडतो!
डॉक्टरांना हे सगळे नवीन होते. मेंदूचे (आणि एकूण शरीराचे) काम कसे चालते ह्याचे ते तटस्थपणे निरिक्षण करत होते.
इथून चालत चालत घरी जायचं होतं. आपल्याला चालता येईल? एक वर्षाचा असताना ते चालायला शिकले होते.
चालणे आणि सायकल चालवणे ह्यांचा आयुष्यात कधी विसर पडत नाही.
डॉक्टरांनी पहिले पाउल टाकले. आपण चालू शकतो ह्याची त्यांना खात्री पटली.
अॅक्च्युअलि काय आहे ना कि “मेमरीआरएनए” मुळे माणसाच्या मुलभूत क्रियांवर परिणाम होत नाही. परिणाम हा होतो की त्याला एक नवीन व्यक्तिमत्व मिळते. “मेमरीआरएनए”चे परिणाम दिसायला चोवीस तास लागतात. जादुगाराने पाण्यातून दिलेल्या “मेमरीआरएनए”चा बूस्टर डोस हळूहळू कार्यरत होत होता. २)राघवेंद्र करमरकर. ह्या ड्राईव वर डेटा लिहिण्याचे काम सुरु झाले होते.
ह्या क्षणी हा रोबोट सारखा चालणारा, दिसणारा इसम गोंधळलेला आहे. आपले काहीतरी बिघडले आहे हरवले आहे पण काय ते आठवत नाही. अशा अनिश्चित अवस्थेत तो आहे.
त्याच्या समोर फक्त शेवटच्या आज्ञा आहेत,
“जागे व्हा. घरी जा. तुमची पत्नी तुमची वाट बघत असेल.”
यंत्रमानवाला जशी जाणीव, नेणीव असते पण फ्रीविल नसते, करमरकरांची अगदी तशीच स्थिति झाली होती. एखादी किल्ली दिलेली भावली जशी दहा पावले सरळ जाते, मग उजवीकडे वळते, आणि चालायला लागते तसेच करमरकर सोसायटीच्या पार्किंग मधून आत आले, उजवीकडे वळले, लिफ्टमध्ये आत शिरले, त्यांनी तीन नंबरचे बटन दाबले, लिफ्ट वर गेली.
लिफ्टचा दरवाजा उघडला, आणि ते बाहेर पडले. त्या मजल्यावर तीन सदनिका होत्या. त्यावर नावे लिहिली होती. ३०१, सदाशिव वाघमारे. ३०२, प्राजक्ता आपटे. ३०३, राघवेंद्र करमरकर. राघवेंद्र करमरकर? कोण आहे हा माणूस? नाव ओळखीचे वाटतंय. घंटी वाजवून विचारू का? करमरकर बराच वेळ दरवाज्या समोर घुटमळत, विचार करत उभे राहिले. विचारावे की नाही विचारावे हाच मोठा प्रश्न होता.
शेजारच्या ३०१ क्रमांकाच्या फ्लॅट मधून सदाशिव वाघमारे(बहुतेक तेच असणार) बाहेर आले.
“हॅलो करमरकर, आज लवकर?”
“हो.” तो जो कोण होता त्याने खालच्या आवाजात उत्तर दिले.
द्विधा मनस्थिति त्यांना असह्य झाली. शेवटी मनाचा हिय्या करून त्यांनी बेल दाबली. पस्तिशीतल्या एका स्त्रीने दरवाजा उघडला.
ओहो हा माझाच फ्लॅट आहे.
माझ्या फ्लॅटमध्ये ही स्त्री काय करतेय?
“आपण माझी वाट पाहत होता का? मला यायला थोडा उशीर झाला आहे. उभ्या का? बसा ना. आत्या ह्यांना चहा वगैरे दिलास कि नाहीस. अहो तुम्ही बसा ना. तुम्ही उभ्या मला ऑकवर्ड होतंय. आत्या कुठे गेली?” डॉक्टरांनी आत्याला हाक मारली.
“राघव, काय हा वेडेपणा चाललाय? आज ही आत्याबाई कुठून उगवली? आज काय बाहेर पार्टी केलीस कि काय? आणि ही छत्री कुणाची घेऊन आलास?” त्या स्त्रीला हा राघवचा खट्याळपणा वाटत असावा, कारण ती मंद मंद हसत होती.
“”आत्याबाईला मिशा असत्या तर” त्यातली आत्याबाई. ती माझी आईप्रमाणे काळजी घेत आहे. गेली वीस वर्षं. आणि छत्री म्हणाल तर ही छत्री कायम माझ्या बरोबर असते. मी लग्न केलं नाही ना. मग हीच माझी जीवनसंगिनी. बरं, ते बाजूला राहू द्या. तुम्ही काय आमच्या इंस्टिट्युट मध्ये अर्ज केला आहे काय? मग ऑफिसमध्ये भेटायचं. इथं माझ्या घरी येणं बरं दिसत नाही.”
“राघव, बस झाली चेष्टा मस्करी. नाहीतर मस्करीची कुस्करी होईल.”
“मस्करी? आधी मला तुमचा परिचय?”
“मी कोण? मी तुमची परमप्रिय पत्नी पुष्पा. तुम्हीच नाही का मला लाडाने पुष्पी म्हणायचा.” एवढे बोलून ती लाडिकपणे राघवाच्या जवळ बसली.
“मिस, प्लीज आधी दूर व्हा. तुमचा काही गैरसमज होतो आहे. मी राघव करमरकर आहे पण तुमचा राघव करमरकर नाही.” डॉक्टर राघव करमरकर ठासून बोलले. “मिस, हे बघा तुम्ही तुमचे कोणी नातेवाईक असतील तर त्यांना बोलवा. मी पण माझे कलीग आहेत त्यांना फोन करतो. त्या शिवाय तुम्ही कोण, मी कोण हा द्विढा सुटणार नाही.”
डॉक्टरांनी शास्त्रींना फोन लावला. पुष्पा स्वयंपाकघरात गेली होती.
“द नंबर यू हॅव डायल्ड डझ नॉट एक्झिस्ट.” अजूनही दुसरे नंबर लावायचा प्रयत्न केला.
तोच संदेश!
“माझा भाऊ तुम्हाला कान पिचक्या द्यायला येतोय.”
दाराची बेल वाजली.
पुष्पाने दरवाजा उघडला. दोन बापे घरात शिरले,
“दादा, पहा ह्या राघवला काय झालय. तो माझ्याशी कसा तिऱ्हाइतासारखा बोलतो आहे.” ती केव्हाही रडायला लागेल असं वाटत होतं.
“ताई, तू रडू नकोस. मी आलो आहेना.” ताईचा दादा ताईला धीर देत बोलला.
“हे अजून दोघं कोण? ह्यांना पण नोकरी पाहिजे आहे का?” डॉक्टरांचा गोंधळ वाढत चालला.
दादाने डॉक्टरांच्या पाठीवर थाप मारत जिगरी दोस्ताच्या खाजगी आवाजात विचारले, “राघव, मला न सांगता प्रोग्राम केलात सालेसाहेब! पुष्पा, लिंबू सरबत कर. एकदम खात्रीचा उपाय!”
“मिस्टर दादा...” एव्हढे बोलून डॉक्टर थांबले. त्यांच्या डोक्यात अनेक (आणि उलटसुलट) विचारांची गर्दी झाली होती.
हा फ्लॅट कुणाचा आहे? माझा आहे. मी कोण?
ही स्त्री कोण? मला माहित नाही. आता हा “मी” कोण? मघाचा “मी” कोण?
त्यांनी हलक्या आवाजात स्वताला विचारले, “मी कोण आहे?”
“मी कोण आहे?” गेली दहा हजार वर्षे मानव ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहे. उत्तर हुलकावण्या देत आहे.
“मी सांगू? तुम्ही कोण आहात? ह्या पुष्पा वैनी म्हणजे तुमची पत्नी, हे मनोहर. पुष्पाचे बंधूराज, तुमचे मेहुणे. मी डॉक्टर शास्त्री तुमचा फॅमिली डॉक्टर. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही राघव करमरकर, “डेटा डायनॅमिक्स” कंपनीत जनरल मॅनेजर. बरोबर?”
“बरोबर चूक! मी राघव करमरकर पण ह्या बाईंचा पती नाही, ह्या दादाचा मेहुणा नाही. आणि तुमचा फॅमिली पेशंट नाही. मी आहे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर राघवेंद्र करमरकर, पुण्याच्या “भारत लार्ज हॅड्रान कोलायडर” चा डायरेक्टर! माझे “कृष्ण विवर” ह्या विषयावरचे संशोधन जगन्मान्य आहे. आता माझ्या डोक्यात प्रकाश पडतोय. तुम्ही शत्रू राष्ट्राचे एजंट आहात ना? डॉक्टर शास्त्री, तुम्ही आज सकाळी राजीनामा देऊन ह्यांच्याशी हातमिळवणी केलीत. राष्ट्रद्रोह हे मोठे पातक आहे. ह्याला प्रायश्चित्त एकच... माझा फोन बिघडला आहे नाही तर मीच पोलिसांना फोन केला असता. घरात हेरांची गॅंग घुसली आहे अशी तक्रार करायला.”
घरातले तिघेही अवाक झाले होते.
“पुण्याच्या “भारत लार्ज हाड्रान कोलायडर” चा डायरेक्टर? मी विचारतो कि हे “पुणे” कुठे आहे? हे नाव मी प्रथमच ऐकतोय.” डॉक्टर शास्त्री आश्चर्यचकित झाले होते.
“म्हणजे तुम्हाला शिवाजी महाराजांचे, पेशव्यांचे पुणे माहित नाही? पिटी. आणि ओ मॅडम, मला एकच पुष्पा माहित आहे. “अमर प्रेम” मधली.”
“शिवाजी महाराज, पेशवे, “अमर प्रेम”? “कोण आहेत हे? अरे काय चाललाय काय?“ ताईचा दादा पुरता वैतागला होता.
आता आश्चर्यचकित होण्याची पाळी डॉक्टर करमरकरांची होती.
शिवाजी महाराज कोण?, पेशवे कोण अशी पृच्छा करणारा मराठी माणूस त्याना पहिल्यांदाच भेटला होता.
“मग तर तुम्हाला पर्वती, संभाजी पार्क, पेशवे पार्क, डेक्कन जिमखाना हे पण माहित नसणार. संध्याकाळी तुम्ही भेळ खायला कुठे जाता?”
“ही नावं आम्ही प्रथमच ऐकतो आहोत. भेळ कशाशी खातात ते पण माहित नाहीत. आमच्या इथेही पार्क आहेत. त्यांची नावं आहेत पी-१, पी-२, पी-३... अशी आहेत.” इति दादा.
किती अरसिक डिजिटल लोक आहेत हे! उद्यानाची नावं म्हणे पी-१, पी-२, पी-३!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet