A Midsummer Night's Dream

A Midsummer Night's Dream
संध्याकाळचे पाच वाजले कि माझी पाउलं शेट्टीच्या हॉटेलकडे वळतात. शेट्टीच्या हॉटेलमध्ये माझे एक खास टेबल आहे. शेट्टीला हे माहित आहे. मी येईपर्यंत तो त्या टेबलावर रिझर्वडची पट्टी लावून ठेवतो. त्या टेबलावरून मला रस्त्यावरची रहदारी पहायला आवडते. तसेच हॉटेलात बसलेल्या काही लोकांचेही दर्शन होते. त्यांना पाहून विचारांची गाडी स्वैर धावू लागते. किती शिकला असेल, कुठे नोकरी करत असेल, आपल्या आयुष्यात हा सुखी समाधानी असेल का?
ह्या विचारांना काही अंत नाही.
त्या दिवशी आकाशात ढग आले होते. पाउस पडण्याची लक्षणे होती. त्यामुळे हॉटेलात गर्दी नव्हती. माझ्या पलीकडच्या टेबलापाशी एक पंचेचाळीस पन्नास वर्षांचा इसम लॅपटॉप खोलून बघत होता. दीज पीपल! जेथे जातो तेथे आपल्या लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसलेले असतात. लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसलेल्या लोकांबद्दल मला प्रचंड आदर आहे. अशा लोकाना मी निवडून खड्यासारखे माझ्या विचारांच्या मर्यादेबाहेर ठेवतो,
इतक्यात तो आला. रॉयल एन्फील्डच्या इंजिनचा आवाज वेगळा असतो. त्याने गाडी पार्क केली आणि तो हॉटेल मध्ये आला. चाल भरदार आणि दमदार. वर्ण गोरा, नजर तीक्ष्ण. शरीरयष्टी कमावलेली. तरीपण किंचित, अगदी किंचितशी नाजूकतेची झाक.
हा हीरो थोडा विवंचनेत दिसत आहे. माझं विचारसत्र सुरु झाले. काय असावा ह्याचा प्रॉब्लेम?
वेटर एक चक्कर टाकून गेला. मेन्यू कार्ड समोर ठेऊन उभा राहिला.
“थोडं थांब.”
वेटर समजला. “बहुत अच्छा.”
एक लक्षात घ्या. ते काय बोलत आहेत ते मला ऐकू येत नव्हते. मी आपले एकूण त्यांच्या हावभावा वरून देहबोलीवरून, चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशंस वरून, लिप रीडिंग करून हे संवाद लिहिले आहेत.
तुम्ही चार्ली चाप्लीन, जाड्या रड्या ह्यांचे मूकअभिनय बघितले असतीलच. कधी तुम्हाला सलीम जावेदची आठवण झाली?
सिनेमा म्हणजे डायलॉगबाजी नव्हे. कल्पना करा. ऑफिसमध्ये मर मर काम करून नवरा जेवणाच्या वेळेपर्यंत कसाबसा घरी पोहोचला आहे, ऐका त्याचा हा डायलॉग.
“ऐ गुलबदन, लाल छडी, किचनमे खडी, मेरे दिलकी राणी. भगवती प्राणेश्वरी चल वाढ. जळकी पोळी, अर्धाकच्चा भात, पातळ वरण, गोSSSड तिखट जे काय केले आहेस ते वाढ. बडी जोरकी भूक लगी है.”
ह्यावर बायको पण एक सज्जड डायलॉग देते आणि पतीचा जो उद्धार करते. तो ऐकून मेलेले डुक्कर पण म्हणेल, “शिव शिव, हेच ऐकायचं राहीलं होतं. ह्याच साठी मी मेलो होतो का?”
चला बॅक टू हॉटेल अँड अवर स्टोरी.
अखेर ती पण आली. सडपातळ, गोरी, नाकेली. फिकट आकाशी रंगाचा ड्रेस. चेहऱ्यावर दुःखाची किंचित छटा. अगदी निरखून बघणाऱ्याला दिसेलशी. .नो मेक-अप. म्हणजे मेक-अप असा कि मेक-अप केला नाहीये असे वाटावे.
पर्स बाजूला ठेवून ती त्याच्या समोर बसली
“अच्छी सूरतको मेक-अपकी जरुरत क्या है|
सादगीमेभी कयामतकी अदा होती है|”
“काय घेणार? चहा घेशील?”
ती मानेनच नकार देते.
“अगं, आलीच आहेस तर काहीतरी घे. कॉफी घेशील?”
तिचे हो किंवा नाही काहीही नाही. हाच होकार समजून त्याने ऑर्डर दिली.
“दोन कॉफी,”
“हॉट कि कोल्ड?”
“हॉट. हॉट.” कोल्ड कशाला? माझ्या नशिबाची कोल्ड कॉफी तर समोर बसली आहे.
हे त्याचे स्वगत होते पण मला स्वच्छ ऐकू आले.
त्याने कर्दळीच्या पानात बांधलेला मोगऱ्याचा गजरा समोर ठेवला. तिने हलक्या हाताने बाजूला सारला. भलतीच दुखावलेली दिसतेय! गजरा नाकारते आहे. ह्या स्त्रिया!
“आता आज अजून का बोलावले आहेस?”
“मला काही बोलायचे आहे.”
“मिस्टर अनि जोशी, तुम्हाला बोलायचे असेल पण मला ऐकायचे नाहीये.”
काही दिवसापूर्वी ही मला “अरे अन्या” असं म्हणायची. तो मनातल्या मनात.
“सुलू, तुला माहित आहे कि माझे तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे.”
“ये बात! हे तुझ्या परमप्रिय मित्राने म्हणजे त्या चालू बेवड्या पक्याने लिहिलेले डायलॉग मला ऐकवतो आहेस का? त्यानेच सांगितलं असणार कि अशी ओपनिंग कर. हो ना?
त्याला सांग की कुठे मराठी तमाशा मध्ये सोंगाडयाचा पार्ट मिळतोय का बघ. स्वतः पैसे कमाव. दुसऱ्यांच्या खिशाला जळू सारखा चिकटू नकोस. माझ नाव घेऊन बिंदास सांग.”
मला हसू आवरात नव्हते. पण कष्टाने दाबून धरले. सुलूचे वाक्ताडण संपलं नव्हते.
“अच्छा आणि त्या छान छबेली मोनिकासाठी काय डायलॉग लिहिले आहेत पक्याने? “मोनिका माय डार्लिंग, आय लव यू.” ए, तिच्याशी तुला इंग्लिशमध्ये बोलावे लागत असेल नाही का? मिस्टर जोशी, तुझे नूमवि इंग्लिश आणि तिचे कँपातले. ती काय म्हणते ते समजते तुला? ती म्हणणार “यू डम फेला.” ती तुला डंबं म्हणतेय हे तुला समजणारच नाही.
“गीम्मे द्या कोम.” मग तू तिला कोंबं देणार. अशी ही बोमाबोम! आणि हँडकरचीफ नाही म्हणायचं हँकरची म्हणायचं.वाक्या वाक्यात फक आणि बास्टर्ड. आवडतं तुला? तू म्हणणार प्रिये, आज हुलग्याचं पिठलं कर. ती म्हणणार “व्हाट इज धीस ह्युलागया?” कधी पिठल्याची इच्छा झाली तर माझ्याकडे ये हो. मी तुला खाऊ घालेन. कसं होणार तुझं.”
“सुलू, काय बडबडते आहेस. एक तर पक्याला ह्यात का ओढते आहेस? नाईस गाय ही इज! बिचारा कथा लिहून पोट भरतोय. आणि ही मोनिका, अग त्या दिवशी तिला घेरी येत होती म्हणून मी तिला सावरली. त्यावरुन तू आमचे लग्न पण लावून दिलेस. जरा समजून घ्यायचा प्रयत्न कर. तू समजतेस तसं आमच्यात काही नाहीये.”
“पक्या इज अ नाईस गाय! मोनिकाला फक्त घेरी येते. आणि मी?”
“यू आर तो सच अ स्वीट सुलू.”
“हा हा समजलं. यू स्वीट लायर! तुझे जर बोलून झालं असेल तर मी जाते. आज मला पहायला येणार आहेत. काय करणार? बरा वाटला तर हो म्हणून टाकते. बीई एमबीए आहे.” ती उठली, दुपट्ट्याची मोहक हालचाल करत ती हॉटेलच्या बाहेर पडली. स्कूटरला नाजूक टाच मारून भुरकन उडून गेली. तिचं म्हणजे सगळच नाजूक.
ती गेली. तो डोके धरून बसला होता.
तो उठला आणि सरळ माझ्या समोर येऊन बसला.
“बघितलस ना पक्या काका. केवढा हट्टीपणा. राग तर नाकाच्या शेंड्यावर. सांगून सांगून दमलो. बाई ग तू समजतेस तसं काही नाहीये. किती नाकदुऱ्या काढू. पण ऐकेल तर शपथ. वर तुझ्यावर पण आगपाखाड.”
ते सगळे बघून मला हसू येत होतं. मजा वाटत होती.
“पक्या, तुला हसायला होतंय. इकडे माझा जीव चाललाय.”
“पोरा खेळ रंगात आलाय नि तू इतका व्याकुळ झालास. अरे तू ह्या खेळात नवशिका आहेस. थिंग्स आर ब्राईटनिंग अप. थोडा दम खा.”
“खोटी आशा. नाही पक्या. आय अॅम अ लूजर... ती लग्न करायची गोष्ट करतेय.”
“लक्ष देऊ नकोस. तुला जळवण्यासाठी ती फेकतीय.. एक गोष्ट तू नोटीस केलीस? जाताना तू आणलेला गजरा तिने हळुवारपणे हुंगला आणि सस्मित पर्समध्ये ठेऊन दिला. तुझं लक्षं कुठं होतं? तू आपला स्वतःच्या दुःखाला कुरवाळत बसला होतास.”
त्याने वळून मागे पाहिले. खरच कि. गजरा टेबलावर नव्हता. फक्त त्याचा सुगंध मात्र दरवळत होता.
“खरच की रे, ती गजरा घेऊन गेली.” हीरो गाण्याच्या तालात म्हणाला, “अरे वेड्या, ती गजरा घेऊन गेली!”
“कट! एक्सलंट. हा फायनल टेक.” टाळ्या वाजवत तो माझ्या शेजारच्या टेबलापाशी बसलेला इसम म्हणाला.
स्कूटरला टाच मारून अदृश्य झालेली हिरोईन पण आली.
“काका, हीरो, हिरोईन तुम्हा सर्वांचा कमाल अभिनय.”
पॅकअप नाऊ.
सगळे आपापल्या लवाजम्या बरोबर वेग वेगळ्या दिशांना पांगले. डायरेक्टर दादा माझ्याजवळ येऊन बसला.
“पक्या काका, तुला काही शेड्युल नाही? बाकी तू पण अभिनयाची थोडी चुणूक दाखवून जुन्या काळाची आठवण करून दिलीस हा.”
“दादा, एवढ्या लहानश्या अपिअरन्ससाठी केव्हढी मोठी कथा रचावी लागली.”
(समाप्त)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेखक (पक्या) हा अडगळीत गेलेला नट आहे. बऱ्याच दिवसानंतर तो अभिनय करत आहे, दादाची कृपा. तो पक्याच्या भूमिकेत आहे. पक्या म्हणजे Puck. प्रेमी युगलांच्नी ताटातूट आणि मीलन करणारा खोडकर imp. त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी आणि मूडमध्ये येण्यासाठी तो कथा जगतो आहे.
Puck- पक्या हे रत्नाकर मतकरींकडून ( शेक्सपिअर) परत न करण्याच्या बोलीवर उसनवार घेतले आहे. नाटकाचे नाव आहे "जादू तेरी नजर" लेखक रत्नाकर मतकरी प्रमुख भूमिका प्रशांत दामले.आणि लिंक आहे
https://www.youtube.com/watch?v=8gM0heG2KLY
Enjoy.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0