अजिंठा

अजिंठा निर्मळ वाघूरच्या प्रवाहात
काठाकाठातला
झाडांच्या देठातला
रंगभोर शिडकावा गोंदवून बसलेला
-ना.धों. महानोर

वाघूर काठच्या अजिंठ्याचे हे रुप पाहून ८ वर्षे झाली. २००७ च्या जुलैमध्ये ती लेणी पाहून मी स्तिमित झाले होते. मी कुणी कवी किंवा चित्रकार नाही पण अजिंठयामुळे मला चित्रकलेत, पुरातत्त्वशास्त्रात, इतिहासात रस निर्माण झाला. हे सगळं लिहायला मला खूप उशीर झाला आहे. माझा जन्म जळगावचा. अजिंठा-वेरुळ पाहाण्याचा योग यायला बरीच दशके जावी लागली. जळगावला-माझ्या आजोळी इतक्या वेळा जाऊनही तेथून केवळ ५५ कि.मी. अंतरावर असलेल्या ह्या गुहा पाहायची संधी कधीच मिळाली नाही याचे वाईट वाटले होते. गुहेत काय पहायचे? वाघ-सिंह नाहीतर वटवाघळे अशी एक समजूत. मुंबई-पुण्यातील मंडळींनी सह्याद्रीतील किेल्ल्यांना न्याय आणि प्रेम दिले असले तरी दोन हजारापेक्षा जुन्या बुद्ध लेण्यांचा अभ्यास आता कुठे सुरु झालेला आहे. मी तर लहान असतांना ऐकले होते की या सगळ्या गुहांमध्ये वटवाघळांची घाण असते अन अंधारात काहीही दिसत नाही. एकंदरीत भारतीयांमध्ये ऐतिहासिक गोष्टी जपण्याबाबत निरुत्साहच असतो. यामागे कदाचित धर्म आणि राजकारणसुद्धा असू शकेल. तेच एखादे हिंदु मंदिर असेल तर भक्तांची रांग लागेल. आणि मूर्तीवर शेंदूर, कुंकू, तेल-तूप, दूध ओतले जाईल. आनंदाची बाब ही की गेली कित्येक शतके काळाच्या पडद्याआड दडलेले हे नैसर्गिक सौंदर्य आणि मनुष्याचा कला-अविष्कार ह्ळूहळू पर्यटकांसमोर येत आहे. पौर्वात्य देशातील बौद्ध भक्तमंडळी अतिशय शिस्तबद्धतेने अजिंठा पहायला येऊ लागली आहेत. या मध्ये विशेषत: जपानी आणि कोरीयन लोकांचा समावेश असल्याने त्या साठी लागणारी व्यवस्था उभारण्यासाठी परकीय चलन येऊ लागले आहे. मी पहिलेला अजिंठा एकदम स्वच्छ होता. हाय वे वरुन आत जातांना कमी धूराच्या खास बसमधून घेऊन जातात. आपली वाहने/रिक्षा/बसेस लेण्यांपासून लांबच थांबतात. अगदी अनवाणी पायांनी आम्ही २८ गुहांमधून फिरलो. फ़्लॅश वापरुन छायाचित्रण करण्यास मनाई आहे. वाघूर नदीचा धबधबा ओलांडून पायवाटेने डोंगरात शिरलो. कॅ. स्मिथला ज्या कड्यावरुन गुहेत शिरणारा वाघ दिसला तो पॉईंट पाहिला. गोमेद-जांभ्याचे दगड गोळा निरखत, कॅमेऱ्यात न मावणारा अजिंठा डोळ्यांमध्ये सामावत, भटकत होते.

डोळ्यांना डसले पहाड इथले ह्या गोंदल्या चांदण्या
कोण्या रंग बिलोर गौर स्मृतिच्या ओल्या इथे पापण्या,
गाभाऱ्यास अजून ओंजळभरी गंधार्त संवेदना
बुद्धाच्या पडसावुलीत निजल्या ह्या राजवर्खी खुणा.
-ना.धों. महानोर

त्यानंतर अजिंठ्याबद्दल मिळेल ते वाचत व पहात होते. ट्रीपहून घरी आल्या आल्या ना.धॊ. महानोरांचे खंडकाव्य "अजिंठा" मागवले. चौरस आकाराचे हे छोटेसे पुस्तक आणि त्यातील पद्मा सहस्रबुद्धे यांची रेखाचित्रे मला खूप आवडली. तो पर्यंत पारो-रॉबर्टची प्रेमकथाही माहीत नव्हती. नंतर २०१२ मध्ये नितीन देसाईंचा "अजिंठा" चित्रपट आला तेव्हा YouTube वर ट्रेलर पाहीला. मग कुणीतरी बंगलोरमध्ये हा सिनेमा आणेल अशी वेडी आशा बाळगून होते. महाराष्ट्रातील मित्रमंडळीकडूनही फारसा अभिप्राय मिळाला नाही. दादरच्या दुकानात सी.डी. पण मिळाली नाही. नंतर फारसा गाजावाजा न होता तो सिनेमा गायब झाला. अखेरीस परवा "मायबोली" वाहिनीवर अचानक तो सिनेमा लागला अन मी हरखून गेले. कामे आवरुन टी.व्ही. समोर बसून राहीले. शेकडो वर्षे उपेक्षित रहिलेल्या अजिंठ्याला थोडासा का होईना न्याय मिळाला असे वाटले. मेजर रॉबर्ट गिल १९४४ मध्ये अजिंठ्याला आला. सैनिकी पेशाचा हा चित्रकार अजिंठा पाहून मंत्रमुग्ध होतो आणि त्याच बरोबर भाषेच्या पल्याड जाऊन पारो ह्या आदिवासी मुलीच्या प्रेमात पडतो त्याची ही कहाणी. महानोरांनी शब्दबद्ध केलेल्या ह्या शोकांतिकेत नैसर्गिक सौंदर्य आणि अजिंठ्यातील कलाकृती ह्या दोन्हींचा समसमा संयोग आहे. महानोरांच्या कविता कौशल इनामदारांनी संगीतबद्ध केल्या आहेत. यामध्ये ढोलकी आणि इतर एतद्देशीय वाद्ये वापरलेली आहेत. ही गाणी "जैत रे जैत" सारखी गळ्यात रुळली नाहीत तरी महानोरांच्या कवितेचा बाज राखून आहेत. होळीच्या वेळचे नाच बॉलीवूडच्या धर्तीवर गेले आहेत. ते जरा साधेपणाने दाखवता आले असते तर बरे झाले असते. सिनेमाचे सेट्स आणि अजिंठ्याचे विहंगम दृश्य ह्यांचे मिश्रण चांगले झाले आहे. गिलची चित्रे आकार घेतांना छान दाखवली आहेत. पारो जंगलातील संपत्ती वापरुन रंग तयार करते ते ही सुंदर रितीने दाखवले आहे.

अजिंठा इ.स.पू. दुसऱ्या शतकात कोरायला सुरुवात झाली असावी. गुहा क्र. ८,९,१०,१२,१३,१५ ह्या सुरवातीला कोरल्या असाव्यात. बाकीच्या २२ गुहा इ.स. ४ ते ६ व्या शतकात कोरल्या असाव्यात. इतक्या जुन्या काळात ह्या कलाकारांनी कुठली अवजारे वापरली असावीत? अंधारात काम करतांना त्यांनी तेल दिवे वापरले की पत्रे किंवा आरसे वापरुन सूर्याचे किरण परावर्तित केले? त्यांनी रंग कसे बनवले? उभ्या कातळात ही म्यूरल्स कशी घडत गेली हे सगळेच प्रश्न मनांत येतात. सातवाहन राजांनी भिक्षुक आणि कलाकारांना किती मदत केली असेल. कित्येक चित्रे जातक कथांवर आधारीत आहेत. म्हणजे कलाकारांना मार्गदर्शन करणारे पंडीतसुद्धा तिथे असणार. की कलाकार स्वत:च भिक्षुक आणि पंडीत होते? ह्या कलाकारांना त्या जंगलात खायला काय मिळत होते? बुद्धाचे तत्त्वज्ञान त्यांनी नक्कीच आत्मसात केलेले असावे. त्याखेरीज अशा कलाकृतींची निर्मिती होणे अशक्य आहे. लौकिक दृष्टीने अशिक्षीत असलेल्या पारोला सुद्धा हे तत्त्वज्ञान माहीत असावे. तिला इंग्रजी येत नसले आणि गिलला मराठी येत नव्हते तरी त्या दोघांना चित्रांमधील भव्यता आणि त्यामागची शब्दातीत पार्श्वभूमी माहीत असावी. ह्या प्रेमकथेला जातककथा आणि बुद्धाचे तत्त्वज्ञान ह्यांची सुंदर जोड आहे. महानोरांच्या काव्यात ऐतिहासिक कादंबरीप्रमाणे एकामागोमाग एक प्रकरणे नाहीत पण त्यांनी ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास करुन, कल्पनाशक्ती वापरुन एका तरल निर्मिती केली आहे. कविवर्य कुसुमाग्रजांची प्रस्तावनाही वाचनीय आहे. नितीन देसाईंनी (आणि मंदार जोशी) लिहीलेल्या पटकथेमध्ये गिलच्या पाश्चात्य मनातील विचार आणि जलालचे भाषांतर छान दाखवले आहे. फ़ीलीप स्कॉट-वॉलेस आणि सोनाली कुलकर्णी आपापल्या भूमिकेत शोभून दिसले आहेत.

अजिंठा म्हणजे स्वप्नील शिल्पचित्रांची अद्भुत खाण आहे. त्याबद्दल म्या पामराने काय लिहावे? जमेल तेव्हा जरुर पहायला जा आणि नाही जमले तर निदान चित्रपट तरी पहा! मला आवडलेल्या आणखी काही पंक्ती....

अजिंठा
अद्भुत भव्य दिव्य स्वप्नातला
प्रतिभावंतांच्या छिन्नीछिन्नीतला
जगडव्याळ चिरंतन नाजुक रेषांमधला
रंगांचं आभाळ साठवून दगडांवर
कभिन्न कातळातलं जगभरचं दु:ख
घोटवून निर्यमक बुद्धाच्या कहाणीत
शांत सचेतन
पद्मासनातल्या गाभाऱ्यातला
-ना.धों. महानोर

-गौरी

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

अजिंठा लेणी मी दोनदा पाहिली.सकाळी ९ ते पाच / सोमवारी बंद असतात.CCD sensor वाले कॅम्रे फोटोसाठी उत्तम.
अजिंठाची चित्रे फ्रेस्को पद्धतीची नाहीत आणि इतके भावदर्शन इतक्या जुन्या चित्रांत कुठेच नाहीये.नंतरही ही कला हरवली आणि 'उरकणे' पद्धतीची बटबटबटीत रंगसंगतीची चित्रकला वाढली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर. हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद! अजिंठ्यातील चित्रे फ्रेस्को की म्युरल्स असा एक वाद असतो. फ्रेस्को (इटालियन शब्द) म्हणजे फ्रेश. फ्रेस्को पद्धतीची चित्रे ओल्या प्लास्टरवर काढली जातात. सुकल्यावर ती त्या भिंतीवर बसतात. अजिंठ्यातील रंगकाम चुना-मातीचा बेस सुकल्यावर केलेले आहे. म्हणजे म्यूरल प्रकार झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी

छान लेखन!
लिंकाही उपयुक्त असाव्यात हाफिसातून उघडणार नाहीत. नंतर बघेन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान लिखाण. एखादी श्रेष्ठ कलाकृती नुसतीच असत नाही तर इतर कलाकारांवर गारुड करते. त्यातून तिला केंद्रस्थानी ठेवून इतर कलाकृतींची निर्मिती होते. हे सगळं होणं हे ती कलाकृती जिवंत असल्याची खूण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजिंठा निर्मितीच्या कालनिर्णयाबाबत वॉल्टर स्पिंक, मिशिगन विद्यापीठातील कलेतिहासाचे प्राध्यापक, ह्यांनी अजिंठा लेण्यांवर अणि त्याच्या कालनिर्णयावर खूप अभ्यास केला आहे. ह्या विषयावरील त्यांचे पुस्तक बूक्स.गूगलमध्ये अंशतः वाचनासाठी येथे उपलब्ध आहे. ह्या विषयामध्ये तुम्हास स्वारस्य असल्यास त्यावर नजर टाकावी असे सुचवितो.. त्यांचीच http://www.walterspink.com/ ही वेबसाइटहि माहितीपूर्ण आहे.

नितिन देसाईनिर्मित 'अजिंठा' चित्रपट आणि त्यातील रॉबर्ट गिल-पारो ही प्रेमकहाणी संपूर्ण कपोलकल्पित आणि 'बढाचढाके' सांगितलेली आहे असे दिसते. ह्यावर बरीच अर्चा २०१२ साली होऊन गेलेल्या 'अजिंठा' ह्या 'ऐसी'मधील धाग्यावर पाहायला मिळेल. तेथील माझाच रॉबर्ट गिल-पारो प्रेमकहाणीवरील प्रतिसाद येथे चिकटवीत आहे. (खेदाची गोष्ट अशी की त्यात आधारासाठी दाखविलेल्या सर्व लिंक्स मदल्या काळात 'डेड' झालेल्या दिसतात. मला इतकेच आठवते की रॉबर्टच्याच कोणातरी वंशजाने आपल्या कुटुंबाची कुळकथा सांगणारा लेख तेथे ठेवला होता.

"मला वाटते विचारबुद्धि पूर्णत: टांगून ठेवली - total suspension of disbelief - तरच हा चित्रपट पाहावासा वाटेल. ह्यात वर्णिलेली कथा कधी होऊ शकली असती हे पटण्याच्या पलीकडचे आहे.

इंग्रज अधिकारी, शिपाई, अन्य इंग्रज आणि नेटिव स्त्रिया ह्यांच्यामध्ये संबंध सर्रास असत पण ते उघडपणे मांडण्याचे धैर्य कोणी करू शकत नसे. असे उघडपणे करणारा इंग्रज त्यांच्या समाजातूनच बहिष्कृतासारखा वागवला जाई आणि खडयासारखा वगळला जाई. आसपासच्या इंग्रज समाजापासून बंड करून राहणे अशक्य होते कारण अशा इंग्रजाचे उपजीविकेचे साधनच काढून घेतले जाई आणि त्याची इंग्लंडात परत जाण्यापलीकडे त्याला पर्याय उरत नसे.

अमेरिकेमध्ये ज्याप्रमाणे आपले वरचे स्थान वापरून काळे गुलाम ठेवणारे गोरे लोक काळ्या स्त्रियांशी संबंध ठेवत पण त्याची वाच्यता होऊ देत नसत तशा प्रकारचेच संबंध हिंदुस्तानातील इंग्रजहि त्यांच्याशी सहज संपर्कात येणार्‍या आया, मेहतरणी, मेमसाहेबांना घरकामात मदत करण्यासाठी नेमलेल्या स्त्रिया अशांशी चोरूनमारून संबंध ठेवत असत पण त्यात 'रोमँटिक अँगल' नसून लैंगिक भूक शमवणे हाच हेतु असे आणि तो हेतु साध्य करणेहि अवघड नसे.

ह्या संस्थळावर रॉबर्ट गिलची खूप माहिती उपलब्ध आहे. अजिंठा सिनेमाच्या सर्व काळात फ्रान्सेस रिकर्बी नावाच्या पत्नीशी त्याचा विवाह चालू होता. फ्रान्सेस रिकर्बीबरोबर त्याचा विवाह १८४१ साली झाला आणि रॉबर्ट १८७९ मध्ये मृत्यु पावेपर्यंत ते लग्न टिकून होते. १८४२, १८४३, १८४५, १८४७ आणि १८४९ ह्या वर्षांमध्ये आपल्या प्रेमवीराला लग्नाच्या बायकोपासून घडयाळाच्या ठोक्यांच्या नियमितपणे मुले पण होत होती.

मधल्या काळात १८४५त पारोशीहि त्याचा संबंध आला होता. ती जवळच्याच भागातील महादेव कोळी जातीची होती. त्या संबंधाचे वर्णन वरील संस्थळावर 'विवाह' असे करण्यात आले आहे पण ते नाइलाजामुळेच आहे हे खाली टीप ७ मध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. (Software दुसरे काही वर्णन घेण्यास असमर्थ असल्यामुळे 'विवाह' असे वर्णन करावे लागले.) पारोला ह्यासंबंधापासून काही अपत्य झाले असल्यास त्याची नोंद नाही. हेहि तत्कालीन विक्टोरियन नीतिमत्ता संकल्पनांना धरूनच आहे कारण ती मुले काळी असणार आणि गोरा इंग्रज बाप त्यांचे पितृत्व उघड उघड कधीच मान्य करणार नाही. पारोचा मृत्यु १८५६ मध्ये झाला.

पारोच्या मृत्यूच्या पुढेमागे १८५६ मध्येच रॉबर्टने अ‍ॅन नावाच्या बाईशी संबंध ठेवले. (वरील कारणासाठीच विवाह न करताच.) ती मिश्र वंशाची असावी आणि त्यामुळे तिची मुले इंग्लंडमध्ये खपण्याइतपत गोरी असावीत आणि म्हणून ती इंग्लंडात गेलेली दिसतात. (असेहि होऊ शकत असे. काही बापांना आपल्या अनौरस संततीबाबतहि माया असे आणि त्यांना इंग्लंडात घेऊन जाणे, कमीतकमी त्यांच्यासाठी हिंदुस्तानात मृत्युपत्रात तरतूद करणे अशा गोष्टी घडत असत.)

हे सर्व इतक्या विस्ताराने लिहिण्याचे कारण असे की चित्रपटात काहीहि प्रियकर-प्रेयसी प्रकारचे गोडगोड नाते रंगविले असले तरी वस्तुस्थितीत ते पारोच्या बाजूने तारुण्यसुलभ इच्छा आणि अगतिकता, तसेच रॉबर्टच्या बाजूने सहज उपलब्ध लाभ पदरात पाडून घेणे एव्हढेच असावे कारण हेच तत्कालीन समाजस्थितीला आणि इंग्रज-नेटिव संबंधांना धरून आहे.

पारोबाबत रॉबर्टला जे काही वाटत असेल ते उघड दाखविण्याचे धैर्य त्याच्यात नव्हते ह्याचा पुरावा उपलब्ध आहे. पारो १८५६ मध्ये वारली आणि तिचे दफन अजंठयाच्या परिसरात करण्या आले आहे. कबर अजूनहि टिकून आहे असे दिसते. कबरीवर “To the memory of my beloved Paroo who died 23rd May 1856” असा लेख आहे आणि तो रॉबर्टनेच लिहून घेतला असावा. पण स्वतःचे नाव त्याखाली घालण्याचे धैर्य त्याने दाखविलेले दिसत नाही. कसे दाखविणार? त्याची सगळी अजंठा करीयर तिथेच संपली असती. त्याला कोठल्याहि मेसमध्ये प्रवेश मिळाला नसता आणि कोठल्याहि 'अ‍ॅट होम'ला त्याला कोणी बोलावले नसते. निजामानेहि त्याला हैदराबादेतून परत बोलवावे अशी मागणी इंग्रज सरकारकडे केली असती.

पारोच्या जातीत दफनाची पद्धत नसतांना तिचे ख्रिश्चन पद्धतीने दफन झाले ह्यावरून असे दिसते की तिच्या जातीने तिला बहिष्कृत केले असावे.

मायकेल एडवर्ड्सलिखित High Noon of Empire ह्या पुस्तकात असे वाचल्याचे स्मरते की हिंदुस्तानात आलेले इंग्रज आणि नेटिव स्त्रिया ह्यांच्यातील संबंध जहाजांना वाफेची इंजिने लागण्याच्या पूर्वीच्या काळात खूपच मोकळे असत कारण इंग्लंड ते हिंदुस्तान प्रवासाला ७-८ महिने लागत आणि तो प्रवास धोक्याचाहि होता. त्याकारणाने लग्नायोग्य इंग्रज मुलगी हिंदुस्तानामध्ये क्वचितच दिसत असे. नंतर १८३०च्या पुढेमागे जहाजे वाफेवर चालू लागली आणि अशा मुली हिंदुस्तानात येऊ लागल्या. (थॉमस बॅबिंग्टन मेकॉले ह्याची येथे आठवण येते. तो १८३२ मध्ये हिंदुस्तानात आला तेव्हा त्याची उपवर बहीण हॅना त्याच्याबरोबर आली आणि अपेक्षेनुसार तिला लवकरच चार्ल्स ट्रिवेल्यन हा उत्तम करीयरचा नवरा मिळाला.) ह्यामुळे उपलब्धतेमुळे आणि विक्टोरियन इंग्लंडच्या वाढत्या प्रभावामुळे इंग्रज पुरुष आणि नेटिव स्त्री ह्यांच्या संबंधाकडे पाहण्याची दृष्टि बदलली. अर्थात सर्वसामान्य सोल्जर, रेल्वेतला फोरमन, तारमास्तर प्रकारच्या इंग्रजाला त्याहि मुली मिळणे दुरापास्तच होते. नेटिव स्त्रियांचे आणि त्यांचे संबंध चालूच राहिले पण त्या संबंधांमध्ये एक नवाच चोरटेपणा दिसू लागला.

सारांश असा की सोयीसाठी निर्माण झालेल्या अशा संबंधांना बढाचढाके ग्लोरिफाय करून त्यांचे रोमिओ-ज्यूलियट बनविण्याचे प्रयत्न पटत नाहीत. "अजिंठा झाडांचा...झाडांच्या झुलत्या प्रवाही पाण्यातला...लेनापूर फर्दापूरच्या गावंढळ गर्दीतला...बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला...अजिंठा' असले काव्यात्मक काहीच झाले नाही. झाले हेच की सत्ताधारी इंग्रजाने सहज उपलब्ध पारोचा चोरूनमारून भोग घेतला."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी वॉल्टर स्पिंक यांचे पुस्तक जरुर वाचेन. मला "शोध"मध्ये टाकूनसुद्धा अजिंठ्यावरची लिंक सापडली नव्हती. मलाही आश्चर्य वाटले की या बद्दल चर्चा कशी नाही.

गिल आणि पारोच्या कहाणीतील मसाला कदाचित काल्पनिक असेलही. पण एक प्रेमकथा आणि अजिंठ्याची पार्श्वभूमी यामुळे मला हा चित्रपट भावला. महानोरांचा हा विडीयो बरंच काही सांगून जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी

लेख आणि प्रतिसाद रोचक.

ऐसीवरची 'शोध' ही सोय फार उपयुक्त नाही. त्याऐवजी गूगलमध्ये सर्च टर्म घालून त्यात site:aisiakshare.com असं लिहिलं की गोष्टी चटकन सापडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

https://cse.google.com/cse/ इथून गूगलचं ऐसीपुरतं सर्च इंजिन तयार करुन त्याचं विजेट 'शोध'करिता लावता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाल्टर स्पिंक साहेब झकास! विडीयो मस्त आहेत. धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी

माहितीपूर्ण. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरविंदरावांनी जो मुद्दा मांडला आहे- इंग्रज अधिकारी भारतीय मुली इत्यादीवर बराच प्रकाश White Mughals by William Darlymple*या पुस्तकात पाडलेला दिसेल.

* जयपूर लिट्ररी फेस्टिवल भरवणारा।लेखाचा वेगळा विषय ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0