भला उसकी कमीज मेरे कमीज......

गेली साठ-सत्तर र्वष चाललेल्या डिर्टजंट वॉरचा आढावा घेतल्याशिवाय टिनोपालच्या कथेचा अध्याय वाचता येणार नाही. १९५९ साली हिंदुस्थान लिव्हरने सर्फ बाजारात आणले आणि बकेट वॉशची पद्धत सुरू झाली. स्वस्तिक केमिकल्सचा डेट नावाचा एक डिर्टजट ब्रँड सोडल्यास सर्फच्या स्पर्धेत कुणीच नव्हतं.
सत्तरीच्या दशकात निरमा नावाच्या ब्रँडने हिंदुस्थान लीव्हरची झोप उडवली. सर्फची शुभ्रतेची मक्तेदारी संपली. ‘दूध सी सफेदी निरमा से आये’ या ओळीनं सर्फचा ब्रँड रिकॉल संपवून टाकला.
ज्यावेळी सर्फ १२-१३ रुपये किलोने विकलं जायचं तेव्हा निरमाची किंमत तीन रुपये किलो होती. छायागीत आणि सोबत निरमाची जाहीरात. दृकश्राव्य माध्यमाची ती उगवती वर्षे होती. छायागीतच्या लोकप्रियतेचा संपूर्ण भरघोस फायदा निरमाला मिळाला. सर्फ गावखेड्यात पोहचत नवहतं पण निरमा तिथे पोहचलं. गावागावात निरमाची गाडी फिरायची . रोख पैसे द्या आणि माल घ्या अशी अट असूनही निरमाचा माल ताबडतोब खपायचा.
हिंदुस्थान लिव्हरने समजदार ललिताजींना (कविता चौधरी) आणलं. ‘अच्छी चीज और सस्ती चिज’ मुद्दा मांडून बघितला. व्हील नावाची नवीन वॉशिंग पावडर निरमाच्या स्पर्धेत आणली. ‘दूर हो जा मेरी नजरों से’ ही कॅम्पेन सुरू करून बघितली.
आज भारतात येऊन सर्फला ६० वर्ष होत आली, सर्फची जिंगल कुणालाच आठवत नाही, पण ‘वॉशिंग पावडर निरमा’ ही जिंगल आठवत नाही असं कुणीच नसेल.. निरमाला संपवण्यासाठी लीव्हरने स्लोगन्स आणि टॅग लाइनचे जे युद्ध सुरू केले ते आजही चालूच आहे.
आता तर स्पर्धकांची संख्या वाढली आहे. शुभ्रतेच्या या बाजारावर काबू करण्यासाठीची धडपड आता एका वेगळ्याच पातळीवर गेली आहे. उदाहरण टाइड या ब्रँडचे घ्या. इतर ब्रँडच्या तुलनेत हा तसा नवीन ब्रँड, पण गेल्या काही वर्षांत टाइडच्या मूळ फॉम्र्युलात कमीत कमी २० वेळा बदल करून बघण्यात आला.
इतकी सगळी धडपड कशासाठी, तर शुभ्र कपडय़ाचे स्वप्न विकायची हिस्सेदारी आपल्या वाटय़ास जास्तीत जास्त यावी म्हणून.
हीच मक्तेदारी काही वर्षांपूर्वी टिनोपालकडे होती. कपडे किती शुभ्र तर टिनोपालमध्ये धुतल्यासारखे. टिनोपाल त्यावेळचा शुभ्रतेचा मानदंड होता. जे पांढरेशुभ्र असेल ते टिनोपाल. टिनोपाल म्हणजे साबण किंवा वॉशिंग पावडर नव्हे. टिनोपाल म्हणजे ऑप्टिकल ब्राइटनर. त्याला फ्लुरोसंट व्हाइटनिंग एजंट हे दुसरे नाव आहे.
कपडा कितीही स्वच्छ धुतला तरी एक पिवळसर झाक राहते, ज्यामुळे शुभ्र पांढऱ्या रंगाचा परिणाम येत नाही, काही तरी कमी आहे असे वाटत राहते. पांढऱ्या रंगाचा झगमगाट दिसत नाही. हे न्यून पुरते करण्यासाठी ऑप्टिकल ब्राइटनरचा वापर केला जातो.
दुसरा पर्याय आहे ब्लिचिंग एजंट वापरण्याचा. त्यामुळे शुभ्रता येते खरी पण तात्पुरतीच. ब्लिचिंग ही रासायनिक प्रक्रिया असल्यामुळे कापड कमजोर होते आणि हळूहळू विरते.
ह्या खेरीज आणखी एक उपाय म्हणजे पिवळसर रंग झाकून टाकणे. ज्याला मास्किंग एजंट असेही म्हणतात. या मास्किंग एजंटपैकी आपल्याला परिचित म्हणजे नीळ. (एके काळी रॉबिन ब्ल्यू नावाचा एक ब्रँड लोकप्रिय होता.) निळीच्या निळसर परिणामाने पिवळट मळकट छटा कमी व्हायची, पण निळीच्या पाण्यात कपडे बुडवायचे तंत्र जमले नाही, तर पिवळ्या रंगासोबत निळे ढगही पांढऱ्या कापडावर दिसायला लागायचे.
टिनोपाल ह्या सगळ्यापेक्षा वेगळे तंत्र वापरते. ते कपडय़ाच्या पृष्ठभागावर पडणाऱ्या प्रकाशाच्या अतिनील (अल्ट्रा व्हायोलेट) किरणांना शोषून त्याऐवजी चमकत्या निळ्या किरणांना परावर्तित करते. ह्या हलक्या निळ्या रंगाचा परिणाम मानवी डोळ्यांना झगमगत्या पांढऱ्या रंगासारखा दिसतो. ह्या पांढऱ्या रंगाला म्हणतात ‘टिनोपाल की सफेदी’.
हवाहवासा वाटणारा हा शुभ्र पांढरा रंग आणण्यासाठी फारशी खटपट करण्याची आवश्यकता नसायची. कपडे धुऊन झाले की बादलीभर पाण्यात दोन चमचे दाणेदार टिनोपाल घोळवून त्या पाण्यातून कपडे काढले की, कपडा झगमग चमकायला लागायचा. निळ्या रंगाची-पांढऱ्या झाकणाची टिनोपालची डबी घरात असणे हे घराच्या पुरोगामित्वाचे लक्षण समजले जायचे. भसकाभर साबणाची पावडर वापरून जी सफेदी यायची नाही, ती सफेदी टिनोपालच्या दोन चमच्यात मिळायची. अर्थात टिनोपालची किंमतही जास्त असल्यामुळे कमावत्या माणसांचे कपडे टिनोपालमध्ये आणि बाकीच्या कपडय़ांसाठी पाचशे एकचा बार असा भेदभावही केला जायचा.
माणसाची कमाई आणि कपडा - माणसाची ऐपत आणि कपडा - माणसाची इभ्रत आणि कपडा याची घट्ट सांगड कपडय़ाच्या शुभ्रतेशी जोडल्याने टिनोपालसारख्या ऑप्टिकल ब्राइटनरला पर्याय नव्हता. ‘असण्या’पेक्षा ‘दिसण्या’चे मूल्य वाढले की, ऑप्टिकल ब्राइटनरची गरज वाढत जाते.
महात्माजी होते तोपर्यंत चळवळीला टिनोपालची गरज नव्हती. गांधी टोपीला कसलाच डाग नव्हता. त्यानंतरच्या काळात ज्यांना टोपी घालूनही उजळ माथ्यानं फिरायची पंचाईत होती त्यांच्या सोयीसाठी टिनोपालची सफेदी फारच गरजेची होती. त्यामुळे टिनोपाल पोलीटीकल स्टेट्स सिम्बॉल झाले. टिनोपालच्या एका धुलाईत कपडय़ावरचे मळके डाग लपायला लागले आणि हो गयी मली मोरी चुनरिया अशी हळहळ वाटणारे संत कालबाह्य झाले.
सिबा गायगी नावाच्या एका कंपनीचा हा ब्रँड आता बीएसएफ या रसायन कंपनीकडे आहे. फार पूर्वी लायसन्स संपल्यावर टिनोपालचं रानीपाल झालं.
सगळ्याच डिर्टजट पावडरमध्ये आता ऑप्टिकल ब्राइटनर असते, त्यामुळे टिनोपाल किंवा रानीपालची वेगळी अशी गरज संपली आहे.
टिनोपाल म्हणजे काय हे आता बऱ्याच जणांना आठवणारही नाही.टिनोपालचे अस्तित्व वेगळे राहिलेले नाही. काही कंपन्या रानीपाल नावानं अजूनही ऑप्टिकल ब्राइटनर विकतात, पण ते काही खरे नाही.
ज्या ब्रँडचा लोकाश्रय संपला तो ब्रँड मावळला.
मावळत्या ब्रँडला अधूनमधून आठवणींचे अर्घ्य द्यायचे.
ग्रेट ब्रँड्स डु नॉट डाय, दे जस्ट फेड अवे.
खरं सांगायचं झालं तर कपडय़ांमध्ये रंगभेद- रंगीत आणि पांढरे - असा फक्त कपडे धुवायला टाकताना करावा, पण हे तत्त्व समजताना काहीतरी गल्लत झाली आणि माणसांनी कपडय़ाच्या रंगाप्रमाणे माणसंच वेगळी केली.
हा व्हाइट कॉलर तर तो ब्ल्यू कॉलर. पांढरपेशे किंवा व्हाइट कॉलर आणि श्रमजीवी ब्ल्यू कॉलर. कायदा सगळ्यांना सारखाच पण व्हाइट कॉलर माणसांच्या मोर्चावर पोलीस छडीमार करायचे, तर ब्ल्यू कॉलरवाल्यांवर लाठीमार करायचे.
न्याय सगळ्यांना एकसारखा पण काही वेळा असं वाटतं की, आपल्याकडे दोन इंडियन पीनल कोड आहेत. एक आयपीसी व्हाइट आणि एक आयपीसी ब्ल्यू.
२००१ सालच्या मे महिन्यातील एका रात्रीची गोष्ट. जुहूच्या एका रस्त्यावर फरदीन खानला अटक करण्यात आली. झडती घेतल्यावर त्याच्या खिशातून काही ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले. मुंबईच्या फिल्मी विश्वाला हादरवून टाकणारी ही बातमी बहुतेक सगळ्याच वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर छापली गेली. चाहत्यांची गर्दी कोर्टात झाली. अपेक्षेप्रमाणे त्याची ताबडतोब जामिनावर सुटकाही झाली. खटला उभा राहण्यासाठी दहा र्वष लागली. गेल्या वर्षी २०११ साली फरदीनवरचे आरोपपत्र कोर्टासमोर आले. मामुली प्रमाणात अमली पदार्थ विकत घेण्याच्या आरोपाखाली खटला पुढे चालवण्यात आला. या वर्षी फरदीन मार्च महिन्यात कोर्टापुढे हजर झाला. कोर्टासमोर त्याने निवेदन दिले की, तो आता व्यसनमुक्त झाला आहे. कोर्टाने त्याचे निवेदन स्वीकारून कलम ६४ (अ) NDPS अ‍ॅक्ट १९८५ ची तरतूद वापरून या खटल्यातून अभय दिले आणि मुक्त केले.
अंमली पदार्थाची केस -दहा वर्षांनी कोर्टासमोर यावी - अकराव्या वर्षी त्यातून अभय मिळावे. सगळं काही सोयीचं- सुरळीत आणि सुटसुटीत.
ही बातमी वाचताना २०-२२ वर्षांपूर्वीची एक बातमी आठवली. मुंबईच्या एका मिल कामगाराची रात्रपाळी सुटल्यावर गेटवर झडती घेण्यात आली. त्याच्या खिशात पंधरा ग्राम टिनोपाल सापडले. त्याची रवानगी ताबडतोब पोलीस ठाण्यात झाली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याची रवानगी कोर्टात आणि कोर्टानं त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्या कामगाराची परिस्थिती जेमतेमच असल्याने सरकारतर्फे वकील मिळून खटला उभा राहायाला काही दिवस गेले. कोर्ट जामीन द्यायला तयार झाले, पण त्याचा जामीन कोणी देईना. सहा महिने तुरुंगात काढल्यावर खटला उभा राहिला आणि तीन महिन्यांची शिक्षा झाली.
अंमली पदार्थ बाळगले तर चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर अभय आणि १५ ग्राम टिनोपाल चोरलं तर सहा महिने जेलात.
आता तो कामगार कुठे असेल किंवा असेल की नाही काही माहिती नाही, पण असलाच कुठे तरी आणि फरदीनची केस त्यानं वाचली, तर एकच प्रश्न त्याच्या मनात उभा राहील, ‘भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे ?’

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (6 votes)

प्रतिक्रिया

नही जम्या इस बार..
सुरवात मस्त.. पण पुढे लेख वेगळ्याच दिशेला गेलाय! काय ते नक्की सांगता येणार नाही पण 'रामदास टच' जाणवला नाही Sad
सॉरी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फारच छान लेख. अनेक मुद्यांना स्पर्श केला आहे. मनोरंजन + माहिती आणि सोबत समाजप्रबोधनही एकाच लेखाद्वारे साधले आहे. भारत आणि इंडिया हे दोन्ही देश एकाच वेळी एकाच भूमीवर नांदत असल्याचा मुद्दाही जुनाच असला तरीही महत्वाचा असल्याने या लेखात समर्पक वाटतो. अशाच अजून लेखांची वाट पाहात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

माझा एक मित्र जर्मनीत होता तेव्हा तिथल्या लोकांना भारतीय गाणं म्हणून "वॉशिंग पावडर निरमा" शिकवलं. कोणी अभारतीय माणूस हे गाणं गात असेल तर आमच्या 'दिपूबाबां'चा परिसस्पर्श त्या आत्म्यास झाला आहे असे समजावे, अशा प्रकारची समजूत आता भारतीय अ‍ॅस्ट्रनॉमर्समधे आहे.
"भला उसकी कमीज मेरे कमीज... " हे अगदी वाक्प्रचारांच्या यादीत टाकावं एवढं प्रसिद्ध झालेलं असावं.

अंमली पदार्थ बाळगले तर चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर अभय आणि १५ ग्राम टिनोपाल चोरलं तर सहा महिने जेलात.

यात बदलत्या काळाची बदलती मूल्यही येत नाहीत का? त्याग, साधेपणा इत्यादी गुणांना एकेकाळी असलेला उदात्तपणा आज आहे का? "मला अंमली पदार्थांचं (यात सिग्रेट, दारू, पॉट, सगळंच आलं) सेवन करायचं आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही करू नका. मी काय करायचं हे मला सांगू नका, मी सज्ञान आहे" अशी वाक्य आजही कदाचित काही भारतीयांना त्रासदायक वाटतील. पण एकेकाळी मुलीचा गर्भ पाडणे, विधवेला (बहुदा लादलेल्या शरीरसंबंधातून) झालेली मुलं मारणे हे फार नैतिक समजलं जात नसलं तरी सर्वसामान्य होतंच की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ब्रॅण्डच्या आठवणी छानच.

फरदीन खानसंबंधित किस्सा मिसप्लेस्ड वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ररा श्री,
भला उसकी कमीज मेरे कमीज...... हे जे वाक्य आहे, त्या पुढे 'पच्च्याक.. थू!' असं पुढचं आहे Wink

'त्या'ची कमिज स्वच्छ असेल तर तिच्यावर पान खाऊन थुंका अशी जहाल आयडिया कोणे एके काळी होस्टेल मधे प्रचलित होती. म्हणजे आपले जास्त पांढरे करण्या पेक्षा, त्यालाच घाण करा? कशी आहे टिपिकल मेंट्यालिटी?

अन त्या भला उसकी कमीज मेरे कमीज...... जाहिरातीचा ब्रँड उजाला होता काहो?

ते शेवटचं ट्विस्ट इन द टेल समजलं नाही. फरदीण खाण कोन?

त्या काळी निर्मा विकायला गावागावातल्या तरूण पोरी सरसावल्या होत्या. ४ रुपयांचं पाकीट (१ किलो) साडे५ रुपयांत घरोघर जाऊन विकणे. ५० पैसे तुम्हाला, ५० होल्सेलर्ला अन बाकी निर्मा कंपनीचा फायदा.

रच्याकने. ५ वर्षं झालीत निरमाचे शेअर्स मुहूर्ताचे म्हणून घेतले होते. अजूनही तेजीत आहेत भयंकर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

लेख तिसऱ्यांदा वाचून काढला. वर ऋषिकेशने म्हटल्याप्रमाणे 'रामदास टच' नसल्याचं जाणवत होतं. पण नक्की काय ते कळत नव्हतं. आता थोडं थोडं लक्षात येतं आहे.

या लेखात शुभ्रता ही दोन अथवा तीन वेगवेगळी रूपकं म्हणून वापरलेली आहे. 'भला उसकी कमीज' या शीर्षकातून सामाजिक असमानतेवर भर असेल असं वाटतं. तसा तो लेखभर येतोच. विशेषतः शेवटच्या किश्श्यांमधून तो स्पष्ट केलेला आहे. खालील वाक्यासारख्या काही वाक्यांतून ते भेदभावाचं सूत्र सांभाळलेलं आहे.

अर्थात टिनोपालची किंमतही जास्त असल्यामुळे कमावत्या माणसांचे कपडे टिनोपालमध्ये आणि बाकीच्या कपडय़ांसाठी पाचशे एकचा बार असा भेदभावही केला जायचा.

माणसाची कमाई आणि कपडा - माणसाची ऐपत आणि कपडा - माणसाची इभ्रत आणि कपडा याची घट्ट सांगड कपडय़ाच्या शुभ्रतेशी जोडल्याने टिनोपालसारख्या ऑप्टिकल ब्राइटनरला पर्याय नव्हता.

हा व्हाइट कॉलर तर तो ब्ल्यू कॉलर. पांढरपेशे किंवा व्हाइट कॉलर आणि श्रमजीवी ब्ल्यू कॉलर.

मात्र मधूनच इतर रूपकं डोकावतात. म्हणजे स्वच्छतेचं असण्यापेक्षा दिसणं महत्त्वाचं वगैरे.

महात्माजी होते तोपर्यंत चळवळीला टिनोपालची गरज नव्हती.

तसंच मधूनच शुभ्रता म्हणजे आदर्श, परफेक्शन हेही डोकावून जातं.

हे मिक्सिंग ऑफ मेटाफर्स चांगल्या लेखाची परिणामकारकता कमी करतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0