एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २

अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी

सुधीर भिडे

A nation that ignores history has no future.

आपला विषय हा आहे की १८१८ ते १९२० या शतकात असे काय घडले ज्याचे समाजावर दूरगामी परिणाम झाले. त्या विषयाची सुरुवात करण्यापूर्वी त्या काळाच्या सुरुवातीला स्थिती काय होती याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. १८१८ साली जी परिस्थिती उद्भवली ती त्याच्या आधीच्या शतकातील – १७२० ते १८१८ – घटनांचा परिणाम होती. यासाठी अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी, सामाजिक स्थिती, शासकीय यंत्रणा आणि धर्माची स्थिती आपण दोन ते सहा या भागांत पाहू.

देशभर मराठ्यांचे प्रभुत्व

अठराव्या शतकात देशभर मराठ्यांचा प्रभाव राहिला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य मोडकळीला आले. इंग्रजांनी अजून पाय रोवले नव्हते. ही पोकळी मराठ्यांनी पुष्कळ अंशी भरून काढली. १७२० साली पहिल्या बाजीरावाने शाहू महाराजांकडून पेशवाई स्वीकारली. पहिल्या बाजीरावाने मराठी सत्ता उत्तरेस वाढविली आणि मराठी संयुक्त सत्ता प्रस्थापित केली. उत्तरेत शिंदे, होळकर आणि पवार हे प्रबळ सरदार प्रस्थापित झाले. रघुजी भोसले हे सातार्‍याच्या छत्रपतींच्या आशीर्वादाने नागपूर येथे प्रस्थापित झाले. त्यांनी बंगालपर्यंत मराठी सत्ता पोचवली. गुजरातेत प्रथम दाभाडे आणि नंतर गायकवाड प्रबळ राहिले. कोल्हापूरला राजाराम महाराजांचे वंशज राज्य करीत होते. त्यांची सत्ता तुंगभद्रेपर्यंत होती. तंजावरला शिवाजी महाराजांच्या चुलत घराण्याची सत्ता होती.

१७४० ते १७६० या काळात नानासाहेब पेशवे होते. ही वीस वर्षे मराठी सत्तेचा सर्वोच्च बिंदू आहे. मराठ्यांची सत्ता ही पुणे- साताराकेंद्रित नव्हती. मराठी वर्चस्वाचे वर्णन कॉमनवेल्थ असे केले जाते. १७४८ साली अहमदशाह दिल्लीत गादीवर आला. रोहिल्यांनी त्याला त्रास देण्यास सुरुवात केली. बादशहाने मराठ्यांजवळ मदत मागितली. मराठ्यांनी रोहिल्यांचा पराभव केला. त्याच्या मोबदल्यात मराठ्यांना उत्तरेकडील मोठ्या भागावर चौथाईचा हक्क मिळाला. त्याशिवाय बादशहाच्या संरक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी घेतली. जेव्हा १७५२ साली अब्दालीने पंजाब प्रांतात हल्ला केला तेव्हा बादशहाच्या रक्षणासाठी रघुनाथराव सैन्य घेऊन उत्तरेस गेले आणि त्यांनी उत्तरेस शांतता प्रस्थापित केली. मराठ्यांस अनुकूल अशा मुघल युवराजास गादीवर बसविले. १७५८ साली अब्दाली परत हिंदुस्थानात घुसला. रघुनाथराव परत उत्तरेस गेले आणि अब्दालीला पिटाळून त्यांनी अटकेवर आणि पेशावरला भगवा फडकाविला. हा मराठी सत्तेचा कळसबिंदू होता. (वरील माहिती ओतूरकरांनी लिहिलेल्या 'मराठी साम्राज्य' या पुस्तकातून घेतली आहे; प्रथम आवृत्ती १९३७, पुन:प्रकाशन २०२०, वरदा प्रकाशन)

पेशव्यांच्या वाढत्या ताकदीमुळे शिंदे आणि होळकर अस्वस्थ होऊ लागले. यानंतर पेशव्यांना त्यांचे संपूर्ण सहकार्य मिळणे अवघड होत गेले. १७६० साली झालेला पानिपत येथील पराभव हा टर्निंग पॉइंट ठरला. येथून मराठी सत्तेची उतरण चालू झाली. उत्तर पेशवाईत थोरले माधवराव वगळता नंतरच्या कोणी पेशव्याने परिस्थितीची समज दाखविली नाही. १८१८ साली दुसर्‍या बाजीरावाला इंग्रजांनी नामोहरम केले. अशाप्रकारे १७२० ते १८१८ अशी शंभर वर्षे देशात मराठ्यांचे प्रभुत्व राहिले.

कोल्हापूर-सातारा / पेशवे कलह

या शतकात भोसल्यांच्या या दोन घराण्यात कायम तेढ राहिली. ही दोन घराणी कशी बनली ते थोडक्यात पाहू. शिवाजी महाराजांना दोन मुले – संभाजी आणि राजाराम. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजे गादीवर आले. औरंगजेबाशी चाललेल्या सतत लढायामुळे त्यांनी आपले कुटुंब आणि राजारामाचे कुटुंब रायगडावर ठेवले. १६८९मध्ये औरंगजेबाने संभाजीराजांस मारले. त्यानंतर मुघलांचे सैन्य रायगडावर चालून गेले. संभाजीच्या पत्नी येसूबाई यांनी आपल्या मुलासह औरंगजेबास शरण जाण्याचे ठरविले. अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा नातू – शाहू औरंगजेबाच्या छावणीत वाढला. राजाराम आपल्या पत्नीबरोबर जिंजीस गेले. तेथून त्यांनी सात वर्षे राज्य केले आणि औरंगजेबाबरोबर लढा चालू ठेवला. जेव्हा औरंगजेबाचे सैन्य जिंजीजवळ पोचले तेव्हा राजाराम महाराज तेथून निसटून महाराष्ट्रात पोचले. सन १७००मध्ये राजाराम महाराजांचा सिंहगडावर मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नी – ताराबाई यांनी लढा चालू ठेवला. त्यांनी आपल्या मुलास गादीवर बसविले आणि त्याच्या नावाने कारभार चालू ठेवला. १७०७ साली औरंगजेब महाराष्ट्रातच मरण पावला. त्यानंतर ताराबाई यांनी पन्हाळा / कोल्हापूर येथून मराठी राज्याचा कारभार चालू ठेवला.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलांनी शाहूस सोडून दिले. त्यांचा असा विचार होता की मराठे आपापसात भांडण सुरू करतील. त्यांची ही अटकळ खरी ठरली. अर्धे मराठी सरदार शाहूस मिळाले (१७०८). त्यांत बाळाजी विश्वनाथ पण होते, जे पुढे सातार्‍याच्या शाहू महाराजांचे पेशवे झाले. शाहू महाराजांनी सातार्‍याहून राज्य चालू केले. अशा प्रकारे भोसले घराण्याची दोन राज्ये झाली - कोल्हापूरला ताराबाई आणि त्यानंतर राजारामाचे वंशज आणि सातार्‍यास संभाजी राजांचे वंशज – शाहू महाराज. या घटना १७००च्या आसपासच्या. भोसल्यांच्या या दोन घराण्यांत कायम तेढ राहिली.

१७३० पासून या दोन संस्थानात (कोल्हापूर आणि पेशवे) पुढची सत्तर वर्षे सातत्याने युद्धे होत राहिली. पहिल्या युद्धात कोल्हापूरचा पराभव होऊन वारणेचा तह झाला. या तहान्वये कृष्णा आणि तुंगभद्रा या नद्यांमधील प्रदेशावर कोल्हापूरचे राज्य राहील, हे निश्चित करण्यात आले. पण तरीही संघर्ष थांबला नाही. या संघर्षात कोल्हापूरने प्रथम हैदर अली आणि नंतर इंग्रजांची मदत घेतली. शेवट अर्थातच इंग्रजांचे अधिपत्य होण्यात झाला.

कायमची युद्धस्थिती

१७२० ते १८१८ ही शंभर वर्षे दक्षिणेत मराठी सत्ता कायम युद्धस्थितीत राहिली. अशा प्रकारची अस्थिरता समाजाच्या हिताची नसते. या शतकात पेशवे सारखी युद्धे करीत राहिले. १७२७ ते १७३७ या दहा वर्षांत बाजीराव आणि चिमाजीअप्पा यांच्या निजाम, सिद्दी, आणि उत्तरेस दिल्लीपर्यंत निजाम, सिद्दी, आणि उत्तरेस दिल्ली तख्त (मुघल सम्राट) यांच्याशी सतत लढाया होत राहिल्या. १७६० साली मराठ्यांना पानिपत येथे मोठी हार सोसावी लागली. त्यानंतर थोरले माधवराव यांच्या दक्षिणेत निजाम आणि टिपू सुलतान यांच्या विरोधात लढाया झाल्या. नंतरच्या काळात पेशवे आणि त्यांचे सरदार आपापसांत भांडत राहिले. कोल्हापूर आणि सातारा (पेशवे) या दोन भोसले घराण्यांत कायम लढाया झाल्या.

युद्धे आवश्यक होती की नव्हती, काय पर्याय होते, हा आपला विषय नाही. असेही असेल की यातील काही युद्धे अपरिहार्य होती. युद्ध समाजाच्या आर्थिक स्थितीसाठी आणि सामाजिक प्रगतीसाठी हानिकारक असते. या कायमच्या अस्थिर स्थितीचा काय परिणाम झाला? मराठे इंग्रजांचा धोका समजू शकले नाहीत. इंग्रजांची ताकद देशभर वाढत राहिली. त्याचा खरा अंदाज तत्कालीन राजांना आला नाही.

या काळात इंग्रज काय करत होते? १७४१ भारतात बंदुकीच्या दारूचे उत्पादन चालू झाले. रॉबर्ट क्लाईव्ह यांची पहिला गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक १७५७ साली झाली. याच वेळेला इंग्रजांनी बंगालात पाय रोवले. इंडियन सिव्हिल सर्व्हिसची सुरुवात १७७३ साली झाली. १७८५ साली कोर्नवॉलिस गव्हर्नर जनरल झाले . इंग्रजी सैन्याची संख्या ७०,०००पर्यंत वाढली, न्यायसंस्था आणि पिनल कोडची सुरुवात करण्यात आली. १८१०पर्यंत इंग्रजांनी पूर्ण सागरी प्रभुत्व मिळविले होते.

ईस्ट इंडिया कंपनीची बाँबे प्रेसिडेंसी

बाँबे प्रेसिडेन्सीचा इतिहास म्हणजे मराठ्यांच्या पतनाचा इतिहास. १६१८मध्ये मुघल बादशहाच्या परवानगीने इंग्रजांनी सुरतमध्ये व्यापारासाठी आपली वखार स्थापन केली. इतिहासात तारखांचा कसा योग येतो ते पहा. बरोबर दोनशे वर्षांनी, १८१८मध्ये पेशवाईचा अंत झाला. १६६१मध्ये मुंबई बेट पोर्तुगीजांकडून इंग्लंडकडे हुंड्यात आले. पोर्तुगीज राजकन्येचा इंग्लंडच्या राजाशी विवाह झाला आणि मुंबई बेट हुंडा म्हणून देण्यात आले.

१६६८मध्ये इंग्लंडच्या राजाने हे बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले. १६७०मध्ये शिवाजी महाराजांनी सुरतवर हल्ला करून शहर लुटले. १६७३मध्ये कंपनीने मुंबईस वखार चालू करून त्या वखारीच्या रक्षणासाठी काही युरोपीय सैनिक नेमले. आता सुरतचे महत्त्व कमी होऊन इंग्रजांचे मुंबई केंद्र बनले. इंग्रजांच्या वाढत्या ताकदीची शिवाजी महाराजांस कल्पना आली आणि त्यांनी सागरी किल्ले आणि आरमाराची उभारणी केली.

१६८७ साली कंपनीने मुंबईस पहिला गव्हर्नर नेमला. तो कलकत्त्यातील गव्हर्नर जनरलच्या हाताखाली काम करत असे. त्यावेळी मुंबईच्या बाजूचा सर्व प्रदेश मराठ्यांच्या (पेशव्यांच्या) हातात होता. नारायणराव पेशव्याच्या खुनानंतर (१७७३) पेशवाईत अंतर्गत दुफळी माजली. एका बाजूला बारभाई आणि राघोबा यांत तंटा चालू झाला. उत्तरेत शिंद्यांनी इंग्रजांशी स्वतंत्रपणे हातमिळवणी केली आणि शिंदे-पुणे दरबार कलह चालू झाला. याचा इंग्रजांनी फायदा उठविला.

सन १७७५पासून १८१८पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य आणि पेशवे / मराठा यांच्यात तीन युद्धे झाली. या तीन लढायांच्या शेवटी इंग्रजांनी महाराष्ट्रात आपली सत्ता कायम केली. १७७५, १८०३ आणि १८१७ या तीन वर्षांत या लढायांची सुरुवात झाली. हा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. पहिल्या लढाईला राघोबा कारणीभूत झाले. राघोबांनी इंग्रजांची मदत घेऊन लढाई चालू केली. पहिल्या वडगाव येथील लढाईत पेशव्यांचा विजय झाला. परंतु १७८२पर्यंत लढा चालू राहिला. शेवटी मुंबईजवळचा भाग इंग्रजांना मिळाला. पेशव्यांच्या दरबारात इंग्रजांचा प्रतिनिधी १७८६पासून अधिकृतपणे राहू लागला. इंग्रजांच्या प्रतिनिधीसाठी मुळा-मुठा नद्यांच्या संगमाच्या बाजूला एक बंगला बांधण्यात आला. हा बंगला इंग्रज-मराठे शेवटच्या युद्धात जाळण्यात आला. त्या जागेवर आजही सरकारी कार्यालये आहेत. दुसर्‍या लढाईची सुरुवात होळकरांनी पुण्यावर केलेल्या हल्ल्यामुळे झाली. यावेळी बाजीरावाने इंग्रजांची मदत घेतली. याला शिंदे आणि नागपूरचे भोसले यांनी विरोध केला. इंग्रजांनी शिंदे आणि भोसले या दोघांनाही हरविले. तिसरी आणि शेवटची लढाई १८१७ साली चालू झाली आणि एक वर्षात पेशवाईचा अंत झाला. तोवर कोल्हापूरच्या संस्थानाच्या स्वातंत्र्याचा शेवट झाला होता.

पेशव्यांच्या पराभवानंतर बाँबे प्रेसिडेंसीचा भूभाग मोठा झाला. दक्षिणेत गोव्यापासून उत्तरेस सध्याच्या पाकिस्तानातील सिंध प्रांतापर्यंत ही प्रेसिडेंसी पसरली होती. सध्याचा मराठवाडा भाग निजामाच्या संस्थानात होता. बेरार भाग (वर्‍हाड) नागपूरच्या भोसले संस्थानाच्या अधिपत्याखाली होता. कोल्हापूरजवळचा प्रदेश भोसले संस्थानाकडे होता. याशिवाय बडोदे हे बाँबे प्रेसिडेन्सीतील अजून एक मोठे संस्थान होते. बाँबे प्रेसिडेन्सीचा नकाशा खाली दिलेल्या चित्रात आहे.

बाँबे प्रेसिडेंसीचा नकाशा पुढच्या काळातील, १८९६ साली प्लेगचा प्रभाव दाखविण्यासाठी काढला होता. पण हा नकाशा बाँबे प्रेसिडेन्सीचा विस्तार दाखवितो. पहाण्यासारखी गोष्ट अशी की या नकाशात १ इंच म्हणजे ८० मैल असे स्केल लिहिले आहे. कार्टोग्राफीची व्यवस्थित सुरुवात भारतात झाली होती.


बाँबे प्रेसिडेन्सीचा नकाशा
बाँबे प्रेसिडेन्सीचा नकाशा

शस्त्रे आणि युद्धनीती
संदर्भ

 • History of ordnance Establishments of British India : 1700-1947, Kaushik Roy, Journal of History of Science, 47.1 (2012) 145-155
 • Guns and the British Empire, 2018, Priya Satia, Aeon, Stanford University

ईस्ट इंडिया कंपनीने १७६०पासून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांची आयात चालू केली. सरासरीने दर वर्षी कंपनीने ५,००० मस्केट्स बर्मिंगहम, इंग्लंडमधून आयात केल्या. मस्केट ही बंदूक ७५ मीटर अंतरावरच्या व्यक्तीवर गोळी झाडू शके. ही गोळी बंदुकीच्या नळीच्या पुढच्या भोकातून आत घालावी लागे. मागच्या भागातून जाळ लावून गोळी झाडावी लागे. (सध्याच्या असॉल्ट रायफल्सच्या तुलनेत या अगदीच मागासलेल्या बंदुका होत्या, पण तलवारीपेक्षा मस्केट्सने लढणे जास्त सोपे आणि परिणामकारक होते) या वेळी प्रत्येक सैनिकाकडे एक मस्केट असावी हा निर्णय घेण्यात आला. १७७०पासून कंपनीकडे भारतात ७५,००० मस्केट्स होत्या आणि दर वर्षी २०,००० आयात होत होत्या. १८०५पर्यंत कंपनीकडे १,९२,००० मस्केट्स होत्या. यावरून ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात किती वाढ होत होती याचा अंदाज येतो. भारतीय वातावरणासाठी आणि वापरासाठी या मस्केट्स विशेष बनविलेल्या होत्या. १८०४ ते १८१५ या काळात कंपनीने ३० लाख मस्केट्स आयात केल्या. यांपैकी काही मस्केट्स भारतीय राजांनाही देण्यात आल्या. यामागे भारतातील शस्त्रे बनविण्याचा उद्योग मारणे हा एक उद्देश होता. याशिवाय कंपनीच्या एका फर्मानाप्रमाणे मस्केट्सचा मेंटेंनन्स भारतीयांपासून दूर ठेवण्यात आला.


मस्केटधारी सैनिक
मस्केटधारी सैनिक

१७८० साली ईस्ट इंडिया कंपनीच्या मुंबई येथील सैन्यात १५,००० सैनिक होते. वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे सैनिकांच्या जवळ बायोनेट (bayonet) लावलेल्या मस्केट्स होत्या. चित्रातील दोन्ही सैनिक भारतीय आहेत. याचा अर्थ असा नाही की सर्वच सैनिकांकडे मस्केट्स होत्या. तलवारीने युद्ध करणारे सैनिकही होते. पण ही आकडेवारी हे दाखविते की १७६०पासून १८१८पर्यंत युद्धाच्या शास्त्रात बदल होत होता. युद्ध बहुतांशी मस्केट्सच्या जोरावर लढले जात होते आणि तलवारीचा वापर कमी होत गेला. १८२०नंतर आणखी एक बदल झाला. मस्केटस जाऊन रायफली आल्या. मस्केट आणि रायफलमधील फरक हा संदर्भ पुढे येईल. १८१८ साली बाँबे आर्मीच्या २५ रेजिमेंट्स होत्या; ज्यामधे पायदळ, घोडदळ आणि तोफखान्याची दले होती. पायदलात महार सैनिक मोठ्या प्रमाणावर होते.

पहिल्या बाजीरावांपासून मराठ्यांचे सैन्य घोडदळावर आधारित होते आणि मुख्य शस्त्र तलवार होते. त्या काळात इंग्रज आणि फ्रेंच यांच्या भारतात लढाया सुरू होत्या. पेशव्यांच्या हे लक्षात आले की युरोपीय सैनिकांकडे मस्केट्स आणि तोफा असून त्यांचा परिणामकारक वापर केला जातो. पेशव्यांनी तोफखाना बनविण्यासाठी फ्रेंचांची मदत घेतली. निजामाबरोबरच्या लढाईत पेशव्यांनी पहिल्यांदा तोफखाना वापरला. परंतु घोडदळ आणि तोफखाना याचा संयुक्त वापर कसा करावा हे तंत्र मराठ्यांनी आत्मसात केले नव्हते. पानिपतच्या पराभवाचे ते एक कारण होते. थोरल्या माधवरावांनी तोफखान्याकडे लक्ष पुरविले. पुण्याजवळ आंबेगाव येथे तोफेचे गोळे आणि तोफा बनविण्याची फॅक्टरी १७६९मध्ये चालू करण्यात आली. पण तीन वर्षांतच माधवरावांच मृत्यू झाला. त्यानंतर आपापसात भांडण्यातच पेशवे आणि सरदारांचा वेळ गेला. जेव्हा इंग्रजांबरोबर लढाया चालू झाल्या तेव्हा इंग्रजी तोफा आणि मस्केट्स यांपुढे पेशव्यांचे सैन्य उभे राहू शकले नाही.

पेशवाईचा अंत

सवाई माधवरावाच्या आत्महत्येनंतर १७९५ साली दुसरा बाजीराव पेशवा बनला. यानंतर पुढच्या पाच वर्षांत इंग्रज-मराठे संबंधात मोठे बदल झाले. पहिली गोष्ट म्हणजे दुसरा बाजीराव चंचल, हलक्या कानाचा आणि अपरिपक्व होता. याच काळात लॉर्ड वेलस्ली मुंबईत आला. त्याने आक्रमक धोरण अवलंबिले. दुसर्‍या बाजीरावाने एक घोडचूक केली. होळकर घराण्यातील विठोजी होळकरास काही गुन्ह्यासाठी हत्तीच्या पायदळी दिले आणि त्याचे मुंडके चव्हाट्यावर लावण्यात आले. वाड्याच्या गच्चीवरून बाजीराव ही घटना हसत पाहत होता. याचा परिणाम म्हणून होळकर पुण्यावर चालून आले आणि त्यांनी पुणे लुटले (१८०२). आता इंग्रजांना संधी मिळाली. त्यांनी बाजीरावास तैनाती फौज देऊ केली. वसईच्या तहान्वये इंग्रजांची फौज पुण्यात आली (१८०३). हिंदुस्थानातील त्यावेळची सर्वांत मोठी ताकद इंग्रजांच्या कह्यात आली. यानंतर पेशव्यांच्या अधिकाराच्या खच्चीकरणाचे पुढचे पाऊल टाकले गेले. इंग्रजांनी पेशव्यांच्या जहागीरदारांबरोबर स्वतंत्र करार केला (१८१२). आता जहागीरदारांवरची पेशव्यांची सत्ता संपली आणि इंग्रजांची सत्ता चालू झाली.

शेवटचा अंक नोव्हेंबर १८१७मध्ये चालू झाला. बाजीरावाने शनिवारवाडा सोडला आणि इंग्रजांच्या फौजा पुण्यात शिरल्या. भीमा कोरेगाव येथील जानेवारीमधील १८१८ सालची इंग्रज-पेशवे यांतील लढाई निर्णायक ठरली. पुणे शहरातील इंग्रजांची सैन्याची तुकडी पेशव्यांच्या सेनेपुढे हारताना दिसत होती. तेव्हा शिरूर येथून इंग्रजांची एक रेजिमेंट पुण्यातील इंग्रज सैन्याच्या मदतीस निघाली. त्यांना तोंड देण्यासाठी पेशव्यांची सेना पुण्याजवळ भीमा नदीकाठी येऊन थांबली. एक जानेवारीला दोन्ही सेना आमनेसामने आल्या. इंग्रजांच्या सेनेत पुष्कळसे महार सैनिक होते. केवळ दोन तासाच्या लढाईत पेशव्यांची हार झाली महारांनी पेशव्यांच्या सैन्यावर मिळविलेल्या विजयाचे स्मारक कोरेगाव भीमा येथे उभारण्यात आले.


भीमा कोरेगावचा विजयस्तंभ
भीमा कोरेगावचा विजयस्तंभ

एक जानेवारीस दर वर्षी महार लोक तेथे जमून त्या विजयाचा स्मृतिदिन पाळतात. दलित समाज इतर समाजापासून किती दूर गेला होता याचे हे निदर्शक आहे. या घटनेनंतर दोनशे वर्षांनी अजूनही महार समाज हा स्मृतिदिन पाळतो. समाजातील टोकाची विषमता किती दूरगामी परिणाम करते!

नाटकाचा शेवटच्या अंकाचा पडदा अष्टी येथे फेब्रुवारी १८१८मध्ये पडला. पेशव्यांच्या फौजेची हार झाली. पेशव्यांचा सेनापती – बापू गोखले रणांगणावर धारातीर्थी पडला आणि बाजीराव पळत सुटले. (राजाने निसटून पळत सुटणे आणि मागे राहिलेल्या सैन्याची आणि नागरिकांची पर्वा न करणे हा प्रकार आपण या शतकात पुन्हापुन्हा पाहतो). १८१८मध्ये बाजीरावाचा पराभव झाला आणि कंपनीची सत्ता धारवाडपासून सिंधपर्यंत पसरली.

मराठी सत्तेच्या अंताविषयी प्राध्यापक ओतूरकर काय लिहितात ते पाहू. (मराठ्यांचे साम्राज्य, रा. वि. ओतूरकर, प्रथमावृत्ती १९३७, पुन:प्रकाशन २०२०, वरदा प्रकाशन).

बाजीराव खुनशी, भित्रा, व्यसनी आणि धर्मभोळा होता. दरबारी कारस्थानांचा सुळसुळाट माजला होता. स्वार्थी लोकांच्या महत्त्वाकांक्षेमुळे बेबंदशाही माजली होती. हे पाहिले म्हणजे मराठ्यांचे राज्य इंग्रजांच्या कारस्थानापेक्षा स्वतःच्या कमकुवतपणामुळेच नष्ट झाले हेच म्हणणे योग्य होईल.
संस्थाने खालसा झाली.

संस्थाने बरखास्त होण्याची प्रक्रिया १७८०पासून सुरू झाली. ही एक प्रदीर्घ काळ चाललेली प्रक्रिया होती. जी संस्थाने गिळंकृत झाली त्यांच्या हे लक्षातसुद्धा आले नाही की इंग्रजांना दिलेली छोटीशी सवलत शेवटी त्यांचे राज्यच इंग्रजांच्या पोटात घेऊन जाईल. इंग्रजांनी संस्थाने खालसा करण्यासाठी तीन क्लृप्त्या वापरल्या –

 • वारस नसणे. इंग्रज दत्तक अमान्य करीत.
 • आधी केलेल्या कराराची वचने/ कलमे मोडण्याचा आरोप करणे.
 • मध्यस्थीच्या निमित्ताने शिरकाव करून संस्थांनिकांचा बिमोड करणे.

जी संस्थाने खालसा केली गेली नाहीत ती इंग्रजांच्या पूर्ण अधिपत्याखाली राहिली. हे पहाण्यासारखे आहे की या संस्थानिकांना इंग्रज प्रिन्स म्हणत किंग, राजा नव्हे. १९४७पर्यंत अशी ५५० संस्थाने होती.

आता आपण इंग्रजांनी सातारा संस्थान कसे गिळंकृत केले ते पाहू.

भीमा कोरेगाव येथे पराभव झाल्यावर बाजीराव निसटून पळाले. निर्णायक लढाई अष्टीला झाली. अष्टीच्या लढाईला इंग्रजांनी असे स्वरूप दिले की ती लढाई शिवाजीचे वंशज छत्रपती यांच्याविरुद्ध नसून लढाई पुंडगिरी करणार्‍या ब्राह्मण पेशव्याविरुद्ध आहे. हा विचार सातार्‍याच्या छत्रपतींच्या सरदारास मान्य झाला. बाजीरावास पकडून ब्रह्मावर्तास पाठविल्यावर छत्रपतीस सन्मानाने गादीवर बसविण्यात आले. छत्रपतींना 'मदत' करण्यासाठी इंग्रजांचा रेसिडंट दरबारात राहिला. छत्रपतीला मासिक २६,००० रुपये (आजच्या किमतीत ५ कोटी) तनखा निश्चित झाला. राज्याचा पूर्ण अधिकार रेसिडंट ग्रँट यांच्याकडे गेला. हा कारभार पंधरा वर्षे चालला. यानंतर दुसरा रेसिडंट आला. लगेच छत्रपतींवर निरनिराळे आरोप करण्यात आले. या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमला गेला. या आयोगाने पूर्णपणे गुप्त चौकशी केली (म्हणजे काय चौकशी झाली ते कोणालाच कळले नाही.) १८३९ साली छत्रपतींस पदच्युत करण्यात आले. त्यानंतर छत्रपती २,७०० लोक बरोबर घेऊन काशीला गेले. तेथे छत्रपतींसाठी एक निवासस्थान बांधले होते. काशीला सात वर्षे राहून छत्रपती काशीतच मरण पावले. अशाप्रकारे सातार्‍याच्या संस्थानाचे अस्तित्व राहिले नाही.

कोल्हापूरच्या संस्थानाविषयी डॉक्टर क. वि. लोखंडे लिहितात (छत्रपती दुसरे शिवाजी, पारस पब्लिकेशन्स, २०२१, पृष्ठ २४२) –

एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात हिंदुस्थानातील (संस्थानिकातील आपसी) तंटेबखेडे सोडविण्यास इंग्रजांशिवाय दुसरे कोणी समर्थ नव्हते. भांडत बसलेल्या राज्यकर्त्यांस कंपनीने आपल्या दावणीस बांधले. पेशवे आणि करवीर यांच्या सत्तास्पर्धेत इंग्रजांना मदतीला बोलाविले. आणि त्यांच्या मध्यस्थीने दोघांचाही मोड झाला. तैनाती फौजेचा स्वीकार करून एतद्देशीयांनी आत्मघात करून घेतला.


फाळणीआधीचा भारत
फाळणीआधीच्या भारताचा नकाशा

वरील नकाशातील रंगावरून दिसून येते की संस्थानांनी भारताचा मोठा भाग व्यापला होता.

पेशवाईच्या अस्तानंतर खर्‍या अर्थाने बाँबे प्रेसिडेंसीत दोन मोठी संस्थाने होती – कोल्हापूर आणि बडोदे. या दोन्ही संस्थानांत इंग्रजांचे रीजंट आधीपासूनच नेमण्यात आले होते. यानंतर कोल्हापूरचे संस्थान स्वातंत्र्यापर्यंत टिकले. कोल्हापूरच्या भोसले घराण्यात १८९४ साली शाहू महाराज गादीवर आले जे समाजसुधारणा करणारे राजे होते. यांचे नावही शाहू असल्याने त्यांचा १९० वर्षापूर्वीच्या शाहू महाराजांशी गोंधळ होतो. या शाहू महाराजांचा उल्लेख पुढे येईल.

निष्कर्ष

अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठ्यांनी देशभर आपला दरारा निर्माण केला. दुर्दैवाने थोरले माधवराव यांचे निधन फार लहान वयात झाले आणि त्यानंतर कोणीही कर्तबगार पेशवा झाला नाही. मग एका बाजूस मराठी सत्ता कोलमडली आणि दुसर्‍या बाजूस इंग्रजांची सत्ता वाढत गेली. इंग्रजांनी निरनिराळे अवैध मार्ग अवलंबून एकामागून एक संस्थाने गिळंकृत केली. शतकाच्या शेवटी इंग्रजांचे मोठे सैनिक सामर्थ्य उभे झाले होते. या सामर्थ्याची खरी कल्पना कोणत्याच संस्थानिकाला आली नाही. शतकाच्या शेवटी इंग्रजांनी संपूर्ण देशावर स्वामित्व प्रस्थापित केले होते. सन १८१८मध्ये राजकीय स्थिती कशी होती? देशात ५००हून अधिक संस्थाने होती. हे संस्थानिक बाहेरच्या देशांशी संपर्क करू शकत नसत. राजदरबारी एक इंग्रज अधिकारी असे. संस्थानिक त्यांच्या भागात शिक्षण, आरोग्य, रस्ते अशा स्वरूपाची कामे करू शकत असत. उत्सवातील मिरवणुकांकरिता शंभर-दोनशेपेक्षा जास्त सैन्य ठेवण्याची परवानगी नव्हती. ही संस्थाने भारताचा ३०%पेक्षा जास्त भूभाग व्यापत होती. उरलेला भूभाग इंग्रजांच्या पूर्ण वर्चस्वाखाली होता. बाँबे प्रेसिडेंसी, मद्रास प्रेसिडेंसी आणि बंगाल प्रेसिडेंसी अशा तीन ठिकाणांहून ईस्ट इंडिया कंपनी देशाचा कारभार चालवत असे.

पुढच्या भागात – भाग ३, अठराव्या शतकातील समाजाच्या स्थितीचा विचार करू.
पुढील भाग

लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.

सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण.

सुधीर भिडे

field_vote: 
0
No votes yet

वाचतो आहे!

एक किंचित आश्चर्यकारक माहितीतुकडा : बाँबे प्रेसिडेंसीचा सर्वात पश्चिमेचा बिंदू (आजच्या) येमेनमधलं एडन हे बंदर होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

१९३२पर्यंत.

यात आश्चर्यकारक काहीही नाही. परकीय सत्तेने आपल्या प्राशासनिक सोयीसाठी केलेले एकत्रीकरण होते ते. त्यामागे इतर कोणतेही यमक वा कारण नव्हते. (फार कशाला, १८४४पर्यंत मकाव आणि तिमोर यांचे प्रशासनसुद्धा पणजीहून चालायचे, असे ऐकलेले आहे.)

(अवांतर: बलुचिस्तानच्या मकरान किनारपट्टीवर ग्वादर हे जे शहर आहे, जेथे पाकिस्तान चीनच्या मदतीने मोठे बंदर बांधू पाहात आहे, ते बराच काळ ओमानच्या मालकीचे होते. स्वातंत्र्यानंतर बऱ्याच वर्षांनी, १९५८ साली, पाकिस्तानने ते ओमानकडून विकत घेऊन पाकिस्तानात सामील करून घेतले. तेव्हाचे साडेपाच अब्ज रुपये खर्च आला म्हणे. अर्थात, यातले बरेचसे पैसे आगा खान यांनी दिले (असे म्हणतात) म्हणा. परंतु ते असो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अटकेपार साम्राज्य पोहोचल्यावर, इतक्या मोठ्या प्रदेशाचे प्रशासन गुंतागुंतीचे झाले असावे. भारतात (आणि युरोपातसुद्धा) कधीच चीनसारखे इतक्या मोठ्या प्रदेशावर एकच भाषा, एकच लिपी असे झाले नाही.

तसा अटकेपार झेंडे म्हणजे खूप मोठा पराक्रम. पण जसे इन्का साम्राज्याच्या अताउल्फाला कधीच वाटले नाही की, या युरोपियनांवर आक्रमण करून स्पॅनिश साम्राज्य काबीज करावे. तसेच, मोघलांना, ना मराठ्यांना, नवाबाला वाटले नाही. पृथ्वी गोल आहे ही समज युरोपियनांना फार लवकर आली.

"इतिहासाचा अभ्यास आणि ‘स्मृती’" हौशी इतिहास वाचकांना कालचा हा लेख कदाचित आवडेल. खास करून हे वाक्य.

गतकाळाविषयी चौकसपणे प्रश्न पडणे ठीक पण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळालेच पाहिजे असे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतात (आणि युरोपातसुद्धा) कधीच चीनसारखे इतक्या मोठ्या प्रदेशावर एकच भाषा, एकच लिपी असे झाले नाही.

चीनमध्येसुद्धा इतक्या मोठ्या प्रदेशावर एकच भाषा, एकच लिपी आहे, ही कल्पना माझ्या कल्पनेप्रमाणे तितकीशी बरोबर नसावी. (अधिकृत/सरकारी/प्राशासनिक/लादलेली भाषा एकच असणे वेगळे. स्थानिक लोक स्थानिक व्यवहारांत जी बोलतात/वापरतात, ती भाषा धरल्यास, एवढ्या मोठ्या प्रदेशावर एकच भाषा जगात नैसर्गिकत: फारच थोड्या ठिकाणी असावी. (यात एकाच भाषेच्या विविध स्थानिक बोलींना स्वतंत्रपणे जमेस धरलेले नाही. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांसारखे 'नवे' देश/प्रदेश याला अर्थातच अपवाद आहेत, परंतु त्याला स्थलांतरितांचा (अधिक स्थानिकांच्या उच्चाटनाचा) इतिहास जबाबदार आहे.)

आणि, भाषा जर एकच नसेल, तर लिपी जरी एकच असली/नसली, तरी त्याने फारसा फरक पडू नये.

पृथ्वी गोल आहे ही समज युरोपियनांना फार लवकर आली.

त्यापेक्षासुद्धा, निकडीच्या वस्तूंच्या पुरवठासाखळीतील व्यत्ययामुळे निर्माण झालेली (तात्कालिक?) गरज हे कारण असू शकेल काय?

नाही म्हणजे, युरोपियनांतसुद्धा आपापसातल्या मारामाऱ्या (हिंदुस्थान्यांप्रमाणेच) पूर्वापार होत्या. परंतु, तुर्कांनी इस्तंबूल काबीज करून मसाल्याच्या (मध्यपूर्वेतील दलालांमार्फत) आयातीच्या व्यापाराच्या नाड्या आवळेपर्यंत कोठल्याही युरोपीय खलाश्याला पूर्वेचा (किंवा, गोलपृथ्वीमार्गाने पश्चिमेचा) रस्ता शोधायला झक मारत उठून निघण्याची गरज भासलेली नव्हती. (किंवा, १४५३पूर्व युरोपीय खलाशी आळशी असावेत काय?)

(हं, आता, ठिकठिकाणी लांबवर जाऊन वसाहती स्थापायला सुरुवात केल्यानंतर मग त्याची - रक्ताची लागते, तशी - चटक लागली असणे शक्य आहे. पण, ती चटक लागण्याअगोदर काय?)

----------
आणि, दूरदेशांतल्या (आशियातल्या/आफ्रिकेतल्या/ऑस्ट्रेलियातल्या/अमेरिकेतल्या) वसाहती काबीज केल्यावर त्या मारामाऱ्या थांबल्या, अशातलाही भाग नाही. दोन्ही महायुद्धे हे त्या मारामाऱ्या न थांबल्याचेच द्योतक आहे.

पर्यायी अश्लील शब्द मोठ्या कष्टाने आवरलेला आहे. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चीन मधली ही माहिती मला अलिकडेच जर्म्स, स्टील... मधून कळली. या पुस्तकाची पीडीएफ इथे उपलब्ध आहे. त्यात एक धडा चीनवर आहे.

परंतु त्याला स्थलांतरितांचा (अधिक स्थानिकांच्या उच्चाटनाचा) इतिहास जबाबदार आहे.

तुमचा अंदाज बरोबर आहे. नॉर्थ अमेरिकामध्ये इंग्रजी, साउथ अमेरिकेत स्पॅनिश आपसूक स्विकारली गेली नाही. युरोपिअनांनी अर्थात वंशसंहार केला, जे उरले त्यांच्यावर आपली भाषा लादली. (पान नं ३२८ शेवटचा पॅरा).^

अर्थात चीन मध्ये आजही इतर भाषा आहेत.(मँडरीनच्या जवळच्या सात भाषा - पण काही लाख लोकात बोलली जाते. तर इतर ३ भाषासमुह ज्या केवळ काही हजारो लोकात बोलल्या जातात). आणि आश्चर्य म्हणजे या भाषा एकच प्रदेशात नाही तर बर्‍याच मधल्या-मधल्या भूप्रदेशात आहेत. पण सर्वसाधारण एकच भाषा एक लिपी हे अलिकडे नाही तर साधारण दोन हजार वर्षापूर्वी घडले. (पान नं. ३२४)

उत्तर चीन मधली लोकं दक्षिण चीनच्या लोकांना रानटी आणि अशिक्षित समजत. बर्‍याच सुधारणा या उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्या. (काही तुरळक दक्षिण चीन मधून उत्तर चीन मध्ये). झाओ राज्यकर्त्यांनी उत्तरेकडून दक्षिणेकडे राज्य वाढवले. आणि अशाप्रकारे प्रथम राजकीय एकीकरण ('पॉलिटिकल कन्सॉलिडेशन') झाले. त्यानंतर आलेल्या क्विन राज्यकर्त्यांनी संस्कृतीचे एकीकरण केले. यांच्या पहिल्या राजाने तर दुसर्‍या भाषेची सगळी पुस्तकं जाळण्याचा आदेश दिला. त्यामुळे बराच ऐतिहासिक ऐवज नाहिसा झाला. आणि सध्याची भाषा अधिक वेगाने पसण्यास मदत झाली. (पान नं. ३३२)

the first Qin emperor condemned all previously written historical books as worthless and ordered them burned, much to the detriment of our understanding of early Chinese history and writing. Those and other draconian measures must have contributed to the spread of North China's Sino-Tibetan languages over most of China, and to reducing the Miao-Yao and other language families to their present fragmented distributions

त्यामानाने भारतात असे भाषेचे एवढ्या प्रमाणात एकीकरण झाले नाही.

दुसरा मुद्दा पटतो. तेच कारण असण्याची शक्यता जास्त आहे. व्यापारासाठी राज्यकर्त्यांना, खलाश्यांना नवीन मार्ग शोधण्याची गरज भासली असावी. त्यात भर म्हणून भांडवलशाहीचा उदय (आद्य शेअर बाजारातून साहसी दर्यावर्दी सफरींसाठी भांडवल उभे करण्याची कल्पना) त्यांच्या पथ्यावर पडली.

^ भारत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड सारखा राजकीय दृष्ट्या कमकूवत नव्हाता. भले इथल्या व्यवस्थेत बर्‍याच त्रुटी असतील, पण एक राजकीय व्यवस्था इथे होती. समाजात वर्गवारी - 'स्ट्रॅटीफाईड सोसायटी' - सगळ्या संस्कृतीचा भाग आहे, भारतात त्याचे प्रमाण जरा अधिक होते. जर कमकुवत व्यवस्था असती तर इंग्रजांनी इथेही वंशसंहार केला असता आणि आपली एक कॉलनी बसवली असती आणि ऑस्ट्रेलियासारखा एखाद दिवस "नॅशनल सॉरीडे" म्हणून ठेवला असता. त्यामुळे काही मवाळ-उदारमतवादी नेत्यांना इंग्रजी राज्य दैवी देणगी वाटत होती, तेही मत चुकीचे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या युरोपियनांवर आक्रमण करून स्पॅनिश साम्राज्य काबीज करावे. तसेच, मोघलांना, ना मराठ्यांना, नवाबाला वाटले नाही.

हे खरे नाही.

दुसरा/का तिसऱ्या शाहूच्या महत्त्वाकांक्षा दमास्कस इस्तांबूलच्या पुढे गेल्या होत्या हे आता समोर आले आहे. आणि मराठा नेव्हीही आंग्र्यांच्या नेतृत्त्वाखाली बरीच मजल मारत होती.

संदर्भ ठाऊक नाहीत पण वरील गोष्टी वाचनात आल्या. जाणकार अधिक बोलतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

अर्थात नवीन माहिती वाचायला आणि मतामध्ये बदल करण्यास नक्कीच आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कान्होजी आंग्रे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई आंग्रे यांनी इसवी सन 1734 साली थोरल्या शाहू छत्रपतींना एक पत्र लिहिले ज्यात त्या म्हणाल्या -

‘महाराजांसारखा धनी सर्व प्रकारे अभिमानी चित्तावरी धरितील तरी रुमशाम शासनाक्रांत करितील.’

म्हणजेच, जर महाराजांनी मनात जरी आणले तरी नक्कीच रुमशामवर जरीपटका फडकेल.

रुमशामवर जरीपटका फडकवण्याचा मनसुबा अजून एका पत्रात आहे पण आता संदर्भ सापडत नाही. मुद्दा हा की क्षमता असो वा नसो, पण मराठ्यांचा कॉन्फिडन्स स्वराज्यानंतर तिसऱ्या पिढीतच कल्पनेत का होईना रूमशामसुद्धा घेऊ इथवर आला होता हे सुद्धा काही कमी नाही इतकेच म्हणायचे होते.

आंग्र्यांचा पराक्रम थोर होता. मादागास्करच्या सरदारांनी शाहूचे मांडलिकत्व पत्करले होते.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

मी नोंद करून ठेवायचे विसरलो.
पण एका अलीकडच्या गुजराती (लेखकाच्या) पुस्तकाविषयी ऐकायला मिळाले. जर इतर कोणाला संदर्भ मिळाला तर अवश्य सांगावे.

पुस्तक इस्लामपूर्व काळातील भारतीयांच्या अरबस्तान आणि मध्यपूर्वेशी असलेल्या संबंधांवर आहे. विशेषत: गुजराती व्यापाऱ्यांच्या/ना मध्यपूर्वेविषयी काय कल्पना आणि माहिती होती याविषयी आहे..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

त्याची ही पोच

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0