सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप ४ - रिश्ता आया है!

हातशिलाईच्या अड्ड्यात अप्रेंटीस असायचे आणि व्हॉलंटीयर्स. अप्रेंटीस क्वचितच सँटा फे मधले स्थानिक असायचे. तर कॉश्च्युम शॉपच्या व्हॉलंटीयर्स या सँटा फे आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या रिटायर्ड बायका असायच्या. शिकत असलेले, शिक्षण संपून खऱ्या जगात उतरू पाहणारे अप्रेंटीस आणि रिटायर झालेल्या, वेळ घालवायला काम करणाऱ्या व्हॉलंटीयर्स असे फार गमतीशीर मिश्रण असायचे हातशिलाईच्या अड्ड्याचे.
वयातला आणि अनुभवातला फरक असला तरी लगेच अप्रेंटीस लोकांनी व्हॉलंटीयर्सना काकू-मावशी-आजी म्हणत लीन व्हावे, त्यांचे ऐकावे वगैरे बावळटपणा तिथे चालत नसे. त्यामुळे गप्पा तश्या म्हणायच्या तर एका पातळीवर चालत.
या सगळ्या सत्तरीच्या आगेमागे असलेल्या बायका एकट्या किंवा फारतर दुकट्या राहात, आनंदी असत आणि मूळ शहरापासून 10-15 किमी दूर असलेल्या ऑपेरा रांचवर रोज आपले आपण ड्राइव्ह करून किंवा कारपूल करून येत असत. यातल्या काहींच्या घरातल्या जास्तीच्या रूम्स त्या ऑपेरा कंपनीला सीझनपुरत्या भाड्याने दिलेल्या असत. कंपनी मग तिथे अप्रेंटिस गायकनटांची राहायची व्यवस्था करे.

कॉश्च्युम शॉपच्या आणि इतर क्रूच्या त्या सगळ्या पसाऱ्यात मी एकटीच देसी असल्याने अनेकजण कुतूहलापोटी भोचक होत असायचेच त्यामुळे थोडा भोचकपणा मी स्वीकारून टाकला होता. यातल्या काही टिपिकल अमेरिकन म्हणजे अमेरिकेच्या पलिकडे जग असतं आणि माणसं राहतात आणि आनंदात असतात याची जाणीव नसलेल्या गोऱ्या काकवा, आज्या असायच्या तर काही हिस्पॅनिक.

एका गोऱ्या काकूंना अमेरिकन असणे (आणि बहुतेक गोरे असणे) खूप मिरवायचे असे. "आम्ही अमेरिकन असल्याने माझ्या वडिलांना शिक्षणाचे महत्त्व पटले होते त्यामुळे त्यांनी आम्हा सर्व बहिणींना, मुली असलो तरी, व्यवस्थित शिक्षण मिळेल इकडे लक्ष दिले. शिक्षण पूर्ण होऊ दिले." असे मला त्यांनी बरेच वेळा सांगितले होते. त्यामुळे या काकू आणि त्यांच्या बहिणी प्रचंड उच्चविद्याविभूषित आहेत असा माझा समज होता. मग एकदा गप्पा मारताना लक्षात आले काकू आणि बहिणी केवळ हायस्कूल पूर्ण केलेल्या होत्या. आणि मी तिथे माझी दुसरी मास्टर्स करायला गेले होते.

आमच्या टेबलची व्हॉलंटियर होती रोझ. हिस्पॅनिक होती. हिस्पॅनिक लोक बहुतांशी कॅथलिक आहेत. रोझ पण अर्थातच. तिच्या बोलण्यात धार्मिक उल्लेख खूप असायचे. 'गॉडच्या नजरेत तू पण ख्रिश्चनच आहेस' वगैरे म्हणायची. पण ते हसून उडवून लावले तर लगेच संगीत मानापमानाचा प्रयोग घडत नसे हे महत्वाचे. रोझच्या घरात दोन अप्रेंटीस गायकनट राहात होते. एक शिकागोहून आलेला गोरा मुलगा होता आणि दुसरा मात्र रेअर केस म्हणजे चक्क एबीसीडी होता. आताचे माहीत नाही पण 90च्या दशकातले एबीसीडी तरुण कलाबिला, गाणेबिणे असल्या नादाला लागणे हे खूप दुर्मिळ होते.

ती आम्हाला त्यांच्या कथा सांगायची आणि अर्थातच त्यांना आमच्या सांगत असणार. आधी ब्राऊन रंगामुळे मी तिला तिच्यासारखीच वाटले होते. पण तिने माझ्याशी स्पॅनिश बोलायच्या आधीच मी इंडियन आहे ती ही खरी खरी इंडियन, कोलंबसाने डेली वाटल्यामुळे इंडियन शिक्का बसलेल्या टाईपची इंडियन नाही हे तिला कळले होते.

तिला माझ्याबद्दल विशेष माया आहे असे वाटायचे. मला आणि टेबलावरच्या बाकी लोकांनाही. बाकीच्यांसारखे indifferent वगैरे मी वागायचे नाही, वयाचा मान कितीही नाही ठरवला तरी दिला जायचा यामुळे तिला आपलेपणा वाटत असावा असे मी गृहीत धरले होते. ती मला खूप प्रश्न विचारे. माझ्या घराबद्दल फॅमिलीबद्दल वगैरे. तिने एका रविवारी आम्हाला घरीही बोलावले होते. नांबे फॉल्सला जाताना वाटेत तिचे घर होते म्हणून आम्ही तिच्याकडे गेलो होतो. ब्रेकफास्ट खाताखाता आम्ही आलो आणि ते दोघे गायकनट नेमके बाहेर गेलेत याबद्दल चार वेळा तरी चुकचुकली होती.

तिच्याकडे राहणारे दोघे गायकनट जाता येता बघून माहीत होतेच. आम्ही गप्पाटप्पा करायचो त्या गायकनटांपैकी एकाशी त्यातल्या गोऱ्याची मैत्री होती. त्यामुळे काऊगर्लसमध्ये क्वचित हाय हॅलो झालेही होते.

पण अर्थातच एबीसीडी - त्याचे नाव आलोक - आणि मी एकमेकांशी कधी बोलणे तर सोडा हॅलो वगैरेही केले नव्हते. साहजिक आहे तेव्हा तरी युनिव्हर्सिटीज वगैरे मध्ये एबीसीडी आणि एफोबी लोक एकमेकांना व्यवस्थित पाण्यात बघत. त्यामुळे बाकी सगळ्यांशी बोलले तरी एबीसीडीशी/ एफोबीशी कोण बोलणार वगैरे नकचढेपणा होताच.

आणि एक दिवस तिने मला सुचवले की मी आणि आलोकने डेटवर जावे. तिने हेच आलोकलाही सुचवलेय हे ही सांगितले. तुमचे लग्न व्हायला हवे हे ही. मी थक्क, चकित आणि बंद पडलेली. यासाठी म्हणजे मॅचमेकर बनण्यासाठी तिला माझ्यात इतका इंटरेस्ट होता तर!

मला माझा माझा एक बॉयफ्रेंड आहे भारतात आणि मी परत जाऊन त्याच्याशी लग्न करणार आहे हे शक्य तितक्या स्पष्टपणे सांगितले. आणि नसता तरी मी आलोकच्या मागे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे हे असलं माझ्या वतीने कुणाला सुचवणे हे माझ्यासाठी लाजिरवाणे आहे. उगाचच गैरसमज निर्माण करणारे आहे त्यामुळे तिने परत असले काही करायला जाऊ नये आणि आलोकलाही मला असला काही इंटरेस्ट नाही हे स्पष्ट करावे असे खडसावले.

यावर एखादी भारतीय काकू 'ह: ज्याचं करावं भलं तो म्हणे माझंच खरं!' असं ऐकवून राग घेऊन बसली असती. रोझ मात्र ओशाळली, सॉरी म्हणाली, आपण जरा जास्तच भोचकपणा केला हे ही तिला मान्य झाले वगैरे.

नंतर एकाच टेबलवर असलो तरी मी तिच्याशी बोलणे कमी केले. पूर्ण सीझनमध्ये आलोकशी कधीच ओळख, मैत्री झाली नाही/केली नाही. शक्यतोवर आम्ही एकमेकांना टाळत राह्यलो.
- नी
#सँटाफेऑपेराकॉश्च्युमशॉप #स्मरणरंजन #भूतकाळातल्यादिवसभराच्याकामातले #कॉश्च्युमशॉपच्यागोष्टी

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet