ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग ११

प्रकरण ११ – निसर्गोपचार

सुधीर भिडे

विषयाची मांडणी

  • निसर्गोपचाराचे प्रवर्तक
  • निसर्गोपचाराचे सिद्धांत
  • उपचारपद्धती
  • जलोपचार
  • माती (चिखल)
  • लोहचुंबक उपचार
  • ॲक्युप्रेशर
  • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ नेचरोपथी, पुणे
  • नेचरोपथीचे शिक्षण
  • निसर्गोपचाराला शास्त्रीय वैद्यक म्हणता येईल का?

***

निसर्गोपचाराचे प्रवर्तक

व्हिनसेंट प्रिसनित्ज (Vincenz Priessnitz) यांचा जन्म १७९९ साली जर्मनीतील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे औपचारिक शिक्षण झाले नव्हते. स्वत:च्या शारीरिक जखमा आणि आजारांवर त्यांनी प्रयोग करून जलचिकित्सेचा (hydrotherapy) प्रयोग चालू केला. त्याच प्रमाणे त्यांनी व्यायाम, विश्रांती आणि शाकाहार यांवर भर दिला. त्यांची ओळख मुख्यत्वे जलचिकित्सेमुळे आहे.

एडॉल्फ जस्ट हे निसर्गोपचारातील अजून एक प्रवर्तक मानले जातात. हे पुस्तकविक्रेते होते. प्रिसनित्जप्रमाणेच त्यांनी स्वत:च्या आजारांवर स्वत: उपचार केले आणि निसर्गोपचाराचे नियम बनविले. स्वत: अनुभवाच्या आधारावर त्यांनी एक सॅनिटोरियम सुरू केले.

निसर्गोपचार आणि गांधीजी
Indian J Med Res. 2019 Jan; Mahatma Gandhi and Nature Cure, Komarraju Satyalakshmi

Gandhiji’s health determinants dictated him to adopt nature cure and recommend to all others as it emphasises self-responsibility and provides self-reliance. According to him, so long as people depend on drugs, doctors and hospitals for their health needs, they are not truly liberated. He was a staunch practitioner of naturopathy all through his life. While he was doing law in the 1880s in London, Gandhiji was greatly influenced by Adolf Just's book, Return To Nature, The Paradise Regained and Louis Kuhne's New Science of Healing.
He initiated a nature cure hospital in a small village near Pune, Urlikanchan, to provide medical services to the rural poor. From August 21 to November 18, 1945, Gandhiji took a 90-day in-patient course of treatments from Dr. Dinshah in his Nature Cure Clinic and Sanatorium at Poona. It greatly improved his health. During this period, Mahatma Gandhi gained 6 lbs. (2.7 kg.) in weight and felt greatly refreshed. He remarked confidently: “I shall now live for 120 years!” Mahatma Gandhi founded the All India Nature Cure Foundation trust on November 18, 1945; with the Institution – the Nature Cure Clinic and Sanatorium, Poona – as its nucleus.

प्रस्तुत लेखातील बरीचशी माहिती, आरोग्याची गुरुकिल्ली – निसर्गोपचार पद्धती, लेखक – डॉक्टर ध. रा. गाला, डॉक्टर धिरेन गाला आणि डॉक्टर संजय गाला, नवनीत पब्लिकेशन्स, १९९७, या पुस्तकातून घेतली आहे. निसर्गोपचार पद्धती इतर वैद्यकीय प्रणालींपेक्षा वेगळी आहे; या प्रणालीत औषधे नाहीत. याशिवाय वरील पुस्तकाचे लेखक लिहितात त्याप्रमाणे –

एखाद्या रोग्याच्या बाबतीत नैसर्गिक उपचारांचा उपयोग होत नाही असे दृष्टीस आले तर इतर चिकित्सेकडे वळावे असे सुचविले जाते (पृष्ठ ७). ज्या रोगांसाठी शस्त्रक्रिया अनिवार्य आहे असे रोग सोडले तर इतर रोग निसर्गोपचामुळे बरे होऊ शकतात. (पृष्ठ १५)

इथे हे मान्य केले गेले की काही आजारांत शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते आणि त्यास नेचरोपथीमध्ये उत्तर नाही.

निसर्गोपचाराचे सिद्धांत

  • सर्व रोगांच्या उद्भवाचे एकच कारण आहे – शरीरात विषारी घटकांचा संचय होणे. (toxaemia)
  • रोग म्हणजे नैसर्गिक रोगनिवारण शक्तीची अभिव्यक्ती
  • जहरी घटकांचा संचय हे रोगाचे कारण आणि जिवाणूंची वृद्धी हा त्याचा परिणाम आहे.
  • जिवाणूंच्या वाढीसाठी शरीरात अनुकूल परिस्थिती नसली तर आजार उद्भवू शकत नाहीत.
  • प्रकृती रोगनिवारण करते औषधे रोगनिवारण करत नाहीत.

पुस्तकाच्या या भागात लेखकांनी काही प्रयोगांची माहिती दिली आहे. या प्रयोगात चांगली प्रकृती असलेल्या व्यक्तींच्या शरीरात जिवाणू सोडण्यात आले. असा संसर्ग होऊन देऊनही त्या व्यक्तींना काही आजार झाले नाहीत. अशा प्रयोगांचा काहीच संदर्भ न दिल्याने विश्वासार्हता कमी होते.

आजारी पडायचे नसेल तर रोगप्रतिकारशक्ती – जीवनशक्ती – प्रबळ करण्यासाठी पुढील गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे – आहार, व्यायाम, नियमित जीवन, व्यसने, मानसिक तणावापासून मुक्तता, औषधांचा अविचारी वापर टाळणे.

उपचारपद्धती

निसर्गोपचार वैद्यकातील वेगवेगळ्या उपचारपद्धतींचे दोन भाग करता येतात.

  • आहार, रसाहार, उपवास, व्यायाम, थंड अथवा गरम पाण्याने स्नान, सूर्यस्नान, वायुस्नान, मालीश
  • जलोपचार, माती / चिखल उपचार, लोहचुंबक उपचार, ॲक्युप्रेशर

पहिल्या प्रकारातील उपचारपद्धतींविषयी जास्त काही बोलण्यासारखे नाही. आधुनिक शास्त्राप्रमाणे ज्याला निरोगी जीवनशैली – healthy lifestyle – समजले जाते त्याच या सर्व उपचारपद्धती आहेत. दुसऱ्या प्रकारातील उपचार प्रश्नचिन्हे उभी करतात. आपण फक्त त्यांचाच विचार करू.

जलोपचार

या उपचारपद्धतीत वेगवेगळ्या प्रकारच्या आंघोळी सांगितल्या आहेत. त्याबाबत काही प्रश्न असण्याचे कारण नाही. आंघोळीमुळे नेहमीच माणसाला शारीरिक आणि मानसिक आराम मिळतो. आता प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या पद्धती पाहू.

आरोग्याची गुरुकिल्ली – निसर्गोपचार पद्धती, लेखक – डॉक्टर ध. रा. गाला, डॉक्टर धिरेन गाला आणि डॉक्टर संजय गाला, प्रकाशक नवनीत पब्लिकेशन्स, १९९७, या पुस्तकातून.

ओल्या कपड्याने सर्वांग गुंडाळणे – पुष्कळ घाम येऊन शरीरातील विषद्रव्य बाहेर काढण्यासाठी हा फलदायी उपाय आहे.
वमन – उलटी / ओकारी -थोडे मीठ घातलेले पुष्कळ पाणी पिऊन मग तोंडात बोटे घालून ओकारी काढावी. ही क्रिया महिन्यातून एक दोन वेळा करावी.

माती (चिखल)

चिखलोपचार

स्वच्छ गाळलेली माती घेऊन त्यात लोण्याइतके मऊ होईल एव्हढे पाणी घालावे. या चिखलाचा संपूर्ण शरीरावर किंवा शरीराच्या दुखऱ्या भागावर लेप द्यावा. गळू अथवा पू झालेल्या भागावर लेप दिल्यास जखम बरी होते. माती शरीरातील विषद्रव्ये शोषून घेते.

(मड थेरपीचे फायदे माहिती News 18 Lokmat, 09/02/2022 या अंकातून)

१. मासिक पाळीच्या त्रासामध्ये आराम
महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी (periods) येण्याच्या समस्येमुळे गर्भाशय, हात, पाय, कंबर आणि स्तनांत वेदना होतात. भूक न लागणे, थकवा जाणवणे, वजन वाढणे, बद्धकोष्ठता अशा समस्या उद्भवू लागतात. अशा परिस्थितीत मड थेरपी खूप प्रभावी ठरू शकते. मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी पोटावर कोमट मातीची पट्टी ठेवा, त्यामुळे वेदना कमी होतील. याउलट ज्या महिलांना मासिक पाळीत जास्त रक्तस्राव होत असेल त्यांनी ओल्या मातीची पट्टी पोटाच्या खालच्या भागावर ठेवल्यास आराम मिळतो. तसेच, अनियमित कालावधीसाठी मड बाथ थेरपी घ्या.

२. पचनक्रिया सुधारते
चिकणमाती पोटावर लावल्यास पचनक्रिया चांगली होते. याशिवाय हे मेटाबॉलिजम वाढवण्याचे काम करते.

३. त्वचेच्या समस्येवर उपाय
मड थेरपी घेऊन त्वचेशी संबंधित समस्यांवर (skin problems) मात करता येते. मड थेरपीमुळे सुरकुत्या, पुरळ, त्वचेचा कोरडेपणा, डाग, पांढरे डाग, कुष्ठरोग यापासून आराम मिळतो. मड थेरपी घेतल्याने त्वचेची चमक वाढते आणि त्वचा मुलायमही होते.

४. डोकेदुखी आणि तापामध्ये फायदेशीर
जर तुम्हाला तीव्र डोकेदुखी होत असेल तर तुम्ही या खास मातीच्या पेस्टच्या मदतीने डोकेदुखीमध्ये आराम मिळवू शकता. याशिवाय, ताप कमी करण्यासाठी तुम्ही मड थेरपीदेखील घेऊ शकता.

५. डोळ्यांसाठी फायदेशीर
कॉम्प्युटरवर जास्त काम केल्यामुळे डोळ्यात दुखत असेल तर तळव्यांना मातीची पेस्ट लावावी. असे केल्याने डोळ्यांना खूप आराम मिळेल.

अशा प्रकारे प्रसारमाध्यमांतून आलेल्या माहितीचे दुष्परिणाम होतात. वरील दाव्यांना काहीही शास्त्रीय आधार नाही.

लोहचुंबक उपचार

आरोग्याची गुरुकिल्ली – निसर्गोपचार पद्धती, लेखक – डॉक्टर ध. रा. गाला, डॉक्टर धिरेन गाला आणि डॉक्टर संजय गाला, प्रकाशक नवनीत पब्लिकेशन्स, १९९७, या पुस्तकातून.

मानवावर लोहचुंबकाचा काय परिणाम होतो ते जाणण्यासाठी प्रयोग झाले आहेत. लोहचुंबकाद्वारे उपचार केल्यास रक्तदाब आटोक्यात येतो, रक्तातील लाल पेशींची संख्या वाढते आणि रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. लोहचुंबक पद्धतीचे दोन प्रकार आहेत. एका ध्रुवाचा वापर, अथवा दोन ध्रुवांचा वापर.

दक्षिण ध्रुवाचे गुणधर्म – गती मंद होते, गारवा येतो, आम्ल कमी होते, संकोचन पावते, रक्ताभिसरण कमी होते, सूज उतरते, गाठी कमी होतात.

संसर्ग आणि सूज (इन्फ्लेमेशन), संधिवात मज्जातंतूंचा आजार यांवर दक्षिण ध्रुव काम करतो.

उत्तर ध्रुवाचे परिणाम – उष्णता मिळते, शारीरिक क्रियांना उत्तेजना मिळते, आम्लता वाढते, रक्ताभिसरण वाढते, सूज वाढते, गाठ वाढते.

पक्षाघात, हर्निया त्वचेचे आजार यावर उत्तर ध्रुव काम करतो.

आपल्या शरीरात सात ऊर्जा चक्रे असतात यावर चुंबकीय ऊर्जेचे चांगले परिणाम होतात.

या बाबतीत जगात झालेले संशोधन काय दाखविते?

Scientific studies on human subjects have failed to show the efficacy of using magnets to treat pain or joint and muscle stiffness. One of the largest studies was published in 2007 in the Canadian Medical Association Journal — a systematic review of numerous previous studies on static magnets.
The researchers concluded: "The evidence does not support the use of static magnets for pain relief, and therefore magnets cannot be recommended as an effective treatment."
In 2006, UC Irvine's Flamm took a closer look at the science behind therapeutic magnets in an article that he published with Leonard Finegold, a professor of physics at Drexel University. For their article, published in the British Medical Journal, the authors reviewed the scientific literature on the efficacy of commercially available therapeutic magnets to treat a variety of ailments. They found no evidence that such magnets actually work.

Elizabeth Palermo, Live Science February 12, 2015

ॲक्युप्रेशर
आरोग्याची गुरुकिल्ली – निसर्गोपचार पद्धती, लेखक – डॉक्टर ध. रा. गाला, डॉक्टर धिरेन गाला आणि डॉक्टर संजय गाला, प्रकाशक नवनीत पब्लिकेशन्स, १९९७, या पुस्तकात ॲक्युप्रेशर हे निसर्गोपचाराखाली गणले आहे. ॲक्युपंक्चर वा ॲक्युप्रेशरची माहिती पुढच्या भागात दिली आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नेचरोपथी, ताडीवाला रोड, पुणे

डॉक्टर दिनशा मेहता यांनी ही नेचरोपथीची सेवा चालू केली. १९७५ साली ही संस्था भारत सरकारला देण्यात आली. सध्या या संस्थेत खालील सेवा देण्यात येतात.

  • रोग्यांना कंसल्टेशन
  • येथील दुकानात नैसर्गिक खाद्य पदार्थ आणि पेये विकली जातात.
  • डाएट सेंटर
  • योगा क्लासेस
  • ॲक्युप्रेशर सेंटर
  • निसर्गोपचार वैद्यांसाठी ट्रेनिंग कोर्सेस.

पुण्याजवळची दोन निसर्गोपचार केंद्रे

महात्मा गांधींनी सुरू केलेला निसर्गोपचार आश्रम उरळीकांचन येथे आहे. लोणावळ्याजवळ कैवल्यधाम केंद्र आहे. या दोन्ही ठिकाणी राहून उपचार घ्यायचा असतो. आठ दिवसाचा खर्च दहा ते वीस हजारापर्यंत असू शकतो. या उपचारकेंद्रातून आता योग आणि इतर आयुर्वेदाच्या उपचारपद्धतींचा वापर होऊ लागला आहे.

नेचरोपथीचे शिक्षण

सरकारी आकड्याप्रमाणे नेचरोपथीचे शिक्षण देणाऱ्या तीसच्या आसपास संस्था आहेत (दहा ऑगस्ट २०१८ला लोकसभेतील प्रश्न आणि उत्तर). या सरकारमान्य संस्थांशिवाय अजूनही खाजगी संस्था आहेत. स्नातकांना BNYS - Bachelor of Naturopathy & Yoga Sciences ही पदवी दिली जाते. हा कोर्स साडेपाच वर्षांचा आहे. सध्या तरी हा कोर्स आयुषचा भाग नाही.

या अभ्यासक्रमात आधुनिक वैद्यकाचे हे विषय शिकविले जातात -

  • Human Anatomy and Systems within the Body
  • Pathology
  • Microbiology
  • Basic Pharmacology
  • Forensic Medicine
  • Biochemistry and Histology
  • Genetics
  • Gynaecology
  • Psychotherapy

आपण हे पाहिले की आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि नेचरोपाथी या वैद्यकीय प्रणालींच्या शिक्षणात आधुनिक विज्ञानाचे विषय शिकविले जातात.

निसर्गोपचाराला शास्त्रीय वैद्यक म्हणता येईल का?

आपण हे पाहिले की आहार, व्यायाम, मसाज, स्नान, योग यांबाबत काही आक्षेप असण्याचे कारण नाही. प्रश्न चिखलाचे उपचार, चुंबकोपचार आणि ॲक्युप्रेशर या उपचारांबाबत राहतात. चुंबकोपचराच्या बाबतीत संशोधन झाले आहे. त्याची माहिती आपण वर पाहिली. इतर वैद्यकांना लावलेले निकष निसर्गोपचाराला लावण्यात काही अर्थ नाही. एक कारण म्हणजे निसर्गोपचारात काही औषधे नाहीत. त्यामुळे औषधांच्या RCT हा प्रश्न उद्भवत नाही. निसर्गोपाचारात शल्यचिकित्सा, सर्जरी नाही. निसर्गोपचाराच्या चिखलाचे उपचार, चुंबकोपचार आणि ॲक्युप्रेशर उपचारपद्धती आहेत त्यांवर जगात संशोधन झाले आहे, आणि त्या उपचारपद्धती काम करत नाहीत असे सिद्ध झाले आहे. थोडक्यात आपण निसर्गोपचाराला शास्त्रीय उपचारपद्धती म्हणू शकत नाही. निसर्गोपचार ही एक जीवनशैली आहे, उपचारपद्धती नाही.

(क्रमशः)

***

भाग १ - शास्त्रीय दृष्टीकोनातून निरनिराळ्या वैद्यकीय प्रणालींचे मूल्यांकन
भाग २ - ॲलोपथीच्या आधीचे पाश्चिमात्य वैद्यक
भाग ३ - आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त
भाग ४ - आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त – त्रिदोष
भाग ५ - परीक्षा आणि चिकित्सा
भाग ६ - आयुर्वेदाची औषधे – भाग १
भाग ७ - आयुर्वेदाची औषधे – भाग २
भाग ८ - आयुर्वेदाचे शिक्षण आणि नंतर
भाग ९ - आयुर्वेदाची प्रॅक्टीस
भाग १० - युनानी आणि सिद्ध

field_vote: 
0
No votes yet

प्रस्तुत लेखातील बरीचशी माहिती, आरोग्याची गुरुकिल्ली – निसर्गोपचार पद्धती, लेखक – डॉक्टर ध. रा. गाला, डॉक्टर धिरेन गाला आणि डॉक्टर संजय गाला, नवनीत पब्लिकेशन्स, १९९७, या पुस्तकातून घेतली आहे. निसर्गोपचार पद्धती इतर वैद्यकीय प्रणालींपेक्षा वेगळी आहे; या प्रणालीत औषधे नाहीत.

होय ते पुस्तक वाचले आहे.

मते आणि नोंदी म्हणून लेख ठीक आहे.

महात्मा गांधींनी सुरू केलेला निसर्गोपचार आश्रम उरळीकांचन येथे आहे. लोणावळ्याजवळ कैवल्यधाम केंद्र आहे. या दोन्ही ठिकाणी राहून उपचार घ्यायचा असतो. आठ दिवसाचा खर्च दहा ते वीस हजारापर्यंत असू शकतो.

उरळीकांचनला (दोन तास) एकदा फेरी मारून आलोय (उपचारासाठी नाही.) उपचारांची शुल्कयादी पाहिल्यावर खर्चिक आहे लक्षात येते. कोणे एके काळी गांधींच्या काळात उरुळी अगदी ओसाड असावे,शहरीकरण नसल्याने हवा शुद्धच असावी आणि तिथे केवळ भाकरी भाजी खाऊन पंधरा दिवस राहिल्यानेही प्रकृती सुधारत असावी. हवापालट हा एक निसर्गोपचार धरला तर. पण आता जवळून जाणारा पुणे सोलापूर अखंड वाहता रस्ता इतके प्रदूषण ओतत असेल की तिथले उपचार बोथट होत असतील. कोणे एके काळी सोलापुरात खेडेगावात राहून टीबीचे रुग्ण बरे होत असत तसे. उष्ण आणि कोरडी हवा जंतू वाढू देत नाही हेसुद्धा असावे.
बाकी लिहू तेवढे थोडेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0