साक्षी

झुंजूमुंजूचे नभोनाट्य
क्षितिजावर रंगत जावे
सूर्यबिंब दवबिंदूंमधले
अलगद खुडून घ्यावे

त्या बिंदूंची रेष केशरी
लवलवती बनवावी
मावळतीची चांदणनक्षी
तिने हळू डहुळावी

स्पर्शाने अलवार विस्कटून
अवघी चांदणनक्षी-
-विरघळेल, त्या विरघळण्याला
एक विदेही साक्षी

विझणार्‍या सूर्यास्तबिंदूना
पश्चिम क्षितिजी टिपण्या
रिक्त ओंजळीत भरून घ्याव्या
मावळत्या चांदण्या

गतप्रभ नक्षत्रे अन् त्यातील
अगणित ह्या चांदण्या
तेज शिंपडित क्षितिजाखाली
जातील गात विराण्या

field_vote: 
0
No votes yet