'लिहावे नेटके' या पुस्तकातील काही मजेदार किस्से (भाग – १)

लहान मुला-मुलींना मराठी व्याकरण शिकविण्यासाठी लिहावे नेटके हे पुस्तक माधुरी पुरंदरे यांनी लिहिलेले आहे. व्याकरणातील नाम, सर्वनाम, कर्ता, कर्म, क्रियापद, विशेषण, लिंग, वचन, अव्यय, अनुस्वार, शिरोबिंदू, अल्प विराम, अर्धविराम, लब्यंत (?) सारख्या संकल्पनाबद्दल सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी भरपूर उदाहरणं, चित्रं, स्वयंपाठ इत्यादी असलेलं हे पुस्तक आहे. या व्याकरणातील संकल्पनापेक्षा त्यांनी निवडलेली उदाहरणं किती मजेशीर आहेत, हे पुस्तक वाचताना लक्षात येईल. उदाहरणादाखल दिलेले काही परिच्छेद वाचत असताना आपल्याला बालपणाची आठवण नक्कीच येईल. मुलांची कल्पनाशक्ती किती आनंददायी असू शकते याची कल्पना येईल.

आपल्याला जे म्हणायचे आहे ते जास्तीत जास्त परिणामकारक पद्धतीने आणि नेमकेपणाने म्हणता येईल अशी वाक्यरचना असावी; शब्दांची निवड अचूक असावी; त्यातून नेमका अर्थ कळावा; आपले बोलणे दुसऱ्याला ऐकावेसे वाटावे असे रेखीव आणि नेटके असावे हे निकष लावल्यास हे किस्से त्यात चपखल बसतील. आपल्या जीवनात हरघडी येणाऱ्या अनुभवांना शब्दबद्ध केल्यास त्या ताजेतवाने होऊन आपल्याला गुदगुल्या केल्यासारखे हसवत राहतील. उदाहरणार्थ हा प्यारा वाचाः

भाषेचा एवढा बाऊ का करायचा?

मुळात भाषेचा एवढा बाऊ का करायचा, त्याबद्दल एवढा कसला विचार करायचा असे अनेकांना वाटत असते. काहीही म्हणायचे झाले, की त्याच्या जवळपासचा अर्थ असणारे शब्द घ्यायचे त्या शब्दांची मोट बांधून कसे तरी वाक्यरचना करून बादलीतून पाणी ओतल्यासारखे बदकन टाकून मोकळे होतात. भाषा सौंदर्याचा अजिबात विचारही केला जात नाही. सरसकट सगळा मामला अत्यंत ढोबळ, वरवरचा व काही वेळा अगम्य असतो. शब्दांचे खेळ समजत नाही, शब्दामागे दडलेले अर्थ पोचत नाहीत, चांगला विनोद समजत नाही; मग आपण नको तिथे टाळ्या वाजवतो, नको तिथे हसतो, पण जिथे हसू यायला हवे तेथे आपली गाडी थांबतच नाही. कविता दुर्बोध वाटते, त्याची सुसंबद्धता, लय कळत नाही. साध्या गोष्टींची ही तऱ्हा तर गुतागुंतीच्या अवघड विचाराबद्दल, नवीन कल्पनाबद्दल विचारायलाच नको अशी स्थिती असते. हीच सवय लिहितानासुद्धा जाणवते. दोन ओळीची चिठ्ठी लिहायची तरी दहा वेळा खाडाखोड व 8-10 व्याकरणाच्या चुका. असो.
क्लासमधला एक किस्साः
पाचवी ते सातवीपर्यंत आम्हाला गायन शिकवायला मांडकेबाई होत्या. नवे वर्ष सुरू झाले, की पहिल्या तासाला प्रत्येक वर्गाला एक किस्सा त्या हटकून सांगायच्या.
“'मला लहानपणापासूनच गाण्याचं भारीच वेड, बरं का! चोवीस तास गाण्याचेच वर कानात घुमत असायचे. दुसरं काही ऐकू यायचं नाही न्‌ समजायचंही नाही. सहावीत होते, तेव्हा मराठीच्या तासाला आमच्या सरांनी विचारलं, “भाषेत स्वर कोणते असतात? कोण सांगेल?”. माझ्या कानात 'स्वर' एवढाच शब्द शिरला. बसल्या बाकेवरच नाचत हात वर करून मी ओरडले, “सर, मी! मी!”. वर्गात कधी तोंड न घडणारी मी अशी नाचताना बघून सगळा वर्ग आणि सरही चकित झाले. मग म्हणाले, “बरं, सांग. सगळे स्वर नीट ओळीनं म्हणून दाखव”. मी उभी राहून ऐटीत “साSSरेSS गSSSमSS... आळवायला सुरुवात केली. नतर जे काही झालय, ते मी जन्मात विसरले नाही न्‌ विसरणार नाही. सरांनी माझा कान पकडून वेगवेगळ्या दिशांना असा काही पिळलाय, की माझ्या तोंडातून “अSS, आSS, इSS, ईSS, उSS...” असे मोजून बारा स्वर आपसूक बाहेर पडले. बाकीच्या मुली खिदळत होत्या आणि एका सुरात माझी नक्कलही करत होत्या. सर म्हणाले, “कळलं, भाषेतले स्वर कोणते ते?' अशी झाली गंमत!”' किस्सा सांगून झाला, की बाई स्वतःच खूप हसायच्या. शाळेत त्या असेपर्यंत मुलींना संगीतातले स्वर किती कळले ते माहीत नाही; पण भाषेतले स्वर मात्र - कुणीही कान न पिळता – छान कळले होते.
अजून एक अनुभव
मास्तरांचं सगळं वेगळंच होतं. त्यांच्या बोलण्याचा ढंग कानडी वळणाचा होता. तो मजेदार असला, तरी आम्हाला आवडत असे.वर्गातल्या सर्वांत जास्त मार्क मिळवणाऱ्या नव्हे, तर तव्हेतऱ्हेचे उपद्व्याप करणाऱ्या मुलाला ते खडूची एक कांडी बक्षीस देत. श्रावणात दर सोमवारी ते सगळ्या मुलांना तळ्याकाठच्या शंकराच्या देवळात घेऊन जात आणि देवळाची, परिसराची साफसफाई करायला लावत. तिथला नंदी अजस्र, पण देखणा होता. देवळाच्या पुजाऱ्याकडचं एखादं भांडं घेऊन मुलं तळ्यातून पाणी भरून आणत आणि नंदीला अंघोळ घालत. त्याचा काळाकुळकुळीत रंग श्रावणातल्या सोनेरी उन्हात लकाकत असे. ही स्वच्छतामोहीम उरकली, की मुलं कपडे काढून तळ्यातल्या पाण्यात मनसोक्त डुंबत. मास्तर काठावरूनच त्यांना पोहण्याचे धडे देत. या उद्योगात शाळेचा एखादा तास बुडाला, तरी मास्तरांना त्याची चिंता नसे. पुढे एका
अभ्यासू मुलाच्या पालकांनी तक्रार केल्यामुळे त्यांची नोकरी गेली.
आज्ञाधारकपणाचा कळस
वाचनाच्या तासाला ग्रंथालयातून आणलेली पुस्तके परत नेऊन देण्याची जबाबदारी सुधन्वाची होती. तास संपल्यावर त्याने स्वत:च सगळी पुस्तके क्रमाने तावली. आता ती लहान गड्डे करून पोचवायची की नाही? हा ऐटीत सगळ्या पुस्तकांचा मनोरा करून हातांवर तोलत निघाला आणि समोरून येणाऱ्या आमोदला धडकला. मग काय! पुस्तके अशी अस्ताव्यस्त पडली.
फक्त कृतीतूनच नव्हे तर बोलण्यातूनसुद्धा!
“सSमSपSदाSS, दहा मिनिटाSनSमध्ये चSनSदाच्या अSङSगणात येSS, नाही तर राज्य घ्यावं लागेSS लS! शेजारच्या वाड्यातून सुचाने आरोळी दिली.
“आलेSSS! माझ्यासाठी थाSमSबाSS!'' संपदाने उत्तर दिले आणि ती पुढ्यातली इडली बकाबक तोंडात कोंबायला लागली. “ऊंSSS! आई, साSमSबार किती गं आSमSबट! आणि इडली थSणSड झालीये... !'' ती कुरकुरली.
“आण, गरम करून देते,'' आई म्हणाली.
“नकोSSS, मला उशीर होतोय! कालचा आSनSSधळी कोशिमSबिरीचा डाव अर्धवट राहिलाय.”
“रात्री जेवायला काय करू?'' आईने विचारले.
“अंSSS, अSणएड्याची आमटी... नाही तर पुडिSङग! करशील?”
“आधी नीट बोल. हे काय चाललंय तुमचं कालपासून? काही तरी फ्याडं काढतात एकेक!''
“आम्हाला गSममत वाटते. करशील ना?'' तोंडातला शेवटचा घास कसाबसा गिळत संपदा उठली आणि पायांत चपला सरकवत ओरडली, '“आणि आजोबाSनSना माझी हिSनSदीची वही तपासून ठेवायला साSङSगS! मी पळतेSS!”
लहानांची निरागसता
"माझं घर ना, एवढे... नाही, एSSवढं उंच आहे.'' ती मुलगी चवड्यावर उभी राहते आणि ताणून ताणून हात उंच करत घराची उंची दाखवते.
“घर उंच असलं की काय होतं?” मी विचारतो.
“पावसाचा ओलाओला ढग छपरावर राहायला येतो. त्यातून पाण्याचे काचेसारखे मोठ्ठे थेंब पडतात. मी ते गोळा करते, माळेत ओवते आणि माझ्या खिडकीवर तोरणासारखे बांधून टाकते. सकाळी वारा येतो. थेंबांची माळ हलते आणि तिच्यातून किण्‌ किण्‌ किण् आवाज येतो. मग मी जागी होते.''
“अरे वा! आम्हालाही तुमच्या या घरात यायला आवडेल,” मी म्हणतो.
“आमच्या उंच घरात यायचं, तर आमच्याएवढं छोटं व्हावं लागतं. तुम्ही तर केवढे मोठ्ठे आहात!” ती खऱ्याखुऱ्या ' काळजीच्या सुरात म्हणते, “तुम्ही मोठे कशाला झालात? म्हणूनच अशी शिक्षा मिळते.'*
“आमची चूकच झाली,'” मी अपराध्यासारखे म्हणतो आणि कान पकडतो.
मग तिला मनापासून हसू येते.
अजून एक उदाहरण….
मी दोन वर्षांची असताना पहिल्यांदा रस्ता चुकले. पोलीसाशी माझी, किंवा खरे तर माझ्याशी पोलिसाची गाठ पडण्याची ती पहिलीच वेळ होती.
“तू राहतेस कुठं, बाळ?”' त्याने मला विचारले.
“मी घरात राहते. ''
“हो का! आणखी कोण राहतं तुमच्या घरात?”
“बाबा राहतो, आई राहते....''
“अरे वा! छान! आणि आजोबा, आजी....''
“ते देवाच्या घरी राहतात.... तिकडे, आकाशात... आणि बाळ आहे, पण ते घरात नाही, पाळण्यात राहतं.''
“हंSS! मला सांग, तुम्ही बंगल्यात राहता का? की फ्लॅटमध्ये ?''
“च्यक्‌! आम्ही घरात राहतो. तू कुठे राहतोस?''
“मीसुद्धा घरातच राहतो, तुझ्यासारखं! दे टाळी!?'
मी त्याच्या हातावर सणसणीत टाळी दिली आणि आम्ही दोघेही मोठ्ठ्याने हसलो.
तो माझा पहिला पोलीस मित्र.
लहानांची कल्पनाशक्ती!
आपण काढलेल्या चित्राकडे तो छोटा मुलगा गंभीर होऊन पाहत होता.
मी त्याला हळूच विचारले, “हे काय आहे?''
मुलगा म्हणाला, “ही जमीन आहे, हे आकाश आहे, हे ढग आहेत आणि ही झाडं आहेत. ''
“'उलटी?''
“हं, वादळ झालंय. वादळात सगळं उलटं होतं ना! या झाडाच्या फांदीवर ही खार आहे. तीपण उलटीच आहे. आता ती घरी कशी जाणार?”
“का??'
“तू बुद्धू आहेस. तुला काहीसुद्धा कळत नाही,” मुलगा हताशपणे मान हलवून म्हणाला. “तिचं घर जमिनीमध्ये आहे, पण ती झाडावरून उतरायला गेली की आकाशातच जाते आहे.''
“ओः! मग तुम्ही झाड सरळ करणार आहात का?”
मुलगा गाल फुगवून तक्रारीच्या सुरात म्हणाला, “आम्ही लहान आहोत ना अजून! आम्हाला कसं जमणार झाड सरळ करायला?''
“मग आता?”
“आम्ही आगीच्या बंबाची वाट पाहतो आहोत....''
लहानांची लेखनशैली!
माझी बहीण गिरिजा
माझ्या बहिणीचे नाव गिरिजा आहे.
गिरिजाला सगळे जण लाडूमाई म्हणतात.
कारण गिरिजा सगळ्यांची लाडकी आहे आणि लाडूसारखी गोल आहे.
गिरिजाला अजून चालता येत नाही.
गिरिजा रांगत गोठ्यात जाते. तिथे छोटे वासरू आहे. गिरिजा वासराचा पापा घेते.
गिरिजा माझी लाडकी बहिण आहे.
- सतीश तुकाराम बांदल
कट्टी फू करण्यासाठी कुठलेही कारण चालू शकते…
इतक्या लहान मुलांना सांभाळण्याची ती माझी पहिलीच वेळ होती. थोडा वेळ बरा गेला; पण नंतर त्या भावंडांचे काय करावे ते मला कळेना. मग मी सहजचं म्हणालो, “गाणं म्हणून दाखव ना!”
हा प्रस्ताव मुलाला फारच पसंत पडला. त्याने गाणे म्हटले.
“'मला कवितादेखील येते,'' तो म्हणाला. मग त्याने कविता म्हटली. आता त्याला
चेवच चढला होता; पण त्याच्या बहिणीने त्याला थांबवले.
“आता तू!'' ती मला म्हणाली.
“मी? मला नाही येत काही.''
“खोटं! 'मी तुमच्यापेक्षा हुशार आहे,' असं तूच मघाशी म्हणालास. आम्ही कशी
पटापट गाणी म्हटली, कविता म्हटल्या, पाढे म्हटले. आता तू काही म्हटलं नाहीस
तर...”
“'कट्री!'' करंगळी पुढे करून दोघेही एका सुरात म्हणाले.
बोलताना किती घोळ होऊ शकतात याचा एक नमूना
““काल मॅच बघायला का आली नाहीस? मी सगळीकडे शोधलं, पण तू कुठेच दिसली नाहीस.''
“मी काल कुठेच गेले नाही. बाबा पाशाला शोधायला गेला, म्हणून घरीच थांबले.''
“पाशा? तुमच्याकडे कुत्रा आहे?!'
“बोका. खूप शोधलं, पण सापडला नाही. काल रात्री आम्ही कुणीच जेवलो नाही.''
“तुम्ही पोलिसांत तक्रार दिली नाहीत का?”'
“ब्रोक्याला शोधायला पोलीस? त्यांना दुसरे उद्योग नाहीत की काय?”
आज्ञाधारकपणा
“काकूS तुमचं पुस्तकं! तुम्ही ताईला दिलं होत ना! तिला वाचायला वेळ नाही म्हणून तिनं परत दिलंय,'' छोटा अक्षय अंगणात पायरीशी उभा राहून म्हणत होता.
.__ “अगोबाई, अक्षय! इतक्या पावसात तुला कशाला पाठवलं तिनं? मला पुस्तकाची घाई नव्हती,'' दरवाजा उघडत आई म्हणाली. एका हातात भलीमोठी काळी छत्री आणि दुसऱ्या हातात पिशवी, असे अक्षयचे ध्यान बघून तिला हसूच आले.
“आत ये अगोदर,” ती म्हणाली.
“नको. पायांना चिखल लागलाय,'' अक्षय म्हणाला आणि त्याने एक पाय वर उचलून दाखवला. चपलेला चिकटलेली चिखलाची ढेकळे बघण्यासाठी त्याने मान वाकडी केली आणि त्याचा तोल गेला. त्याच्याहून जड छत्री त्याला घेऊन धपकन खाली पडली.
“काकूSS” , शर्टाला आणि चड्डीला आणि... आणि .पुस्तकालापण चिखललागला... !'' तो रडवेला होऊन म्हणाला. आई हसत हसत त्याला उचलायला धावली
नाट्यक्षेत्रातील मंडळींसाठी
मी तेव्हा सात-एक वर्षांचा असेन. कुणाच्या तरी मंगळागौरीच्या जागरणाच्या निमित्ताने आळीतल्या उत्साही मुलींनी आम्हा लहान मुलांचे नाटक बसवायचे ठरवले. त्यात राजपुत्र, राजकन्या, राक्षस वगैरे नेहमीचाच मसाला होता. आमच्या वयाला अजिबात न झेपणारी त्याची भाषा होती. पण समजत नसलेले शब्द घडाघडा म्हणण्यातही मजा असते, तशी मजा आम्हाला येत होती. राजपुत्राला संवादच नव्हते. त्या मानाने अख्खी दोन वाक्ये वाट्याला आलेली साधूची भूमिका मला मिळाल्यामुळे मी खूष होतो.
पहिलीच तालीम प्रत्यक्ष प्रयोगापेक्षा जास्त संस्मरणीय ठरली. माझे वाक्य होते : “राजकन्येS, राजपुत्राच्या आठवणीनं तू झुरू नकोस. तो तुला लवकरच भेटेल, असा मी आशीर्वाद देतो.”राजकन्या झालेली समोरच्या वैद्यांची मधुरा मख्ख चेहेऱ्याने माझ्याकडे बघत होती. मागून प्रतिमाताई कुजबुजत होती, “हं, टिंबू... म्हण, राजकन्येS,... राजपुत्राच्या आठवणीनं....'' तिचे दोन-तीनदा ऐकून घेतल्यावर मी एकदम मधुरावर ओरडलो, “अगं, झूर ना! त्याशिवाय मी 'झुरू नको
असं कसं म्हणणार?” यावर हसण्याचा असा काही स्फोट झाला, की मधुरा घाबरून रडायलाच लागली.
माझ्या संवादात ह्या वाक्याची भर घालण्यात आली. प्रत्यक्ष प्रयोगात तर सगळ्या बायकांनी मला तो पुन्हा म्हणायला लावला. राजकन्येला झुरण्याची आज्ञा देण्याची कल्पना एकदम सुपरहिट झाली. तेव्हापासून मलाच चित्रविचित्र आज्ञा करण्याचा सगळ्यांना छंद जडला. मी रुसलो की. “टिंब्या, फूग ना!'. स्वस्थ बसलो की, 'थोडा चुळबूळ रे!” बारकी पोरिसुद्धा रस्त्यातून जाताना 'ए टिंब्यादादाS, खिडकीतून ढुंक ना जरा!' म्हणून ओरडत. असे मी कॉलेजला जायला लागेपर्यंत चालू राहिले.
उपद्व्यापी मुलं...
बोलताना बोलून बोलायला बोलायचे तर बोलू बोलता बोलत बोलावे...
श्रावणचे उपद्व्याप हा त्याच्या आई-बाबांच्या वादाचा विषय आहे. त्याला सगळे करायचे असते. म्हणजे बाबांच्या गँरेजमध्ये गाड्यांची दुरुस्ती करायची असते आणि हात बरबटायचे असतात, एकट्याने बाजारात जायचे असते, फ्यूज गेला तर तो बदलायचा असतो.... आईच्या बरोबरीने पोळ्या लाटायला तर त्याला भयंकर आवडते.
“करू दे गं त्याला. असं करत करतच शिकेल तो,'' बाबा म्हणतात.
“तर तर! पण एक करताना माझ्यासाठी दहा कामं वाढवून ठेवतो त्याचं काय?”' आई वैतागून म्हणते. नंतर तिलाच सगळे निस्तरावे लागते ना!
परवाचीच गोष्ट. आई पापड भाजत होती. “आई, मला भाजू दे ना!'' असे म्हणत श्रावणने तिच्या हातातून पापड घेतला. त्याला चिमटा वापरायचा नव्हता. आई हातानेच पापड भराभर फिरवते आणि उलटापालटा करते, तसे करायचे होते. मग व्हायचे होते तेच झाले. श्रावणने त्या खटपटीत हात पोळून घेतला आणि पापडही जळून गेला. नंतर तासभर तो रडत बसला होता.
बालपणातील फुटकळ आठवणी....
आठवते तुला? आपले सगळे बालपण त्या चिंचेच्या अवतीभोवती गेले. किती तरी गोष्टींची पहिली ओळख तू मला तिथेच करून दिलीस. एक दिवस तू चिंचेची कोवळी आंबट्ट फुले गोळा केलीस.
“खा!” माझ्यासमोर त्या फुलांची ओंजळ धरून तू म्हणालास.
“'फुलं खायची?'' मी विचारले.
“खा रे! मस्त लागतात.”
मी तुझ्याकडे संशयाने बघितले. मग बिचकतच एक छोटेसे फूल घेतले, जिभेवर ठेवले आणि धीर करून खाल्ले. माझ्या अंगावर एकदम काटा आला; पण फुलाची चव मला आवडली. तुझा हेवाही वाटला. वाटले, ह्यालाच कशा ह्या गोष्टी माहीत असतात?
एकदा तिन्ही सांजेला चिंचेखाली मी तुला शोधत होतो. तू एकदम धपकन माझ्या पुढ्यात उडी मारलीस आणि हसत सुटलास. मी कमालीचा भ्यायलो आणि आल्या पावली उलटा घराकडे पळालो. माझा चेहरा बघून आईने खूप खोदून विचारले; पण मी माझी फजिती तिला सांगितली नाही. आज फुटकळ वाटणाऱ्या अशा आठवणीही मनात रुतून राहिल्या. मग आपण मोठे झालो. बालपण कायमचे टिकायचे नव्हतेच. अत्तराचा सुगंध हवेत उडून जावा तसे ते उडाले. नाहीसे झाले
डायरीतील एक पान...
काल मी अश्वीनला इतिहासाची वही दिली, पण आज तो मला ती परत दिला नाही. अश्वीन नेहमी असा करतो. संध्याकाळी अण्णा माझ्यासाठी भोवरा आणले. मी दिन्याला भोवरा खेळायला शिकवलो. आणि हातावर झेललो. शेजारची पियू बाल्कनीत होती. ती मला विचारली, “घोडकेबाई फार रागीट आहेत ना रे?” आणि हसली. मी राग आलो, पण काही नाही बोललो. रात्री अण्णा शाळेबद्दल विचारले. अभ्यासाची चौकशी केली. मी अश्वीनची तक्रार केली, पण बाई मला शिक्षा केल्या ते नाही सांगलो. माझे अण्णा फार कडक आहेत.
कट्टी फू केलेल्या मैत्रिणीस...
रागावलेल्या माझ्या मैत्रिणीस,
चिमणीच्या दातांनी वाटून खाल्ली, ती आंबट-गोड करवंद विसरू नकोस.
उतू नकोस, मातू नकोस, मैत्रीचा वसा टाकू नकोस,
भांडू नकोस, तंडू नकोस, जिंकू नकोस न्‌ हरूही नकोस.
गालाची खळी हरवू नकोस, साखरेचं हसू घालवू नकोस,
रडू नकोस, चिडू नकोस, माझ्याशी गट्टी तोडू नकोस.
- अश्विनी
इंग्रजी शाळेतील मराठी...
मी सकाळी ७ वाजता उठतो.
मी ७.३० वाजता अंघोळतो.
नंतर मी खोली स्वच्छतो.
९ ते ११ मी मराठी अभ्यासतो.
नंतर मी मुलांना इंग्रजी शिकवतो.
१ वाजता मी स्वयंपाकतो, जेवतो.
आणि दुपारी मी आरामतो.

क्रमशः

field_vote: 
0
No votes yet