'ओळख' नावाचा बुडबुडा

ओळख

'ओळख' नावाचा बुडबुडा

लेखिका - अमृता प्रधान

'ओळख' नावाचा बुडबुडा

कामाच्या निमित्ताने मला बऱ्याचदा बाहेरगावी आणि त्यातही निमशहरी किंवा ग्रामीण भागात फिरावं लागतं. असे दौरे हा नेहमीच एक वास्तवाचं भान आणणारा आणि समृद्ध करणारा अनुभव असतो.

मी जेव्हा जेव्हा कामानिमित्त अशा दौऱ्यांवर गेले आहे, त्या प्रत्येक वेळी मला त्या त्या ठिकाणच्या लोकांनी अत्यंत चांगली वागणूक दिली आहे. बऱ्याचदा तर त्यांच्या आवाक्याबाहेर जाऊनही मदत केली आहे. एखाद-दुसरा किरकोळ प्रसंग सोडता मला 'वाईट अनुभव' असा कधीच आला नाही. पण लोक माझ्याशी इतके चांगले वागतात, याचं काही एक कारण आहे असं मला वाटतं.

एखाद्या केस-स्टडी साठी, माहिती गोळा करायला, आंदोलकांशी बोलून त्यांची बाजू समजून घ्यायला, सरकारी अधिकाऱ्यांशी बोलायला इत्यादि कारणांसाठी जेव्हा मी अशी परगावी जाते, तेव्हा मी म्हणजे फक्त 'मी' नसतेच, तर माझ्या बरोबर माझ्या 'स्व' च्या वेगवेगळ्या ओळखींचं किंवा आयडेंटिटीजचं एक मोठं पोतं असतं! आणि इथेच खरी मेख आहे. माझ्या 'स्व' च्या अनेक छोट्या छोट्या बारकाव्यांवरून ठरतं की मला नक्की कशी वागणूक मिळणार आहे.

माझी पहिली ओळख म्हणजे मी एक मुलगी आहे. आपल्या समाजात 'बाईच्या जातीसाठी' काही अलिखित नियम आहेत. म्हणजे मी असं एकटीदुकटीने, दूर खेड्यापाड्यांत, अनोळखी लोकांबरोबर वगैरे फिरणं अगदी सपशेल चूक आहे. माझी दुसरी ओळख म्हणजे मी तरुण म्हणता येणाऱ्यांपैकी आणि लग्न न झालेली आहे. आणि म्हणून आत्ता या क्षणी माझ्यासाठी लग्नाहून महत्त्वाचं काही असताच कामा नये.

तिसरी गोष्ट म्हणजे माझ्या आडनावावरून हे कळतं की मी वरच्या जातीतली, सवर्ण समाजातली मुलगी आहे. चौथं म्हणजे मी पुण्यासारख्या मोठ्या शहरातली मुलगी आहे.

पाचवं- माझे कपडे आणि मी वापरत असलेल्या मोबाईलसदृश वस्तू बघून हे कळतं की मी एका सुखवस्तू, उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी आहे.

सहावं- माझी डिग्री असं दाखवते की मी उच्च शिक्षण घेतलेली मुलगी आहे.

मी ज्या पद्धतीने वावरते त्यावरून असं दिसतं की मला असं एकटीने फिरायची सवय आहे.

आणि सरतेशेवटी मी एक 'नाकी-डोळी-नीटस' अशी मुलगी आहे.

तर अशा माझ्या 'स्व' चे वेगवेगळे पदर एकत्र येऊन एक खूप स्ट्रॉँग असा 'फेमिनिन फॅक्टर' तयार होतो, जो जीवशास्त्रीय (biological) पण आहे आणि सांस्कृतिक (cultural) पण. आणि या सगळ्याचा माझ्या भोवती असा एक बुडबुडा तयार होतो. माझ्या 'स्व' चे सगळे छोटे छोटे बारकावे या बुडबुड्यामधे भर घालतात. आणि मग हा बुडबुडारूपी पिंजरा वाढतच जातो. मी जिथे जाईन तिथे तिथे मला वेढून टाकतो.

म्हणजे जेव्हा लोक माझ्याशी बोलत असतात, तेव्हा खरं म्हणजे ते माझ्याशी बोलतच नसतात. ते ह्या बुडबुड्याशी बोलत असतात. आणि मग ते खूप चांगलं पण वागतात. स्मित वगैरे करतात, स्त्री-दाक्षिण्य दाखवतात. माझ्याजवळ सामान असेल तर ते उचलायला मदत करतात. मला बसायला जागा देतात. असं सगळं मोठ्ठं नाट्य घडत राहतं. पण त्या बुडबुड्याच्या आतल्या 'मला' मात्र हे सतत जाणवत राहतं की हे सगळे लोक काही माझ्याशी चांगले वागत नाहीयेत. हे तर त्या बुडबुड्याशी चांगलं वागताहेत!

हा बुडबुडा अनेकविध मजेशीर अनुभवांना कारणीभूत ठरला आहे. मला आठवतंय, मी आणि प्रांजळ जेव्हा पहिल्यांदा 'प्रयास' च्या कामासाठी औरंगाबादला गेलो, तेव्हा रिक्षावाल्याला सांगितलं की आम्हाला एखाद्या बऱ्याश्या हॉटेलपाशी सोड. त्याप्रमाणे त्याने एका हॉटेलपुढे रिक्षा उभी केली. तिथे जवळच पानाची टपरी होती. आमची रिक्षा थांबली आणि आम्ही खाली उतरलो. ज्या क्षणी मी रिक्षातून खाली पाय ठेवला, त्या क्षणी त्या पानठेल्यावरच्या सगळ्या माना सर्रकन वळल्या. मला अक्षरशः अचानक त्या नजरांच्या शेकडो सुया टोचताहेत असं वाटलं! एखादी शहरी मुलगी येऊन हॉटेलमधे राहायची बहुदा औरंगाबादकरांना सवय नसावी.

जेव्हा मी सीमाबरोबर लातूर शहराच्या पाणी पुरवठ्याचा अभ्यास करायला गेले तेव्हा आम्हाला दोघींनाच मिळून बऱ्याच मोठ्या भागाचा सर्व्हे करायचा होता. म्हणून आम्ही वेगवेगळ्या दिशांनी जायचं ठरवलं. मग लातूरच्या कुठल्याश्या गल्ल्यांमधे मी एकटीदुकटी फिरत होते. आणि माझ्या मागे एक साताठ टवाळ पोरांचं टोळकं फिरत होतं. नशिबाने कमेंट्स करण्यापलिकडे त्यांनी काही त्रास दिला नाही. काही घरांचा सर्व्हे केल्यावर मला असं लक्षात आलं की त्या भागातली पाण्याची परिस्थिती नीट समजून घ्यायची असेल तर तिथल्या नगरसेवकाला भेटणं आवश्यक होतं. म्हणून मग मी त्यांचा पत्ता शोधत निघाले. रस्त्याच्या कडेला गाडीवर थांबलेल्या एका माणसाला पत्ता विचारला. त्याने मला नगरसेवकाकडे काय काम आहे वगैरे विचारलं. मग घड्याळाकडे नजर टाकली. संध्याकाळचे सात वाजत आले होते. त्याने क्षणभर विचार केला, मग म्हणाला, “मॅडम, आत्ता या वेळी नका जाऊ तुम्ही. उद्या सकाळी गेलेलं बरं राहील. ते पिलेले वगैरे राहातील. उगीच कशाला भलत्या वेळी जाता?!” म्हणून मग मी नगरसेवक प्लॅन कॅन्सल केला आणि आणखी काही घरांचा सर्व्हे करायचं ठरवलं. साडेसातच्या सुमाराला अंधार पडला तेव्हा मी हमरस्त्यापासून बऱ्याच आतल्या गल्ल्यांमध्ये पोहोचले होते. अजून थोडी घरं करू असा विचार करत मी एका घराचा दरवाजा ठोठावला. तीन जणांचं कुटुंब होतं. साधारण पन्नाशीतले आई-वडील आणि कॉलेजमधे जाणारा मुलगा. त्यांना आमच्या प्रोजेक्टबद्दल सांगितल्यावर ते खूपच प्रभावित झाले. आणि मी अशी पुण्याहून येऊन लातूरात एकटी फिरत सर्व्हे करते आहे याचं त्यांना विलक्षण कौतुक वाटलं. पण दुसऱ्याच क्षणी त्यांना तितकीच काळजी वाटली. त्यांनी अगदी निक्षून सांगितलं की सर्व्हे पुरे झाला, उशीर झालाय, आता हॉटेलवर परत जा. ते म्हणाले की त्यांचा भाग मुलींसाठी तितकासा सुरक्षित नाही. मला रिक्षा मिळायला त्रास होईल म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाला मला गाडीवर चौकापर्यंत सोडायला सांगितलं. आणि अशा रीतीने माझी आयतीच सोय झाली.

मी जेव्हा भिवंडी महानगरपालिकेत जायचे तेव्हा पाणीपुरवठा विभागात कुठल्या न कुठल्या इंजिनीअरला भेटायसाठी बऱ्याचदा ताटकळत बसावं लागायचं. बसायची खोली माणसांनी, मुख्यतः पुरुषांनी गच्च भरलेली असायची. मी नुसती खोलीत शिरले की लोकं बिचारी अशी काय अवघडून जायची. एकदम अंग चोरून बसायची. माझ्या नुसतं असण्यानेच त्यांना इतकं भयंकर ऑकवर्ड व्हायचं. मला इतकी मजा वाटायची. आणि गंमत म्हणजे माझ्याशी काही बोलायचं असेल तर ते मला उद्देशून आपापसांत बोलायचे. म्हणजे मला चहा विचारायचा असेल तर शेजारच्याला विचारायचे “मॅडमसाठी चहा सांगा नं.” मग मी सांगायचे की मी चहा घेत नाही. मग ते परत शेजारच्याला विचारायचे “मॅडम चहा नाही घेत?” मग मी परत म्हणायचे की नाही. मग ते परत आपापसात बोलायचे “मॅडम पुण्याच्या दिसतात.” मग मी म्हणायचे 'हो'. हे असं बराच वेळ चालायचं. पण कोणी 'माझ्याशी' असं बोलायचंच नाही.

मी काही दिवसांपूर्वीच निम्न पैनगंगा धरण विरोधी आंदोलन करणाऱ्या लोकांना भेटायला यवतमाळला गेले. ते तर आमच्या कामावर इतके खूश झाले की मला बिलकुल फाईव्ह स्टार वागणूक मिळाली. मी ज्यांच्या संपर्कातून गेले होते त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की माझी राहायची अशी काही सोय नाहीये तेव्हा त्यांनी मला त्यांच्या घरी राहायला नेलं. त्यांच्या सगळ्या कुटुंबाला भेटवलं. प्रत्येकाला आवर्जून सांगितलं की ही खास पुण्याहून आपल्या धरणविरोधी समितीचं काम बघायला आलेली आहे. त्यांच्या पत्नीने माझ्यासाठी साग्रसंगीत जेवण बनवलं. मात्र सगळ्यांनी मला वारंवार बजावलं की आता मी लग्न करायला हवं.

यवतमाळला जायच्या आधी मी तिथल्याच जवळच्या उमरखेड तालुक्यातल्या एका अगदी खेडेगावातल्या मित्राला भेटायला गेले असताना 'पुन्याच्या पावनीला' बघायला खास एक बायकांचा जथा येऊन गेला. दुर्दैवाने नेमकी तेव्हाच मी लॅपटॉपवर काम करत बसले होते. ते बघून तर त्या अश्या काही खूश झाल्या आणि मग मी कशी शूर आहे, कशी एकटी एवढ्या लांब आले वगैरे वगैरे खूप बडबड केली. आणि मी उमरखेडला जात असताना बसमधे माझ्या शेजारी बसलेला माणूस तर इन्स्टंट फॅन झाला. मी कोण, कुठली वगैरे विचारत त्याने बोलायला सुरुवात केली. मग म्हणाला तुम्ही नक्कीच इंजिनीयर असणार. मग त्याला दहा मिनिटं समजावलं की मी नक्की काय काम करते. मग तर तो असा काय इम्प्रेस झालाय की विचारता सोय नाही. त्याने तिथल्यातिथे मला सांगूनच टाकलं की मी यापुढे त्याची प्रेरणा वगैरे असणार आहे. मला हे उघडपणे दिसत होतं की तो फ्लर्ट करतोय. मग त्याने मला माझा हात दाखवायला सांगितला. मग माझ्या स्वभावाबद्दल आणि भविष्याबद्दल काय काय गोष्टी सांगितल्या, आणि मग मला म्हणाला की तुमच्या हातावरच्या रेषा खूपच छान आहेत. तुमचं भविष्य अगदी उज्वल आहे!

तुम्हाला असं वाटतंय का की मी बढाया मारते आहे? मुळीच नाही! उलट मला यातला धडधडीत विरोधाभास दाखवून द्यायचा आहे, जो मला सतत जाणवतो. जेव्हा मी या सगळ्यापासून स्वत:ला वेगळं काढून अगदी वस्तुनिष्ठपणे बघायचा प्रयत्न करते तेव्हा मला हे स्पष्ट दिसत राहतं की हे सगळं किती अनेक पातळ्यांवर चुकीचं आहे, असमतोल आहे. म्हणजे जर माझ्या जागी एखादा लहानश्या खेड्यातला मुलगा असता तर त्याला अशी एवढी राजेशाही वागणूक मिळाली असती? नक्कीच नाही. जेव्हा लोक असे अति जास्त साखरेत घोळवलेलं वागतात तेव्हा त्याचं हसू पण येत नाही. वैताग येतो. आणि विचारात पडायला होतं.

पण गंमत म्हणजे माझ्या भोवतीचा हा जो बुडबुडा आहे त्याकडे प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातून बघतो, आणि त्याप्रमाणे माझ्याशी वागतो. काही लोकांना खूप कौतुक वाटतं तर काही नाकं मुरडतात. माझे कितीतरी नातेवाईक असे आहेत जे माझ्या कामाला, मी मानत असलेल्या मूल्यांना, माझ्या तत्त्वांना मूक नापसंती दर्शवतात. त्यांची 'चांगल्या घरची मुलगी' ची जी काय व्याख्या आहे त्यात मी कुठेच बसत नाही. माझी एक आज्जी तर मला 'बँडिट क्वीन' म्हणते. कारण काय तर मी सारखी विदर्भ भागात जाते जो नक्षलवादी भाग म्हणून ओळखला जातो.

पण या सगळ्यामधे कोणीच खऱ्या माझ्यापर्यंत पोहोचत नाही. सगळे येऊन त्या बुडबुड्यापाशीच थांबतात. आत अडकलेल्या माझी मात्र घुसमट होत राहते.

✻ ✻ ✻

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हे खरं आहे.ते लोक फार आदराने वागवतात.तो बुडबुडा आहे आणि त्यात आपण आहे हे जाणवत राहतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे "बुडबुडों से बातां" सगळीकडे असतंच. तुमच्या दिसण्यावागण्याबोलण्यावरून लोक आडाखे बांधतात, ते पूर्वग्रहांशी जोखतात आणि त्यानुसार वागतात.

ऐसी किंवा अन्य जालीय फोरमांचं मुख्य आकर्षण "बुडबुड्यांपासून मुक्ती" हेच आहे. उद्या नवी बाजू किंवा जुनियर ब्रह्मे त्यांच्या बुडबुड्यांसकट प्रत्यक्ष सामोरे आले तरी त्यांना कोणी ओळखू शकणार नाही. तशी गरजच नाही.

तुमच्या लेखातलं काय आवडलं असेल, तर ते म्हणजे "बाईच्या जन्म" किंवा "पुर्षांची वृत्ती" याविषयी कोणतीही रडारड न करता लेखाचा ठेवलेला खेळकर सूर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लेख तर आवडलाच, आदूबाळचा प्रतिसादही.

'न'वी बाजू किंवा ज्यु. ब्रह्मे त्यांच्या बुडबुड्यांसकट प्रत्यक्ष सामोरे आले तर मला ते बहुदा आवडणार नाही. तरीही बुडबुड्यांपासून मुक्ती असतेच असं नाही. भाषेचा वापर, लेखनातून आपण कुठे प्रवास केला आहे याचे उल्लेख यांतूनही बुडबुडे तयार होतात. आपल्याला नकोसे असले तरीही त्यातच आपल्याला बंदिस्त केलं जातं.

तुमच्या लेखातलं काय आवडलं असेल, तर ते म्हणजे "बाईच्या जन्म" किंवा "पुर्षांची वृत्ती" याविषयी कोणतीही रडारड न करता लेखाचा ठेवलेला खेळकर सूर.

अगदी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऐसी किंवा अन्य जालीय फोरमांचं मुख्य आकर्षण "बुडबुड्यांपासून मुक्ती" हेच आहे.

सिक्सर!!!
___
आपल्या नकळत आपल्या भवतालचे लोक स्पंजसारखी इतकी माहीती साठवुन घेत असतात. हे कळतं कारण आपण इतरांबद्दल डिट्टो तेच करत असतो. पेहेराव, मुद्रेवरील भाव, हालचाली, पर्स्/दागिने/टाय्/बूट व तत्सम अ‍ॅक्सेसरीज सर्व काही त्या व्यक्तीबद्दल केवढे तरी बोलत असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हाला असं वाटतंय का की मी बढाया मारते आहे? मुळीच नाही! उलट मला यातला धडधडीत विरोधाभास दाखवून द्यायचा आहे, जो मला सतत जाणवतो. जेव्हा मी या सगळ्यापासून स्वत:ला वेगळं काढून अगदी वस्तुनिष्ठपणे बघायचा प्रयत्न करते तेव्हा मला हे स्पष्ट दिसत राहतं की हे सगळं किती अनेक पातळ्यांवर चुकीचं आहे, असमतोल आहे. म्हणजे जर माझ्या जागी एखादा लहानश्या खेड्यातला मुलगा असता तर त्याला अशी एवढी राजेशाही वागणूक मिळाली असती? नक्कीच नाही. जेव्हा लोक असे अति जास्त साखरेत घोळवलेलं वागतात तेव्हा त्याचं हसू पण येत नाही. वैताग येतो. आणि विचारात पडायला होतं.

अधोरेखित भागाबद्दल - मला असं अजिबात वाटत नाही की हे कोणत्याही पातळीवर चुकीचं आहे.

मी तर म्हणतो की हे जे चाललं आहे तेच अत्यंत योग्य आहे. सिरियसली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्या पदरांना लेखिका बुडबुडे म्हणतात त्यांना मी "एक्स्टेन्शन ऑफ द इनर सेल्फ" म्हणेन. आणि त्यादृष्टीने मलाही त्या पदरांमुळे मला मिळणारी वागणूक ही वावगी न वाटता, योग्यच वाटते.
शेवटी "जज" करणे ही मेंदूची एक फॅकल्टी आहे, धर्म आहे. मग या समोर आलेल्या पदरांच्या बेसिसवरती, जर मी जज केले जात असेन तर त्यात वावगं काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला लेखातला आक्षेप नीटसा समजला नाहीये.
म्हणजे आपल्या ओळखीचे अनेक पदर असतात आणि ते सर्व मिळून आपण असतो. त्यातल्या एकाच गोष्टीमुळे आपल्याला लोकांनी जोखू नये हे ठिक आहे. आपल्या प्रत्येक कृतीचे कारण कुठल्या तरी एकाच गोष्टीमधे लोकांनी शोधू नये हे ठिक. अमुक ठिकाणी तमुक गोष्टीला महत्व देऊन आपल्याशी वागले जाऊ नये ही अपेक्षाही रास्तच पण ती एक गोष्ट आपला एक भाग आहे हे नाकारायचे का?
किंवा रादर अश्या अनेक गोष्टी मिळून आपण बनलो आहोत तर या सर्व गोष्टींना वेगवेगळे वा एकत्रितपणे बघणार लोक आणि त्याप्रमाणे वागणार हे उघड नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

तुमच्या समजा एकुण ६ ओळखी आहेत. एकात एक मिक्स झालेल्या. आता त्या सर्व मर्ज करुन एक टाइप ५२७ क्रं ची मुलगी तुम्ही आहात. ( माफ करा मुद्दा मांडतोय शैली कडे दुर्लक्ष करा ) तर आता तुम्ही प्लस अजुन ८ टाइप सहज सापडतील बघा. आता काय झालय की इतक्या विविध ओळखी निर्माण होताहेत एकेका व्यक्तीत अधिक एकेका कॅटेगरीत व मग त्यातील अनेक परस्परविरोधी एकदम.
मग क्लॅशेस होतात. तणाव फारच वाढतोय.
एक उदा. बघा आजच्या जाहीराती घ्या त्यात बघा एक स्त्री कीती विवीध स्तरांवर दाखवतात.
कुछ नया सोचे इतक विरोधाभासी टायटल मिल्टन च बाई बघा बुवा सवयबाज ठुमरी वगैरे बाइ सवाल मिस करणार तोच जुना पॅटर्न.
दुसरी मम्मी आपने हमारे लीए आठ साल पहले करीयर छोडा था आज फिरसे नयी शुरुवात बुवा पोर स्वागतशील
तिसरी बघा यंग मेरा करीयर खुदका घर सेटल बाबा तीन वर्ष थांबा इक्वल इक्वल हो जाएगा
चौथी वाय नॉट एक टकलु नाचतोय चड्डी दाखवतोय स्ट्रीप टीज वाय नॉट आम्ही का नाही बघणार एकदम वेगळी आयडेन्टीटी
पाचवी मुव्ह लाऊन घेतेय सहावी काहीतरी साबण वगैरे लाउन त्वचा मग तो मागे फिरतो त्यात आनंद शोधतेय
मला इतकच म्हणायचय कीती वेगवेगळ्या ओळखी आहेत या कॅरेक्टरच्या एक स्त्री हा घटक निवडला तर एक बालक एक पुरुष एक वृद्ध काहीही घ्या परत कीती पदर आहेत.
हे काल्पनिक आहे अस नका समजु. जाहीरातदार पक्के व्यावसायिक कुठे तरी तो सेगमेंट अस्तित्वात आहे म्हणुनच ते त्याला टारगेट करतायत. त्याशिवाय ते प्रबोधन सोशल वर्क वगैरे फालतु भानगडी करत नाहीत कधीच ते व्यावसायिक असतात. आय मीन असे घटक आहेतच समाजात. जाहीरात फक्त वास्तव अधोरेखीत करत असते.
तर तुम्ही तुमच्या ओळखी त्यातुन येणारे बुडबुडे व त्याने संवादात येणारा अडथळा कृत्रिमता खोटेपणा दाखवला.
पण एकेक माणसाच्या एकंदरीत कीती असंख्य ओळखी वाढताहेत त्याने काय प्रचंड गोंधळ आता निर्माण होतोय
हे अपार्ट फ्रॉम वरील स्त्री विश्लेषण कीती व्यापक आणि भयानक वास्तव आहेच

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

व्यापक हे पटलच पण भयानक असेलच का प्रत्येकवेळी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

या लेखाला नक्की काय म्हणावं समजत नाहीये.
शैली, मी बै 'बै' ए ! वगैरे करत न राहण, वगैरे मस्तच! मात्र "ओळख" ही भोवतीचा बुडबुडा आहे आणि तुम्ही कोणीतरी वेगळ्याच आहात हा दावा काही नाही पटला.

फारतर तुम्हाला स्वतःची जितकी ओळख आहे तितकी इतरांना नाही इतकाच त्याचा अर्थ निघतो.

===

बाकी लेखाची सुरवात लयच भारी! तुमच्या ओळखीची यादी देतानाच्या मिश्कीलीने खूप हसु फुटत होते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख आवडला पण आमच्याकडे याला बहुधा सुख खुपणे असं म्हणतात ब्वॉ !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे सुख खुपणं नसतं.

आपल्यासारख्याच इतर काही माणसांना, आपल्याला मिळते तेवढी चांगली वागणूक मिळत नाही, आपण काहीही तीर मारलेले नसूनही, याचा विषाद असतो. मराठीत त्याला compassion म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण विशेषतः या पवित्र भारतभूमीमधे स्त्रीला इतकी चांगली वागणूक मिळतेय म्हटल्यावर आम्ही त्याला इंग्रजीत 'नशीबवान / भाग्यवान' म्हणतो. Smile
असेही "समय से पहले और नसीब से ज्यादा किसी को कुछ नही मिलता" असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सगळ्यामधे कोणीच खऱ्या माझ्यापर्यंत पोहोचत नाही

को-अहम ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखातले स्वतःबद्दल केलेले वर्णन (मी अशी, मी तशी) लेखिकेने स्वतःच आपल्या भोवती ओढून घेतलेल्या आवरणासारखे आहेत. त्यामुळे कोणी अगदी कुणाशीही ज्या आपुलकीने बोलावं त्या आपुलकीने लेखिकेशी बोललं तरी लेखिकेला "मी यँव म्हणून असं बोलताहेत" असा गैरसमज होताना दिसतोय. लोक तुमच्यापर्यंत पोचताहेत, पण तुम्हालाच स्वतःबद्दल असलेल्या गैरसमजामुळे त्यांना तिथपर्यंत पोहचू द्यायचं नाही असंच वाटलं लेख वाचून.

बाकी उमरखेडजवळच्या कुठल्या खेड्यात गेला होता? मी स्वतः मुळ उमरखेडचाच आहे, त्यामुळे तुमच्याकडे लॅपटॉप असल्याने जनता खुश झाली हे काही पचत नाही हो. घराघरात लॅपटॉप कधिच पोचलेत ह्या भागात!

स्वतःभोवतालचे स्वतः निर्माण केलेले बुडबुडे फोडा, म्हणजे सगळे तुमच्या जवळ नक्कीच पोचतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक