पौषाच्या रातीचा ख्याल

सकाळचे शेत

तृतीय पुरुषी आवाज १ :

एखाद्या लिखाणात , कथेत नायक असलाच पाहिजे आणि मग त्याला नावगाव, पद-पगार वगैरे असलंच पाहिजे हे खरं आहे एका अर्थाने आणि प्रस्तुत लिखाणातील नायकाला नाव-गाव, पद-पगार वगैरे आहे. फक्त प्रस्तुत तुकड्यात ते फारसं महत्वाचं आहे की नाही याबद्दल या तृतीय पुरुषाला पक्की खात्री वाटत नाही. अजूनतरी एक प्रकाशाचा वेग सोडला तर बाकी सर्वच बदलत असल्याने महत्वाचं काय आणि बिन महत्वाचं काय, सर्वच क्षणिक! कोण जाणे मनुष्य कधीतरी प्रकाशालाही त्याचा वेग बदलायला लावेल. प्रकाशाच्या वेगाचे नियंत्रक येऊ शकतील. मनुष्य आणि अतिप्रगत तंत्रज्ञान यांची चांगलीच जोडी जमली आहे आता. मनुष्याच्या काही कृती पाहिल्या, त्यानं वेगवेगळ्या क्षेत्रात केलेली कामगिरी पाहिली तर मनुष्य प्रकाशाचाच एखादा तुकडा असावा असं कुणाला वाटू शकेल इतकी प्रगती साधली आहे माणसानं. कल्पनातीत वेगाने जाणाऱ्या सरळसोट प्रकाशकिरणांनी या अतिप्रचंड वेगाला कंटाळून किंवा त्यात काहीतरी बदल हवा म्हणून आपखुशीनं आपली गती कमी करून मनुष्य आकार धारण केला असावा असंही कधी कधी म्हणावंसं वाटतं. पण गंमत अशी आहे प्रकाशानं व्यापून असलेल्या आसमंतात मनुष्य वावरतो तरीही प्रकाश, पृथ्वी, इतर अनेक तारे, ग्रह यांच्या वेगापुढे मनुष्याचा वेग अगदीच संथ आहे. मनुष्य आणि प्रकाश यांचं काहीतरी अजब नातं आहे !

अजब नात्यांचा गजब अनुभव आपल्या नायकाला देखील आहे. आपला नायक म्हणजे कोण तर एका कॉलेजातील एक साधा भाषा-शिक्षक , तेही ज्युनियर कॉलेजातला भाषा शिक्षक! तर भाषा-साहित्य वगैरे शिकवण्याचं हे त्याचं बारावं किंवा तेरावं वर्ष ! हे कॉलेज मुख्य शहरापासून बऱ्यापैकी दूर असलेल्या एका प्रदेशात आहे. या प्रदेशाला स्वतःचा असा खास चेहरा नाही, किंवा तो पूर्वी असावा. कधी काळच्या पाच दहा छोट्या गावांच्या पुंजक्याचं आता बऱ्यापैकी वर्दळ असलेल्या, लोकवस्ती असलेल्या प्रदेशात रूपांतर झालं आहे. कधी काळी तुरळक वस्ती आणि बैठी घरं असल्यानं पूर्वी इथली गावं सूर्यप्रकाशात न्हाऊन निघत असत; प्रकाश-सावल्यांच्या खास नक्षी तयार होऊन विरून जात असत. आता अनियमित आणि ओबडधोबड वाढलेल्या वस्तींमुळे प्रकाश आणि सावल्यांची खास अशी नक्षी अजून तयार होत नाही. आजूबाजूला थोडी शेती आहे, काही छोट्या मोठ्या फॅक्टऱ्या देखील आहेत. लोकवस्ती वाढल्याने ढाबे, बेकऱ्या, कपड्यांची दुकानं वाढली आणि मग थोडी शाळा कॉलेजची गरजही आणि त्यामुळे झालं ज्युनियर कॉलेज. या प्रदेशाची मूळची लय संथ परंतु आता मात्र तिच्यावर बाहेरच्या कृत्रिम द्रुत लयीचं आक्रमण झालंय. नक्की कोणत्या लयीत चालावं, वागावं याचा थोडा गडबडगुंडाच झाला आहे खरंतर. पूर्वीच्या खोलवर रुतलेल्या संथ लयीत अजूनही पावलं पडतायत आणि तरीही बाहेरची द्रुत लय मनाला खेचते आहे अशी थोडी खेचाखेची सुरु आहे. तरी मुख्य शहराच्या तुलनेत पुष्कळ बरं चाललंय !

आपल्या नायकाची एक मजेदार सवय अशी आहे, की तो कॉलेजला कधी सायकलवर, कधी चक्क चालत तर कधी बसने जातो. आजूबाजूचा परिसर न्याहाळत जायला त्याला आवडतं आणि न्याहाळण्यासाठी बघणाऱ्याचा वेग कमी असेल तर जास्त चांगलं. तसंही आपल्या नायकाला वेगाचं थोडं वावडंच आहे. आपल्या नायकाच्या जीवनाच्या ताल कोष्टकात ना, धिं, ता, त्रक असे नेहमीचे बोल आहेतच पण एकूण स्थायी लय ही मध्य विलंबित डक्याव डक्याव!

दिवाळीची सुट्टी संपलेली आहे आणि शाळा कॉलेजं पुन्हा सुरु झालेली आहेत. दिवाळीतल्या चकल्या कडबोळ्यांची चव त्याच्या जिभेवर अजून आहे. घरी फराळाचे जिन्नस आणि इकडून तिकडून आलेले दोनचार मिठाई बॉक्स अजून उरलेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर आता नायकाला कॉलेजला जाणे आलेच, कॉलेजात जाऊन भाषा-साहित्य शिकवणे आलेच ! हां, आता आपल्याच आजूबाजूला वावरणारे, आपल्यातलेच वाटणारे असे काही लोक भाषा आणि साहित्य वगैरे का शिकू आणि शिकवू लागतात हा एक प्रश्न आपल्यापैकी बहुतेक सर्वांना पडेल, किंवा आधी कदाचित पडलेलाही असेल. कुणाला या प्रश्नाची काही उत्तरं मिळाली असतील, कुणी उत्तर शोधून थकून गेलं असेल. पुन्हा बदलत्या काळात भाषा, साहित्य शिकण्या शिकवण्याचं चित्र बदलत चाललं आहेच. पण ते सर्व असो!

भाषा-साहित्य वगैरे शिकवणारा आपला हा नायक आज बसमधून कॉलेजला जाणार! बसचा वीस पंचवीस मिनिटांचा प्रवास हा खूप फायद्याचा- स्वस्त आणि मस्त! आजूबाजूची माणसं, थोडा निसर्ग वगैरे बघता येतो आणि महत्वाचं म्हणजे आज काय शिकवायचं याची मनातल्या मनात शांतपणे उजळणी करता येते, कधी त्याच्या टिपणवहीत छोटीमोठी टिपणं करता येतात. त्याला बसच्या इंजिनाच्या आवाजाचा तानपुरा पार्श्वभूमीला ऐकता येतो, रेडिओवरची गाणी आपसूक ऐकायला मिळतात.

प्रथम पुरुषी आवाज १:

नोव्हेंबरचा महिना आला; हा महिना खास थंडीचा - नेमेचि येतो मग हा हिवाळा ! आता बसचे ड्रायव्हर लोक, कंडक्टर मंडळी, पॅसेंजर वर्ग सगळ्यांच्या गळ्याभोवती वेगवेगळ्या रंगाच्या मफलर दिसू लागतील, त्या मफलरांचे लोकरी धुळकट वास येऊ लागतील. पुरुष मंडळींत बिड्या ओढण्याला बहर येईल. बायामाणसांच्या अंगावर शाली आणि लहान पोरांच्या डोक्यावर माकड-टोप्या येतील, पहाटे पहाटेची कामं करणारे दूधवाले, पेपरवाले मफलर-कानटोपी-स्वेटर अशा अवतारात दिसू लागतील आणि त्यांच्या चेहऱ्याकडे नुसतं पाहिल्यावरच हे पहिल्या धारेच्या थंडीचा अनुभव घेऊन आलेत हे समजू लागेल, तरुण पोरं फॅशनेबल स्वेटर घालून तरुण पोरींना आकर्षित करण्याचं स्वाभाविक काम करू लागतील. मोठमोठ्या शहरांमध्ये ऐन थंडीच्या काळात गोरगरिबांना, बेघर लोकांना स्वेटर, कांबळी वगैरे मोफत वाटण्याचे उपक्रम सुरु होतील. विविध मोसम आणि ऋतू आपल्याला काय काय दाखवतील आणि शिकवतील त्याचा नेम नाही. मोसमाप्रमाणे कपडे उपलब्ध आहेत आणि ते लोकांना खरेदी करता येताहेत ही गोष्ट आपण गृहीत धरतो. पावसकाळातल्या तुफान पाऊस पाण्याने दिलेल्या शिरशिरीच्या , हुडहुडी भरण्याच्या अनुभवांच्या नवीन छटा अनुभवायला मिळू लागतील. हवेतली आर्द्रता कमी होऊन ओठ कोरडे पडू लागतील, टीव्हीवरच्या जाहिराती बदलतील, जागोजागी उभे राहून कपातून गरमागरम चहा पिणाऱ्या लोकांच्या कपातून वर जाणाऱ्या वाफेच्या हलक्या झोतांचं अस्तित्व एरवीपेक्षा जास्त जाणवू लागेल. एकूण काय तर थंडी नावाच्या एकीकडे थोड्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या आणि एकीकडे नावडत्या ऋतूचा सामना करायला बहुतेक सगळे सज्ज होऊन जातील. बाहेर थंडी असल्या कारणाने बरेच लोक बसच्या खिडक्या बंद करणार, थंडीपासून रक्षण करायला एवढं साधं तंत्रज्ञान पुरतं कधीकधी आणि उन्हाळा येईपर्यंत हे असंच चालणार आता! आपल्या देशात ऋतूंचा हिरो म्हणजे पाऊस; पावसाचे बरेच वेगवेगळे टप्पे आणि त्याची वेगवेगळी रूपं असले तरी अखेर पाऊस बरसला तरी रडवणार , नाही बरसला तरी तेच. पावसाची चाल म्हणजे घरातल्या लाडक्या मोठ्या पोरासारखी, कधी बेताल वागून बापाच्या डोळ्यातून पाणी काढणार, तर कधी काहीतरी चांगला पराक्रम करणार आणि बापाच्या डोळ्यात आनंदाश्रूंचं कारंजं येणार ! त्यामुळे पावसाच्या अवतीभवतीनं गाणी , कविता , रागदारी असं बरंच काय काय करून ठेवलंय माणसानं; त्यातही भारतीय माणसानं. पावसानंतर बहुतेक उन्हाळ्याचा नंबर यावा. पण उन्हाळा म्हणजे एखादा अँटीनायकच जणू ! शेवटच्या टप्प्यात असं वाटतं की आता हा सगळं जग जाळूनच टाकणार ! थंडी तशी रडवत नाही; कदाचित अंतर्मुख वगैरे करू शकते. थंडी हा तसा चमत्कारिक ऋतू आहे; एकीकडे हवासा वाटतो , एकीकडे नकोसा वाटतो. उन्हाळा हा कसा लक्ख प्रकाशाचा ऋतू आहे तर थंडीत कधी कधी प्रकाश गोठवून टाकण्याचं सामर्थ्य असावं असाही अनुभव येतो. थंडीबद्दल असं आणखीही काहीबाही सांगता येईल, पण थंडीची दुसरी एक खास बात म्हणजे हा आकुंचन पावण्याचा ऋतू आहे.

TeaParty

दरवर्षी प्रमाणे यावेळचा ही सिलॅबस ठीक ठाक चाललेला आहेच. अभ्यासक्रमात लावलेल्या कविता , ठरलेले पाठ शिकवून झाले आहेत, अगदी अभ्यासक्रमाच्या मागणीप्रमाणे; साहित्याच्या उद्देशांप्रमाणे नव्हेत. आता साहित्याचा उद्देश नक्की काय आहे हे ठरवत बसलो तर परिसंवादच घ्यावा लागेल. आमच्या कॉलेजात होतो असा एक परिसंवाद; दर दोन वर्षांनी. साहित्य वाचून नक्की कुणाला काय मिळतं हे ठरवता येणं कठीण आहे, पण मला मात्र साहित्य वाचून विद्यार्थ्याचं मन थोडं जरी प्रसरण पावताना दिसलं की बरं वाटतं, किंवा काहीतरी अर्थपूर्ण केल्यासारखं वाटतं! आमच्या कॉलेजातली पोरं साहित्याच्या बाबतीत फारशी उत्साही नाहीत आणि त्यांच्या वाचनाला काही खास आकार उकार नाही तरीही काहीतरी वाचत असताना एखाद्याच्या नजरेत काहीतरी चमकून जातं, तेवढं काम करण्यासाठी पुरतं.

आता येणाऱ्या थंडीत प्रेमचंद बाबांचा पौषाच्या रात्रीचा विलंबित ख्याल शिकवावा लागणार ! ही कथा नेमकी थंडीतच शिकवायला येते या टायमिंग बद्दल अभ्यासक्रम समितीचे खास आभार मानले पाहिजेत ! म्हणजे खुद्द पौष लागायला अजून साधारण दीडएक महिन्याचा अवकाश असला तरी थंडी आजूबाजूला पुरेशी मुरलेली असते. कथेसाठीची वातावरण निर्मिती त्या निमित्ताने आपोआपच झालेली असते. ही कथा गेली बारा तेरा वर्षं आपण शिकवतो आहोत, पण त्या निमित्तानं जे काही अगदी खरं खरं म्हणायचं, सांगायचं आहे ते मात्र सर्व अभ्यासक्रमाच्या बाहेरचं आहे. ते सांगितलं , लिहिलं तर मार्क वगैरे काहीही मिळणार नाहीत. ते कुणी ऐकलं किंवा वाचलं तर कुणाला समजेल याचीही खात्री नाही. तरीही गेली काही वर्षे नियमितपणे दिवाळी नावाचा प्रकाशाचा उत्सव संपल्यानंतर पौषाच्या रात्रीचा या संथ खयालात आपण नेमाने अडकतो आहोत. हे अडकवणं थांबवता येत नाही, त्याच्या लाटा येतच राहतात एकामागोमाग एक! अनुभवानं असं लक्षात येतंय, की या लाटांची सुरुवात अगदी छोट्या आरोह अवरोहाने होत आलीय. कुठेतरी खोलवर असलेल्या एखाद्या लाटेला बाहेर पाहिलेल्या कुठल्याशा दृश्याने, ऐकलेल्या गाण्याने धक्का बसतो आणि हळू हळू भरून राहतात त्या आपल्यात.

नेहमीच्या पद्धतीने हा खयाल शिकवत आलोच आहोत आपण, म्हणजे आधी आपणच कथा तुकड्यातुकड्यात मोठ्याने वाचायची किंवा एखाद्या उत्साही विद्यार्थ्याने वाचून दाखवायची आणि मग त्याची खास शब्दावली समजावून देत, त्याच्या आगेमागे थोडं सांगत मुख्यतः परीक्षेच्या दृष्टीने काय येईल त्याची तयारी करून घ्यायची; परीक्षेतली प्रश्नोत्तरे ! मुलं मुख्य कथेत काय चाललंय याकडे कधी लक्ष देतात, कधी नाही. त्यांना परीक्षेचे पॅटर्न माहित असतात, प्रश्नोत्तरांचे ठरीव साचे माहित असतात. आधी पास झालेले विद्यार्थी कधी त्यांना नोट्स देऊन जातात आणि पहिल्यांदाच कथा वाचणाऱ्या बऱ्याच मुलांना मग सगळं माहित झालेलं असतं जणू! परीक्षा देऊन पुढे गेलेली मुलं कधी गावात, शहरात भेटली तर ओळखीचं हसतात, कधी थोडं काही बोलतातही पण पौषाचा हा खयाल आपण सोबत ऐकल्याच्या आठवणी फारशा कुणाकडे असत नाहीत, किंवा त्या असतीलही पण त्याबद्दल कुणी आवर्जून बोलत नाही. सगळं जग जणू एखाद्या आखून दिलेल्या सिलॅबसप्रमाणे चाललेलं आहे की काय अशी शंका येते कधी कधी !

तृतीय पुरुषी आवाज २:

बसमध्ये फारसं काही घडत नसल्याने आपल्या नायकाने आधी खिडकीबाहेर पाहण्याचा प्रयत्न केला आणि नंतर एखादी प्रतिक्षिप्त क्रिया घडावी तशी बॅगेतून आपली टिपणाची वही काढून तीत काही खरडू लागला. या टिपणाच्या वहीत काहीबाही लिहून ठेवणे, मधूनच एखादं छोटं चित्र काढणे, रेखाटन करणे ही त्याची जुनी सवय. चित्रकलेची हौशी आवड! शाळा सुटल्यापासून चित्रकलेशी फारसा जवळून संबंध राहिला नव्हता परंतु लिहिता लिहिता असा क्षण येई की शब्द अपुरे वाटत त्याला. अचानक एखादं नवीन क्षेत्र हाकारतंय असं काहीतरी होई आणि मग तो आपोआप कागदावर रेघोट्या मारू लागे. शब्द आणि चित्र यांचंही काही एक अजब नातं आहे. एकीकडे शब्दांच्या सहायाने चित्र उभं करण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडे समोर दिसणाऱ्या किंवा मनात दिसलेल्या चित्राला शब्दबद्ध करण्याची धडपड मनुष्य अनेक युगे करतो आहे असं त्याला लहानपणापासून अंधुक जाणवत होतं. आता अनुभवाने याचे अनेक पैलू त्याला दिसू लागले होते. गेल्या पौर्णिमेच्या रात्री एका मित्राच्या शेतघरावर रहायला गेलेला असताना ते दोघेही मध्यरात्री एका तळ्यावर गेले होते. त्या पौर्णिमेच्या रात्रीत दिसणारं, जाणवणारं ते वन आणि तळ्यावरला झिरझिरधवल प्रकाश पाहून दोघेही अनेक क्षण स्तब्ध होते. दुसऱ्या दिवशी या अनुभवाचं, या प्रत्यक्ष पाहिलेल्या दृश्याचं शब्दचित्र रेखाटण्याचा त्याने बराच प्रयत्न केला होता, पण काही केल्या शब्दांतून ते चित्र, तो अनुभव उभा राहीना. अर्थात सिद्धहस्त लेखकांना ही कला अवगत असते असं आपण म्हणतो पण ते कितपत खरं आहे याबद्दल त्याला शंका होती. प्रत्यक्ष घेतलेला अनुभव जर अगदी जाणीवपूर्वक पाहिला तर तो शब्दांतून यायला हवा, त्यासाठी सिद्धहस्त असण्याची आत कशाला हवी ! शब्द मर्यादित असले तरी कोणा एकाच्या मालकीचे नाहीत. पिठूळ चांदणं आणि चंद्राची पाण्यात पडणारी प्रतिबिंबं भावगीतात आणि प्रेमगीतात आलेली आहेतच याआधी कितीदा, पण तो अगदी वेगळा मुद्दा झाला. त्या गीतांमध्येही वेगळेपणा क्वचितच सापडेल. गीतांची आणि त्याला लागून असलेली संगीताची दुनिया सुद्धा वर्षानुवर्षे त्याच त्याच प्रतिमांच्या फेऱ्यात अडकलेली आहे. आपण यापेक्षा अगदी वेगळं काहीतरी लिहावं, अगदी संपूर्ण निराळी अभिव्यक्ती शोधावी असा त्याचा हट्ट आणि प्रयत्न ! पण तो पकडण्यात अजून कुठली दिशा दिसत नव्हती, सफलता दूरच राहिली ! अशावेळी त्याला कडकडून वाटे, की चित्रं काढता आली असती तर या अनुभवातलं काहीतरी नक्कीच अभिव्यक्त करता आलं असतं. रंगरेषांचं जग शब्दाच्या दुनियेपेक्षा अमर्याद असं आहे, त्याला काही सीमाच नाही जणू ! आयुष्याची इतकी वर्षे शाळा कॉलेजात नुसतंच वह्यांमध्ये काहीतरी तात्पुरतं खरडस्केच करून आणि चित्रकलेकडे शाळेतल्या सिलॅबस पुरतंच लक्ष देऊन वेळ वाया घालवल्याची खोल खंत वाटली त्याला. भाषेच्याही खूप आधी चित्रे आहेत. गुहेच्या भिंतीवर, कातळावर चित्रंच आहेत, शिलालेख वगैरे पुष्कळ नंतर आले. असं असूनही आपल्या आजूबाजूला इतके बडबड करणारे, भरमसाठ लिहिणारे, शब्दांनी आसमंत भरून टाकणारे लोक का आहेत हा एक त्याला नेहमी पडणारा प्रश्न आता पुन्हा वर आला. सिनेमा, सीरियली, वर्तमानपत्रं, कथा कादंबऱ्यांची पुस्तकं यातून माणसं सारखी बोलताहेत. का आणि कशासाठी? थोडक्या शब्दांत चित्र उभं करण्याची कला कुठल्या लेखकाकडे आहे आणि त्याहूनही महत्वाचं अशा लेखकाकडे लक्ष देणारे किती वाचक आहेत ?

बस थांबली; तो उतरून कॉलेजकडे जाऊ लागला. कॉलेजच्या आवारात पोरापोरींची वर्दळ होती, त्यांच्या तरुण आवाजांनी आसमंत भरून गेला होता, इकडे तिकडे छोटे छोटे घोळके दिसत होते. नेहमीच्या ओळखीच्या लोकांना राम राम करून झाले आणि तो थेट शिक्षक रूम मध्ये गेला. आपल्या कप्प्यातून पुस्तकं आणि आणखी काही सामान काढलं आणि वर्गाकडे कूच करता झाला. तास सुरु व्हायला अजून दहा एक मिनिटे असावीत. आजच्या तासाला त्याचे दोन तीन आवडते विद्यार्थी असणार होते. प्रत्येकच वर्षी तो मनात कुठेतरी आवडत्या विद्यार्थ्यांची वाट पाहत असे. ते वर्गात दिसले की त्याला आनंद होई, हुरूप येई आणि हे दोघे तिघे तरी अभ्यासक्रमाच्या बाहेर जातील अशी काही आशा वाटत राही. रिकाम्या वर्गात तो आला आणि खिडकीपाशी येऊन उभा राहिला. या खिडकीतून आधी कॉलेजला लागून असलेल्या छोट्या हिरव्या मैदानाचा तुकडा दिसत असे आणि त्यानंतर थोडी शेती. मग पुढे एक छोटा रस्ता आणि त्यानंतर काही छोट्या मोठ्या इमारती आणि तुकड्यातुकड्यात क्षितिज. खिडकीत उभा राहून एकदा त्याने हे दृश्य पाहून घेतलं, आणि त्याला शेतात जाणारा हल्कू दिसू लागला. पुन्हा एकदा कथेचं पान त्याने उघडलं आणि वाचनात मग्न झाला. त्याला एकदा तरी ही कथा शेतात बसून शिकवायची होती; त्यातही रात्रीच्या वेळी. हल्कूला वाजणारी थंडी अनुभवून पहायची होती, अंगावर एक कांबळ घ्यायची मारामार असलेल्या, कायम देणी चुकवण्याच्या विवंचनेत असलेल्या हल्कूचा आणि सुरेल जबराचा मौनसंवाद ऐकायचा होता; हल्कू नक्की कुठल्या वाटेनं शेतात आला असावा, त्या वाटेवरल्या कुठल्या टप्प्यावर त्याच्या मनात नक्की काय काय आलं असावं याचं खरंखुरं जाणवणारं वर्णन करायचं होतं. तो याचाच विचार करू लागला, की ही कथा कायम नवीन प्रकारे शिकवत राहिलो तर आपल्याला आणि विद्यार्थ्यांना कुणालाच कंटाळा येणार नाही आणि पौषाच्या रातीचा हा ख्याल उत्तरोत्तर रंगतच जाईल.

प्रथम पुरुषी कथन : २

… थोड़ी देर में अलाव जल उठा. उसकी लौ ऊपर वाले वृक्ष की पत्तियों को छू-छूकर भागने लगी. उस अस्थिर प्रकाश में बगीचे के विशाल वृक्ष ऐसे मालूम होते थे, मानो उस अथाह अंधकार को अपने सिरों पर संभाले हुए हों अंधकार के उस अनंत सागर मे यह प्रकाश एक नौका के समान हिलता, मचलता हुआ जान पड़ता था….

आता या ओळी संख्येनं चारपाच भरतील, परंतु या ओळींच्या आधारानं पुढं पुढं जात रहायचं, ओळखीची टेकडी उतरतो तसं. या ओळीतले बहुतेक सर्व शब्द ओळखीचेच आहेत आणि या ओळी ज्या ओळींच्या आगेमागे गुंफल्या आहेत त्या ओळींचेही शब्द फार अवघड वगैरे नाहीत! परिस्थिती देखील बहुतेक ओळखीचीच! पण बऱ्याचदा ओळखीची टेकडी उतरून पलीकडे गेल्यावर समोर दिसणारा पॅनोरमा अनोळखी भासतो; अनोळखी आणि अनोखा ! सुरवातीला आपली नजर एकदम खिळून राहते, हळूहळू स्थिरावते, तयार होऊ लागते आणि त्यातले बारकावे झिरपू लागतात आपल्यात ! या प्रदेशाकडे आपण निराळ्याच नजरेनं पाहू लागतो.

नाईलाजीच्या मजूरीचे व्रण त्वचेवर वागवणारा हल्कू, त्याच्या त्वचेवर धडकणारी थंडी, आंब्याच्या जाडसर पानांचा अंधारात विरघळलेला गंध, शेकोटीची नश्वर ऊब, शेकोटीच्या आजूबाजूने आसमंतात अनियमित बदलणारा प्रकाश, त्याच्या आजूबाजूला पडणाऱ्या-उडणाऱ्या सावल्या, जमिनीलगतचा गवतात खोल घुसलेला थंडीचा थर, त्याला लाखो योजने दूर असणाऱ्या चांदण ठिपक्यांची मिळणारी साथ, थंड-उष्ण तापमानाच्या हलके बदलत राहणाऱ्या सीमारेषा आणि हल्कूच्या मनातले ऊबदार प्रदेशाकडे कूच करत राहण्याच्या स्वाभाविक इच्छांचे झोत, मालकावर मूक प्रेम करणारा दिलदार जबरा, त्याची अधूनमधून ऐकू येणारी कुंकूं… असं बरंच काही दिसू शकतं या चित्रात आणि ज्याला काही ऐकायचं असेल त्याला अनेक ध्वनी ऐकू देखील येतील!

न दिसणारं असं आणखीही पुष्कळ काही आहे इथे. खाली पडलेली पानं एकत्र करून कशाबशा पेटवलेल्या शेकोटीच्या आगीतून उडणाऱ्या, वर जाणाऱ्या ठिणग्या त्यांची ऊब हरवून बसतात हळूहळू. तरीही आसमंतात कसलीशी ऊब जाणवतेय . तुम्हाला वाटू शकेल, की शेकोटीच या ऊबेचा स्रोत आहे , पण आणखी थोडं जवळ जाऊन पाहिलं तर कदाचित कुणाला दिसू शकेल, की या थंडीचा मुकाबला करू पाहणारी हल्कूच्या हृदयातली अदृश्य ऊब पसरतेय, झिरपतेय पौषाच्या या थंड निशेवर! थंडीच्या जोरापुढे तिचं काही चालणार नाही हे ओघानं आलंच आणि ही ऊब हल्कूच्या गुलाबी रंगाच्या शुद्ध हृदयातून पाझरतेय हे लगेच दिसणं, जाणवणं तसंही मुश्किलच! कारण तसाही बऱ्यापैकी तुंदिलतनु असलेला, कायम पैशाच्या तंगीत असलेला, जगरहाटी न समजलेला, हट्टाने शेतकरीच राहणारा हल्कू रस्त्यावर चालत असताना समजा आपल्या जवळून जरी गेला तरी तरी कुठं ध्यानात येतो आपल्या ! असे अनेक हल्कू आपल्या आजूबाजूला असतात, पण त्यांची दखल घेण्याची जगरहाटी नाही. तरी हल्कूचं पुष्कळ बरं आहे म्हणता येईल. मुन्नीचं काय ! मुन्नीला कथेतही फारसा वाव नाही, ती खाष्ट आणि व्यावहारिक वाटत राहते नुसती, तिच्या हृदयात नक्की काय चाललंय याचा छडा लावायला मुन्नीच व्हावं लागेल कदाचित! प्रत्यक्ष जीवनात आपल्या अवतीभवती अगणित मुन्नी जन्माला येतात, कशाबशा जगतात आणि विरून जातात! त्या आपल्या खिजगणतीतही नसतात. त्यांची दुःखं, त्यांनी केलेले त्याग, त्यांची हुशारी, त्यांची चिकाटी हे सर्व अदृश्य राहून जाण्यासाठीच असतं जणू ! आता तुम्हाला म्हणून सांगतो, की कधी कधी ही कथा वाचत असताना त्याच आंब्याच्या बागेत एका झाडाखाली डोळ्यांवर चष्मा चढवून प्रेमचंद बाबांची छबी बसलेली दिसते! त्यांना सांगावंसं वाटतं, की आता पूर्वीपेक्षा परिस्थिती बरीच सुधारली आहे, मुली शिकत आहेत. इथंच बघा आपल्या वर्गात, कॉलेजात मुलींची संख्या जवळजवळ मुलांइतकीच भरते आणि मुली मुलांपेक्षाही हुशार आहेत! तुम्ही विचाराल, की रात्रीच्या अंधारातही प्रेमचंद बाबा दिसतो कसा , तर त्याला कारण हल्कूनं त्या शेतात पेरलेला प्रकाश असं मला वाटतं आणि हल्कूचं असं दर्शन होऊ शकतं त्याला कारण प्रेमचंद बाबा ! हल्कू आणि प्रेमचंद जणू वेगळे नाहीतच, हा माणूस स्वतःला मजूर म्हणवून घ्यायचा आणि दररोज लिहायचा, पण या माणसाचं लिखाण म्हणजे प्रकाशाचा शोध आहे. दैनंदिन जीवनातील प्रकाशाचा शोध ! मजुरी तसे आपण सर्वच करतो, पण आपल्याला प्रकाशाचा किरण सापडतो का हा प्रश्न विचारला पाहिजे ! प्रेमचंद बाबाला अतिवेगानं जाणारा प्रकाश सापडला आहे असं जाणवून देणारे अनेक क्षण येतात. रात्रीच्या शेतात एकट्यानंच तिथल्या थंडीत ऊबेची पखरण करणारं हल्कूचं निर्मळ हृदय हे प्रेमचंद बाबाचंच हृदय असावं खरं तर ! म्हणून तर या आमराईतल्या अशा अथांग अंधार सागरात नावाप्रमाणे दोलायमान होणारा अस्थिर प्रकाश लेखकाला इतका स्पष्ट दिसला असावा आणि तो त्याच्या या चार पाच ओळीत अगदी सहज उतरून गेला आणि नीट पहा मग पुन्हा त्या ओळींमधून आपल्या मनात एक प्रकाशचित्र तयार होतंय.

रात्रशेतशेकोटी

इतकी सुरेख चित्रं देणाऱ्या या मनुष्याची आजच्या क्षणोक्षणी स्वतःची छवी बनवणाऱ्या आपल्या माणसांच्या दुनियेत दोनचारच चित्रं कशीबशी आहेत आणि तीच सगळीकडे फिरताहेत- साहित्य सभांच्या पोस्टरांवर, पत्राच्या लिफाफ्यांवर, स्टॅम्पवर ! या माणसाच्या इतक्या मोठ्या लिखाणावर अजून कुणी चित्रं का काढली नाहीत? कुणास ठाऊक, काढली देखील असतील, आपल्याला माहित नसेल. शेतांची आणि शेतकऱ्यांची चित्रं तुम्ही पाहिली असतीलच. खरं सांगायचं तर पेपर वगैरे वाचून आणि पुस्तकातली माहिती रटून शेतीबद्दलचं आणि शेतकऱ्याबद्दलचं काहीतरी चित्र तयार होतं मनात. ते कितपत खरं आहे ,माहीत नाही ! आपल्याला खायला , ल्यायला मिळतंय यापलीकडे फारसं बघत नाही आपण, कधी अडीनडीला एखाद्याला थोडी मदत करतो तेवढंच, तीसुद्धा आपला खिसा सांभाळून !

तृतीय पुरुषी कथन ३:

कथा पुन्हा शिकवत असताना त्याला आतलं मन सांगत होतं- आपण चित्रकार असतो तर भटकत फिरलो असतो देशभर, सुदैवाने देशात अजून भरपूर शेतं आहेत आणि मग काही कायम सलत राहणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असती कदाचित एखाद्या हल्कूच्या शेतावर मुक्काम करून तिथे रंगवलेल्या चित्रांत, किंवा हल्कूच्या सोबत घालवलेल्या पौषातल्या एखाद्या जबरदस्त थंडीच्या रात्रीत! हे सांगत असताना अगदी आत्ताच हातात पेन्सिल ब्रश घेऊन काहीतरी रंगवावं अशी एक खोल उर्मी त्याच्या मनात आली. कदाचित त्यानं शेताची चित्रं रंगवली असती. शेताचा थोडा अनुभव त्याला होता, पण तो लहानपणचा ! त्याचं आणि शेतीचं काही जमलं नाही. म्हणजे घरात आजोबांची शेती होती, पण त्याचं चित्र काही भलतंच होतं. बाहेर वावरात मस्त खळाळतं पाणी, बांधाला असलेली भलीमोठी चिंच, शेतातली कणसं, तिथले प्राणी पक्षी असं एकीकडे अगदी स्वप्नवत चित्र आणि घरात मात्र भाऊबंदकीची उच्च स्वरातली भाषा, झगडे , रुसवे फुगवे, एकमेकांना पार मारून टाकण्याची भाषा ! शेताच्या हिरव्या रंगीत चित्रापेक्षा अगदी भलतंच काहीतरी ! लहानपणी त्याला वाटत असे, की आपणही शेती करावी. पण आईला फारशी आवड नव्हती, तिनेच परावृत्त केलं, म्हणाली शाळा कॉलेजात मास्तर हो. शेतीतले कष्ट जमले नसते, शेती समजली नसती मुळात! अर्थात आज तरी कुठे काय समजतं शेतीबद्दल आणि शेतकऱ्यांबद्दल! या सर्व विचारयात्रेत कुठूनतरी दिवाळीच्या मिठाई बॉक्स मधले उरलेले दोन बॉक्स कामवाल्या छायाताईंना द्यायला हवेत असाही एक विचार येऊन गेला.

तास संपला. आजची कथा शिकवून झाली , पण आज पहिल्यांदाच थोडी सिलॅबसच्या बाहेर जाऊन त्याने शिकवली होती. कॉलेजची वेळ संपली तसा तो बसथांब्यावर आला. संध्याकाळचा प्रकाश फिक्कट जांभळ्या छटा घेऊन आला होता. बसच्या टपावर तो हलकेच धडकून एक निराळीच छटा निर्माण करीत होता. या विविध रंगछटांना आपल्या भाषेत नावं शोधायला हवीत आणि ती आपल्या वहीत उतरवून काढायला हवीत अशा विचारात बसमध्ये चढला. बसमध्ये काही शेतकरी महिला चाफ्यांची फुलं केसात माळून बसल्या होत्या. गर्दी अजून फार नव्हती. बसच्या धुरानं या प्रकाशाच्या जांभळ्या छटेत शिरून त्याला एक किंचित करडेपणा , काळपटपणा बहाल केला आणि ती छटा जांभळ्या रंगात मिसळून गेली. आजूबाजूच्या दुकानांच्या पाट्यांवर ती छटा हलक्याने दिसू लागली. बसच्या खिडकीतून बाहेर पाहत, आजूबाजूचे लोक पाहत आपला नायक घरी चालला होता.

दैनंदिन जीवनात प्रकाशाचा शोध घेत रहायला हवा मनुष्यानं !

( टीप : हाकारा www.hakara.in मध्ये पूर्वप्रकाशित: "the work was first published in हाकारा । hākārā, an online bilingual journal of creative expression published in English and Marathi.काही बदल करून पुन्हा लिहिला आहे. चित्रेदेखील माझीच आहेत.)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फोटो दिसण्यासाठी त्यांची jpg link वापरून इथे insert image हा पर्याय वापरावा लागेल. अधिक माहिती इथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसरं चित्र फार आवडलं आहे Smile
(तृतीय पुरुषी कथन वाले मथळे ठळक करता येतील का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद ! मथळे माझ्याकडच्या डॉक्युमेंटमध्ये ठळकच होते, पण इथे नाही करता आले. माझं तांत्रिक ज्ञान कमीच पडतं आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed

फार फार सुंदर लिहीलंय!
काही वेगळंच.
तिसरं चित्र मला घरी लावायला फार आवडेल.
ते खरेदी करता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नमस्कार नील ! धन्यवाद ! लिखाण आवडल्याचं वाचून आनंद झाला. चित्र आवडलं हे वाचून किंचित जास्तच आनंद झाला Smile हे चित्र आणि मी आम्ही दोघेही भारतात नाही,नाहीतर प्रत्यक्ष भेटून हे चित्र तुम्हाला भेट दिलं असतं. . ( तुम्ही भारतातच राहता का ?) असो, व्यनि वर बोलूयात. 

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed

ऐसीवर इतका काळ असल्याचे समाधान वाटायला लावणारा लेख!

सकाळी एका रिकाम्या रेल्वेस्टेशनवर उन्हात हा लेख वाचत बसलो होतो. आकाशात चुकार उन्हाळी पावसाचे ढग. नऊ. सातची रेल्वे येऊन, मिनिटभर थांबून गेली. तिचा आवाज येतोय तरी मी लेखात गुंग. लेख संपल्यावर ध्यानात आले की गाडी चुकली.

मी हाकारा मध्ये आधी वाचला नाही हा लेख. लिहिते ऱ्हावा हो प्लीज. येड लागायची पाळी आली आहे बातम्या-इत्यादी बघून वाचून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

नमस्कार , वास्तविक अशा प्रकारची प्रतिक्रिया मला पहिल्यांदा मिळते आहे. हा छोटा लेख वाचण्यात तुम्ही इतके मग्न झालात हे फारच छान ! आता मी तुम्हाला प्रेमचंद वाचायचा आग्रह करेन :) 
खूप धन्यवाद ! 

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed