बदलाचा प्रश्न - आलँ बादियु (भाग १)

#संकल्पनाविषयक #मन्वंतर #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२१

"जिथं बदल हाच नियम आहे अशा जगाला आपण बदललं पाहिजे." - आलँ बादियु

फ्रेंच तत्त्वज्ञ आलँ बादियु यांच्या तीन लेखांचं भाषांतर

- निवड आणि संपादन - वैभव आबनावे

- भाषांतर - अनुश्का गोखले, जमीर कांबळे

भाग १ : बदलाचा प्रश्न

प्रस्तुत संहिता ही आलँ बादियु यांनी युरोपियन ग्रॅजुएट स्कूल येथे २०१२ साली दिलेल्या व्याख्यानादरम्यान डयूआन रुसेल यांनी केलेल्या नोंदींवर आधारीत आहे. या संहितेचा प्रमुख आधार मौखिक आहे. बादियु यांनी तिचं पुनर्लेखन अथवा तिच्यावर पुनर्संस्करण केलेलं नाही. तिचा समावेश 'Day One, Seminar One' या नावाने The Subject of Change: Lessons from the European Graduate School, 2012' (New York: Atropos Press, 2013) या डयूआन रुसेल संपादित पुस्तकात आहे. प्रस्तुत शीर्षक - बदलाचा प्रश्न - हे ह्या पहिल्या व्याख्यानाच्या सुरुवातीला नमूद केलेल्या प्रमुख आशयसूत्राचं - The Question of Change - भाषांतर आहे.

संपादकीय नोंद - लेखातील पुरुषप्रधान भाषा मुळाबरहुकूम भाषांतरित केली आहे.

आलँ बादियु
आलँ बादियु, प्रतिमा विकिपिडीयावरून

या सत्रादरम्यान आपल्यासमोरील प्रश्न हा बदलाचा प्रश्न असेल. तो आपल्यासाठी सर्वांत महत्त्वाचा प्रश्न असेल. बदल म्हणजे काय? खरा बदल म्हणजे काय? खोटा बदल म्हणजे काय? बदलापेक्षा अचलता अधिक चांगली असतं का? बदलाचे वेगवेगळे प्रकार कोणते? समाजातील बदल म्हणजे काय? राजकीय बदल म्हणजे काय? ऐन्द्रीय रूपातील बदल म्हणजे काय? कलेतील बदल म्हणजे काय? ज्ञानात होणारा बदल म्हणजे काय? उदाहरणार्थ, वैज्ञानिक बदल म्हणजे काय? आयुष्यात होणारा बदल म्हणजे काय? आणि वैयक्तिक आयुष्यातील बदल म्हणजे काय?

साधारणपणे, आपण बदलासाठी आवश्यक पूर्वअटींचं किंवा ज्या संदर्भात बदल घडून येतो त्या संदर्भाचं निरीक्षण करू शकतो. किंबहुना, बदल नेहमी विशिष्ट स्थानापुरता मर्यादित असतो का, ह्यासंबंधीचा हा प्रश्न आहे. जागतिक पातळीवर घडणाऱ्या किंवा संपूर्ण बदलाच्या शक्यतेचाही हा प्रश्न आहे. हा प्रश्नही तितकाच वैध आहे. म्हणून नेमकं कशाला बदलाचं स्थान, आणि त्याचं स्थानिकीकरण (localisation) म्हणायचं किंवा बदल नेमका कुठे घडतो हाही आपल्यासमोरचा प्रश्न आहे. अर्थातच हे प्रश्न अवघड आहेत. बदल हा नेहमी बदल न होणाऱ्या गोष्टीच्या तुलनेने ठरतो. तो नेहमी 'बदल' आणि 'काहीतरी निराळं' यांच्या द्वंद्वात असतो. म्हणजेच तो 'बदल' आणि 'अचलता', 'बदल' आणि 'नेहमीपेक्षा निराळा किंवा दुसरा बदल' या दोघांच्या मध्ये असतो. हे सगळे प्रश्न उपस्थित करणं शक्य आहे आणि ते नक्कीच अवघडही आहेत.

मी थोड्या वैयक्तिक प्रश्नानं सुरुवात करणार आहे. प्रश्न कदाचित माझ्यातील विशिष्ट बदलाचा किंवा माझ्या विशिष्ट अशा असमर्थतेचा आहे. इथे तुमच्यापर्यंत काहीतरी पोचवण्याचा, तुमच्यासोबत काही गोष्टींचा उहापोह करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. सर्वप्रथम ही पोचवण्याची — 'संप्रेषणाची' — प्रक्रिया काही एका अर्थाने विरोधाभासी आहे. आणि या संप्रेषणाचा बदलाच्या प्रश्नाशी जवळचा संबंध आहे. म्हणून मी आपल्या इथल्या संदर्भापासून सुरुवात करतो. तुम्ही सगळे एकत्र येऊन तयार झालेल्या श्रोतेवर्गापर्यंत काहीतरी संप्रेषित करणं, तुमच्यासमोर काहीतरी चर्चेला ठेवणं हा नेमका काय प्रसंग आहे? तुमच्यात काहीतरी बदल घडावा हे माझं ध्येय असू शकतं, कदाचित. किंवा असं असेल का की ज्याअर्थी मी तुमच्यापर्यंत असं काहीतरी संप्रेषित करतोय जे आधीपासून इथे आहे — जे कुठेतरी आहे, पण तरीही इथे आहे — आणि म्हणूनच मी तुम्हाला असं काहीतरी देऊ पाहतोय का की जे तुम्ही आहात त्यामध्ये काही बदल घडवणार नाही, परंतु तुम्ही जे आहात त्याला पूर्ण करण्याचा मात्र प्रयत्न करेल?

संप्रेषणचा प्रश्न हा शिकवण्याचा प्रश्न आहे. सर्वांना माहीत आहे, जेव्हा आपण शिकवण्याच्या प्रश्नाकडे पाहतो तेव्हा आपण एका कठीण आणि विरोधाभासी परिस्थितीत असतो. पण या विरोधाभासाशी संबंधित दोन गोष्टींकडे मला प्रामुख्याने पाहायचं आहे, जिथे शिकवणंं म्हणजे कुणा दुसऱ्यापर्यंत काहीतरी पोचवणं, संप्रेषित करणं असं अभिप्रेत असतं. हे दोन प्रश्न पोहोचवणाऱ्याला, म्हणजे माझ्या बाजूला, आणि ऐकणाऱ्यांना, म्हणजे तुमच्या बाजूलाही लागू होतात. पोहोचवणाऱ्याच्या म्हणजे शिक्षकाच्या, गुरुच्या पदाला अनेक नावे आहेत. संप्रेषक, शिक्षक, गुरू, प्राध्यापक, वगैरे. पहिलं म्हणजे, इथे पोहोचवण्याचं काम करणारा एक म्हातारा मनुष्य आहे. आणि मी तरुण आहे असं म्हणू नका, (हशा) कारण ते सत्य नाही. मी पंच्याहत्तर वर्षांचा आहे हे मला माहीत आहे. परंतु मी एक आनंदी म्हातारा मनुष्य आहे. असो, माझा प्रश्न वेगळाच आहे. माझा प्रश्न आहे: एक म्हातारा मनुष्य जे काही संप्रेषित करतोय त्याचा आशय काय आहे?

खरं तर, हा एक ऐतिहासिक प्रश्न आहे. कारण इतिहासात - बहुधा अनेक वर्षांपूर्वी - काहीतरी पोहोचवणं हे एका म्हाताऱ्या माणसाचं काम होतं. बहुधा हे आजच्या काळाला लागू होत नाही, बहुधा हे आता बदलले आहे. आजच्या काळात तरुण स्त्री-पुरुषांचं राज्य आहे, आणि म्हातारी माणसं आता भूतकाळाचा भाग बनली आहेत. ते एका जुन्या जगाचा भाग आहेत. परंतु हजारो वर्षं परिस्थिती निराळी होती. एखादा म्हातारा पुरुष आणि स्त्री एखाद्या तरुण स्त्री आणि पुरुषापर्यंत विचार पोहोचवू शकत असे. आणि त्यामुळे अनेक वर्षं संप्रेषणाची क्रिया आणि वय ह्यांच्यात एक घट्ट नातं होतं. साधारणपणे म्हणायचं झालं, तर एखाद्या म्हाताऱ्या माणसाचं स्थान काहीसं पवित्र होतं, कारण त्याच्यात काही विचार पोहोचवण्याची क्षमता होती. एखाद्या म्हाताऱ्या माणसानं नेमकं काय पोहोचवायचं? असं काहीतरी जे त्याने स्वतः अनुभवलं असेल, दीर्घायुष्यामुळे आलेले स्वाभाविक अनुभव. दीर्घायुष्य म्हणजेच दीर्घ अनुभव. ज्यांनी अजून इतके पावसाळे पहिले नाहीयेत, अशा तरुण स्त्री-पुरुषांना एखादा म्हातारा माणूस त्याच्या दीर्घायुष्यातले अनुभव सांगू शकतो. परंतु हे अनुभव अर्थातच भूतकाळातले असतात. त्यामुळे इथे आपल्या लक्षात येईल की हा प्रश्न बदलाचा आहे.

इथे आपल्याकडे भूतकाळ आणि वर्तमानाच्या नात्याचं, म्हणजे संप्रेषणाच्या अनुभवात गुंतलेल्या म्हाताऱ्या माणसाच्या आणि तरुण स्त्री-पुरुषांच्या नात्याचं एक उदाहरण आहे. आणि खरोखरच संप्रेषण म्हणजे भूतकाळातील अनुभव पोहोचवणं. ह्याला जोडूनच लगोलग उद्भवणारा प्रश्न म्हणजे भूतकाळ आणि वर्तमानाच्या नात्याचा, जो बदलाचं एक उदाहरण आहे. अशा प्रकारे आपल्यासमोर एक विरोधाभासी परिस्थिती आहे: त्या म्हाताऱ्या माणसाला असं काही संप्रेषित करायचं आहे, जे त्याच्या भूतकाळाचा भाग आहे. त्याचा अनुभव हा भूतकाळाचा अनुभव आहे. पण आजच्या तरुण मुला-मुलींना भूतकाळाच्या अनुभवात रस असू शकतो का? तो केवळ भूतकाळाची निव्वळ पुनरावृत्ती असून चालणार नाही, कारण मग ते संप्रेषित करण्याची काही गरज नाही. मूलभूतदृष्ट्या, अशा प्रकारचं संप्रेषण म्हणजेच परंपरा. तो परंपरेचा अनुभव असतो. आपण असं म्हणू शकतो की वयस्कर असणं म्हणजेच परंपरांचं संप्रेषण करता येण्याची क्षमता असणं.

तुम्हाला माहितीये का परंपरा (tradition) आणि संप्रेषण (transmission) ह्या शब्दांचं जवळचं नातं आहे. खरं तर भाषांतर (translation) हादेखील ह्यांच्याशी निगडितच शब्द आहे. नेमकं सांगायचं तर, काळाच्या ओघात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी परंपरेत समाविष्ट असतात. परंपरा भूतकाळातून वर्तमानात चालत येते. पण ते तितकं सरळसोट नसतं कारण परंपरेच्या मुळाशी संप्रेषण असतं – भूतकाळातून वर्तमानात होणारे – ज्याचा रोख अंतिमतः भविष्यकाळाकडे असतो. भविष्यकाळ हा भूतकाळाप्रमाणेच असावा असा भूतकाळातून वर्तमानात होणाऱ्या संप्रेषणामागचा हेतू असतो. तिथे भविष्यकाळ हा केवळ भूतकाळाची पुनरावृत्ती असावी असं वाटतं. थोडक्यात, परंपरा बदल घडवत नसून बदलाचा प्रतिकार करणाऱ्या शक्तींचं संघटन करत असते. ती भूतकाळातून आलेल्या आणि वर्तमानात संप्रेषित झालेल्या गोष्टीचं स्वरूप धारण करत असते. भविष्यकाळ हा अंधुक, अस्पष्ट, खडतर, अनिश्चित न राहता तो केवळ भूतकाळाची पुनरावृत्तीच असावा हे परंपरेचं अंतिम ध्येय असतं. तर परंपरा म्हणजे बदलाच्या विरोधातल्या संघर्षासाठी आवश्यक असं संप्रेषण होय.

हा काही दुर्बोध, प्रतिगामी, अविवेकी दृष्टिकोन नाही. शेवटी आपल्याला ठाऊक आहे की अत्यंत अविवेकी बदलदेखील घडूच शकतात. केवळ बदल होण्याला तसे काही मूल्य नसतं. उदाहरणार्थ, तुम्ही जर एखाद्या लहान मानवी समूहाचा भाग असाल, आणि जीवनाचं सातत्य टिकवणं हाच जर तुमचा प्रश्न असेल, कारण तुमचे निरनिराळ्या प्रकारचे शत्रू आहेत, वगैरे वगैरे, तर तुम्हाला अशा परिस्थितीत कुठलेही बदल नकोत असं वाटणं साहजिक आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला आपण केवळ अस्तित्वात आहोत हेही पुरेसं वाटतं. त्यामुळे निव्वळ अस्तित्वाचे संदर्भ भविष्यकाळात संप्रेषित करावे असं आपल्याला वाटतं, जेणेकरून जगण्याचं सातत्य टिकून राहील. आपल्याला हे ठाऊक आहे की भूतकाळातल्या किंवा वर्तमानातल्या छोट्या मानवी समूहांसाठी परंपरेचा रोख त्या समूहाच्या अस्तित्वाचं सातत्य टिकवून ठेवण्याकडेच असतो. बदल काहीसा नकारात्मक समजला जातो कारण तो त्या समूहअस्तित्वाचा पायाच परिवर्तित करतो.

त्यामुळे, उदाहरणादाखल सांगितल्याप्रमाणे, एका म्हाताऱ्या माणसाकडून समूहातल्या इतरांपर्यंत होणारं संप्रेषण हे एक प्रकारच्या संघर्षाचं संप्रेषण असतं. ती निव्वळ निष्क्रियता नसते. अजिबात नाही. परंपरा स्वीकारली पाहिजे. परंपरेत अंतर्भूत असलेली ही एक सक्रीय दृष्टी आहे. पण तिला बदलाच्या विरोधातील संघर्षदेखील अभिप्रेत असतो. आपण तिला खऱ्याअर्थी संवर्धनवादी बदल1 असं म्हणू शकतो. तो बदल सातत्य टिकवून ठेवण्याच्या आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीनं घडवून आणलेला असतो. सरतेशेवटी, तो पुनरावृत्तीसाठीचा संघर्ष असतो. त्याच्या मुळाशी ही कल्पना असू शकते – आणि बऱ्याचदा असते – की बदल हा त्या समूहाचं सातत्य टिकवून ठेवण्यासाठी योग्य नाही. आणि त्यामुळेच आपल्याला भूतकाळातून वर्तमानात येऊन अशा भविष्याकडे वाटचाल करावी लागते, जी केवळ भूतकाळाची पुनरावृत्तीच असेल. परंतु मला हा मुद्दा अधोरेखित करायचाय की ही भूतकाळाची पुनरावृत्ती निष्क्रिय स्वरूपाची नसते. आपल्याला त्यादृष्टीनं काम आणि त्या पुनरावृत्तीच्या निकडीचं समर्थन करावं लागतं. ह्यात त्या छोट्या समूहाच्या सामूहिक अस्तित्वाच्या पातळीवर अनेक वाईट बदलदेखील घडू शकतात.

साधारणत: ह्या प्रकारच्या संप्रेषणात त्या म्हाताऱ्या माणसाचं स्थान तरुण पिढीला बदलाच्या विरोधातल्या संघर्षासाठी संघटित करणं हे असतं. तो त्या समूहाचं निव्वळ अस्तित्व टिकवून ठेवण्याचा लढा असतो. ह्या दृष्टीतून पाहता, आपसूकच हे कार्य त्या समूहातील एखाद्या म्हाताऱ्या पुरुषाचं किंवा स्त्रीचं असतं. त्याच्यावर किंवा तिच्यावर, संप्रेषण करणं आणि लढ्यासाठी संघटित करणं ही जबाबदारी असते. ह्या संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे परंपरा. तो बदलाच्या विरोधातला एक संघर्ष असतो. त्यानं किंवा तिनं जर संप्रेषित किंवा संघटित केलं नाही, तर त्या समूहाच्या बाबतीत काही विपरीत घडू शकतं. हे सर्व मांडण्यामागे हा मुद्दा आहे की परंपरा आणि बदल, प्रतिगामी विचार आणि बदल घडवून आणण्याची इच्छा ह्यांच्यातला झगडा खूप गुंतागुंतीचा आहे. तो निष्क्रियतेविरुद्धचा झगडा मुळीच नाही. परंपरेतही संघर्षसदृश असं काही असतं. असा काही नियम नाहीये की एक पुरोगामी आणि दुसरं प्रतिगामी, वगैरे. असं म्हणणं फार बाळबोध ठरेल.

म्हातारा माणूस म्हणजे ज्ञानाचा स्वामी ही प्रतिमा आपल्याला परंपरेत आढळते. परंपरेचा स्वामी हा ज्ञानाचाही स्वामी असतो. किंबहुना ज्यानं ज्ञानावर स्वामित्व मिळवलं आहे, त्यानं अचलतेवर आणि शांततेवरही स्वामित्व मिळवलेलं असतं. असा स्वामी मानवतेच्या उगमापाशी2 तयार होतो, तो एका भूतकाळातून, एकाअर्थी अनादी-अनंत3 भूतकाळातून आलेला असतो. हा ज्ञानाचा स्वामी एका अनादी-अनंत भूतकाळाच्या तसाच अनादी-अनंत पुनरावृत्तीच्याही भूमिकेतून बोलत असतो. आणि ह्या स्वामित्वाच्या भूमिकेत कायम एक वृद्ध पुरुषच असतो. परंपरेनुसार कधीच एखादी तरुण मुलगी आपल्याला ज्ञानाच्या संप्रेषितेच्या भूमिकेत दिसत नाही. भविष्यात सापडेल बहुधा, परंतु भूतकाळात नाही. पारंपरिक प्रतिमेनुसार वृद्ध पुरुष हा ज्ञानाचा स्वामी आणि परंपरेचा मूळपुरुष असतो. तो केवळ स्वतःच्या आयुष्याचंच नाही तर आपल्या अर्थपूर्ण भूतकाळाचंही संप्रेषण करणारा असतो.

किंबहुना, आपल्या श्रोत्यांमध्ये बदल घडवून आणणं हेच ह्या स्वामीचं ध्येय असतं. त्याचं ध्येय हे केवळ पुनरावृत्ती करणं हे नसतं. साधारणतः ज्ञानाच्या स्वामीला व्यक्तीमध्ये4 बदल घडवून आणायचा असतो, तरुण मुलाला किंवा मुलीला पुनरावृत्तीच्या दिशेनं बदलायचं असतं. वास्तविक जगाच्या मूलभूत स्थैर्याशी अनुरूप होण्यासाठी आवश्यक बदल त्याला व्यक्तीमध्ये घडवून आणायचा असतो. हे मूलभूत स्थैर्य म्हणजे निसर्गाचं मूलभूत स्थैर्य. परंपरावादी भूमिकेनुसार ज्ञानाचा स्वामी असलेला म्हातारा मनुष्य शुद्ध पुनरावृत्तीचा आग्रह धरत नसून, पुनरावृत्तीच्या बाजूनं श्रोत्यांमध्ये बदल घडवत असतो. ह्या दोन निराळ्या गोष्टी आहेत. त्याला व्यक्तीच्या अंतरंगात चुकीच्या किंवा वाईट बदलाच्या विरोधात एक संघर्ष उभा करायचा असतो. व्यक्तीमध्ये चांगल्या पुनरावृत्तीकडे किंवा निसर्गाच्या पुनरावृत्तीतून निर्माण होणाऱ्या चांगल्या आयुष्याकडे परतण्याची वाट तयार करायची असते. ज्ञानाच्या या दृष्टिकोनातून पाहता निसर्गाची पुनरावृत्ती हेच वास्तविक जग असतं.

आपला प्रश्न हा केवळ समूहाचा प्रश्न नाही – हो, मी हे म्हटलं आहे की साधारणतः समूहाला नियमांच्या पुनरावृत्तीतून आणि बदलाच्या विरोधातील संघर्षातून टिकवून ठेवणं ह्याची धुरा म्हाताऱ्या मनुष्याच्या हातात असते – परंतु आपल्यासमोर अजून एक नवी समस्या आहे ती म्हणजे बदलाच्या प्रश्नाचं आणि निसर्गाच्या प्रश्नाचं एकमेकांशी असलेलं नातं. याचं आधुनिक रूप म्हणजे पर्यावरणाचा प्रश्न5. अर्थात, जुन्या परंपरेत, ज्ञानाच्या स्वामीस असं वाटत असं की आपण निसर्गातील स्थित्यंतराला पूरक असलं पाहिजे, जे मूलभूतदृष्ट्या आपल्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं असतं त्याला आपण पूरक असलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला व्यक्तिनिष्ठ बदलाच्या विरोधात संघर्ष करावा लागेल कारण तो बदल निसर्गाच्या विराट विश्वासमोर अपुरा पडतो. साधारण ह्या अर्थाचं म्हणणं आपल्याला स्टॉइक दर्शनाच्या6 परंपरेत आढळतं. स्टॉइक दर्शन हादेखील मनुष्याच्या चुकीच्या बदलाविरुद्धचा एक प्रकारचा संघर्षच आहे. निसर्गाच्या विराट विश्वात आपल्यामध्ये एकप्रकारची स्थितप्रज्ञता7 असायला हवी.

समकालीन पर्यावरणशास्त्राविषयी मी काही शब्द बोलू शकतो. शेवटी ती मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील नात्याचीच आधुनिक रूपातील चर्चा आहे. आजची पर्यावरणशास्त्रीय दृष्टी बहुतेकवेळा हेच सांगत असते की मानवाला नवतेच्या राक्षसी इच्छेनं ग्रासलं आहे, बदलाची राक्षसी इच्छा, खुद्द निसर्गातच बदल घडवून आणण्याची इच्छा! आणि म्हणून माणूस एका अर्थी निसर्गाचा विनाश करत चाललाय, यातून उद्भवणारा धोका त्यानं स्वीकारला आहे. याविरुद्धचा संघर्ष नेमका काय आहे? तो एक सखोल पर्यावरणीय संघर्ष आहे, विचारांची दिशा ठरवणारा, मानवजातीच्या अमर्याद सामर्थ्यानं आणि इच्छेनं होणारा पर्यावरणाचा विनाश रोखणारा संघर्ष. काही अर्थी ही एकप्रकारच्या परंपरेकडे परत जाणारी दृष्टी आहे, कारण ती बदलविरोधी आहे. निसर्गाच्या वैश्विकतेचा आपण आदर केला पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे असा दावा करणारी ही परंपरा आहे. नैसर्गिक स्वरूपातल्या सगळ्याचा आपण आदर केला पाहिजे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे. सजीव प्राणी नेहमीच मानवी नसतात, आणि निसर्गामध्ये असं काहीतरी असतं ज्याला पुनरावृत्ती आणि अस्तित्व टिकवून ठेवण्याचा हक्क असतो, ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. मानवजातीच्या निर्दयी इच्छेमुळे होणाऱ्या विध्वंसापासून सजीवांची सुटका आपण होऊ दिली पाहिजे.

पर्यावरणशास्त्रामध्ये बदलाच्या प्रश्नाचं एक नवं रूप आपल्याला दिसतं. कदाचित आपण एक आधुनिक परंपरा तयार करावी हे त्यामध्ये अपेक्षित असावं. हे आपण नेमकं समजून घेतलं पाहिजे : एका अर्थी आपण निसर्गाची पुनरावृत्ती जपतोय म्हणून ही आधुनिक परंपरा ही एक परंपराच आहे. इथे पुनरावृत्ती केवळ निसर्गाची अंतर्भूत अखंडता, तिचं वैविध्य टिकवण्यात आहे. या अखंडतेमध्ये खंड पाडणं आपण थांबवलं पाहिजे. राक्षस तयार करणं आपण थांबवलं पाहिजे, खून करणं, आण्विक आपत्ती वगैरे आपण रोखल्या पाहिजेत. निसर्गाचा नाश थांबवायचा असेल तर आपल्याला काही एका अर्थानं अखंडतेचा नियम मान्य करावा लागेल. म्हणून मी आधुनिक परंपरा असं म्हणतोय.

हवं असल्यास आपण याची तुलना पारंपरिक क्रांतिकारी दृष्टीशी करू शकतो कारण पारंपरिक क्रांतिकारी दृष्टी ही पूर्णपणे बदलाच्या बाजूनं असते8. एका अर्थी क्रांतिकारी दृष्टीला 'आपल्याला जुन्या जगाचा नाश करावाच लागेल' ही कल्पना मान्य असते. परंतु जुन्या जगाचा नाश करायचा म्हणजे जुन्या निसर्गाचाही नाश करायचा आणि निसर्गाला पूर्णपणे क्रांतिकारी बदलाच्या हाती सुपूर्द करायचं. ही केवळ एक अमूर्त कल्पना नाहीये, तर खरीखुरी इच्छा आहे. क्रांतिकारी इच्छेला निसर्गाच्या वैश्विकतेबद्दल तसा काही फारसा आदर नसतो. प्रथमतः, तिला मानवी जीवनाशी निगडित असलेल्या कशाचाही आदर नसतो. तेव्हा जुन्या क्रांतिकारी परंपरेत आपण जीवितहानी करायची की नाही हा केवळ प्रश्न नसून, ती करावीच लागते अशी भूमिका आहे. नव्याची निर्मिती करायची आहे ना तर मग मारा आणि जुनं जग नष्ट करा! नव्याची निर्मिती एकाचवेळी जुन्या जगाच्या आत आणि त्या जगाच्या विनाशाकडे होणाऱ्या वाटचालीतून होते. या सगळ्यामध्ये निसर्ग म्हणजे एक निष्क्रियता, पुनरावृत्ती असते, आणि ती क्रांतिकारी बदलाच्या परिघाबाहेर असते.

म्हणून पर्यावरणाचा विचार जुन्या क्रांतिकारी दृष्टीचा भाग नसतो. पर्यावरणाचा विचार हे काहीतरी वेगळं आहे, कारण ती पारंपरिक क्रांती असते ती स्वतः परंपरेनेच सुरू केलेली क्रांती असते. पर्यावरणाचा विचार एक नवी परंपरा रुजवू पाहत असतो. त्याला नव्या रूपाची शुद्ध प्रगती किंवा शुद्ध 'होत राहणं' (becoming) नको असतं. हा खरं तर एक गुंतागुंतीचा परंतु मजेशीर प्रश्न आहे, नव्या परंपरेची इच्छा आणि क्रांतिकारी परंपरा यांच्यातील नात्याचा हा प्रश्न आहे. थोडक्यात आपण म्हणू शकतो की पर्यावरणाचा विचार हा क्रांतिकारी परंपरेत घडवून आणलेली क्रांती आहे, एक नवी परंपरा घडवण्याचा तो प्रयत्न आहे. हा विचार क्रांतिकारी परंपरेची एकप्रकारे टीकाही असतो. ज्याला मी जुनी क्रांतिकारी दृष्टी म्हणतो तीही एक प्रकारची परंपराच असतं. ती बदलाची परंपरा असते. इथे लगेच आपल्या लक्षात येतं की पर्यावरणीय दृष्टीतून आपल्याला एक नवी परंपरा हवी आहे, अशी परंपरा जिच्यात न केवळ बदल पण अखंडता आणि पुनरावृत्ती ह्यांच्याही सहयोगानं रचलेला भविष्यकाळ असेल.

ही एक खूप नवी समस्या आहे. या सगळ्यामध्ये एक आधिभौतिकात्मक (metaphysical) प्रश्न समाविष्ट आहे, हे समजून घेतलं पाहिजे. प्रश्न निसर्ग आणि इतिहास यांच्या नात्याचा आहे. आधुनिक जगाची व्याख्या आपण पुढीलप्रमाणे करू शकतो : इतिहास पुनरावृत्तीवर आधारलेला असतो हे जिथे स्वीकारार्ह नाही असं जग. आधुनिक असण्याची ही सर्वांत महत्त्वाची व्याख्या आहे. आजचं जग हा आधुनिक जगाचा केवळ एक भाग किंवा फार तर एक टप्पा आहे. इतिहास परंपरेवर उभा असतो आणि परंपरा पुनरावृत्तीवर उभी असते हे मानवजातीला मान्य नाही. आजच्या जगाला पुनरावृत्ती होणारं जुनं सगळंच नष्ट करावं असं वाटतं. यामुळे इतिहास निसर्गापासून पूर्णपणे वेगळा होतो. इतिहासाचे नियम हे निसर्ग-नियम नसतात, असं आजच्या जगाला वाटतं. या भिंगातून पाहताना इतिहास हा खरं तर एक निसर्गविरोधी संघर्ष आहे अशी कल्पना माणूस विकसित करतो, आणि ऐतिहासिक बदलाची किंमत अनेकदा निसर्गाचे काही भाग नष्ट करून मोजावी लागते. हायडेगर ज्याला techne म्हणतो त्या तंत्रवैज्ञानिक शोधांचा हा प्रश्न आहे, ज्यायोगे तंत्र केवळ निसर्गाचाच नव्हे तर मानवतेचा किंवा एकूण अस्तित्वाचाच विध्वंस आणि ऱ्हास करतं.

ही एक उच्छेदवादी (nihilistic) क्रिया आहे. खरा प्रश्न हा आहे की आपलं ऐतिहासिक अस्तित्व उच्छेदवादी आहे का? अर्थातच, मानवी जग हे संपूर्णतः निसर्गाच्या नियमांना पूरक नाहीये. आपल्या इतिहासदृष्टीनुसार आपण निसर्गाचे काही भाग नष्ट करू शकतो. आपण मानवतेच्या ऐतिहासिक परंपरेचेदेखील काही भाग नष्ट करू शकतो, कारण निसर्गाविरुद्धचा लढा हा एका अर्थी परंपरेविरुद्धचा लढा असतो. तो मानवी परंपरेविरुद्धचाही लढा असतो. उदाहरणार्थ, आपण छोट्या (मानवी) समूहांना नष्ट केलं. आपण छोट्या समूहांना फारच कमी काळात नष्ट केलं, अक्षरशः काही शतकांमध्ये, थोडक्यात म्हणायचं झाल्यास हा काळ नगण्य आहे. आज आपण ज्याला आधुनिक जग म्हणतो, ते घडवण्यासाठी आपण काही शतकांमध्ये असंख्य भाषा, छोटे समूह आणि संस्कृती नष्ट केल्या असणार. हा प्रश्न बदल आणि पुनरावृत्तीचा आहे. हे अगदी खरंय, की आधुनिक जग केवळ क्रांतिकारी जग नसून ते भांडवलवादी जगही आहे. आणि हे ही खरंय की भांडवलवादी जगदेखील सर्वप्रथम निसर्गाचा खूप मोठा भाग नष्ट करतंय. आज आपण सगळेच काही अर्थानं हे मान्य करतो की आपला इतिहास म्हणजे निव्वळ पुनरावृत्ती आणि परंपराधारित असू शकत नाही. भांडवलशाही व्यवस्थेच्या इतिहासातील तीन ते चार शतकांमध्ये आपण प्रचंड प्रमाणात सजीव जग, संस्कृती, छोटे समूह, भाषा इत्यादींची हानी केली आहे.

निव्वळ पुनरावृत्ती आणि परंपरेवर आधारित असणाऱ्या जगात परतणं आज कुणालाही मान्य नाहीये. पर्यावरणशास्त्रालादेखील निव्वळ परंपरांचं संप्रेषण करणाऱ्या जुन्या जगात परतण्याची इच्छा नाहीये. पर्यायानं पर्यावरणशास्त्राची भूमिका खऱ्या अर्थानं नवीन परंपरा निर्माण करणं, अशी आहे. ती जुन्या परंपरांची पुनरावृत्ती करणं नसून, नवीन, आधुनिक परंपरा निर्माण करणं अशी आहे. ह्यामुळेच पर्यावरणशास्त्र कधी कधी पारंपरिक ज्ञानाची बाजू घेतं. अशी नवीन परंपरा निर्माण करण्यामागची अडचण बहुधा ही आहे की ही परंपरा भूतकाळातील परंपरांचं संप्रेषण करणाऱ्या म्हाताऱ्या माणसाकरता नाहीये, तर बहुधा अशा तरुण-तरुणींसाठी आहे, जे वर्तमानातील परंपरेचा भाग आहेत. आपल्याला हे मान्य करावं लागेल की ही एक विरोधाभासी परंपरा आहे. ती एक अशी परंपरा आहे, जी भूतकाळातून वर्तमानाकडे वाटचाल करणारी नसून, वर्तमानातून थेट भविष्याकडे वाटचाल करणारी असावी. तो एक असा भविष्यकाळ निर्माण करण्याचा प्रयत्न असतो, जो निव्वळ बदलाचं, एका विध्वंसक बदलाचं सातत्य टिकवून ठेवणारा नसतो.

प्रश्न हा आहे की आपण निसर्गाचा विध्वंस करण्याला नकार का द्यायचा? आणि ह्यात कठीण भाग हा आहे की पर्यावरणशास्त्राची इतिहासदृष्टी काय आहे? आपल्याला हे समजू शकतं, निसर्गाचा संपूर्णपणे ह्रास करणं अत्यंत घातक आणि भयानक आहे, हा पर्यावरणशास्त्राचा स्वाभाविक दृष्टिकोन असतो. नैसर्गिक परंपरेतून येणाऱ्या पुनरावृत्तीतला काही भाग आपण एका अर्थानं मान्य केला पाहिजे, कारण मनुष्य शेवटी निसर्गाचा एक भाग आहे. त्यामागचा सखोल विचार हा आहे की आपण इतिहास आणि निसर्ग ह्यांचं पूर्ण विलगीकरण नाकारलं पाहिजे. हा मुद्दा तसा कठीण आहे. इतिहास आणि निसर्गामध्ये एका नव्या शांतीचा प्रस्ताव पर्यावरणशास्त्र मांडतं, जी मानवी आणि प्राणी जगतातील शांतीदेखील असेल, वगैरे, वगैरे. ती सर्व जैव जगतातली नवी शांती असेल. तर मुद्दा हा आहे की इतिहास आणि निसर्ग ह्यांतील नातेसंबंधाविषयीची एक नवी दृष्टी आहे. आपण निसर्गाची हानी नाही केली पाहिजे, हा निसर्गाच्या बाजूनं केलेला दावा आपण समजू शकतो. पण ह्या सगळ्याचा दुसऱ्या बाजूवर, म्हणजे इतिहासाच्या संकल्पनेवर नेमका काय परिणाम होतो; पर्यावरणशास्त्राची इतिहासदृष्टी काय आहे; ही आपल्यासमोरची खरी समस्या आहे.

ही आधुनिक जगापासून घेतलेली फारकत आहे, कारण आधुनिक जग इतिहास आणि निसर्ग ह्यांना एकमेकांपासून विलग करतं. उदाहरणार्थ, मानवजात निसर्गाची स्वामी असते, ह्याला देकार्तनं (Descartes) होकार दिला होता. आणि त्यामुळे निसर्ग ही आपल्यासमोरील समस्या नाही. आपण त्याची हानी करू शकतो, त्याच्याकडून आपल्याला जे हवं ते घेऊ शकतो, वगैरे वगैरे. पर्यावरणशास्त्रामध्ये आपल्याला एका वेगळ्या संकल्पनेला दिलेला होकार आढळतो, आणि ही संकल्पना म्हणजे आधुनिक जगापासून घेतलेली फारकत. निसर्गासोबत केल्या जाणाऱ्या नव्या शांतीस दिलेला हा होकार आहे. परंतु पर्यावरणशास्त्राची इतिहासदृष्टी काय आहे? शेवटी, हा एक तत्त्वज्ञानात्मक प्रश्न आहे. निसर्गाशी शांती प्रस्थापित करणाऱ्या अशा एका संपूर्णपणे नव्या इतिहासदृष्टीचा शोध लावणं किंवा तिची निर्मिती करणं आज आपल्याला शक्य आहे का? निसर्गाशी केल्या जाणाऱ्या ह्या शांतता-करारात मानवजातच दोन्ही बाजूंना आहे. आणि हीच मुख्य समस्या आहे. निसर्ग मुका आहे, निसर्ग काही बोलत नाही, निसर्ग अजिबात बोलूच शकत नाही. त्यामुळे, मानवजातीनं स्वतःशीच केलेली ही एक वाटाघाट आहे.

ही एक अशी ऐतिहासिक दृष्टी आहे जिच्यात आपण इतिहास आणि निसर्ग ह्यांच्या नातेसंबंधांविषयी चर्चा करतो आणि ते तपासून पाहतो. पण ह्याची दखल घेणं फार महत्त्वाचं आहे की आपण इतिहास आणि निसर्ग ह्यांच्यातील नव्या नात्याचा निसर्गाच्या बाजूनं विचार करू शकत नाही. त्याचा इतिहासाच्याच बाजूनं विचार करणं अपरिहार्य आहे. आपण हे सर्व गृहीत धरलं पाहिजे. आजची पर्यावरणवादी समस्या म्हणजे आधुनिक जगाशी फारकत घेण्याची समस्या ही एका क्रांतिकारी परंपरेपासूनही फारकत घेणारी असते. समस्या ही आहे की निसर्गाशी नवं नातं जोडताना त्याची ऐतिहासिक आणि आधुनिक जगाच्या परिप्रेक्षात राहून चर्चा कशी करता येईल. आधुनिक जग म्हणजे इतिहास आणि निसर्ग ह्यांच्या विलगीकरणाला दिलेला होकार. ही एक ठोस समस्या आहे. उदाहरणार्थ, जर काही प्राण्यांचं रक्षण करायचं ठरवलं तर तुम्ही ते नेमकं कसं करणार? तुम्ही प्राण्यांचं रक्षण कसं करणार? प्राण्यांचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला संपूर्णपणे मानवी निर्णय घ्यावे लागतील. उदाहरणार्थ, तुम्ही प्राण्यांना एखाद्या शांत ठिकाणी ठेवू शकाल. पण शांत जागा म्हणजे काय हे तुम्हाला स्पष्ट करावं लागेल. प्राणी ह्या बाबतीत तुम्हाला काही मदत करू शकणार नाहीत, ते काही बोलत नाहीत. तुम्हालाच त्या जागेच्या शांततेची व्यवस्था लावून द्यावी लागेल. सामान्यतः तो एक संघर्ष असतो. खरं तर, प्राण्यांचं रक्षण करणं म्हणजे एक युद्धच असतं. आपल्याला केवळ मानवी साधनांचाच वापर करून प्राण्यांचं रक्षण करावं लागतं, आणि कदाचित बरेचदा हिंसक मानवी साधनांचा.

या परिस्थितीत खूप विरोधाभास आहे. आधुनिक जगात निसर्गाशी नवं नातं तयार करण्यासाठी आधुनिक जगाची सर्व साधनं एकत्रित केली जात आहेत. शिवाय, आधुनिक जगाची साधनं इतिहास आणि निसर्ग ह्यांच्यातील विरोधाभासाच्या आत एकत्रित केली जात आहेत. हा विरोधाभास ताबडतोब बाजूला सारणं शक्य नाही, बहुतेक अशक्यच आहे. ही आपल्यासमोरची पहिली समस्या आहे. दुसरी समस्या विध्वंसाच्या प्रश्नाची. पहिली समस्या इतिहास आणि निसर्ग ह्यांच्यातील नातेसंबंधांची होती, पण आता मात्र आपल्यासमोर दुसरी, तत्त्वज्ञानात्मक समस्या आहे, ती म्हणजे निसर्गाबद्दलची. निसर्ग म्हणजे काय? पर्यावरणशास्त्र अपरिहार्यपणे निसर्ग ह्या संकल्पनेविषयीच नवीन प्रस्ताव सादर करतं. तो निसर्गाच्या व्याख्येत झालेला बदल आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण हा सत्ताशास्त्रीय (ontological) प्रश्न आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की निसर्गाची हानी करणं थांबवलं पाहिजे, तेव्हा निसर्गाचा खरा काय अर्थ आपल्याला अभिप्रेत आहे? आपण निसर्गाचा विचार केवळ सातत्य, पुनरावृत्ती आणि निर्मिती (creation) एवढाच मर्यादित ठेवून चालणार नाही. मृत्यू आणि विनाश हेदेखील नैसर्गिकच असतात. जीवनाचा विचार करणं म्हणजेच मृत्यूचा विचार करणं. अर्थातच, मृत्यू आणि विनाश हे इतिहासाचा भाग असतात. निसर्ग हा सगळ्यात मोठा serial killer आहे, त्याच्याशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही. आणि शेवटी इतिहासतले मृत्यू आणि निसर्गातले मृत्यू ह्यांची तुलनाच होऊ शकत नाही. निसर्ग हा सगळ्यात मोठा मृत्यूदाता असतो.

आपण जेव्हा निसर्गासोबत शांतता-कराराचा प्रस्ताव करतो, तेव्हा एका अर्थानं ती दोन मारेकऱ्यांमध्ये होणारी वाटाघाटी असते. आणि त्यामुळे पर्यावरणशास्त्र हे एका अर्थी मृत्यूचं चिंतन असावं. बऱ्याचदा पर्यावरणशास्त्र जीवनाचं चिंतन करण्याला प्राधान्य देतं. परंतु आपल्या नैसर्गिक अस्तित्वाच्या पातळीवर असणाऱ्या जीवन आणि मृत्यूमधल्या द्वंद्वात्मक नात्याचा तत्त्वज्ञानात्मक विचार करण्यावाचून आपल्याला पर्याय नाही. निसर्ग मानवजातीला आणि सजीवांच्या संपूर्ण जगालाच नष्ट करू शकतो. तुम्हाला डायनॉसोरबद्दल माहिती असेलच. त्यांच्यासाठी एक जग होतं, एक संपूर्ण जग होतं. सरपटणाऱ्या प्राण्यांचं एक संपूर्ण आणि विलक्षण जग असतं. आपल्याला डायनॉसॉर्स आवडतात कारण ते मेले आहेत, कारण निसर्गानं त्याचं काम केलंय, त्या सर्वांना नष्ट केलंय. तो आपल्या ग्रहावरील एका संपूर्ण सजीव अस्तित्वाचा संपूर्ण विनाश होता.

आपण नाही म्हटलं तरी छोटे मारेकरी आहोत. जीवन आणि मृत्यूच्या प्रश्नाबाबत निसर्ग अत्यंत अलिप्त असतो. निसर्गाच्या दृष्टीनं जीवन आणि मृत्यू ह्यांमध्ये द्वंद्वात्मक समता असतं. सर्व जीवन ही मृत्यूकडे होणारी वाटचालही असते, आणि मृत्यूसुद्धा जीवनाची एक महत्त्वाची पूर्वअट असते. निसर्गात सगळीकडेच मारेकरी असतात आणि मनुष्यजातदेखील मारेकरी आहेच. मला वाटतं, समस्या ही आहे की निसर्गाचा आपण भाग आहोत आणि आपली निसर्गाशी काहीतरी बांधिलकी आहे हे ज्याआधारे आपण मान्य करू शकतो अशा नवीन परंपरेचा शोध लावणं अशक्य आहे. हे संपूर्णपणे नैसर्गिक नियमानुसार किंवा पूर्णतः निसर्गाच्या बाजूनं असलेल्या एखाद्या नियम किंवा विचारांनुसार करणं अशक्य आहे. जीवन आणि मृत्यूपैकी कशाच्याच बाजूनं निसर्ग विचार करू शकत नाही. निसर्गासाठी जीवन आणि मृत्यू एकाच पातळीवर असतात. त्यामुळं आपल्याला निसर्गाचा संहार थांबवायची इच्छा असेल – ज्या इच्छेचं मूळ पूर्णपणे नैसर्गिक स्वरूपाचं नाहीये – तर पर्यावरणशास्त्रातच काहीतरी अनैसर्गिक (artificial) असणार. कारण ते मानवनिर्मितही आहे. मला वाटतं निसर्गाकडे पाहण्याची नवीन ऐतिहासिक दृष्टी देणं हे पर्यावरणशास्त्राचं , विद्वत्तापूर्ण पर्यावरणशास्त्राचं, तत्त्वज्ञानात्मक पर्यावरणशास्त्राचं आणि राजकीय पर्यावरणशास्त्राचं इतिकर्तव्य आहे. निसर्गाकडे पाहण्याची ही नवी ऐतिहासिक दृष्टी मृत्यूवरचं एक नवीन चिंतनदेखील असेल. मानवतेकडे आणि निसर्गाकडे बघण्याच्या आपल्या दृष्टिकोनात मृत्यूचं नेमकं काय स्थान आहे? हा एक नवा चिंतनात्मक प्रश्न आहे. मी ह्याला एक तत्त्वज्ञानात्मक प्रश्न म्हणून सामोरं जाऊ इच्छितो.

बराच काळ मृत्यूचा प्रश्न हा धार्मिक प्रश्न होता. आपण हे मान्य केलं पाहिजे की मृत्यूचा प्रश्न शतकानुशतकं लाखो लोकांसाठी एक धार्मिक प्रश्न होता. ही वस्तुस्थिती आहे. माझ्या मते पर्यावरणशास्त्राच्या बाबतीत काही अस्पष्ट असेल, पण तितकंच आशादायी असेल, तर ते म्हणजे अधार्मिक दृष्टीनं मृत्यूच्या प्रश्नाचा शोध. मृत्यूच्या प्रश्नाचा असा अधार्मिक दृष्टीनं विचार करणं हे विनाशाचा विचार करण्याचं नवं प्रमाण असायला हवं. ते निसर्ग आणि इतिहास ह्यांच्या नात्यासंदर्भात संहार म्हणजे नेमकं काय ह्याचा नव्यानं विचार करण्याचं प्रमाण असायला हवे. मला वाटतं आपल्याला आपल्या आधुनिक जगात – म्हणजे अशा जगात जिथे सतत बदल होत असतो, सतत नवीन शोध लावले जात असतात, सतत नाश होत असतो – मृत्यू म्हणजे काय ह्याची कल्पना नाहीये. आपल्यापाशी धार्मिक दृष्टींचे काही अंश आहेत, आपण अजूनही मृत्यूकडे धार्मिक दृष्टीनंच बघतो. परंतु मृत्यूचा धार्मिक दृष्टीनं विचार करणं हा जुन्या परंपरेचा भाग आहे, ती केवळ तग धरून राहिलेली जुनी परंपरा आहे. मृत्यूकडे बघण्याची नवी दृष्टी आपल्याकडे नाहीये. ह्यामुळेच आपण संहार करू शकतो. आपण मृत्यूच्या कल्पनेशिवाय9 (idea) जगत आहोत. आपण शेकडो प्राण्यांना अन्नासाठी मारू शकतो आणि शेकडो माणसांनादेखील मारू शकतो. तुम्हाला कळतंय का, की ह्या सगळ्याची उत्तरं आपल्याला निसर्गात सापडू शकत नाहीत आणि ह्यामागील साधं कारण म्हणजे निसर्गदेखील कुठलेही प्रश्न न विचारता मारतो.

बहुधा भविष्यात म्हाताऱ्या स्त्री किंवा पुरुषाचं काम मनुष्य आणि निसर्ग ह्यांच्यात होऊ शकणाऱ्या शांतता-करारासंबंधीच्या नव्या परंपरेचं संप्रेषण करणं हे असू शकेल. बहुधा ती मृत्यूकडे पाहण्याची नवी ऐतिहासिक दृष्टी असू शकेल. आपल्या जगात मृत्यू अर्थहीन आहे. ते शुद्ध निरर्थकतेकडे परतणं आहे. मृत्यूची त्याच्या नैसर्गिक अस्तित्वाकडे रवानगी केली गेली आहे. आपलं मरण अपरिहार्य आहे, तो एक निसर्गाचा नियम आहे. मरण अपरिहार्य आहे हा काही इतिहासाचा नियम नाही, तो निसर्गाचा नियम आहे. तुम्हाला जर एक नवीन परंपरा हवी असेल, जी धार्मिक परंपरांची पुनरावृत्ती नसेल, तर मग तुम्हाला मृत्यूचा नव्यानं अर्थ लावावा लागेल, जीवन आणि मृत्यू ह्यांच्यातील नात्याचा नव्यानं अर्थ लावावा लागेल. पर्यावरणशास्त्राचा अतिशय गुंतागुंतीचा प्रस्ताव ह्या दिशेनं जातो. जीवन आणि मृत्यूचं नातं केवळ नैसर्गिक नियम म्हणून न पाहता, इतिहासाच्या दृष्टिकोनातून कसं दिसतं? हा निसर्गाचा नव्यानं अर्थ लावण्याचा एक मार्ग आहे, जो एका नवीन ऐतिहासिक संकल्पाचा भाग आहे.

आपण ह्या प्रश्नापासून सुरुवात केली की म्हातारा पुरुष किंवा स्त्री हे भविष्याचे संप्रेषक असू शकतील का? म्हणजे तो एका तत्त्वज्ञानात्मक परंपरेच्या शक्यतेबद्दलचा प्रश्न होता, आणि त्याचा संबंध मृत्यूसोबत जगणं म्हणजे नेमकं काय ह्या प्रश्नाचं तत्त्वज्ञानात्मक संप्रेषण करणं हा होता. त्याचा संबंध एका नवीन विचाराशी, एका नवीन ऐतिहासिक विचाराशी, मानवी इतिहास आणि निसर्ग ह्याच्या एकमेकांशी असलेल्या नात्याविषयीचा विचार संप्रेषित करण्याच्या प्रक्रियेत भाग घेण्याशी आहे. हा प्रश्न अनुत्तरित आहे. हा तुमचा प्रश्न आहे, म्हाताऱ्या माणसाचा नाही. हा भविष्याबद्दलचा प्रश्न आहे. आपला मृत्यू अपरिहार्य आहे. मानवजातीच्या इतिहासाचा तो भाग आहे आणि त्याचं मूळ संपूर्णपणे नैसर्गिक आहे, आणि म्हणूनच जर आपल्याला इतिहास आणि निसर्गामधील नातं बदलायचं असेल तर मृत्यूशी देखील आपलं नातं आपण बदललं पाहिजे. जुन्या परंपरेनुसार ही धार्मिक दृष्टी होती, अगदी निःसंशयपणे. बहुधा, आपण ती धार्मिक परंपरा टिकवून ठेवू शकतो, पण तुम्हाला ठाऊक आहे की आधुनिक जग आणि अशाप्रकारे परंपरा टिकवून ठेवणं ह्यांमध्ये एक विरोधाभास असतो. कारण ती जुनी परंपरा असतं.

नवीन परंपरा, जी अजून अस्तित्वात नाहीये, ती इतिहास आणि निसर्गातील एक नवा करार असेल. ती एक नवी परंपरा तयार होण्याची शक्यता असेल. मानवी इतिहासाच्या पहिल्या टप्प्यात मानवजात ही निसर्गाचा भाग असतं हा विचार समाविष्ट होता. हे छोट्या समूहांना लागू असतं, पण छोटे समूह मानवजातीच्या अस्तित्वाचा एक मोठा भाग असतात. इतिहास घडण्याची प्रक्रिया खूपच कमी कालावधी व्यापते. ते बहुधा केवळ एक संक्रमण असतं. पहिल्या टप्प्यात विचार असा होता की आपण निसर्गाचा भाग आहोत, आणि त्यामुळे मानवता ही एकाप्रकारे निसर्गाशी केलेली वाटाघाटी आहे आणि हे नातं एकाप्रकारे घनिष्ट आणि अंतस्थ आहे. उदाहरणार्थ, ह्यामुळे आपण जेव्हा प्रागैतिहासिक गुहांतल्या भिंतींवर प्राण्यांची ती अभूतपूर्व चित्रं पाहतो, तेव्हा आपल्याला जाणीव होते की प्राणी ह्या जगाचा मूलभूत भाग आहेत, किंबहुना प्राण्यांचं जग हेच जग आहे. आणि त्यानंतर येतो तो इतिहास आणि निसर्ग ह्यात उत्तरोत्तर केला जाणारा मूलभूत फरक. ती आधुनिक जगानं संथ गतीनं चालू ठेवलेली प्रक्रिया आहे.

आपण असं म्हणू शकतो की मोठी राज्यं, साम्राज्यं, वगैरे ह्या प्रक्रियेचंच एक रूप आहे. ही सामर्थ्याची (power) पुष्टी आहे, इतिहास नावाच्या सामूहिक सामर्थ्याची, सर्व लोकांपासून येणाऱ्या सामर्थ्याची पुष्टी आहे, आणि निसर्गाच्या शक्तीचीदेखील. मानवजातीच्या अस्तित्वाचा हा दुसरा टप्पा आहे. पहिला टप्पा प्रागैतिहासिक आहे, दुसरा ऐतिहासिक. तिसरा असेल आपण केलेली निर्मिती, आपल्यासमोरची शक्यता असेल. आपण जर निसर्गासोबतच्या नव्या कराराचा शोध घेतला नाही – जो जीवन आणि मृत्यू ह्यांतील नवा करार असेल – तर आपण बहुधा डायनॉसोर्ससारखे मरून जाऊ. ही एक शक्यता आहे. मागं वळून पाहता, मनुष्यजात फारशी अद्भुत वाटणार नाही. बहुधा मनुष्यजातीनंतर डायनॉसोर्स पुन्हा येतील. आणि म्हणून मला वाटतं की आपल्याला काहीतरी नवं शोधायला लागणार. त्यामुळं आपण फार काळ असा संहार आणि नाश करत राहू शकणार नाही. पण आज आपल्याकडे ह्यापेक्षा काही वेगळं करण्यासाठीची साधनं नाहीयेत. आणि आपल्याकडे दुसरं काही करण्याची साधनं नाहीयेत कारण जीवन आणि मृत्यू ह्यांच्याशी आपलं नवं नातं कसं असावं ह्याबद्दल स्पष्ट कल्पना आपल्यापाशी नाहीये. हाच खरोखर कळीचा प्रश्न आहे. त्यामुळं तुमचं काम, आपलं काम, मानवी अस्तित्वाच्या तिसऱ्या टप्प्याची दारं खुली करणं, हे आहे. हे काही साधंसुधं काम नाही. त्यामुळे आज आपण सतत कशाच्यातरी शोधात आहोत, त्यामुळे आपण अनिश्चिततेत जगत आहोत, त्यामुळे आपण एका धुरकट जगात वावरत आहोत.

निसंशयपणे प्रश्न बदलाचा आहे. आणि तो आपल्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांपैकी एक असेल. तुम्हाला माहीत असेल की इथे तुमच्यासमोर बदलाच्या दोन स्वतंत्र दृष्टी आहेत. एका अर्थी आधुनिक जगात नवा बदल नेहमीच घडत असतो. बदलाचं जग असतं ते. नवीन उत्पादनं, नवीन शोध, नवीन तंत्रज्ञान, नवीन लोक इत्यादी. नवीन आणि अविरत बदलाचं जग. जेव्हा मी म्हणतो की आपण काहीतरी नवं शोधलं पाहिजे तेव्हा मला 'हा' बदल अभिप्रेत नाही. मला आधुनिक जगाच्या आत अविरत घडणारा बदल अपेक्षित नसून आधुनिक जगच बदलणं अभिप्रेत आहे. अशा तऱ्हेनं बदलाचे दोन अर्थ आहेत ह्या निष्कर्षाला आपण पोचतो. एक म्हणजे जग जसं आहे तसं राखून त्याच्या आत होणारा बदल, आधुनिक जगाच्या आतील बदल, जग जसंच्या तसं राखून बदल घडवणं हाच जणू नियम (law) असल्याप्रमाणं होणारा बदल. शेवटी हा आधुनिक जगाचा महान नियमच आहे की बदला किंवा नष्ट व्हा. अशा प्रकारचा बदल हा एखाद्या नियमाप्रमाणेच असतो, इथे बदल हाच जगाचा नियम असतो.

जग बदलण्यापेक्षा ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. बदल हाच जणू जगाचा नियम, अशा स्वरूपाचा हा दुसरा बदल नाहीये. उलट तो बदलाचा नियमच बदलतो, आणि म्हणूनच तो जग बदलणारा बदल आहे. जिथं बदल हाच नियम आहे अशा जगाला आपण बदललं पाहिजे. आज आपण बदल म्हणजे काय ह्या प्रश्नासमोर उभ्या ठाकलेल्या निर्णायक पेचप्रसंगात (crisis) सापडलोय. परंतु हा पेचप्रसंग एकाअर्थी 'बदल हा जगाचा नियम असतो' हाच धडा आपल्याला शिकवतो. आपली सर्व सरकारं बदल पुन्हा परत यावा यासाठी, म्हणजे आपत्तिजन्य बदल नाही तर सामान्य बदल पुन्हा परत आणण्यासाठी कार्यरत असतात. त्यांना 'बदल हाच नियम' ह्याकडे परतायचंय. खरं तर तो आपत्तिजन्य नियम आहे. कारण पुढची आपत्ती ही इतरांसाठी असेल. आपल्यासमोरचा निर्णायक पेचप्रसंग काय आहे हे समजावून घेताना आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे की आपल्या जगाचा नियम हा अविरत बदल, अविरत प्रगती, शोध, पैशाचं चलन-वलन, इत्यादी आहे. हे बदलाचं एक अतिशय अविरत आणि दुबळं रूप आहे.

आपल्याला जर जगाबरोबर मुळापासून बदलायचं असेल तर पर्यायानं आपल्याला असं जग तयार करावं लागेल जे पूर्णपणे बदलाच्या नियमांतर्गत नसेल. एका अर्थानं, जे बदलाच्या नियमांतर्गत असतं ते जग बदलत नाही. आपण अशी परंपरा मांडली पाहिजे जी जगाचा नियम नसून बदलाची बिनशर्तता थोपवणारी असेल. आपण द्वंद्वात्मक जग तयार केलं पाहिजे, आपण असं जग तयार केलं पाहिजे जे बदल आणि परंपरा ह्यातील द्वंद्वानं बनलेलं वास्तव असेल. हाच खरा मुद्दा आहे. असं जग तयार करणं जे बदल आणि परंपरा ह्यांच्यातील द्वंद्वात्मक नात्यासारखं असेल - असं जग जिथे विनाश, हत्या, ह्यासारख्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी एक स्पष्ट आणि सार्वत्रिक मोजमाप असेल - आपल्याकडे जीवन आणि मृत्यूचा नव्यानं अर्थ लावणारी संकल्पना असली पाहिजे.

त्यामुळे ती निसर्गाबद्दलचीच नवीन संकल्पना असली पाहिजे. ती मानवजातीच्या नैसर्गिक अंगाविषयी असली पाहिजे. इतिहास आणि निसर्ग ह्यांच्या नात्याचा नव्यानं विचार करण्यासाठीची ही पूर्वअट असेल. हा पर्यावरणशास्त्रीय प्रश्न आहे. ह्यामुळेच मी वर्तमानात राहून भविष्यातल्या म्हाताऱ्या माणसाचं वर्णन करू शकतो. जर भविष्यकाळ नव्या जगाच्या परंपरेचं संप्रेषण करणारा असेल तर ते परंपरा आणि बदल ह्यांच्यातील नात्याचं, आणि शेवटी जीवन आणि मृत्यू ह्यांच्यातील नव्या नात्याचंदेखील संप्रेषण असेल. जीवन आणि मृत्यू ह्यांच्यातील नव्या नात्याचं संप्रेषण एका तत्त्वज्ञानात्मक किंवा द्वंद्वात्मक परंपरेच्या भूमिकेतून येतं. द्वंद्वात्मक परंपरा ही अशी परंपरा असते जिच्यामध्ये आपण परंपरा आणि बदल ह्यांचं नातं मान्य करतो. द्वंद्वात्मक परंपरा ही पुनरावृत्ती नसून, परंपरा आणि बदल ह्यातील नव्या नात्याला ती टिकवून ठेवते. निव्वळ घडत राहणाऱ्या बदलाच्या रानटीपणाला ती आवर घालते.

आधुनिक जगात खरी सभ्यता नाही. आधुनिक जग क्रूर आहे. त्यामुळे आज धड कुठलीच परंपरा नाही. आहे ते फक्त जुन्या परंपरांचं सातत्य. धड कुठलीही परंपरा नाही, कारण निव्वळ बदल कुठल्याही परंपरेशिवाय आणि सभ्यतेशिवाय घडत असतो. एकेकाळी परंपरादेखील सभ्यताच होती. आपल्यासोबत ती थिजलेपण, अन्याय, पुराणमतवाद आदींना घेऊन आली होती. आज उरलाय तो फक्त बदलासाठी आणि जीवनासाठी केला जाणारा संघर्ष. एखादी नवीन सभ्यता ही इतिहास आणि निसर्ग ह्यांच्यातील नवा करार असतो, परंपरा आणि बदल ह्यांच्यातील नवा करार. आणि जर हा नवा करार धार्मिक परिप्रेक्षातून उद्भवणारा नसेल तर आपण असं म्हणू शकतो की तो पूर्णपणे तत्त्वज्ञानात्मक असतो.

मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही कधीतरी एका तत्त्वज्ञानात्मक परंपरेची निर्मिती कराल. मी भविष्याचा केवळ एक संप्रेषक आहे, तुम्हाला, तुमच्या मुला-मुलींना, तत्त्वज्ञानात्मक परंपरा निर्माण करता येण्याच्या शक्यतेचा मी संप्रेषक आहे. आज तत्त्वज्ञान अस्तित्वात आहे, पण मी तुमच्यासमोर जिचा प्रस्ताव मांडला तशी तत्त्वज्ञानात्मक परंपरा अस्तित्वात नाही. नक्कीच, आज एक धार्मिक परंपरा, वैज्ञानिक परंपरा अस्तित्वात आहे, पण तत्त्वज्ञानात्मक परंपरा - जिचं दुसरं नाव द्वंद्वात्मक परंपरा आहे - ती मात्र अस्तित्वात नाही. तर सरतेशेवटी मी एका नव्या तत्त्वज्ञानात्मक परंपरेच्या शक्यतेचा प्रेषित आहे. आपण इथे थांबूया.

(भाग २ इथे वाचता येईल.)

--

तळटिपा :

1. इथे conservative changeचं भाषांतर 'परंपरावादी' अथवा 'पुराणमतवादी बदल' असं न करता 'संवर्धनवादी बदल' असं केलं आहे, ज्यायोगे conservative ह्या विशेषणाकडे 'आधुनिकतावादी' पूर्वग्रहाशिवाय बघता येईल.

2. ज्याला इंडो-युरोपियन परंपरेत मनू अथवा Noah अशा नावांनी संबोधलं जातं.

3.इथे eternalचं भाषांतर ‘शाश्वत’ अथवा केवळ ‘अनंत’ असं न करता ‘अनादी-अनंत’ असं केले आहे, ज्यायोगे eternal या शब्दाच्या immemorial ह्या अर्थछटेकडे निर्देश करता येईल.

4.इथे ‘subject’ चे भाषांतर individual या अर्थाने केवळ ‘व्यक्ती’ असे केले असले तरी त्यातून ‘ज्याच्यात अथवा जिच्यात बदल होऊ शकतो, जी बदलाच्या प्रक्रियेला मूर्त रूप देऊ शकते ती व्यक्ती’ ही अर्थछटा अभिप्रेत आहे. तात्विक पातळीवर मात्र बादयु ‘individual’ आणि ‘subject’ ह्यांत फरक करतात. त्यांच्या लेखी Subject ‘होणं’ म्हणजे ‘विचारांचा पाईक होणं’. त्यामुळे इतर दोन लेखात जेव्हा Subject हा शब्द बादयु यांच्या विचारव्यूहातील प्रमुख तात्विक संकल्पना म्हणून येतो तेव्हा त्याचे भाषांतर ‘विचारनिष्ठ’ असे केले आहे आणि subjectivity चे भाषांतर ‘विचारनिष्ठता’ असे केले आहे.

5. इथे ecologyचं भाषांतर 'पर्यावरणशास्त्र' असं न करता केवळ 'पर्यावरण' असं केलं आहे, ज्यायोगे लेखात प्रथमच उपस्थित होणाऱ्या 'ह्या' प्रश्नाची व्याप्ती एका ज्ञानशाखेपुरती मर्यादित नाही हे सूचित होईल. यापुढे मात्र 'ecology' साठी 'पर्यावरणशास्त्र' हाच शब्द वापरला आहे.

6. स्टॉइक दर्शनानुसार आनंद म्हणजे सदाचार आणि सदाचार म्हणजे मानवी इच्छांना निसर्गाक्रमाशी जुळवून घेणं.

7. इथे quiet dispositionचं भाषांतर केवळ 'शांत वृत्ती' अथवा 'शांत स्वभाव' असं न करता 'स्थितप्रज्ञता' असं केलं आहे, ज्यातून स्थितप्रज्ञ शब्दात सामावलेल्या इतर अर्थछटा - तटस्थपणा, निर्विकारपणा, धैर्य, धीरगंभीरता, स्वीकारवृत्ती - देखील ध्वनित होतील.

8. इथे classical revolutionary visionचं भाषांतर 'अभिजात क्रांतिकारी दृष्टी' असं न करता 'पारंपरिक क्रांतिकारी दृष्टी' असं केलं आहे, ज्यायोगे अभिजात शब्दामुळे जागृत होणारा अभिजन हा संदर्भ टाळून, 'पारंपरिक' या विशेषणातून ध्वनित होणाऱ्या जुन्या, पूर्वीपासून चालत आलेल्या, पुनरावृत्त, थिजलेल्या वा साचलेल्या ह्या अर्थछटांकडे निर्देश करता येईल. त्यामुळे पुढे classical revolutionary visionचं भाषांतर थेट 'जुनी क्रांतिकारी दृष्टी' आणि classical revolutionary traditionचं भाषांतर 'जुनी क्रांतिकारी परंपरा' असं केलं आहे. Traditional revolutionचं भाषांतर मात्र 'पारंपरिक क्रांती' असं केलं आहे, ज्यात परंपरा या शब्दातून ध्वनित होणारे सातत्य, संवर्धन अभिप्रेत आहे.

9. इथे ideaचं भाषांतर जरी 'कल्पना' असं केलं असलं तरी त्याचं पर्यायी भाषांतर 'विचार' असंदेखील असू शकतं. इतरत्र संदर्भांनुसार ideaचं भाषांतर 'संकल्पना' अथवा 'विचार' असं केलं आहे. बादियु idea, truth, principle, thought, hypothesis, axiom हे शब्द एकमेकांना पर्याय म्हणून वापरतात. ह्या वरकरणी भिन्न भासणाऱ्या शब्दांना जोडणारे अदृश्य धागे म्हणजे 'द्वंद्वात्मकता' आणि 'वैश्विकता'. Idea ही एकाच वेळी मूर्त असते मात्र पूर्णपणे नसतेदेखील, तिला रूपबंध असतो मात्र पूर्णपणे नसतो, ती विचारांच्या कक्षेत (thinkable) असते मात्र पूर्णपणे नसते, ती ऐन्द्रीय (sensible) असते मात्र पूर्णपणे नसते. त्याचवेळी 'ती' (idea) कोण्या एकाची मक्तेदारी मात्र नसते. विचार करणारा, कल्पना करणारा, सृजनात गुंतलेला, बदलाचा ध्यास घेतलेला, त्यासाठी धडपडणारा असा 'कोणीही' (anyone) तिच्या निर्मितीत, संरचनेत सहभागी होऊ शकतो, तिचा पाईक (subject) होऊ शकतो. थोडक्यात, idea म्हणजे 'ह्या' जगात अस्तित्वात असणारी (आणि तरीही पूर्णपणे नसणारी) एका 'नव्या'' जगाच्या निर्मितीची, कोणालाही प्रयत्नपूर्वक साध्य होऊ शकेल, अशी अपूर्ण 'शक्यता'.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेख एकदा वाचून पाहिला, पण डोकं गरगरायला लागलं. काहीच कळत नाही. भाषांतरकर्त्यांच्या प्रयत्नांची बूज राखायची म्हणून खवचट काही लिहिण्याचा मोह महत्प्रयासाने आवरला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

लेखाच्या अंतर्गत उपशीर्षके असलेले खंड असते तर वाचताना सोय झाली असती, खरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मूळ पुस्तक कोणत्या वाचकांत प्रिय आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0