ऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ४) - माझे आजचे आकलन

------
भाग १ | भाग २ | भाग ३
------

Orpheus
( Image Courtesy : SwittersB )

जेंव्हा जेंव्हा मी जी एंची ऑर्फिअस वाचतो, तेंव्हा तेंव्हा मला त्यातून काहीतरी नवीन सापडल्यासारखे वाटते. आता वाचत असताना जाणवले की आपण सगळे ऑर्फिअस आणि युरीडीसीचे अवतार आहोत. आणि थोड्या फार प्रमाणात प्लुटो व पर्सिफोनचे देखील. इथे एक लक्षात ठेवायचे की कुणीही कायमचा एक अवतार म्हणून जन्माला येत नाही. आपण ह्या सगळ्या भूमिका आपल्याच नकळत आलटून पालटून घेत असतो. किंवा अजून सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे आपण झाड असतो आणि वेगवेगळ्या वेळी ऑर्फिअस, युरीडीसी, प्लुटो आणि पर्सिफोनचे गुणावगुण आपल्याला पकडत असतात, आपल्या अंगात येतात, आपल्याला पछाडून टाकतात.

आजकालच्या शहरी जगात जिथे प्रेमविवाह फार मोठ्या प्रमाणात होतात, कुटुंबाचा आकार फार छोटा असतो आणि नवरा बायको पैसा कमाविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी काम करीत असतात, तिथे घरोघरी अनेक ऑर्फिअस आणि अनेक युरीडीसी वेगवेगळे अनुभव वेगवेगळ्या वेळी घेत असतात. सारखे एकमेकांच्या पुढे मागे होत असतात. कधी कधी एखादा जोडीदार आयुष्याच्या प्रचंड गतीमध्ये पुढे पुढेच जात राहतो आणि त्याचा जोडीदार मात्र त्या वेळी ते अनुभव घेऊ न शकल्याने मागे राहतो. मग केवळ शरीराने जिवंत म्हणून आणि कायद्याने नाते तोडता येत नाही म्हणून असा प्रत्येक ऑर्फिअस आणि प्रत्येक युरीडीसी, पुढे गेलेल्याची घुसमट आणि मागे राहिलेल्याची ओढाताण सहन करीत राहतात.

असा विचार करीत असताना मला एकदम जाणवलं की आपण तर ऑर्फिअस आणि युरीडीसीने न जगलेले जीवन जगत आहोत. जी एंची युरीडीसी म्हणते त्याप्रमाणे मृत्यू हा एक असा बिंदू आहे की जो एकदा ओलांडला की पुन्हा मागे फिरता येत नाही. ती एक बिंदू ओलांडते आणि मग तिची आणि ऑर्फिअसची कायमची ताटातूट होते. पुन्हा संधी मिळूनही ते दोघे तिचा वापर करीत नाहीत. त्यांचे सहजीवन अपूर्ण राहते. ते प्रत्यक्षाच्या पातळीवर येतच नाही आणि त्यांची झाकली मूठ सव्वा लाखाची बनून अजरामर प्रेमकथा बनते.

युरीडीसीने केलेली, 'ओलांडून परत न येत येण्यासारखा बिंदू' अशी मृत्यूची व्याख्या मान्य केली तर प्रत्येक अनुभव एकदा घेऊन झाला की त्या अनुभावापुरते आपण मृत झालेलो असतो हे देखील मान्य करावे लागेल. आणि मग प्रत्येक अनुभवानंतर न येणारा शारीरिक मृत्यू, आपल्याला सहजीवनाची, ऑर्फिअस आणि युरीडीसीने नाकारलेली संधी पुन्हा पुन्हा देत असल्याने, आपल्या आयुष्याच्या कथेला जी एंच्या ऑर्फिअसच्या कथेचे परिमाण लागू होत नाही हे देखील मान्य करायला सोपे जाईल. आपले सहजीवन प्रत्यक्षाच्या पातळीवर येत असल्याने आपली मूठ झाकलेली राहत नाही. त्यामुळे प्रेमामुळे असो किंवा रीतीप्रमाणे ठरवून, आपल्या सहजीवनातून प्रेमाने काढता पाय कधी घेतला ते आपल्याला कळत नाही.

कयामत से कयामत तक चा उल्लेख केला होता मी या लेखमालेच्या दुसऱ्या भागात, त्याच्यावरून मग सगळ्या गाजलेल्या प्रेमपटांच्या कथा आठवल्या. एक दुजे के लिये वगैरे. मग प्रेमाच्या गाजलेल्या गोष्टी आठवल्या. हीर रांझा, शिरीन फरहाद, लैला मजनू, सलीम अनारकली वगैरे. अगदी आपल्या राधा कृष्णाची देखील. मग आठवल्या दोन कविता. एक कुसुमाग्रजांची पृथ्वीचे प्रेमगीत आणि दुसरी गोविंदाग्रजांची प्रेम आणि मरण. पहिलीत मनाने वरलेला प्रियकर आणि प्रेमगीत म्हणणारी प्रेयसी जिवंत रहातात पण भेटत नाहीत. आपापल्या कक्षेत फिरत राहतात. थोडेफार राधा कृष्णासारखे तर दुसऱ्या कवितेत ज्या क्षणी निग्रही प्रियकराला त्याची प्रेयसी भेटते त्याक्षणी त्याचा मृत्यू होतो. या सगळ्या चित्रपटात, प्रेमकथात, प्रेमकवितेत सूत्र एकच. या सगळ्या झाकल्या मुठी आहेत. सातत्याचे सहजीवन न जगता, केवळ एका क्षणाचे गुणगान करून प्रेमाची महती गाणाऱ्या रचना आहेत हे जाणवले. इतकेच काय पण राधा कृष्णाच्या जोडीतील, कृष्ण ज्यांच्याबरोबर सातत्य असलेले सहजीवन जगला त्या रुक्मिणी, सत्यभामा, जाम्बवती, कालिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा या अष्टभार्यांपैकी एकीचेही सहजीवन आदर्श प्रेम म्हणून गायले जात नाही. म्हणजे जेंव्हा भगवंतांची झाकली मूठ उघडते तेंव्हा ती देखील प्रत्येक वेळी सव्वा लाखाची नसते हेच सिद्ध होते.

विचारांची गाडी इथपर्यंत आल्यावर एकदम आठवली कुसुमाग्रजांची अजून एक कविता “प्रेम कुणावर करावं ?”
एक गोष्ट जाणवली की भलेही यात कुसुमाग्रजांनी भिन्न गोष्टींवर प्रेम करायला सुचवलं असलं तरीही त्यांनी जितक्या स्पष्ट शब्दात सर्व पर्याय सुचवले आहेत तितक्या स्पष्ट शब्दात नवरा बायकोच्या नात्याचा, भारतीय संस्कृतीप्रमाणे सात जन्माच्या जोडीदारांचा, पर्याय सुचवलेला नाही आहे. त्यांनी सुचवलेले सर्व पर्याय हे मानवी आयुष्यातील विविध घटना, भावना किंवा त्यांचे प्रतीक असलेल्या व्यक्ती आहेत. खरं तर त्यांनी सांगितलेल्या अनेक पर्यायांना "वात्सल्य, अभिलाषा, आकर्षण, आदर, सहानुभूती, आत्मानुभव, कर्तव्य" अशी प्रेमापेक्षा अधिक समर्पक विशेषणे आहेत. पण कुसुमाग्रजांना कवितेतून व्यक्त करायचे होते ते आयुष्यावरचे प्रेम. त्यांच्या दृष्टीने प्रेम म्हणजे प्रचंड मोठा इतिहास असणाऱ्या संस्कृतीरूपी वाहनाला भविष्याकडे नेणारे इंधन, म्हणून त्यांनी आयुष्यातील मान-अपमान, आशा-निराशा, मैत्री-शत्रुत्व, जय-पराजय या सर्वांवर प्रेम करायला सुचवलंय.

पण त्यात संस्कृतीचा सर्वात लहान एकक म्हणजे कुटुंब आणि त्यातील नवरा बायकोचे नाते, लग्न ही घटना आणि त्यानंतर येणारा संसार याचा कुठेही उल्लेख नाही. कदाचित कुसुमाग्रजांनादेखील या नात्यात होणाऱ्या प्रेमाच्या ओढाताणीची कल्पना आली असावी. मागे राहिलेल्या ऑर्फिअसचे आणि पुढे गेलेल्या युरीडीसीचे पण तरीही एकत्र राहाव्या लागणाऱ्या या जोडीचे दु:ख्ख त्यांना जाणवले असावे, म्हणून त्यांनी स्पष्ट शब्दात,

प्रेम नवऱ्यावर करावं
प्रेम बायकोवर करावं,

असं सांगून आपल्यावर ही जबाबदारी टाकली नसावी.

मग करायचे काय? प्रेमाचा भास होणारे पण त्याने आपल्या सहजीवनातून काढता पाय कधी घेतला ते न कळल्याने उरलेले रखरखीत सहजीवन तसेच जगत रहावे का? की दुसरा काही उपाय आहे?

त्याचे उत्तर पण जी एंनी ऑर्फिअसच्या कथेत देऊन ठेवले आहे असे मला वाटते. "आपल्या मर्यादा ओळखणे याला कदाचित ज्ञान देखील म्हणता येईल" असे जी ए प्लुटोच्या तोंडून आपल्याला सांगतात.

प्रत्येक अनुभवानंतर शारीरिक मृत्यू न येणे आणि एकाच जीवनात अनेक अनेक अनुभव जोडीदारापेक्षा वेगळ्या वेळी घ्यावे लागणे, सातत्य असलेले सहजीवन जगायला लागणे हीच आपली मर्यादा आहे याचे एकदा ज्ञान झाले की अश्या सहजीवनातून काढता पाय घेणाऱ्या प्रेमाला थांबवणे आपल्याला कदाचित थोडे सोपे जाईल.

एक तर सहजीवनातील जोडीदाराला आपल्या बरोबर प्रत्येक अनुभवात सामील करून घ्यावे आणि ते शक्य नसेल तर वाट पाहण्यास तयार व्हावे, इतकेच आपण करू शकतो. दोन कनेक्टिंग ट्रेन मध्ये किंवा विमानाच्या फ्लाईटमध्ये जर अंतर असेल तर आपण मनाची तयारी करून तो मधला वेळ चांगला जावा म्हणून आधीच आवडते पुस्तक किंवा गेम किंवा अजून काहीतरी घेऊन ठेवतो आणि वाट पाहण्याचा आपला वेळ सुसह्य करतो तसेच काहीसे केल्यास जोडीदार त्याच्या स्वतःच्या वेगाने येत असताना आपला खोळंबा होतोय अशी भावना फार जाणवणार नाही. कधी कधी पुढील गाडी किंवा विमान यायचे जास्त लांबते हे खरे आहे पण मी आशावादी आहे की, मागे राहिलेल्या जोडीदाराला त्याच्या अंगात आलेल्या ऑर्फिअसच्या भूमिकेचे भान असेल आणि तो आपला वेग वाढवण्याचा प्रयत्न नक्की करेल. आणि पुढे गेलेली युरीडीसी त्याला या प्रयत्नात घाई न करता मदत करेल.

युरीडीसी शारीरिक मृत्यूचा अनुभव घेते. म्हणून तो त्याच वेळी अनुभवणे ऑर्फिअसला शक्य नसते. आपल्या सहजीवनात आपण रोजच्या रोज शारीरिक मृत्यूचा अनुभव घेत नसून इतर अनुभव आपल्या जोडीदाराच्या आधी घेत असतो. हे अनुभव आपल्या मेंदूत नोंदले जातात आणि मग आपण ते व्यक्त करायला विसरतो, कंटाळतो किंवा असमर्थ असतो. त्यामुळे दोघांमधील अंतर वाढत जाते. परंतु आपण सध्या ज्या जगात राहतो त्या जगात विज्ञानाने, अनुभव मेंदूबाहेर पकडून ठेवण्यासाठी फोटो, व्हिडीओ सारखी अनेक साधने उपलब्ध करून दिली आहेत. त्याशिवाय, संपर्काच्या साधनांच्या आधारे हे पकडून ठेवलेले अनुभव आपण जवळपास त्याच क्षणी आपल्या जोडीदाराबरोबर शेअर करू शकतो आणि त्याचा आपल्या बरोबर राहण्याचा वेग वाढवू शकतो. याशिवाय संवाद तुटू न देणे ही जबाबदारी आपल्याला सजगपणे सांभाळावी लागेल. तर ही उघडलेली मूठ देखील सव्वा लाखाची ठरू शकेल.

जसे जोडीदाराच्या बाबतीत आपण ऑर्फिअस किंवा युरीडीसी असतो तसेच, आपल्या मुलांच्या बाबतीत आपण प्लुटो असतो. जसा प्लुटो आपल्या आयुष्यातील मागे घडलेली घटना ऑर्फिअसच्या आयुष्यात घडवण्याचा प्रयत्न करतो. तसेच आपण देखील आपल्या आयुष्यातील पूर्ण न होऊ शकलेल्या शक्यता आपल्या मुलांच्या आयुष्यात घडवण्याच्या प्रयत्न करतो. छोटे कुटुंब सुखी कुटुंबच्या आपल्या जगात प्रत्येक कुटुंबात मुले कमी आणि त्यांच्या भविष्याच्या शक्यता अनंत आहेत. त्यामुळे आपण "भी इस दुनिया में जिंदा मेरा नाम रहेगा, जो भी तुझको देखेगा तुझे मेरा लाल कहेगा" हे गाणे नकळत कायम आचरणात आणत असतो.

पण एक गोष्ट विसरतो की प्लुटो ऑर्फिअस आणि युरीडीसीला निवडीचे स्वातंत्र्य देतो. आपला निर्णय त्यांच्यावर लादत नाही आणि त्यानी त्यांची निवड केल्यावर ती योग्य की अयोग्य यावर भाष्य न करता त्यांना त्यांचे सुखद किंवा दु:ख्खद परिणाम भोगायला मोकळे करतो. हे प्लुटोच्या भूमिकेतल्या आपल्याला कायम लक्षात ठेवायला हवे. त्याचवेळी, मुलांनी पूर्ण विचारांती घेतलेला निर्णय अयोग्य आहे असे म्हणणारी पर्सिफोन जर आपल्या अंगात आली तर तिला शांत करायची जबाबदारी देखील आपल्यावरच असते. मला वाटते प्लुटो आणि पर्सिफोनचे हे रूपक नोकरी व्यवसायातील कनिष्ठ किंवा नव्याने रुजू झालेले सहकारी या सगळ्यांच्या बाबतीत किंवा सासू-सासरे आणि सून-जावई यांच्या बाबतीत देखील तितकेच चपखल बसेल.

या लेखमालेच्या सुरवातीच्या दोन भागात मी ऑर्फिअसची कथा आणि तिचे प्रचलित साहित्यातील इतरांनी लावलेले अर्थ लिहिले. तिसऱ्या भागात जी एंनी त्या कथेचा केलेला विस्तार आणि तिची मला लागलेली लागलेली संगती लिहिली. आणि या चौथ्या आणि अंतिम भागात जी एंच्या या मनोहारी रांगोळीचे आपल्या जीवनाशी साधर्म्य नसून देखील आपल्याला ती कशी मार्गदर्शन करते ते लिहिले. पण मला कल्पना आहे की हे माझे आजचे आकलन आहे. आणि ते अपूर्ण आहे. आयुष्याचे अजून जितके नवीन अनुभव घेईन तितके माझे आकलन अजून पूर्णत्वाला जाईल. पण, ‘जे आहे ते अपूर्ण असून ते अंतिम ज्ञान नव्हे’ हे मला कळले आहे, हेच जणू मला आता प्लुटोच्या विचाराने पछाडले असल्याचे लक्षण आहे. तुम्हाला जेंव्हा तुमचा ऑर्फिअस किंवा युरीडीसी किंवा प्लुटो किंवा पर्सिफोन पछाडेल तेंव्हा तुम्ही सजग असावे आणि त्या विचाराचा आनंद लुटावा अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि जी एंनी मला या कथेतून जे दिले ते तुमच्यापर्यंत शब्दातून पोहोचवण्याचा माझा प्रयत्न थांबवतो.

------
भाग १ | भाग २ | भाग ३
------

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

"Marriages maybe made in heaven, but a lot of the details have to be worked out here on earth. - "Author: Gloria Pitzer
.

युरीडीसी शारीरिक मृत्यूचा अनुभव घेते. म्हणून तो त्याच वेळी अनुभवणे ऑर्फिअसला शक्य नसते. आपल्या सहजीवनात आपण रोजच्या रोज शारीरिक मृत्यूचा अनुभव घेत नसून इतर अनुभव आपल्या जोडीदाराच्या आधी घेत असतो. हे अनुभव आपल्या मेंदूत नोंदले जातात आणि मग आपण ते व्यक्त करायला विसरतो, कंटाळतो किंवा असमर्थ असतो. त्यामुळे दोघांमधील अंतर वाढत जाते.

वा! खूप छान.
.
पण हे अंतरच बरे वाटते. मला माझ्या प्रतिकृतीशी विवाह करायला अज्जिबातच आवडणार नाही. त्याचे व माझे अनुभव वेगळे आहेत आणि म्हणुनच एकमेकांत आकर्षण आहे, एकमेकांची क्षितीजे रुंदावण्याच्या शक्यता आहेत. मी अमका अनुभव घेतल्याने जर त्या अनुभवाबद्दलची माझी प्रतिक्रिया/संवेदना बोथट झाली असेल तर उलट माझ्या जोडीदाराचा त्या अनुभवाकरता असणारा लसलसता अविष्कार पाहून, त्याची त्या अनुभवाला भिडण्याची लालसा पाहून माझ्या वठलेल्या संवेदनेस पालवी फुटू शकते.
.
सहसंवेदना ही फार सुंदर संकल्पना आहे पण अप टू अ सर्टन लिमिट.

Ay, you shall be together even in the silent memory of God.
But let there be spaces in your togetherness,
And let the winds of the heavens dance between you.

.
ही जी अनुभवांची भिन्नता आहे, हे जे मधले अंतर आहे त्यातच नंदनवनाचे सुगंधी वारे विहार करु शकतात. एक पुढे गेला व एक मागे राहीला तर फार काही दु:ख नाही कारण त्या मागे राहीलेल्याने नक्कीच अन्य बर्‍याच अनुभवांत, पुढे गेलेल्या जोडीदारास मागे टाकलेले असेल. Every seeming disability is an opportunity.
_____
मुक्तक किंवा चिंतन जे काही आहे ते फार आवडले.

एक कुसुमाग्रजांची पृथ्वीचे प्रेमगीत आणि दुसरी गोविंदाग्रजांची प्रेम आणि मरण.

ओहोहो काय कविता आठवलीत राव. "प्रेम आणि मरण" सुपर्बच. खरं तर दोन्ही अप्रतिमच कविता आहेत पण पृथ्वीचे प्रेमगीत रोज रोज रोज वाचून वाचून माझ्या संवेदना बोथट झालेल्या आहेत मानसिक ऑर्गॅझम चा refractory period चालू आहे. याउलट "प्रेम आणि मरण" वाचून शतके लोटली आहेत.

१- In human sexuality, the refractory period is usually the recovery phase after orgasm during which it is physiologically impossible for a man to have additional orgasms due to increase in the penile sensory threshold

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण हे अंतरच बरे वाटते. मला माझ्या प्रतिकृतीशी विवाह करायला अज्जिबातच आवडणार नाही. त्याचे व माझे अनुभव वेगळे आहेत आणि म्हणुनच एकमेकांत आकर्षण आहे, एकमेकांची क्षितीजे रुंदावण्याच्या शक्यता आहेत. मी अमका अनुभव घेतल्याने जर त्या अनुभवाबद्दलची माझी प्रतिक्रिया/संवेदना बोथट झाली असेल तर उलट माझ्या जोडीदाराचा त्या अनुभवाकरता असणारा लसलसता अविष्कार पाहून, त्याची त्या अनुभवाला भिडण्याची लालसा पाहून माझ्या वठलेल्या संवेदनेस पालवी फुटू शकते.
.

याच धर्तीवर एक कल्पना सुचली होती .. गेल्या महिन्याभरापासून डोक्यात घोळतेय ... व्यवस्थित मुरली डोक्यात आणि वेळ मिळाला की लिहीन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आन्दो!! (आने दो)
नेकी और पूछ पूछ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"ऑर्फिअस" कथा आज वाचली. मग परत तुमच्या लेखाचे ४ ही भाग वाचून काढले. खूपच आवडले.
____
स्वामीही वाचली. मग मात्र डोकं सुन्न झालं. जी एंचा डोस लहान प्रमाणातच घेववतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!