नो स्नॅक्स फाॅर यू!
आमच्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची एकच खासियत आहे. आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपलं, की दुसऱ्याच दिवशी अकाऊंटस तयार होतात, तीन दिवसांत ऑडिट होतं, आणि एकवीस दिवसांची नोटीस देऊन २५ एप्रिलच्या आसपासच्या रविवारी एजीएम होते. या प्रथेबद्दल सगळ्या मेंबरांना सार्थ अभिमान वगैरे वाटतो. मग एजीएमचं कामकाज आटोपलं की काहीतरी नाष्टा वगैरे दिला जातो आणि मग मेंबरं भरल्या पोटी आणि तृप्त मनाने आपापल्या घरी जातात. बाकी कितीही मतभेद किंवा भांडणं असली तरी एप्रिलमधली एजीएम आणि त्यातला नाष्टा याबद्दल सर्वांचं एकमत असतं.
तर २०१७ सालची गोष्ट. मह्याचे बाबा पहिल्यांदाच सोसायटीचे सेक्रेटरी होते. तर त्यामुळे तीस मेंबरांचा नाष्टा अरेंज करायची जबाबदारी मह्यावर आणि त्यामुळे माझ्यावरपण होती.
"ते नेहेमीचं ढोकळा नाहीतर साबुदाणा खिचडी नको यार, काहीतरी दुसरं घेऊया," मी म्हटलं.
"अरे पुढच्या चौकात तो नवीन बेकरी-कम-कॅफे आलाय ना गेल्या वर्षी, तिथे चिकन पफ आणि व्हेज क्विकी घेऊयात."
"क्विकी नाही रे, कीश म्हणतात त्याला," मी फूड चॅनेलवर प्राप्त केलेलं ज्ञान पाजळलं.
मग मह्यानी आणि मी बोलता बोलता काही मित्रांना सांगितलं, आणि या एजीएमला काहीतरी हटके नाष्टा असणार याची बातमी सोसायटीच्या एकोणतीस फ्लॅट्समध्ये पसरली. (चौथ्या मजल्यावरचा जाधवांचा फ्लॅट रिकामा असतो. ते पॅराग्वेमधे राहतात.)
तर एजीएमच्या दिवशी बरोब्बर नऊ वाजता मह्या आणि मी त्या कॅफेत पोचलो. मह्यानी ऑर्डर दिली, "वीस चिकन पफ आणि दहा व्हेज कीश."
"चिकन पफ आठच उरलेत," काऊंटरवरचा माणूस म्हणाला.
"असं कसं? आम्ही एकदम लवकर आलोत," मह्या वाद घालायच्या मोडमधे गेला. "असू द्या. वीस पनीर पफ द्या," मी पटकन बोललो.
"बंड्या, वीस अकरा आणि दहा सोळा!" काऊंटरवरच्या माणसाने - बहुधा मालक असावा - हाळी दिली. मी पटकन मेनूकडे नजर टाकली. नंबर अकरा म्हणजे पनीर पफ आणि नंबर सोळा म्हणजे व्हेज कीश होते.
"आठशे रूपये झाले" मालक म्हणाला आणि मह्यानी क्रेडिट कार्ड पुढे केलं.
"कार्ड मशीन बिघडलंय. फक्त कॅश!"
मह्याकडे कॅश नव्हती. मी पाकीट उघडलं आणि दोन हजाराची नवीकोरी नोट दिली.
"आठशेचे स्नॅक्स घेता आणि दोन हजाराच्या नोटा नाचवता!" मालक खडूसपणे म्हणाला. "नो स्नॅक्स फाॅर यू!"
रांगेतल्या दोन पोरी फिदीफिदी हसायला लागल्या, आणि मी मह्याला हात धरून कॅफेबाहेर ढकलला.
"जाऊ दे रे, आपण मस्त सामोसे नेऊ," मी बोललो.
"असं कसं? हटके नाश्त्याची खबर पसरलीये ऑलरेडी."
मह्यानी बाईकला किक मारली आणि आम्ही सरळ पुढच्या चौकातल्या ताज बर्डीजकडे गेलो. "वेळ नाहीये रे, नाहीतर स्टेशनच्या माॅन्जिनीजला गेलो असतो," मह्या चुटपुटला.
ताज बर्डीजमध्ये तीस जणांना स्नॅक्स घेतले. माझ्याकडचे दोन हजार पुरले नसते, पण तिथलं कार्ड मशीन चालू होतं. आम्ही सोसायटीत पोचलो तेव्हा एजीएम नुकतीच संपली होती.
"या या, आम्ही म्हटलं नाष्टा मिळणार की नाही?" तळमजल्यावरच्या काकू म्हणाल्या.
पुण्याला राहणारे आणि फक्त एजीएमसाठी येणारे आजोबा मह्याला म्हणाले, "तू चिटणीसांचा मुलगा ना?"
मह्या म्हणाला, "नाही हो. ठाकुरांचा. रामचंद्र ठाकूर. आणि आपल्या बिल्डिंगमधे चिटणीस कोणीच नाहीत."
"अरे चिटणीस म्हणजे सेक्रेटरी रे," आजोबा हसत म्हणाले.
एकूण वातावरण खेळीमेळीचं होतं. मह्या आणि मी सगळ्यांना पेपर प्लेटमध्ये स्नॅक्स दिले.
"छान आहे रे हे. नाहीतरी दर वर्षी ढोकळा नाहीतर सामोसे खाऊन कंटाळा आला होता," कोणीतरी बोललं.
"अरे पण तो बाॅक्स ताज बर्डीजचा आहे ना? कितीला पडला हा नाष्टा?" दुसऱ्या मजल्यावर हल्लीच राहायला आलेला पस्तीशीच्या मेंबरनी विचारलं.
"बावीसशे," मी बोललो आणि एकदम हलकल्लोळ माजला.
"बावीसशे! इथे आपण ग्रिलला रंग लावत नाही आहोत आणि नाष्ट्याला बावीसशे!" "या पिढीला पैशांची किंमतच नाही!" "अहो ठाकूर, तुम्ही सेक्रेटरी आहात म्हणून असा पैसा उधळायचा?" वगैरे वाक्यं कानावर पडली.
मह्या मोठ्याने पण शांतपणे म्हणाला, "तसं नाहीये. मला ऑफिसमधे चांगलं इन्क्रीमेन्ट मिळालं, म्हणून ही माझ्याकडून पार्टी."
सगळे आवाज निवळले आणि मेंबरांनी परत स्नॅक्सकडे मोर्चा वळवला.
मह्या आणि मी सुट्टा मारायला चौकात गेलो. त्या कॅफेकडे रोखून बघत मह्या म्हणाला, "ही स्टोरी अजून क्रमशः आहे!"
==============================================
मह्या आणि मी अख्खा दिवस भटकत होतो. पण तो एक्झॅक्टली काय करतोय ते मात्र सांगत नव्हता.
पहिल्यांदा आम्ही मह्याच्या - म्हणजे अॅक्चुअली चटर्जीदाच्या - ऑफिसमधे गेलो. मी काहीतरी टिवल्याबावल्या करत बसलो, पण मह्या मात्र त्याच्या काॅम्प्युटरवर फुल फोकसनी काहीतरी डिझाईन करत होता.
मग मह्यानी ते डिझाईन इमेल केलं, आणि आम्ही मह्याच्या नेहमीच्या प्रिंटिंग प्रेसमधे गेलो. पार कांजूरमार्गला. प्रिंटरनी पॅम्फलेटस छापून तयार ठेवली होती. मी एक पॅम्फलेट उचलून वाचू लागलो आणि माझी ट्यूब पेटली.
"परीक्षेतील यशाबद्दल अभिनंदन!
हे यश साजरे करायला या कॅफे ×× मध्ये!
तुम्हाला परीक्षेत जे टक्के मिळाले असतील तेवढे टक्के डिस्काऊंट! सर्व स्नॅक्सवर!
ही ऑफर फक्त आज, प्रत्येकी शंभर रूपयांपर्यंतच्या खरेदीवरच."
पुढचं काम तसं सोपं होतं. दुसऱ्याच दिवशी, म्हणजे एक मे रोजी, चौकातल्या शाळेचा निकाल होता. एका पेपरवाल्या पोऱ्याला शाळेबाहेर उभा करून पॅम्फलेट वाटायला सांगितली, आणि आम्ही कॅफेबाहेर सुट्टा मारत थांबलो. कॅफेचं फसाद पूर्ण काचेचं असल्यामुळे आम्हांला आतला आंखो देखा हाल समजत होता.
शाळा सुटली. रोजची प्रार्थना आणि एक मेचं स्पेशल "जय जय महाराष्ट्र माझा" गाऊन झालं, आणि मुलं शाळेबाहेर पडली. पोऱ्यानी पटापट पॅम्फलेट वाटली आणि तो पसार झाला.
काही मिनिटांतच पहिलीपासून दहावीपर्यंतची मुलं-मुली आपल्या मार्कशीट आणि पॅम्फलेट दाखवत कॅफेत घुसली. मालकानी पहिल्यांदा विरोध केला, पण पोरांच्या लोंढ्यासमोर आणि कलकलाटासमोर त्यांनी लवकरच हार मानली. वीस रूपयांचे पफ सहा रूपयांना, चाळीस रूपयाचे चिकन रोल दहा रूपयांना वगैरे मिळाल्याने पोरं मेजर खूश होती. एक स्काॅलर मुलगी तर शंभर रूपयांचे स्नॅक्स फक्त चार रुपयांत मिळवल्याची विजयगाथा मैत्रिणींना अभिमानाने सांगत होती. उशीरा आलेल्या मुलांना स्नॅक्स मिळाले नाहीत, पण ऑफर वेस्ट होऊ नये म्हणून त्यांनी पाव, नानकटाई, ब्रेडस्टिक्स वगैरे उरल्यासुरल्या गोष्टी खरेदी केल्या. सुमारे अर्ध्या तासात कॅफेतला सगळा माल संपला होता, आणि मालक डोक्याला हात लाऊन काऊंटरवर बसला होता.
मग आम्ही पुढच्या चौकात गेलो. ताज बर्डीजमधे एकेक क्राॅईसां खाल्ला. मग सद्गुरू स्टाॅलवर चहा प्यायलो आणि एकेक सुट्टा मारला. मग घरी गेलो.
प्रतिक्रिया
मस्त !
छान आहे !
चांगला सूड घेतलानीत!
पण काय हो, तुमच्या त्या मह्याचा तो प्रिंटर (कांजूरमार्गचा), तो हँडबिलाच्या कोपऱ्यात कुठे बारक्या अक्षरांत आपला मार्क (छापणाराचे नाव, वगैरे) टाकीत नाही काय?
नाही म्हणजे, त्या नोस्नॅक्सवाल्याने मनात आणलेच, तर ही हँडबिले आली कोठून, याचा पाठपुरावा करणे त्याला अगदीच अशक्य नसावे.
असो. पण सूड छान घेतलानीत.
(बादवे...)
(...सिंधूआज्जी-स्लॉथ्या कोठे आहेत सध्या?)
गुड गुड गुड!
गुड गुड गुड!
बादवे, ते क्राॅईसां नसून क्वाह्सां असे काहीसे आहे. भारी लागते.
:प
भूक खवळली माझी, क्विकी वगैेरे वाचून!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
No
भेंजो?
हाहा
पाम्प्लेट वर बारीक ष्ठार कडून अटी लागू लिहायचे राहिले वाटतं.
(No subject)