व्हॅलेन्टाईन्स डेची कहाणी
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब मध्यमवर्गीय दांपत्य रहात असे. एकुलता एक मुलगा परदेशी शिकायला गेल्यापासून ते अतिशय कंटाळवाणे आयुष्य कंठत असत. बायको दिवसभर मराठी मालिका पाही आणि नवरा दिवसाभर मराठी बातम्या वाचे. संध्याकाळी नवरा इंग्रजी/हिंदी बातम्या पाही, बायको हिंदी मालिका पाही आणि दोघे जेवून झोपी जात. त्यांच्या प्रेमरथाची गती तिशीनंतर मंद होता होता आता अगदी ठप्प होऊन गेली होती. बायको अगदी विटून गेली होती. शेजारचे मध्यमवयीन दांपत्य मात्र हातात हात घेऊन फिरायला जात, सिनेमाला जात, मधूनमधून सुट्टीवर जात आणि एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवलेले प्रेमळ फोटो फेसबुकावर लावत. बायकोला शेजारणीच्या भाग्याचा हेवा वाटे.
बायको शेजारणीच्या घरीं एकें दिवशी बसायला गेली. आपल्या व्यथेचं गाणं गाइलं. शेजारणीनं तिला व्हॅलेन्टाईन्स डेच व्रत सांगितलं.
ती म्हणाली, “बाई बाई, ऊतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको. हे व्हॅलेन्टाईन्स डेच व्रत तू या फेब्रुवारीच्या चौदा तारखेपासून धर. सारा दिवस उपास करावा, फराळासाठी फक्त हृदयायाच्या आकाराचे पदार्थ खावे. बारा लाल रंगाचे गुलाब आणावेत, पाच गुलाबी हृदयायाच्या आकाराचे फुगे आणावेत, घरात सर्वत्र लाल-गुलाबी पताका लावाव्यात. लेसची सुंदर पारदर्शी अंतर्वस्त्रे आणि गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावेत. लाल-गुलाबी-हृदय हा मंत्र विसरू नये. मनोभावे व्हॅलेन्टाईनची आराधना करावी, संध्याकाळीं व्रताचं उद्यापन करायाला पतीबरोबर बाहेर जेवायला जावं, पंजाबी-चायनीज असा मध्यमवर्गीयपणा करू नये, कॉन्टीनेन्टलला जावं, बुडबुडेवाल्या मद्याचं प्राशन करून उपास सोडावा. घरी परतताना जोडीदाराचा हात हातात घ्यावा, "ग्रे रंगाच्या पन्नास छटा" ही पोथी एकत्र जमेल तेवढी वाचावी.” हे सगळं केलं तर पती प्रसन्न होईल, रात्रभर सारीपाट खेळेल, तुझी व्यथा दूर होईल असं सांगितलं. ती घरीं आली. व्हॅलेन्टाईनची प्रार्थना केली व व्हॅलेन्टाईन डे व्रत करायच्या तयारीला लागली.
चौदा तारखेला तिने सकाळीं उठून स्नान केलं, गुलाबी रंगाचे कपडे परिधान केले, पतीलाही नवीन गुलाबी शर्ट काढून दिला, त्याला हृदयाच्या आकाराची धिरडी करून दिली. पतीला गुलाबी शर्ट शोभून दिसत होता, त्याला कामावर गेल्यावर प्रत्येकाने तसे आवर्जून सांगितले. पत्नीने दिवसभर उपास केला, फराळाला हृदयाच्या आकाराचे केळीचे पान कापून त्यावर हृदयाच्या आकाराची भाताची मूद घेतली. घरात लाल-गुलाबी पताका, लाल गुलाब, गुलाबी फुगे अशी सजावट केली.
संध्याकाळी पती घरी आल्यावर आश्चर्यचकीत झाला, तिने त्याला आपण जेवायला बाहेर जाऊ असे सुचविले. बातम्या चुकणार असल्याने पती नाराज झाला आणि "तुम्हाला कस्ली कस्ली म्हणून हौस नाही" असे तोंडावर आलेले वाक्य तिने गिळले आणि बाबापुता करून त्याला जेवायला बाहेर नेले. कॉन्टीनेन्टल म्हटल्यावर पती पुन्हा नाराज झाला, त्याला असल्या मिळमिळीत चवी आवडत नसत आणि तिने "तुम्हाला काही म्हणून वेगळं खावून पहायला नको" असे तोंडावर आलेले वाक्य मागे परतवले आणि "आपण बुडबुडेवाले मद्य घेऊ" अशी सुचवणी केली. मद्याचे नाव काढताच पतीची कळी खुलली आणि बिल देताना बसलेला धक्काही मद्यप्राशनाने सुसह्य झाला.
घरी परतल्यावर बातम्या पहात असताना पत्नी गुलाबी रंगाची टू पिस नायटी घालून सामोरी आली तेंव्हा पुढे काय वाढून ठेवले आहे याची पतीला कल्पना आली आणि तो थोडा सटपटला. बायकोने "ग्रे रंगाच्या पन्नास छटा हे पुस्तक एकत्र वाचावे असे सुचविल्यावर त्याला थोडे आश्चर्य वाटले पण बातम्या नाहीत तर निदान थोडे वाचन करावे असे वाटल्याने तयार झाला. एकत्र वाचनाची कल्पना त्याला आजिबातच आवडली नाही कारण तो फार हळूहळू वाचत असे पण आलीया भोगासी म्हणून तयार झाला. पोथी कशाबद्दल आहे याविषयी त्याला मुळीच कल्पना नव्हती त्यामुळे आठ-दहा पाने वाचल्यावर त्याला दरदरून घाम फुटला. हा हार्टअॅटॅक नाही याची पत्नीने खातरजमा करून झाल्यावर तिने पोथी मिटून "आता पुरे" म्हटले. लाडीकपणे नवर्याचा चष्मा काढून घेतला. चष्मा काढल्यावर पतीला जवळचे काही दिसत नसल्याने त्याला हायसे वाटले शिवाय मद्याचा परिणाम अजूनही थोडासा होता त्यामुळे तो थोडा सैलावला.
त्यानंतरची रात्र जलद गेली. सारीपाट वगैरे खेळून झाला, पत्नी प्रफुल्लीत झाली, पती आनंदित झाला आणि त्यांच्या प्रेमारथाची चाके अगदी मंद गतीने का होईना पण पुन्हा फिरायला लागली. पत्नीने शेजारणीचे आभार मानले आणि दरवर्षी व्हॅलेन्टाईन डे व्रत पाळायला लागली. तिला जसा व्हॅलेन्टाईन प्रसन्न झाला तसा तुम्हा-आम्हा सर्वांना होवो आणि ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होवो. ते काय म्हणतात ते "हॅप्पी व्हॅलेन्टाईन्स डे"!!
प्रतिक्रिया
हृदयाच्या आकाराची धिरडी? हा
हृदयाच्या आकाराची धिरडी? हा रांडेच्यांनो! काय एकेक नवनवीन थेरं काढतील!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
थेरं?
थेरं काय? हे बघ किती गोग्गोड दिसतायत! फारच ब्वा तुम्ही अरसिक!
धिरडी म्हणून त्यांचं असं
धिरडी म्हणून त्यांचं असं धिरडं करू नका बै! म्हणा पॅ-न-के-क!
पॅनकेक म्हटलं की कसं काॅन्टिनेन्टल वाटतं, मग ह्रृद्याच्या आकाराची असोत, मूत्रपिंडाच्या आकाराची नाहीतर फुफ्फुसासारखी जाळीदार!
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
+
मूत्रपिंडाच्या आकाराच्या प्यानकेकची कल्पना बहारदार आहे. (खास करून वरून सिरप ओतल्यास.)
हात् साला!
एवढी सगळी फाइट मारून पती खेळूनखेळून काय खेळेल, तर सारीपाट???
(तरी नशीब, भिकारसावकार नाही म्हणालात!)
सारीपाट
नबा, तुमचा सारीपाटाच्या खेळाबद्दलचा अभ्यास कमी पडतोय. "हा खेळ राजा प्रसन्न असला की रात्रभर खेळतो. राणीला बरोबर नऊ महिन्यांनी पुत्रप्राप्ती होते" वगैरे वगैरे उल्लेख सांकेतिक असतात.
ओहो!
याबद्दल कल्पना नव्हती. अभ्यास तोकडा पडला खरेच!
तदुपरि, सारीपाट खेळताखेळता बोले तो भलतीच अवघड(लेली) स्थिती (मराठीत: पोझिशन) म्हणायची की ही! किंवा, कदाचित हा त्याअगोदरच्या खेळाचा (मराठीत: प्रायःक्रीडा?) प्रकार समजावा काय?
सारीपाट
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
आजच्या पीढीच्या अरुण दातेंचं गाणं.
सारीपाटाच्या खेळामधली राजा आणिक राणी
सरता मेला डाव सरेना दर्दभरी ही कहाणी
राजा वदला मला समजली, शब्दावाचून भाषा
माझ्या नशिबासवे काचती, पिंक शर्टच्या "रेषा"
तेव्हा न कळे भालावरती आठी का ती आणी ?
सरता मेला डाव सरेना दर्दभरी ही कहाणी
राणी वदली बघत एकटक, "मेसी"चा तो तारा
लावी अचानक "व्हिक्टोरियाच्या गुप्तपणा" नारा
पण राजाला उशिरा कळली, गूढ अटळ ही वाणी
सरता मेला डाव सरेना दर्दभरी ही कहाणी
तिला विचारी राजा का हे वीकेंड हे मळवावे
लोळत काढून "बिंज"वॉचिंग्चे सूख असे पळवावे
या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी केविलवाणी
सरता मेला डाव सरेना दर्दभरी ही कहाणी
का राणीने मिटले डोळे, "सारीपाट" जुळताना
का राजाचा श्वास कोंडला, "शिंचा व्हालैंटाना !"
गुलबक्षावर वाहून गेले वीकांताचे पाणी
सरता मेला डाव सरेना दर्दभरी ही कहाणी
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
वाह! वाह!!
__/\__
काय प्रतिभा, काय प्रतिमा!!
अप्रतिम विडंबन! मजा आ
अप्रतिम विडंबन! मजा आ गया.
काश अरुण दात्यांच्या कापर्या आवाजात "शिंचा व्हालैंटाना" ऐकायला मिळालं असतं!
का राजाचा श्वास कोंडला,
प्लीज!!! हसवून माराल मुसु!!
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
अहो नवी
अहो, 'न'वी,
त्यांना 'सारी पाठ' म्हणायचं असेल!
???
कुठल्या देशात राहतात ही मंडळी?
आमच्याइथे असते, तर (कोणी तोंडावर बोलले नसते कदाचित, पण) बहुधा पती गे आहे, असा निष्कर्ष परस्पर काढून आख्खे हापीस मोकळे झाले असते.
असो.
अतिअवांतर
बहुधा शारुक्खान कुठल्या तरी गाण्यात पिंकिश की मरुनिश रंगाचा असा तो घोळदार कोटछाप 'डगला' घालतो. आय गेस डीडीएलजे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
...
देशोदेशीचे संकेत, ठिकठिकाणचे ष्टीरियोटैप, दुसरे काय?
भारतात मित्रांमित्रांनी एकमेकांच्या खांद्यांवरून हात टाकून चालणे अथवा दोन पुरुषांनी मिठ्या मारणे यांस (१) मित्रांमित्रांनी एकमेकांच्या खांद्यांवरून हात टाकून चालणे अथवा (२) दोन पुरुषांनी मिठ्या मारणे याव्यतिरिक्त अन्य कोणताही अर्थ प्राप्त होत नाही.
अर्थातच. तदुपरि भारतातील
अर्थातच.
तदुपरि भारतातील अनेक केशकर्तनालयांत मस्तककेशकर्तनानंतर अनेकजण कक्षाकेशकर्तनाकरिता मॉडेल पोज़ देऊन उभे राहतात आणि नाभिक तत्रस्थ केशकुलाचे निवारण करतो ते दृश्य पाश्चात्यांनी पाहिल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होईल ते इम्याजिनवत आहोत. (ईईईईई!)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
..
तदुपरि, मरून इज़ ओके, परंतु (पुरुषाने) पिंक बोले तो... हॅहॅहॅ...
कोणे एके काळी, बोले तो
कोणे एके काळी, बोले तो १९२०-३० च्या सुमारास अमेरिकेतच ही कन्व्हेन्शन्स नेमकी उलट होती म्हणे...
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तेच तर!
अरे अरे...तोच तर मुद्दा होता हो! पत्नीने निरागसपणे गुलाबी शर्ट नवर्याला दिला, नवर्यानेही निरागसपणे घातला, इतरांनी खवचटपणे अभिप्राय दिला, तो ही लक्षात आला नाही वगैरे वगैरे!
बहारदार लेखन !
खुसखशीत आणि बहारदार लेखन ! :love:
लेसची सुंदर पारदर्शी अंतर्वस्त्रे
लेसची सुंदर पारदर्शी अंतर्वस्त्रे वगैरे ठीक आहे हो, पण मुदलातच जर कार्ब युक्त भारतीय खाणे खा खा खाऊन पोते झालेल्या त्या कायेवर ते कितीशीक शोभून दिसणार?
कशाला बिचार्या त्या सुंदर सुंदर पारदर्शी अंतर्वस्त्रांचा अपमान?
जाता जाता, इन जनरल भारतीय स्त्री पुरुष इतर वंशीयांशी तुलना करता दिसायला इतके वाईट का असतात?
- फॅशन आणि स्टाईल चा अभाव म्हणावा
- कि अयोग्य खाणे खा खा खाऊन आणि व्यायामा कडे केलेले दुर्लक्ष्य म्हणावे
- कि जेनेटीक डिफेक्ट म्हणावा?
देशो देशीचे स्त्री पुरुष बघून भारतीय दिसायला असे का असतात हा एक नेहमीच प्रश्न पडतो.
त्यातल्या त्यात पुरुषांना व्यायाम बियाम करून, स्न्यायु बळकट करून थोडीशी सिमेट्री तरी आणता येते.
याचे एक कारण - विवाह =
याचे एक कारण - विवाह = जन्माचा करार हेदेखील आहे. एकदा लग्न झालं की नवर्याने टाकायची/ घटस्फोटाची भीती इतकी नगण्य असते की बायका मुद्दाम लग्न टिकून रहाण्याकरता प्रयत्नशील रहात नसाव्यात. मला तरी हेच्च कारण वाटतं. अन थोडा जेनटीक भागही असावा. अनेक अमेरीकन बायका प्रचंड वेट-कॉन्शस असलेल्या पाहील्या आहेत. सगळ्याजणींचे २ रे लग्न आहे. ज्या ओबीस पाहील्यात त्या अविवाहीत्/परित्यक्ता पाहील्यात. सरसकटीकरणाचा दोष जमेस धरुन हे विधान करते आहे.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
त्यातल्या त्यात पुरुषांना
तीच गोष्ट बायकांची, स्नायू बळकटीकरण वगैरे सोडले तरी सुडौल का कायसेसे म्हणतात तशी फिगर बनवता येतेच की. पण संन्यस्त खेकड्याचे म्हणणे पटते आहे. सौंदर्य ही ट्रेडिंग कमोडिटी असणे हे भारतात लग्नोत्तर नसते. अमेरिकेत लग्नोत्तरही घटस्फोट खा खतरा कायम मंडराता वगैरे असल्याने बहुधा ते शस्त्र कायम परजत ठेवायची त्यांना गरज वाटत असेल हे सयुक्तिक वाटते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कदाचित, अजुन एक कारण आहे ते
कदाचित, अजुन एक कारण आहे ते हे की, स्विमिंग वगैरे स्विमिंग ड्रेस घालून आपण लोक करत नाही. उगाच भीड अन लाज बाळगतो.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
सटल्टी हो सटल्टी,
सटल्टी हो सटल्टी! नाहीतर,
असे का म्हटले असते? बाकी या कहाण्यांमधे पती पुरुषोत्तम असतात म्हणून बरे नाहीतर बायकोलाही चष्मा काढायला लागला असता.
...
असे कोणी म्हटले?
परंपरेनुसार आमच्या हिंदू बायका फार सोशिक. काय वाट्टेल ते खपवून घ्यायच्या. (न घेऊन सांगतात कोणाला?)
पण नाही म्हणायला एकदोन पौराणिक दाखले आहेत. ती अम्बिकाच ना ती, धृतराष्ट्राची आई? व्यासांच्या एकंदर अवताराकडे पाहून डोळे मिटून घेतलेनीत, ती?
किंवा, फॉर द्याट म्याटर, ती गांधारी. धृतराष्ट्राची बायको. तिने डोळ्यांस पट्टी बांधून घेतलेलीन, ती तुम्हाला काय वाटते पातिव्रत्यापोटी, 'नवर्याला दिसत नाही तर मी कशी पाहू?' असल्या खुळचट (आणि ऑबव्हियसली मेड अप) कारणापोटी?
('मजबूरी का नाम महात्मा गाँधी' या हिंदी वाक्प्रचाराशी बहुधा आपला परिचय नसावा. किंवा, तो आवडत/रुचत/पटत नसल्यास, 'दृष्टीआड सृष्टी' हादेखील विचारार्ह आहे. असो.)
पण ते एक असो. माझी मूलभूत शंका अशी, की 'त्या' प्रसंगी चष्मा तसा/शीही कोण घालतो/ते? तो मध्ये येणार नाही काय? शिवाय, मोडलाबिडला म्हणजे?
(आयुष्यात कधी कॉण्ट्याक्ट लेन्सिस वापरली नसल्याकारणाने, त्यांच्याही बाबतीत अशी एखादी अडचण येत असावी किंवा कसे, याबद्दल यत्किंचितही कल्पना नाही. (तज्ज्ञांनी खुलासा कृपया जरूर करावाच, आणि होतकरूंना मार्गदर्शन करावे. आगाऊ धन्यवाद.) परंतु, का कोण जाणे, पण प्रस्तुत ष्टोरीतील थेरडाथेरडी हे बहुधा कॉण्ट्याक्ट लेन्सिस वापरीत नसावेत, अशी शंका येते. चूभूद्याघ्या.)
'त्या' प्रसंगी चष्मा तसा/शीही
त्यावरुन आठवले, यावेळेच्या व्हाईट एलिफंट एक्स्चेन्ज मध्ये कोणीतरी "व्यक्ती रात्री पाहू शकेल असा चष्मा" भेटवस्तूत ठेवला होता. तिच्यामते ती "किंकी" भेट होती. मला कळत नाही त्या चष्म्यात एवढे "किंकी" काय आहे? सरळ नाईट लॅम्प लावा ना.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
तो चष्मा माझ्यामते स्वतःच्या
तो चष्मा माझ्यामते स्वतःच्या बेडरूम व्यतिरिक्त अन्यत्र वापरल्यास किंकी नाही का होणार?
तुम्ही म्हणजे फारच सोवळ्या बॉ!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हाहाहा खरय!!!
हाहाहा खरय!!!
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
घरी परतल्यावर बातम्या पहात
हाहाहा
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
वाचताना मजा आली. या वर्षीचा V
वाचताना मजा आली. या वर्षीचा V -डे, सौ.च्या मते सवती सोबत घालीविला. एक तर सरकारी नौकरी, ती ही रायसीना पर्वतावरील कार्यालयात. शिवाय आजकाल चांगले दिवस आलेले आहे. शनिवारी कार्यालय रोज सारखेच भरते. सकाळी चहा पिताना चांगला कार्यक्रम बनविला होता. पण सकाळी सकाळीच सौ.ची सवत अर्थात बाॅसचा फोन आला. कार्यालयातच बाॅस सोबत व-डे साजरा केला.
मग सौ.ने "तुम्हाला कस्ली
मग सौ.ने
हे वाक्य ऐकवले की नाही?
__/\__ आम्ही व्हॅलेंटाइनदिनी
__/\__
आम्ही व्हॅलेंटाइनदिनी अंमळ व्यग्र असल्याने आज धागा पाहिला!
या धाग्याची प्रिंट काढून ऐसीच्या नामोल्लेखासह ५ सुवासिनींना वाटल्यास व त्यांनाही या व्रताचे महात्म सांगितल्यास व्हॅलेंटाइन आपल्याकडील एक गुलाबी लेसचे पांघरूण तुमच्या घरावर अंथरेल हा मंत्र द्यायला मात्र विसरलात हा!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हसून हसून मेले. वॅलेंटाइन
हसून हसून मेले. वॅलेंटाइन महात्म्य भयानक आवडले! ग्रे रंगाच्या पन्नास छटांची पोथी "आणि मग कलावती आणि लीलावती..." च्या चालीवर वाचायला हवी.
+१
हाहाहा! धमाल. एकेक पंचेस छान जमून आलेले आहेत! मजा आली.
-Nile
हहपुवा !
लेखिकेचा अनुभव काय व्हॅडेचा ?
महान कथा _/\_
महान कथा _/\_
निव्वळ थोर
व्हॅलेण्टाईन बशीवला काय आणि लगेच कहाणीही हजर, तिथे आरती.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
फेरविचार
स्पर्धेच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा आणि दुसरे परीक्षक नेमावेत. पहिलं बक्षीस नक्की या कहाणीलाच मिळेल.
मस्त!
लेख जमला आहे.
लेख मस्तच झाला आहे.वाचुन खुप
लेख मस्तच झाला आहे.वाचुन खुप खुप हसलो.प्रतिक्रीयेतील मुक्तसुनीत यांची कविताही छान जमली आहे.
पुन्हा एकदा
आज पुन्हा एकदा कहाणी वाचली.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मुहूर्ताचं महत्त्व
Study: 89% Of Husbands Planning To Surprise Wife On Valentine’s Day By Dressing As Naked, Chubby Cherub
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.