जयंत पवार : माणूस । लेखक । मित्र - राजीव नाईक

जयंत पवार : माणूस । लेखक । मित्र

राजीव नाईक

--

हा लेख म्हणजे विश्लेषण नाही, संस्मरणच आहे. जवळचा माणूस चांगला लेखक असला की गोची होते. त्याच्या उंचीचा अंदाज नीट येत नाही. जयंता माझा खूप जवळचा मित्र होणार होता. त्याआधीच तो असा दूर गेला. पण इतकं मात्र म्हणेन की तो मला मित्र मानण्याइतपत जवळ आला, ह्यातही मी लकी आहे.

(‘वसा’ २०२१ दिवाळी अंकातून साभार)

Jayant Pawar

जयंता, माझा फार जवळचा मित्र होणार होता; त्या आधी गेला. मात्र मित्र होऊन गेला. तो हळूहळू माझा मित्र होत गेला. त्याची ‘गोष्ट’ थोडक्यात सांगतो, कारण त्यामुळे लेखक जयंत पवार आणि माणूस जयंता थोडा कळू शकेल.

जयंताची आणि माझी ओळख नेमकी कधी आणि कुठे झाली ते आठवत नाही. पण १९८५च्या आधी. म्हणजे पस्तीसहून अधिक वर्षं झाली. गेल्या वीस वर्षांत आम्ही पुष्कळ आणि पुष्कळ खासगीही बोललो. अगदी मित्रांसारखे. परिचित ते स्नेही ते मित्र ह्याला इतकी वर्षं का लागली? माझी भावना आणि अंदाज नोंदवतो.

तो मला दूरचा समजत असावा. म्हणजे वेगळ्या वातावरणातला, वेगळ्या वर्गातला, वेगळ्या विश्वातला; म्हणून वेगळ्या जाणिवांचा, वेगळ्या आस्थांचा, वेगळ्या निष्ठांचा. म्हणजे हा विचारसरणीतला आणि जीवनदृष्टीतलाच फरक झाला. त्याच्या-माझ्या आशय व अभिव्यक्तीचा गाभा व तर्‍हाच वेगळ्या वाटत असाव्या त्याला. माझ्याबद्दल वा माझ्या लिखाणाबद्दलसुद्धा त्याला फारसा जिव्हाळा नसावा. मी एलीट होतो असणार त्याच्यासाठी. कदाचित सुमारही!

मी १९८५ साली त्याचं नाटक ऐकलं होतं, पुण्याला भरलेल्या थिएटर अकादमीच्या नाटककार कार्यशाळेमधे, १९८७ मध्ये ‘वंश’ पाहिलं होतं आणि त्याच्या आधीच्या त्याच्या एकांकिका वाचल्या होत्या, काही पाहिल्याही होत्या. त्या मला फारशा आवडल्या नव्हत्या. त्या मला ढोबळ वाटल्या होत्या. ह्यात विषय आहे, पण रूपाशय नाही, असं वाटत होतं. म्हणजे मला त्याचं लिखाण पुरेसं सोफिस्टिकेटेड वाटत नव्हतं असणार. (एक खुलासा : त्याच्या कथा मला सोफिस्टिकेटेड वाटतात, त्या कित्येकदा अनघड आणि बहुतेकदा वाघड्या असूनही.) मला जयंत पवार हा एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेणारा कोणी एक, एवढंच वाटत होतं. ‘अधांतर’ वगळता त्याच्या नाटकांनीही अजिबात प्रभावित केलं नव्हतं. एकांकिका स्पर्धांबद्दल माझं तेव्हा बरं मत नव्हतं. त्या काळी माझं बहुतेक गोष्टींबद्दल बरं मत नव्हतंच म्हणा – मी स्वतः कसाही असलो आणि माझ्या लिखाणाचा दर्जा कोणताही असला तरी.

म्हणजे आम्हा दोघांनाही एकमेकांच्या ॲक्टिविटीबद्दल फारसा आदर नव्हता आणि एकमेकांबद्दल काही खास प्रेम असण्याचं कारण नव्हतं!

मला त्याची आच जाणवत होती मात्र. त्याला काही म्हणायचं आहे आणि ते म्हणणं महत्त्वाचं आहे हेही जाणवत होतं. आम्ही दोघं एकाच वेळी थिएटर करतोय आणि दोघंही मुंबईतच राहातो आहोत खरे, पण तरीदेखील वेगवेगळ्या मुंबईत वाढलो आहोत, हे तर लक्षात येतच होतं. त्याच्या व माझ्या भोवतीचे लोक आणि त्याचे व माझे अनुभव वेगळे होते, म्हणून मला त्याच्या लिखाणाबद्दल जवळीक वाटत नव्हती का? तसं विचारांती नाही वाटत. मी नामदेव ढसाळांच्या निराळ्या आशयभारी प्रतिमाभरल्या कवितांनी झपाटलो होतो, बाबूराव बागुलांनी अनुप्रासाचाही बेधडक वापर करून घेऊन विदारक अनुभव कसा मांडला असावा, ह्याचा मला विस्मय वाटत होता. मग त्या वेळचं जयंताचं लिखाण माझ्यापर्यंत पोचत का नव्हतं? कसं म्हणू? त्याच्या लिखाणाला ‘विषय’ होते, पण त्याचा ‘आशय’ नव्हता मला जाणवत. आणि त्याला मी नि माझी नाटकं त्याच्या विषय-विश्वापासून खूप लांबच्या कशाबद्दलची तरी वाटत असावीत. कदाचित पोकळसुद्धा. इर्रेलवंट. अर्थात हा फक्त माझा आणि माझाच कयास आणि कयासच आहे; नंतर कधी तरी तो मला, माझा ‘मोकळा’ हा कथासंग्रह (१९८८) वाचला असल्याचं म्हणाला. हे लिहिताना मी त्याच्या-माझ्या परस्परांबद्दलच्या अपेक्षांचा आणि अभिप्रायांबद्दलच्या बदलांचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करत आहे.

जयंताला त्या वेळी स्वतःच्या एकांकिकांबद्दल काय वाटत असेल? १९८५च्या नाटककार कार्यशाळेत नाटक वाचण्याआधी जयंता म्हणाला होता, की मला अजिबात कॉन्फिडन्स वाटत नाही आहे. हा कॉन्फिडन्स फक्त वाचून दाखवण्याबद्दलचा असेल की लेखनाबद्दलचा की एकंदर स्वतःबद्दलचा? सभाधीटपणा जयंताला उशिराच गवसला आणि तरी नंतरही दर वेळी तो आतून बुजला आहे असं वाटत राहायचं. तो त्या वयात स्वतःला आजमावत असेल का? की काहीतरी फुटून बाहेर येणं ह्यातच त्याला हलकं झाल्यासारखं वाटत असेल? की स्पर्धेच्या तगाद्यात मुरायचा अवधीच गायब होत असेल? अलीकडच्या त्याच्या कथा वाचतानाही कधीकधी वाटतं की त्याला रूप-रचना-भाषेचा आगाऊ अंदाज आहे; पण क्वचित असंही वाटतं की हा लिहीत सुटला आहे – अनावरपणे, अभानपणे. त्याच्या कथांवर मिळाल्या तशा त्याच्या एकांकिकांवर त्याला प्रतिक्रिया मिळाल्या नाहीत का? मिळाल्याच असणार. जगभरच्या कथा-कादंबर्‍या त्याने वाचल्या, तसं जगभरचं नाट्यवाङ्मय त्याने तेव्हा वाचलं नव्हतं का? की जे नाट्यप्रयोगसाचे – एकांकिकांचे वा नाटकांचे – त्या वेळी प्रत्यक्ष अवतीभवती होते, तेच त्याने अनुसरले?

‘वंश’ (१९८७) मध्ये तर बॉक्ससेटवाल्या कौटुंबिक नाट्यपठडीचा इन्फ्ल्युअन्स अतिशय जाणवतो. संवादभाषेवरही. ‘अधांतर’ (१९९७) वा ‘माझं घर’ (१९९८) मधेही तो कमी झालेला नाही; पण हे आता केवळ विषयासाठी केलेलं लेखन न वाटता, त्यात वेगवेगळ्या पद्धतीने आयुष्य जगणारी पात्रं भेटू लागतात आणि त्यांच्यातल्या संवादांना, जयंताच्या भाषेलाच थोडी धार येते. ह्या इतर दोन नाटकांचा सांगता येतो, तसा ‘अधांतर’चा पटकन गोषवारा सांगता येत नाही. ह्याचं कारण केवळ विषय महत्त्वाचा न राहाता आशयसूत्रं प्रबल होणं हे असावं. इथे पात्रं रसरशीत झाली, उच्चारित भाषेचं नेमकेपण साधलं. ह्यात व्यक्ती महत्त्वाची आहे, कुटुंब महत्त्वाचं आहे, वस्ती महत्त्वाची आहे, सामाजिक स्तर महत्त्वाचा आहे आणि काळ तर महत्त्वाचा आहेच आहे. कालावकाशाबद्दल ‘अधांतर’ हे नाटक अत्यंत सजग आहे.

‘अधांतर’च्या लेखन-प्रक्रियेबद्दल थोडं बोलतो, कारण तिच्याशी माझी-जयंताची मैत्री-प्रक्रिया जोडली गेली आहे. मंगेश कदम हा जयंताचा मित्र आणि माझाही मित्र. जयंताने १९९०च्या दरम्यान ‘वाळवी’ नावाची एकांकिका लिहिली होती. पण त्याचं समाधान होत नव्हतं. जयंताने ‘वाळवी’चं वाचन माझ्या घरी केलं होतं. नंतरही मी ‘वाळवी’चे काही खर्डे ऐकले. हे ‘अधांतर’चं पहिलं रूप. त्यात आजारी वडील होते, मंजूचं लग्न झालं नव्हतं. मंचावर पाच पात्रं दिसत, खोकणारे वडील दिसत नसत. ‘सावल्या’ (१९८६) ह्या एकांकिकेचं जेव्हा पूर्ण नाटक (लेखन १९८८, प्रयोग १९९१) करायला सत्यदेव दुबे ह्यांनी सांगितलं, तेव्हा मी चेतन दातारला म्हटलं की, एकांकिकेत ज्यांचा उल्लेख येतो ती पात्रं आणू शकतोस मंचावर, प्रत्येक पात्राला एकेक कॉन्फिडण्ट (Confidant) देऊन पाहा. होरॅशिओशिवाय हॅम्लेट नाही आणि सुभद्रेलाही सारंगनयना लागतेच. इट वर्क्ड. हेच मी जयंतालाही सांगितलं. तसं त्याने केलंही. पण त्यात जो जावई सापडला जयंताला तो निव्वळ अफलातून होय आणि मोहनला मात्र कुणी मित्र न देणंही ग्रेट!

पण मी पुढे गेलो. सांगत होतो की जयंता ‘वाळवी’चे खर्ड्यावर खर्डे करत होता. १९९३ साली ‘वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान’ एकांकिका स्पर्धेचे परीक्षक म्हणून मी, विजय तापस आणि मंगेश कदम कणकवलीला गेलो होतो. आम्ही तिथे असताना जयंताचा दोन अंकी नाटकाचा पहिला खर्डा तयार झाला आणि तो घेऊन जयंता चक्क एसटीत बसून मुंबईहून कणकवलीला आला. स्पर्धेनंतर रात्री सुमारे बारा वाजता त्याने नाटक वाचायला सुरुवात केली. खूप नंतर १९९७ साली रंगमंचावर आलेल्या ‘अधांतर’ ह्या नाटकाचे आम्ही पहिले श्रोते ठरलो! त्यानंतरही जयंता खर्डे करतच राहिला…

Adhantar Jayant Pawar

‘अधांतर’ हे जयंताचं पहिलंच नाटक, जे मी टक लावून आणि विस्फारून अनुभवलं. ‘अधांतर’ची लेखन-प्रक्रिया सुमारे सहा-सात वर्षांची होते. इतके खर्डे झालेलं दुसरं नाटक मला ठाऊक नाही. जयंताच्या आस्था, त्याचा अनुभव, त्याचं आकलन ह्यांना इथे अभिव्यक्ती सापडली. इथवर तयार झालेल्या त्याच्या कौशल्यांचा आणि अथक मेहनतीचा परिणाम दिसून आला. पात्रं-प्रसंग, भाषा-रचना, भावना-विचार ह्यांचा नाटकीय संयोग झाला. त्याने निवडलेला घाट मात्र अतिपरिचित होता. तो वास्तववादी, कौटुंबिक नाटकाचा होता; अर्थातच प्रचंड मध्यमवर्गीय लागेबांधे असलेला होता. मला खटकलेल्या नाटकाच्या काही बाबी ह्या पठडीमुळेच निर्माण झालेल्या होत्या. कित्येकदा ‘अधांतर’चं रूप त्याच्या आशयाला सीमित करतं की काय असं वाटतं. पण असंही वाटतं की वास्तववादी पठडीत व कुटुंबाच्या सीमेत राहून जितका परिणाम साधता येईल तितका तरीही ‘अधांतर’ साधतं. नंतरचं ‘काय डेंजर वारा सुटलाय’ (२०१०) हे नाटक ह्या पठडीला छेद देतं. कौटुंबिकतेलाही अणि एकवर्गीयतेलाही. काही झालं तरी ‘अधांतर’ छप्पर डोक्यावर असणार्‍या आणि कधीतरी पावट्याची उसळ किंवा मटण खाऊ शकणार्‍या लोकांचं नाटक आहे. ‘काय डेंजर वारा सुटलाय’मधला बबन येलमाने घरशहरविरहित आहे. बहुतेक कित्येकदा अन्नाशिवायही असावा. ह्या नाटकात पठडीसंकर नीट जमला नाही आणि अनेकस्तरी रचनेची वीण सैल पडली असं वाटतं; पण ते ‘अधांतर’हून महत्त्वाकांक्षी नाटक म्हणावं लागेल. ‘अधांतर’मध्ये लेखक स्वत:च्या अगदी जवळच्या माहोलबद्दल आणि व्यक्तींबद्दल बोलत होता; ‘काय डेंजर वारा सुटलाय’मध्ये तो नाट्यपट विस्तारू बघत होता.

पण जयंताने कौटुंबिक मेलोड्रामाचा बाज त्याला हवा तसा वापरून घेतला हेही खरं, ‘मधल्या भिंती’ (तेंडुलकर), ‘नातीगोती’ (जयवंत दळवी), ‘घर तिघांचं हवं’ (रत्नाकर मतकरी) ह्या नाटकांमध्येही असं झालं आहे. त्याने ह्या घाटाचा वापर करण्याचा प्रयत्न केला खरा, पण अखेर रूपालाही एक आशय असतो. हे रूपच नाकारण्याचा त्याने ‘काय डेंजर वारा सुटलाय’मध्ये प्रयत्न केला. त्याच्या पुढच्या जवळजवळ संपवत आणलेल्या अद्याप अमंचित नाटकात त्याने कोणता प्रयोग केला आहे त्याची उत्सुकता आहे.

जयंता एकांकिका लिहू लागला साधारण १९८१-८२ पासून. तो मिलमधे नोकरीला होता आणि गिरणी-संप ढासळल्यावर सुमारे १९८५ पासून पत्रकारिता करू लागला, आधी ‘चंदेरी’मध्ये, मग ‘महानगर’मध्ये आणि नंतर ‘लोकसत्ता’-‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये. त्याचं वाचन खूप. आपली स्फूर्तिस्थानं म्हणून तो भालचंद्र नेमाडे, विजय तेंडुलकर, अरुण कोलटकर, भाऊ पाध्ये आणि नामदेव ढसाळ ह्यांची नावं घेत असे. ढसाळ, नेमाडे, तेंडुलकर ह्यांच्याशी त्याच्या गाठीभेटी, बोलणंही बरंच होई. तेंडुलकर त्याला म्हणाले होते की, तू तुला हवं ते आणि तसं लिही. ढसाळ त्याला म्हणाले होते, की तू तुझ्या वर्गाबद्दल लिही. नेमाडे त्याला म्हणाले होते की, तू तुला जे पटेल ते लिही. हे जयंताने अनेकदा सांगितलं आहे. त्याने ह्या तिघांचंही ऐकलं असं म्हणावं लागेल. जयंताने त्याला पटलेलं, त्याच्या वर्गाबद्दल आणि त्याला हवं तेच व तसंच लिहिलं.

त्याच्या पत्रकारितेमुळे त्याच्या अनुभवात आणि म्हणून आकलनातही खूप भर पडली असणार. त्याच्या सर्जनशील लेखनात त्याला ह्याची खूप मदत झाली असणार. वैयक्तिक अनुभवावर आपल्या लेखनाची सगळी मदार ठेवण्याची नौबत टळली असणार. जयंता पहिल्यापासूनच खूप वाचत होता. त्याच्या हातात मराठीबरोबर हिंदी-इंग्रजी पुस्तकं कित्येकदा दिसत. इतर भाषांतल्या, प्रांतांतल्या, संस्कृतींतल्या सर्जनशील आणि इतर साहित्याच्या वाचनामुळे त्याच्या जाणिवा समृद्ध होत गेल्या. त्याच्या पुढल्या काळातल्या अचंबित करणार्‍या कथांना त्याच्या पत्रकारितेची आणि मराठीपलीकडल्या वाचनाची खूप मदत झाली असणार; त्याचा आशयपरीघ विस्तृत व्हायला आणि रूपशक्तीबद्दलची त्याची जाण वाढायला पत्रकारिता आणि वाचन ह्याचं खूप साहाय्य झालं असणार.
कारणं काही असोत, जयंताच्या कथेने असं थक्क केलं, जसं त्याच्या नाटकांनी केलं नव्हतं. मराठी कथेला जयंता सापडला. मी अचंबित झालो, चाट पडलो. इतका की वाटू लागलं आपण ओळखतो तो जयंता हाच का?

जयंताने कथेला कुचेष्टेपासून वाचवलं. मराठीत साहित्यप्रकारांची चढाओढ लावण्यात आणि आपल्या आवडीच्या प्रकाराला मान्यता मिळवून देण्यात अनेक जण वेळ खर्चत बसतात. व्यक्तिगत आवडीला वस्तुनिष्ठ मूल्याची प्रतिष्ठा देऊ बघतात. जयंतच्या कथेमुळे मराठी कथा आपलं कथापण मिरवू लागली. कविता आणि कादंबरीच काय ते मूल्ययुक्त हा गैरविचार धुळीस मिळाला. इथे नाटकाबद्दल काही न बोललेलं बरं. जे साहित्याभ्यासक नाटक हा साहित्याचाच भाग आहे असं म्हणतात ते नाटकं वाचतसुद्धा नाहीत.

Jayant Pawar Books

जयंताच्या कथांच्या शीर्षकातूनच रूपाशय झळकू लागतो. ‘वरणभात लोंचा नि कोन नाय कोंचा’, ‘चंदूच्या लग्नाची गोष्ट अर्थात सड्डम ते टड्डम’, ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’, ‘मेरी नींद नसानी होय’. आपल्याला अगदी थेट ‘पण लक्षांत कोण घेतो’, ‘माझ्या बाबांचा संसार माझा कसा होईल?’, ‘श्रीधरा, आता तू कुठे जाशील?’, ‘गेली सांडून दमयंती’ असल्या अफलातून शीर्षकांची आठवण व्हावी. उफ्फ.

बारीकसारीक बाबी मुद्दाम नोंदवणं पण त्यात वास्तववादी तपशील नसणं, तटस्थपणा आणि गुंतलेपणा एकदम साधणं, रहस्यकथन व अन्य पठडींची खुमासदार उसनवार करणं, स्वतः नाटककार असतानाही निवेदनप्रधान कथनावर भर देणं, बोलभाषेवर मांड असूनही मधेच एखाद्या तत्सम शब्दाचं चपखल योजन करून जणू मिश्कील परळ-दादर भाषासंकर घडवणं… असे त्याचे किती एक शैली-विशेष मोहवतात, ह्याचं कारण त्यांतूनच आशय आकारतो.
जयंताच्या पात्रांना नावगाव असतं आणि ते महत्त्वाचंही असतं. आडनाव मुद्दाम असतं. बाकी शारदा, कोदंड, सिंधू, गीता, उषा, शाम ह्यांचं आडनाव काय, असा प्रश्न आम्हा नाटकवाल्यांना नेहमी पडतो. प्रत्यक्षात जात जाहीर करणारी आडनावं जातील तेव्हा जावोत, अलीकडे ‘शारदा इंदिरा कांचन’ असा ट्रेंड आढळू लागला आहे. लेखक कधी आडनाव नोंदवतात, कधी नाही. ह्याचा लेखनावर परिणाम होतो का? तेंडुलकर आपल्या नाटकांत वागळे (‘श्रीमंत’), बेणारे (‘शांतता! कोर्ट चालू आहे’), पितळे (‘गिधाडे’) अशी आडनावं नोंदवतात; पण चंपा, लक्ष्मी (‘सखाराम बाइंडर’) ह्यांना आडनावं देत नाहीत. का? चिरंतन भावनांबद्दल लिहिताना काही तपशील वगळले तर बरं पडतं का? सातत्याने बदल होतच असताना (अगदी अगणित क्रांत्या झाल्यावरही होत राहाणार असताना), चिरंतन असं काही उरतं का? उरतंच? जयंताच्या बर्‍याच एकांकिकांमध्ये पात्रांना आडनावं नाहीत, पण ‘अधांतर’मध्ये धुरी, ‘काय डेंजर वारा सुटलाय’मध्ये दाभाडे आहे. जयंतच्या कथांमधे सिद्धीविनायक टेंगशे, गजानन राशिवडेकर, रावसाहेब भिंताडे, भाऊ आवळस्कर, पंढरी हडकर, चंद्या कोचरेकर अशी अनेक अख्खी नावं आढळतात. विशिष्टाची, पर्टिक्युलरची अनेकदा जयंता मुद्दाम दखल घेतो. जातिप्रांताचे, वर्गस्तराचे, पंथधर्माचे तपशील पुरवतो; ह्या सार्‍याला सामावून घेऊन सार्वत्रिकाकडे, युनिव्हर्सलकडे जातो. जेव्हा आडनावं वगळली जातात, तेव्हा विशिष्टाला ओलांडून सार्वत्रिकाकडे जायची घाई लेखकाला झाली आहे असं वाटतं. माझ्याच ‘साठेचं काय करायचं?’मध्ये शीर्षकातच एक आडनाव असूनही नाटकातल्या अभय व सलमा ह्या दोन्ही पात्रांना आडनाव नाही; तर ‘बंदिश’मध्ये सर्व पात्रांच्या आडनावांचा उल्लेखच नाही तर दखलदेखील आहे.

‘लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’मध्ये कथेची गोष्ट होताना लांबी कमी होते, तसं काही वेळा आडनाव व इतर तपशीलही कमी होतात. माकडांसारखे प्राणी वा अनाम लेखक जिथे बरेच महत्त्वाचे होतात, तिथे हे अपेक्षितच होय. स्थळकाळाबद्दल बोलतानाही स्थळकाळाच्या पलीकडे जावंसं वाटू शकतंच कधीकधी लेखकाला. बदललं पाहिजे पण भीतिदायकपणे कायम होतंय अशा, जवळजवळ चिरस्थायी होऊ बघणार्‍या अशिवाकडे, ईविलकडे लक्ष वेधण्याची तातडी जयंतला जाणवू लागली होती का?

‘लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ हा संग्रह मला तितका झोंबला नाही, पण त्यावर फार काही बोलता येणार नाही : मी त्या गोष्टी मेलवर आणि पुस्तकात अशा दोनदाच वाचल्या आहेत आणि माझा अभ्यास नाटकांचाच आहे. मी सर्वकलासाहित्यप्रकार समीक्षक नाही. बोललो तेच लै झालं. इतकीच शंका नोंदवतो, की मला ह्या गोष्टी फारशा न रुचण्याचं एक चमत्कारिक बारकं कारण – छोटी एकशब्दी शीर्षकं तर नसेल? की ह्यातल्या बर्‍याच गोष्टी रूपक-कथांच्या अंगाने जाणार्‍या आहेत हे असेल? मला रूपक-कथा फारशा भिडत नाहीत, जीएंच्या काय किंवा सारंगांच्या काय (कॅरल चॅपेक अपवाद). काही गोष्टींमधली मिथकांच्या उलटकरणाची प्रयुक्तीदेखील मला फार प्रभावित करत नाही. लाक्षागृहाच्या एपिसोडचे व्यासांनीच पुरेसे, खरं तर पुरते, वाभाडे काढले नाही आहेत का? (सरोजताई देशपांडे ह्या महाभारत-अभ्यासकांचं म्हणणं असं : व्यास सांगतात एक आणि दाखवतात भलतंच. सांगतात प्रस्थापितांचा महिमा, दाखवतात प्रस्थापितांचा स्वार्थ.)

प्रतिचित्रण तर करायचं, पण प्रतिसृष्टीही उभी करायची हे जयंताच्या कथेचं वैशिष्ट्य मला लोभवत राहिलं. हे अद्भुत आहे. त्याची कथा काही साहित्यिक छायाचित्रण करत नाही. ज्या भाषिक तर्‍हेने वा तर्‍हेवाईकपणे जयंताने कथेला आकार दिला त्यातूनच आशय उमलला. ह्या कथेला गहिरे सामाजिक संदर्भ प्राप्त होतात तेच मुळी चित्रविचित्र भाषिक वापरामुळे. जयंताच्या कथेचा गोषवारा देणं फोल ठरतं.

जयंताची नाट्यपरीक्षणं मी आवर्जून वाचायचो, कित्येकदा त्यातले मुद्दे मला पटायचे नाहीत तरी. ह्याची कारणं : ती परीक्षणं नाटक ह्या प्रयोग-साहित्य-कलेचं माध्यम जाणणार्‍याने लिहिलेली वाटत, त्यातली मराठी अतिशय नेटकी असे आणि त्यात यत्किंचितही प्रतिगामीपणा नसे.

भरकटलो. सांगत होतो हे की नाटकामुळे मी जयंताच्या जवळ येत गेलो, पण लेखक म्हणून जयंत पवारने भापलो; दिपलो ते त्याच्या नाटकांमुळे नाही तर त्याच्या कथांमुळे. तो एकदम मोठा झाला माझ्यासाठी.

माणूस म्हणून तो मला मोठा वाटत गेला, त्याला दोन-तीन कारणं आहेत. एक म्हणजे तो नागरिक म्हणून, आम आदमी म्हणून त्याचं कर्तव्य ठामपणे आणि ठणकावून बजावू लागला. मुद्दा अल्पसंख्याकांच्या गळचेपीचा असो, वंचितांवरच्या अत्याचारांचा असो, ‘शहरी नॅक्सलाइट्स’ ह्या आरोपांचा असो की अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा. मी जे डळमळीतपणे आणि रुकुटुकु करत होतो, ते तो आवेगाने आणि आवेशाने करत होता. एके काळचा मुखदुर्बळ, आत्मविश्वास नसलेला हा मनुष्य ह्या भयावह वर्तमानात बुलंदपणे उभा ठाकला.

दुसर्‍या एका वैयक्तिक कारणामुळे तो मला माणूस म्हणून मोठा वाटला आणि माझ्या जवळही आला. माझ्या आईने ‘अधांतर’ पाहिलं. त्यात शेवटी नरू म्हणतो : ‘एकेकाची आय झवून टाकेन.’ तर जयंताने आणि मंगेशने माझ्या आईला विचारलं (ते तिला ‘ए आई’च म्हणायचे) की हे वाक्य अश्लील वाटतं का? गाळावं का? तर आई म्हणाली की छे अश्लील कुठलं? घाबरले मी. आता काय होणार ह्या सगळ्यांचं? नाटक तर आईचं आणि ही शिवीही आईवरून, भीती वाटली रे! तर ह्या दोघांनी ठरवलं की हे वाक्य कापायचं नाही. नंतर माझी आई हॉस्पिटलमधे असताना जयंता कित्येकदा माझ्या सोबतीला येऊन बसला. पुढे दहाएक वर्षांनी २००९ मध्ये मीच मल्टिऑर्गन फेल्युअरमुळे अनेक महिने हॉस्पिटलमध्ये होतो. मरणारच होतो. वाचलो. वेदना-यातनांबद्दल तर बोलायलाच नको. त्यानंतर मी घरीच काही महिने बिछान्यावर होतो. जयंता तेव्हा अनेकदा येत असे. तेव्हा एकदा मी त्याला म्हटलं की, कारे बाबा तू येतोस? मी नाही येऊ देत कुणाला. त्यांना माझी अवस्था बघून तकलीफ, मला काही त्यांचा उपयोग नाही. तर तो म्हणाला की तू खरा माणूस वाटतोस म्हणून येतो. आता मी ह्यावर जास्त काही बोलत नाही, कारण ह्यावर बोलण्यासारखं काय आहे?

नंतर काय झालं की त्याला कॅन्सर झाला आणि त्याचा त्रास सुरू झाला. अगदी त्याची कथा बहरत असताना मृत्यू बोलवू लागला. तो झगडत होता. मध्ये चांगला बरा झाला. परत आजार उलटला. तर अशात मलाच २०१७ मध्ये कॅन्सर झाला. त्यावेळी जयंता मला फोन करून सल्ला देई, की बाबा तुला मधुमेह नाही तर तू मध-तूप मिक्स करून जबड्याच्या आत लाव, म्हणजे रेडिएशनच्या माऊथ-अल्सर्सचा ताप थोडा कमी होईल. तेव्हाही मी त्याला एकदा म्हटलं की, अरे तू किती प्रेमाने सांगतो आहेस. तर तो म्हणाला की काय आहे की तू चांगला लेखक आहेस, बरा होऊन लिहायचं आहे तुला. त्याला काही महिने आधीच आलेल्या माझ्या ‘कविताबिविता’ फार आवडल्या होत्या. लक्षात घ्या हे जयंता मला सांगत होता. नंतर मी त्याला हेच अगणित वेळा सांगितलं असेल!

तर मग असा तो मित्रच होऊन गेला. नाटकाने आम्ही जवळ आलो, पण त्याच्या कथेने आणि माझ्या कवितेने आम्हाला जास्तच जवळ आणलं का? की आमच्या दोघांच्या अजस्र आजारांनी? की त्याच्या नसलेल्या आणि माझ्या निघालेल्या आईने? की काळानेच? झालो खरे मित्र.

अलीकडेच आम्ही अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्द्यावर एकत्र आलो आणि असं एकत्र असत राहावं लागणार आहे. तेव्हा एक पत्रक काढायचं होतं. त्या पत्रकावरच्या नावांची चर्चा करताना मी म्हटलं की नावांची यादी फार मोठी नाही, काही मोजक्याच लोकांची आहे, शेदोनशे लोकांची नाहीत. आणि ह्यात तुझंही नाव आहे आणि संध्याचंही नाव आहे. हे जरा खटकतं आहे. तर जयंता माझ्यावर तो भडकू शकेल तितका भडकला. संध्या नरे हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, तिचं-तिचं काम आहे, म्हणून तिचं नाव आहे. मी थोडी हुज्जत घातली. नंतर त्याचं म्हणणं मान्य केलं. पण मला त्यावेळी जयंताचा एक नवरा म्हणून एक गुण दिसला- नवरेपण नसण्याचा नवर्‍याचा गुण. महत्त्वाची व्यक्ती म्हणून, स्वतंत्र स्त्री म्हणून संध्याबद्दलचा आदर असलेला जयंता दिसला. असंच एकदा तो संध्याबद्दल म्हणाला होता : माझ्यामुळे माझ्या मैत्रिणीचा वेळ फुकट चालला आहे.

माणूस म्हणून आणि विचारवंत म्हणून जयंताची खूण मला पटली, असा आणखीन एक प्रसंग आठवतो. आदिवासी आणि इतर वंचितांबद्दल आम्ही बोलत होतो. तर मी म्हटलं की परिवर्तन तर व्हायला हवं हे तर उघड आहे, पण ते हिंसाविरहित हवं. तो म्हणाला, बरोबर, पण प्रस्थापित नजरअंदाज करतच राहिले, कुठल्याही शांतीपूर्ण, लोकशाही पद्धतीच्या आंदोलनाने ढिम्म फरक पडला नाही, वर्षानुवर्षं असं शोषण चालूच राहिलं, तर? मी म्हटलं की सरकारं तर वाटच बघत असतात कधी चिडून, वैतागून, अनावरपणे बांध फुटून एखादी भावना उचंबळून एखादी हिंसक घटना घडते आहे त्याची. तर तो म्हणाला हे शतकानुशतकं चाललं तर? मी हिंसेची बाजू पत्करलीच नाही. कदाचित भरडले जातील अशा निरपराधींचं काय, असं म्हणत राहिलो. तड लागली नाही, पण ह्या दरम्यान त्याने जे दाखले दिले, जी आर्ग्युमेंट्स केली त्याने माझं परिवर्तन झालं नसलं तरी मी खूप विचार करू लागलो, प्रभावित झालो. त्यातून कळकळीबरोबरच त्याचं वैविध्यपूर्ण वाचन आणि अचूक तर्क जाणवत गेला. आणि पुन्हा एकदा मला नॉनकॉम्प्रोमाइज्ड माणूस जाणवला.

जयंता अनेकदा म्हणायचा की, मला तरुणपणी माझं म्हणणं बोलून मांडणं जमत नसे. आता तो ते उत्तमपणे मांडत होता. जयंताला शब्द सापडले होते, आपला आवाज सापडला होता आणि आता तो निर्भयपणे, तार्किकपणे आणि स्पष्टपणे आपलं म्हणणं मांडू लागला होता. त्याच्या ललितेतर लिखाणांमध्ये विचारांचा स्फोट होत होता, तर त्याच्या ललित साहित्यात व्यंजनेतून सत्य प्रकटत होतं. पहिल्यात काही तरी जोरकस आणि पारदर्शक होतं, दुसर्‍यात बरंच ओघवतं आणि सूचक होतं. दोन्हींतून स्पष्ट विचार व प्रामाणिक भाव असलेला, नितळ तरी तेजस्वी माणूस-लेखक जाणवू लागला होता.

मी जयंताने लिहिलेलं जवळजवळ सगळं वाचलं आहे. जयंतानेही मी लिहिलेलं बहुतेक सगळं वाचलं होतं. माझी बहुतेक सारी नाटकंही त्याने बघितली होती. ‘मिटली पापणी’ (१९८७) आणि ‘अखेरचं पर्व’ (१९९२) ही माझी नाटकं, त्याला वेगळी वाटली होती. ह्या माझ्या नाटकांच्या थिएट्रिकॅलिटीबद्दल तो माझ्याशी नेहमी बोले. एके दिवशी, तो रस्ता तू का सोडलास असं तो म्हणाला. हे कधी, तर आम्ही तीन दिवस पुण्यात विनोद दोशी नाट्यमहोत्सवाला (फेब्रुवारी २०१८) एकत्र होतो तेव्हा. तेव्हा तो दहीभात, क्रीम ऑव्ह चिकन खाऊ शकत होता. त्याच्या प्रश्नावरचं माझं लांबलचक उत्तर इथे महत्त्वाचं नाही. त्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. तो बिनवास्तववादाच्या बाजूने प्रश्न विचारत होता. मात्र त्याला सगळ्यात जास्त आवडलेलं माझं नाटक म्हणजे ‘सांधा’ (१९८९-९०). आणि मलाही ते आवडतं. जीव सुखावतो अशा बारक्या गोष्टीने.

त्यानंतर असं झालं की, त्याचे तीन एकांकिकासंग्रह एकत्रच छापले जाणार होते : ‘नाद’, ‘निनाद’, ‘पडसाद’ (पंडित प्रकाशन, २०१८). तेव्हा मी जयंताला प्रूफरीडिंगमधे मदत केली. आम्ही तीन-चार दिवस दिवसभर माझ्या घरी बसून प्रूफं तपासली. आता जयंता फोडणीतिखटाशिवायच्या डाळीत एकदम मऊ होईपर्यंत भिजवलेली नाचणीची भाकरीच तेवढी खात होता. तेव्हा जयंता म्हणाला, की प्रत्येक एकांकिका वाचून झाली की तू त्यावर काही बोल. मग मी फेर्‍या मारत दोन-तीन मिनिटं त्यावर बोलायचो नि पुढच्या एकांकिकेकडे वळायचो. आता मला वाटतं की ह्यावर एक लेख झाला असता. आता ‘अधांतर’वर (राजू देसले ‘अधांतर’वर पुस्तक काढत आहे, त्यासाठीचा लेख) लिहून झालं तरी पुरे आहे. माझ्या ह्या प्रदीर्घ प्रस्तावित लेखाची टाचणं जयंताने वाचली होती आणि त्याच्या काही मुद्द्यांवर व्हॉट्सअपवर आमची चर्चाही झाली आहे.

जयंताच्या काही विचारांनी मात्र मी संभ्रमात पडलो आहे. प्रयोगशील लेखनाकरता दिला जाणारा ‘गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार, २०१६’ जयंताला मिळाला. मला तो २०१२साठी मिळाला होता. तो त्याला माझ्या हस्ते मिळावा हा जयंताचा आग्रह होता. माय ऑनर इनडीड. तर जयंता आणि त्याची मुलगी सई ह्यांच्याबरोबर मी मुलुंडला कार्यक्रमासाठी गेलो आणि त्यांच्याबरोबरच परतलो. मला वांद्र्याला सोडून ते बोरिवलीला गेले. ह्यावेळी मी जयंतावर केलेलं भाषण ‘पाऊलखुणा, जयंत पवार विशेषांक, २०१८’ ह्यात प्रसिद्ध झालं आणि आता ‘रंगवाचा’मध्ये परत छापलं जात आहे. तर ह्या कार्यक्रमात जयंताची एक मुलाखत घेतली गेली. त्यामध्ये बोलताना जयंता म्हणाला की, भुतंखेतं हा कोकणातल्या माणसाच्या जगण्याचाच एक भाग आहे. ह्याबद्दल मी त्याला परतताना टॅक्सीत विचारलं. तर तो म्हणाला ह्यावर नीट बोलावं लागेल, पण मानवी आयुष्यात न-नैतिकतेचा आणि ज्ञात विज्ञानाच्या पलीकडला भाग काही प्रमाणात कुठल्याही विशिष्ट काळी असतोच. ह्यावर चर्चा नाही झाली. ह्याच वेळी जयंताने मला सांगितलं की, डॉक्टर म्हणतोय की ही इज अनहॅपी विथ माय कंडिशन. ह्यानंतर जयंताचं दुखणं बळावतच गेलं.

जयंताच्या मला ठाऊक असलेल्या खणखणीत पुरोगामित्वाच्या आणि विज्ञाननिष्ठेच्या संदर्भात ह्या न-नैतिकतेचा आणि विज्ञानाच्या पलीकडच्याचा अर्थ कसा लावायचा? अगदी अलीकडे त्याचा संदेश आला की आता शरीर नको म्हणतं आहे, मी महेशसारखा (एलकुंचवार) सगळ्याचा स्वीकार करायचा ठरवलं आहे. आपल्याला यातना देणार्‍या गोष्टींचा स्वीकार ही मोठी गोष्ट आहे; पण आपल्याला न कळणार्‍या गोष्टींचा स्वीकार म्हणजे काय? एवढा निष्ठावान मनुष्य कुठल्या न-नैतिकतेबद्दल आणि विज्ञानाच्या पलीकडल्याबद्दल बोलत होता? आता त्याच्या लिखाणातच ह्याचं उत्तर मिळतं का ते शोधायला हवं.

Rajeev Naik, Jayant Pawar & co.

डावीकडून : राजीव नाईक, जयंत पवार, प्रेमानंद गज्वी, शफाअत खान, प्रदीप मुळ्ये

पुन्हा एकदा वैयक्तिक नात्याच्या पातळीवर येऊन एक सांगावंसं वाटतं आहे. आमची एक गॅंग झाली होती अलीकडे. जयंत पवार, राजीव नाईक, शफाअत खान, प्रदीप मुळ्ये आणि प्रेमानंद गज्वी. प्रेमानंद नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष झाला (२०१९), तर आम्ही त्याचा सत्कार केला. माझ्याच घरी, पण रीतसर. शफीने शाल घातली, जयंताने उभं राहून भाषण केलं, प्रेमानंदने आभार मानले. सगळं खरंखोटं मिक्स, नाटकासारखं. जयंताने घरूनच डबा आणला होता. आम्ही त्याला एक बटाटा उकडून दिला आणि थोडं ताक दिलं. मी जयंताचं आधीचं तगडं जेवण पाहिलं आहे अनेकदा! तर सांगायचं आहे हे की ही शाल जयंताने स्वतः अगदी शोधून कुठून तरी विकत आणली होती. काही छोट्याछोट्या गोष्टी किती मोठ्या वाटतात नंतर कधीकधी!

आता हे अधिकाधिक खासगी होत चाललं. तरीही ह्यातून जयंता थोडा तरी कळेल म्हणून लिहितोय. नाहीतर माझ्या सलगीचा डांगोरा तेवढा व्हायचा. वाचकहो, ह्यात जयंताने केलेली माझी बारीक प्रशंसा येऊ देतो आहे. त्याचं कारण सांगतो. ज्या मला जयंता हा आणखीन एक केवळ स्पर्धेचा एकांकिका लेखक आणि माझ्या मित्राचा मित्र वाटत होता, तो मला महत्त्वाचा लेखक वाटू लागला आणि माणूस म्हणून खूप जवळ आला. आणि त्यालाही जो मी बहुतेक हस्तिदंती मनोर्‍यातला उच्चभ्रू वाटत होतो तो मी लेखक म्हणून चांगला आणि माणूस म्हणून जवळचा वाटू लागलो. आम्ही मित्रच झालो. जयंताने मला दिलेल्या ‘अधांतर’च्या १९९९च्या प्रतीवर लिहिलं आहे : ‘राजीव नाईक यास, प्रेमपूर्वक’, तर ‘काय डेंजर वारा सुटलाय”च्या २०११च्या प्रतीवर लिहिलंय : ‘प्रिय मित्र राजीव यास’. अंतर चांगलंच फिटलं आमच्यातलं!

त्याला माझ्या कविता पुष्कळच आवडल्या. ‘कविताबिविता’ ह्या संग्रहानंतरच्या माझ्या सर्व कविता त्याने वाचल्या होत्या. माझ्या अलीकडच्या एका दीर्घ कवितेची त्याने खूप तारीफ केली आणि एका कवितेला तर तो मुंबईवरच्या मराठीतल्या उत्तम कवितांमधली एक म्हणाला. त्याला माझ्या कवितांवर लिहायचं होतं. पण इथेही एक दुःखद आठवण आहे. तो लिहितो लिहितो म्हणत होता. एकदा त्याचा व्हॉट्सअप आला : तुझ्या कवितेवर लिहायला घेतोय. त्यानंतर संदेश आला : तुझ्या कवितांवर लिहायला घेतलं की काय होतं माहीत नाही, पण मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागतं. असं तीनदा झालंय. आता हा फक्त माझ्यावरचा क्रूर विनोद असता तरी मला चाललं असतं. पण खरोखर त्याच्या हॉस्पिटलच्या वार्‍या वाढल्या होत्या. मी खल्लास. त्याला उत्तर पाठवलं : माझ्या कवितांवर अजिबात लिहू नकोस तू.

मात्र त्या आधी ह्याच वर्षी (२०२१) मार्च ९ रोजी माझं ‘प्रयोगकलांचं इतिहासलेखन’ ह्यावर एक भाषण होतं. तेव्हा जयंताला मी ह्या बाबतीतले त्याचे स्वतःचे प्रश्न पाठवायला सांगितले आणि त्याचे दहा प्रश्न त्याने अगदी नीट लिहून मेल केले. ते मी तसेच्या तसे वाचून दाखवले.

आता ह्यापुढे आणखीन काही लिहीत नाही. आठवणी आणि निरीक्षणं वाढतच जायची. त्यात पुन्हा जास्त खासगी झालं तर वाचकांना त्यात काय रस असणार? जयंताचा जबरा लोकसंग्रह. प्रत्येकाच्या वैयक्तिक आठवणी असणार. त्यात माझ्या ह्या नोंदींची काय मातबरी? हे जे लिहिलं आहे तेही अर्धं डोक्याने आणि अर्धं मनाने. हे घाईघाईत, पुढे-मागे, बाहेर-आत, इथे-तिथे करत लिहिलं आहे. हे मुद्देसूद नाही, अघळपघळ आहे. हे निरर्थक ठरू नये ही इच्छा. जयंता वायफळ लिहीत नव्हता ना.

बहुसंख्य लोकांचे मातीचे पाय दिसू लागले असताना, जयंता मातीत पाय घट्ट रोवून लिहीत होता. खूप जवळ आलेले दूर जात असताना हा शांतपणे किंचित जवळ आला होता. तूर्तास मला आमचं नातं जास्त आठवतं आहे. हा लेख म्हणजे विश्लेषण नाही, संस्मरणच आहे. जवळचा माणूस चांगला लेखक असला की गोची होते. त्याच्या उंचीचा अंदाज नीट येत नाही. सुरुवातीला मी म्हटलं की, जयंता माझा खूप जवळचा मित्र होणार होता. त्याआधीच तो असा दूर गेला. पण इतकं मात्र म्हणेन की तो मला मित्र मानण्याइतपत जवळ आला, ह्यातही मी लकी आहे.

आठवत राहशील जयंता. काही बरंवाईट लिहिलं की, काही चांगलं वाचलं की, सामाजिक कारणांमुळे, वैयक्तिक नात्यांमुळे वा शारीरिक व्याधीने अस्वस्थ, बेचैन झालो की तू मला आठवशील. तू विसरण्याजोगा नाहीस जयंता.
--
Rajeev Naik
राजीव नाईक
35 कलानगर, तळमजला, वांद्रे पूर्व, मुंबई 400051.
9769041050
rnaik35@gmail.com


पुनर्प्रकाशनासाठी परवानगी दिल्याबद्दल संध्या नरे-पवार व राजीव नाईक यांचे आभार
सर्व प्रतिमा आंतरजालावरून साभार

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

लेखाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध वेगवेगळ्या कारणांसाठी पुन्हा पुन्हा वाचावे असे आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

सुंदर लेख.
('वसा' त) वाचायचा होताच पण सुदैवाने इथेच मिळाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गेल्या दिवाळी अंकातकी नींद नसानी होय अजून रुतून राहिलीय काळजात.
पवार गेले हे अजूनही स्वीकारावं वाटत नाहीय.
लेख उत्कृष्ट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हृद्य लेख!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************