Cold Blooded - ७

सकाळी साडेआठ वाजता वाजता रोहितने आपलं हॉटेल चेक-आऊट केलं आणि एअरपोर्टला जाण्यासाठी टॅक्सी पकडली. तासाभराने तो एअरपोर्टवर जवळपास पोहोचला असताना त्याच्या मोबाईलवर कदमांचा फोन आला.

"गुड मॉर्निंग! बोला कदम....."

"सर....."

"आर यू शुअर कदम? तुमची पूर्ण खात्री आहे?"

"येस सर ....."

कदमांच्या शब्दाशब्दाला त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बदलत होते. गेले दहा - बारा दिवस दिल्ली, सिमला, मंडी, कलकत्ता अशी सुरु असलेली अथक धावपळ आणि इन्क्वायरी आणि त्यातून पुढे आलेली माहिती याची नव्याने सांगड घालणं आता क्रमप्राप्तं होतं! डॉ. भरुचांवर त्याचा पूर्ण विश्वास होता. त्यांनी प्रत्येक बारीक-सारीक गोष्टं तपासून पाहिलेली असणार याबद्दल त्याला पूर्ण खात्री होती. सुरवातीपासूनच हे प्रकरण चांगलंच गुंतागुंतीचं आहे याची त्याला कल्पना होती, त्यामुळे कदमनी सांगीतलेली बातमी त्याला अजिबात अनपेक्षित नव्हती.

********

"अम्मी! मै बात करती...."

"अरे बेटी! कैसी हो तुम? कहां...."

"हम अजमेरमें है अम्मी! दर्गाहपर चादर चढाने आए थे! दोपहरवाली गाडी से वापस लौटेंगे!"

"...."

"खुदा हाफीज!"

तिने फोन कट् केला तेवढ्यात मागून तो आलाच!

"क्या हुवा? किसको फोन किया था?"

"अम्मीसे बात कर रही थी...."

बोलत बोलत दोघं दर्ग्याच्या परिसरातून बाहेर पडले. त्याने समोर आलेल्या रिक्षाला हात केला.

"अजमेर स्टेशन चलो! जल्दीसे!"

दहा-पंधरा मिनिटांतच रिक्षा अजमेर रेल्वे स्टेशनसमोर उभी राहिली. त्याने पैसे दिले. आपलं सामान घेवून दोघं स्टेशनमध्ये शिरले. त्याने तिकीटं काढली. सुदैवाने गाडी फक्तं पंधरा मिनिटंच लेट होती. दिवसाचा प्रवास असल्यामुळे ती बरोबर असूनही तो रिझर्वेशन वगैरेच्या भानगडीत पडला नव्हता. त्यातच गाडी राजस्थानच्या टोकाला असलेल्या जैसलमेरहून येत असल्याने जागा मिळण्याची शक्यता तशी नव्हतीच. तिला त्याने आधीच तशी कल्पना दिली होती, पण सुदैवाने रिझर्वेशनच्या डब्यात घुसल्याने तिला बसायला जागा मिळून गेली. आपल्याजवळची लहानशी सुटकेस तिच्याकडे देत त्याने पाय बाहेर टाकून दारातच बसकण मारली.

रानीखेत एक्सप्रेसने अजमेर सोडलं आणि ती जयपूरच्या दिशेने धावू लागली तेव्हा त्याने सुटकेचा नि:श्वास टाकला.

********

मुंबईला जाणारी फ्लाईट दोन तास लेट झाल्यामुळे एअरपोर्टवर वाट पाहत थांबण्यापलीकडे रोहितकडे दुसरा पर्याय नव्हता! फ्लाईट येईपर्यंत तो केसच्या संदर्भातल्या आपल्या जुन्या नोट्सची उजळणी करत असतानाच त्याचा मोबाईल वाजला. कोहलींचा फोन!

"गुड मॉर्निंग! बोला कोहली....."

"सरजी, अल्ताफचा पत्ता लागला! रुक्सानाचा फोन अर्ध्या तासापूर्वी राजस्थानात अजमेर इथे ऑन करण्यात आला आहे!"

"तुम्ही ताबडतोब अजमेरला जा कोहली! आय विल जॉईन यू डिरेक्टली देअर! काहीही झालं तरी या वेळेस अल्ताफ आपल्या हाती लागलाच पाहिजे! सी यू इन अजमेर!"

रोहितने आपल्या रिस्टवॉचवर नजर टाकली. साडेअकरा वाजले होते. त्याने ताबडतोब दिल्लीला फोन करुन कमिशनर त्रिपाठींना थोडक्यात कल्पना दिली आणि राजस्थान पोलीसांना कळवण्याची विनंती केली. हे महत्वाचं काम आटपल्यावर त्याने ताबडतोब एअरपोर्टच्या वरीष्ठ अधिकार्‍यांची गाठ घेवून आपल्याला अत्यंत तातडीने अजमेर किंवा जयपूर गाठणं आवश्यंक असल्याचं सांगून त्यांची मदत मागितली. तो मुंबई सीआयडीचा वरिष्ठ अधिकारी आहे आणि एका महत्वाच्या केसचा तपास करतो आहे याची कल्पना येताच भराभर चक्रं फिरली! त्याच्या सुदैवाने कलकत्त्याहून दुपारी अडीच वाजता थेट जयपूरला जाणारं विमान होतं! एअरपोर्टच्या अधिकार्‍यांनी या विमानात त्याला सीट मिळवून दिली!

रोहितची ही धावपळ सुरु असतानाच त्याला कोहलींचा फोन आला. रुक्सानाचा फोन सकाळी अकराच्या सुमाराला अजमेर शरीफ दर्ग्याच्या परिसरात सुरु असल्याचं आढळून आलं होतं! कमिशनर त्रिपाठींनी अजमेर पोलीसांना अल्ताफचा शोध घेण्याची सूचना दिली होती. अल्ताफ अजमेर पोलीसांच्या हाती लागला तर ही बातमी फक्तं कमिशनर त्रिपाठी, कोहली किंवा रोहित या तिघांव्यतिरिक्त कोणालाही कळवू नये असं त्यांना बजावण्यास ते विसरले नाहीत! अल्ताफवर वरदहस्तं असलेल्या आझमगडच्या राजकारण्याचा हस्तक्षेप होण्याची शक्यता ध्यानात घेत ही कारवाई शक्यं तितक्या गुप्तपणे करणं आवश्यक होतं. कोहली आपल्या स्टाफसह अजमेरच्या मार्गावर होते. निघण्यापूर्वी कोहलींनी मोबाईलचं आत्ताचं लोकेशन जाणून घेण्यासाठी रुक्सानाच्या सर्विस प्रोव्हायडरलाही फोन लावला होता, पण तिचा फोन स्विच्ड ऑफ होता!

जयपूरला जाणार्‍या विमानाने टेकऑफ घेतला तेव्हा रोहितच्या डोक्यात एकच प्रश्नं फिरत होता.

अल्ताफ कुरेशी अद्यापही अजमेरमध्येच असेल का?

********

दिल्ली पोलीसांना खुनाच्या प्रकरणात हवा असलेला फरारी आरोपी अजमेरमध्ये आला आहे ही माहिती मिळताच अजमेर पोलीसांनी लगेच आपल्या हालचालींना सुरवात केली. अल्ताफचा रेकॉर्डवर असलेला फोटो अजमेर पोलीसांना ई-मेलवरुन पाठवण्यात आला होता. अल्ताफच्या बायकोच्या मोबाईलच्या सर्विस प्रोव्हायडरकडून तिचा फोन अजमेर शरीफ दर्ग्याच्या परिसरात ऑन करण्यात आल्याचं कळल्यावर पोलिसांनी तिकडे धाव घेतली. दर्ग्याच्या परिसरात मोठ्या संख्येने पोलीस आलेले पाहून वातावरण काहीसं तणावपूर्ण झालं होतं. पोलीसांच्या एका तुकडीने परिसरात असलेली दुकानं. हॉटेल्स वगैरेमध्ये चौकशीला सुरवात केली. दुसर्‍या तुकडीने दर्ग्यात आलेल्या भाविकांची बारकाईने चौकशी करण्यास सुरवात केली. सुमारे तासाभराच्या चौकशीनंतर अजमेर पोलीसांना अखेर एक दुकानदार सापडला ज्याने अल्ताफला पाहिलं होतं! अल्ताफ आणि त्याच्या बायकोने त्या दुकानातून दर्ग्यात चढवण्यासाठी चादर, फुलं आणि उद घेतला होता. किंमतीवरुन बरीच घासाघीस केल्याने त्याचा चेहरा दुकानदाराच्या लक्षात राहिला होता.

अल्ताफच्या बायकोचा फोन अजमेर स्टेशनवर आढळल्याचं कळल्यावर अजमेर पोलीसांनी स्टेशनवर धाव घेतली होती. अर्थात अल्ताफ इतर कोणत्या मार्गाने अजमेर सोडण्याचीही शक्यता नाकारता येत नव्हती. पोलीसांनी स्टेशनबरोबरच अजमेरचा बस स्टँड आणि शहरात असलेल्या सर्व टॅक्सी स्टँडवर तसेच टुरिस्ट बसेस निघतात त्या ठिकाणांवर धाव घेत तपास करण्यास सुरवात केली. इतकंच नव्हे तर ते एखाद्या हॉटेलमध्ये किंवा गेस्ट हाऊसमध्ये उतरले असल्याची शक्यता ध्यानात घेत त्या दृष्टीनेही पोलीसांचा तपास सुरु होता. दर्ग्याजवळ असलेला रिक्षा स्टँड गाठून रिक्षावाल्यांकडेही चौकशीचं सत्रं आरंभलं होतं. जवळपास संपूर्ण दिवसभर अजमेर पोलिसांचा तपास सुरु होता, पण अल्ताफ किंवा रुक्साना हाती लागले नव्हते.

जयपूरला उतरल्यावर टॅक्सी करुन रोहितने अजमेर गाठलं तेव्हा संध्याकाळचे साडे सात वाजून गेले होते. तो पोहोचण्यापूर्वी जेमतेम अर्धा तास कोहली तिथे आले होते. रोहितने आपली ओळख देवून अजमेर पोलीसांकडे अल्ताफची चौकशी केली.

"अल्ताफ कुरेशी आपल्या बायकोबरोबर काल रात्री ख्वाजा गरीब नवाझ गेस्ट हाऊसवर राहिला होता सर!" इन्स्पे. भदोरीया माहिती देत म्हणाले, "आज सकाळी नऊ वाजता त्याने रुम चेक-आऊट केली आहे. त्यानंतर तो दर्ग्यावर गेला असावा. तिथे असलेल्या एका दुकानदाराशी दर्ग्यात चढवण्यासाठीच्या चादरीवरुन त्याची वादवादीही झाली होती. त्यानंतर तासभरतरी तो इथे होता सर, कारण अकराच्या सुमाराला दर्ग्यातून बाहेर पडल्यावर ते दोघं रिक्षाने अजमेर रेल्वे स्टेशनकडे गेल्याचीही आम्हाला माहिती मिळाली आहे! पण अजमेर स्टेशनवरुन ते पुढे कुठे गेले हे अद्याप समजलेलं नाही सर! दिल्लीहून फोन आल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत आम्ही संपूर्ण अजमेर शहरात कोम्बिंग ऑपरेशन सुरु केलं. आमचे लोक दुपारी साडेबारा - एकच्या दरम्यान अजमेर स्टेशनवरही पोहोचले होते, पण अल्ताफ तिथे सापडला नाही!"

"दॅट मिन्स अल्ताफ अजमेर स्टेशनवरुन पसार झाला असला तर सकाळी साडेअकरा ते दुपारी एकच्या दरम्यान त्याने ट्रेन पकडली असणार! या दीड तासात अजमेर स्टेशनवरुन कोणत्या ट्रेन्स सुटतात हे सांगू शकाल भदोरीया?"

भदोरीयांनी अजमेर रेल्वे स्टेशनला फोन लावला आणि थेट स्टेशनमास्तरनाच फोनवर गाठून त्यांच्याकडे चौकशी केली. अजमेर हे राजस्थानमधलं एक महत्वाचं जंक्शन असल्याने दिवसभरात तिथे बर्‍याच गाड्या जात - येत होत्या. दुपारी साडेअकरा ते एकच्या दरम्यान तीन ट्रेन्स अजमेरहून सुटत होत्या. परंतु तासभर उशीरा आलेली एक ट्रेनही आज नेमकी त्याच दीड तासात अजमेरहून सुटली होती. स्टेशनमास्तरांनी दिलेली सर्व माहिती भदोरीयांनी आपल्यासमोरच्या रायटींग पॅडवर लिहून घेतली आणि फोन कट् करुन ते रोहितकडे वळले.

"त्या दीड तासात चार ट्रेन्स अजमेरहून सुटल्या आहेत सर!" आपल्या पॅडवरची माहिती वाचत भदोरीया म्हणाले, "जयपूर - मुंबई एक्सप्रेस खरंतर रोज अकराला जाते, पण आज ती तासभर लेट झाल्यामुळे बारानंतर गेली आहे. त्यानंतर साडेबाराला जैसलमेरहून दिल्लीमार्गे काठगोदामला जाणारी एक्सप्रेस गेली आहे. तिच्यापाठोपाठ जोधपूर - इन्दौर मेल आणि एकला पाच मिनिटं असताना ओखा - जयपूर एक्सप्रेस गेली आहे सर!"

"अल्ताफ मुंबईला जाईल अशी मला शक्यता वाटत नाही कोहली!" रोहित विचार करत म्हणाला, "तो इंदोरला जाण्याचेही चान्सेस कमीच आहेत. माझ्या अंदाजाप्रमाणे तो यूपीमध्येच कुठेतरी आश्रय घेण्याचा प्रयत्नं करेल. त्या दृष्टीने विचार केला तर जयपूर गाठून मग तिथून आग्रा आणि पुढे सटकणं त्याच्या दृष्टीने सोईस्कर आहे. शेवटचा ऑप्शन म्हणजे दिल्ली! पोलीस आपल्या मागावर असणार याची अल्ताफला कल्पना असणार, त्यामुळे तो दिल्लीत परत जाण्याची रिस्क घेणार नाही, बट व्हू नोज...."

बोलताबोलता रोहितने आपल्या रिस्टवॉचवर नजर टाकली. एव्हाना साडेआठ वाजले होते. इंटरनेटवरुन जैसलमेर - काठगोदाम एक्सप्रेसचं टाईमटेबल शोधून त्याने ते तपासून पाहिलं तेव्हा रात्री साडेआठ वाजता ती दिल्लीच्या सराय रोहिल्ला स्टेशनवर पोहोचत असल्याचं त्याच्या दृष्टीस पडलं! जवाहरचा मृत्यू झाला त्या दिवशी सकाळी अल्ताफ आणि रुक्साना याच स्टेशनवरुन ट्रेन पकडून दिल्लीतून पसार झाले होते हे त्याला लगेच आठवलं. अल्ताफ दिल्लीला तर परतला नसेल? शकूरबस्ती आणि वझीरपूर इथल्या त्याच्या दोन्ही घरांवर आणि दिल्लीत राहणार्‍या त्याच्या बहिणींच्या घरावर दिल्ली पोलीसांची नजर होती. त्यांच्यापैकी कोणाच्याही घरी तो गेला असता तर अलगद पोलीसांच्या जाळ्यात सापडणार होता!

"आपली अजमेर ट्रीप एकूण फुकटच गेली सरजी!" कोहली म्हणाले, "अल्ताफ अजमेरला आला होता हे कळलं, पण आपल्या हाती सापडण्यापूर्वीच तो इथून निसटून गेला!"

"दॅट्स ओके कोहली! चालायचंच! अल्ताफ इथून सटकला हे खरं असलं, पळून पळून किती दिवस पळेल? तो दिल्लीलाच गेला असला तर फार काळ लपून राहू शकणार नाही! अल्ताफ आणि त्याच्या रिलेटीव्हजच्या घरावर वॉच ठेवणार्‍या तुमच्या लोकांना पुन्हा एकदा अ‍ॅलर्ट करा! आज ना उद्या तो किंवा त्याची बायको आपल्या घरी परत येणार हे निश्चित! त्यावेळेस तो आपल्या तावडीतून सुटता उपयोगी नाही!"

दुसर्‍या दिवशी सकाळी रोहितने अल्ताफने मुक्काम केलेलं गेस्ट हाऊस गाठून चौकशी केली, पण त्यातून फारसं काही निष्पन्नं झालं नाही. अल्ताफ आणि रुक्साना रात्री उशीरा तिथे पोहोचले होते आणि दुसर्‍या दिवशी सकाळी निघून गेले होते. गेस्ट हाऊसच्या रजिस्टरमध्ये वझीरपूर इथला पत्ता देण्यात आलेला होता. गेस्ट हाऊसच्या मॅनेजरकडून अल्ताफकडे एक लहानशी सूटकेस असल्याचीही माहिती मिळाली. रोहितने दर्ग्याच्या परिसरात असलेलं ते दुकान गाठून दुकानदाराकडेही विचारपूस केली. दुकानदाराने सांगितलेल्या किंमतीपेक्षा निम्म्या किमतीत अल्ताफने चादर मागितल्याने त्यांचा वाद झाला होता. अल्ताफच्या बायकोने बुरखा घातलेला असल्याने तो तिचं वर्णनही करु शकला नाही. अजमेरमध्ये आणखीन काही हाती लागण्याची शक्यता नसल्याने आपला तपास आवरता घेत रोहित आणि कोहली दिल्लीच्या मार्गाला लागले.

संध्याकाळी दिल्लीला पोहोचल्यावर रोहित आणि कोहलीनी अल्ताफची शकूरबस्ती इथल्या चाळीतली खोली गाठली, पण अल्ताफ तिथे फिरकला नव्हता. वझीरपूर इथल्या त्याच्या खोलीलाही मोठं टाळं होतं. दिल्लीतल्या त्याच्या सावत्रं बहिणींपैकी कोणाकडेही तो गेलेला दिसून आला नव्हता! कोहलींनी उत्तर प्रदेश पोलीसांशीही संपर्क साधला होता, पण अल्ताफ आझमगड किंवा लखनौ इथेही फिरकलेला नव्हता! तो हरीयाना किंवा राजस्थानमध्ये लपून राहण्याची कोहलींना शक्यता वाटत होती, त्यामुळे त्यांनी त्या दोन्ही राज्यांच्या पोलीसांशीही संपर्क साधला होता. अल्ताफप्रमाणेच अखिलेशही दिल्लीतून पार अदृष्यं झाला होता! रोहितने कमिशनर त्रिपाठींना विनंती करुन अखिलेश आणि अल्ताफ दोघांबद्दलही दिल्ली एनसीआर आणि आजूबाजूच्या सर्व राज्यांत अर्जंट अ‍ॅलर्ट पाठवण्याची व्यवस्था करवली होती!

अल्ताफ आणि अखिलेशपैकी पोलीसांच्या तावडीत आधी कोण सापडणार होतं?

********

पहाटे साडेचारच्या सुमाराला रोहितचा मोबाईल वाजला. कोहलींचं नाव दिसताच त्याने ताबडतोब फोन उचलला.

"हॅलो, बोला कोहली...."

"सरजी.... " कोहलींचा आवाज धाप लागल्यासारखा येत होता, " अखिलेश तिवारी...."

"अखिलेश...." रोहित ताड्कन बेडवर उठून बसला, "अखिलेश सापडला कोहली?"

"सरजी...."

फोनवर कोहलींचं बोलणं ऐकताना क्षणाक्षणाला त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बदलत होते. जो एकमेव माणूस या सगळ्या प्रकरणाचा खुलासा करु शकत होता, तो यापुढे कधीच बोलू शकणार नव्हता! या केसमधला महत्वाचा दुवा त्याच्या हातातून निसटला होता.....

अखिलेश तिवारीचा मृतदेह गाझियाबाद रेल्वे स्टेशनवर सापडला होता!

********

"सलाम आलेकुम रमिझभाई! सलाम अश्फाक!"

"वालेकुम अस्सलाम! अरे तू? तू यहां क्या कर रहा है?" रमिझने आश्चर्याने विचारलं.

"बस ऐसे ही! मौलवीचाचासे मिलनेके वास्ते आया था!"

"एक बात बता, तू कुछ लफडा किया है क्या?"

"ऐसा तो.... कुछ खास नहीं! पर तुम किस वास्ते पूछ रहे हो?"

"पुलीस तेरेको पूछने आई थी तेरी खोली पे! शायद अभी भी वहांपर नजर रखे हुए है! क्या किया तू?" अश्फाक म्हणाला.

"अरे यार, बोला ना कुछ भी नहीं किया! तुमको तो पता है ना पुलीस वैसे भी अपने पीछे पडी रहती है! वैसे भी, अत्तारभाईके होते हुए अपनेको पुलीसकी फिक्र करनेकी कोई जरुरत नहीं! खैर, बहोत दिनो बाद मिले हो, चलो चाय पिलाता हूं तुम लोगोंको!"

गप्पा मारत तिघं गल्लीच्या तोंडाशी असलेल्या चहाच्या टपरीपाशी आले. त्याने चहावाल्या पोराला तीन स्पेशल चहाची ऑर्डर दिली. ते तिघं चहा उकळण्याची वाट पाहत असतानाच आणखीन एक माणूस तिथे आला आणि त्यानेदेखिल चहाची ऑर्डर दिली. त्याच्या एकंदर पेहरावावरुन तो पठाण होता हे कोणीही चटकन ओळखलं असतं! रमिझ आणि अश्फाक आपल्याच गप्पांमध्ये मग्नं होते, पण तो मात्रं त्या पठाणाला पाहून एकदम चपापला होता!

गप्पांच्या ओघात अश्फाकने काहीतरी विनोद सांगितला असावा कारण रमिझ एकदम मोठ्याने हसत सुटला. खरंतर त्याचं अश्फाकच्या बोलण्याकडे अजिबात लक्षं नव्हतं, पण तरीही तो त्यांच्यबरोबर मोठ्याने हसला. तिघांच्या हसण्याचा आवाज आल्यावर पठाणाची नजर आपसूकच तिघांकडे वळली.

"सलाम आलेकुम!" अदबीने झुकत त्याने पठाणाला अभिवादन केलं.

“सलाम आलेकुम!" पठाणाने जबाब दिला.

तो एकदम सतर्क झाला! काही वेळापूर्वी त्याला जो संशय आला होता त्याचं आता खात्रीत रुपांतर झालं होतं! पण तो पुढे काही बोलणार इतक्यात चहाचे ग्लास पुढे आले. चहा पिताना तो पुन्हा अश्फाक आणि रमिझच्या गप्पांत सामिल झाला, पण डोळ्याच्या कोपर्‍यातून त्याचं पठाणावर बारीक लक्षं होतं. चहा संपवून पठाणाने पैसे दिले आणि तो बाजूच्या गल्लीत शिरला तसा त्याने आपला अर्धवट संपलेला चहाचा ग्लास तसाच ठेवला, चहावाल्यापुढे वीसची नोट टाकली आणि अश्फाक आणि झहीरला जवळजवळ ओढतच तो त्या गल्लीत शिरला!

*******

रोहित गाझियाबाद रेल्वे स्टेशनवर पोहोचला तेव्हा सकाळचे सहा वाजत आले होते. दिवस उजाडण्यास नुकतीच सुरवात झाली होती. भल्या सकाळीही प्लॅटफॉर्मच्या टोकाला जिथे मृतदेह आढळला होता, तिथे बघ्यांची गर्दी झाली होती. रेल्वे स्टेशनचे कर्मचारी, प्रवासी, हमाल इतकंच काय स्टेशन परिसरात वावरणारे भिकारी आणि तृतीयपंथीही गर्दीतून वाकून त्या मृतदेहाकडे पाहण्याचा प्रयत्नं करत होते. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या अधिकार्‍यांनी आणि गाझियाबाद पोलीसांनी जागेचा ताबा घेत बॅरीकेड्स टाकून गर्दी मागे हटवली होती. इन्स्पे. कोहली तिथे हजर असलेले आर पी एफ अधिकारी आणि पोलीसांशी चर्चा करत होते. रोहितला पाहताच कोहलींनी पुढे होत आर पी एफ अधिकारी पांडे आणि पोलीस इन्स्पे. मिश्रांशी त्याची ओळख करुन दिली.

रोहितने अखिलेशच्या मृतदेहाकडे नजर टाकली प्लॅटफॉर्म नं २ च्या टोकाला असलेल्या मुतारीपासून जेमतेम ५ फूट अंतरावर तो उताण्या अवस्थेत पडलेला होता. त्याच्या अंगात पठाण लोक घालतात तसा झब्बा आणि पायजमा होता. पायात अगदी साध्याच चपला होत्या. डोक्यावर काळ्या रंगाची गोल टोपी घातलेली होती. केस आणि दाढी-मिशा लाल रंगाने रंगवलेल्या होत्या. डोळ्यात काजळ घातलेलं दिसत होतं. आपली ओळख लपविण्यासाठी त्याने वेषांतर केलं होतं हे उघड होतं. प्रथमदर्शनी तरी त्याच्या देहावर कोणतीही जखम आढळून येत नव्हती. कपड्यांवर कुठेही रक्ताचा डाग दिसून येत नव्हता. चेहर्‍यावर वेदनेचं कोणतंही चिन्हं नव्हतं. त्याचे डोळे मात्रं सताड उघडे होते! नजर दूर अज्ञातात लागलेली होती. ध्यानीमनी नसताना अचानक मृत्यूने त्याला गाठलं असावं!. मृतदेहाशेजारीच काळ्या रंगाची एक लहानशी सॅक पडलेली होती. एकंदरीत परिस्थितीवरुन स्टेशनवरुन गाडी पकडून कुठेतरी पळ काढण्याचा त्याचा विचार असावा असं अनुमान सहजच काढता येत होतं.

"पांडेजी, हे सगळं नेमकं कसं झालं?"

"पहाटे तीन वाजता याच प्लॅटफॉर्मवर असलेल्या टी-स्टॉलवर काम करणार्‍या माणसाने या भानगडीची आमच्या चौकीत खबर दिली. आम्ही ताबडतोब इथे पोहोचलो, पण आम्ही इथे येण्यापूर्वीच हा खलास झाला होता. आम्ही आमची इन्क्वायरी सुरु केली आणि सिटी पोलीसांनाही इन्फॉर्म केलं. याने आपला हुलिया बदलला असला तरी काल आलेल्या पोलीस अ‍ॅलर्टमध्ये फोटो असलेला अखिलेश तिवारी हाच आहे असा मला शक आला होता. हे मिश्राजी इथे आल्यावर ते कन्फर्म झालं. त्यानंतर त्यांनी कंट्रोलरुमला फोन केला."

"आय सी! याच्यापाशी काही सापडलं?"

"त्याच्याजवळच्या बॅगेत आम्हाला थोडेफार कपडे सापडले आहेत. त्याची बॉडी मात्रं आम्ही अद्याप चेक केलेली नाही."

एव्हाना चांगलंच उजाडलं होतं. गाझियाबाद स्टेशनवरुन दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील मेरठ, कानपूर इत्यादी शहरांकडे बर्‍याच गाड्या जात होत्या. रोहितने आर पी एफ अधिकारी पांडेंमार्फत प्लॅटफॉर्म नं २ वरुन सुटणार्‍या सर्व गाड्या त्या दिवसापुरत्या इतर प्लॅटफॉर्म्सवरुन सोडण्याची स्टेशन मास्तरांना विनंती केली. पांडे स्टेशन मास्तरांच्या ऑफीसच्या दिशेने निघून गेल्यावर तो गुडघ्यावर खाली बसला आणि त्याने अखिलेशच्या मृतदेहाचं निरीक्षण करण्यास सुरवात केली. पायापासून अत्यंत एकाग्रपणे आणि बारकाईने तपासणी करत रोहित त्याच्या गळ्यापर्यंत पोहोचला आणि अचानक इलेक्ट्रीक शॉक बसावा तसा ताठ झाला. त्याच्या तीक्ष्ण नजरेने ती गोष्टं अचूक टिपली होती.

"कोणाकडे ट्वीझर आहे? चिमटा?" वर न पाहता त्याने प्रश्नं केला.

कोहली आणि मिश्रांनी थोडीफार शोधाशोध केल्यावर अखेर रेल्वे स्टेशनमध्ये असलेल्या प्रथमोपचाराच्या पेटीतला चिमटा त्याच्या हाती ठेवला. रोहितने अत्यंत हळूवारपणे अखिलेशच्या गळ्यात घुसलेली ती वस्तू चिमट्याच्या सहाय्याने उपसून काढली आणि कोहलींनी तत्परतेने पुढे केलेल्या प्लॅस्टीकच्या पिशवीत अलगदपणे सोडली. सुमारे इंचभर लांब आणि अत्यंत तीक्ष्ण टोक असलेली इंजेक्शनच्या सिरींजपेक्षा किंचीत जाड अशी सुई!!

सुमारे दहा मिनिटांनी उठून उभं राहत स्टेशन मास्तरना त्याचा निरोप देवून तिथे परतलेल्या पांडेंना विचारलं,

"अखिलेशची बॉडी सर्वप्रथम कोणी पाहिली?"

या प्रश्नासरशी एक पोरगेलेसा तरुण पुढे आला. फारतर १९ - २० वर्षांचा असावा तो. त्याच्या अंगावर खाकी कपडे होते. डोक्यावर टोपी होती. त्याच्या वेशभूषेवरुन तो रेल्वेचा कर्मचारी आहे हे सहज ओळखू येत होतं.

"साबजी, मेरा नाम भूपेश है. याच प्लॅटफॉर्मवर असलेल्या टी-स्टॉलवर मी काम करतो. पहाटे पावणेतीनच्या सुमाराला मी टॉयलेटकडे चाललो होतो. काठगोदाम एक्सप्रेस लेट झाली होती आणि दोन मिनिटांपूर्वीच गेली होती. त्यानंतर सकाळच्या पॅसेंजरपर्यंत या प्लॅटफॉर्मवर एकही गाडी येण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे बाथरुमला जाऊन यावं आणि दोन तास आराम करावा हा माझा विचार होता. मी टॉयलेटच्या दिशेने जात असतानाच माझ्यापुढे दूर अंतरावर दोन माणसांच्या आकृत्या दिसत होत्या. मी ब्रिजखालून पुढे आलो तो त्या दोघांपैकी पुढे असलेला माणूस अचानक खाली कोसळला. तो दुसरा माणूस त्याच्यावर वाकून काय झालं हे पाहत असतानाच मी 'क्या हुवा भाई?' असं जोरात ओरडून विचारलं आणि धावत इथे आलो, पण मी इथे पोहोचण्यापूर्वीच तो ट्रॅक्समधून पळत सुटला आणि अंधारात गायब झाला! मग मी प्लॅटफॉर्मवर असलेल्या पोलिस चौकीत खबर दिली आणि त्यांना इथे घेऊन आलो."

"त्या दुसर्‍या माणसाने नेमकं काय केलं हे तू पाहिलंस?"

"नहीं साबजी! त्यावेळी इथे बराच अंधार होता त्यामुळे मला त्यांच्या फक्तं आकृत्याच दिसल्या."

"तो दुसरा माणूस कोणत्या दिशेला पळाला?"

"तो ट्रॅक्समध्ये उडी टाकून त्या बाजूला गौपुरी - कैलाश नगरच्या दिशेने पळाला साब!"

त्याला आणखीन काही विचारण्यात अर्थ नाही हे रोहित समजून चुकला. अखिलेशच्या झब्ब्याच्या खिशातून सुमारे पाच हजार रुपये आणि दरभंगा गावचं तिकीट आढळून आलं होतं. गाझियाबाद स्टेशनवरुन गाडी पकडून दिल्लीबाहेर सटकण्याचा त्याचा इरादा होता हे उघड होतं. पांडे आणि मिश्रांनी प्लॅटफॉर्म नं २ वर असलेले रेल्वे कर्मचारी, हमाल आणि शक्य तितक्या प्रवाशांचे जाब-जबाब घेतलेले होते. अखिलेशपाशी सापडलेलं रेल्वे तिकीट रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी घेतलेलं होतं असं दिसून येत होतं. रेल्वे अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे प्लॅटफॉर्म नं २ वरुन रात्री साडेबाराला दिल्ली वरुन बिहारमधल्या सहारसा इथे जाणारी गाडी सुटत होती. ही गाडी थेट दरभंगा इथे जात नसली तरी तिथून अर्ध्या तासावर असलेल्या समस्तीपूर जंक्शनला जात होती. अखिलेश हीच गाडी पकडण्याच्या उद्देशाने गाझियाबाद स्टेशनवर आला असावा असा पांडेंचा अंदाज होता. परंतु काही कारणामुळे ही गाडी आज तब्बल ७ तास लेट झाली होती आणि रोहितच्याच सूचनेवरुन प्लॅटफॉर्म नं १ वरुन सोडण्यात आली होती. भूपेशच्या टी-स्टॉलवरच अखिलेशने रात्री चहा आणि पाण्याची एक बाटली विकत घेतली होती हे स्पष्टं झालं होतं. त्या दुसर्‍या माणसाबद्दल मात्रं कोणालाच काही सांगता आलं नव्हतं.

"पांडेजी, तुमच्या चौकीत असलेले आवश्यक कर्मचारी सोडले तर इतर सर्व जवानांना प्लीज इथे बोलावून घ्या!" रोहित पांडेंना म्हणाला, "त्याचप्रमाणे स्टेशनवर अ‍ॅव्हेलेबल असलेले सर्व पोर्टर्स आणि जमलंच तर इतर रेल्वेच्या लोकांनाही बोलवा. आणि शक्यं तितक्या हमालांनाही!"

पांडे आणि मिश्राच काय, पण कोहलीही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले. त्याचा नेमका काय विचार आहे याचा कोणालाच अंदाज येत नव्हता. त्यांच्या चेहर्‍यावरचे प्रश्नार्थक भाव पाहून खुलासा करत तो म्हणाला,

"अखिलेशच्या मानेत घुसलेली ती सुई.... आय अ‍ॅम शुअर त्या सुईमुळेच अखिलेशचा असा अचानक मृत्यू झालेला आहे. त्या सुईच्या टोकाला एखादं शीघ्रपणे परिणाम करणारं अत्यंत जालिम आणि घातक विष लावलेलं असावं! हे विष अखिलेशच्या मानेला टोचताच तो खाली कोसळला असावा. भूपेशने पाहिलेल्या त्या दुसर्‍या माणसानेच ही सुई त्याला टोचली असणार यात शंका नाही. ज्या अर्थी ती सुई अखिलेशच्या मानेत जवळपास अर्धा इंच रुतलेली होती, त्या अर्थी ती हाताने टोचलेली असणं शक्यंच नाही! मग ती सुई त्याला कशी मारण्यात आली? दोनच शक्यता आहेत, एक तर ब्लो पाईप किंवा.... “ कोहलींकडे अर्थपूर्ण दृष्टीक्षेप टाकत रोहित म्हणाला, “एखादी गन! आय अ‍ॅम शुअर कोहली, जवाहरच्या गार्डनमध्ये सापडलेल्या रिव्हॉल्वरसारख्या दुसर्‍या रिव्हॉल्वरमधून ही सुई झाडण्यात आली आहे! या भूपेशने त्या दुसर्‍या माणसाला ट्रॅकमधून रेल्वे कॉलनीच्या दिशेने पळून जाताना पाहिलं आहे. शक्यं आहे की पळून जाण्याच्या गडबडीत ते रिव्हॉल्वर रेल्वे ट्रॅकमध्ये पडलं असेल! तेच आपल्याला शोधायचं आहे! ऑफकोर्स, इट्स अ मॅटर ऑफ चान्स, कदाचित काही सापडणारही नाही, पण प्रयत्नं करण्यात तर काहीच नुकसान नाही!"

कोहली, पांडे आणि मिश्रा थक्कं झाले! कोहलींच्या हातात अद्यापही ती प्लॅस्टीकची पिशवी होती. त्या सुईला

अत्यंत घातक विष लावलेलं असावं या कल्पनेनेच त्यांना घाम फुटला होता. न जाणो त्या तीक्ष्ण सुईचं टोक प्लॅस्टीक फाडून आपल्या बोटात घुसलं तर? एका मिनिटात आपलाही खेळ आटपायचा!

लाऊडस्पीकरवरुन आर पी एफचे जवान, पोर्टर्स आणि मोकळ्या असलेल्या सर्व हमालांनी प्लॅटफॉर्म नं २ वर हजर व्हावं अशी सतत अनाऊन्समेंट सुरु होती. दहा - पंधरा मिनिटांत सुमारे पंचवीस एक लोक तिथे जमा झाले. रोहितने त्यांना थोडक्यात आपली योजना समजावून सांगितली आणि भूपेशने जिथे त्या माणसाला रेल्वे ट्रॅकमध्ये उडी टाकून पळताना पाहिलं होतं त्या स्पॉटपासून सुरवात करुन रेल्वे कॉलनीच्या दिशेने ट्रॅकमध्ये शोध घेण्याची सूचना दिली. अर्थात जाणार्‍या - येणार्‍या ट्रेन्सपासून आवश्यक ती सावधगिरी बाळगण्याचं त्यांना बजावण्यास तो विसरला नव्हता! त्यांच्यावर लक्षं ठेवण्याच्या हेतूने स्वत: पांडेही ट्रॅकमध्ये उतरले होते.

पोलीस फोटोग्राफरचं काम कधीच आटपलं होतं. फिंगर प्रिंट तज्ञही तिथे आले होते, पण त्यांना फारसं काही हाती लागलं नव्हतं. अर्थात हे अपेक्षितच होतं. एव्हाना पोलीसांची हर्स गाझियाबाद स्टेशनच्या बाहेर येवून पोहोचली होती. इन्स्पे. मिश्रांनी अखिलेशचा मृतदेह दिल्लीच्या गर्व्हमेंट हॉस्पिटलमध्ये पाठवून दिला. रोहितने डॉ. सोळंकीना फोन करुन या सगळ्या प्रकाराची कल्पना देत अखिलेशच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम करावं अशी विनंती केली होती. डॉ. सोळंकींनी ताबडतोब होकार दिला होता!

"आय अ‍ॅम शुअर कोहली, श्वेता आणि जवाहरप्रमाणेच अखिलेशचा मृत्यूही कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टमुळेच झाला आहे असं पीएम रिपोर्टमध्ये समोर येईल!" रोहित कोहलींच्या हाती असलेल्या प्लॅस्टीकच्या पिशवीतल्या सुईकडे गंभीरपणे पाहत म्हणाला, "अर्थात या कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टमागचं नेमकं कारण काय आहे हे त्याच्या गळ्यात घुसलेल्या या सुईवरूनच कळू शकेल. नेमका काय प्रकार झाला हे आपल्याला डॉ. सोळंकीच सांगू शकतील!"

सुमारे तासभर शोध घेतल्यानंतरही रेल्वे ट्रॅकमध्ये काही सापडलं नाही तेव्हा रोहितने शोध घेणं थांबवण्याची पांडेना सूचना दिली. पांडे आणि मिश्रांना पंचनाम्याचे कागदपत्रं कोहलींना पाठवून देण्याची सूचना करुन रोहित आणि कोहलींनी गव्हर्मेंट हॉस्पिटल गाठलं. डॉ. सोळंकी आणि डॉ. दुबे दोघंही तिथे नुकतेच पोहोचले होते.

"धिस इज नॉट फेअर रोहित!" डॉ. सोळंकी मिस्कीलपणे म्हणाले, "मी फक्तं एका बॉडीची ऑटॉप्सी करण्याचं मान्य केलं होतं, इथे तू दुसरीही बॉडी तयार ठेवली आहेस!"

"मी तरी काय करु सर... गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही याच्या शोधात होतो, पण तो सापडला तो अशा अवस्थेत! आय हॅव अ गट फिलींग, याचाही मृत्यू कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टमुळेच झाल्याचं समोर येईल!"

"ऑटॉप्सीतर मी करेनच रोहित, बट द थिंग यू टोल्ड मी ओव्हर फोन.... या बॉडीजवळ तुला जे काही सापडलं आहे त्यात मला जास्तं इंट्रेस्ट आहे! लेट्स हॅव अ लुक!"

रोहितने अखिलेशच्या मानेतून उपसून काढलेली ती सुई डॉ. सोळंकींच्या समोर ठेवली. जवाहर कौलच्या घरी सापडलेलं ते लहानसं रिव्हॉल्वरही त्याने डॉ. सोळंकीना दाखवलं.

"आय अ‍ॅम शुअर सर, सेम अशाच रिव्हॉल्वरमधून अखिलेशला ती नीडल मारण्यात आली आहे! अ‍ॅज पर आय विटनेस, नीडल लागताच अगदी काही सेकंदांत तो खाली कोसळला आणि हार्डली मिनिटभरात ही वॉज नो मोअर! आय अ‍ॅम अ‍ॅब्सोल्यूटली शुअर त्याच्या बॉडीत कसलं तरी अत्यंत डेडली पॉयझन इंजेक्ट करण्यात आल्यामुळेच इतक्या इन्स्टंटली तो मेला आहे सर!"

"आय कान्ट बिलीव्ह धिस रोहीत!" डॉ. सोळंकी त्या लहानशा रिव्हॉल्वरचं निरीक्षण करत म्हणाले, "दिवसेदिवस गुन्हेगार जास्तीत जातं सोफीस्टीकेटेड आणि टेक्नीकल होत चालले आहेत. लुक अ‍ॅट धिस गन फॉर एक्झाम्पल, कॅन यू इमॅजिन, एखाद्या माणसाची हत्या करण्यासाठी असं एखादं शस्त्रं कोणी वापरु शकेल?"

रोहित काहीच बोलला नाही. ते रिव्हॉल्वर त्याच्या हाती लागलं तेव्हा नेमकं हेच विचार त्याच्या डोक्यात आले होते.

"ही नीडल मिळाली हे फार चांगलं झालं! धिस कुड बी द कर्टन रेझर फॉर द मिस्ट्री वी हॅव ऑन अवर हँड्स! आय अ‍ॅम शुअर, अद्यापही त्या नीडलला ते पॉयझन किंवा केमिकल लावलेलं असणार! त्याचा परिणाम किती घातक आणि तत्काळ होतो हे तुझ्या इन्व्हेस्टीगेशनमध्ये समोर आलं आहेच! डू मी अ फेव्हर, बॉडीच्या मानेत मिळालेली नीडल या बॉक्समध्ये ठेव! ऑटॉप्सीपेक्षाही ही लाईव्ह नीडल माझ्यादृष्टीने अधिक महत्वाची आहे! अय विल स्टार्ट माय वर्क नाऊ! होपफुली आय शुड हॅव समथिंग फॉर यू बाय टुमारो मॉर्निंग!"

रोहितने खूण करताच कोहलींनी अखिलेशच्या मानेतून काढलेली सुई असलेली ती पिशवी डॉ. सोळंकींच्या समोर ठेवली. डॉ. सोळंकींनी एका लहानशा चिमट्याच्या सहाय्याने ती सुई आपल्याजवळच्या काचेच्या बॉक्समध्ये ठेवली. त्यांचा निरोप घेवून बाहेर पडल्यावर रोहित आणि कोहलींनी थेट हेडक्वार्टर्स गाठलं आणि त्रिपाठीसाहेबांची गाठ घेतली. अखिलेशचा खून झाल्याचं समजल्यावर त्रिपाठी काहीसे वैतागलेच होते! अल्ताफचा फोटो वाँटेड म्हणून सगळ्या न्यूज चॅनल्सवरुन दाखवण्याची त्यांनी कोहलींना ऑर्डर दिली! रोहितने मोठ्या मुष्कीलीने त्यांना या निर्णयापासून परावृत्त करण्यात यश मिळवलं होतं! एकदा का अल्ताफचा फोटो टीव्हीवरुन दाखवण्यात आला की अल्ताफ सावध झाला असता आणि त्याच्यावर वरदहस्तं असलेल्या राजकारण्याची मदत घेवून तो निसटून जाण्याची शक्यता होती! दिल्ली पोलीसांनी अल्ताफच्या दोन्ही सावत्रं बहिणींच्या घरी धाव घेत त्यांची कसून चौकशी केली होती, पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नव्हतं. त्यांच्याकडून अल्ताफचा मिळालेला मोबाईल नंबर स्विच्ड ऑफच होता. अल्ताफच्या दिल्लीतल्या मित्रांकडे केलेही चौकशीही अशीच व्यर्थ ठरली होती.

संध्याकाळी रोहितने डॉ. सोळंकींना फोन लावला, पण त्यांचा फोन स्विच्ड ऑफ असल्याचा मेसेज त्याच्या कानात शिरला. वास्तविक डॉ सोळंकींनी त्याला उद्या सकाळी फोन करण्याची सूचना दिली होती, पण त्यालाच आता धीर धरवत नव्हता. डॉ. सोळंकी अद्यापही आपल्या कामात गर्क असावेत या कल्पनेने कोहलींना आणखीन थोड्याफार सूचना देवून तो हेडक्वार्टर्समधून बाहेर पडला आणि थेट गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये पोहोचला. जिना चढून तो दुसर्‍या मजल्यावर पोहोचतो तो पॅसेजमध्येच त्याची डॉ. सोळंकी आणि डॉ. दुबेंशी गाठ पडली. त्याला समोर पाहिल्यावर डॉ. सोळंकींच्या चेहर्‍यावर हलकीशी स्मितरेषा चमकून गेली.

"डिडन्ट आय से डॉ. दुबे, हा इथे आल्याशिवाय राहणार नाही?" डॉ. सोळंकी मिस्किलपणे म्हणाले तसे तिघंही हसले.

"पोस्टमॉर्टेममध्ये काय मिळालं सर? आणि त्या नीडल्सवर?"

"आय मस्ट से रोहित, यू हॅव अ ग्रँड जजमेंट! काँग्रेज्युलेशन्स!" त्याच्यापुढे हात करत डॉ. सोळंकी म्हणाले, "तुझा अंदाज अगदी बरोबर होता! आज सकाळी तू हजर केलेली ती दुसरी डेड बॉडी, व्हॉट्स हिज नेम... तिवारी राईट? त्याची डेथ कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टनेच झालेली आहे! तुला मिळालेल्या त्या पहिल्या डेड बॉडीच्या, त्या कौलच्या मृत्यूची झेरॉक्स कॉपी ठरावी अशी ही केस आहे! या दोघांचाही मृत्यू एकाच पद्धतीने झालेला आहे एवढंच मी आता सांगू शकेन! अ‍ॅज फार अ‍ॅज द नीडल इज कन्सर्न्ड, त्या नीडलवर मला काही स्पेसिफीक टेस्ट्स करायच्या आहेत आणि त्या माझ्या लॅबमध्येच करणं शक्यं आहे! मोअर इम्पॉर्टंटली, त्या नीडलच्या टेस्ट्स झाल्यावर मला कदाचित पुन्हा डेड्बॉडी चेक करावी लागण्याची शक्यता आहे! सो होल्ड ऑन टू इट!"

********

रात्रीचे पावणेबारा वाजून गेले होते....

दिल्लीच्या पूर्व सीमेवर असलेलं गाझियाबाद हे उत्तर प्रदेशातलं महत्वाचं रेल्वे जंक्शन! दिल्ली - कानपूर या मुख्य मार्गावर असलेल्या गाझियाबादला पूर्वेला मुरादाबाद, बरेली आणि उत्तरेला मेरठवरुन जाणारे रेल्वेमार्ग मिळत होते. गाझियाबादहून दिल्लीच्या दिशेने अनेक लोकलगाड्याही सुटत होत्या, त्यामुळे दिवसभर हे स्टेशन तसं गजबजलेलंच असे. आता जवळपास मध्यरात्रं झाल्यामुळे स्टेशनवर फारशी गर्दी दिसत नव्हती. अगदी रात्री उशीरा सुटणार्‍या ट्रेनच्या प्रतिक्षेत असलेले थोडेसे प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी तेवढे स्टेशनवर होते. स्टेशनवर असलेले हमालही तसे आरामातच होते. काही प्रवासी रात्री पाऊणला जाणार्‍या बरेली पॅसेंजरमध्ये जागा पकडण्यासाठी हमालांशी 'सौदा' पटवण्यात गर्क होते.

स्टेशनच्या एका टोकाला असलेल्या तिकीट विंडोसमोर जेमतेम दोन - तीन माणसं होती. त्यांच्यापैकी एकजण पठाण असावा असं त्याच्या एकंदर अवतारावरुन सहज अनुमान काढता येत होतं. आपली पाळी आल्यावर झब्ब्याच्या खिशातून पाचशेची चुरगळलेली नोट काढून त्याने खिडकीतून आत सरकवली आणि बिहारमधल्या दरभंगा गावचं तिकीट मागितलं.

"दरभंगा?" बुकींग क्लार्क क्षणभर विचार करुन म्हणाला, "दरभंगा जानेवालीतो कोई गाडी नहीं है!"

"साढेबारा बजेकी एक्सप्रेस है ना?"

"वो गाडी सात घंटे देरीसे चल रही है! मेरी बात मानो, यहाँसे अच्छा आनंदविहार चले जाओ! गाडी वहींसे निकलती है तो आपको बैठने के लिए आसानीसे जगह भी मिल जाएगी!"

क्षणभरच पठाणाची चलबिचल झाली, पण दुसर्‍याच क्षणी त्याचा विचार पक्का झाला.

"नहीं, ठीक है! आप टिकट दे दो!"

बुकींग क्लर्कने खांदे उडवत दरभंगाचं तिकीट आणि उरलेले पैसे खिडकीतून सरकवले.

"ये लो! गाडी दो नंबर प्लॅटफार्मपे आएगी!"

पठाणाने तिकीट आणि पैसे आपल्या झब्ब्याच्या खिशात टाकले आणि सावकाशपणे पावलं टाकत तो प्लॅटफॉर्मच्या दिशेला वळला. ब्रिज चढून दोन नंबरचा प्लॅटफॉर्म गाठण्यासाठी त्याला दोन-तीन मिनिटं लागली. तो प्लॅटफॉर्मवर पोहोचतो तोच लखनौला जाणारी सुपरफास्ट एक्सप्रेस त्याच प्लॅटफॉर्मवर येत असल्याची अनाऊन्समेंट करण्यात आली. त्याबरोबर त्या गाडीसाठी थांबलेले प्रवासी, मोजकेच फेरीवाले, चहावाली पोरं यांची लगबग सुरु झाली. पठाणाला त्यात काहीच इंट्रेस्ट नव्हता. जेमतेम दोन मिनिटं थांबून ट्रेन निघून गेल्यावर तो समोरच असलेल्या 'खान-पान सेवा' स्टॉलवर आला.

गरमागरम चहा आणि प्लेटभरून मूगवडे पोटात गेल्यावर त्याला जरा बरं वाटलं. सहजच त्याने आपल्या गाडीची चौकशी केली. तिकीट विंडोतल्या माणसाने सांगितल्याप्रमाणे गाडी तब्बल सात तास लेट असल्याने सकाळी सातच्या आधी येण्याची शक्यताच नव्हती! स्टॉलवरुन त्याने पाण्याची एक बाटली विकत घेतली आणि थोड्या अंतरावर असलेल्या एका बाकड्याकडे मोर्चा वळवला. त्याच्या सुदैवाने ते बाकडं रिकामंच होतं. आपल्यापाशी असलेली बॅग उशाला घेत तो त्या बाकड्यावर आडवा झाला. गाडी वेळेवर आली असती तर जनरल डब्यात त्याला आडवं होण्याचीही संधी मिळणं कठीण होतं, त्यामुळे गाडीला झालेला उशीर त्याच्या पथ्यावरच पडला होता!

झोप घेण्याच्या हेतूने तो आडवा झाला होता खरा, पण तो आडवा झाल्याला जेमतेम पंधरा मिनिटं होतात तोच डेहराडून एक्सप्रेस आणि पाठोपाठ बरेलीला जाणारी पॅसेंजर या दोन्ही गाड्या प्लॅटफॉर्मच्या दोन बाजूला येऊन उभ्या राहिल्या! डेहराडून एक्सप्रेस लगेचच निघून गेली, पण बरेली पॅसेंजर काही अनाकलनीय कारणामुळे तब्बल अर्धा - पाऊण तास तिथेच थांबली होती! अखेर रात्री दीडच्या सुमाराला पॅसेंजर निघून गेल्यावर त्याने सुटकेचा नि:श्वास टाकत पुन्हा डोळे मिटले, पण जेमतेम पंधरा - वीस मिनिटं झाली तोच एक लांबलचक मालगाडी दिल्लीच्या दिशेने आली आणि खाडखाड आवाज करत कानपूरच्या दिशेने गेली! ती मालगाडी गेल्यावर जरा वातावरण शांत होत आहे तो दहा-पंधरा मिनिटांनी कानपूरच्याच दिशेने इंजिनच्या कर्कश्श् शिट्टीचा आवाज करत एक एक्सप्रेस आली आणि स्टेशनवर न थांबता धाडधाड आवाज करत दिल्लीच्या दिशेने जात काळोखात दिसेनाशी झाली! हे सगळं कमी होतं म्हणूनच की काय ती गाडी गेल्यानंतर जेमतेम पाच मिनिटांनी काठगोदामला जाणारी एक्सप्रेस एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर येवून उभी राहिली होती! आज ती साडेतीन तास लेट झाली होती!

या सगळ्या प्रकाराने पठाणाच्या झोपेचं मात्रं पार खोबरं झालं होतं! रेल्वेला शिव्या घालतच वैतागून तो बाकड्यावर उठून बसला. स्टॉलवर घेतलेली पाण्याची बाटली उघडून त्याने तोंडावर थोडं पाणी मारलं, त्याबरोबर त्याच्या डोळ्यांवरची उरली-सुरली झोपही उडून गेली. बाटलीतल्या पाण्याचे दोन घोट घेत त्याने प्लॅटफॉर्मवर असलेल्या मोठ्या घड्याळाकडे नजर टाकली. रात्रीचे अडीच वाजत आले होते. अद्यापही त्याची गाडी येण्यास किमान चार ते साडेचार तास वेळ लागणार होता! सतत ये-जा करणार्‍या गाड्यांमुळे आपल्याला झोप मिळणं शक्यं नाही हे त्याने स्वत:शीच मान्यं करुन टाकलं होतं. झकासपैकी गरमागरम चहा प्यावा आणि मग आपल्या गाडीची वाट पाहत बसावं या विचाराने तो उठला आणि चहा पिण्यापूर्वी 'हलकं' होण्याच्या इराद्याने तो प्रसाधनगृहाच्या दिशेने निघाला. दरम्यान गाझियाबादचा आपला दोन मिनिटांचा हॉल्ट संपल्यामुळे काठगोदाम एक्सप्रेस आपल्या पुढच्या प्रवासाला निघून गेली होती!

प्लॅटफॉर्मच्या टोकाला असलेल्या प्रसाधनगृहापर्यंत तो जवळपास पोहोचलेला असतानाच....

कोणीतरी अगदी हलक्या आवाजात मारलेली हाक त्याच्या कानावर आली!
त्यासरशी तो गर्रकन मागे वळला....
एक अनोळखी माणूस त्याच्यासमोर उभा होता....
अचानक त्या माणसाचा हात वर झाला....
आपल्या मानेला काहीतरी टोचलं एवढंच पठाणाला जाणवलं....
अभावितपणेच त्याचा हात गळ्याकडे गेला....
दुसर्‍याच क्षणी त्याचे डोळे विस्फारले....
हातापायातली सगळी शक्ती गेल्यागत तो मागच्य मागे धाडदिशी प्लॅटफॉर्मवर कोसळला....
त्याचा जीव घुसमटत होता....
तो माणूस पठाणाच्या अंगावर झुकला आणि थंड नजरेने तडफडणार्‍या पठाणाकडे पाहत राहिला....
काही क्षणांतच पठाणाचा खेळ खलास होणार हे त्याला अनुभवाने माहीत होतं!

"क्या हुवा भाई?" अचानक कोणीतरी ओरडल्याचा आवाज आला.

त्या माणसाने दचकून त्या आवाजाच्या दिशेने पाहीलं. प्लॅटफॉर्मवरुन कोणीतरी जोरजोरात धावत त्या दिशेला येत होतं! क्षणभर त्याने पठाणाकडे नजर टाकली. क्षणभरच....

दुसर्‍या क्षणी रेल्वे ट्रॅकमध्ये उडी टाकून तो दिल्लीच्या दिशेने धावत सुटला!

********

भल्या पहाटे त्या बिल्डींगसमोर एक पांढर्‍या रंगाची टुरीस्ट टॅक्सी येवून उभी राहिली.

टॅक्सी आलेली पाहताच घाईघाईनेच दोन माणसं बिल्डींगमधून खाली उतरली आणि टॅक्सीत बसली. त्यांच्याबरोबरचा वृद्ध माणूस त्यांना टॅक्सीपर्यंत सोडण्यास आला होता.

"अच्छा चाचा, हम चलते है....."

टॅक्सी भरवेगात तिथून बाहेर पडली आणि काही वेळातच एन एच ९ वरुन धावू लागली. सुमारे दीड तासाने गृहमुक्तेश्वराच्या पुलावर आल्यावर मागे बसलेल्या दोघांपैकी एकाने टॅक्सी थांबवण्याची सूचना केली. टॅक्सी थांबताच तो खाली उतरला आणि आपल्या खिशातून फार जपून काढलेली वस्तू त्याने पुलाखालच्या गंगेच्या प्रवाहात भिरकावली. ती वस्तू पाण्यात पडल्याची खात्री होताच तो मागे वळला आणि पुन्हा टॅक्सीत बसला, त्याबरोबर टॅक्सी पुन्हा आपल्या मार्गाला लागली.

********

दुसर्‍या दिवशी सकाळी रोहितने पोलीस हेडक्वार्टर्स गाठलं आणि कमिशनर त्रिपाठींची भेट घेतली. कमिशनरसाहेबांच्या ऑर्डरप्रमाणे पोलीसांनी आदल्या दिवसापासूनच संपूर्ण दिल्लीत कोम्बिंग ऑपरेशनला सुरवात केली होती. अल्ताफ कुरेशीचा चौफेर शोध सुरु होता. पोलीसांच्या रेकॉर्डवर असलेल्या आणि लॉकअपमध्ये नसलेल्या प्रत्येक गुंडाला उचलून त्याच्याकडे अल्ताफ कुरेशीची चौकशी करण्यात येत होती. अल्ताफचे दिल्लीतले मित्रं आणि त्याच्याशी अगदी जुजबी ओळख असलेल्याही प्रत्येक व्यक्तीकडे कसून विचारपूस करण्यात येत होती!

अल्ताफच्या दोन्ही सावत्रं बहिणी आणि त्यांच्या कुटुंबियांना पोलीस स्टेशनवर आणण्यात आलं होतं. पोलीसांनी त्यांना चांगलंच फैलावर घेतलं होतं, पण त्यांच्याकडूनही काहीच कळू शकलं नव्हतं! अल्ताफ वर्षभरापासून आपल्याकडे आलेला नाही यावर त्याच्या बहिणी ठाम होत्या. अल्ताफची बायको रुक्साना ही मूळची उत्तर प्रदेशातल्या अलिगड इथली होती. त्रिपाठीसाहेबांच्या सूचनेवरुन उत्तर प्रदेश पोलीसांनी आधीच अलीगडमधलं तिचं घर गाठलं होतं. रुक्सानाचे आई - वडील आणि वृद्ध आजी - आजोबा इथे राहत होते. अलिगड पोलीसांनी पूर्वीही त्यांच्याकडे रुक्साना आणि अल्ताफबद्दल चौकशी केली होती, परंतु त्यांनी आपल्याला काही माहीत नाही असं सांगून कानावर हात ठेवले होते! रुक्सानाच्या कॉल डिटेल्सवरुन तिने अजमेर इथून आपल्या वडिलांच्या मोबाईलवर फोन केल्याचं निष्पन्न झाल्यावर पोलीसांनी तिच्या कुटुंबियांची कसून चौकशी केली असता तिचा फोन आल्याचं त्यांनी कबूल केलं, पण अजमेरहून ती नेमकी कुठे गेली असेल हे सांगण्यास मात्रं असमर्थता दर्शवली! सखोल चौकशी केल्यावर रुक्सानाच्या इतर नातेवाईकांचा पत्ता लागला. तिचे बहुतेक सर्व नातेवाईक मुरादाबाद्, बरेली, बदायून्, शाहजहानपूर या भागात होते.

जवळपास दिवसभर ही चौकशी सुरु होती. रोहित आणि कोहलीची रुक्सानाच्या नातेवाईकांच्या संदर्भात उत्तर प्रदेश पोलीसांबरोब फोनाफोनी सुरु असतानाच रोहितचा मोबाईल वाजला. डॉ. सोळंकीं!

"गुड इव्हिनिंग सर! काय...."

"रोहित, कम अ‍ॅन्ड सी मी इमिजिएटली इन माय ऑफीस!" डॉ. सोळंकी एवढंच म्हणाले आणि फोन कट् झाला!

जेमतेम अर्ध्या - पाऊण तासात रोहित डॉ. सोळंकींच्या ऑफीसमध्ये येवून पोहोचला. डॉ. सोळंकी गंभीरपणे फोनवर कोणाशी तरी बोलत होते. त्याला बसण्याची खूण करुन त्यांनी आपलं बोलणं तसंच पुढे सुरु ठेवलं. पाच मिनिटात कॉल संपल्यावर ते त्याच्याकडे वळले.

"काय झालं सर?" रोहितने उत्सुकतेने विचारलं, "त्या नीडलवर काय सापडलं?"

"काय सापडलं? काय सापडलं नाही विचार रोहित!" डॉ. सोळंकी उत्तरले, "यू विल बी शॉक्ड! आय अ‍ॅम स्टिल इन द शॉक मायसेल्फ! इतक्या वर्षांच्या माझ्या फॉरेन्सिक करीअरमध्ये मी कधीही अशी केस पाहिली नव्हती! त्या डेडबॉडीच्या मानेत तुला मिळालेली नीडल... दॅट नीडल हॅड प्रूव्हड टू बी अ गेम चेंजर! त्या नीडलवर मला जे केमिकल मिळालं आहे.... आय स्टिल कान्ट बिलीव्ह इट! ते केमिकल म्हणजे एक अत्यंत घातक पॉयझन आहे! अतिशय रेअर असलेलं हे पॉयझन कोणाची हत्या करण्यासाठी वापरलं जाईल याचा मी स्वप्नातही विचार केला नसता! अ‍ॅज पर माय गेस, जगभरातली ही पहिलीची केस असावी ज्यात खून करण्यासाठी हे पॉयझन वापरलं गेलं आहे! धिस इज समथिंग टोटली युनिक!

"कोणतं पॉयझन सर?"

"बॅट्रॅकटॉक्सिन!"

"बॅट्रॅक...." रोहित अडखळला, "व्हॉट इज इट सर?"

"बॅट्रॅकटॉक्सिन! अ रेअर अ‍ॅन्ड एक्स्ट्रीमली डेडली पॉयझन!"

"जवाहर आणि अखिलेशच्या खुनासाठी हे पॉयझन वापरण्यात आलं आहे?" रोहित आश्चर्याने थक्कं झाला.

"येस सर!" डॉ. सोळंकी गंभीरपणे उद्गारले, "धिस इज एक्स्ट्रीमली सिरीयस रोहित! डू वन थिंग, गो अ‍ॅन्ड मिट डॉ. विजय मालशे! संपूर्ण भारतात बॅट्रॅकटॉक्सिनबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन फक्तं त्यांच्याकडेच मिळू शकेल! जगभरातील जे मोजकेच सायंटीस्ट अनेक वर्षांपासून त्याच्यावर रिसर्च करत आहेत, त्यापैकी डॉ. मालशे हे एक आहेत! हे पॉयझन भारतात कसं आणि कोणत्या मार्गाने आलं हे कदाचित फक्तं तेच सांगू शकतील! तू इथे आलास तेव्हा मी त्यांच्याशीच फोनवर बोलत होतो. या केसमधल्या माझ्या टेस्ट्सचे रिझल्ट्स मी आजच त्यांना पाठवणार आहे. आय होप यू विल बी ओके विथ इट!"

"सर्टनली! थँक्स अ लॉट फॉर हेल्पिंग मी आऊट सर! अदरवाईज आमचं इन्व्हेस्टीगेशन भरकटतच राहिलं असतं!"

"नो नो रोहित! इनफॅक्ट, आय वॉन्ट टू थँक यू अ‍ॅन्ड भरुचा फॉर इन्व्हॉल्व्हींग मी इन धिस! एका दुर्मिळ केमिकलचा अभ्यास करण्याची, त्यावर थोडाफार रिसर्च करण्याची आणि अनेक सिद्धांत आणि अनुमानं नव्याने तपासून पाहण्याची गोल्डन ऑपॉर्च्युनेटी या केसमुळे मला मिळाली! त्या नीडलवर बॅट्रॅकटॉक्सिन आहे हे सेंट पर्सेंट प्रूव्ह झालं आहे आणि त्याच संदर्भात मी काही टेस्ट्स आणि त्या दोन्ही डेडबॉडीजची पुन्हा ऑटॉप्सी करणार आहे! त्या दोघांचाही मृत्यू बॅट्रॅकटॉक्सिनमुळेच झाला आहे हे कन्क्लुझिवली प्रूव्ह करण्यासाठी या टेस्ट्स फार इम्पॉर्टंट आहेत! आय विल कीप यू अ‍ॅज वेल अ‍ॅज डॉ. मालशे अ‍ॅन्ड भरुचा इन्फॉर्म्ड!"

"कॅन आय टेक दॅट नीडल विथ मी सर? इज इट सेफ इनफ टू हँडल?"

"ऑफकोर्स! मी ती नीडल पूर्णपणे क्लीन केली आहे! आता तिच्यावर बॅट्रॅकटॉक्सिनचा कणही शिल्लक नाही!"

"वन लास्ट क्वेश्चन सर, अखिलेश आणि जवाहरच्या बॉडीची पहिल्यांदा ऑटॉप्सी केली तेव्हा त्या पॉयझनचे काहीही ट्रेसेस आढळले नव्हते आणि दोघांचीही डेथ कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टनेच झाली आहे एवढंच समोर आलं होतं, राईट? त्या पॉयझनचा बॉडीवर झालेला इफेक्ट शोधण्यासाठी आणि त्याचे ट्रेसेस शोधण्यासाठी तुम्ही पुन्हा त्या दोघांची ऑटॉप्सी करणार आहात. सिमीलरली, एखादी डेडबॉडी नसेल आणि फक्तं व्हिसेरा असेल तर त्यावर टेस्ट्स करुन बॅट्रॅकटॉक्सिनचे ट्रेसेन मिळू शकतील सर? इज इट पॉसिबल?"

"वेल, देअर इज नो हार्म टू ट्राय! पण एक गोष्टं लक्षात घे, जनरल ऑटॉप्सीमध्ये पूर्ण बॉडीवर टेस्ट्स करुनही बॅट्रॅकटॉक्सिनचे काहीही ट्रेसेस आढळले नव्हते! नीडलवर बॅट्रॅकटॉक्सिन आहे हे कळल्यावर आता मी अ‍ॅडीशनल टेस्ट्स करणार आहे. अ‍ॅन्ड इट मे टेक सम टाईम! नुसत्या व्हिसेरावर त्यापेक्षा बराच जास्तं वेळ लागू शकतो! ऑल्सो इट कॅन रिझल्ट इनटू अ टोटल फेल्युअर अ‍ॅज वेल! पण हे सगळं तू का विचारतो आहेस? अजून एखादी डेथ..... ओह, आय गेट इट! भरुचाने मला ज्या मुलीचा पीएम रिपोर्ट पाठवला होता, तीच केस राईट?"

"येस सर! श्वेता सिंग! तिचा व्हिसेरा आम्ही हैद्राबादच्या लॅबमध्ये पाठवला होता, पण त्यांनाही कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टपलिकडे काहीच सापडलं नाही! आय डोन्ट ब्लेम देम, कारण त्या पॉयझनच्या दृष्टीने टेस्ट्स करण्याचं तेव्हा तरी काही कारणच नव्हतं!"

"त्या व्हिसेराची सँपल्स असली तर ती माझ्यकडे पाठवून दे! आय विल गिव्ह अ शॉट!"

रोहित हेडक्वार्टर्सला परतला तो संध्याकाळचे सात वाजून गेले होते. अल्ताफच्या संदर्भात कोहलींची फोनाफोनी अद्यापही सुरुच होती. रोहितने बॅलॅस्टीक एक्सपर्ट फर्नांडीसना फोन करुन ऑफीसमध्ये येण्याची विनंती केली. त्या रिव्हॉल्वरच्या संदर्भात काही इन्फॉर्मेशन मिळाली आहे हे कळल्यावर फर्नांडीस तातडीने ऑफीसमध्ये येवून धडकले. रोहितने ते रिव्हॉल्वर आणि डॉ. सोळंकीनी दिलेली ती सुई फर्नांडीससमोर ठेवताच फर्नांडीसचे डोळे लकाकले. त्याने घाईघाईने रिव्हॉल्वरचं मॅगझिन उघडून ती सुई आत बसवली आणि रोहितला मागे सरकण्याची सूचना देत मानवी शरीराच्या आकाराच्या कटआऊटवर ते रिव्हॉल्वर रोखत ट्रिगर दाबला....

फर्नांडीसचा पहिला शॉट फुसकाच ठरला होता....
दुसर्‍यांदा ट्रिगर दाबला तेव्हा रिव्हॉल्वरमधून सणसणत निघालेली सुई समोरच्या कटआऊटच्या मानेत घुसली होती!

फर्नांडीसनी ती सुई काळजीपूर्वक त्या कटआऊटमधून उपसली आणि ते आतल्या रुममध्ये निघून गेले. सुमारे अर्ध्या तासाने ते परत आले तेव्हा त्यांचय चेहरा समाधानाने फुलून आला होता!

"दॅट्स इट मि. प्रधान! ही नीडल या किंवा एक्झॅक्टली अशाच गनमधून फायर केलेली आहे! या गनमध्ये असलेल्या मॅगझीनमध्ये ती अगदी परफेक्टली बसते आहे आणि तिच्यावर अगदी बारीक असे स्क्रॅचेसही आहेत!"

रोहित काही बोलण्यापूर्वीच त्याचा मोबाईल वाजला. कोहली!

"बोला कोहली....."

"सरजी, अल्ताफ अजमेरहून निसटून गाझियाबादला आला होता!" कोहली नुकतीच फोनवर मिळालेली माहिती देत म्हणाले, "गाझियाबादला एका मौलवीच्या घरी अल्ताफ आणि त्याची बायको राहिले होते! बायकोला तिथेच सोडून अल्ताफ एकटाच दुपारपासून बाहेर पडला तो काल पहाटे परत आला आणि घाईघाईतच टॅक्सीने ते दोघं निघून गेले!"

"काल पहाटे? याचा अर्थ अखिलेशचा खून केल्यावर अल्ताफ बायकोबरोबर पळून गेला असणार! अल्ताफ कुठे जाणार होता काही कळलं त्या मौलवीकडून? टॅक्सीवाल्याचा काही ट्रेस लागला?"

"आपल्याशी बोलताना बरेली आणि तिथून शाहजहानपूरला जाणार असल्याचं अल्ताफने बोलून दाखवलं होतं असं मौलवी म्हणतो आहे! गाझियाबाद पोलीस त्या टॅक्सीवाल्याचा शोध घेत आहेत, पण अद्यापही तो सापडलेला नाही! त्याच्या बायकोचे बरेली आणि शाहजहानपूरला रिश्तेदार आहेत, त्यामुळे तो कदाचित तिकडेच गेला असेल सरजी! मी बरेली पोलीसांशी बोलतो सरजी!"

अलिगड पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रुक्सानाची मावशी बरेलीच्या एजाज नगरमध्ये राहत होती. कोहलींचा फोन येताच बरेली पोलीसांनी एजाज नगर गाठून आजूबाजूच्या परिसरात गुप्तपणे चौकशी केली असता वजाहतुल्लाह निसारच्या घरी दिल्लीचे पाहुणे आल्याची बातमी त्यांच्या कानावर आली! अधिक खोलवर तपास केला असता निसारच्या बायकोची भाची आपल्या शौहरबरोबर आदल्या दिवशी सकाळी आपल्या मावशीला भेटायला आली असल्याची, आणि दुसर्‍या दिवशी सकाळीच त्यांनी लखनौला जाण्यासाठी त्यांनी गाडीही ठरवल्याची पोलीसांना माहिती मिळाली!

अल्ताफ आणि रुक्साना बरेलीत आहेत ही पक्की खबर मिळताच रोहितने बरेली पोलीसांना निसारच्या घरावर सक्तं नजर ठेवण्याची सूचना केली आणि ताबडतोब कमिशनर त्रिपाठींशी संपर्क साधला! त्रिपाठीसाहेबांना थोडक्यात सगळी कल्पना देत रोहित आणि कोहली सहा कॉन्स्टेबल्ससह रात्री अकराच्या सुमाराला भर वेगाने बरेलीच्या मार्गाला लागले.

"आपल्याला बरेलीला पोहोचेपर्यंत किती वेळ लागेल?" दिल्ली - मेरठ एक्सप्रेसवे गाठल्यावर रोहितने ड्रायव्हरला विचारलं.

"ट्रॅफीक नसेल तर पाच ते साडेपाच तास लागतील सरजी!" व्हॅनच्या ड्रायव्हरने उत्तर दिलं, "मोरादाबाद हायवेला रोडचं काम सुरु असल्याने कधीकधी जाम लागतो, पण आता रात्रीच्या वेळी फारसा त्रास होईल असं वाटत नाही!"

रोहितने आपल्या रिस्टवॉचवर नजर टाकली. रात्रीचे पावणेबारा वाजत आले होते. क्षणार्धात निर्णय घेत त्याने कोहलींना बरेली पोलीसांना फोन करण्याची सूचना दिली. कोहलींचा फोन आहे म्हटल्यावर इन्स्पे. शेख सादीक लगेच फोनवर आले.

"शेख, धिस इज सिनीयर इन्स्पेक्टर रोहित प्रधान, मुंबई सीआयडी! कोहलीसाहेबांनी ज्या अल्ताफ कुरेशीवर वॉच ठेवण्याची तुम्हाला सूचना केली आहे.... येस तोच... तो ज्या घरात लपला आहे तिथे रेड करा! त्याला सरळ उचला आणि तुमच्या पोलीस स्टेशनला आणून बंद करा! काय वाट्टेल ते झालं तरी तो हातातून निसटता कामा नये! त्याने काही गडबड करण्याचा प्रयत्नं केला तर सरळ फटकावून काढा! आणखीन एक, अल्ताफला सोडवण्यासाठी कोणीही, कितीही प्रेशर आणलं, थयथयाट केला तरी बिलकूल लक्षं देवू नका! बाकीची जबाबदारी माझी! आम्ही पहाटेपर्यंत पोहोचतो आहोत! खुदा हाफीज!"

पाठलाग सुरु झाला होता....

*******

क्रमश:

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet