कथा - सुरवात ?

कथा - सुरवात ?
----------------------------------------------------
" सुरवात ! "
रणदीप ओरडलाच .
आम्ही सगळे त्याच्याकडे पाहायला लागलो.
" ठरलं तर , आपल्या संघटनेचं नाव - सुरवात ! " तो म्हणाला. आम्ही माना डोलावल्या.
वरच्या झाडाच्या फांद्याही हलल्या .
------------------
रणदीपला सतत काहीतरी करायला हवं असायचं. म्हणजे चार लोकांच्या नजरेत भरेल असंच काहीतरी. ..लाइमलाईट !... पुढारीपणा करायला अन गाजवायला त्याला भलतंच आवडायचं.
तो आमच्या भागातल्या नगरसेवकाचा मुलगा होता. त्यामुळे हक्क गाजवणं , रुबाब करणं त्याच्या रक्तातच होतं . त्याहीपेक्षा जास्त म्हणजे त्याला असं वाटायचं की काय हा आपला बाप !... नुसता नगरसेवकच आहे .एकाच जागी- पुढे जातच नाही .
त्याला वाटायचं की नुसता नगरसेवक नाही तर पुढे-आमदार, मुख्यमंत्री आणि पुढे पुढेच... बाप नाही गेला तर आपण जाऊ !...
अंगाने धिप्पाड ,मस्तवाल, गडी . हिरोसारखे वाढवलेले केस , वाढवलेल्या पण ट्रिम केलेल्या दाढी मिशा ,खादीचे कड्डक कपडे , गळ्यात चेन्स ,हातात चेन्स ,अंगठ्या अन पोहची . डोळ्याला रेबॅनचा गॉगल .बुडाखाली चकाचक बुलेट अन खिशात पैसे. अंगात मस्ती अन दंडात रग . वयाने कमी , माझ्याएवढाच .
पण एक होतं,तो माझा जिगरी यार होता . लहानपणापासूनचा मित्र . म्हणून तर आम्ही त्याला दिप्याच म्हणायचो .
मला म्हणायचा की ,यार मी वर वरच जाणार आणि तुलाही माझ्यासोबत वर घेणार ! तू लै मागं आहेस . तुला मडक्याच्या थंड पाण्यातून बाहेर काढणार आणि फ्रीझ मधल्या थंडगार बिअरपर्यंत पोचवणार ,भाई !
त्याला माझ्या दोस्तीची जाणीव आन परिस्थितीची कदर होती .
-----------------------------
एकदा मी त्याला सांगितलं , " दिप्या , नुसतं मिरवून होत नाय यार . काहीतरी करायला पाहिजे ."
"काहीतरी म्हणजे ? "
"म्हणजे आपण एक संघटना स्थापन करू या .अर्थातच तू अध्यक्ष आणि आपण काहीतरी सोशल वर्क करू या - पोरांच्या प्लास्टिक बॉलच्या मॅचेस , शाळेच्या वह्या वाटप, कॉलेजच्या पोरांसाठी अभ्यासिका ..."
" हं !...आन पाळणाघर ? "
"पाळणाघर ?"
"मग काय तर साल्या ,तू लेका नेहमीचंच काहीतरी सांगतोयस .यात नवीन काय ?....आता पुढं बोल ना - बाळंतिणींना मार्गदर्शन, वधूवरसूचक केंद्र, अंतिम विधीची फुकट व्यवस्था ....स्साला चुत्या ! "
पोरं लय हसली .
भावड्या म्हणतो कसा " आणि मडकं हा पुरवणार ! "
त्यावर पोरं चेकाळल्यागत हसली.
मी हसलो नाही.
माझ्या बापाचं कुंभारवाड्यात मडक्याचंच दुकान आहे ...
--------------------
माझं डोकं सटकलं होतं. रागही आला होता आणि विचारही करत होतो .
माझीही काही स्वप्नं होती .अन तो माझी मशाल होता -माझ्या अंधारातल्या स्वप्नांना रस्ता दाखवायला !...
नाहीतर मडक्यात विरजण घालून दही लावायला आई ते वर टांगून ठेवते, तसं माझं आयुष्य होतं .
मी दिप्याला बोललॊ ," यार ,आपण काहीतरी सनसनाटी करायला पाहिजे ! आज कुछ तुफानी करते है ! "
" हां हां तर - "
" ओके .मग ऐक, आपण एक संस्था स्थापन करू . मग आपण घोषणा करायची , ज्या कोणाला भ्रष्टाचाराला तोंड द्यावं लागलंय , त्यांनी आमच्याकडे यावं , आम्ही हर तऱ्हेने त्याचा प्रश्न सोडवू ."
त्याचे डोळे चमकले , " कसं ?"
" आपण मीडिया गाठू , आंदोलन करू नाहीतर अटॅक करू , खळ्ळखटॅक करू ,वाट्टेल ते करू आणि आपण रातोरात स्टार होऊ ."
त्याला फार नसलं तरी थोडंफार डोकंही आहे .
-------------------
मग कामाची सुरवात करायचं ठरलं आणि संस्थेचंही नाव ' सुरुवात ' ठरलं .
अशा रीतीने श्रीगणेशा झाला .
" भाई , पहिले फ्लेक्स लावू बाकी प्रोशीजर नंतर ." भावड्या म्हणाला .
लगेच पोरांनी फ्लेक्स बनवला देखील .
मोठया अक्षरात -
' सुरुवात '
खाली पुन्हा -
' एक नवी सुरुवात ' संघटना
भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी !
ज्या झाडाखाली आम्ही जमायचो ,त्या झाडालाच फ्लेक्स लावायचा ठरलं .
ते झाड आमच्या जन्माच्या आधीपासूनचं . आमचा अड्डा त्याच्या खालीच कायम . गाड्या लावून, टवाळक्या चालायच्या आमच्या .
त्या झाडाला आमचं सगळंच माहीत .
ते झाड आम्हाला आवडायचं . मोठठं , डेरेदार , गडद हिरव्या पानांचं . छत्रीसारखं , पसरून सावली धरलेलं . मोठया बुंध्याचं . नाव माहिती नव्हतं ; पण छोटी छोटी लाल रंगाची फुलं येणारं . बारीक केसरांची . खाली पडल्यावर गुंतवळाचा कचरा झाल्यासारखी होणारी .
पोरांनी लगेच फ्लेक्स त्या झाडाला लावला .
संध्याकाळची वेळ . आकाशात एका बाजूला ऊन होतं .तर एका बाजूला एकदम काळं .
एकदम वारं सुटलं . आडवं तिडवं खेळू लागलं . मग ते घोंगावू लागलं .चक्रवातच जणू . उष्मा एकदम गायबच झाला . चाळीस डिग्रीवरून टेम्परेचर दहावर आलं असावं . सगळीकडेच काळं झालं .
राखाडी रंगाच्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर हिरवं झाड लय भारी दिसत होतं . वातावरण छान वाटत होतं . आम्हाला तर जास्तच - डोळ्यात स्वप्नं होती ना .
पोरं तशातही फ्लेक्सखाली उभी राहून फोटो काढू लागली .
मग दिप्या म्हणाला , " तुम्ही थांबा , मी तुमचा फोटो काढतो ."
त्याने ॲपलचा फोन घेतलेला ,कालच . लेटेस्ट अन महागडा .
आता झाडाची पानंही गळायला लागली . गिरगिरायला लागली , भिरभिरायला लागली .
दिप्याच्या डोळ्यात कचरा गेला. त्यासाठी त्याने मान खाली घातली अन तो डोळा चोळू लागला.
कडाइ कइ ! ....
वर आवाज आला , झाडाची एक मोठीच्या मोठी फांदी तुटली. धाडकन खाली पडली ती दिप्याच्या डोक्यातच. दणका वर्मी बसला होता . तो जागेवरच आडवा झाला . रक्ताच्या लाल धाराच लागल्या . डोकंच फुटलं , आतला मगज बाहेर आला होता . ते दृश्य भयंकर होतं - निगरगट्टालाही न बघवणारं .
मागचा फ्लेक्सही उचलून फेकल्यासारखा खाली पडला .
रग्गेल पोर आमची ! पण तीही शॉकच झाली .
मीही त्राण गेल्यासारखा झाडाला टेकलो .
वाऱ्याचा धिंगाणा चालूच होता... माझी स्वप्नही कुठे भिरकावून देत होता , नेत होता , कोणास ठाऊक !...
शेवटी मसणात मडकं फोडतात तसं माझ्याही स्वप्नांचं मडकं फुटल्यासारखं वाटत होतं .
स्साला ! सुरुवातीलाच शेवट झाला होता .
दिप्याचाही अन माझ्या स्वप्नांचाही ....
-------------------------------------------------------------
बिपीन सांगळे
bip499@hotmail.com

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

झेपली नाही.
"सुरुवातीलाच शेवट" ह्या कॅचफ्रेजभोवती पूर्ण गोष्ट बांधली आहे असं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0