तीर्थ नेत्री दाटताना प्रहर शीतल व्हायचे

“नाहीच कुणी रे आपुले, प्राणांवर नभ धरणारे” अशी आक्रोश-न-करणारी तरल अवस्था अधून मधून येते. त्यावेळेस काहीही करावे वाटत नाही. ही अवस्था इतर कोणता परजीव भरून काढेल अशीही अपेक्षा नसते. खऱ्या अर्थाने ‘missing’ वाली भावना.
उतरत्या पावसाळ्यात तुम्ही एसटी मधून कुठेतरी चाललेले असता. दुपारची सुस्ती असते. कुणी उतरत नाही, चढत नाही म्हणून “हात-दाखवा-बस-थांबवा”वाली जनवाहिनी बससुद्धा लांबचे पल्ले घेत असते. क्वचित एखाद्या ठिकाणी; कमरेतून वाकलेली, सुरकुतलेली म्हातारी वायरची पिशवी सांभाळत बसमध्ये चढते. असलेच चुकार ब्रेक असतात अशा प्रवासाला. कोणतीही मानवी घिसाडघाई नसलेले थांबलेपण बसमध्ये हिंदोळे खात-खात स्थिर झालेले असते. तुम्ही हळू हळू ग्लानीत जाऊ लागता. कानात घातलेली हेडफोनची बोंडकंदेखील अनावश्यक वाटतात. एसटीचे कर्कशणारे सर्व आवाज त्रास द्यायचे बंद करतात. बाहेर लांबवर पसरलेल्या जमीनीच्या, झाडाझुडुपांच्या पसाऱ्यावरून ढग त्यांच्या सावल्या ओढत नेत एका दिशेला वाहत असतात. खिडकीतून जोराने वारा वाहत येतो, तुम्हाला त्याचीही फिकीर नसते. शेजाऱ्यांशी बोलण्याचे विषयही संपून विरलेले असतात. तुमच्या मनावर हे एकटेपण मग सरकत जाते. माझ्या बाबतीत बसचा असा प्रवास ह्या भावनेच्या अनुभूतीचे एक चल तीर्थक्षेत्र आहे. ती मनमानी भावना वेळ पाळत नाही. एखादी पावसाळी संध्याकाळ किंवा सैलावत चाललेली एखादी मरगळलेली दुपार तिला आपसूक आमंत्रण देतात.
‘कुणीतरी नाही’ अशी अपूर्णत्त्वाची भावना मन काबीज करते. अर्थात इतर सगळे तिथल्या तिथं असतातच. पतिपत्नी-प्रियकर-प्रेयसी-मित्रमैत्रिणी-आईवडील-भावंडं. सगळी सेंद्रीय आणि असेंद्रीय नाती त्यांचे सगळे गुणधर्म लेउन एका अंतरावर शांत उभी असतात. त्यातल्या कोणालाही तुम्हाला हाकारता येत नाही. तशी इच्छाच होत नाही. कुणीतरी नसल्याची भावना. तिचा अंदाज घेत घेत ती भवतालाच्या कोलाहलात विरत जाण्याची वाट पाहत तुम्हीही थबकून असता. तुम्हाला ती तासता येत नाही. ती जैविक असते. तिला तुम्ही मद्याच्या,गाण्यांच्या किंवा कवितांच्या नशेत बुडवू शकत नाही. तिचं येणं समजून घेऊन तिला भोगूनच मोकळं व्हावं लागतं. ती भावना सलणाऱ्या दु:खांची गोळाबेरीज नसते. ती असोशी देईल, क्वचित कासावीस करील पण दु:खी करणार नाही. कारण ती भावना निर्माण होण्यात तुमच्या कृती जबाबदार नसतात. ग्रेस त्या भावनेला शब्दांत पकडतो -
नाहीच कुणी रे आपुले, प्राणांवर नभ धरणारे
दिक्काल धुक्याच्या समयी, हृदयाला स्पंदवणारे..
सुनीताबाईंच्या आयुष्यात माणसांची काय कमी होती? जीएंसारखा अंतरंगमित्र असताना त्याही या भावनेने विकल होत.
दिक्काल धुकंही काय कुणाला चुकणारं नसतं. आपण ह्या भावाशी मांडवली करून अस्वस्थतता कमी करायचा प्रयत्न करतो. कितीतरी व्यवधानं गुंतवून ठेवायला हजर असतातच. पण हा भाव व्यापून राहतो.
लोकांत गुंतलेलं असू तेव्हा ती भावना दूर सारायची घाई होते. जवळच्या माणसाला आपले चित्तव्यवहार पक्के ठाऊक असतील तर आपल्या चालण्या-बोलण्यात डोकावणारी ही भावना त्यांच्या लक्षात येतेच. आपली झालेली ही पारध आपल्याला त्यांच्यापासून किंवा व्यवहारात लपवावी लागते. काहीतरी खोटं नाटं कारण देऊन आपण बाथरूममध्ये जातो किंवा शहरातलाच एखादा परका कोपरा पाहून सिगारेट शिलगावतो. ओळखीचं कुणी आपल्याला हटकू नये म्हणून आपण काहीही करतो. ही भावना तिचा निचरा होण्यासाठी तुमच्याकडे हक्काचा एकांत मागते. तेवढा वेळ आपल्याला द्यावाच लागतो. तीची तीव्रता आणि भवताल दोघे मिळून “आंखो मे नमी” आणतात. आक्रोश करण्याइतपत तपशील किंवा आठवणी ह्या भावनेला जोडलेले नसतात. ती तुमच्या संचितातलं न भरलेलं मोकळेपण जाणवून देते.
प्राणांवर नभ धरणाऱ्यांचा शोध घ्यावासा वाटत नाही. कारण इतर कुणी ही स्पेस भरून काढेल याची आपल्याला कधीच शाश्वती नसते. एका अर्थाने अस्तित्त्वात नसलेल्या सोलमेटला साद घालणं आहे हे. त्यामुळे जन्म-मृत्यूचे नियमही इथे बांधील नाहीत. शोध घ्यायला न लावताही ही भावना थकवते. तुम्ही तिचा स्वीकार करता तेव्हा “नभ धरणाऱ्या” कुणीतरीकडून असलेल्या निखळ आणि उत्कट अपेक्षाच आपण व्यक्त करू शकतो. अगदी याच क्षणांना संदीप शब्दांनी ठळक करतो.
तीर्थ नेत्री दाटताना प्रहर शीतल व्हायचे,
जन्म-मृत्यूपार जाऊन पोचलो वाटायचे.
उत्कटाच्या ऊन्ह छायेतून घर बांधायचे,
कोण जाणे कोण ऐसे मज कधी भेटायचे!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

‘कुणीतरी नाही’ अशी अपूर्णत्त्वाची भावना मन काबीज करते.

एकदम.
शेवटला परिच्छेद खूप आवडलेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असे कधी अनुभवले नाही पण आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे असं की आपण कामानिमित्त बाहेर पडतो रोज आणि नंतर घरी येतो. हे सर्वांच्याच बाबतीत होत नाही. कारण त्यांचं घर दुसरीकडेच कुठेतरी असतं. पण रोजचे प्रवास असे कंटाळवाणे होत असतील. इतर प्रवासी मात्र कधीमधी प्रवास करणारे असतील तर त्यांना कंटाळा आलेला नसतो ते गप्प बसले तरी.

पण प्रवास हा शब्दश: न धरता मानसिकही असतोच. तो आहे.

आवडलं लेखन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अचूक वर्णन, आणि संदीपच्या अनेक कवितांमधून ही भावना तरलपणे, स्पष्टपणे समोर येत राहते..

सगळे काही आहे, पण ते पूर्ण नाही.. काही तरी निसटून जातेय, आणि ते धरता ही येत नाही.. काही झाले तरी प्रवास संपत नाही, साथ द्यायला कोणी नाही..

संदीप एक ठिकाणी म्हणतो -
पैलतीर गाठताना आले ध्यानी गेला धीर
पार पोचताच झाला पैलतीर एलतीर..

इतका प्रवास नेमका मी कशासाठी करतोय?
कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा
असे हालते आत हळुवार काही
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खऱ्यांची नाव...गाव...घर नावाची कविता फार आवडते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0