टेस्ट मेकर्स - मयूख सेन

Taste Makers

लोक स्वयंपाक का करतात?

काही जण स्वावलंबन म्हणून स्वयंपाक करतात. काहींचा स्वयंपाक संस्कृतीनं आणि कुटुंबव्यवस्थेनं त्यांच्यावर लादलेला असतो. काही जण हौस म्हणून स्वयंपाक करतात. काही अर्थार्जनासाठी. म्हंटलं तर स्वयंपाक करणं हे एक कंटाळवाणं काम आहे. म्हंटलं तर स्वयंपाक वाहवा मिळवण्यासाठी कमावलेली एक 'परफॉर्मिंग आर्ट' आहे. पण स्वयंपाक करून तयार झालेल्या पदार्थांइतकीच काहींसाठी स्वयंपाकाची कृतीही महत्त्वाची असते. ती करत असताना अनेक जण तिच्यात स्वतःलाच शोधत असतात. स्वयंपाकातून आत्मशोध हे ओशोच्या एखाद्या पुस्तकातून ढापल्यासारखं आणि दवणीय वाटत असलं तरी त्यात तथ्य आहे. आपण कुठून आलो, आपला धर्म काय, आपली जात काय याबरोबर आपली बाहेरच्या जगातली ओळख जितकी जोडलेली असते, तितकीच आपण काय खातो याच्याशीदेखील ती जोडलेली असते. आणि अशातच जर आपला देश सोडून परदेशी स्थायिक होण्याची वेळ आली, तर पहिल्या काही दिवसांत येणाऱ्या आठवणींमध्ये मायदेशातल्या खाण्यापिण्याच्या आठवणी सगळ्यांत जास्त व्याकूळ करणाऱ्या असतात. नवीन देशात चूल मांडताना, अनेकदा आसपास भारतीय लोक राहतात का याबरोबरच भारतीय ग्रोसरी स्टोअर जवळ आहे का हा विचार करूनही घर घेतलं जातं. अशा स्थित्यंतरांत जेव्हा आजूबाजूची परिस्थिती ओळखीची, सवयीची नसते, तेव्हा आपसुख स्वयंपाक ती उणीव भरून काढतो. आपल्या आजूबाजूच्या अनोळखी जगात वावरताना आपल्या स्वयंपाकघरात आपल्या ओळखीचं एक जग रचण्यात मायदेशातल्या पाककृती आणि जिन्नस मदत करत असतात.

परदेशात स्वतःचं असं जग पुन्हा रचू पाहणाऱ्या अशा सात स्त्रियांच्या गोष्टी मयूख सेनच्या 'टेस्ट मेकर्स' या पुस्तकात वाचायला मिळतात. या सातही बायका मायदेश सोडून अमेरिकेत स्थायिक झाल्या. चो यांग बुवी (चीन), एलिना झेलयाता (मेक्सिको), मादलेन कम्मान (फ्रान्स), मार्चेला हझन (इटली), जुली साहनी (भारत), नजमिया बटमांग्लीज (इराण) आणि नॉर्मा शर्ली (जमेका) अशा या सात जणी आहेत. यांतल्या प्रत्येकीनं आपल्या पाककलेतून आणि पाककृतींबद्दलच्या लिखाणातून अमेरिकेच्या बदलत्या खाद्यसंस्कृतीत आपल्या मायदेशाला स्थान मिळवून दिलं. साधारण १९४० ते १९८० या चाळीस वर्षांच्या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यांवर या स्त्रिया अमेरिकेत आल्या. पण या सगळ्यांना बांधून ठेवणारा समान दुवा म्हणजे आपला देश सोडून नवीन देशात आल्यावर सतत वाटणारी व्याकुळता.

जुली साहनी आणि नॉर्मा शर्ली यांचे अपवाद वगळता, कुणाचीच इंग्रजीशी फार ओळख नव्हती. चो यांग बुवीनं जपानमध्ये वैद्यकशास्त्राचं शिक्षण घेतलं. जपानला जायच्या आधी तिला अमेरिकेतूनही शिष्यवृत्ती मिळाली होती. पण इतकी परकी भाषा आपल्याला जमणार नाही म्हणून तिनं जपान निवडलं. चीनमध्ये परत येऊन काही वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर नवऱ्याच्या नोकरीमुळे तिला अमेरिकेत यावं लागलं. आणि अमेरिकेची भाषा आत्मसात करावीच लागली. ती करत असताना मात्र, स्वतःच्या देशात खायला मिळतं तसं अन्न तरी मिळावं, या हट्टापायी तिनं अमेरिकेत सहज मिळणारं वाणसामान वापरून चिनी पदार्थ करायला सुरुवात केली. आणि हळूहळू त्यात प्रावीण्य मिळवलं. १९४५ साली प्रकाशित झालेलं 'हाऊ टू कूक अँड ईट इन चायनीज' हे तिचं पुस्तक अमेरिकेतील लोकांसाठी दिशादर्शक ठरलं. चीनच्या वेगवेगळ्या प्रांतांची आणि तिथल्या पाककृतींची माहिती बुवीच्या पुस्तकांतून लोकांना मिळू लागली. तिच्या पावलावर पाऊल ठेवून मग चीनमधल्या वेगवेगळ्या प्रांतांमधल्या पाककृतींची अनेक पुस्तकं लिहिली गेली आणि 'चायनीज फूड' या एकाच मठ्ठपणाने मारलेल्या शिक्क्याच्या पलीकडचं प्रादेशिक वैविध्य लोकांना अनुभवायला मिळालं.

मादलेन कम्मानही नवऱ्याच्या नोकरीमुळे बॉस्टनमध्ये आली. त्या काळी, म्हणजे १९६०च्या दशकात, अमेरिकेत फ्रेंच पाककलेची ओळख करून देणारी ज्युलिया चाईल्ड सगळ्यांची लाडकी होती. १९६१ साली जेव्हा ज्युलिया पहिल्यांदा टीव्हीवर दिसली तेव्हा ती पन्नाशीला आली होती. तिचा प्रवासही ठरवून झाला नव्हता. पण तिचाही आत्मशोध स्वयंपाकातूनच झाला आणि तो तिला परत मायदेशी घेऊन आला. ज्युलियाला 'अमेरिकेची स्वीटहार्ट' म्हणायचे. तिच्यामुळे लोक फ्रेंच पाककृतींकडे कुतूहलानं बघू लागले. यामागचं महत्त्वाचं कारण ती अमेरिकी होती हे होतं. अमेरिकी लोकांना ती 'आपली' वाटायची. फ्रेंच पाककृती टीव्हीवरून प्रसारित होऊ लागल्या असल्या, तरी एके ठिकाणी ज्युलियानं केलेलं एक विधान मादलेनच्या जिव्हारी लागलं. 'फ्रेंच बायकांना स्वयंपाक आवडत नाही' असं सरसकट विधान ज्युलिया चाईल्ड करायची. तसंच, ज्युलियाच्या पाककृतींमध्ये फ्रेंच पाककृतींना असलेली सांस्कृतिक पार्श्वभूमी सादर केलेली नसायची. फ्रान्सबद्दल होणारे गैरसमज खोडून काढायचा प्रयत्न मादलेननं केला. पण अमेरिकी मीडियानं 'ज्युलिया विरुद्ध मादलेन' असं मसालेदार रूप देऊन तो वाद भरकटवला. स्त्रिया आपापसांत भांडत आहेत हे अधोरेखित करून स्त्रीवादी मुद्दे उधळून लावायची खोड जुनीच आहे. तीच इथे वापरली गेली.

मादलेन पक्की स्त्रीवादी होती. पॉल बोक्युस नावाच्या एका फ्रेंच शेफनं एकदा "स्त्रियांची जागा रेस्तराँ किचनमध्ये नाही. त्या फक्त बिछान्यात बऱ्या असतात." असं विधान केलं. तेव्हा मादलेननं तिच्या बॉस्टनमधल्या 'शे ला मेर मादलेन' या रेस्तराँमध्ये बोक्युसचा फोटो उलटा टांगला होता. तिचं पहिलं पुस्तक, 'द मेकिंग ऑफ अ कुक', १९७१ साली प्रकाशित झालं. मादलेनचा भर फ्रेंच स्वयंपाकातल्या काही ठरावीक प्रक्रिया आत्मसात करण्याकडे असायचा. फ्रेंच पाककृतींमध्ये वारंवार लागणारे, स्टॉक किंवा पेस्ट्री यांसारखे, घटक उत्तम बनवले की पुढील पदार्थ चांगलाच होतो या तत्त्वावर तिची सगळी पुस्तकं बेतलेली असायची. ती स्वतः अतिशय चिवट होती. स्वयंपाकघरात काम करताना अपयश येणारच आणि त्यातून शिकलं पाहिजे या तत्त्वावर ती ठाम होती. पाककृतीलेखन आणि रेस्तराँ चालवणं यांबरोबरच ती पाककलेचे वर्गही घ्यायची. तिच्या हाताखाली शिकणाऱ्या मुलींना ती 'आधी ज्युलिया चाईल्डचं पुस्तक फेकून द्या!' असा सल्ला द्यायची, कारण तिच्या मते त्यातलं फ्रेंच पदार्थांबद्दलचं ज्ञान अमेरिकी लोकांना आवडावं म्हणून अतिसुलभ केलेलं होतं. फ्रान्स आणि अमेरिका खाण्यापिण्याच्या बाबतीत एका पातळीवर येतील हा मादलेनचा विश्वास नक्कीच आंधळा होता. पण तिच्या मनात अमेरिकी लोकांना अस्सल फ्रेंच स्वयंपाक करता यावा अशी तळमळ होती. त्यातून जे लेखन, जे टीव्हीवरचे कार्यक्रम झाले, ते तिच्या विचारांना पुढे नेणारेच होते.

हे पुस्तक वाचताना आपसुख यांच्या चित्रफिती यूट्यूबवर मिळतात का असा शोध घेतला. आणि त्यातून मला काही पाककृतीही मिळाल्या. खाली ज्युलिया चाईल्ड आणि मादलेन कम्मान या दोघींच्या चित्रफिती दिल्या आहेत. (ज्युलिया चाईल्डचा आवाज आणि तिचा कॅमेर्‍यासमोर असलेला वावर बघून मात्र पाककृतींपेक्षा जास्त मेरील स्ट्रीपचीच आठवण येते!)

मादलेनच्या चित्रफितीत तिनं एक आठवण सांगितली आहे. डोंगराच्या सावलीकडील बाजूस राय पिकायचं आणि उन्हाकडील बाजूस गहू पिकायचा. त्यामुळे सावलीकडचा पाव काळा दिसायचा आणि उन्हाकडचा पाव पांढरा. मग दोन्ही बाजूंची शाळकरी मुलं शाळेत भेटायची आणि पावांची अदलाबदल करायची.
"शेजारच्यांच्या घरात शिजलेलंच मुलांना जास्त आवडतं" असं जेव्हा मादलेन म्हणते, तेव्हा एखादं वैश्विक सत्य ऐकल्यासारखं वाटतं!

इराणमधून अमेरिकेत आलेली नजमिया बटमांग्लीज १९७९ सालच्या क्रांतीनंतर आधी फ्रान्समध्ये स्थायिक झाली. इराणमध्ये होणाऱ्या बदलाचं तिनं एका वाक्यात मार्मिक वर्णन केलं आहे - 'क्रांती होण्याच्या आधी आम्ही घरात प्रार्थना करायचो आणि बाहेर नाचायला जायचो. क्रांती झाल्यावर आम्ही बाहेर प्रार्थना करू लागलो आणि घरात (लपून छपून) नाचू लागलो.'. अशा वातावरणात आपल्या मुलांना वाढवणं नजमियाला मान्य नव्हतं, म्हणून तिनं देश सोडायचा निर्णय घेतला.
काही महिन्यांची गरोदर असलेली नजमिया सुरुवातीला एकटीच फ्रान्समध्ये गेली. त्यानंतर काही महिन्यांनी तिचा नवरा येऊ शकला. त्या काळी, इराणमधून फ्रान्समध्ये जाण्यासाठी फार कागदपत्रं लागत नसत. मात्र काही वर्षांतच फ्रान्समध्ये असलेला अरबद्वेष तिला खुपू लागला. म्हणून ती आणि तिचं कुटुंब वॉशिंग्टनमध्ये स्थायिक झाले. तिच्या कुटुंबात अनेक सुगरण स्त्रिया होत्या. पण आपल्या मुलीनं शिक्षणाला प्राधान्य द्यावं आणि लहान वयात स्वयंपाकघरात गुंतू नये म्हणून शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय स्वयंपाकघरात यायचं नाही अशी ताकीद तिला तिच्या आईनं दिली होती. लग्नाच्या आधी सात वर्षं नजमिया अमेरिकेत राहिली आणि शिकली होती. जेव्हा नजमिया परत इराणला गेली, तेव्हा तिच्या आईच्या हातात तिची डिग्री देऊन तिनं स्वयंपाकघरात प्रवेश मिळवला. त्यानंतर मात्र स्वयंपाकाशी तिनं कायमचं नातं जोडलं. अमेरिकी प्रकाशकांना इराणबद्दल कुठलंही कौतुकपर पुस्तक छापायचा उत्साह नव्हता हे नजमियाच्या लक्षात आलं. म्हणून तिनं आणि तिच्या नवऱ्यानं स्वतःच या पुस्तकांचं प्रकाशन सुरू केलं. त्यानंतर 'माज' या नावाखाली त्या दोघांनी अनेक पुस्तकं प्रकाशित केली.
तिचं पाहिलं पुस्तक यायच्या आधी पाककृतींच्या काही पुस्तकांतून इराणचा उल्लेख 'पर्शिया' असा व्हायचा. तसं केल्यानं त्या प्रदेशाला एक गूढता प्राप्त व्हायची. नजमियानं थेट 'इराण' असा उल्लेख करायला सुरुवात केली.
स्वखुशीने देश सोडला असला, तरीही असा निर्णय घेणं आणि त्याचा आपल्याच मनानं स्वीकार करणं, यात कधी कधी अनेक वर्षांचं अंतर असू शकतं. नजमियाच्या बाबतीतही असंच घडलं. नजमियाच्या पाककृतीलिखाणातून ती कधी खय्यामबद्दल लिहायची, तर कधी तिच्या राजकीय भूमिकेबद्दल लिहायची. तिची पुस्तकं पाककृतींबद्द्ल असली तरी त्यांतून इराणच्या संस्कृतीबद्दलही माहिती वाचकांना मिळत राहायची.

यांतल्या इतर स्त्रियांच्या कथाही इतक्याच रोचक आहेत. पण मला आवडलेल्या तीन तेवढ्या मी इथे दिल्या आहेत. यांतल्या जवळपास सगळ्याच स्त्रियांनी त्यांच्या आयुष्यातल्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर नैराश्याला, अनिश्चिततेला तोंड दिलं. मार्चेला हझनच्या कुटुंबाला महायुद्धातल्या बॉम्बहल्ल्यांपासून वाचण्यासाठी अनेक दिवस लपून राहावं लागलं होतं. त्या काळात जे मिळेल ते आणि मिळेल तेव्हा खावं लागायचं. अन्नाचा असा अभाव अनुभवत असताना मार्चेला तिच्या बालपणीच्या आवडत्या पदार्थांचे विचार करायची. एलिना पस्तीस वर्षांची असताना तिला मोतीबिंदू व्हायचं निमित्त होऊन तिची दृष्टी गेली. तिचा धाकटा मुलगा जन्माला आला तेव्हा ती पूर्ण आंधळी झाली होती. दृष्टी जाण्याआधी एलिना स्वतःचं रेस्तराँ चालवत होती. पण अशा परिस्थितीतही एक तान्हं बाळ सांभाळत सांभाळत ती पुन्हा उभी राहिली. त्यात तिच्या नवऱ्याची प्रेमप्रकरणंदेखील तिला खचवून टाकायची. तिला एक 'गाईड डॉग' (अंध व्यक्तींना रोजच्या व्यवहारात मदत करणारा प्रशिक्षित कुत्रा) घेता यावा, म्हणून तिच्या काही मैत्रिणींनी तिला पाककृतीचं पुस्तक लिहायला उद्युक्त केलं. ते पुस्तक खपून, त्यासाठी घेतलेलं कर्ज तर फिटलंच, शिवाय तिला 'गाईड डॉग' ही घेता आला.

ज्युली साहनी अमेरिकेत आली, तेव्हा ती स्वतः न्यूयॉर्कच्या नगर नियोजन विभागात विभागात काम करत होती. तिचा नवराही 'दिल्ली आयआयटी'मधून शिकलेला, अमेरिकेत चांगली नोकरी करणारा होता. पण कालांतराने त्यांनी वेगळं व्हायचं ठरवलं आणि ज्युलीनं तिचा स्थापत्यशात्रातलं काम सोडून देऊन पाककृतीलेखन आणि वर्ग घेण्यावर लक्ष केंद्रित केलं. तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा तिला पैशाची चणचण भासू लागली. अशातच न्यूयॉर्कमधल्या दोन भारतीय रेस्तराँमध्ये 'एग्झिक्युटीव्ह शेफ' म्हणून ज्युली काम करू लागली. अशा पदावर काम करणारी ती पहिली स्त्री होती ही गोष्ट नंतर अनेक जण विसरून गेले. हे दोन्ही रेस्तराँ हॉलिवूडच्या अनेक दिग्गजांचे अड्डे झाले. पण तिथल्या अन्नाचा दर्जा घसरू नये म्हणून ज्युली अथक प्रयत्न करायची. तिला घरी यायला कधी-कधी पहाटेचे दोनही वाजायचे. ही अशी काम करायची पद्धत, तीही घरी मुलाकडे बघायला कुणाचा फार आधार नसताना, ज्यूलीला मानवली नाही आणि तिनं त्या रेस्तराँमधून स्वतःची सुटका करून घेतली.

जशा अडचणी होत्या, तसे या स्त्रियांच्या कामांना हातभार लावणारे लोकही होते. मार्चेला हझनचा नवरा व्हिक्टर - तिच्या सगळ्या लेखनाचं इंग्रजी भाषांतर करायचा. हे काम त्यानं आयुष्यभर केलं. मार्चेलाला जेव्हा पाहिलांदा न्यूयॉर्कटाइम्सकडून पुस्तकासाठी विचारणा झाली, तेव्हा तिनं "मला इंग्रजी येत नाही. मी पुस्तक लिहिणार नाही', असं म्हणून शांतपणे रिसिव्हर ठेवून दिला होता. हे संभाषण व्हिक्टरनं ऐकलं आणि तिला 'इंग्रजीचा प्रश्न मी सोडवतो' असं सांगून लिहायला प्रेरित केलं. त्यानंतर या दोघांनी मिळून अनेक पुस्तकं लिहिली. ती अमेरिकेनं आता आपलीशी केली आहेत.

चो यांग बुवीचा नवरा मात्र तिनं लिहिलेलं इंग्रजी उगाचच अवघड करून ठेवायचा. त्याचा असा ठाम समज होता की त्याचं इंग्रजी तिच्यापेक्षा जास्त चांगलं आहे. पण बुवी अशी दादागिरी सहज सहन करणाऱ्यांतली नव्हती. एका पुस्तकाच्या प्रस्तावनेतच तिनं, 'या पुस्तकात जे चांगलं आहे ते माझ्यामुळे आहे. आणि जे वाईट आहे ते माझ्या नवऱ्यामुळे आहे.' असं लिहून टाकलं आहे. असं असलं, तरी बुवीला आधी तिच्या नवऱ्याचा आणि नंतर अमेरिकेत शिकलेल्या तिच्या दोन मुलींचा पूर्ण पाठिंबा होता. तिच्या लेखनात त्यांचे हस्तक्षेप झाले. पण 'नवऱ्याकडून लेखन सुधारून घेणारी बायको' या प्रतिमेच्या पलीकडली बुवी या पुस्तकातून वाचकांना दिसते.
एखाद्या बाईनं लग्न केलं आहे, तिला मुलं आहेत,ती नोकरी-व्यवसाय करत नाही आणि तिला स्वयंपाकाची हौस आहे म्हणजे...अशी काही निरीक्षणं वापरून आपण समोरच्या बाईला पटकन एका साच्यात टाकत असतो. पण स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभं राहून, आयुष्यभर काम करत राहण्यासाठी पडद्यामागेही तितकाच संघर्ष करावा लागतो, जितका घराबाहेर पडल्यावर करायला लागतो. यांतल्या काही स्त्रियांच्या गोष्टी वाचताना मला रसायनशास्त्रात शिकलेल्या 'लेटन्ट हीट'ची आठवण झाली. एखादा पदार्थ एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जात असताना तो ऊर्जा शोषतो, पण ती थर्मामीटरवर दिसत नाही. स्त्रियांच्या तारुण्यातला एक महत्त्वाचा काळ अशी लेटन्ट हीट घेऊन स्वतःला आणि परिस्थितीला बदलण्यात जात असतो. तेव्हा आजूबाजूच्यांना असं वाटतं की ही काहीच करत नाही; किंवा हिला काहीच जमत नाही! पण लहान मुलं सांभाळून कुठलंही काम सातत्यानं करणाऱ्या स्त्रिया आपल्याला सहज न दिसणारा संघर्ष करत करतच कामातलं सातत्य टिकवून ठेवत असतात.

त्या काळी एखादं पाककृतींचं पुस्तक प्रकाशित करण्यासाठी काय करावं लागायचं? कुठे जावं लागायचं? कुणाला भेटावं लागायचं?
या पुस्तकात याचं एकच उत्तर आहे - न्यू यॉर्क टाइम्स. यांतल्या अनेक बायकांना क्रेग क्लेअरबोर्ननं प्रसिद्धीच्या झोतात आणलं. क्लेअरबोर्ननं लिहिलेल्या गोगलगायीबद्दलच्या एका लेखावर मादलेननं वाचकांच्या पत्रव्यवहारातून ताशेरे ओढले होते. ते वाचून क्लेअरबोर्न थेट तिच्या घरी तिला भेटायला आला आणि मग त्यानें तिच्याबद्दल एक लेख लिहिला. मार्चेला हझनच्या नवऱ्यानं 'न्यू यॉर्क टाइम्स;मध्ये तिच्या पाककृतीवर्गाची जाहिरात देण्यासाठी म्हणून अर्ज केला होता. जाहिरात द्यायला तुम्हांलाथोडा उशीर झाला असं त्यांना सांगण्यात आलं, पण एक दिवस अचानक क्रेग तिच्या घरी जेवायला आला. त्या काळी गुरमे, बॉन अपेतीत आणि न्यू यॉर्क टाइम्स यांसारखी नियतकालिकं आणि क्लेअरबोर्नसारखे समीक्षक एखाद्याला सहज प्रसिद्धी मिळवून देऊ शकत होते. पण यासाठी सतत प्रकाशकांची आणि समीक्षकांची मर्जी सांभाळावी लागायची. (पुस्तकात असं मत व्यक्त केलं असलं, तरी ते वाचताना असं वाटतं की नवनवीन लेखिका शोधून काढणे आणि अमेरिकेला वेगवगेळ्या देशांच्या खाद्यसंस्कृतीशी ओळख करून देणे हे काम निदान क्लेअरबोर्नच्या काळात तरी बऱ्यापैकी सातत्यानं केलं जात होतं.)

आजची परिस्थिती काय आहे असा विचार पुस्तक वाचून झाल्यावर अपरिहार्यपणे मनात येतो.आंतरजालयुगाच्या आधी पाककृतींच्या पुस्तकांचं सामान्य गृहिणींच्या आयुष्यात किंवा स्वयंपाक करू पाहणाऱ्या कुणाच्याही आयुष्यात जे स्थान होतं, ते आता सोशल मीडियाने घेतलं आहे. माझ्याच बाबतीत सांगायचं झालं, तर तेरा वर्षांची असताना मी 'रुचिरा' वाचून स्वयंपाक करू लागले. त्यानंतर काही वर्षं मी पाककृतींची पुस्तकं आवडीनं विकत घेऊन त्यांच्या मदतीनं स्वयंपाक केला. पण आज मला एखादी पाककृती हवी असेल तर मी पुस्तक उघडत नाही. 'यूट्यूब' उघडते. सोशलमीडियानं पाककृती लिहू पाहणाऱ्या लोकांना पुस्तकांपेक्षा कितीतरी पटींनी समृद्ध असलेलं माध्यम उपलब्ध करून दिलं आहे. एखादी पाककृती लोकांसमोर आणायची असेल; तर कृती लिहून, कृतीच्या पायर्‍यांचे फोटो काढून, किंवा कृतीची चित्रफीत करून, अशा कुठल्याही पद्धतीनं ती अगदी कमी खर्चात लोकांसमोर सादर करता येते.
या पुस्तकात दिलेली रेखाटनं चित्रकार काढून द्यायचे. चांगली चित्रकार शोधणं हा पुस्तक लिहिण्याच्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग असायचा. ती चित्रकार प्रत्यक्ष पाककृती बघून मग रेखाटनं करायची. आज एक चांगला स्मार्टफोन हे काम सहज करू शकतो.
आणि आंतरजालावर तुम्हांला हवं असेल, तेव्हा तुम्ही नायजेला लॉसन किंवा संजीव कपूर यांनी दाखवलेली एखादी पाककृती बघू शकता किंवा मराठी पद्धतीचा स्वयंपाक शिकवणार्‍या मधुरा 'यू ट्यूबर'चीही. तिथे कंपूशाही नाही. आणि माझ्यासारखी एखादी कुणी 'इंस्टाग्राम'वर मिरवायला म्हणून नायजेलाच्या पाककृतींकडे वळत जरी असली, तरी घरी स्वयंपाक करताना संध्याकाळी ओट्यापाशी उभी राहून निश्चितच 'हेबर्स किचन' किंवा 'मधुराज रेसिपी' उघडेल! (मधुराने कितीही वेळा, कितीही 'स' घालून, 'जबरदस्त' हा शब्द त्यात वापरलेला असला तरीही!). अर्थात खुल्या माध्यमांमध्ये उठून दिसण्यासाठी जास्त काटेकोर आणि जास्त उठावदार प्रयत्न करावे लागतात हेदेखील तितकंच खरं आहे. अशा मार्गानं यशस्वीपणे अर्थार्जन करणाऱ्या, मधुरासारख्या किंवा अर्चना हेब्बरसारख्या, स्त्रियांचे प्रवास त्यामुळेच तितकेच प्रेरणादायी आहेत. या दोघींच्या प्रवासाची सुरुवातही परदेशात राहतानाच झाली हीदेखील तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे.

या पुस्तकाचा लेखकही अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय कुटुंबातला आहे. मयूखचा मूळ प्रांत पत्रकारिता आणि संशोधन हा असल्याने हे पुस्तक भाषा आणि संदर्भ या दोन्हींसाठी वाचण्यासारखं आहे. जवळपास शंभर पानं फक्त संदर्भ देण्यासाठी वापरलेली आहेत. भाषा शब्दबंबाळ नाही,अगदी गोळीबंद आहे. असं असलं तरीही मयूखची इंग्रजी भाषा अनेक ठिकाणी 'साहित्यिक' वाटते. 'स्त्रियांबद्दल असलेलं हे पुस्तक माझ्यासारख्या पुरुषानं का लिहावं?' या, वाचकांच्या संभाव्य प्रश्नाचं उत्तर सुरुवातीलाच देऊन मयूख त्या प्रश्नांची धोंड बाजूला सारतो. मयूख स्वतःची ओळख 'क्विअर' अशी करून देतो (१९८५ सालानंतर जन्माला आलेले अनेक लोक हा शब्द पुन्हा नव्या अर्थानं वापरू लागलेले आहेत). त्याला त्याच्या लिंगभावात जाणवणारी तरलता, क्विअर पुरुष म्हणून त्याला जाणवणारं वेगळेपण, आणि त्याला स्वयंपाकाबद्दल असलेलं अपार प्रेम या गोष्टींमुळे त्याला या स्त्रियांच्या कथा जवळच्या वाटल्या. तसंच, इतिहास अशा स्त्रियांना विसरायला नेहमीच उत्सुक असतो, म्हणून अशा कथांचं एके ठिकाणी एकत्रीकरण व्हायला हवं अशीही या लेखनामागची त्याची भूमिका आहे.

पुस्तक वाचून झाल्यावर मात्र हे पुस्तक पाककृती लिहिणाऱ्या स्त्रियांबद्दल आहे असं न वाटता या सगळ्या माणसांनी घेतलेल्या आत्मशोधाच्या गोष्टी आहेत असंच वाटतं. हा परिणाम साधल्यामुळे हे लेखन यशस्वी झालं आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मादलेनबद्दल तू लिहिलं आहेस की "ती पक्की स्त्रीवादी होती." मला वाटतं ती डांबरटही होती. 'बघा, हे लोक मला कसा त्रास देतात' म्हणून व्हिक्टिम काँप्लेक्स जपण्याजागी तिनं तिचा बदला गमतीशीर पद्धतीनं घेतला.

आपण कोण आहोत, याचा शोध खूप वेगवेगळ्या पद्धतींनी घेता येतो. त्यात स्वयंपाक आणि एकंदरीतच खाणंपिणं या बाबतीत मी अंमळ ढ आहे. तरीही लेख आवडला.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा हा. नव्हती पण ती पुरेशी डांबरट. तिला तिच्या आणि ज्युलियाच्या
झालेल्या तुलनेचा बराच त्रास झाला. काही वर्ष ती परत फ्रान्सला निघून गेली.
मला त्या चित्रफितीत ती काही वक्यांनंतर "आँ?" असं म्हणते ते फार आवडतं. It is a really French way of speaking English.
आणि ज्युलिया ज्या accent मध्ये बोलते तो काहीसा पॉश accent आता अमेरिकेत अजिबातच दिसत नाही.

डांबरट लोकांना त्रास होत नाही असं नाही. मित्र वगैरे म्हणवणारे पुरुषही स्त्रीवादी बायकांना समजून उमजून त्रास देतात; त्याचा त्रास होतो. डांबरट लोक ते जे त्यातला डांबरटपणाच सार्वजनिक पातळीवर करतात.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

(तूर्तास माझी श्रेणिप्रदानव्यवस्था इ. इ.)

डांबरट लोक ते जे त्यातला डांबरटपणाच सार्वजनिक पातळीवर करतात.

हैं वो क़ाफ़िर जो बन्दे नहीं इस लाम के

(हे उगाच आठवले. पूर्णपणे अवांतर. बाकी चालू द्या.)

—————

या प्रकरणाचा इतिहास-भूगोल जाणकारांनी कृपया सविस्तर विशद करावा. माझी स्वतःची याबद्दलची माहिती अत्यंत त्रोटक, अर्धवट (अॅट बेस्ट), इकडूनतिकडून उडतउडत ऐकलेली/वाचलेली, तथा खात्रीलायक नाही अशी आहे. (फार कशाला, गूगलल्यावर याचे किमान तीन स्रोत तथा किमान तीन पाठभेद आढळले. तेही अर्थात अविश्वसनीय जालस्रोतांवर. असो चालायचेच.)

आणि ज्युलिया ज्या accent मध्ये बोलते तो काहीसा पॉश accent आता अमेरिकेत अजिबातच दिसत नाही.

ज्युलियाच्या अॅक्सेंटबद्दल कल्पना नाही, परंतु, ज्युलियाचा अॅक्सेंट ज्या व्हिडियोत आहे, तो व्हिडियो मात्र आता अमेरिकेत अजिबातच दिसत नाही.

त्या ठिकाणी “Video unavailable – This video contains content from PBS, who has blocked it in your country on copyright grounds” असा संदेश मात्र दिसतो.

(वास्तविक, पीबीएस ही अमेरिकेतील वाहिनी. तिने हा कंटेंट कॉपीराइट कारणांकरिता अमेरिकेतच का ब्लॉक करावा, हे समजत नाही. परंतु अर्थात माझी समज अंमळ कमीच असल्याकारणाने, चालायचेच!)

ऐसीला जर अशी श्रेणीप्रदानव्यवस्था काढून घेता येत असेल, तर अशाच प्रकारे प्रतिसादप्रदानव्यवस्था काढता येत नाही का?
किंवा काही दिवस श्रेणी परत देऊन प्रतिसाद काढून घेता येणार नाहीत का?

सहानुभूती.

(Sometimes, just occasionally, I cannot stand myself, either.)

तुम्ही असे नॉर्मल का झालाय?
BTW, that accent is called Mid- Atlantic accent. ही माहिती मला श्री. जयदीप चिपलकट्टी यांनी दिली.
It is the accent used on American TV in the 60s? 70s? But it is relatively posh.

BTW, that accent is called Mid- Atlantic accent. ही माहिती मला श्री. जयदीप चिपलकट्टी यांनी दिली.
It is the accent used on American TV in the 60s? 70s? But it is relatively posh.

नाही, असेलही. मला त्याबद्दल काहीच म्हणायचे नाही.

माझा म्हणण्याचा मुद्दा एवढाच होता, की मुदलातला तो ॲक्सेंट आहे कोठे? तो व्हिडियो दिसत नाहीये; 'आमच्या देशात' तो ब्लॉक्ड आहे, असा संदेश येतोय.

Quod Erat Demonstrandum. एवढेच दाखवायचे होते.