जित्याची खोड

#अंकाविषयी #ललित #आफ्रिका #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२३

जित्याची खोड

- झंपुराव तंबुवाले

बेन बोव्हा यांच्या 'Men of Good Will' या कथेचं परवानगीसह भाषांतर

"मला मुळीच कल्पना नव्हती की अमेरिकेचा चांद्रतळ इतका मोठा आणि अद्ययावत आहे", हवाबंद दालनातून पुढे सरकताना UN सदस्य टॉर्गसन म्हणाला. "होय, हा प्रपंच भलामोठा आहे खरा", कर्नल पॅटन किंचित हसून म्हणाला. त्याचं जाडजूड शिरस्त्राण उच्च दाबात टिकून राहण्यासाठी बनवलेलं होतं; त्यातूनही त्याचा व्यावसायिक अभिमान झळकत होता.

दाब सुसह्य होताच आपापल्या ॲल्युमिनियम सुटांमधून कात टाकल्यासारखे ते दोघे बाहेर पडले. पॅटन चांगलाच भारदस्त होता आणि सर्वांत मोठ्या आकाराच्या अवकाशसुटात कसाबसा मावायचा. त्याउलट टॉर्गसन किरकोळ बांध्याचा होता; त्याचे केस विरळ होत चालले होते. त्यात मोठा चश्मा. एकूणच तो रंगरूपानं सामान्य होता.

एअरलॉकमधून बाहेर पडून ते अमेरिकेच्या चांद्रतळाच्या भल्यामोठ्या प्लॅस्टिक डोमच्या कॉरिडॉरमध्ये शिरले. दोहोबाजूंना असलेल्या अनेक बंद दारांकडे पहात टॉर्गसननं विचारलं, "या खोल्यांमध्ये काय आहे?" टॉर्गसनच्या बोलण्यातली किंचित स्कॅंडनेव्हिअन ढब पॅटनला खटकत होती.

"उजवीकडे आहेत ऑफिसर्सच्या खोल्या, मेस, अनेक प्रयोगशाळा, आणि स्टाफची ऑफिसेस. आणि डावीकडच्या खोल्यांमध्ये संगणक", व्यावसायिक सहजतेने पॅटननं उत्तर दिलं.

टॉर्गसननं चमकून विचारलं, "काय, अर्धी इमारत भरून संगणक? इतक्या संगणकांची गरज काय? इतके सगळे इथे आणणे खूपच खर्चिक असणार. माझ्याच चांद्रप्रवासाला लाखो डॉलर्स लागले. इतके संगणक म्हणजे ...".

"अतिखर्चिक." पहिल्यांदाच आवाजात नरमाई आणून पॅटन म्हणाला. "पण माझ्यावर विश्वास ठेवा, त्या सगळ्या गोष्टींची येथे नितांत आवश्यकता आहे."

पॅटनचं ऑफिस कॉरिडॉरच्या दुसऱ्या टोकाला होतं. काही न बोलता दोघं तिथपर्यंत गेले. कर्नलनं दरवाजा उघडला आणि ते दोघे आत शिरले.

"वा! प्रशस्त ऑफिस", टॉर्गसन म्हणाला, "आणि खिडकीसुद्धा!"

"हुद्द्याचा तो एक फायदा आहे", स्मित करून पॅटन म्हणाला, "क्षितिजाजवळ दिसणारा पांढरा ॲंटेना रशियन्सचा बरं का!"

"अच्छा. उद्या जाणार आहे मी त्यांनापण भेटायला."

पॅटननं मान डोलावली व टॉर्गसनला बसण्याची खूण करून आपणही लोखंडी टेबलापलीकडे जाऊन खुर्चीवर बसला.

पॅटन म्हणाला, "या अमेरिकन चांद्रतळावर येणारी तुम्ही अशी पहिली व्यक्ती आहात जिला ना संरक्षण खात्याकडून क्लीअरन्स आहे, ना अमेरिकन नागरिकत्व आहे, ना तुमची नोकरी अमेरिकन सरकारी आहे. खरं तर या तिन्ही गोष्टी असल्याशिवाय इथे येण्याची परवानगी मिळतच नाही. पेंटॅगॉनमध्ये तुम्ही कोणती कळ फिरवली कुणास ठाऊक. पण आलाच आहात, तर बोला, काय हवंय तुम्हाला?"

टॉर्गसनने आपला चश्मा काढून त्याच्याशी चाळा सुरू केला.

"सगळ्यात साधं उत्तर देणंच बहुदा योग्य होईल. युनायटेड नेशन्सला शोधून काढायचं आहे – कोणत्याही परिस्थितीत शोधायचं आहे की चंद्रावर तुम्ही आणि रशियन न भांडता, शांततेत कसे राहू शकता."

पॅटननं तोंड उघडलं, पण काही न बोलताच बंद केलं.

"अमेरिकन आणि रशियन," टॉर्गसन पुढे म्हणाला, "एकमेकांवर सगळीकडे हल्ले करतात. उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर, पृथ्वीभोवतीच्या कृत्रिम उपग्रहांवर, अगदी सगळीकडे. दोन्हींकडचे मुत्सद्दी युनायटेड नेशन्सच्या बिल्डींगमध्येही भांडतात."

"मला त्याची कल्पना नव्हती."

"हो तर. आम्ही ती गोष्ट बाहेर पडू देत नाही. पण सगळीकडे वातावरण अतिशय तापलेलं आहे. पृथ्वीवर सगळीकडे दोन्ही बाजू शस्त्रास्त्रांनी सज्ज आहेत. कधीही भडका उडेल अशी स्थिती आहे. अवकाशातही हल्ले सुरू असतात. आणि तरीही इथे चंद्रावर मात्र तुम्ही शेजारीशेजारी शांततेत राहता. हे कसं शक्य आहे हे आम्हाला कळायलाच हवं".

पॅटन हसला. "तुम्ही योग्य दिवस निवडलात. तुम्हाला कसं बरं सगळं समजावयाचं? हं, तुम्हाला माहीतच आहे की इथली परिस्थिती जाचक आहे. नगण्य वातावरण, कमी गुरुत्वाकर्षण ..."

त्याला मध्येच तोडत टॉर्गसन म्हणाला, "इथलं वातावरण कृत्रिम उपग्रहांवरच्या वातावरणापेक्षा जास्त प्रतिकूल नाही. उलट इथे थोडं तरी गुरुत्वाकर्षण आहे, जमीन आहे, इमारती आहेत. कृत्रिम उपग्रहांपेक्षा किती तरी पटीनं सुसह्य जीवन. तरीही कृत्रिम उपग्रहांवरदेखील युद्धं झाली आहेत - पण चंद्रावर नाही. युद्ध एखाद्या व्यसनासारखं असतं, सहजासहजी सुटत नाही. कृपया कमी गुरुत्वाकर्षण वगैरेंसारख्या फालतू गोष्टी सांगून तुमचा आणि माझा वेळ वाया घालवू नका. UNनं या सफरीवर खूप पैसा खर्च केला आहे. मला सत्य काय, तेच सांगा".

पॅटननं मान हलवली, "मी सांगणारच होतो. मी पृथ्वीतलावरून खातरजमा केली आहे की तुम्हाला व्हाईट हाऊस, नासा व पेंटॅगॉन या सर्वांनी क्लीअरन्स दिला आहे".

"तर?"

"ठीक तर. अगदी निखळ सत्य हे आहे की ..."

पॅटनच्या टेबलावरच्या एका छोट्या घड्याळाच्या नाजूक गजरामुळे त्याचं वाक्य अर्धवट राहिलं. "मला माफ करा."

टॉर्गसन खुर्चीत मागे सरकून बसला व कर्नल पॅटनच्या हालचाली पाहू लागला. पॅटननं टेबलावरच्या सर्व वस्तू पद्धतशीरपणे उचलल्या - घड्याळ, कॅलेंडर, फोन, कागदपत्रांचे ट्रे, तंबाखूची डबी, इत्यादी - आणि त्यानं त्या ड्रॉवरांमध्ये व्यवस्थित ठेवल्या. मग तो उभा राहिला आणि कपाटाकडे जाऊन त्यानं ते नीट बंद केलं. मग तो खोलीच्या मधोमध उभा राहिला आणि त्याने चारी बाजूंना दृष्टी फिरवली. पूर्ण समाधान झाल्यावर मनगटावरच्या घड्याळाकडे बघत तो टॉर्गसनकडे वळून म्हणाला, "चला पोटावर पालथे पडा."

"काय"?

"हे असं." असं म्हणून पॅटननं स्वत: त्या रबरी जमिनीवर साष्टांग दंडवत घातला.

टॉर्गसन त्याच्याकडे पाहत राहिला.

"चला, काही क्षणच उरले आहेत," असं म्हणत पॅटन उठला आणि टॉर्गसनचं मनगट धरून त्याला उठवलं. अविश्वासानंच टॉर्गसन ओणवा झाला व मग कर्नलच्या शेजारी आडवा झाला.

एक-दोन क्षण ते एकमेकांकडे काही न बोलता पाहत राहिले.

"कर्नल, हे अपमानास्पद ..."

अचानक खोली स्फोटांच्या अनेक आवाजांनी भरून गेली. काहीतरी – अनेक काहीतरी – भिंतींना छेदून आले. त्यांच्यावरील हवेत उष्ण वस्तू जात असल्यागत आवाज झाले. लोखंडी टेबलावर व कपाटावर काही कठीण वस्तूंचे आघात झाल्यासारखे आवाज झाले.

टॉर्गसननं डोळे घट्ट मिटले आणि जमिनीत शिरायचा प्रयत्न केला. कोणी गोळीबार करत असल्यासारखाच तो सर्व प्रकार होता.

अचानक सुरू झालं तितक्याच अचानकपणे ते सगळं बंद झालं.

एखादं चाक पंक्चर झाल्यावर होतो तसा आवाज सोडला तर कोणताही आवाज येत नव्हता. टॉर्गसननं डोळे उघडले, तेव्हा त्याला कर्नल उठताना दिसला. दरवाजा ढकलून तीन सार्जंट घाईघाईने आत आले. त्यांच्या हातात सिमेंटच्या ट्यूब आणि चिकटपट्टीच्या चकत्या होत्या. त्यांनी खोलीत फिरून भिंतीतील शेकडो छिद्रं पटापट बंद करायला सुरुवात केली.

जेव्हा ते सार्जंट्स नि:शब्दपणे भिंतीला ठिगळं लावायचं काम करत होते, तेव्हा त्या भिंतीकडे निरखून बघितल्यावर टॉर्गसनच्या लक्षात आलं की ती पूर्ण भिंतच ठिगळा-ठिगळांची बनल्यासारखी दिसत होती. आज झालेला प्रकार पूर्वीही अनेकदा झाला असणार.

हळूहळू उठून टॉर्गसन उभा राहिला आणि त्यानं कापऱ्या स्वरांत विचारले, "उल्का"?

कर्नल पॅटननं नकार दिला आणि टेबलामागच्या खुर्चीत पुन्हा स्थानापन्न झाला. टॉर्गसनच्या आता हेही लक्षात आलं की टेबलावर आणि कपाटावर अनेक पोचे पडले होते. त्याची दृष्टी खिडकीकडे वळताच पॅटन म्हणाला, "खिडकी बुलेटप्रुफ आहे". टॉर्गसन मान हलवून खुर्चीत बसला.

"इथलं जीवन तुम्हाला वाटलं होतं तितकं सुखावह नाही. रशियन्सबरोबर सध्या येथे शांततेत सहजच राहता येतं. आमच्याजवळ दुसरा पर्यायच नाही. आम्हांला तसं करावंच लागलं".

"त्या गोष्टी ... होत्या तरी काय"?

"गोळ्या".

"गोळ्या? पण कशा ...".

सार्जंट्सचं काम संपलं होतं. त्यांनी कर्नलला सॅल्युट ठोकला. कर्नलनंदेखील त्यांना सॅल्युट केला आणि मग सार्जंट्स शिस्तीत निघून गेले.

"कर्नल, मी पुरता गोंधळून गेलो आहे".

"हा प्रकार समजायला सोपा आहे, पण याने आश्चर्यचकित होण्याबद्दल फार वाईट नका वाटून घेऊ. पेंटॅगॉनमधल्या फक्त सर्वोच्च अधिकाऱ्यांनाच या प्रकाराची माहिती आहे. आणि अर्थातच राष्ट्राध्यक्षांना. त्यांना सांगावंच लागलं".

"झालं तरी काय?"

कर्नल पॅटननं आपल्या चिरुटात तंबाखू भरून सांगायला सुरुवात केली, "असं बघा, चंद्रावर रशियन आणि आम्ही नेहमीच शांततेत राहत नव्हतो. पृथ्वीवर होतात तशा चकमकी इथेही झाल्या".

"पुढे बोला."

कर्नल पॅटननं काडी उगाळून चिरूट पेटवला.

"आम्ही आमचा बेस उभा केला; त्यांनी त्यांचा. आणि मग आमच्यात तंटे सुरू झाले". पॅटननं हात झटकून काडी विझवली आणि उघड्या ड्रॉवरमध्ये टाकली.

"तुम्हाला माहीतच आहे की हे स्थान ओशियानस प्रोसेलारमवर आहे, बरोब्बर चंद्राच्या विषुववृत्तावर. चांद्ररुपी वायुविरहित मोठ्या दगडावरच्या सर्वांत मोठ्या पठारांपैकी हे एक.

ते इथे आधी आले म्हणून हा सर्व भाग त्यांचा असं रशियन म्हणू लागले. आम्ही म्हणालो की कायदेशीर मालकीहक्क अजून ठरलेला नाही कारण UN चार्टर आणि नंतरच्या ..."

"कायदेशीर तपशिलांत शिरू नका. झालं तरी काय"?

पॅटनला ते बोल थोडे लागले. "आम्ही एकमेकांवर गोळीबार सुरू केला. त्यांच्या एका सैनिकानं आमच्या एका सैनिकावर गोळ्या झाडल्या. अर्थात ते म्हणतात की आमच्या सैनिकानं आधी गोळीबार केला. पण २० मिनिटांत दोन्ही बाजूंची चांगलीच जुंपली होती. त्या तिथे, दोन्ही बेसच्या मध्ये". खिडकीकडे बोट दाखवून पॅटन म्हणाला.

"हवाविरहित जागी बंदुका चालवता येतात?"

"हो तर. बिनधोकपणे. पण एक वेगळंच संकट उद्भवलं".

"काय ते"?

"इतर युद्धांप्रमाणे काही सैनिकांनाच गोळ्या लागल्या. बाकीचे बहुतांश नेम चुकले".

"तर?"

पॅटन गंभीरपणे हसला, "आमच्या एका असैनिकी गणितज्ञानं सहज गणित मांडायला सुरुवात केली. अनेक हजार वेगवान गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. हवाविरहित जागी, घर्षणविरहित वातावरणात. आणि त्यात पुन्हा गुरुत्वाकर्षण नावालाच. गोळ्या त्यांच्या लक्ष्याच्या बाजूने थेट निघून गेल्या".

टॉर्गसनच्या चेहऱ्यावर तो प्रकार समजू लागल्याचे भाव उमटले, "अरे देवा".

"बरोब्बर. त्या गोळ्या सरळ जात राहिल्या डोंगरमाथे ओलांडून. इथल्या वक्रतेमुळे आणि चंद्राच्या छोट्या क्षितिजामुळे त्यांनी स्वत:ला अतिशय लंबगोल अशा कक्षेत स्थापन करुन घेतले. साधारण दर तासानं त्या पृष्ठभागाच्या सर्वांत जवळ येतात आणि दर २७ दिवसांनी तो बिंदू इथे असतो, जिथे त्या गोळ्या झाडल्या गेल्या. चंद्र स्वत:भोवती २७ दिवसांत फिरत असल्यामुळे असं होतं. तर अशा त्या जेव्हा येतात तेव्हा आमची पळापळ होते. अर्थात रशियन लोकांचीसुद्धा."

"पण तुम्ही ..."

"काय करणार? बेस हलवता येत नाही. त्याची परवानगी थेट वरून यावी लागेल, आणि तिथल्या लोकांचं एकमत होत नाही. खास रोधक द्रव्यं आणता येत नाही. कारण तसं करायला मनाई आहे. एकच करू शकतो आणि ते म्हणजे अद्ययावत संगणक वापरून सगळ्या गोळ्यांच्या कक्षांवर बारीक लक्ष ठेवणे. जेव्हा जेव्हा त्या बेसमधून जातात तेव्हा तेव्हा त्यांच्या कक्षा बदलतात – सामानावर आपटून, भिंत छेदून, इथल्या हवेमुळे. त्यामुळे संगणक पूर्ण वेळ व्यस्त असतात."

"अरे बापरे!"

"आणि अर्थातच अजून गोळ्या झाडायची हिंमत आमचीही नाही आणि रशियनांचीपण नाही. नाही तर संगणकांवरचा ताण वाढून सगळ्याच कक्षा हरवून बसू. मग थोड्या थोड्या वेळाऐवजी दर २७ दिवसांनी अनेक तास जमिनीवर पडून रहावे लागेल."

बधीर झाल्याप्रमाणे टॉर्गसन केवळ बसून राहिला.

"पण काळजी करू नका," आपलं व्यावसायिक हास्य परत आणून पॅटन म्हणाला, "माझी एक छोटी पलटण गुप्तपणे बेसच्या दुसऱ्या बाजूला – रशियन पाहू शकणार नाहीत अशा ठिकाणी – एक दगडी भिंत बांधते आहे. ती सर्व गोळ्या थांबवायला समर्थ असेल. मग त्या युद्धखोरांचा कायमचा समाचार घेता येईल."

टॉर्गसनचा चेहरा फिक्का पडला. पॅटनच्या ड्रॉवरमधून अस्फुट असा गजर झाला.

"पुन्हा लोटांगण घालायची तयारी करा. दुसऱ्या फैरीची वेळ झाली आहे."

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

- यात आफ्रिका कोठे आली?

- गोळ्या कक्षेत जातात, असे (suspension of disbelief वगैरे अंमलात आणून) तूर्तास जरी मानले, तरीसुद्धा, इमारतीच्या भिंती छेदण्यात, झालेच तर टेबलांवर नि कपाटांवर आदळण्यात, किंवा अगदी त्या बुलेटप्रूफ काचेवरून ricochet होण्यात वगैरे) त्या गोळ्यांच्या गतीत फरक पडणार नाही काय? विशेषेकरून, इमारतीच्या भिंती छेदताना, छेदल्या जाणाऱ्या भिंतीच्या रोधामुळे, त्यांची गती कमी होणार नाही काय? (इतरही आदळाआदळीत मला वाटते काही अंशी का होईना, परंतु transfer of energy वगैरे होऊन गती थोड्याफार प्रमाणात कमी होऊ शकेल. कदाचित तिचे प्रमाण खूपच कमी असेल, किंवा आदळआपटीच्या परिणामी गती कमी होण्याच्या तुलनेत गतीची निव्वळ दिशा बदलण्याचे प्रमाण अधिक असेल; कोणास ठाऊक!) (टीप: गोळीवर गोळी आदळण्याची दूरदर्शनरामायणी शक्यता नगण्य मानून तिचे परिणाम येथे जमेस धरलेले नाहीत.) आणि मग, अशा प्रकारे गती कमीकमी होत गेल्यावर, तोवर कदाचित केवळ गोळीला कक्षेत ठेवण्यात खर्ची पडणाऱ्या चंद्रावरच्या (पृथ्वीच्या एकषष्ठांश का होईना, परंतु) गुरुत्वाकर्षणाचा अंमल चढू लागून, गोळी खाली पडून out of commission होणार नाही काय? अगदी ‘अनेक हजार गोळ्या’ जरी म्हटले, तरी अशा असूनअसून किती गोळ्या असणारेत? कधी ना कधी संपणारच!

- “त्या गोळ्या सरळ जात राहिल्या डोंगरमाथे ओलांडून.” चला, मानले. याचा अर्थ एवढाच, की गोळीबार जेथे झाला, तेथे गोळ्यांना अडविण्याकरिता पुरेसा उंच डोंगरमाथा नाही. ठीक आहे. “ इथल्या वक्रतेमुळे आणि चंद्राच्या छोट्या क्षितिजामुळे त्यांनी स्वत:ला अतिशय लंबगोल अशा कक्षेत स्थापन करुन घेतले. साधारण दर तासानं त्या पृष्ठभागाच्या सर्वांत जवळ येतात…” चला, हेही मानले. (तेच ते, suspension of disbelief!) परंतु मग, पृष्ठभागाच्या तितक्याच जवळचा दुसरा बिंदू चंद्राच्या विरुद्ध टोकावर असणार, त्याच्याही जवळपास पुरेसा उंच डोंगरमाथा नाही… Suspension of disbeliefचा भाव थोडा जास्तच वाढू लागला आहे, परंतु तूर्तास हेदेखील चालवून घेऊ. “… आणि दर २७ दिवसांनी तो बिंदू इथे असतो, जिथे त्या गोळ्या झाडल्या गेल्या.” म्हणजे इतर वेळी हे बिंदू चंद्रावर वेगवेगळ्या ठिकाणी असतात. इतक्या ठिकाणांपैकी कोठेच पुरेसा उंच डोंगरमाथा सापडू नये, म्हणजे… योगायोग अंमळ जास्तच होऊ लागलेला नाही काय? या हिशेबाने उद्या जर कोणी मला “चंद्राचा पृष्ठभाग सर्वत्र सरसकट सपाट सखल गुळगुळीत आहे, त्यावर अजिबात चढउतार नाहीत” म्हणून जरी सांगितले, तरी त्यावर विश्वास ठेवायला मी तयार आहे. “चंद्रावर खड्डे असतात” ही अफवा ज्याने कोणी पसरविली, त्याच्याविरुद्ध चंद्राने अब्रूनुकसानीची फिर्याद दाखल केली पाहिजे!

- “ खास रोधक द्रव्यं आणता येत नाही. कारण तसं करायला मनाई आहे.” का म्हणे? (आणि, ती बुलेटप्रूफ काच काय आहे मग? किंवा, त्या बांधू घातलेल्या भिंतीचा दगड?)

- चंद्रासारख्या वातावरणरहित ठिकाणावरचा बेस आहे, म्हटल्यावर बेसवरील लोकांना श्वासोच्छवास करण्याकरिता लागणारी हवा ही पृथ्वीवरून (नळकांड्यांतून?) आयात केलेली अत एव दुर्मिळ / मर्यादित पुरवठ्यातील असणार. अशा परिस्थितीत तेथे धूम्रपान करून तेही तेथील एक वरिष्ठ अधिकारी तिचा अपव्यय करतो? अगदी अमेरिकन बेस झाला म्हणून काय झाले, इतका बेजबाबदारपणा?

- मुळात चंद्रावरील बेसवर जाताना (ऑफ ऑल द थिंग्ज़) बंदुका कोण कशाला घेऊन जाईल? चंद्रावरल्या सशाची शिकार करायला? नासामध्ये हल्ली सेकंड अमेंडमेंटवादी मूर्खांचा भरणा होऊ लागला आहे काय? (आणि रशियनांचे काय?)

एकंदरीत, अधिक विचाराअंती, ष्टोरी well-formed वाटली नाही. किमान त्या बेसच्या इमारतीच्या भिंतीइतकीतरी भोके आहेत.

अर्थात, चालायचेच.

——————————

हे विशेषण सामान्यतः stoolच्या संदर्भात वापरले जाते, हा निव्वळ योगायोग नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0